सूट

"सूट" कथामालिका

लेख: 

सूट - भाग 1

एका हाॅटेलच्या वरच्या मजल्यावरील एका रूममध्ये उभी होती ती. एकटीच. वार्याची झुळूक आली की नाही असं वाटलं म्हणून खिडकीत उभी राहिली. रस्ता संथ वाहत होता. 'ऑफिसला जाणार्यांची वर्दळ', ती पुटपुटली.
कालच तिनं आणि विनूनं Utah मध्ये पाउल ठेवले होते. Flight ला यायला उशीर झाला होता. त्यात rental car घेऊन map धरून hotel मध्ये reservation असूनही check-in करायला वेळ लागला. 'पहिलाच दिवशी ऑफिसमध्ये उशीरा जातोय मी', विनू करवादला, 'त्यात तू एकदम हळूबाई'. 'अरे! माझ्यावर काय चिडतोस, तूही पाहिलं ना, सगळे पत्ते सारखेच.' तिलु रदबदली करायला गेली. इथले सर्व रस्ते चर्चचा reference धरून होते. ती rental car वाली बाई पण धन्य होती. You'll figure it out once you go to the temple म्हणे. 'अगं ए, आपलं temple नाही काही. इकडे त्यांच्या चर्चला temple म्हणतात. नाहीतर लावशील भुणभुण जाऊ या जाऊ या करत. तो मॅप धर व्यवस्थित आणि direction बघून सांग.' एवढे सांगून सुद्धा तिलु खिळल्यासारखी त्याला बघत होती. 'अशी काय बघतेस माझ्याकडे? कधी पत्ता शोधला नाहीस काय? मुंबईत राहीलीस ना तू?' 'हो. पण ते दादाकडे.' तिलूचं उत्तर ओठातच राहीलं. मॅप पूर्ण उघडायच्या प्रयत्नात तिचा हात कारच्या खिडकीला लागला जोरात. तिनं अभावितपणे हाताकडे पाहीलं. मेंदी जरा पुसटली होती. लग्न होऊन काहीच दिवस झाले होते. 'काय झालं? लागले का?', विनूनं हात धरून विचारताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं.

खटखट दार वाजलं. 'Housekeeping!' कुणी तरी ओरडलं आणि धाडकन दरवाजा उघडला गेला. तिलु सकपकून खिडकीपासून दूर झाली.

******

'Hi, housekeeping. Do you want to vacuum bed today?'
'अं? No no. Sorry yes yes' तिलु गोंधळली.
दोन्ही housekeeping करायला आलेल्या मुली भराभर आवरत होत्या. बाथरूम मधली साबण, शॅम्पू तत्सम बदलून एक बाहेर आली. 'Anything you need?' वापरलेली टाॅवेल्सचे भेंडोळं करून त्या मुलीनं विचारलंस. तिलुनं मान हलवली नाही अशी. पण ते न कळाल्याने दुसरी तिच्या समोर उभी ठाकली. हातातले धूत टाॅवेल्स व शॅम्पूच्या बाटल्या तिच्या डोळ्यासमोर नाचवत परत विचारती झाली. तिलुनं अंमळ जोरात जवळ जवळ ओरडून नाही सांगितले. ती मुलगी तिलुकडे रोखून बघत होती. तिलुने हळूच बांगड्या असलेले हात लपवायला कुर्तीमागं घेतले.

'काय हे? हातभरून बांगड्या. इकडे कुणी असं घालत नाही. काढून ठेव ते सगळं'
'अरे पण मला आवडतात म्हणून आईने खास सुल्तान बाजार मधून मागवल्या. मी तर घालणारे. माझ्या सगळ्या कुर्त्यांवर मॅचिंग आहेत!'
'अगं तुला काम कसं करायला जमणार एवढ्या ढीगभर बांगड्या घालून?'

तिला विनूबरोबर झालेला प्रेमळ संवाद आठवला. तसंच विनूचं आठ्या भरलेलं कपाळ आठवून तिला खुदकन हसायला आलं.

तश्या आठ्या आल्या की विनूच्या कपाळावर मधोमध गंध रेखल्यासारखी आठी पडायची. त्याच्या विशाल भालप्रदेशाकडे बघत रहावसं वाटायचं तिला. 'काय बघताय एवढे निरखून मॅडम?', असं म्हणून विनूनं दोन पावलं पुढे टाकताच तिने काही नाही म्हणून किचनकडे धूम ठोकली होती.

'Enjoy your day' म्हणत त्या मुलीनं दरवाजा जवळ ओढला. तिलुने दरवाज्याची कडी लावली. घाईघाईने साखळी लावली. इतका वेळ रोखून धरलेला सुस्कारा सोडला.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 2

'तिलु, तू किमान अंडं तरी ट्राय करायला हवं. Nonveg खात नाही म्हणजे काय? उपाशी रहावं लागेल अशाने.'
'हं'
'हूं काय? अन्नच आहे ते. सगळे जण खातात.'
'मला नाही खायचं. मी कधी खाल्लं नाही. बघायला आलास तेव्हाच सांगितले होते, मी खात नाही हे सगळं म्हणून'. तिलुचा गळा भरून यायला लागला.
'हो बाई. पण हे काय contract आहे का, आधीच सांगितले होते वगैरे म्हणायला?'
तोवर तिलु मुसमुसु लागली. तसा विनू गांगारून गेला.
'अगं सगळीकडे veg मिळत नाही इथं. म्हणून म्हटलं ट्राय करून पहा अंडं तरी.' एव्हाना विनूचा सूर खाली आला होता आणि तीही शांत झाली.
'हे बघ रोज रोज मी तुझ्या सोबत ब्रेकफास्ट करू शकत नाही. तू आरामात आवरून जात जा ना. मला उशीर होतो ऑफिसला. त्यात माझं office चर्चच्या आवारात. ही लोकं खूप काटेकोर आहेत सर्वच बाबतीत. वेळ, काम, पेहराव, सर्वच. मी रोज उशीरा जाऊ शकत नाही. ऐकतेयस ना?'
'....'
'प्लीज?'
'काय प्लिज रे? मोझरेला स्टिक्स कोण खातं ब्रेकफास्ट म्हणून? वर तो ऑरेंज ज्युस?'
'नको खाऊस मग.थोड्याच अंतरावर एक रेस्टॉरंट आहे. तिथं जाऊन पहा.'
'मी एकटी जाऊ?', तिलुने डोळे मोठे करून पहायला लागली.
'हो. काय झालं न जायला? मी इकडे drawer मध्ये पैसे ठेवतो. तू जा जमेल तेव्हा. लवकरच तुझं credit card अप्लाय करतो मी. माझं कार्ड वापरशील का नाही तर?'
'ए..नको नको. तुला लागेल ना. राहू देत. आणि मी काही जाणार नाही कुठं. मुंबईत एकटीनं कॅबमध्येही बसले नाही मी. ते काही नाही. मी रूम सर्व्हिस ऑर्डर करणार'. तिलुने सुनावले.
'बरं जशी तुमची इच्छा राणीसाहेब'. विनूला नाटकीपणाने झुकलेलं पाहून तिलुला हसू यायला लागलं. विनूला हुश्श झालं. त्यानं तिच्या डोळ्यासमोर येणारी बट हलकेच सारखी केली. तिच्या कानशिलाला त्याचा श्वास जाणवू लागला तशी ती मागं सरकली.
'जरा माफी द्या राणीसाहेब सेवकाला'. विनूनं तिचा हात पकडला.
'काही नको जा. Contract म्हणालास ना'
'अगं contract नाहीये असं म्हणालो'
तोपर्यंत तिलुने सुटका करून घेतली. विनूनं काम सुरू करण्यासाठी लॅपटॉप बाहेर काढला. खिडकीतून रस्त्यावरची वाहतूक दिसत होती. लवकरच रात्र सर्वांना मिठीत घेणार होती.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 2.5

'काय झालं तिलु? केवढ्या मोठ्याने ओरडलीस. स्वप्न पडलं का काही? थांब, थोडं पाणी पिऊन घे'.
विनूनं तिला उठवून बसवलं. पाणी पिऊन तिलुला जरा हुशारी वाटली. ती सावरून बसली.
'काही व्यवस्थित आठवत नाही. स्वप्नच असावं'
'कसलं स्वप्न? अतिविचार करतेस ना. असं होणार ना मग. काय पाहीलं सांग'. विनूनं लॅपटॉप बंद केला आणि बॅगेत ठेवून दिला.
'तू होतास स्वप्नात'
'काय? तू मला पाहून किंचाळलीस???'
'नै कै', तिलु हसत म्हणाली.
'तुझ्या चेहर्यावर खूप तेज होतं. मी तो प्रकाश कुठून येतोय हे जाणून घेण्यासाठी भरभर पुढे येत होते'
'आणि तू कशाला तरी ठेचकाळुन धडपडलीस?'
'अय्या! तुला कसं माहित? '
'मी होतो ना तुझ्या स्वप्नात'. विनू खो खो हसायला लागला.
'कर थट्टा आणखी. खरंच सांग ना कसं कळलं तुला?'
'ए वेडी आहेस का? तुक्का मारला मी'.
'हॅ'. तिनं मान झटकली. 'काय झाली वाटतं सुटका पहिल्या बायको पासून'. ती लॅपटॉप बॅग वरून हात ओवाळले.
'नाही ग. काम आहे अजून. उद्या करतो'
'का? उद्या का? कर आताच'
'ए चिडू', विनूनं तिचं नाक चिमटीत पकडून हलवलं. 'काम संपत आलेलं पण मी LDS बद्दल वाचत बसलो होतो'. तिचा चेहरा प्रश्नार्थक झाला. 'Latter Day saints church किंवा मर्मन्स चर्च, जिथे मी काम करतो. खूप जुनं आणि प्रख्यात चर्च आहे हे. याचं बांधकाम किती तरी वर्षे चाललं. तरी main stream पासून या चर्च ला वेगळी मान्यता आहे'.
तिलुच्या चेहर्यावर कौतुक मिश्रित आश्चर्य प्रकटलं.
'कॅथॉलिक असो की प्रोटेस्टंट सर्व या चर्चला फार मानतात'.
'एक मिनिट. काय फरक आहे त्यांच्यात? '
काही मदर मेरीला मानतात तर काही येशू ख्रिस्त देव मानतात. पण या चर्चला सर्वच मानतात.'
ती श्रद्धेने ऐकायला लागली.
'त्याचं हे temple खूप सुंदर आहे. ते फक्त स्वच्छ ठेवत नाही तर इतर नियमही पाळतात. Temple च्या सान्निध्यात कुणी जोरात बोलत किंवा हसत नाही. सर्वांना कोट आणि टाय compulsory आहे. पत्ता पण तू पाहिलंस ना, temple पासून अमुक direction ला अमुक नंबरच्या street वर, असाच असतो. Temple ला मध्यवर्ती धरून रस्त्यांना नंबर दिले आहेत. याउलट आपण आपल्या धर्मस्थळांना कुठं जपतो?'
विनूनं आपली व्यथा बोलून दाखवली.
'तू खूप भारावून गेला आहेस'
'हो तर! नियम पाळण्यात माझ्याकडून ही कसूर व्हायला नको असं वाटतं. म्हणूनही मला उशीर करायला आवडत नाही.'
'असं आहे होय. किती हुशार आहेस रे तू. किती माहिती आहे तुला!'
'नाही. मी कसला हुशार. मला तर काहीच माहिती नाही.'
'कशाची माहिती नाही? '
'तुझी माहिती गं' विनू तिला खेटून बसला.
'मी काय ऐतिहासिक स्थळ आहे माझी माहिती कशाला'
'ऐतिहासिक नाही पण 'स्थळ' तर आहेस, तेही प्रेक्षणीय'. बोलता बोलता त्याने तिची हनुवटी उचलली. तिलुने डोळे मिटून घेतले होते.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 3

'You can do it Billy! C'mon buddy'. स्विमिंग पूलात अर्धवट पाण्यात उभा राहून तो एका लहानशा 'बिल' ला पाण्यात उडी मारायला सांगत होता.
रोज ह्या वेळेला हे कुटुंब स्विमिंग पूलाचा आनंद घेत दिवस काढत. खिडकीच्या एका बाजूला असलेला हा पूल म्हणजे तिलुसाठी मोठा दिलासा होता. कोणत्याही वेळेला डोकावलं तरी कुणी न कुणी दिसायचंच.
'बिल'च्या आईला या बापलेकांशी काही घेणं देणं नसावं बहुतेक. ती फक्त तोकड्या कपड्यात बाजूला पहुडलेली असायची. मधून मधून हातातलं पुस्तक किंवा डोळ्यांवरचा गॉगल बाजूला करून हसू फेकायची. बिलीचा बाबा आर्जवं करून थकत नव्हता. बिलीला पोहायला शिकवायचा जणू त्याने निर्धारच केला होता. ते एवढंसं गबदूलं बाळदेखिल पाण्यात बिनधास्त उडी मारायचे.
बाळपण किती सुखाचा असतो! किती बिनघोर आईवडिलांच्या जीवावर उड्या मारत असतो आपण.. एक विश्वास असतो मनात की काहीही झालं तरी आईवडील आपल्याला खाली पडू देणार नाहीच. एवढ्यात तिलुची विचारशृंखला तुटली. 'एएए! पडला तो पडला!', तिलु जोरात ओरडली. बिलीने कठड्याच्या बाजूने न पाहता उडी मारली होती. पण तिलूचं ओरडणं ऐकून बिलीचा बाबा सावध झाला आणि त्यानं बाळाला घाईघाईने धरलं. 'Ok? Bill?'. बिलीने दुसर्याच क्षणी बाबाच्या कडेवरून बाहेर पळ काढला आणि पुन्हा पूलात उडी मारायला सज्ज झाला. तिलुला हसायला आलं. ती स्वतःशी हसायला आणि बिलीच्या बाबाने तिच्याकडे पहायला एकच गाठ पडली. त्यानंही हसून पाहीलं आणि तिच्याकडे बघत हात हलवला.
तिलु झटक्यात खिडकीतून बाजूला झाली. नाही म्हटलं तरी तिला घाम फुटला होता आणि धडधडायलाही लागलं.
विनूला फोन करावा का? नको नको, busy असेल तो. भारतात गुडूप झोपली असणार सर्व. काय करावं बरं? तिलु स्वतःशी बडबडत मागं वळून अडखळली.
'You alright?', हाऊसकीपिंगवाली विचारती झाली. ती इतका वेळ बाथरूमच्या आत असल्याचं तिलु विसरून गेली होती. त्या मुलीनं तिला आधार देऊन बसवलं. तिला पाहून विस्फारलेली तिलुची नजर स्थिरावली. हायसं वाटून तिनं हसण्यासारखं केले. एकाच वेळी तिचे झरझर बदललेले भाव पाहून ती मुलगी तिलुकडे रोखून बघायला लागली.
'I am alright' इतक्या वेळाने तिलुने तोंड उघडलं.
'Had lunch?' त्या मुलीनं विचारलं. 'You order here, right?'
'How do you know? ' तिलुने विचारले आणि जीभ चावली.
'तुझ्या रूमच्या बाहेर plates असतात ना, त्यावरून'
कसला बावळट प्रश्न पडतो आपल्याला. तिलु स्वतःवरच चिडली.
'मी लुना'
'अं?'
'माझं नाव लुना. यू इंडियन?'
ते 'are you Indian?' असे हवे. तिलुने मनातल्या मनात तिचं वाक्य दुरूस्त करून घेतलं. लोखंडे मॅडमनी शिकवलेले ग्रामर डोक्यात पक्कं बसलेलं होतं.
'हो. आम्ही indian आहोत. काय नाव सांगितले तुझं?' तिलुने संभ्रमाने विचारले.
'इट्स ल्यूsssना'
इकडे तिलुला तिची लुना आठवून हसायला आलं. तिनं चेहर्यावर दिसु दिलं नाही.

Keywords: 

लेख: 

सूट भाग 3.5

'ओह, हाय लुना'
लुना बहुतेक हसली वाटतं तिकडे वळून. आपण तिला आत्ता हाय म्हणायला नको होतं का? तिलु खजील होऊन पाहत राहिली.
'And you are?'
'तिलोत्तमा'
'थी.....?'
'थी नाही. ति, तिलोत्तमा'
'.....????'
'Call me तिलु'
'ओह ठिलु!'
आधीचच बरं होतं की! तिलुने कपाळावर हात मारून घेतला. मनात.

'तुझं नाव कुणी ठेवलं गं?', विनूनं तिच्या केसांशी चाळा चालवला होता.
'आत्यानं. मला पाहील्याबरोबर ती आईला म्हणाली, माले अप्सरेसारखी सुंदर मुलगी आहे तुझी! पुढे त जन्माक्षर आले म्हणून.'. तिलुने एका श्वासात पूर्ण स्टोरी सांगितली. 'का विचारलंस?'
'नाही म्हणजे किती पर्याप्त नाव आहे असं वाटून-'
'हो म्हणूनच लग्नानंतर नाव बदलायचं आहे का असं विचारलंस तेव्हा'. तिलु फणकारत म्हणाली.
'काही बोलायला सुचत नव्हतं. इतक्या सुंदर मुलीला पहिल्यांदा पाहिलं ना इतक्या जवळून'.
'काहीही खोटं बोलतोस', तिलुने उठून केस सारखे केले.
'राहू दे ना मोकळे. छान दिसतेस. त्या दिवशी अंबाडा काय घालून बसली होतीस'
'हो, तरीपण एक माणूस एकटक बघत बसलं होतं ना'. तिलुने हसून म्हटलं.
'काय करणार, इथं मानेवर असा जीवघेणा तीळ आहे. दुसरीकडे पहायची काय बिशात पामराची'. विनूनं हळूच फुंकर मारली.

'You love him. Don't you?'
खाली मान घालून खुदूखुदू हसणार्या तिलुला लुनाने विचारलं. तशी ती एकदम चोरी पकडल्यासारखी गोरीमोरी झाली.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 4

'ही अजून इथेच कशी?', तिलु उठून उभी राहिली.
'तुझं झालं ना vacuum करून'
'हो. निघतच होते.' लुना म्हणाली. दारात थांबून तिने मागं वळून पाहिलं. 'पुढच्या वेळेस पियानो on करून वाजव. त्याच्या मागं बटन आहे.'
'अरे देवा! तू कधी पाहिलंस?', तिलुने विचारलं.
'काल दुपारी. त्याच्या आदल्या दिवशी वाजवलेलं ऐकलं मी. तू छान वाजवत होतीस.'
'पण ते हिंदुस्थानी संगीत...'. तिलुचे शब्द हवेतच विरले. ऐकायला लुना होती कुठं. लांब ढांगा टाकत पार दुसरीकडे निघून गेली होती.
त्याचं असं झालं होतं की तिलुला आल्यापासूनच स्विमिंग पूलाशेजारी ठेवलेला पियानो खुणावत होता. कशीबशी हिंमत करून ती खाली गेली. आसपास कोणी नाही असं पाहून तिने एक दोन वेळा पियानो वरून बोटं फिरवली. 'म्हणजे आपण विसरलो नाही तर', तिलुने खुशीत वर पाहिलं.
'That was pretty good! You play very well'
कुणी उंचापुरा तरूण तिला म्हणाला. तो तिच्या शेजारी येऊन उभा राहिला.
'No. I don't'.
तिलुने पुटपुटत elevator गाठला होता. पळतच रूममध्ये येऊन पडली होती ती.

'तो काय तुला खाणार होता का? कशाला घाबरायचं?', विनूनं विचारलं.
'तसं नाही पण..'
'मग? पळून का आलीस? बोलायचं'
'आता तूही दादासारखंच बोलायला लागलास'
'त्या दिवशी पण तसंच. कारचा ताबा घे, खाली जाऊन चाबी घे म्हणून सांगितले तरी ऐकलं नाहीस. पडद्याआड उभी राहिलीस'
'ए ऐक ना. आपण फिरायला कुठे जाऊ या? तू येणार का उद्या लवकर? नॅशनल पार्कला जाऊ या का?'
तिलुने शिताफीने विषय बदलला. त्यानंतर विनू फक्त आजुबाजुला असलेल्या नॅशनल पार्क्स बद्दलच बोलला.

दुसर्या दिवशी तिलु दुपारी दबकतच खाली पियानो जवळ आली. बोटं फिरवली पण हाय! पियानो बोले ना! तिला आश्चर्य वाटलं. तिने मदतीसाठी आजुबाजुला पाहिलं पण दुपार खूपच अंगावर आल्याने की काय, कुणी रिसेप्शनवर दिसलं नाही तिला. वायर काढून ठेवली असल्याचं तिच्या लक्षात आलं नाही. थोडी हिरमुसून परतली होती तिलु.
'पण हे सगळं लुनाला कसं कळलं?', तिलुचं डोकं पार भंजाळलं होतं.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 5

'हॅलो रूम सर्व्हिस? मला पिझ्झा ऑर्डर करायचाय. आताच करता येत नाही म्हणजे? ओह, 11.30 नंतर होय. हो, तसा उल्लेख आहे मेनू मध्ये, पण मला ब्रेकफास्ट मेनू मधलं ऑर्डर करायचे नाहीये. मला बरं नाही-'
तिकडून फोन कट झाला होता.
तिलुला बरं वाटत नव्हतं. ब्रेकफास्ट मधले तेच ते options try करून तिला कंटाळा आला होता. त्यात ती बर्याच उशीरा उठली होती.
'काय झालं? बरी आहेस का?', लुनाने काम थांबवून विचारलं.
'नाही ना. डोकं दुखतंय. त्यात ही रूम सर्व्हिसवाली बाई माझी order घेत नाहीये. लंच मेनू 11.30 नंतर म्हणे. अजून चांगली 20 मिनिटं आहेत त्याला. माझा भूकबळी जाणार तोवर.', तिलु वैतागून म्हणाली.
'May I? ', लुनाने फोन हातात घेतला.
'हो. जसं काही हीचं ऐकून घेणार आहेत', तिलुने मनात म्हटलं. तोवर रूम सर्व्हिसवालीबाई आणि लुना मध्ये जुंपली होती.
'हे पहा रोज आम्ही ब्रेकफास्ट ऑर्डर करतो पण आज पिझ्झा हवाय. तसंही तुम्ही पिझ्झा तयार करून आणेपर्यंत लंच टाईम होईलच. Why do you want lose customer just for few minutes? '
तिकडून नरमाईचे सूर ऐकू आलेत.
'Done!', फोन ठेवून लुना विजयी मुद्रेने म्हणाली. तिलुला ती देवासमान भासली!
'धन्यवाद लुना'.
'तुला काही मेडिसीन हवं असेल तर रिसेप्शनवर सांग. तो माणूस मदत करू शकतो', लुना कोरा चेहरा ठेवून बोलत होती.
'नको. थोडं झोपलं की बरं वाटेल मला', तिलु म्हणाली.
'आज पियानो session नाही का मग?', लुनाने हसून विचारलं.
'तुला हसायला पण येतं? आणि तू चक्क जोक केलास?', तिलु हसून म्हणाली.
'याह sometimes, तू विश्रांती घे'. लुनाचा चेहरा परत गंभीर झाला.
तिलु तिला न्याहाळत होती. उंच, गोरी, नाकेली, पिंगे केस..किती छान आहे ही दिसायला! थोडं हसली की छान दिसते, पण फार कमी हसते ही. आणि ती भर्रकन निघून गेली, नेहमीप्रमाणेच.
तिलुला आज दादाची खूपच आठवण येत होती. त्या विकेंडला संजूदादा आला होता. दादाचा मित्र. 'बाॅर्डर' मूव्ही बघायला निघालो. बसस्टॉपवर बस समोरून येत असतानाच दादानं भूक लागली आहे का असं विचारलं. तिलुने थोडीश्शी भूक आहे म्हणताच ती बस सोडून तडक समोरच्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेला. तिच्यासाठी ऑर्डर केलेला उत्तप्पा समोर येताच त्याने त्याचे bite size चे तुकडे करून प्लेट तिलुसमोर ठेवली. 'खा बेटा!, काही घाई नाही. सावकाश होऊ दे'.
'अरे ती काय लहानसं बाळ आहे का तुकडे करून द्यायला? नशीब भरवत नाहीयेस!', संजू म्हणाला.
'अरे लहान बाळीच आहे ती माझी. आता आता पर्यंत माझ्या खांद्यावर बसवून फिरवायचो मी तिला', दादा मायेने म्हणाला.
काॅफी रिचवून तिन्ही बसस्टॉपकडे निघालेच होते. मध्येच संजू हा मी आलोच म्हणत गायबला आणि आईस्क्रीमचे कोन घेऊन परतला.
'एवढ्या थंडी मध्ये आईस्क्रीम?', तिलुला आश्चर्य वाटले.
'खाऊन तर बघ'. असं संजूने म्हणताच बस आली. घाई घाईत कोन वाटप झाले.
'चल आपण वर बसू', दादानं तिलुला खुणावलं. एका हातात कोन सांभाळत ते डबलडेकर बसच्या वरच्या भागात आले.
पहिल्या सीट वर बस काचेसमोर, मजा येते', असं म्हणून संजू आणि तो एका बाजूला आणि तिलु दुसरीकडे बसले. वरून बसच्या काचेतून समोर रस्ता स्पष्ट दिसत होता.
'काय झालं तिलु? आवडलं नाही का आईस्क्रीम? '
'दादा, मला चाॅकलेट फ्लेवर आवडत नाही', तिलुने कोन दाखवला.
'आण इकडे मला. हा रोलीपोली फ्लेवर मस्त आहे. आवडेल तुला'.
असू दे म्हणाल्यावरही दादानं बळेच त्याचा कोन तिच्या हातात दिला. संजूदादा तिकडून बस चालवण्याची समरसून अॅक्टींग करत होता. रस्त्यावरच्या दिव्यांनी मुंबई उजळून निघाली होती.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 6

'काय झालं तिलु? अशी झोपून का आहेस? बरं नाहीये का?', विनुने कपाळावर हात लावून पाहिला.
'मी ठीक आहे रे. ते दादा आणि संजूदादा- '
'काय? स्वप्न पडलं का काही? मग दादा दादा काय करतेस तिलु? आठवण आली का घरची?'
'हो. दादाची खूप आठवण येतेय मला आज'
'थोड्या वेळाने फोन करून बोल. बरं वाटेल तुला. खाल्लं का काही? काही order करू का? पिझ्झा मागवू का?'
'ए नको नको. दुपारी मी तेच मागवलं होतं. लुनाने मला मदत पण केली'.
'लुना काय? कोण? असं नाव आहे का कुणाचं?'
तिलुने घडलेल्या गोष्टी सांगितल्या बरोबर विनू काळजीत पडला. 'तिलु, मग मला फोन नाही का करायचा?'
'तू कामात व्यस्त असशील म्हणून नाही केला अरे. जाऊ दे. मी बरी आहे आता. सांग बरं काय program आहे?'
'चल मस्त पैकी डिनरला जाऊ या. इकडे जवळच ताजमहाल रेस्टॉरंट आहे. तिथं जाऊ या का?'
'हो. मी रिसेप्शनमधल्या computer वर search केले जवळपासच्या indian restaurant बद्दल. चक्क 2-3 ताज आहेत. त्यापैकी कुठलं?', तिलुने विचारलं.
'अगं ती एक गंमत आहे. कसं असतं ना की ताजमहाल म्हणजे इंडिया हे इथल्या लोकांच्या पक्कं डोक्यात बसलेलं असतं. त्यामुळे झाडून सगळ्या भारतीय रेस्टॉरंट्सची नावं ताजमहाल असंच ठेवलेलं असतं. तेही आपल्या मारवाडी, पंजाबी किंवा गुज्जुभाईचंच असतं!', विनूने माहिती पुरवली.
'आपलीच भारतीय माणसं ना? मग जाऊ या की'.
तिलु तयार होत होती. विनूला मात्र तिलुची काळजी लागली.
'ही लुना आहे तरी कोण?', तो स्वतःशीच म्हणाला.

रात्रभर तिलुने दादाशी पोटभर गप्पा मारल्या. कुठं फिरलो, काय केलं, काय खाल्लं आणि पाहिलं-काय सांगू काय नको असं झालं होतं तिला. दादानेपण दोन तीन ठिकाणांची नावं सांगून त्यांच्या भटकंतीचं वेळापत्रक परस्पर ठरवून टाकलं होतं. पुन्हा विनूकडून तसं वदवूनपण घेतलं! सगळं काही तुम्ही भाऊ बहीण ठरवत आहात तर उद्या मी ऑफिसला जाऊ की नको ते पण सांगा- असं विनूनं पण पिडून घेतलं होतं.
झोपेत असताना तिच्या चेहर्यावर असलेलं मंद हास्य विनू आपल्या डोळ्यात साठवत होता.

'कशी आहेस?', लुनाने विचारलं. तिलुने हसून मान डोलावली. 'काय तुम्ही Indians? Oscillating heads?', लुना म्हणाली. आज तिचा काही काम करायचा मूड दिसत नव्हता.
'Oscillating heads? म्हणजे? ', तिलुने प्रश्न टाकला.
'हेच. नेहमी डोकं हलवत असतात. असं असं', लुनाने action करून दाखवली. तिलुला हसायला आलं पण रागही आला. 'मग काय तुमच्या सारखं गंभीर चेहरा करून फिरायचं?'. तिलुने वार परतवला.
लुना खाली मान घालून खुर्चीवर शेजारी येऊन बसली.
'परिस्थिती गंभीर व्हायला भाग पाडते'. मोठा सुस्कारा सोडून लुना म्हणाली.
'का? काय झालं?', तिलुला तिच्या बोलण्याचं वाईट वाटलं.
'मी hurricane Katrina ची survivor आहे', लुना हळूहळू म्हणाली.
'काय?'
'तुला new orleans माहित आहे का? कतरीनाच्या हैदोसाच्या आधी आमची फॅमिली तिथंच रहात होतो. मी, विली आणि माझी गोड मुलगी- jade. तिला पाहताक्षणी मी उद्गारले होते- OMG! She just looks like Jade!!
पण कतरीनाच्या पुढे आमचे सूख टिकलं नाही. सगळं काही उध्वस्त झालं. सगळीकडे फक्त लूटपाट आणि लचके तोडणे हेच चाललं होतं. तिथल्या एका refugee camp मधल्या एका माणसाने हा रस्ता दाखवला किंमत वसूल करूनच. Jade ला घेऊन पळून आले मी इथे', लुना संथपणे बोलत होती. तिलु आश्चर्याने आणि खेदाने ऐकत होती.
'I am extremely sorry!', तिलु म्हणाली.
लुना पुढे बोलू लागली.
'माणसं पाहता पाहता श्वापदासारखी केव्हा वागतील ते सांगता येत नाही. त्या दिवशी तू पियानो वाजवत असताना आलेला तरूण मला बरोबर वाटला नाही. थॅक गाॅड तू निघून गेलीस. दुसर्या दिवशी तू पियानो न वाजायचं कारण शोधत होतीस ना? हा तरूण तुझ्याकडे येत होता. तुला मदत करायला. बहुतेक ती wire पण त्यानेच काढली होती. म्हणून मी त्याला अडवले'.
'पण मला कुणीच कसं दिसलं नाही?', तिलुने विचारलं.
'Training मध्ये होता staff', लुनाने सांगितले.
'आणि तू? तू नाही का गेलीस training ला?'
'ह्या! मला काय कोण training देणार? मला त्यांच्यापेक्षा चांगलं माहिती आहे सगळं!', लुना चिडली होती.
'एकदा का मी jade ला माझ्या आईकडे सोडून आले की बघतेच मी सर्वांना. तुला आवडेल माझ्या jade ला भेटायला?'
'हो. चालेल ना', तिलु म्हणाली.
'5 वर्षांची गोड मुलगी आहे बरं माझी jade. तिला भेटून तुला खूप आनंद होईल'.
तिलुने यावर सौम्य हसून स्विकृती दर्शविली.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 7

तिलु आपल्याच विचारात मग्न होती. चुकार दिवस आज खूपच रेंगाळला होता. खिडकीतून दिसणारा आकाशाचा तुकडा डोळ्यात साठवत ती विनूची वाट पाहत होती. नुकतेच अपग्रेड मिळून ते आता वरच्या मजल्यावरील सूटमध्ये शिफ्ट झाले होते. हा सरंजाम खरंतर विनूला कंपनीने आधीच करून दिला होता. पण ते आले तेव्हा काही कारणाने कोणताच सूट उपलब्ध नव्हता.
आता wi-fi रूममध्येच असल्याने तिलुला खाली रिसेप्शनमधल्या इंटरनेटवर विसंबून रहायची गरज नव्हती. तसंच टीव्ही आणि काही मुव्ही चॅनल्स असल्याने ती सुखावली होती. त्यातही आदल्या रात्री क्लासिक्समध्ये चक्क डीडीएलजे लागला होता! कैक वेळा तो पाहूनही इतक्या दिवसांनी अमेरिकेत आल्यावर तो चित्रपट पाहताना खास वाटलं तिला. मधून मधून विनूच्या घोरण्याची साथ होतीच!
भाॅक! म्हणत विनूनं तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिलु मागं वळून मंद हसली.
'काय राणी सरकार घाबरल्या नाहीत आज? काय विशेष?'
'काही नाही. काल देशात जाऊन आले ना!'
'देशात? अरे वा! ते कसं काय?', विनुने चेहरा धुवत विचारलं.
'अरे डीडीएलजे नाही का पाहिला काल टीव्ही वर. तेव्हढंच देशात फिरून आले मनानं. खूप मस्त वाटलं!
लहानपणी मी वाचलं होतं की टिळक आवर्जून सिंहगडावर जात असत. जाऊन आल्यावर ती हवा त्यांना आठवडाभर तरी पुरत असे म्हणे. आपली दुधाची तहान ताकावर! निदान असं तरी आपल्या मातीचं दर्शन घडलं. तेव्हढं पुरे मला'.
'हे छान झालं तिलु. मी उगाच देशात जायला टिकीट्स पाहत होतो. आठवण आली की डीडीएलजे पाहून घे तू'. विनू हसत म्हणाला.
'काहीही!', विनुच्या आवाजातला खोचक सूर ऐकून मान झटकली तिलुने. विनूने तिलुकडे पाहिलं. तिलु एकेक पाकळी उमलत होती जणू.
'तसं नाही रे, आपल्या माणसांमध्ये किती आश्वस्त असतो आपण. एक विश्वास असतो मनात की काहीही वाईट होणार नाही. समजा काही झालं तरी आपली माणसं आपल्या बरोबर आहेत हा दिलासा खूप मोठा असतो. विशेषतः देशाबाहेर आपल्या माणसांपासून दूर आल्यावर फार प्रकर्षाने जाणवतं ते'.
तिलु अधोमुख होऊन गंभीरपणे बोलत होती.
तिला तसं पाहून विनूला काय करावं कळेना झालं. लगेच त्याने हातातला टाॅवेल भिरकावला आणि तिच्यासमोर किंचित झुकत नाटकीपणाने उभा राहिला.
'मोहतरमा! आपको किसीने याद किया'
'माहीत्ये, दादाचा फोन आला नं?', तिलु हसत म्हणाली.
'तुला कसं कळलं?'
'अरे, दादा ताई आणि मी- एकाच पुस्तकाची पानं!'
'हे बरंय', विनु म्हणाला. 'और अगर कोई आप से कहता की आपका कोई अजिज आया था तो आप कहती कौन विनित? कहांका विनित?'
त्याच्या आविर्भाव पाहून हसू आवरलं नाही तिला. 'दुनिया में और कुछ याद रहे ना रहे, इस प्यारे अजिज को कैसे भुलेंगे हम?'. त्याच्या गळ्यात आपल्या हातांनी माळ गुंफून तिनं त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.
'काय म्हणाला दादा?'. तिलुने विचारलं.
'हम्म. कसलंतरी गिफ्ट दिलं होतं का तुला मुंबईहून येतांना? आवडलं का तुला म्हणून विचारत होता', विनू केस विंचरत म्हणाला.
तिलु हातातला कंगवा ड्रेसरवर टाकून धावतच सुटकेसकडे आली. आतल्या कप्प्यातून गिफ्ट बाहेर काढलं. रॅपर काढेपर्यंतही तिला धीर धरवत नव्हता.
'मी अशी कशी विसरले!', मान हलवत गिफ्ट उघडलं तिलुने. तिच्या हातात सुंदर घड्याळ होतं. शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या पट्टया आणि डायल्सपण होती. तिलुच्या डोळ्यात आनंद मावत नव्हता.
'खास लोकांना खास गिफ्ट! मस्तच आहे हे'. विनूनं घड्याळ तिच्या मनगटावर ठेवलं.
तिलु ओठावर मंद हास्य पाहून तो म्हणाला, 'आवडलं?'
'हो. लक्षात आहे त्याच्या अजून'
'काय ते?'
'माझ्या आईला बाबांनी असंच घड्याळ घेऊन दिलं होतं त्यांच्या लग्नानंतर. आई सांगायची त्या घड्याळाबरोबर सोळा सुंदर डायल्स होती आणि किती तरी वेगवेगळ्या डिझाईन असलेल्या पट्टया. आई बाबा फिरायला कुठे बाहेर जात असले की आई ती नेसलेल्या साडीला मॅचिंग डायल आणि पट्टी निवडून घालायची. खूप मस्त दिसत दोन्ही. अगदी त्या काळातले राॅयल कपल जणू! माझ्या मामांनी त्यांचं सुरेख पेंटींग काढलं होतं. अजूनही आहे ते पेंटींग पण घड्याळ मात्र गेलं कुठं तरी..'
तिलूने मोठा सुस्कारा सोडला.
'आता तू हे घड्याळ घाल म्हणजे आपण पण राॅयल कपल होणार. काय?', विनुने तिच्या खांद्यावर थोपटत म्हटलं.
'चला हसल्या तरी राणी सरकार. येणार का शिकारीला?'
'कुणाची शिकार?', तिलु घड्याळ ड्रेसरवर ठेवत म्हणाली.
'कुणाची कशाला? आमचीच शिकार केली ना या नजरेनेच'.
'हो का?', तिलुने डोळे मोठे केले. दोन्ही हसत बाहेर आले.
'ए चालत जाऊ या?', लिफ्ट कडे वळणार्या विनूला थांबवत ती म्हणाली.
तसं विनूनं तिला अलगद उचललं आणि तो पायर्या उतरू पण लागला. 'अरे काय करतोयस' असं म्हणत तिनं त्याचा खांदा धरला. त्याची अर्धवट उगवलेली दाढी तिच्या गालावर घासत होती. तिनं डोळे गच्च मिटून घेतले. दोन तीन पायर्या उतरून होत असतांनाच कुणी तरी मागून आल्याचा आवाज आला. ती व्यक्ती धावतच पायर्या उतरून खाली आली. तशी तिलुने घाईघाईने विनूच्या हातातून निसटून खाली उडी मारली. ती व्यक्ती त्यांना पाहत पुढे जाऊन थांबली. तिलुही धडाधड पायर्या उतरून खालच्या मजल्यावर येऊन थांबली. विनू मात्र गोरामोरा झाला. त्याच्या बुटाची लेस बांधत तो वरच थांबला.
ती व्यक्ती लुना होती. नेहमी प्रमाणेच तिने तिचा चेहरा कोरा करून तिला विचारलं, 'व्हाट आर यू गाईज् डुईंग हियर? वर सगळे महागडे सूट्स आहेत'.
'आम्हाला ना अपग्रेड मिळाला. आम्ही आता वर शिफ्ट झालो. तू कशी आहेस? दिसली नाहीस?'
तिलूने माहिती पुरवत विचारलं. पण लुनाचं लक्ष वरून येत असलेल्या विनूकडे गेलं तशी ती घाईघाईने निघून गेली. उत्तर न देताच!
तिलुला तिच्या वागण्याचं खूप आश्चर्य वाटलं. वर शिफ्ट झाल्यापासून एकदाही लुना तिला दिसली नव्हती. आज इतक्या दिवसांनी दिसली तरी ती अशी का वागली? तुम्ही लोकं इथे काय करताय म्हणजे काय? आपण कधी सूटमध्ये राहू असं तिला वाटलं नसावं? का? तिची मदत करणारी, गप्पा मारणारी, दिलेली फळं गपगुमान नेणारी लुना आज किती विचित्र वागली. हिला आपण जास्तच सूट तर नाही दिली ना?'
तिलु लुना गेली त्या दिशेने पाहत उभी राहिली.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 8

सूट भाग 8

'You got something in here for me!', छोट्या बिलीने तिलुच्या पर्सकडे निर्देश केला. त्याच्या चेहर्यावर खोडकर हसु होतं. तिलु खाली आली तशी तो स्विमिंग पूलाचा कठडा सोडून तिच्याकडे पळतच आला होता. त्याच्या बाबाने त्याला हाक मारली. तो वळून पाहत असताना तिलुने हळूच चाॅकलेट त्याच्या बाबाला त्याच्या नकळत दाखवलं. त्यांनी संमती दर्शविताच तिने चपळाईने चाॅकलेट बिलीच्या खिशात टाकले.
'No sir, it's here', असं म्हणून तिने बिलीला त्याच्या खिशातून चाॅकलेट काढून दिले. तसं बिलीने आ वासला. मोठ्या आनंदाने ते चाॅकलेट त्याच्या बाबाला दाखवून झालं.
'Hi, how are you?'
बिलीच्या बाबाने विचारलं. तसं तिलुने हसून मान डोलावली.
'You play piano very well'
'Thank you', तिलु म्हणाली.
'You should teach me sometime', असं बिल'च्या बाबाने म्हणताच बिल'च्या आईने पुस्तकातून डोकं वर काढलं.
'For God's sake Pete, the girl has boyfriend!'. हा इथंही सुरू झाला या अर्थाने ती जरा ओरडलीच.
'He is my husband', तिलुने लगेच सांगितले.
'There's Starbucks around here', बिलीचा बाबा सांगत होता.
'Pete?' बिल'च्या आईचा आवाज जास्तच धारदार झाला, तसं बिलीचा बाबाने इशारा कळून, हसत हसत यू टर्न मारला.
'You should try chai latte there', असं म्हणून तो परत चालायला लागला.
त्यांची ती नोकझोंक बघून तिलुला हसायला आलं. ती बाहेर येऊन Dennis च्या दिशेने चालू लागली.

'What would you have?'
अं.. उम्म करत तिलु मेनूकडे वर बघायला लागली.
'हे बघ, तुझं ठरवून झालं नसेल तर लायनीच्या बाहेर हो आधी', ऑर्डर घेणार्या 'कृष्णा'काकुने तिला दरडावले.
तिलु घाबरून बाजूला होणारच होती, पण तिला लुना आठवली. 'Nobody can make you feel inferior without your consent-हे तिचं वाक्य आठवलं आणि तिच्यामध्ये लुना संचारली! लुनासारखा निर्विकार चेहरा करून तिलुने कृष्णा'काकुकडे रोखून पाहिलं. 'Give me a minute', असं म्हणून तिने आपली ऑर्डर दिली.
'For here or to go?'
'To go', तिलुने कॅश काढून दिली.
त्यातील चुकून जास्त आलेलं 5 डाॅलर कृष्णा'काकुने तिला परत केली. 'नाव काय तुझं?', त्या मुलीनं परत दरडावले. तिच्या चेहर्यावर 'कुठून कुठून येतात लोकं',असे त्रासिक भाव होते. तिलुचं आपल्या वेंधळट स्वभावावर चरफडून झालं. चेहरा शक्य तितका शांत ठेवून ती त्या मुलीकडे पाहू लागली.
'तिलोत्तमा'
'क्काय?', काही चावल्यागत ती मुलगी ओरडली. शेजारच्या रांगेत ऑर्डर द्यायला उभी असलेली गोरी त्यांच्याकडे बघायला लागली. तिलुने आवंढा गिळत परत सांगितले.
'काय?', त्या मुलीनं परत कपाळावर आठ्या आणून विचारलं.
तिलुने परत एकदा लुनादेवीचा धावा केला!
'You heard me',तिलु शांतपणे डोळे तिच्यावर रोखून पाहिलं. यावर शेजारच्या गोरीच्या चेहर्यावर एक अस्फुट हास्य आल्याचं तिलुने टिपले.
'Is that all? Thank you. Please wait'. असं म्हणून त्या मुलीनं तिला टोकन दिलं.
तिलुच्या चेहर्यावर जिंकल्याचा आनंद मावत नव्हता. कधी एकदाचं तिचं पार्सल मिळेल आणि कधी जाऊन लुनाला हे सांगु असं झालं होतं तिला!
लवकरच ती परतीच्या मार्गाला लागली. पार्सल तिच्या सुपूर्त करताना देखील त्या कृष्णा'काकुने तिला अगम्य नावाने बोलावलं होतं. त्यातील पदार्थ पाहून तिने आपली ऑर्डर ओळखली होती. एकुणात झालेल्या सरशीमुळे तिलु जवळ जवळ उड्या मारतच चालली होती. तसा तिला शेजारून जाणारा freeway दिसला. दुपार असूनही वाहतूक भरून वाहत होती. तिला एक छोटासा रस्ता cross करून जायचे होते. पण तिलुला तिथं सुंदर रानफुले दिसल्याने ती तिथं रेंगाळली. निळ्या रंगाची इवली इवली फुले पाहून ती हरखून गेली. एक पाच मिनिटांनी एक गाडी तिच्या मागेच उभी असल्याचं तिच्या लक्षात आलं आणि ती भर्रकन मागं वळली. तर काय! तिच्या मागे तीन चार गाड्यांची line लागली होती. तिलु चक्क ramp वर उभी होती!
तिच्या समोरच्या कारवाल्याने तिला रस्त्यातून बाजूला व्हायची खूण केली. साॅरी म्हणत तिलु धापा टाकत होटलवर पोहोचली. गंमत म्हणजे तिच्यामागे गाड्यांची रिघ लागूनही एकाही कारवाल्याने हाॅर्न वाजवला नव्हता. सगळे शांतपणे ती रस्त्यातून बाजूला व्हायची वाट पहात होते!
रिसेप्शनपर्यंत गेल्यावर तिला हायसं वाटलं. तेवढ्यात तिला लुनाबरोबर येणारी housekeeping वाली मुलगी दिसली. तशी तिलु धावतच तिच्याकडे गेली.
'Where's Luna?', तिने आतूरतेने विचारले.
'Luna? She's gone', ती मुलगी साबणं trolley मध्ये ठेवत उत्तरली.
'Gone? Where?', तिलुने आश्चर्याने विचारलं.
'गेली ती. काढून टाकलं तिला कामावरून'. एवढे बोलून ती मुलगी जवळच्या रूममध्ये trolley घेऊन शिरली. तिलु त्या दिशेने हतबुद्ध होऊन बघत उभी राहिली.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 9

'Aren't you the one who plays piano?'
एक तरूण तिच्या जवळ आला.
तिलुने चमकून त्याच्याकडे पाहिलं.
'Who's asking?', तिने उलट विचारलं.
'मी लुनाचा मित्र'.
तिलु अविश्वासाने त्याच्याकडे पाहत होती.
'मी लुना आणि विलीचा मित्र. Jade चा Stan uncle'.
तिलु अजूनही त्याच्याकडे तसंच पाहत होती.
'त्या दिवशी नाही का, मी सफाई करत पियानो unplug केला होता आणि लावायला विसरलो. तुम्हाला पाहून लक्षात आले पण लुनाने अडवले'.
'....'
'लुनाबद्दल विचारलंत ना आता. म्हणून न राहवून आलो तुमच्याकडे', तो पोरगेलंसा तरूण इकडेतिकडे बघत भरभर बोलत होता.
'ओह, कुठे गेली ती?', तिलुने तोंड उघडलं.
'तुम्ही जरा staircase च्या त्या बाजूला येणार का? इथं बोलता येणार नाही'.
'अं. नको नको', तिलु गडबडून म्हणाली.
'प्लिज. फक्त दोन मिनिटं. लुनासाठी?'

*****

लाॅबी आणि पायर्यालगतच्या passage मध्ये तिलु आणि Stan उभे होते. या कोपर्यात लिफ्ट नव्हती, तसंच होटलमध्ये विशेष वर्दळ नव्हती.
'लुनाला कामावरून काढलं नाही, तीच निघून गेली'.
'क्काय? का?', तिलुने आश्चर्याने विचारलं, 'पण मग ती मुलगी सांगत होती- '.
'हो. लुनाचं फारसं पटायचं नाही कुणाबरोबर. मॅनेजमेंटबरोबरही तिचे बरेच खटके उडत. ती तिच्या values impose करायला बघायची पण ते सर्वांना आवडेल असे नाही ना. विलीला गमावल्यापासून ती जरा विक्षिप्त वागत होतीच'.
'काय? विली आता नाहीये?', तिलुला धक्कयावर धक्के बसत होते.
'हो. hurricane ने आम्हा सर्वांना उध्वस्त करून टाकले'.
Stan सांगत होता आणि तिलुच्या चेहर्यावर एकाचवेळी अनेक भाव येत जात होते.
'लुना आणि विली खूप गोड जोडपं. विली एक हरहुन्नरी आणि दिलखुलास माणूस. तो आणि लुना एका eatery मध्ये काम करत. एक न एक दिवस छान टुमदार कॅफे काढायचं स्वप्न पाहत होते ते. पण jade ची चाहूल लागली आणि सगळं बदलून गेलं. आम्हा सर्वांच्या विश्वात jade सारखी गोड Angel व्यापून राहिली. माझंच बघा ना. ती या जगात यायच्या आधी एक उचल्या, उनाड मी, एक जबाबदार uncle Stan uncle झालो. Jade च्या बाळलीलांमध्ये रमून गेलो. इतकं की सालं आपलं पण घर असावं, बायको- मुलगी असावी असे माझ्यासारख्याला पण वाटू लागलं होतं!
त्या वादळाने मात्र आमची सगळी सप्नं लुटली. आमच्या घराच्या काड्याही उरल्या नाही'.
Stan सांगत होता. तिलु स्तब्ध होऊन ऐकत होती.
पण लुनाने स्वतःला सावरलं. विमनस्कपणे फिरत असलेल्या मलाही तिनं refugee camp मध्ये दाखल केलं. कुणाकुणाच्या मागं लागून मला इकडे जाॅब मिळवून दिला.
मी ऊनाडक्या करायचो आणि ती मला समजावत सांभाळून घ्यायची. तिला कुणी 'आपलं' वाटलं की ती सगळं झोकून देते त्यांच्यासाठी. स्वभावच आहे तसा तिचा!
त्या वादळानंतर मिळालेल्या वागणुकीत माणुसकी सोडून सर्व काही होतं. त्यामुळे की काय उच्चपदस्थांविषयी लुनाच्या मनात आकस निर्माण झाला. त्यांना त्रास द्यायचा, उलट बोलायचा तिचा स्वभाव बनला. Rich people कडून थोडंसं आपण घेतलं तरीही ते rich च राहणार असं म्हणायची ती'
'म्हणजे? चोरी? '
'She wouldn't call that. तिच्या मते थोडंसं श्रीमंत लोकांच्याकडून काही घेतलं तर त्यांना काही फरक पडत नाही. पण गरीबांचं मात्र नशीब बदलतं', Stan ने स्पष्ट केले.
'पण तू मला हे सर्व का सांगत आहेस? तेही ती निघून गेल्यावर? ', तिलुने विचारलं.
'तिच्याबद्दल तुम्ही गैरसमज करून घेऊ नये म्हणून. लुना काही लोकांशीच संवाद साधायची. त्यापैकी तुम्ही असल्याने- ', Stan ने वाक्य अर्धवट ठेवून तिच्याकडे पाहिलं. तिलुने समजल्यासारखी मान हलवली.
'मी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला. एकदा training झालं की तिचं प्रमोशन होईल, परिस्थिती चांगली होईल. किमान jade साठीतरी हे वागणं बाजूला ठेव म्हणून किती सांगितले तरी तिनं ऐकलं नाही', Stan लुनाची बाजु मांडत होता. तिलुला आता लुनाच्या वागण्याची लिंक लागत होती.
'याशिवाय वरील suites मध्ये राहणार्यांच्या complaints वाढत चालल्याची कुणकुण तिला लागली आणि तिने इथून निघून जाण्याचा निर्णय घेतला'
'कसल्या complaints? ', तिलुने विचारलं.
'चोरी होत असल्याच्या ', Stan म्हणाला.
'ओहह!', तिलु झटका लागल्यासारखी म्हणाली.
'का असं शाॅक लागल्यागत उद्गारला तुम्ही?', त्याने विचारले.
तिलुच्या चेहर्यावरचे भाव झरझर बदलले.
'लुना त्या दिवशी वरच्या suites ना महाग म्हणाली त्या अर्थी तिकडे राहणारे तिच्या मते so called rich people? आणि ती तिकडे जाऊन चोरी... नाही नाही!', तिलुच्या मनात द्वंद्व चालू होतं.
ती डोळे मिटून भिंतीला किंचित टेकली आणि दीर्घ श्वास घेतला.
तिचा निर्णय झाला होता जणू.

Keywords: 

लेख: 

सूट - भाग 10 (समाप्त)

तिलुने पर्स check करायला सुरुवात केली.
'काय झालं?', Stan ने काळजीच्या स्वरात विचारलं.
तिलु तशीच चालु पडणार तोच Stan आडवा आला.
'का?'
'पैसे गायब आहेत यातले'
तिलु एक एक शब्द शांत पण जरा चढ्या आवाजात म्हणाली.
तिलुने निघत असताना नेहमीप्रमाणेच ड्रावरमधून नोटा पर्स मध्ये कोंबल्या होत्या. Dennis मध्ये बिलाची रक्कम भरतांना तिला नेहमीची 100 ची नोट दिसली नव्हती. कदाचित तिच्या वेंधळेपणामुळे कुठे राहिली असेल असं आधी वाटलं. पण आता संशय घ्यायला जागा होती.
'ओह नो! विसरला का कुठे?', Stan ने विचारलं.
तिलु तडक रिसेप्शनकडे निघाली तसं तो परत घाईघाईने पुढं झाला.
'तुम्ही complaint तर नाही ना करणार?'
तिलुने उत्तर दिले नाही.
'खरंच चोरी झाली असेल का? पण हे कसं शक्य आहे. लुना तिच्या बरोबर असा व्यवहार नाही करू शकत. ती तर किती आपुलकीने लागायची. हा.. पण बर्याच वेळेला तिचा काम करायचा मुड नसायचा. एकतर तिच्या सोबतच्या मुलीला काम करायला सांगायची नाही तर गप्पा मारत बसायची'
तिलुच्या मनात लुनाची विविध रूपे येऊ लागली. (हो हो, ते जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये दाखवत तसंच Wink )
कामचोर, प्रेमळ, रागावणारी, चिडवणारी, क्वचित हसणारी लुना! तिनं चोरी करावी यावर विश्वास बसत नाहीये. आता फक्त 100 ची नोट दिसली नव्हती. बापरे! अजून काय गेलं असेल? तिलु स्वतःशीच विचार करत होती. रूममध्ये काही विशेष काही नव्हतं. लॅपटॉप विनूनं नेला होता ऑफिसला आणि पर्स तिच्याकडे होतीच. तिला अजून काही आठवेना. ऐकलं ते इतकं अनपेक्षित होतं की तिला काय करायचे ते कळत नव्हतं.
'प्लीज नका करू complaint. लुना साठी तरी? '
Stan हळूच गयावया करत होता.
'मग असं वागायचं कशाला? Must do right thing',
एवढे बोलून ती रिसेप्शन कडे गेली.
ती चालत होती. पण तिचं डोकं बधीर झालं होतं. आता समजा तिने पैसे दिसत नाही म्हणून complaint केली तर? शोध घेऊनही पैसे नाही मिळाले तर staff ची चौकशी होईल. हाॅटेलचं reputation सांभाळायला कदाचित आता असलेल्या staff ला काढून टाकतील. लुना तर गेली निघून पण इथं असलेल्या हकनाक भोगावे लागेल...
विचार करत करत तिलु तिच्या नकळतच रिसेप्शनवर येऊन उभी राहिली.
तिथल्या माणसाने तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेनं पाहताच ती कडाडली.
'कोण आहे इथला in charge? कसं काम करता तुम्ही? '
'काय झालं मॅडम? ', रिसेप्शनवरील staff ने विचारलं.
'मी वरच्या suite मध्ये काही दिवसांपासून राहतेय. काही व्यवस्थित ठेवाल की नाही? '
'का? काय झालं मॅडम? सफाईवाल्यांचं schedule तर बरोबर आहे. अजून काही complaint आहे का?'
'कर्मचारी येतात जातात पण काम करतात की नाही हे पहायला नको का?', तिलुने खडसावले.
'Sorry for the inconvenience madam. Training मुळे गडबड झाली असावी. मी लगेच check करतो. तुमचा रूम नंबर?'
त्याला रूम नंबर सांगून तिलु लिफ्ट कडे वळली. लिफ्टचे दार बंद होता होता तिथंच अंग चोरून उभा असलेल्या Stan ने सुटकेचा निश्वास टाकलेला तिला स्पष्ट ऐकू आला.
ती कोण होती लुनाला सूट देणारी? लुनाच्या आपुलकीने आणि मैत्रीने उलट तिला सूट दिली होती तिचं स्वत्व जपण्याची. तिच्या प्रेमळ समजावणीमुळे, क्वचित केलेल्या कान उघाडणीमुळेच तर तिलुचा आत्मविश्वास परत आला होता ना! या परक्या देशात जवळपासचा आधार म्हणायला विनू नंतर दुसरं होतं तरी कोण तिच्याशिवाय?
तिलुने खोल श्वास घेतला आणि रूमचं कार्ड swipe करून आत आली. पाय ओढतच ती ड्रावरकडे गेली, जसं काही तिच्या पायाला मणामणाचे ओझे लादले होते. थरथरत्या हातांनी तिने ड्रावर चेक केले. त्यात काहीही नव्हतं. तेवढ्यात तिला दादानं दिलेल्या घड्याळाचा बाॅक्स दिसला. साशंक मनाने तिलुने तो उघडला. तिची शंका खरी ठरली होती. आत घड्याळ नव्हतं!
'याचा अर्थ लुना जेव्हा आपल्याला पायर्यावर भेटली त्या दिवशी ती या suite मध्ये आली नसेल ना? तिनेच तर नाही ना चोरी केली?....'
तिलु हताशपणे घड्याळाच्या रिकाम्या खोक्याकडे पाहत राहिली.

*****

मध्यंतरी बराच काळ लोटला.

तिलुला भारतातील अनुभवामुळे लवकरच जाॅब मिळाला. तिचा working visa होऊन, नव्या प्रोजेक्टच्या निमित्ताने ती Louisiana ला आली होती काही दिवसांपूर्वीच.
कॅबमधून ती उतरत असतांनाच तिचा फोन वाजला.
'काय पामराला विसरलात मॅडम, फोन नाही अजिबात?', पलीकडे विनू बोलत होता.
'ए चपे! लागलास रडायला लगेच. आता अजून 2 आठवडे काढायचे आहेत', तिलुने हसून सांगितले.
'अरे वा! झाला का project extend? छान छान. मग आता कधी येणार? '
'ए ऐक ना विनू. मी काय म्हणतेय, तूच ये ना इकडे. Fall colors पहायला. मी एकदा ऑफिसात विचारून सांगते तुला', तिलुने भरभर सांगितले.
'अरे वा. चांगल्या ओळखी झाल्या वाटतं ऑफिसात'.
'ए जळू!', तिलु मनापासून हसत म्हणाली, 'तुला माहितीये, मी आता एका रेस्टॉरंट मध्ये आलेय. इथे तुझ्या आवडीचे curly fries मिळतात म्हणे'
'थांब मी आलोच. Curly fries साठी काय पण!'
तिलुने हसून फोन ठेवला.
ऑर्डर देऊन ती लॅपटॉप घेऊन बसली. दोन तीन इमेल पाठवेपर्यंत तिची ऑर्डर आली. तेवढ्यात तिला ऑफिसातून काॅल आला. काही emergency आली होती. तिची टीम मेंबर तिला उचलणार होती. ऑफिसात परत जावं लागणार होतं. तिलुने ऑर्डर पॅक करून द्यायला सांगितले व ती बाहेर येऊन parking lot मध्ये उभी राहिली. थोड्या वेळाने तिथं काम करणार्या मुलीने तिचं पार्सल आतून आणून दिले. त्याबरोबर तिला एक बाॅक्सपण दिला.
'हे काय?', तिलुने विचारलं.
'My supervisor says this belongs to you'.
असं म्हणून ती मुलगी आत निघून गेली.
तिलुने आश्चर्याने तो बाॅक्स उघडला. दादानं तिलुला दिलेलं वेगवेगळ्या डायल्सचं घड्याळ होतं ते!
पण हे तर चोरीला गेलं होतं. मग इथे कसं काय आलं? तिलु विचारात पडली. समोरून एक कार गेली आणि तिलुच्या डोक्यात प्रकाश पडला.
'ओह माय गॉड! लुनाच असावी ही!'
तिलुने गर्रकन मागं वळून पाहिलं. दिव्यांच्या प्रकाशात त्या रेस्टॉरंटचे नाव - 'Jade and Willy's' झगमगत होतं.

(समाप्त)

Keywords: 

लेख: