दोन-अडीच महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल. युट्यूब बघत असताना अचानक ‘जंगल एकोज’ ह्या चॅनलवर ‘किरण पुरंदरे म्हणजेच किका’ यांची मुलाखत दिसली. आधीही त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं व हल्लीच नवरा नागझिऱ्याला जाऊन आला तेव्हा त्याच्याकडूनही त्यात भर पडली. त्यामुळे तो पॅाडकास्ट बघायला लागलो. तो बघितल्यावर मग एकामागून एक त्याचेच पॅाडकास्ट दिसायला लागले. बरेच ऐकलेही. त्यात एक फुलपाखरांवरही होता. ते ऐकताना माझ्या डोक्यात अचानक विचार आला की कुठेही बाहेर गेलो तर फुलपाखरं दिसतात उडताना पण आपण त्यांच्याकडे कधी फार लक्ष दिलं नाही. गच्चीत झाडं आहेत तेव्हा आधीही दिसली आहेत. फुलपाखरांचे सुरवंट घरी आणून वाढवलेही आहेत पण त्यापलिकडे त्यांच्यात इंटरेस्ट नाही दाखवला. मग ठरवलं हा विषय जरा सिरीयसली घेऊया. गच्चीत जाऊन लक्ष द्यायला लागले. सकाळी १०.३०-११ ला कॅमेरा घेऊन जायला सुरूवात केली व दिसतील आणि जमतील तसे फोटो काढायला लागले. मला त्यात मजा वाटायला लागली. नवऱ्यालाही त्यात इंटरेस्ट वाटू लागला. पण गच्चीत येणारी किंवा दिसणारी फुलपाखरं तशी लिमिटेड होती. मग सप्टेंबर महिन्यात सायन-धारावी भागात ‘महाराष्ट्र नेचर पार्क’ आहे, तिथे गेलो.
हे पार्क अगदी डंपिंग ग्राऊंडवर बनवलं आहे. नेटिव्ह अशी बरीच झाडं आहेत तिथे. मॅक्रो फोटोग्राफी करणारी मंडळी जात असतात तिथे. पार्कमध्ये गेल्यावर घाणेरीच्या व ब्लू स्नेकवीडच्या झाडांवर भरपूर फुलपाखरं उडत होती. दोन अडीच तास कसे गेले कळलंच नाही. एकंदरीत मजा आली. फुलपाखरांच्या नावांच्या यादीत भर पडली. गच्चीत कॅमेरा घेऊन जाण्याचा सिलसिला होताच सुरू. तिथेही अजून २-३ नवी फुलपाखरं दिसली.
मागे फोटो टाकले तेव्हा फुलपाखरांचं जीवनचक्र लिहीलं होतं. १. अंडी २. अळी/सुरवंट ३. कोष (पुपा) ४. फुलपाखरू. …कोषातून बाहेर येतानाच पूर्ण विकसित फुलपाखरू बाहेर येतं. ह्यांचं आयुष्य इनमिन महिन्या-दीड महिन्याचं. ते ही जगली वाचली तर. त्यामुळे या मिळालेल्या महिन्याभरातच त्यांना सगळं उरकून पुढच्या पिढीच्या हातात सोपवायचं असतं. हे सगळं ऐकल्यापासून मला या इवल्याश्या जीवाबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला.
यांच्याबद्दल माहिती करून घेण्यासाठी गुगलला साकडं घातल्यावर जी काही माहिती मिळाली ती आश्चर्यचकित करणारी होती. फुलपाखरांच्या शरीराचे मुख्यत: तीन भाग असतात - १. डोकं २. Thorax (छातीचा भाग) Abdomen (पोट).
डोक्याच्या भागात ॲंटेना, प्रोबॅासिस आणि डोळे असतात. ॲंटेना म्हणजे त्यांचं नाकाचं काम करतं. हवेतील रसायनांचा वास ते फुलांचा गंध तसेच संभाव्य जोडीदाराचा गंध या ॲंटेनाद्वारेच कळतो. या ॲंटेनाचं काम तोल सावरणे व आजूबाजूच्या हालचाली ओळखणे हे ही असतं.
प्रोबॅासिस हे स्ट्रॅा सारखं काम करतं. मकरंद, पाणी, फळांचा रस व तत्सम द्रवपदार्थ शोषून घेण्याचं काम हे प्रोबॅासिस करतं. ह्याची गरज असेल तेव्हा ते बाहेर येतात, बाकीच्या वेळेस वायरसारखे गुंडाळून ठेवलेले असतात.
मनुष्याच्या डोळ्यात जशी एकच लेन्स असते तसं फुलपाखरांमध्ये नसतं. त्यांचा संयुक्त डोळा (Compound Eye) हा असंख्य डोळ्यांनी बनलेला असतो ज्याला Ommatidia म्हणतात त्यात प्रत्येक डोळ्यात लेन्स असते.
(ही वरची माहिती सायन्सच्या विद्यार्थिनींना माहिती असेल बहुधा कारण माझ्या धाकट्या बहिणीला हे सगळं माहिती होतं).
तसंच ह्यांची काहीच माहिती नसल्याने फुलपाखरांचे फोटो गुगलवर टाकून किंवा मग जवळपास राहाणारा एक माहितगार आहे त्याला फोटो दाखवून आयडी करणं सुरू आहे. त्यामुळे चुकभूल माफ करावी. मराठी नाव तसंच होस्ट प्लॅन्ट माहित असेल तर लिहीन. बऱ्याच ठिकाणी बघितलं तर होस्ट प्लॅन्टची नावं साईंटिफिक/बोटॅनिकल लिहिली आहेत. ती नावे गुगल करून झाडांची साधी नावं माहिती करून घ्यायचा उत्साह नाहीये मला त्यामुळे मी लिहिलीही नाहीयेत.
पक्षांचे फोटो काढतेच पण यांचे फोटो काढायला लागल्यावर लक्षात आलं की यांचे फोटो काढायला जरा कठीणच आहे. जरा पानावर/फुलांवर टेकलंय म्हणून फोकस करायला जावं तर ते उडून गेलेलं असतं. असो….. गेल्या महिन्या-दीड महिन्याच्या काळात बऱ्याच फुलपाखरांच्या जाती कळल्या, बरेच फोटो काढले ते तुमच्याशी शेअर करते. मागच्या एका लेखातही काही फोटो शेअर केले होते.
फुलपाखरांची मराठी नावं मजेशीर वाटली मला. काहींच्या नावावरून अंदाज बांधता येतो पण काहींची कशावरून पडली असतील ते कळलं नाहीये अजूनतरी. ज्यांची नावं कळली आहेत ती लिहिली आहेत.
Common Lime (लिंबाळी)
ह्यांचं अंडी घालायचं झाड लिंबाचं असतं म्हणून हे नाव पडलं आहे. बऱ्याचदा अधून मधून दिसत असतं गच्चीत.

कॅमेरा घेऊन गच्चीत जायचे तेव्हा हे भिरभिरताना दिसायचं पण जरा बसेल तर शप्पथ. सतत अशोकाच्या झाडापाशी जायचं. शोधल्यावर गुगलने सांगितलं की अशोकाचं झाड होस्ट प्लॅन्ट आहे त्याचं….मग बरोबर. आम्हांला भरपूर वाट पहायला लावून मग एकदा ते बोगनवेलीवर आलं. नंतर त्याची भीड चेपली वाटतं, सदाफुली व नंतर इक्झोरावर बसलं. समाधानकारक फोटो मिळाल्यावर मी फोटो काढायचं सोडून दिलं.
Tailed Jay (अशोकासक्त)

ह्याचा फोटो मी आधीच्या बीबीवर टाकला होता. हे Mottled Emigrant (चट्टेरी भटक्या 🤣). नावाला अगदी सार्थ करत गच्चीत गेलं की पहिलं दर्शन याचंच असतं.

Common Emigrant. हे आणि वरचं Mottled ही दोन्ही एकाच फॅमिलीमधली. आकार, पंखांचा रंग व त्यावरील डिझाईन यात फरक आहे. हे ही मागच्या बिल्डिंगमधल्या एका झाडावर फिरत असतं.

