सूट - भाग 2

'तिलु, तू किमान अंडं तरी ट्राय करायला हवं. Nonveg खात नाही म्हणजे काय? उपाशी रहावं लागेल अशाने.'
'हं'
'हूं काय? अन्नच आहे ते. सगळे जण खातात.'
'मला नाही खायचं. मी कधी खाल्लं नाही. बघायला आलास तेव्हाच सांगितले होते, मी खात नाही हे सगळं म्हणून'. तिलुचा गळा भरून यायला लागला.
'हो बाई. पण हे काय contract आहे का, आधीच सांगितले होते वगैरे म्हणायला?'
तोवर तिलु मुसमुसु लागली. तसा विनू गांगारून गेला.
'अगं सगळीकडे veg मिळत नाही इथं. म्हणून म्हटलं ट्राय करून पहा अंडं तरी.' एव्हाना विनूचा सूर खाली आला होता आणि तीही शांत झाली.
'हे बघ रोज रोज मी तुझ्या सोबत ब्रेकफास्ट करू शकत नाही. तू आरामात आवरून जात जा ना. मला उशीर होतो ऑफिसला. त्यात माझं office चर्चच्या आवारात. ही लोकं खूप काटेकोर आहेत सर्वच बाबतीत. वेळ, काम, पेहराव, सर्वच. मी रोज उशीरा जाऊ शकत नाही. ऐकतेयस ना?'
'....'
'प्लीज?'
'काय प्लिज रे? मोझरेला स्टिक्स कोण खातं ब्रेकफास्ट म्हणून? वर तो ऑरेंज ज्युस?'
'नको खाऊस मग.थोड्याच अंतरावर एक रेस्टॉरंट आहे. तिथं जाऊन पहा.'
'मी एकटी जाऊ?', तिलुने डोळे मोठे करून पहायला लागली.
'हो. काय झालं न जायला? मी इकडे drawer मध्ये पैसे ठेवतो. तू जा जमेल तेव्हा. लवकरच तुझं credit card अप्लाय करतो मी. माझं कार्ड वापरशील का नाही तर?'
'ए..नको नको. तुला लागेल ना. राहू देत. आणि मी काही जाणार नाही कुठं. मुंबईत एकटीनं कॅबमध्येही बसले नाही मी. ते काही नाही. मी रूम सर्व्हिस ऑर्डर करणार'. तिलुने सुनावले.
'बरं जशी तुमची इच्छा राणीसाहेब'. विनूला नाटकीपणाने झुकलेलं पाहून तिलुला हसू यायला लागलं. विनूला हुश्श झालं. त्यानं तिच्या डोळ्यासमोर येणारी बट हलकेच सारखी केली. तिच्या कानशिलाला त्याचा श्वास जाणवू लागला तशी ती मागं सरकली.
'जरा माफी द्या राणीसाहेब सेवकाला'. विनूनं तिचा हात पकडला.
'काही नको जा. Contract म्हणालास ना'
'अगं contract नाहीये असं म्हणालो'
तोपर्यंत तिलुने सुटका करून घेतली. विनूनं काम सुरू करण्यासाठी लॅपटॉप बाहेर काढला. खिडकीतून रस्त्यावरची वाहतूक दिसत होती. लवकरच रात्र सर्वांना मिठीत घेणार होती.

Keywords: 

लेख: