सूट भाग 3.5

'ओह, हाय लुना'
लुना बहुतेक हसली वाटतं तिकडे वळून. आपण तिला आत्ता हाय म्हणायला नको होतं का? तिलु खजील होऊन पाहत राहिली.
'And you are?'
'तिलोत्तमा'
'थी.....?'
'थी नाही. ति, तिलोत्तमा'
'.....????'
'Call me तिलु'
'ओह ठिलु!'
आधीचच बरं होतं की! तिलुने कपाळावर हात मारून घेतला. मनात.

'तुझं नाव कुणी ठेवलं गं?', विनूनं तिच्या केसांशी चाळा चालवला होता.
'आत्यानं. मला पाहील्याबरोबर ती आईला म्हणाली, माले अप्सरेसारखी सुंदर मुलगी आहे तुझी! पुढे त जन्माक्षर आले म्हणून.'. तिलुने एका श्वासात पूर्ण स्टोरी सांगितली. 'का विचारलंस?'
'नाही म्हणजे किती पर्याप्त नाव आहे असं वाटून-'
'हो म्हणूनच लग्नानंतर नाव बदलायचं आहे का असं विचारलंस तेव्हा'. तिलु फणकारत म्हणाली.
'काही बोलायला सुचत नव्हतं. इतक्या सुंदर मुलीला पहिल्यांदा पाहिलं ना इतक्या जवळून'.
'काहीही खोटं बोलतोस', तिलुने उठून केस सारखे केले.
'राहू दे ना मोकळे. छान दिसतेस. त्या दिवशी अंबाडा काय घालून बसली होतीस'
'हो, तरीपण एक माणूस एकटक बघत बसलं होतं ना'. तिलुने हसून म्हटलं.
'काय करणार, इथं मानेवर असा जीवघेणा तीळ आहे. दुसरीकडे पहायची काय बिशात पामराची'. विनूनं हळूच फुंकर मारली.

'You love him. Don't you?'
खाली मान घालून खुदूखुदू हसणार्या तिलुला लुनाने विचारलं. तशी ती एकदम चोरी पकडल्यासारखी गोरीमोरी झाली.

Keywords: 

लेख: