माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग २

भाग १

व्हिसा मिळाला आणि खरेदीची एकच धांदल उडाली. थोडेसे गरम कपडे घ्यायचे प्रवासी कंपनीने सुचवले होते. कपडे, बूट अशी खरेदी, क्लिनिकला पेशंट्सची कामं आवरणं यात दहा दिवस उडून गेले. शुक्रवारी पहाटे आमचे टर्कीश एयरलाईनचे विमान अगदी वेळेवर इस्तंबुलला येऊन पोहोचले. पुढे इस्तंबुल रोम असे दोन तासानी विमान बदलून जायचे होते. विमानाबाहेर येऊन बघतो तर विमानतळावर अफाट गर्दी. पिक अवरमधलं डोंबिवली स्टेशन झालं होतं. तिथे गेटपाशी आल्यावर कळलं की पुढची फ्लाईट बेमुदत लेट आहे कारण रोमच्या टर्मिनल तीनला आग लागल्याने कालपासून रोमचा विमानतळ बंद आहे! इस्तंबुलचा विमानतळ आपल्या टी टूच्या पुढे अगदीच यस्टीस्टँड दिसत होता. त्यात गेटवर तौबा गर्दी आणि प्रचंड उकाडा. सतत इकडून तिकडे फिरणारे पांढर्‍या कपड्यातले मक्का यात्रेकरू कुठेही उभे राहून नमाज पढत होते. टर्किश डिलाईट्ची चव घेत परत एकदा आमच्या गेटवर आलो, तर गर्दी अजूनच वाढलेली. या विमानतळावर अतिशय अरूंद पॅसेजेस जायला यायला ठेवलेले आहेत, त्यामुळे लोकांना धक्के खात यावे लागत होते.तेवढ्यात मला बसायला जागा मिळाली. म्हणून त्या सीटरूपी फळकूटावर मी बसून घेतले. तोच समोरून आमच्या ट्रीपमधली वयस्कर मंडळी आली. त्यांना उभं ठेवून आपण कसं बसणार म्हणून जागा त्याना देऊन टाकली आणि चांगल्या कामाचे फळ म्हणून एक तास उशिरा का होइना फ्लाईट जाणार म्हणून घोषणा झाली. बोर्डिंगसाठी चक्क धक्काबुक्की सुरु होती.आम्हाला सर्वांना एकदाचे बोर्डिंग पास मिळाले, विमानात जाऊन स्थानापन्न झालो. मी आणि मैत्रीण शेजारी होतो. आयल सीटवर एक अरब. विमान भरले तरी सुटत नव्हते, बर्‍याच प्रवाशांची बाचाबाची सुरू होती. मग अरब बुवाने आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. म्हणजे मधेमधे इंग्रजी शब्द आणि हातवारे ! अरब कालपासून ताटकळला होता. त्याच्या मुलीचा फोटो आय पॅडवर दाखवला. आम्ही पण वा वा केलं? मग तो मुद्द्यावर आला! हॅजबंड युवर ना सी?
आम्ही ..ना सी!! गोइन्ग अलोन!!

त्याने अविश्वासाने हात उडवले! इटली नो गुड प्लेस मिसेस!! असं म्हणून तो फोन करायला पुढे झाला आणि त्याच्या जवळून घाण वास येतोय, तो पुढे झाला की असा शोध आमच्या नाकाला लागला! त्याच्या अगदी शेजारीच सुनिता बसली होती, तिला तो वास सहन होईना. माझ्यापर्यंंत तो वास ज रा मंद येत होता, त्यामुळे मी खिदळायला सुरुवात केलीच होती तोवर त्याने त्याचे बूट काढले आणि जो काही मोज्यांचा वास आलाय म्हणून सांगू, बेशुद्ध माणसाला जागं करणारा वास तो. आता हा बाबा कधी उठतो असं झालं होतं. त्यात त्याला गप्पा मारायचा भारी उत्साह आलेला. सुनिताने ती बालरोगतज्ञ असल्याचे सांगितल्यावर त्याने मुलीचा फोटो परत दाखवून काहीबाही विचारायला सुरुवात केली, तिने मग मी आलेच म्हणत पळ काढला. मग त्याचे लक्ष खिडकीतल्या माझ्याकडे गेले!! तो मी डेंटिस्ट आहे हे सांगितल्यावर दात दाखवेल या भीतीने मी, आय नो डॉक्टर , हाऊसवाईफ असे सांगून माझी सुटका करून घेतली!!! विमान उडल्या उडल्या एयर होस्टेसकडून कोलोन फवारलेला टिश्यु घेऊन नाकाला लवून बसलो ! अजून चालतेची विमान, वास हा सरेना करत!! संपले अखेर ते दोन तास आणि विमानातून अफाट पसरलेले रोम एकदम सामोरे आले! आहा रोम!!