हे खालचं इवलंसं फुलपाखरू जास्वंदाच्या पानावर बसलेलं दिसलं.
Plains Cupid (पठारी पांडव)

हे पहिल्यांदा जांभळाच्या झाडावर बसलेलं मिळालं. नंतर बघितलं तर ते आंब्याच्या झाडात, जांभळाच्या झाडात नाहीतर पिवळ्या फुलांच्या झाडावरच दिसतं.
Black Rajah (कृष्ण नरेश)

असंच एक दिवशी टळटळीत उन्हात गच्चीत फुलपाखरांची वाट बघत उभं असताना इक्झोराच्या झाडापाशी हे घिरट्या घालताना दिसलं. आकाराने थोडं मोठं. छान ॲाफ व्हाईट व केशरी रंगामुळे उठून दिसत होतं. जमतील तसे फोटो काढले व शोधलं तर ते Great Orange-tip होतं. नंतरही एक-दोन दिवस दर्शन व फोटो काढायची संधी दिली त्याने.
Great Orange-tip


काही वर्षापूर्वी Danaid Eggfly (छोटा चांदवा) हे फुलपाखरू गच्चीत दिसलं होतं. त्यावेळेस साध्या फोनच्या कॅमेऱ्याने फोटो काढला होता. सप्टेंबरमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र नेचर पार्कला गेले तेव्हा Great Eggfly हे दिसलं. या महिन्यात ते गच्चीवर दिसलं.
Great Eggfly


फुलपाखरं व त्यांचे फोटो या विषयाने पछाडलं असल्याने एकदा दुपारी २ वाजताही गच्चीत गेले. फुलपाखरं ही ऊन असेल तिथेच असतात. कढिलिंबाच्या झाडावर हे भिरभिरताना सापडलं. अर्थात हे तसं म्हटलं तर कॅामनच होतं.
Common Mormon (बहुरूपी)

हे अचानकच दिसलं. आधी Black Rajah आहे असं वाटलं. इतकं कोपऱ्यात जाऊन बसलेलं की फोटोसाठी फारच मेहनत करावी लागली.
Lemon Pansy (पितनेत्री भिरभिरी)

सकाळी ८-९ च्या आसपास गच्चीत अचानक एकदम Common Jezebel (हळदीकुंकू) दिसायला लागलं. तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी हे नक्की बघितलं असेलच. पण अजिबातच कुठे बसत नव्हतं. शेवटी महाराष्ट्र नेचर पार्कच्या दुसऱ्या फेरीला व्यवस्थित फोटो मिळाला.

खालचे फोटो महाराष्ट्र नेचर पार्कला काढलेले आहेत. तिथे गेल्या गेल्या घाणेरीच्या व स्नेकवीडच्या फुलांवर फुलपाखरंच फुलपाखरं. हे बघू की ते बघू असं झालेलं.
Commander (नायक)

Common Grass Yellow (तृण पिलाती)

Common Gull (कवडशा)

Blue Tiger (नील रूईकर)

Common Jay (शेवाळी)


Common Pierrot (कवडा)
हे फुलपाखरू इतकं छोटं होतं की पायाखाली लक्ष न देता चाललं तर दिसणारही नाही. गवताच्या एका पातीवर बसलं होतं.

Plain Tiger (रूईकर)

Yellow Orange-Tip

Striped Tiger

Common Palmfly (ताडपत्री)

Tawny Coster (कृष्णकमलिनी)

Common Castor

Gray Pansy (राखी भिरभिरी)

महाराष्ट्र नेचर पार्कच्या दोन फेऱ्या झाल्यावर अनेक वर्षांपासून ऐकलेल्या ठाण्याच्या ओवळेकर वाडी फुलपाखरू उद्यानाला भेट दिली. उद्यान कसलं, नुसतंच रान माजलेलं होतं. तिथे गेल्यावर फुलपाखरांच्या यादीत अजून ४-५ नावांची भर पडली. तिथे जाण्याचं मुख्य आकर्षण होतं -Sahyadri Blue Oakleaf (शुष्कपर्ण) हे फुलपाखरू.
Common Baron (सरदार)

Baronet

Common Sailor (तरंग)

Dark-branded Bushbrown

Lime Blue (निलिंब)

Common Wanderer (विमुक्ता)

Sahyadri Blue Oakleaf (शुष्कपर्ण)
हे फुलपाखरू अगदी नावाप्रमाणेच वाळक्या पानासारखं (शुष्कपर्ण) दिसतं. नीट बघितलं तरच हे फुलपाखरू आहे हे लक्षात येईल. फोटो बघितल्यावर कळेलच. पण आम्हांला दिसलं तेव्हा ते इतक्या वाईट्ट ठिकाणी बसलं होतं की फोननेही धड फोटो येईना. त्यामुळे जरा निराशाच झाली.