विमानातून उतरल्यावर लगेच हॉटेलला न जाता आधी कोलोसिअम बघायचे होते. बस अगदी पंधरा मिनिट चालली असेल आणि ते समोर दिसले,आपली केशरी जादू संध्याकाळची उधळत,गेली दीड हजार वर्ष लोकांना स्तिमित करत उभे असणारे कोलोसिअम!

.
(चित्र आंतरजालावरुन साभार)

इथे आम्हाला आमची गाईड फ्रँचेस्का भेटली. उशीर झाला असल्याने घाईघाईने आत घेऊन गेली. रोम जळताना फिडल वाजवत बसलेल्या सम्राट निरोच्या प्रासादासमोरच्या तळ्याची ही जागा. निरोनंतर आलेल्या फ्लावियन सम्राटांनी थोडी लोकाभिमुखता दाखवण्यासाठी हे अ‍ॅम्फीथिएटर बांधले. त्या काळात तळे बुजवून जमिन तयार करून ट्रॅव़्हेटाईन दगडात ही इमारत बांधली आहे.केशरी वर्णाच्या या दगडामुळे संपूर्ण इमारत केशरी दिसते.

बाहेर एक भिंत्, मध्ये पॅसेज आत परत एक भिंत. बाहेरच्या भिंतीची कमानींची रचना, त्या कमानीमध्ये सुंदर पुतळे ठेवलेले असायचे. आणि मग स्टेडियमसारखी पायर्‍यांची रचना. सम्राटासाठी जरा उंचावर वेगळा कक्ष्, तसाच व्हेस्टल व्हर्जिन्स आणि सिनेटच्या लोकांसाठी तळात जरा रूंद मानाच्या जागा. मधोमध अरीना. हा लॅटिन हरिना म्हणजे वाळूवरून आलेला शब्द आहे. इथे लढतीत वाहणारे रक्त शोषुन घ्यायला वाळू पसरलेली असे. त्याखाली अनेक खोल्या, बोगदे दिसतात. तळमजल्याला चार बाजूंना दारं. एका बाजुने गुन्हेगार कैदी ख्रिश्चन तर दुसर्‍या बाजुने त्यांच्याशी लढाई करण्यासाठी आणलेली हिंस्त्र जनावरं अरिनामध्ये येत. प्रेते बाजूला काढायल दुसरे दार वापरले जाई. इथेच ग्लॅडिएटर्सच्या लढती होत. सम्राटाला माणसं जिवंत किंवा मृत ठेवायचा अधिकार असे. त्या काळात पन्नास हजारच्यावर प्रेक्षक बसायची इथे व्यवस्था होती. तरीही सर्व बाजूनी असलेल्या ऐंशी दारांतून पाच मिनिटात हे थिएटर भरता किंवा रिकामे करता येत असे.
.

कोलोसिअमला फेरी मारत बाहेर परत आलो. तिथेच सम्राट कॉन्स्टान्टाईनची सुरेख कमान आहे. दुसर्‍या एका रोमन सम्राटावर विजय मिळवल्याचे प्रतिक म्हणून ही कमान बांधलेली आहे. तिच्यावर सम्राटाची स्तुति करणारे देखावे कोरलेले आहेत. या सम्राटानेच रोममध्ये प्रथम ख्रिस्चनांना त्यांचा धर्म पाळण्याची परवानगी दिली. तो मरताना त्याला बेशुद्धावस्थेत बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात आलं आणि तो आणि त्याची आई हेलेना यांना संतपद दिलं गेलं, धर्माचे सेवक म्हणून! कॉन्स्टंटाईनंतरही इतर सम्राट या कमनीखालून विजय मिरवणूका काढत असत.

.

कमानीच्या बाजूलाच पॅलेटाइन टेकडी आहे. इथेच रोम प्रथम वसलं म्हणून ही जास्त महत्वाची. या टेकडीवरच एका धनगराला लांडगी दोन जुळ्या बालकांना दूध पाजताना दिसली. ती बालकं धनगराने मोठी केली. अशी आख्यायिका आहे. ते भाऊ रोम्युलस आणि रीमस. पुढे रोम्युलसने रोम भरभराटीला आणले. गावचा तट बांधताना तो कायमचा राहावा म्हणून इथे रीमसचा बळी दिला गेला! या भागात नंतर अनेक सम्राटांनी महाल बांधले. त्याचे अवशेष जागोजागी दिसत राहातात. याच टेकडीसमोर पुरातन जुपिटर मंदिराचे अवशेष आता उरले आहेत.

.

वेळेअभावी रोमन फोरम मात्र बघायचा राहून गेला. आता बस रोम शहर दाखवत हळूहळू निघाली. प्रथम लागले ते सर्कस मॅक्झिमस. इथे रथांच्या शर्यती होत.
.
(चित्र आंतरजालावरून साभार.)

मग पिआझा व्हेनेत्झिया सुरु झाला. कारण या भागाची जागा व्हेनिसच्या दोजची असे. समोर भलंमोठं विक्टर एमॅन्युएलचं स्मारक दिसायला लागलं. पांढरंशुभ्र. एकावर एक चढणार्‍या पायर्‍या, त्यांच्या दोन्ही बाजूला पुतळे असणार्‍या या ठाशीव स्मारकाला रोमवासी मात्र टाईपरायटर म्हणतात! मधोमध विक्टर एम्मॅन्युएलचा मोठा पुतळा आहे. गॅरिबाल्डीने पोपची सत्ता उलथवून या जर्मन राजाला इटलीचा राजा बनवला. स्मारकाच्या दोन्ही टोकांना क्वॉड्रिगा म्हणजे पंखधारी घोड्यांचे शिल्प आहे.
.

या पालाझ्झो वेनेझ्झियामध्ये अनेक सुंदर इमारती आहेत. सगळ्याच राजवाड्यासारख्या दिसतात हे विशेष! तिथेच एका इमारतीबाहेर झेंडे लावलेला सज्जा आहे . इथुन मुसोलिनी भाषणे देत असे.
.

बघत परत कोलोसिअमच्या भागत आलो. कमानीच्या आवारातच स्मरणवस्तू विकणार्‍यांनी दुकानं मांडलेली आहेत. तिथेच ग्लॅडिएटरची वेशभुषा करुन फोटोसाठी हिंडणारे लोक फिरत असतात. आमच्या ग्रुपमधल्या एका पाप्याचे पितर म्हणावे अशा किरकोळ अंगयष्टीच्या काकांनी त्या बलदंड ग्लॅडिएटरच्या पोटात ते मोठ्या त्वेषाने तलवार खुपसत आहेत असा फोटो काढला आणि आमचे हसणे लपवायला आम्हाला ग्रुपपासून जरा लांब जावे लागले Wink तर तिथे अजून दोन जणी आमच्याच ग्रुपमधल्या तेच करायला आलेल्या! एकमेकींकडे नुसते पाहूनच आमच्या समान शील, व्यसनाच्या कुंडल्या त्याक्षणीच जुळल्या!! आणि पुढची ट्रिप मस्तच होणार याची नांदी सुरु झाली!

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle