ऐल पैल

ail_pail_cover.jpeg

भेट होणं किती गरजेचं असतं! लांब राहून विचार स्वच्छ राहात असतील, विचार करायला वेळ मिळत असेल पण नुसतंच विचारांमध्ये किती दिवस एखाद्याला जिवंत ठेवायचं.. आज जर अशी अचानक भेट झाली नसती तर मी स्वतःहून त्याला भेटायचं ठरवलं असतं...? तो म्हणाला असता तर मी गेले असते की पुन्हा तू घाई करतोयस म्हणाले असते...? एवढे दिवस संपर्क तोडून मी काय तीर मारला होता..? पायलशी भेट होइपर्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकले असते का मी..? आणि ती भेटलीच नसती तर हे चक्र असंच सुरू राहीलं असतं... त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून फक्त त्याची एक अर्धवट चूकच लक्षात ठेवून हळूहळू त्याच्यापासून दूर जात राहिले असते... शेवटी मलाच काही फरक पडला नसता... त्याच्याबद्दल जे नकारात्मक मत बनवून घेतलं होतं, पुढे जाऊन स्वतःला त्याला सोडून दिल्याचं तेच कारण सांगितलं असतं आणि तेच खरं मानत आले असते... आणि त्याचं काय? तो कसलीच तक्रार न करता कधीतरी माझा निर्णय होईल या भरवशावर थांबून आहे...पुढे फक्त त्याची सवय मोडली म्हणून त्याला मी नाही म्हणून सांगितलं असतं तर त्याला काय वाटलं असतं..?
तिने एक मोठा श्वास घेतला.
भेट झाली ते चांगलंच झालं... इतके दिवस रुटीन आपलंसं करत न संपणाऱ्या चक्रात अडकून बसले होते, त्यालाही अडकून ठेवलं होतं... त्याला आज भेटून मला परत कळून चुकलंय की मला तो किती हवा आहे..!

लेख: 

ऐल पैल 1- सुरुवात

तुम्ही लोक खरंच निघून चालला आहात, मला विश्वासच बसत नाहीये. आम्हाला अजिबात करमणार नाही " त्रिशा सुमंत काकूंचा हात हातात घेत म्हणाली.
"काकू खरंच.. रद्द करा शिफ्टिंग बिफ्टिंग, तुमचं घर आमच्यासाठी सेकंड होम आहे! काका, तुम्ही, अजय, दिशा तुम्ही सगळे फॅमिली आहात. मी तर नाही जाऊ देणार तुम्हाला, बस ठरलं" मीनाक्षी डोळ्यात पाणी आणत म्हणाली.
"पोरींनो आता मी काय करणार, इथून पुढे जिकडे अजय, तिकडे आम्ही. मला मेलीला तरी कुठे सोडावं वाटतंय हे घर, तीस वर्षे राहिलीये मी या शहरात आणि या घरात पंधरा वर्षे. तुम्ही दोघी पोरी आल्यापासून तर मला मुलीच मिळाल्या" काकू म्हणाल्या
" अजय ला मी सांगते, तुला जिकडे जायचंय तिकडे खुशाल जा, आमचे काका काकू आम्हाला हवेत, दिशालाही ठेवून घ्यावं म्हणतेय मी तर" मीनाक्षी तणतणत बोलत होती
त्रिशा आणि काकू दोघी एकमेकींकडे बघत मोठ्याने हसल्या.
" काकू तुम्हा लोकांचं निघून जाणं आमच्या आईबाबांनाही झेपणार नाहीये. आम्ही अजूनही पहिल्यांदा घराबाहेर राहणाऱ्या मुली आहोत त्यांच्यासाठी! आमच्या बाबतीत तुमच्या फार भरवशावर असतात ते ." त्रिशा काकूंनी समोर ठेवलेल्या चकलीकडे नुसतंच बघत म्हणाली. दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी बँगलोर ला स्थायिक होण्याची कल्पना दिली होती पण आज त्यांच्या निघून जाण्याचा ठरलेला दिवस कळल्यानंतर तिचा मूडच गेला होता.नाहीतर एरव्ही चकली तीही काकूंच्या हातची, तिच्याकडून धीर धरणं म्हणजे अशक्य गोष्ट होती.
" मला तर वैतागल्येय आई! तिने कुठला पदार्थ केला की माझं पहिलं वाक्य "काकू हे असं करतात!" हातातला चिमटा/ लाटणं/ उचटणे जे काही असेल ते फेकून मारते की काय असं वाटतं मला खूपदा. " मीनाक्षी नेहमीप्रमाणे सायलेंट एकपात्री प्रयोगातल्या पात्राने पटापट हावभाव बदलावेत तशी रडक्या मग चिडक्या आणि मग पुन्हा नॉर्मल मोड आली होती.
"अगं बाई! मेले आईला कशाला सल्ले द्यायला जायचं मग , मी तर म्हणते मारायलाच हवं होतं ते फेकून एकदा"
"काकू तुमचं नाव घ्यायचे म्हणून काही वाटायचं नाही तिला, दुसऱ्या कोणाचं असतं तर मारलंच असतं"
"तुला मार द्यायचाच असेल तर हेच कारण कशाला हवंय मीने, दिवसभरात अजून बरेच उद्योग करत असशील तू" त्रिशा बळच मूड लपवत संभाषण चालू ठेवत होती. मनातल्या मनात काका काकू सोडून गेल्यानंतर या मजल्यावर आपल्याला किती एकटं वाटेल याचंच तिला वाईट वाटत होतं. या दोघी राहतात तो फ्लॅट त्रिशा आणि मीनाक्षी गेल्या चार वर्षांपासून शेअर करत होत्या. फ्लॅटचे मालक त्रिशा च्या बाबांचे मित्रच, त्यामुळे कुठल्याही अग्रीमेंट शिवाय हव्या तितक्या काळासाठी त्यांनी त्रिशाला हा 1 bhk फ्लॅट रेंटवर देऊन टाकला होता. त्रिशा पी जी करून हॉस्टेल मधून बाहेर पडली तशी इथे रहायला आली होती. सुरवातीला तिच्या कॉलेज मधलीच एक मैत्रीण तिच्याबरोबर रहायची. नंतर ती सोडून गेली आणि ओळखिंच्या साखळीतुन मीनाक्षी तिथे रहायला आली. तेव्हापासून गेल्या चार वर्षांत दोघींच्या नोकऱ्या, पहिले प्रमोशन्स याच फ्लॅट मध्ये झाले. सुमंत कुटुंब रहायला यांच्या समोरच. तेव्हापासून या सगळ्यांमध्ये जवळीक होती. आता अजयला बँगलोर चं पोस्टिंग मिळालं म्हणून त्यांना सोडून जावं लागणार होतं. पुण्यात त्यांचं अजून एक नवं घर होतं त्यामुळे बँगलोर ला जाण्याआधी हे जुनं घर त्यांनी विकण्याचा निर्णय घेतला होता. सेफ्टी गेट च्या आवाजाने त्रिशा विचारांतून बाहेर आली.
दारातून भाजीची पिशवी घेऊन काकांचा प्रवेश झाला.
"काय म्हणतोय अड्डा ? आज कसला ज्वलंत विषय?"
"तुमच्याशी तर बोलायचंय नाहीये मला" मीनाक्षी ताडकन खुर्चीवरून उठली आणि थेट घराबाहेर पडली.
" बापरे, ह्या हिडिंबे ला काय झालं आता" काका मीनाक्षीच्या अशा धाडधुडीने चक्रावलेच.
" काका तिची चूक नाही, तुम्ही लोक आठ दिवसांनी इथे नसणार आहात, हे आज कळतंय आम्हाला. पण मला तुमची काळजी जास्त वाटतेय. अर्ध्या पेक्षा जास्त आयुष्य तुमचं इथे गेलं, आता एकाएकी सोडून जाऊन तिथे परत नव्याने सगळं सुरू करायचं म्हणजेच मोठ्ठा बदल असणार आहे तुमच्यासाठी. मला कळतंय, हे तुमच्यासाठी हे सगळं जरा कठीण असेल, पण उगीच माझं शहर माझे लोक करत बसू नका, नवीन नवीन मित्र मैत्रिणी करा. दक्षिण भारत फिरून या. काकू तुम्ही तिथल्या बायकांशी गट्टी जुळवा आणि भरपूर नवीन डिशेस शिका हा" त्रिशा स्वतःलाच धीर देत म्हणाली.
" हो हो हो , किती सूचना देशील!तुम्हा पोरींची फार आठवण येईल आम्हाला. पोरींनो आम्हा म्हाताऱ्यांकडे चक्कर मारा बरं का एखादी"
" काका नक्की येऊ आम्ही, खास तुम्हा दोघांसाठी.
बरं काका, कोणत्या फॅमिलीला हा फ्लॅट विकला आहे म्हणाला होता तुम्ही? "
समदरीया. ते नवरा बायको दोघे कदाचित एवढ्यात रहायला येणार नाहीत, पण त्यांचा मुलगा येईल एकटा."
"ओह" ऐकूनच त्रिशाला एकदम कसंतरी झालं. काका काकूंच्या घरात दुसरं कोणी राहणार आहे, त्यात तो कोणी बॅचलर मुलगा आहे ही कल्पनाच नको वाटली तिला. डोळ्यांसमोर एकदम अस्ताव्यस्त पसरलेले कपडे, न झाडलेल्या रूम्स, न धुतलेले सॉक्स, दोन तीन दिवसांची खरकटी भांडी, सिगारेट्स ची थोटकं, इ जेवढ्या गोष्टी तिने आजवर पाहिल्या होत्या आणि कोणा कोणा कडून ऐकल्या होत्या त्या सगळ्या डोळ्यांसमोर आल्या. स्वतःशीच मान हलवत ती उठली.
" बरं तुम्ही दोघेपण, पॅकिंग, आवराआवरीला सुरुवात केली की आवाज द्या. उद्या परवा मी रिकामटेकडी असते, परवा रविवारी मिनू पण.
चला येते मी"

पाहता पाहता आठ दिवस निघून गेले. सुमंतांच्या शिफ्टिंग च्या तयारीत त्रिशा मीनाक्षीने भरपूर मदत केली. निघण्याचा दिवस आला. त्या दिवशी सोमवारचा दिवस होता पण दोघींनी सुट्टी घेऊन दुपारच्या जेवणासाठी सुमंतांना बोलावून घेतले. छोले भटोरे, काकडीची कोशिंबीर, व्हेज पुलाव आणि गुलाबजामाचा बेत केला. यापूर्वी कित्येकदा त्यांनी अशी एकत्र जेवणं केली होती, आता पुन्हा असं जमायला लवकर मिळणार नव्हतं. गप्पा टप्पा, जुन्या आठवणींना उत आला.जेवणं उरकल्यानंतर त्रिशा मीनाक्षी ने आठवण आणि नव्या घरासाठी म्हणून भिंतीवरचे एक अँटिक डिझाइन असलेले घड्याळ आणि एक चांदीचा गणपती काका काकूंना भेट म्हणून दिले.
" मुलींनो, आता हे तुमच्यासाठी छोटंसं गिफ्ट , तुमच्या काकुकडून"
काकू एकेक कापडी पिशवी दोघींच्या हातात देत म्हणाल्या.
" या वेळेला ही फॉर्मालिटी अगदी चालेल आम्हाला, तुमची एखादी आठवण म्हणून" त्रिशा म्हणाली
"बघा तरी काढून काय आहे ते"
दोघींनी एकदमच दोन पर्पल रंगाचे हातांनी विणलेले स्लीवलेस क्रोशे जॅकेट्स बाहेर काढले.
" आहा, काकू तुम्ही विणलेत हे? कधी केलंत हे सगळं ? किती सुंदर आहेत !!"म्हणत मीनाक्षी काकूंच्या गळ्यात पडली.
" बऱ्याच दिवसांआधी सुरुवात केली होती. मुद्दामच लपवून ठेवलं होतं. तुमचे असतात तसे फॅशनेबल आहेत ना गं, नाहीतर तुमच्या मैत्रिणी म्हणतील हे काय घातलंय" काकू मीनक्षीच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या.
" काकू खूप सुंदर झालेत हे , अगदी वापरावेत की नाही असं वाटेल. थॅंक्यु काकू" काकूंना मिठी मारताना त्रिशाने हळूच डोळ्यातून ओघळलेला पाण्याचा थेंब पुसला.

काकूंची सून दिशा सगळे निघून गेले तरी थोडा वेळ तिथेच रेंगाळली. दिशा ब्युटीशीयन होती. त्रिशा आणि मीनाक्षी रहायला आल्यापासून ती दोघींची मैत्रिण आणि पर्सनल ब्युटीशीयन झाली होती. अर्थात त्रिशा फारशी त्या वाटेला जाणारी मुलगी नव्हती. महिना दीड महिन्यांनी एक नेहमीची वारी आणि दुसऱ्यांनी दाखवून दिल्यानंतर हेअरकट या शिवाय तिच्या आयुष्यात दुसरा पार्लर टाईम नव्हता. मीनाक्षीचं पाहून कधीतरी लग्न, पार्टी वगैरे कार्यक्रम असतील तर दिशा कडून ती घरच्या घरी हेअर आणि मेकअप करून घेत असे, तिला त्याचे पैसे पण देत असे आणि तिच्या शिव्या खात असे. त्रिशा अशीच होती. जबाबदार, व्यवहारी, मॅच्युअर, स्वच्छता नाझी, काहीशी गंभीर आणि ऑकवर्ड.
तिघी जणी त्रिशा मीनाक्षीच्या बेडरूम मध्ये जाऊन बसल्या. त्रिशाने तिघींसाठी कॉफी करून आणली. अर्ध्या तासात मीनाक्षीचा बॉयफ्रेंड, सगळ्यांचे सेलेब्रिटी क्रश ते ग्लोबल वोर्मिंग पर्यंत सगळे विषय निघाले आणि त्या दिवशीचा त्यांच्या गप्पांचा कोटा त्यांनी पूर्ण केला. तिघी आतापासूनच एकमेकींना मिस करू लागल्या होत्या पण तिघींनी ही मुद्दाम तो विषय काढला नाही. मूव्हर्स पॅकर्स आले तेव्हा बळच त्या बाहेर आल्या. जाताना प्रत्येकाला भरून आलं होतं.
सुमंतांचा सगळा संसार एकेक करून घराबाहेर हलवण्यात आला आणि फ्लॅट सुना सुना झाला. शेवटचं सगळं एकमेकांशी बोलून सुमंत कुटूंब कार मध्ये बसून सामनाच्या गाडी बरोबर निघून गेलं. आता घरात फक्त अस्ताव्यस्त पडलेले काही कागद, सुतळ्यांचे तुकडे, लहानसहान खोके, थोडीफार धूळ एवढंच काय ते बाकी राहिलं.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 2- किल्ली

नवीन मालकांना घर सोपवण्याआधी ते थोडंसं आवरून पुसून देण्याची जबाबदारी त्रिशा मीनाक्षी ने घेतली होती. आदल्याच दिवशी त्यांनी सुमंतांकडेच आधी कामासाठी असणाऱ्या बाईला आजचा वेळ देऊन ठेवला होता. सोसायटीत असं एक दिवस एखाद्याच कामासाठी तयार होणारी बाई मिळणे कठीण होते, त्यामुळे ही जुनी बाई हमखास येईल म्हणून हिला मीनाक्षीने सांगून ठेवले होते आणि त्यामुळे तिचा नंबरही घेऊन ठेवावा असे तिला वाटले नव्हते. तिची वाट पाहात त्या दोघींनी तिथेच हॉल मध्ये जमिनीवर बसकण मारली.
" किती भकास झालं हे घर एकाएकी" मीनाक्षी चहूबाजुंना पाहात म्हणाली.
"हम्म, आता आपल्याला हे असं पाहण्याची सवय करून घ्यावी लागेल" त्रिशाला त्या अनोळखी मुलाचा आधीच वैताग आला होता.
"नवी फॅमिली कशी असेल! अर्थात सुमंतांइतकी छान असण्याची अपेक्षा नाहीचेय" मीनाक्षी अजूनही सगळीकडे पहात होती.
"फॅमिली नाही, फॅमिलीतला एक मुलगा येतोय एकटा रहायला"
"हो ? " मीनाक्षी ओरडलीच , रिकाम्या घरात आवाज घुमल्याने त्रिशाच्या कानठळ्या बसल्या.
"ए अगं हळू, एकदम चार मिन्या ओरडल्यासारख्या वाटल्या. त्रिशा कानांवर हात ठेवत म्हणाली. "सॉरी मी पूर्णच विसरले तुला सांगायचं. काका म्हणाले होते असं"
मीनाक्षीने एक मोठा उसासा टाकत गुडघ्यात तोंड घातलं.
"आय नो. जाउदे. ही बाई आली कशी नाही अजून?
" हो ना. नेमका तिचा नंबर पण नव्हता घेतला काल."
" नंबर घ्यायला हवा होतास् तू मीने , सगळी कामं अर्धवट कर तू"
"अगं मला काय माहीत ही अशी दगा देईल म्हणून, जुनी बाई होती ती यांची."
"हो पण नंबर असू द्यावा, म्हणजे स्टेटस कळायला सोपं पडतं. ह्या बायकांना त्यांची रेग्युलर कामं असतात, आपलं छोटं मोठं काम लक्षात रहात नाही यांच्या. आणि राहिलं तरी त्यातून पाय काढायचं बघत असतात त्या"
"आता लेक्चर नको हा प्लिज, अजून थोडी वाट बघुयात" मीनाक्षी फुरंगटून म्हणाली.

मीनाक्षीने मोबाईल काढला आणि फेसबुक चाळण्यात गुंग झाली. त्रिशा पाय पसरून दोन्ही हातांवर रेलून छता कडे, भिंतींकडे पहात बसली. अर्धा तास निघून गेला तरी बाईचा पत्ता नव्हता. घर तर असंच नव्या मालकाच्या ताब्यात देता येणार नाही, आता पुन्हा बाई बघा, तिची वाट बघा! एवढा सगळा विचार करून शेवटी त्रिशाने ठरवून टाकलं.
"मीनू, चल उठ. आपणच करून घेऊयात आता इथली स्वच्छता, अजून वेळ घालवायला नको. " त्रिशा उठत मागच्या बाजूने जीन्स झटकत म्हणाली.
"ओके" मीनाक्षी फेसबुक स्क्रोल करता करता म्हणून गेली. दोन तीन सेकंदांनी तिला करंट बसला "काय? आपण?!"
"हो, काही पर्यायच नाहीये आता, आता कोणी मिळणार ही नाही"
"यार त्रिशा, सकाळपासून कामच करतोयत आपण, आता मला बुडही हलवायची इच्छा नाहीये" मीनाक्षी जवळजवळ रडत म्हणाली
"हो माहितीये, पण आता उद्यापासून आपलं ऑफिस असेल,
वर दोघींनी आजच सुटी घेतल्यामुळे उद्या पुन्हा घेणं शक्य नाही. हे घर असंच तर नाहीना सोपवू शकत आपण."
"घर आता काकांचं राहिलं नाहीएना मग कशाला आपण त्रास करून घ्यायचा, नवा मालक बघेल..."
मीनाक्षी चं वाक्य पूर्ण होण्याआधीच त्रिशा घरातून बाहेर पडली आणि तडक त्यांच्या घरात गेली. त्यांच्या घरातले झाडू, सुपली, मॉप, बादली इत्यादी साहित्य आणले. हा एक सेट सुमंत मुद्दाम इथेच ठेऊन गेले होते त्यामुळे दोघींना आपापली हत्यारं मिळणार होती. त्रिशाने दोघींचे छोटे स्कार्फ ही बरोबर घेतले. येताना त्यांच्या 305 फ्लॅटच्या लाकडी दाराला कुलूप लावले आणि बाहेरच्या सेफ्टी डोअर ची कडी लावून घेतली. जमिनीवर फतकल मारून बसलेल्या मीनक्षीला तिने धरून उठवले. मीनाक्षी रडत, बाईच्या नावाने खडे फोडत कशीबशी तयार झाली. दोघी स्कार्फ ची त्रिकोणी घडी करून कपाळावर स्कार्फ बांधून , राहिलेल्या कोनाने केस झाकून सज्ज झाल्या. घराच्या अर्ध्या अर्ध्या वाटण्या केल्या. घर तसं स्वच्छ होतं फ़क्त एकेक हात मारला की काम होणार होतं. झाडू उचलून दोघी आपापल्या रणभूमीवर सज्ज झाल्या.
साधारण अर्ध्या तासानंतर दाराची बेल वाजली.
हम्म! ही बाई आता आली दिसतेय असं म्हणत त्रिशा पुन्हा हातातल्या मॉप ने किचन पुसू लागली. नुकत्याच पुसलेल्या फरशीवरून चालणं तिच्या जीवावर आलं म्हणून तिने आवाजाकडे दुर्लक्ष केलं. बेल पुन्हा वाजली, यावेळी दोनदा.
"मी पाहते त्रिशा थांब" मीनाक्षी आतून आवाज देत म्हणाली
"नाही, तू तिकडेच थांब, किचन ची फरशी ओली आहे. मी बघते" त्रिशा मॉप भिंतीशी उभा करून दोन्ही हात हवेत थोडेसे पसरून तोल सांभाळत पायांच्या पंज्यांवर हळूहळू चालत दाराकडे निघाली.
" बाईला चांगलं खडसाव, दगाबाज कुठली" आतून मीनाक्षी ओरडली.
त्रिशाने लावून घेतलेल्या सेफ्टी डोअरच्या फुलांच्या जाळीतून पाहीले तर एक ग्रे फॉर्मल शर्ट कमरेवर हात ठेवून पाठमोरा उभा होता.
" एस्क्यूज मी?" त्रिशाने आतूनच विचारले.

आवाज येताक्षणी त्याने पटकन मागे वळून पाहिले.
" मिस त्रिशा उपाध्ये याच फ्लॅट मध्ये राहतात ना? " त्याने त्रिशा च्या फ्लॅटकडे अंगठ्याने इशारा करत विचारले. "आणि हा फ्लॅट सुमंतांचा, बरोबर?"
"हो आणि हो. आपण? "
" मी नकुल. आशिष समदरिया चा मित्र. मिस उपाध्येना भेटायचं होतं पण घराला लॉक दिसतंय त्यांच्या"
" ओह" त्रिशाने सेफ्टी डोअर उघडले. "मीच त्रिशा" त्रिशा डोक्यावरचा रुमाल काढत म्हणाली." मिस्टर समदरिया किल्ली पिक करण्यासाठी उद्या संध्याकाळी येणार आहेत असं काका म्हणजे सुमंत काका मला सांगून गेले होते"
नकुलने तीच त्रिशा आहे असं कळल्यानंतर हलक्याशा भुवया उडवत कळल्यावर तिचा तो अवतार डोक्यापासून पायापर्यंत पाहून घेतला. खांद्यापर्यंत स्टेप कट केसांची ची हाय पोनी, प्लेन ग्रीन टीशर्ट,जीन्स गुडघ्यापर्यंत दुमडलेली, उकड्याचे दिवस असल्याने आणि काम केल्याने चेहरा काहीसा घामेजलेला.
" आशिष ला आज कामानिमित्त अचानक मुंबईला जावं लागलं म्हणून त्याने मला किल्ली घेऊन ठेवायला सांगितलं आहे, परवाच शिफ्टिंग होईल मेबी"
त्रिशाच्या कपाळावर आठ्या पडल्या. वास्तविक तिने आशिष समदरिया हा प्राणी प्रत्यक्ष कसा दिसतो हेही पाहीले नव्हते. काकांचं कुटुंब तोवर बँगलोर ला शिफ्ट झालं असेल आणि किल्ली त्याला त्रिशा मीनाक्षी कडूनच घ्यावी लागेल हा विचार करून किल्ली देताना नेमका माणूस कोण आहे हे माहीत असलं पाहीजे म्हणून काकांनी आशिष च्या ई-मेल अकाउंट वर असलेला त्याचा फोटो त्रिशा ला दाखवून ठेवला होता. काका आशिष आणि त्याच्या कुटुंबियांनाला भेटलेले होते आणि हे सगळे फोनवरून एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये होतेच. आशिष किल्ली घ्यायला येणार हेही त्यांना माहीत होते, त्यामुळे त्रिशाला फक्त फोटो दाखवून ते निर्धास्त होते. त्रिशाने आशिष चा चेहरा निदान फोटोत तरी पाहीला होता पण
हा आता अजून एक अनोळखी मुलगा आशिष चा मित्र आहे असं सांगून किल्ली मागत होता. त्रिशाला च्या सेफ आणि जबाबदार स्वभावाला त्याच्या फक्त म्हणण्यावरून त्याला किल्ली देऊन टाकणे पटेना. थोडासा विचार करून ती म्हणाली.
" माफ करा, मी किल्ली फक्त मिस्टर समदरियांकडे देऊ शकते." त्रिशा शक्य तितक्या नम्रपणे म्हणाली.
" मी समजू शकतो, पण आज किल्ली मिळणे गरजेचे आहे, त्यामुळे माझ्याकडे दिली तर हरकत नाही, आशिष आणि मी रुममेट्स आहोत" नकुल म्हणाला
" अकच्युली नाही. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्हाला पाहिलेलं ही नाहीये, शिवाय काका मला असं काही म्हणाले नव्हते. खरंतर मी मिस्टर समदरीयांना देखील पाहिलेलं नाहीये पण किमान त्यांचा फोटो पाहिलेला आहे. इतकी मोठी गोष्ट मी काहीच जाणून न घेता तुमच्याकडे सोपवू शकत नाही, सॉरी" त्रिशा ठामपणे म्हणाली.
"ठीक आहे , मी आशिष ला कॉल करतो, तो स्वतःच सांगेल तुम्हाला"
त्रिशा ने मान हलवत एक मोठा उसासा टाकला.
नकुलने ब्लॅक फॉर्मल पॅन्ट च्या खिशातून चटकन मोबाईल काढला. स्क्रीन वर अंगठा फिरवणार तोच हाताचा तळवा उंचावत त्रिशा म्हणाली
"हे पहा, त्यांच्या केवळ एका कॉल वर ही मी विश्वास ठेवू शकत नाही. पलीकडून कोण बोलतंय हे मी कस ठरवू शकेन?" साफसफाई करणं त्रिशाला कितीही आवडत असलं तरी ह्या अनपेक्षितपणे अंगावर पडलेल्या कामामुळे ती काहीशी वैतागली होती, त्यात पुन्हा ह्या मुलाशी वाद घालावा लागत होता.
दारातून येणारे आवाज ऐकून मीनाक्षी हात झटकत, हाश हुश्श करत बाहेर आली
"काय चाललंय त्रिशा ? हे कोण? " नकुल कडे बघत मीनाक्षी म्हणाली.
" आज सोमवार आहे, मी आमच्या टी टाईम मधून पळून इथे आलो आहे आणि तुमचा विश्वास संपादन करून घ्यायचा म्हणजे आयुष्य लागेल असं दिसतंय आता. " नकुल त्रिशाकडे बघत हसत म्हणाला. याला परिस्थितीच गांभीर्यच नाहीये पाहून त्रिशा चिडली.
" तुमच्यासाठी हा चेष्टेचा विषय असू शकतो पण किल्ली बरोबर माणसाकडे देण्याची जबाबदारी काकांनी माझ्यावर टाकली आहे, सो प्लिज, तुम्ही खुद्द समदरियांना इथे यायला सांगा" त्रिशाचा स्वर आता काहीसा कठोर झाला होता.
"तो मुंबई ला गेलाय, विसरलात?" नकुल खिशात हात घालून निवांत उभा रहात म्हणाला.
"मी त्रिशाशी सहमत आहे" मीनाक्षी आता आखाड्यात उतरली होती.
" पण मला आज किल्ली घेऊन जाणं गरजेचं आहे. माझा वेळ वाया चाललाय, तुम्हाला ही तुमचे काम आहेत असं दिसतंय." नकुल एका हाताचा तळवा उपडा करून त्या दोघींकडे कडे रोखत खाली वर झुलवत म्हणाला. "ओह, ठीक आहे , तुम्हाला प्रूफ च हवंय ना. एक मिनिट"
मघाशी खिशात सरकवलेला फोन नकुलने पुन्हा बाहेर काढला.
स्क्रीनवर काही सेकंद बोटे फिरवली, स्क्रीन त्रिशा कडे केली आणि दुसऱ्या हाताचं बोट स्क्रीनवर ठेवत म्हणाला.
"हे बघा, हा आशिष, याला तुम्ही पाहिलंय, म्हणजे फोटोतच आणि त्याच्या डाव्या बाजूला मी. नीट पहा. " असं म्हणत नकुलने फोन तुलना करण्यासाठी तसाच आधी स्वतःच्या चेहऱ्याजवळ नेला मग त्रिशाकडे दिला. तो चार पाच मुलांचा ट्रेक ट्रिप चा फोटो वाटत होता. नकुलने त्याला झूम केले होते. आशिष च्या डाव्या बाजूला एक मुलगा सोडून नकुल उभा होता. त्यात त्याचा आतासारखा वरतून खाली येताना केसांची घनता कमी कमी होत गेलेला क्रू कटच होता, पण सध्याचं काळभोर गवत थोडंसं वाढलेलं दिसत होतं. डोळे फक्त उन्हातच कॉफी कलरचे दिसतील असे काळेच वाटणारे होते. चेहरा उभा, अंडाकृती पण नाजूक होता , चेहऱ्याच्या उभट पणाला शोभून दिसणारे सरळ लांब ग्रीसीयन नाक एवढं धारदार की कितीही गाल वाढले तरी ते कायम वरच दिसेल. अंगाला चिकटलेला, 'पॅरिस' अशी इंग्लिश मधून प्रिंट असलेला काळा राउंड नेक टी शर्ट, शेवाळी बरमुडा आणि चेहऱ्यावर आता मिनीटभरापूर्वी होतं तसंच गोंडस हसु, फक्त जरासं मोठं होतं. ओठ पातळ आणि मुलांमध्ये क्वचित दिसतात असे लाल गुलाबी होते. मोठं हसल्यामुळे पातळ ओठांना अजूनच लपवणारी वरची थोड्याशा उभट, एक सारख्या पांढऱ्याशुभ्र मोत्यांची ओळ संपुर्ण दिसत होती. खालच्या तशाच ओळीचीही हिंट कळून येत होती. डेंटिस्ट च्या क्लिनिक च्या भिंतीवर असतं तसं ते हसू होतं.
आता मीनाक्षीचे समाधान झालेले दिसले.
"त्रिशा हा ही बरोबरच माणूस आहे असं दिसतंय" त्रिशाच्या खांद्यावरून फोन मध्ये डोकावत असलेली मीनाक्षी हळूच त्रिशाला म्हणाली. त्रिशाला या व्यक्तीच्या वृत्तीवर संशय तसा नव्हताच, पण सहजासहजी अनोळखी माणसाकडे तिला किल्ली द्यावीशी वाटत नव्हती, जोपर्यंत योग्य माणसापर्यंत ती जाणार नाही तोवर तिलाच घोर लागून राहील. अजून ती मोकळ्या मनाने हो म्हणणाच्या पायरीपर्यंत आलेली नव्हती.
"नाही मीनाक्षी" त्रिशा नकुलकडे मोबाईल देत म्हणाली. "मला एकदा काकांना फोन करून हे सगळं सांगावं लागेल. मी आलेच." असं म्हणत त्रिशा आत निघून गेली. क्रू कट ने मीनाक्षी कडे पाहात "कठीण आहे" अशा अर्थाने दोन्ही हातांचे तळवे पसरले.
तीनेक मिनिटांनी त्रिशा बाहेर आली. बाहेर येते तोच तिला मीनक्षी आणि नकुल हसून एकमेकांना टाळी देताना दिसले. त्यांचे तिच्या मोठ्या झालेल्या डोळ्यांकडे लक्ष जाताच दंगा चालू असलेल्या वर्गात शिक्षक यावेत तसे ते दोघे पुतळ्यासारखे स्तब्ध झाले.
एकंदरीत आशिष समदरिया आणि अजय च्या कम्युनिकेशन मधला हा गोंधळ होता. आशिष ला त्याने आज त्रिशा मीनाक्षी या वेळी घरी सापडतील असं सांगितलं होतं पण आशिष ने गडबडीत किल्ली घेण्यासाठी कोण येणार आहे हे अजय सांगितलेलं नव्हतं.
"झालं सगळं क्लिअर? की आता आशिष चा आणि माझा शाळेचा दाखला हवाय" नकुल शक्य तितका चेहरा सरळ ठेवत म्हणाला. मीनक्षीच्या तोंडातून मात्र फिस्कन हसू बाहेर पडले. नकुल ने गोंडस हसून तिला सपोर्ट केला.
मीनाक्षीकडे रागाने बघून पुन्हा नकुल कडे बघत त्रिशा म्हणाली,
"अजून 10 एक मिनिटे वाट पहावी लागेल"
" ओह, केस सोल्व्ह करायला कन्सल्टंट हवाय का? पण बेकर स्ट्रीट वरून दहा मिनिटांत इथे पोहोचेल का तो? " मीनाक्षी ला डोळा मारून मोत्यांची पखरण करत नकुल म्हणाला.
त्रिशाने त्याच्यावर डोळे रोखले.
" काका स्वतः तुम्ही दोघे असलेला फोटो आशिष कडून घेऊन मला पाठवणार आहेत "
आता नकुलने आ च केला. मीनाक्षी हसू लपवून लाल झाली.
" बरोबर आहे, जबाबदारी जबाबदार लोकांनाच कळते. साहाजिकच इथे कोणी नाहीचेय तसं" त्रिशा शांत आणि गंभीर आवाजात म्हणाली.
"सॉरी त्रिशा, पण मी खरोखर तुझ्याशी सहमत आहे. तू अशी आहेस् म्हणून मला कसलीही काळजी नसते" मीनाक्षी त्रिशाच्या खांद्याभोवती हात गुंढाळत म्हणाली. नकुल अजूनही मी मात्र अजिबातच सॉरी नाहीये च्या अर्थाने हसत होता.
तेवढयात त्रिशाचा फोन वाजला. तिने कोड टाकून पटकन फोन उघडला. व्हाट्सऍप वर नेमका नकुलने दाखवलेलाच फोटो काकांनी पाठवला होता. काकांना रिप्लाय म्हणून एक अंगठा पाठवून त्रिशा ने वर पाहीले. काहीच न बोलता फक्त फोटो उघडलेली स्क्रीन नकुल समोर केली. नकुलने एकदम तो त्रिशाच्या हातातून घेतला, नाटकी पणाने पुन्हा स्वतःचा फोन काढून त्यात तोच फोटो काढून , दोन्ही फोन शेजारी शेजारी ठेऊन चष्मा घालायला विसरलेल्या माणसासारखे डोळे करून ते फोटो तपासले. त्रिशाने डोळे फिरवलेले डोळ्यांच्या कोपऱ्यातून पाहून तो पुन्हा नकुल स्पेशल हसला. त्याच्या सततच्या त्या हसण्याचा आणि चेष्टा करण्याचा त्रिशाला आता राग येऊ लागला होता. आत जाऊन किल्ली ती घेऊन आली आणि नकुलच्या हातावर आदळली.
" पाच मिनिटं , आम्ही आमचं सामान बाहेर आणतो"
मीनाक्षी त्रिशा ने कुलुपासकट पटापट त्यांची सगळी हत्यारं बाहेर आणली. नकुलने दाराला कुलूप अडकवलं.

" थँक्स अ लॉट" असं म्हणत नकुल निघाला आणि परत मागे वळत त्रिशाकडे बघत म्हणाला
" बाय द वे, तुमची साफसफाई अर्धवट राहिलेली असेल तर आम्ही शिफ्ट झाल्यानंतर पुन्हा आलात तरी हरकत नाही"
मीनाक्षीला पुन्हा हसू फुटले, त्रिशा कुठलीच प्रतिक्रीया न देता सरळ तिच्या घराच्या दारापाशी जाऊन 'आम्ही' शब्दावर विचार करत कुलूप उघडू लागली. मीनाक्षीला बाय करून नकुल लिफ्ट न वापरता धडाधड पायऱ्या उतरत निघून गेला.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 3 - त्रिशा

त्रिशाला नोकरी लागली त्याच महिन्यात तिचे बाबा गेले. तोपर्यंत स्टॅटिस्टिक्स मध्ये पीजी ते कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड ह्या गोष्टी झटपट आणि स्वप्नवत झाल्या होत्या. पहिल्या पगारात आई बाबांसाठी काहीतरी करायचं यावर रोज रात्री गादीवर पडलं की ती विचार करत असे. त्यातली आईबाबांसाठी नॉर्थ ईस्ट इंडिया टूर च्या पॅकेज ची कल्पना तिला मनापासून आवडली. बाबा अजून रिटायर्ड नव्हते त्यामुळे त्यांच्या हातात थेट तिकीटं देऊन उपयोग नव्हता. तसेच 'कशाला यात पैसे घालवलेस ते तुम्हा दोघींना सोडून आम्हाला एकट्याने जावं वाटणार नाही' यासाठी एक दिवस द्यावा लागणार होता. उंच टेकडी वर गेल्यानंतर चारी बाजुंनी शुभ्र, कापसासारख्या मऊ ढगांनी घेरले जावे तशी ती या सगळ्या प्लॅन्स आणि स्वप्नांच्या दुनियेत वावरत होती. पण गोष्टी स्वप्नवत घडण्याचा तिचा कोटा संपला असावा. जॉईन होऊन उणेपूरे तीन आठवडे ही झाले नव्हते तोच तिलाच सुट्टीसाठी विनंती करावी लागली होती.
एका सकाळी ऑफिसमध्ये तिच्या डेस्कवर बसून सिनियर कडून काम समजावून घेत असतानाच तिला आईचा फोन आला. तिने दोनवेळा कट केला. तिसऱ्यांदा तिच्या सिनियर ने च तिला घ्यायला लावला. फोन उचलल्यावर ती आईवर वैतागली. तिच्या डोक्यात त्यावेळी तिच्या कामाबद्दल असंख्य प्रश्न होते, इनसेक्युरिटी होती, भीती होती. सकाळी घरातून निघतानाच व्यवस्थित बोलणं होऊनही ती आता सारखी का डिस्टर्ब करतेय, म्हणजे काळजी तरी किती करावी, काहीतरी मर्यादा? मी काय लहान आहे का आता असा स्वतःशीच त्रागा करत तिने फोन उचलला. दबक्या आवाजात तणतण करत मग तिने आईला बोलण्याची संधी दिली आणि तिचं बोलणं झाल्यानंतर ती पूर्ण ब्लॅंक झाली, आपण आत्ता काहीतर ऐकलंय हे तिच्या डोक्यात शिरलं खरं, पण ते मेंदूत प्रोसेस च होईना. ती तशीच डेस्कवर येऊन बसली. तिचा सिनियर तिथेच होता.
"करूयात कँटीन्यू?"
"आं? सॉरी, हो"
सिनियर बोलत राहीला, तेही तिच्या डोक्यावरून गेलं. दोन तीन मिनीटांनी त्याचं बोलणं तोडत म्हणाली.
"माझे बाबा गेले"
"काय?"
"हो आईने त्याचसाठी फोन केला होता"
"आत्ता आईचा फोन होता तुझ्या? बाबा?" त्रिशाचं वागणं पाहून सिनियर पण गोंधळला.
"...."
" तू जा, सरांना भेट, सुट्टी घेऊन ताबडतोब निघ"
सिनियरनेही सावरायला काही क्षण घेतले.
" काय?" धड वरचा ही नाही आणि खालचा नाही असा तिचा स्वर होता.
"चल माझ्याबरोबर, उठ"
सिनियर ने तिला धरून उठवले. सरांना आधी इंटर्नल मेसेंजर पिंग केल्याशिवाय भेटण्याची पद्धत नव्हती, पण आता तेवढ्या फॉर्मालिटी ला वेळ नव्हता. सिनियर तिला घेऊन केबिन जवळ गेला आणि दारावर नॉक केले. त्यानंतर सरांशी ती काय बोलली, तिथून यांत्रिक हालचाली करून रिक्षाने बस स्टँडवर कशी आली, फलटण च्या स्टँडवर कधी उतरली आणि पुन्हा रिक्षा करून घरी कधी आली हे तिला स्वतःलाच समजले नाही. दारात दिसणारे बऱ्याच चपलांचे जोड पाहात आणि बोलण्याचे दबके आवाज ऐकत ती घरात आली . घरी येऊन आईचा आणि बहिणीचा चेहरा पाहीला आणि मगच संपूर्ण भानावर आली. बाबांवर अंत्यसंस्कार होईपर्यंत तिच्या डोळ्यांतून एक अश्रू बाहेर पडला नाही.

ऑफिसमधून तिला 10 दिवसांची सुट्टी मिळाली होती. चार पाच दिवसानी भेटायला येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ कमी झाली तेव्हा त्या तिघींना घर खायला उठलं. तिघींनाही आपण आता पोरके झाल्याची तीव्र जाणीव होऊ लागली. डोक्यावर एकवेळ छत नसेल तर चालून जाईल,पण बाबांची उणीव कशानेच भरून निघणारी नव्हती. पुढचे काही दिवस त्यांच्या बोलण्यातून चुकून काही वेळा बाबा अजून आपल्यातच असल्यासारखा त्यांचा उल्लेख येत होता. ते एक दोन न रडल्याचे दिवस त्रिशाने नंतर रात्री एकट्यातच भरून काढले. त्या रात्रीच त्रिशा मोठी झाली. पण सातव्या महिन्यातलं मूल जसं काहीतरी उणीव घेऊन जन्माला येतं, त्रिशाचं मोठं होणं तसं होतं.बाबा नाहीत हे नको असलेलं वास्तव एकीकडे होतंच पण बाबांनंतर घराला सावरण्याची, सांभाळण्याची जबाबदारी आता आपलीच आहे , घरातली कर्ती कमावणारी व्यक्ती आपणच आहोत या जाणिवेने तिला बदलून टाकले. त्यानंतर तिने दोघींजवळ बाबांचा विषय काढला नाही, त्यांची आठवण आली तर कधीही त्यांच्याजवळ मन मोकळे केले नाही. आपल्याला भावनिक झालेलं पाहून दोघींचा धीर खचू नये, हा विचार त्या मागे होता. आपण स्वतः स्थिर आहोत असे दाखवत ती आईचं आणि विशेषकरून तिच्या पेक्षा चार वर्षांनी लहान बहिणीचं सांत्वन करत राहिली. बाहेर जवळचे नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याजवळ ही तो विषय ती टाळू लागली. सिंपथी ही गोष्ट आधीपासूनच तिची नावडती होतीच, तिच्या दृष्टीने ती एक निरर्थक गोष्ट होती. जमलं तर माणसाने समोरच्यासाठी काहीतरी प्रॅक्टिकली करून दाखवावं, फुकट सिंपंथी देऊन उगीचच स्वतःचा आणि दुसऱ्याचा वेळ घालवू नये या मताची ती होती. आता अशा परिस्थितीत तर बाहेरच्यांच्या सिंपथी मुळे धीर येण्याऐवजी आपण अजूनच दुबळे होत जातो आणि अशा दुबळेपणाचा नंतर लोक फायदा उठवतात या विचाराने तिच्या मनात पक्के घर केले होते. त्रिशा स्वभावाने खंबीर होती, पण तो खंबीरपणा आणि जबाबदारपणा सध्यातरी फक्त करियर मधल्या चॅलेंजेस पेलणे, नवनवीन गोष्टी शिकत राहणे, आईबाबांना मदत होईल त्या दृष्टीने सेव्हिंग्ज, बहिणीला तिच्या करियर मध्ये मार्गदर्शन, आपण केलेल्या चुकांबाबत तिला आधीच सूचना देऊन ठेवणे या गोष्टींपुरताच मर्यादित होता. अचानक एवढा अवघड पेपर समोर येऊन पडेल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. हे सगळे भावनिक ओझे वागवून ती मनातून दडपून गेली. तिचे करिअर, घरच्यांकडे कुटुंब प्रमुख असल्यासारखे लक्ष देणं- कधीकधी आवश्यकतेपेक्षा जास्तच, तिने उत्तम सांभाळले. वास्तविक आई ने लगेचच मुलींसाठी स्वतःला सावरले होते, शलाकानेही परिस्थितीशी जुळवून घेतलेहोते, त्रिशाला वाटत होतं तेवढ्या त्या दुबळ्या नव्हत्या, त्यांची आर्थिक स्थिती ही तितकी वाईट नव्हती. तरीही त्रिशा शंभर टक्के या दडपणातून बाहेर आलीच नाही. नेहमीप्रमाणे महिन्यातून एकदा घरी ती आली की तिला बाबांची तीव्र आठवण होत असे. मूव्ह ऑन होणे तिला अजूनही जमत नव्हते. तिच्या त्या अस्वस्थतेच्या काळात तिला उगीचच घराचा कुठलातरी भाग आवरायला काढणे, कपाटातले डबे काढून घासत बसने, कपड्यांचं कपाट थोडंसं विस्कटलं की लगेच तो कप्पाच रिकामा करून पुन्हा घड्या घालून व्यवस्थित लावणे अशा सवयी लागल्या. हा ocd अर्थातच नव्हता, ताण कमी करण्यासाठी, मन दुसरीकडे वळवण्यासाठी तिला आपोआपच मिळालेला मार्ग होता. अशा सगळ्या परिस्थितीत सुमंत कुटुंब तिच्यासाठी ओएसीस बनून राहणे साहजिकच होते.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 4 - नवा शेजारी

सवयीप्रमाणे जिना चढत त्रिशा तिसऱ्या मजल्यावर आली. समोरच्या फ्लॅटचं दार उघडं होतं. शिफ्टिंग चालू असल्याच्या खुणा दिसत होत्या. दोन दिवस सुमंतांच्या बंद घराची तिने सवय करून घेतली होती, पण ते दार आज उघडं दिसलं आणि ती एकदम नॉस्टॅल्जिक झाली. त्यांनी आणि त्रिशा मीनाक्षीने एकत्र साजरे केलेले सण, वाढदिवस, सुटीच्या दिवशी पाहिलेले मुव्हीज, अंगतपंगत, न्यू इअर च्या रात्री उशिरापर्यंत पाहिलेले कार्यक्रम हे सगळं तिच्या डोळ्यासमोरून गेलं. त्या घराकडे तोंड करून शून्यात बघत ती उभी राहीली. अखेर पुन्हा वर्तमानात येत एकेक पाय वर घेत तिने सँडल चे बंद काढले, चपलांच्या कपाटात सरकवले. पर्समधून घराची किल्ली काढली आणि कुलूप उघडणार तोच मागून "हाय" असा आवाज आला.
तिने मागे पाहीले. क्षणभर निरीक्षण करून आशिष समदरियाला तिने ओळखले. त्याच्या फॉर्मल पांढऱ्या शर्ट च्या बाह्या बटन्स काढून कोपरापर्यंत खाली-वर दुमडलेल्या होत्या. ऑफिस संपवून थेट शिफ्टिंग च्या कामाला लागला असावा असा एकंदरीत अवतार होता.
"हाय" त्रिशा ठेवणीतलं हसली
" त्रिशा की मीनाक्षी?"
"त्रिशा. आशिष? "
"बरोबर" आशिषने हात पुढे केला.
"ओह, एक मिनिट" म्हणत त्रिशाने किल्ली पुन्हा पर्समध्ये टाकली. तोवर गोंधळत आशिष ने हात मागे घेतला होता. त्रिशाने पर्सला अडकवलेली सॅनिटायझर ची बाटली हातावर पालथी केली, हात पटापट एकमेकांवर चोळले आणि हात पुढे केला. आशिषने हसून हात मिळवला
"ऑफिस?"
"हो, तिकडूनच येतेय"
" बाय द वे, त्या दिवशी किल्लीवरून खूपच गोंधळ झाला. नकुलने सांगितलं सगळं. सॉरी, गडबडीत मीच अर्धवट माहिती दिली होती, पुढे एवढं सगळं होऊ शकेल असं लक्षातच आलं नाही"
त्या दिवशीचा तो सगळा त्रासदायक प्रकार त्रिशाला आठवला.
"दॅटस् फाईन, किल्ली योग्य माणसाकडे देऊन जबाबदारी एकदाची पूर्ण करून टाकणे एवढंच माझं एम होतं, त्यामुळे ते सगळं जरा जास्त ताणलं गेलं"
मनातून तिने केलं ते शंभर टक्के बरोबरच होतं याबद्दल तिला अजिबात शंका नव्हती.
"नाही, तुझं बरोबर होतं. अशा कामांमध्ये खबरदारी घेणं अजिबात चुकीचं नाही, कदाचित तुझ्या जागी मी असतो तर असाच वागलो असतो."
हे जरा तुझ्या अनोयिंग मित्रालाही समजाव!
बाकी त्याचं बोलणं ऐकून त्रिशाला स्वतःच कौतुक वाटलं, एखाद्या छोट्याला बे चा पाढा न चुकता म्हणून दाखवल्यावर वाटतं तसं! आशिष नक्कीच त्याच्या रुममेट् पेक्षा सेन्सिबल व्यक्ती आहे असं मत बनवायला तिची काहीच हरकत नव्हती.

"शिफ्टिंग झालं दिसतंय सगळं" त्रिशाने विचारलं
"आमचं सामानच किती होतं असं, त्यामुळेच विक डे मध्ये शिफ्ट करू शकलो."
पुन्हा आमचं. म्हणजे तो नकुलही इथे राहणार हे खरंच आहे तर! याचा अर्थ आता कुठल्याही क्षणी बाहेर येऊन तो नक्कीच दर्शन देईल असं तिला वाटलं आणि ते तिला अजिबात नको होतं. मान उंचावून आशिष च्या मागे बघत ती खात्री करू लागली.
ती मागे बघतेय म्हणून आशिष ने ही मागे वळून पाहिलं. त्याने काही विचारण्याच्या आत त्रिशा ने न निघालेला विषय बदलला.
"इथे खालीच, सोसायटीच्या बाहेर गरजेची सगळी दुकाने आहेत. अर्थात तुम्ही पाहिलीच असतील ती"
"येस"
पुढे काय बोलावं ते दोघांनाही न कळल्यामुळे त्रिशा शेवटचं काहीतरी बोलायचं म्हणून बोलली.
"ठीक आहे मग, तुला काही गरज पडली तर सांग. म्हणजे काही विसरलं, संपलं असेल .. " आशिष तिला बरा वाटला म्हणून तिला फॉर्मली का होईना असं म्हणावं वाटलं, अजूनही काका काकूंच्या घरात दुसऱ्याचा वावर तिला पचतच नव्हता.
"हो, नक्की..थँक्स'
"ओके..बाय"
"बाय"
त्रिशा घरात आली आणि लगेच तिचा फोन खणखणला.
"बोल मीनु"
"आलीस तू घरी? ऐक, मला आज जरा उशीर होईल, बर्थडे पार्टी आहे कलीग ची, जेवूनच येईन"
"ओके, काळजी घे आणि जास्त उशीर करू नको"
"येस मॅम"
"रेस्टॉरंट तिथून जवळच आहे ना? आणि घरी कशी येणार आहेस?"
"डोन्ट वरी, मी एकटीच येईन आणि व्यवस्थित येईन ठिके?"
"बरं, निघालीस की मेसेज कर"
" डन, बाय"
"बाय"
एरव्ही कधीतरी घर असं फक्त स्वतःच्या मालकीचं असलेलं तिला आवडत असे पण आज मीनू ने येऊन कंटाळा येईपर्यंत जगभराच्या गॉसिप्स आपल्याला सांगत बसाव्यात असं तिला वाटत होतं. नेमका आजच तिला उशीर व्हायचा होता. तिने किल्ली दाराजवळ असलेल्या टेबलवरच्या बाउल मध्ये टाकली. बेडरूम मधल्या कपाटात तिची बॅगपर्स ठेऊन दिली. स्वच्छ धुतलेला, कापलेल्या संत्र्याची प्रिंट असलेला तिचा नेहमीचा आकाशी टी शर्ट आणि गोळ्यांच्या डिझाइन चा पजामा काढला. टी शर्ट पजामामध्ये गोल छोटा चेहरा, गोबरे गाल, काहीशी चबी आणि अवरेज उंची असलेली त्रिशा नववी दहावीतली शाळकरी मुलगी वाटत असे. बाथरूम मध्ये जाऊन ती हातपाय धुवून फ्रेश झाली, स्वतःसाठी चहा करून घेतला आणि टीव्हीसमोर जाऊन चॅनेल सर्फ करता करता बाहेरून येणाऱ्या मुलांच्या बोलण्याचा, हसण्याचा, सामान इकडे तिकडे सरकवण्याचा, प्लास्टिक च्या पिशव्यांच्या आवाजांचा कानोसा घेत बसली. जेवणाची वेळ झाली तशी तिने सकाळचं काय शिल्लक राहिलंय ते पाहीलं. एक पोळी शिल्लक होती. तिने कुकरला मुगाची खिचडी लावली. 15-20 मिनीटांनी ताटात पोळी, आईने दिलेला साखरांबा, उडदाचा भाजलेला पापड आणि खिचडी असं सगळं एकत्र घेऊन हॉल मधल्या मऊ खुर्चीत मांडी घालून बसली. टीपॉय टेबलच्या खालच्या लाकडी फळीवर ठेवलेले 'हॉंटिंग ऑफ द हिल हाउस' काढून खुर्चीच्या हातावर ठेवून कंटिन्यू केले. जेवण, भांडी घासणे झाल्यावर त्रिशा रोजच्या सारखं शतपावलीसाठी बाहेर पडली.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 5 - पीजे

त्रिशा जिना उतरत बिल्डिंग मधून बाहेर पडली. जून नुकताच लागलेला होता. उरल्यासुरल्या उन्हाळ्यातल्या रात्रीचा आणि अजून सुरू न झालेल्या मान्सूनची चाहूल असलेला असा मिश्र सुखद, गार, नॉस्टॅलजीक वारा होता. उगाचच आपल्या क्रशची, ब्रेकअप ची, किंवा शाळेत असताना या काळात सुरू असलेल्या सुट्ट्यांची आठवण करून देणारा! खाली रोजच्यासारखे , रोजचे ठरलेले सोसायटीकर फिरताना दिसत होते. सोसायटी खूप मोठी होती. ए बी सी पुन्हा त्यात ए 1, 2,3 अशा बिल्डिंगस् च्या रांगा होत्या, त्यामुळे मधला आवार कडेकडेने गाड्या पार्क करूनही लांबी रुंदीला मोठा रहात होता. मध्यभागी डिव्हायडर सारखा उपयोग होईल असा एक मोठा, दोन तीन पायऱ्या चढून वर जावं लागेल असा आयत केलेला होता. त्या आयतातच थोडसं लॉन आणि मुलांसाठी दोन घसरगुंड्या , दोन झोके ठेवलेले होते. त्रिशा केसांची हाय पोनी घट्ट करत आजूबाजूचं निरीक्षण करत निघाली. नेहमीच्या एक दोन ओळखीच्या तोंडाना स्माईल केलं.
थोडीशी पुढं जाते तोच तिच्या दिशेने तोंड करून उभा काळा टी शर्ट आणि शेवाळी बरमुडातला क्रू कट एक हात कमरेवर ठेऊन फोनवर बोलत असलेला दिसला. दोघांची काही सेकंद नजरानजर झाली. अचानक त्याला असं समोर पाहून त्रिशा सेकंदभरासाठी थबकली पण सावरून नजर खाली करून पुन्हा चालायला लागली. ती त्याच्या शेजारून जाऊ लागली तसं तो ही त्याच दिशेला वळला आणि एक नजर तिच्याकडे टाकत फोन वर बोलत तिच्या बरोबर चालू लागला. त्रिशाने गोंधळून शेजारी पाहीले.
"जेवण झालं मगाशीच, तू काय केलं होतंस आज" तो बोलत होता.
त्रिशा पुन्हा सरळ बघत कपाळाला आठ्या पाडत चालू लागली, त्याने तिच्याकडे एकदा हसून पाहिलं, चालत राहिला.
"नाही उद्या नाही , पुढच्या विकेंडला येईल, आताच तर शिफ्ट झालोय" तो तिच्याबरोबर चालतच होता.
वैतागून त्रिशा शेवटी थांबली , दोन्ही हात कंबरेवर ठेऊन त्याच्या दिशेने वळाली. ती अचानक थांबलेली त्याच्या पटकन लक्षात आलं नाही, तो जरासा पुढे गेला आणि तिला थांबलेलं पाहून "चल ठेऊ मग, बाय" म्हणत मागे येत पुन्हा तिच्यासमोर येऊन तिची नक्कल करत तसाच कमरेवर हात देऊन उभा राहीला. त्रिशाला त्याच्याकडे पाहण्यासाठी मानेचा विशाल कोन करावा लागला.
"काय चाललंय हे?" तिने जरासं रागात विचारलं
"कुठे काय, तुला शतपावली करायला कंपनी देत होतो" म्हणत त्याने फेक इनोसंट स्माईल केली.
"मी विचारलं?"
" नाही पण तू एकटीच आहेस तर.."
त्याचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत ती ताडताड चालू लागली. तो दोन मोठे पावलं टाकत पुन्हा तिच्या रेषेत येऊन चालू लागला. त्रिशाने स्वतःशीस मान हलवून मोठा उसासा टाकला
"काय शेजारी मिळालेत, झालं का शिफ्टिंग, काही गरज असेल तर सांगा वगैरे सोडाच पण साधी ओळख सुद्धा दाखवत नाहीत!"
"मी नाहीच ओळखत तुला आणि हे सगळं आधीच घराच्या मालकाला विचारून झालंय माझं.
आणि हो, तू शेजारी नाहीयेस, समोर राहतोस"
तो मान वर करत खळखळून हसला.
"गुड वन"
आपण याच्यासमोर या वेळेला पीजे कसाकाय मारला हे त्रिशाला स्वतःलाच समजलं नाही.
"मग, मीनाक्षी नाही आली खाली?"
"ती अजून घरीच आली नाहीये" त्रिशा शक्य तितकं जेवढ्यास तेवढं बोलत होती. तो भेटला तसा सतत तिची खेचतोय हे तिला कळत होतं आणि इरिटेट ही होत होतं. पण तरीही त्याला एकदाच समज द्यावी असा पर्फेक्ट चान्सच तिला मिळत नव्हता. तोवर तिला त्याच्यामुळे इरिटेट होतंय हेही तिला दिसू द्यायचं नव्हतं.
"एवढा वेळ ऑफिस? बराच उशीर झालाय आता" तो हातातलं काळं जी शॉक बघत म्हणाला. घड्याळाच्या खालून मनगटाच्या उजव्या कडेला पीसा चा लाल काळा टॅटू डोकावत होता.
त्रिशा त्याच्या प्रश्नावर गप्प राहीली.
"तू फार कमी बोलतेस असं दिसतंय"
" मला फार बडबड करायला आवडत नाही, जास्त बोलणारे लोकही आवडत नाहीत" दुसरं वाक्य त्रिशा त्याच्याकडे पहात म्हणाली.
यावर तो फक्त मान डोलवत समोर पहात चालत राहिला.
दोघे चालत असताना समोरून सावंत आणि पाटील काकू गप्पा मारत येताना दिसल्या. त्यांना पाहून सावंत काकू पाटील काकूंच्या कानाजवळ जाऊन काहीतरी बोलताहेत हे त्रिशाने पाहीलं. झालं, या बायकांना आता हॉट रुमरच मिळाली. अर्थात या काकवांच्या सवयी तिला चांगल्या ठाऊक होत्या आणि तिला त्याने काहीही फरक पडणार नव्हता. जोपर्यंत आपल्यापर्यंत काही गंभीर येत नाही तोवर दुर्लक्ष करत रहायचं ती शिकली होती. त्या हळूहळू जवळ आल्या तशा सावंत काकूंनी आधी नकुल कडे रोखून बघत मग हसून त्रिशाला ओळख दिली.
"काय, शतपावली चाललेय का?"
नाही स्विमिंग करतेय! त्रिशाने जिभेवर आलेले शब्द गिळून टाकले.
"हो, तुमचं झालं जेवण?" काहीतरी विचारायचं म्हणून ती म्हणाली.
"हे काय मघाशीच. हे कोण? नवीन शेजारी वाटतं" नकुलकडे पाहत त्या म्हणाल्या. त्रिशा उत्तर द्यायला तोंड उघडणार तोच नकुल म्हणाला.
"शेजारी नाही, समोर राहतो मी त्यांच्या" काकवांना यावर काय प्रतिक्रिया द्यावी ते सुचेना. त्रिशाला करंट लागला, बाजूला बघत तिने बळच हसू दाबलं.
" हाss, म्हणजे सुमंतांच्या फ्लॅट मध्येच ना" सावंत काकू गोंधळत म्हणाल्या.
" हो तिथेच. जुनी सोसायटी छानच होती आमची पण तिथल्या काकवा महा भोचक. शेवटी कंटाळून इकडे आलो. आता इथे कोणी असं भेटू नये म्हणजे झालं"
त्रिशा आता तोंडावर हात ठेवून उभी होती आणि सावंत काकूंचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.
"ठिकेय मग, फिरा तुम्ही" कसंनुसं हसत त्या पुढे निघून गेल्या.
पुढे सोसायटीचं गेट येईपर्यंत दोघांपैकी कोणीच बोललं नाही. ती मागे वळाली तसा तोही वळाला. पुढे परत शांतता. एवढ्या लवकर आपल्या बोलण्याचा परिणाम होईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. पण अजून हा पिच्छा सोडायला तयार नाहीये. पूर्ण दुर्लक्ष केलं की हा एकदाचा कंटाळून निघून जाईल अशा विचारात चालत असताना चपलेखाली मोठा खडा येऊन ती अडखळली की थेट डोकं नकुलच्या खांद्यावर आदळलं.
"मी एकदम ठीक आहे, डोन्ट वरी"
त्रिशाने डोळे घट्ट दाबून राग आवरला.
एवढ्यात वर जाऊन पुन्हा एकटंच बसावं लागेल त्यापेक्षा अजून थोडे मिनिटं खालीच थांबुयात असा विचार करून ती आयताच्या पायरीवर बसली. ती बसली की तोही बसला. त्रिशाने डोळे फिरवले.
" हेट चेंजेस" आजूबाजूला कमी आवाजात चाललेल्या गप्पा, बूट चपला, मधूनच ऐकू येणाऱ्या लहान मुलांच्या उत्साही बडबडीची शांतता भंग करत नकुल म्हणाला.
तो कशाबद्दल बोलतोय हे न विचारता त्रिशा म्हणाली,
" हम्म. मलापण जड जातंय. समोर तुमच्याआधी जे सुमंत कुटुंब राहायचं त्यांच्याशी आमची खूप जवळीक होती. तिने त्याच्या डोळ्यात पाहिले."आता घरी आलं की दुसरीकडेच कुठेतरी आलेय असं वाटतं"
"ओह, असं आहे तर" नकुल त्याच्या पूर्ण उंचीवर उठत म्हणाला."पण जसं तुला माहीतच आहे, आम्ही त्यांना घालवलेलं नाही. ते गेले म्हणून आम्ही रहायला आलो. "
त्रिशा यावर काहीच बोलली नाही.
"हॅपी सफरिंग इन सायलन्स" तो त्याची ठरलेली मोठी स्माईल करत दोन बोट कपाळाला लावून फेक सल्युट करत निघून गेला.
त्रिशा तो जाताना बघतच राहीली. आपण चक्क याला कटवण्यात यशस्वी झालो यावर तिचा विश्वासच बसेना. त्याच्या सो कॉल्ड कूलनेसला आपण हेअर लाईन का असेना पण क्रॅक दिला म्हणून तिचा मूड एकदम खुलला. उभा राहून तिने आधी हात वर करत , मग एकेका बाजूने कंबरेत वाकत स्ट्रेच करून घेतलं. चालताना पजमाला दोन्ही बाजूने हात टाकून चालायला खिसे हवे होते असं तिला वाटलं.

लेख: 

ऐल पैल 6- अनरियल टूर्नमेंट

त्रिशाने त्या दिवशीचं किल्ली प्रकरण अजूनही डोक्यात ठेवलंय असं नकुल ला वाटलं. हु केअर्स, एवढ्या बारीक सारीक गोष्टी एवढे दिवस ती लावून धरत असेल तर तो प्रॉब्लेम तिचा आहे. नकुलने आज त्याच्या पद्धतीने तिच्याबरोबर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता पण तिचा ललिता पवार मोड ऑफ तर होतच नव्हता उलट सुमंत कुटुंबांच्या जागेवर त्यांनी राहिलेलं तिला आवडत नाहीये हे ही तिने स्पष्टपणे सुचवलं होतं. हा सगळा विचार करत जिने चढत तो वर आला. घरात आल्यावर कशाचाच आवाज येईना म्हणून तो आशिष च्या रूममध्ये डोकावला.
आशिष बेडवर पाय पसरून, मांडीवर लॅपटॉप घेऊन नेटफ्लिक्स सर्फ करत होता.
"हेय"
" हम्म"
"तुला काय झालंय आता?या सोसायटीची हवाच खराब दिसतेय, ज्याच्या त्याच्या तोंडावर बारा वाजलेत" नकुल वैतागत म्हणाला
" म्हणजे अजून कोणाच्या?" लॅपटॉप मधून डोकं न काढताच तो म्हणाला.आशिष चा स्वर एकदम खालचा होता, नकुलला कष्टानेच ऐकायला आला.
"तू तुझं सांग"
"काही नाही, नेहमीचंच,मम्मी चा फोन होता"
साधना समदरिया. ही बाई! हिचीच उणीव होती आज. त्यांचा उल्लेख आलेला पाहून नकुल ने आशिष ला दिसणार नाही अशी काळजी घेऊन कपाळाला आठ्या पाडल्या.
"काय म्हणत होत्या?" नकुल बेडच्या एका कोपऱ्यावर बसत म्हणाला.
" तेच नेहमीचं गाणं. अजून दुसरीकडे नोकरी करण्याची हौस भागली नाही का, घरचा पप्पांचा आणि काकांचा एवढा मोठा बिजनेस असताना बाहेर दुसऱ्यांसाठी काम करण्याची काय गरज आहे, बिजनेसचा तूच एकटाच वारस आहेस, तू आता गंभीरपणे विचार करायला हवाएस वगैरे वगैरे" आशिष चा स्वर कायम होता.!!
"हे गौतम काकांना हवंय की त्यांना?"
" माहीत नाही, पप्पांनी सुरवातीला विरोध केला होता, तुला माहीतच आहे, पण नंतर कधीच काही म्हणाले नाहीत. मला वाटतं हे मम्मी चं स्वतःचच जास्त चाललंय, त्यांचा संबंध नसावा"
ह्याचेच चान्सेस जास्त आहे आहेत!
"तू काय म्हणालास मग?
"चिडून ठेऊन दिला फोन, काय करणार? तिच्यावर चिडायला मला आवडत नाही पण मला अजिबातच कंट्रोल झालं नाही"
"तुझी आई आहे ती,आयांचा राग फार टिकत नाही"
"तो प्रॉब्लेम नाहीये. तिचं बोलणं म्हणजे लिटरली इमोशनल ब्लॅकमेलिंग असतं! पपांचं वय झालंय, ते काही म्हणत नाहीत म्हणजे त्यांना हे नको आहे असं नाही, अशी सगळी हत्यारं वापरते ती. मागच्या वर्षी त्यांना हार्ट अटॅक येऊन गेला आहे. ही असं काही बोलायला लागली की जरा काळजी वाटते मला"
"हम्म"
"माझा कॉन्फिडन्स जातो, मी बरोबर करतोय की चुकीचं असं वाटत राहतं"
"हे बघ. तू घरचा बिझनेस सोडून तुला हवं त्यात करियर करतोयस म्हणजे घरच्यांबरोबर काही वाईट करत नाहीयेस. त्यांनी त्यांच्या वडिलांचा मार्ग निवडला म्हणून तुही तेच करावं असा नियम नाहीये. आयुष्यभर तिकडं गावात राहून सेल्स पर्चेस करत बसणं तुला जमणार आहे का?" नकुल त्याला समजावत म्हणाला
"माहीत नाही, आता या वेळेला तरी मी पूर्ण कन्फ्युज आहे"
साधना समदरिया इफेक्ट्, नकुल मनातल्या मनात म्हणाला.
"चिल, आजचा दिवस जाउदे, उद्या ऑफिसला जाशील तेव्हा सगळं नीट होईल"
"होप सो"
उठून त्याच्या खांद्यावर थाप मारत नकुलने आशिषला त्याच्या एकांतात बसू दिले.!!!!!!!!

त्रिशा घरी आली तेव्हा दार आतून बंद असलेलं तिला दिसलं. तिने बेल वाजवली. मीनाक्षीने दार उघडलं
" तू कधी आलीस आणि मला कशी दिसली नाहीस येताना? मी खालीच तर होते" त्रिशा आत येत म्हणाली
"काय माहित, मला पण वर आल्यावर कळलं तू नाहीयेस ते"
काही वेळाने दोघीही आपापल्या बेडवर पाय पसरून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसल्या.मीनाक्षीकडून बँकेतल्या कलीग च्या पार्टीबद्दल साग्रसंगीत, अथ ते इति माहिती ऐकल्यावर त्रिशाला बरं वाटलं. तिचा मूड एवढा खुलला होता की मीनक्षीला ती स्वतःहून आणखी खोलात जाऊन प्रश्न विचारत होती. मीनाक्षीला कुणकुण लागलीच.
"त्रिशा, आज चक्क तुला इंटरेस्ट येतोय माझ्या स्टोरीत"
"नेहमीच ऐकते हा तुझ्या गप्पा मी" त्रिशा उशीवर चापट्या मारत म्हणाली
"नोप, आज शंभर टक्के मन लावून ऐकतेयस"
"असं काही नाहीये गं. चल मी झोपतेय आता" त्रिशा बेडवर पसरत म्हणाली. पडल्या पडल्या साईड टेबल वरचं छोटं घड्याळ उचलून अलार्म सेट केला. मीनाक्षी तिच्याकडे अजूनही शंकेनेच बघत होती.
"विचित्र मुलगी आहे ही" म्हणत तिने उठून लाईट बंद केला, दार ओढून घेऊन बाहेर हॉलमध्ये जाऊन खुर्चीत बसली आणि ओम ला कॉल केला.

त्रिशाने दोन्ही हात डोक्याच्या खाली घेतले. थोड्यावेळापूर्वी नकुलशी झालेली तू तू मे मे तिला आठवली. त्याची इंटरॅक्ट होण्याची पद्धत चीड आणणारी असली तरी तो आज तिच्याशी तिची अजिबात चेष्टा न करता, अगदी साधं बोलण्याचा प्रयत्न करत होता हे तिच्या आता डोकं शांत असताना लक्षात येत होतं. अर्थात या सगळ्याला जबाबदार त्यांची पहिली भेट होती पण तरीही दोघे आपापल्या स्वभावानुसारच वागले होते. चेष्टा एकीकडे पण ते दोघे इथे राहताहेत हे तिला आवडत नाहीये असं अगदी स्पष्ट तोंडावर बोलून मोकळं होणं हे जरा जास्त टोकाचं झालं होतं. आपण जरा उद्धटच वागलो असं तिला वाटलं. त्याच्याशी मैत्री वगैरे होण्याची अपेक्षा नाहीच, पण किमान असं भांडण तरी राहायला नकोय. ती लेट इट गो प्रकारातली नव्हती आणि म्हणून दरवेळी समोरासमोर आलो की सतत डोक्यात असा राग खदखदत राहणं तिला तरी अजिबात परवडणारं नव्हतं. सो त्रिशा, आतापर्यंत जे झालं त्याबद्दल गिल्ट ठेवू नको, ही गॉट व्हॉट ही डीझर्वड! पण इथून पुढे जरा शांततेकडे पाऊल टाक, ती मनाशी म्हणाली.आता परत तो जर भेटला, तर हे सगळं बिघडलेलं ती दुरुस्त कसं करणार आहे असा प्रश्न तिला पडला आणि तरीही तिला स्वतःला पहिला प्रयत्न करण्याची इच्छा नव्हती. असो, म्हणत तिने मोठा उसासा टाकला.

अजून तिला झोप येत नव्हती. ती उठली आणि तिचा लॅपटॉप घेऊन बसली. दोन आठवड्यांपूर्वी तिने एका कंपनीसाठी टेस्ट दिली होती, त्यात ती पास ही झाली होती. पण त्या साईटवर तिच्या पुढच्या इंटरव्ह्यू पुढे तीने जेव्हा जेव्हा पाहीलं तेव्हा स्टेटस पेंडिंगच दिसत होतं. नंतर चार पाच दिवस ते बघायचं तिने मुद्दाम टाळलं होतं.. आता तिला त्याची आठवण झाली. तिने साईट उघडली, लॉगिन केलं, स्टेटस पाहीलं. अजूनही पेंडिंग च होतं. आधीचे काही दिवस रोज ऑफिसमधून आली की ती ते उत्सुकतेने चेक करायची आणि तिचा भ्रमनिरास होत असायचा. आता तिला तसंही वाटत नव्हतं. कदाचित आजच्या चांगल्या मूडचा तो परिणाम होता. लॅपटॉप बंद करून ती पुन्हा बेडवर पडली आणि तिला एकदम काहीतरी आठवलं.
गेल्या काही महिन्यांपासून तिच्या सोसायटी पासून जवळ एक वेस्टर्न डान्स स्टुडिओ सूरु झाला होता. त्यात तिने सालसा बॅचेस चं पोस्टर ही खूपदा पाहीलं होतं. ऑफिसातून येता जाता ती रोज ती त्याचं काचेचं दार आणि बाहेरच्या चपला बघून येत असे. आजवर स्वतःला खूप काही कारणं देऊन किंवा कधी फक्त कंटाळा म्हणून तिने तो विषय टाळला होता. पण आता यावेळी तिला जॉईन करण्याची जेवढी इच्छा झाली होती तेवढी कधीच झाली नव्हती. थोडावेळ तिने त्यावर विचार केला. उद्या त्याच्याबाबतीत निर्णय घेऊनच रहायचं असं मनाशी ठरवून झोप येईपर्यंत फिरत्या फॅनकडे पहात राहीली.
तिकडे नकुलने लॅपटॉपवर अनरियल टूर्नमेंट खेळताना आजवर पहिल्यांदाच पहिल्या 3 मिनिटांतच सगळे हेल्थ percentage गमावले होते.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 7 - Sway!

"मीनू... आज संध्याकाळी काकांना कॉल करायचं लक्षात ठेव"
नुकत्याच झोपेतून उठलेल्या मीनाक्षी ला हलवत त्रिशा घराबाहेर पडली. शुक्रवारी कॅज्युअल डे असल्यामुळे तिने आज कॉटन चा प्लेन पोपटी शॉर्ट स्लीवलेस टॉप आणि डार्क ब्लु जीन्स घातलेली होती. आईला कॉल लावून जिने उतरत त्रिशा बिल्डिंग च्या बाहेर पडली. सकाळ आणि त्यातल्या त्यात ही सात-सव्वा सात ची वेळ सोसायटीतले बारके आणि त्यांना बस मध्ये बसवून देण्यासाठी आलेले त्याचे पालक यांच्या गडबडीची असायची. इस्त्रीड कपड्यांमधली, दप्तर वॉटरबॅग सांभाळत चाललेली उत्साही बुटकी मंडळी आणि त्यांना जाईपर्यंत सूचना करणारे त्यांचे आई बाबा किंवा आजी आजोबा हे दृश्य रोज तेच असलं तरी पाहताना तेवढीच मजा येत असायची.
त्रिशा ती परेड पहात आणि एकीकडे आईशी एक दोन दिवसाआड होत असणाऱ्या रुटीन कॉल वर बोलत चालली होती. ती चालत गेटजवळ आली आणि तिला सावंत काकूंबरोबर गप्पा मारत, खिदळत चालत येणारा नकुल दिसला! काय अजब मुलगा आहे! तिने विचार केला. त्या ह्याच काकू ज्यांना नकुल ने काल परवा पहिल्याच भेटीत फटकन बोलून गप्प केलं होतं आणि आज जर तो त्यांच्या घरी जेवताना दिसला तरी नवल वाटणार नाही असा एकंदर माहोल होता. चुकून आपण त्यांना असं काही बोललो असतो आणि आज त्या अशा समोरून येताना दिसल्या असत्या तर आपण तर रस्ता बदलून गेलो असतो! आईच्या आवाजाने ती विचारातून बाहेर आली. बोलून झालं म्हणून तिने फोन ठेवला तोवर समोरून नकुल आणि काकू बोलत बोलत तिच्या पुढे आले. त्याला पाहून ती ऑकवर्ड झाली. तरीही एका क्विक लूक ने तिने त्याच्या चेहऱ्यावरचे चे भाव तपासले.
"गुड मॉर्निंग त्रिशा! ऑफिसला का?"
त्रिशाच्या मनात आज कुठलंही आडवं उत्तर आलं नाही
"हो! तुमचा वॉक झाला?"
नकुल त्याच्या बर्म्युडा च्या खिशात हात घालून त्रिशा सोडून बाकी सगळी कडे बघत होता, चेहऱ्यावर राग, अटीट्युड नव्हता, काकूंशी जसा बोलत असताना जसा होता तसेच भाव ठेवत शांत उभा राहिलेला होता. आतापर्यंतच्या त्यांच्या भेटीत त्याला एवढं स्थिर ती पहिल्यांदा पहात होती तिला ते चुकल्या चुकल्या सारखं वाटलं.
"हे काय झालाच. येता येता जरा दुकानातून ब्रेड घेतला आणि हा भेटला"
त्रिशाने यावर फक्त हसून प्रतिक्रिया दिली आणि पुन्हा चटकन नकुलकडे पाहून घेतले.
"काकू, मी जातो पुढे"
नकुल त्यांचं पुढचं बोलणं तोडत म्हणाला.
" हं हो, जा जा बेटा"
याच काकू परवा त्याला बेरकी नजरेने पहात होत्या! त्रिशाला गंमत वाटली. तोवर नकुल चार पावलं पुढेपण गेला होता.
काकूंना बाय करून त्रिशा निघाली. काल रात्रीचे सुलह बद्दलचे तिचे विचार तिला आठवले.

काल ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ऑफिसातून येताना त्रिशा 'Sway' डान्स स्टुडिओत गेली. तिच्या नशिबाने नवी बॅच उद्यापासूनच चालू होणार होती. डान्स च्या बाबतीत फक्त मनापासून आवड सोडली तर ती बाकी शून्य होती. लहानपणी टिव्हीत नाचणाऱ्या हिरॉइन्स ची नक्कल करणे आणि आता घरातल्या घरात गाणे वाजत असेल काहीतरी अर्ध्या मूर्ध्या स्टेप्स करणे एवढाच तिचा डान्सानुभव. त्यात साल्सा चे तिने फक्त यु ट्यूब वर व्हिडीओज पाहिले होते. मूड असेल तर एखादेवेळी त्यातले बिगीनर्स टुटोरियल्स ही तिने ट्राय करून पाहिले होते, पण तेही फक्त टाईमपास म्हणून. यात एक गोष्ट मात्र बरी होती की तिला रोज कार्डिओ आणि स्ट्रेचिंग ची सवय असल्याने ती बऱ्यापैकी फ्लेक्सीबल होती. हेही आधीच आपण थोडेसे चबी आणि त्यात शॉर्ट आहोत म्हणून तिने कायम ठेवले होते. कधी कंटाळा आलाच तर समोर यातलं काही एक न करता शिडशिडीत असणारी आणि उंच मीनाक्षी होतीच!

तिने तिच्या सगळ्या शंका ट्रेनरशी बोलून दूर केल्या. ट्रेनर ने त्याचे मार्केटिंग स्किल्स वापरून त्रिशाला एवढ्या झाडावर चढवलं की पुढच्या महिन्यातच आपण डान्स इंडिया डान्स मध्ये भाग घेऊ शकतो असं तिला वाटलं! शेवटी फी भरण्याचा प्रश्न आला आणि ती पुन्हा अडखळली. तिने आजवर फक्त स्वतःसाठी गरजेच्या गोष्टी सोडून क्वचितच खर्च केलेला होता. करू शकत नव्हती असं नव्हतं पण सेव्हिंग तिची प्रायोरिटी होती आणि त्यात ती असे थोडे फार खर्च ही टाळत असे. अखेर हे पहिलं आणि शेवटचं असा विचार करत तिने अडमिशन करून घेतलं. Sway चं पँफ्लेट घेऊन ती छान मूड घेऊन बाहेर पडली.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 8 - मी दि त्रि

"हे बघ" त्रिशाने Sway चं पँफ्लेट मीनाक्षीच्या मांडीवर टाकलं.
"हे काय? हे Sway आपल्या इथलंच का?" मीनाक्षी वाचत म्हणाली.
"यप्स! मी जॉईन केलं, साल्सा बॅच ला!" त्रिशा उत्साहात म्हणाली.
"खरंच? अचानक कसं काय?
" काल रात्रीच ठरवून टाकलं होतं, नो मोर टाळाटाळ!
"मस्त! सकाळच्या एक्सरसाईझ कमी पडल्या ना तुला म्हणून हेही जॉईन केलं!"
"एक्सरसाईझ गरज, हा किडा! मीने, तू पण चल ना, मजा येईल. हॉट दिसशील तू तर साल्सा करताना"
" प्लिज नको!! मला कष्टांच्या कामाची ऍलर्जी आहे माहितेय तुला, बँकेत दिवसभर असते तेच भरपूर आहे माझ्यासाठी. तू घरी आलीस ना की मला दाखवत जा काय काय शिकलीस ते"
"आळशी! बरं चल, काकांना कॉल करू.
काकांना कॉल करून त्रिशाने तिचा फोन स्पीकरवर टाकला. नशिबाने ते सगळे घरीच सापडले. सामानाची लावलाव झाली होती, कामवाल्या बायका, रोजचा दुधाचा रतीब या सगळ्या गरजेच्या गोष्टींची व्यवस्था झाली होती. त्या सगळ्यांची या दोघींना किती आठवण येतेय, घरी आलं की किती चुकल्यासारखं वाटतं, नवे शेजारी या आणि इतर भरपूर गप्पा साधारण अर्धा तास चालल्या. एकीकडे दिशाने या दोघींनी गिफ्ट केलेलं घड्याळ भिंतीवर लावल्याचा फोटो त्या तिघींच्या 'मी दि त्रि' व्हाट्सएप ग्रुपवर पाठवला.
गप्पा संपल्या. त्यांच्याशी बोलून दोघींना खूप बरं वाटलं.
तेवढ्यात ग्रुपवर दिशाचा पिंग आला.
"एक येणार होता ते माहीत होतं, हे दुसऱ्याचं काय प्रकरण आहे?"
मीनाक्षी आणि त्रिशाने हसताना डोळ्यातून पाणी निघणाऱ्या स्माईली टाकल्या.
मी: "अगं दोन्ही हँडसम प्रकरण्स् आहेत, आय बेट, आधारकार्ड वर पण ते असेच दिसत असणार! दिशा मुली तू हवी होतीस इथे"
दिशाने अश्रुंचे पाट वाहणाऱ्या स्माईली टाकल्या.
त्रि: एक बायको, एक गर्लफ्रेंड, लेडीज.. अँड लेडीजच" (पळून जाणारी स्माईली)
दिशा आणि मीनाक्षीने लाल तोंडाच्या स्माईली टाकल्या.
दि: "मीने हाण तिला आधी"
मीनाक्षीने खरंच त्रिशाला धपाटा टाकला.
मी:" डन! "
त्रि: "अरे सगळ्यात वॉर्म वेलकम तर मी केलंय त्यांचं! त्यातल्या एकाशी जोरदार टक्कर घेतलेय मी, साधी सुधी नाही, एकदम ब्लडी" (बॉक्सिंग चा ग्लव्ह घातलेला हात)
आणि कालच ती तह करण्याचा विचार करत होती!
दि: " हे काय आता नवीन?"
मी :" दोनदा? दुसरी कधी झाली?"
दोघींनी एकदमच मेसेज टाकले.
त्रिशाने चष्मा घातलेल्या स्माईली टाकल्या
दि: एवढं रामायण झालं आणि दोघींपैकी एकीने तोंड उघडलं नाही!" (पिवळं रागीट तोंड)
त्रि: "महाभारत म्हण, दुसरा नकुल आहे" (दात आणि अश्रू)
मी : बघितलं? बेडरूम शेअर करतो आम्ही आणि तरी मला माहीत नसतं" (लाल तोंड)
दि: मीनू... तू झोपली असशील नक्की तेव्हा ( zzz स्माईली)
त्रि: Ahahahahah
अशाच गप्पा चालू असताना दारावर 'टक टक टक' झाली.

"बेल असताना नॉक कोण करतंय यार" म्हणत मीनाक्षी दार उघडायला उठली. त्रिशालाही उत्सुकता वाटली.
मीनाक्षी ने दार उघडलं तर नकुल त्याच्या घरासमोर शूज काढत उभा होता. तिने डावीकडं उजवीकडं बघितलं.
"ह्हा, कोणीच नाही! नकुल, तू पाहिलंस् का आमचं दार कोणी वाजवलं ते?"
" मीच तो " नकुल मागे वळत म्हणाला.
"ओह, मला वाटलं दार वाजवून कोणी लहान पात्र पळून बिळून गेलं की काय, कधीतरी मध्येच हुक्की येते त्यांना असं करण्याची"
नेमकं काय चाललंय ते बघायला त्रिशाही बाहेर आली.
"नोप, मी आलोय हे सांगायला नॉक केलं. " "मी आलोय" हे तो फिल्मी स्टाईल ने खर्जातल्या आवाजात म्हणाला. " माझा प्रेझेन्स कळायला नको तुम्हाला?!"
अँड ही इज बॅक! त्रिशाने मनाशी म्हणाली.
मीनाक्षीने हसून आधी त्रिशा कडे आणि मग नकुल कडे पाहत स्वतःच्या गळ्यावर बोट फिरवले.
"तुझा प्रेझेन्स कळायला तू काय पंतप्रधान आहेस?" त्रिशा चेहरा सरळ ठेवत म्हणाली.
"पंतप्रधान असे दार वाजवत फिरतात का? " नकुलची तलवार ही नेहमीप्रमाणे परजलेली होतीच
" कोणताही सेन माणूस कारण नसताना दुसऱ्यांचे दार ठोठावत फिरत नाही"
"सेन/ इनसेन हे रिलेटिव्ह असतं ! आता लोकांना कदाचित काही व्यक्ती सेन..
तो पुढे काय बोलणार आहे आणि त्याचा कमबॅक आपल्याकडे नाहीये हे ओळखून त्रिशा शांततेत आत निघून गेली.
नकुल तिकडे बघून बारीकसं हसला.
"हुश्श! झालं तुमचं?" मीनाक्षी म्हणाली.
नकुल त्यावर काहीच म्हणाला नाही.
"मग, तो ब्रूडींग बॉय आला की नाही अजून घरी?"ती म्हणाली
"हेय, तू तर माझाच शब्द चोरला" नकुल एकदम म्हणाला.
काय ढवळ्याला पवळ्या मिळालाय! त्रिशा आतून ऐकत होती. फार ओळख नसताना असं चटकन मिसळू शकणाऱ्या लोकांचं तिला फार कौतुक वाटत असायचं.
बाहेर त्यांची बडबड ऐकून आशिष बाहेर आला.
"उप्स" मीनाक्षीने जीभ चावली.
"डोन्ट वरी, आता ते मिडल नेम झालंय माझं"
आशिषचा आवाज ऐकून त्रिशा सहज बाहेर आली. ती आलेली पाहून नकुल अजिबात तसं न दाखवता आत निघून गेला. त्रिशाला अर्थात ते कळलं.
"तुम्ही दोघी इथेच दिसलात म्हणून लगेच सांगून ठेवतो. उद्या माझा वाढदिवस आहे आणि नवीन घरात पण राहायला आलोय तर साधी घरगुती पार्टी ठेवलेय. आमचे तीन चार जवळचे मित्र मैत्रिणी असतील फक्त. तर तुम्ही दोघींनी जरुर यायचंय" आशिष म्हणाला.
"खायला असणार आहे ना तिथे? मग डन" मीनाक्षी ताबडतोब म्हणाली.
" चालेल, थँक्स" मीनाक्षीचं बोलणं ऐकून त्रिशा मान हलवत म्हणाली.
क्रमशः

ऐल पैल 9 - वुडन क्लिप

आशिषने सांगितल्याप्रमाणे त्रिशा आणि मीनाक्षी त्यांच्या घरातून आशिषचं रॅप केलेलं गिफ्ट घेऊन बाहेर पडल्या. त्रिशाने वाइड, फ्रिल्ड नेक असलेला आणि कोपरापर्यंत स्लीवज्ला नेकसारखंच फ्रिल असलेला पिस्ता कलर्ड टॉप आणि नेव्ही ब्लु कप्रि जीन्स घातली होती. हलकासा मेकप आणि तिच्याकडे असलेली एकुलती एक मॅट कँडी पिंक लिपस्टिक तिने हो-नाही करत अखेर लावून टाकली होती. केसांचं मिडल पार्टिशन करून दोन्हीकडून एकेक बट ट्विस्ट करून मागे छोटीशी आडवी वुडन क्लिप लावली होती. मीनाक्षीच्या आवडत्या ब्लड रेड लिपस्टिकमुळे तिच्या फ्लोरल ग्रे ड्रेसकडे चुकूनच लक्ष जात होतं. दोघींनी घरात पाय टाकला आणि एकमेकींकडे बघून मोठ्याने हसायला लागल्या. भिंतीवर लहान मुलांच्या वाढदिवशी लावलेले असतात चक्क तसे फुगे आणि कागदी रिबीनींची सजावट केली होती. हॅपी बर्थडेचं साइन पण टांगलेलं होतं! हा सगळा कोणाचा उद्योग असावा, याचा अंदाज लावण्याचीही गरज नव्हती. त्रिशा मीनक्षीच्या कानात "आय होप ड्रिंक म्हणून त्यांनी रसना ठेवला नसावा" म्हणाली आणि दोघी पुन्हा खुसखुसल्या.
आशिषने त्यांना पाहून "असंच असतं हे"चे एक्सप्रेशन्स दिले. वेल बिल्ट, गोरा घारा बर्थडे बॉय आशिष बॉटल ग्रीन प्लेन टी शर्ट आणि फेडेड जीन्समध्ये आणखीनच गोरा दिसत होता. पार्टी नवीन घराचीही होती, म्हणून दोघींनी ठरवून सकाळी बारीक पांढऱ्या फुलांची डिझाइन असलेल्या काचेचा थ्री पेंडंट्स सिलिंग लॅम्प आणला होता. दोघींनी त्याला गिफ्ट देऊन विश केलं.
डावीकडे मांडलेल्या दोन खुर्च्यांवर मित्र-मैत्रिणीची एक जोडी आधीच येऊन सेटल झालेली दिसत होती. आशिषने दोघींना बसायला सांगितलं. दुसरे दोघे बसले होते त्यांच्या जवळच ठेवलेल्या सोफ्यावर त्या बसल्या. काही दिवसांपूर्वी दोघी साफसफाई करत होत्या, त्यानंतर पहिल्यांदाच त्या या घरात आल्या होत्या. आशिष म्हणाला होता त्याप्रमाणे त्यांचं सामान अगदी कमी होतं. हॉलमध्ये टीव्ही, सोफा, कॉफी टेबल आणि एक पुस्तके किंवा इतर काही गोष्टीं ठेवण्यासाठीचं शेल्फ एवढंच सामान असल्यामुळे हॉल मोठा मोठा वाटत होता. बाल्कनी, आधी जिथे सिंगल झोका असायचा तीही रिकामीच होती. त्रिशाचं सगळीकडे बघून होतंय तोवर मीनाक्षीच्या बाकी तिघांमध्ये मिसळून गप्पा सुरु झाल्या होत्या. त्रिशानेही तिच्याबाजूने थोडीफार भर घातली. पाच-दहा मिनिटे गेली आणि त्रिशा तिथे बोअर होऊ लागली. सोफ्यावरून उठून आतून बाहेर आलेल्या आशिषकडे ती गेली.
"तुम्हाला कशात काही मदत हवीये?"
"नाही अजिबात नाही, तू बस निवांत, आम्ही केलंय सगळं मॅनेज"
"मला बसून कंटाळा आलाय म्हणून विचारतेय" त्रिशा गप्पा मारणाऱ्यांकडे पाहून अगदी हळूच म्हणाली.
"ओके" आशिष हसत म्हणाला. "आतमध्ये नकुल मसाला पाव बनवतोय, त्याला विचारून बघ."
त्रिशा स्वयंपाकघराच्या दारापर्यंत गेली आणि आत हळूच डोकावून पाहिलं. तिथे जाईपर्यंत तिचा हाय असलेला कॉन्फिडन्स त्याला पाठमोरा उभा बघून सपाट झाला. आपल्याला इथे पाहून त्याची काय प्रतिक्रिया असेल, याचा विचार करत ती पुन्हा बाहेर आली, मोठा श्वास घेतला आणि परत मांजरीच्या पावलांनी आत गेली.
लांब उभा राहून तिने अखेर त्याला विचारले.
"तुला काही मदत हवीये? "
प्लेन ग्रे टीशर्टवर घातलेल्या ओपन बटन रेड ब्लु चेक्स शर्टच्या बाह्या वर करता करता त्याने आवाजाच्या दिशेने मान वळवली दोन-तीन सेकंद त्याने त्रिशाला निरखून पाहीले.
"नाही, थँक्स" म्हणत परत पुन्हा पुढे बघून लादीतले पाव वेगळे करू लागला.
"अकच्युली, बाहेरच्या नवीन लोकांशी माझी ओळख नाहीये. तरी मी ट्राय केलं पण मला बोअर होतंय"
त्रिशा जरा धीर एकवटून एकेक पावलं टाकत पुढे येत म्हणाली.
"मग तुला इथेही थांबणं जमणार नाही, मी ही अनोळखीच आहे" दोनेक दिवसांपूर्वी त्रिशा त्याला असं म्हणाली होती ते तिला लगेच आठवलं. आता पुढे बोलून काही उपयोग नाही असा विचार करत ती मान खाली घालून बाहेर जाण्यासाठी वळाली.

नकुल! डोन्ट पुश इट, ती चांगल्या शब्दांत विचारतेय!
नकुल मनाशी म्हणाला.
मोठा श्वास सोडून खाली मान घालत तो म्हणाला
"ठीक आहे"
त्याचा आवाज ऐकून ती गर्रकन मागे वळाली.
"फार काही नाहीये, तुला करायचंच असेल तर मी पाव भाजतोय, तू त्यात मसाला भर"
"ओके" म्हणून ती सिंकमध्ये हात धुवून त्याच्या शेजारी जाऊन उभी राहीली. आफ्टर शेव्हचा जरा डार्क पण हवासा, धुंद करणारा वास आल्यावर तिने तिरक्या नजरेने त्याच्याकडे पाहून घेतले. क्लीन शेव्हड! तिला मी दि त्री वरचे चॅटस् आठवून हसू आलं. त्याने गॅसवर ठेवलेल्या पॅनवर चमचाभर बटर टाकलं. त्याचा चर्रर्र आवाज त्यांच्यातली शांतता चिरत गेली. तोवर बाहेर कोणीतरी मडोनाचं 'ला इज्ला बोनीता' चालू केलं होतं. तिला तिच्या साल्सा क्लासचा माहौल आठवला. नकुलने एका वेळी तीन चार पाव पॅनवर टाकले होते.
"आय होप तुम्ही खाण्यासाठी अजून काही मागवलं असेल, एवढं तर मी आणि मीनाक्षीच संपवून टाकू" त्याचे पाव भाजून होईपर्यंत ती रिकामीच होती. बर्फ तोडण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली.
"पिझ्झा मागवले आहेत" तेवढं बोलून तो गप्प झाला.
"मग ठिके"
या किचनमध्ये ती आधी कित्येकदा येऊन गेली होती. आता ते तेव्हासारखं भरगच्च आणि फॅमिली टच असलेलं नसलं तरी स्वच्छ, नीटनेटकं होतं.
"तुला माहितीये, म्हणजे.. आपण नव्या घरी रहायला आलो आणि कधीतरी आपलं लहानपण जिकडे गेलंय त्या घरात गेलो किंवा आजोळी गेलो की कसं वाटतं..." तो ऐकतोय की नाही त्याची तिने मान वर करून खात्री करून घेतली. "तसं आता मला इथे आलं की वाटतंय. म्हणजे इथे आधी जे कुटुंब होतं, आम्ही फार अटॅच होतो त्यांच्याशी. ते गेल्यानंतर मी खूप उदास झाले होते. एकानंतर एक गोष्टी होत गेल्या आणि मी तुला..."
"ज्यांना बोलायला आवडत नाही अशा लोकांच्या मानाने तू खूप जास्त बोलतेयस आज" म्हणत त्याने तिच्याकडे रोखून पाहीले.
त्याचा शांत, बेस असलेला आवाज तिला टोचला. ती एकदम गप्प झाली. इथून पळून जावं असं तिला वाटायला लागलं. फक्त एवढ्याशा बोलण्यावरून इतकं हलून जायला आपण एवढे दुबळे कधीपासून झालो असं तिला वाटलं.
तिला बोलून तो पुन्हा त्याच्या कामाकडे वळला होता. पुढचे मिनीट दोन मिनीट कोणी काही बोललं नाही. त्याने तिच्यासमोर ठेवलेल्या पावांच्या लॉटमधून एकेक पाव घेत त्यात मसाला भरू लागली. एवढं होऊन पण तिने पाय रोवून आपली बाजू लढवण्याचे ठरवले.
"मसाल्याचा वास मस्त येतोय" तिच्या सगळ्या भावना लपवत ती म्हणाली.
एव्हाना त्याचे पाव भाजून झाले होते. तो सिंकजवळ गेला, हात धुतले, ट्रॉलीच्या दाराला अडकवलेल्या फडक्याला पुसले आणि "तू कँटीन्यू कर" म्हणत जायला निघाला.
तिला त्यावर काहीच उत्तर द्यावेसे वाटले नाही. ती तशीच दुखावल्या अवस्थेत तिचं काम करत राहिली. तो किचनच्या दारापाशी जाऊन पुन्हा वळला आणि म्हणाला,
"तुझं झालं की ते सगळं तिथंच राहू दे"
आवाज ऐकून तिने समोरच्या शेगडीवरच्या टाईल्सकडे नजर उचलून पाहिले.
"पसाऱ्यासहित. मी नंतर येऊन आवरतो, तू गेस्ट आहेस आमची"
तिने यावर मागे सुद्धा पाहीलं नाही.
तिचं झाल्यानंतर नकुलने बजावलं होतं तसं सगळं तसंच ठेऊन ती हात पुसत बाहेर आली.

बाहेर अजून दोन गेस्ट वाढले होते आणि त्यांनीही हसतच एन्ट्री केलेली तिला आतपर्यंत ऐकू आली होती. नवीन पाहुण्यांमुळे गप्पांना पुन्हा जोर चढला. पूर्ण वेळ नकुल इतरांना कळणार नाही असं तिला इग्नोर करत राहिला. तिथं थांबणं आणि त्याचं वागणं दोन्ही तिला असह्य झालं होतं. बाकीच्यांना विचित्र वाटू नये म्हणून खाणंपिणं चालू होईपर्यंत ती बळंच थांबली. पार्टीत आशिषच्या बर्थडे बम्पस्शिवाय कुठल्याही नेहमीच्या गोष्टी झाल्या नव्हत्या. मागवलेला केक त्यांनी फक्त खाण्यासाठी ठेवला होता. कुठलीही फॉर्मालिटी नसलेली, कोझी पार्टी तिला एकीकडे आवडत होती. पण तिची पूर्ण एनर्जी आपला चेहरा पडलेला दिसू नये यातच चालली होती. तिला अपमानामुळे, भांडण न मिटल्यामुळे, की नकुल ती सोडून सगळ्यांबरोबर अगदी हसून खेळून 'नकुल'सारखा वागतोय म्हणून वाईट वाटतंय, हे तिला कळत नव्हतं.
शेवटी ती तिथून उठलीच. आईला फोन करायचाय असं कारण देण्यासाठी ती मीनक्षीच्या कानापाशी झुकली. नकुल तिच्याशी बोलत नसला तरी तिच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होता. त्यानेही ते पाहिलं. आशिषला पुन्हा एकदा विश करून ती तिथून बाहेर पडली. मीनाक्षी नेहमीप्रमाणे गप्पात गुंग होती. ती घरात आली आणि बेडरूममध्ये गेली. कपडे बदलून ती बेडवर बसून राहीली. नेहमीच्या कपड्यात तिला जरा हलकं वाटलं. पिझ्झाचे कसेबसे दोनच तुकडे तिने इच्छा नसताना खाल्ले होते, मसाला पावाला तर हातसुद्धा लावला नव्हता. भूक भागली नव्हती, म्हणून तिने तिच्यासाठी मग भरून दूध गरम करून घेतलं.

इकडे पार्टीत गप्पांच्या ओघात आपापल्या गावांचा विषय निघाला होता. त्रिशा मीनाक्षी सोडून बाकी सगळे एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे हा प्रश्न मीनाक्षीसाठी होता.
आशिषने मीनक्षीला सहज त्रिशाबद्दलही विचारलं. नकुलने कान टवकारले.
"त्रिशाच्या घरी फलटणला आई आणि एक लहान बहीण असते. तिचे बाबा चारेक वर्षांपूर्वीच गेले. पण प्लिज त्याबद्दल बोललेलं तिला आवडत नाही. मी ही आजवर फार बोलले नाहीये. अजूनही ती त्यांना खूप मिस करते. त्यांच्या घराची जबाबदारी आता एकप्रकारे तिच्यावरच असते"
हे सगळं ऐकून नकुलला धक्का बसला. त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं की त्याच्या आणि त्रिशामध्ये एखादी गोष्ट कॉमन असू शकते आणि ती ही असेल! तो स्वतः शाळेत असताना त्याचे वडील गेले होते. तेव्हापासून एखाद्याला आई किंवा बाबा नसणं, ही गोष्ट त्याच्यासाठी खूप मॅटर करणारी होती. त्रिशा आतमध्ये असताना त्याला सुमंत कुटुंबांबद्दल, या जागेबद्दल सांगत होती, तेही सगळं त्याने याला जोडून पाहिलं. त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला. तिच्याबद्दलचे सगळे समज दूर होऊन नवीनच त्रिशा त्याच्या मनात तयार होऊ लागली होती.

रात्र वाढत गेली तसे सगळे आपापल्या घरी जायला निघाले. मीनाक्षीही घरी आली. त्रिशा बेडरूममधल्या टेबल खुर्चीत बसून वाचण्याचा बळंच प्रयत्न करत होती. नेहमीप्रमाणे मीनाक्षी त्रिशाला ती निघून आल्यानंतर पार्टीत घडलेल्या सगळ्या काही गमतीच्या डिटेल्स सांगू लागली. त्रिशाला ते ऐकण्याची अजिबात इच्छा नव्हती.
"मीनू, मी जरा खाली जाऊन येते, माझं पोट एवढं भरलंय, जरा फिरल्याशिवाय झोपच येणार नाही."
"ओके, मी खूप थकलेय, आता पडले की झोपूनच जाईन"
"तू झोप, मी बाहेरून लॉक करून जाते"
"गुड आयडिया. अरे हो, काय म्हणत होत्या काकू?"
"काही विशेष नाही. शलाकाच बोलली, तिला टेस्टचं टेन्शन आलं होतं म्हणून बराच वेळ बोलत बसली होती" त्रिशाने मनाला येईल ते सांगितलं.

त्रिशा खाली आली.
सगळीकडे थोड्या वेळापूर्वी येऊन गेलेल्या पावसाच्या खुणा दिसत होत्या. हवा पण दमट वाटत होती. आपण कोणाला दिसू नये आणि कोणी ओळखीचं आपल्याशी बोलायला येऊ नये म्हणून अंधार पाहून ती पार्किंग लॉटच्या कट्टयावर बसली. त्याच त्या गोष्टींचा विचार करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. रडावंसं वाटतंय पण रडू येईना, अशी काहीतरी विचित्र अवस्था झाली होती. ती दोन्ही हात दोन बाजुंनी कट्टयावर ठेवून मान खाली घालून बसली.
दहा पंधरा मिनिटे तशीच गेली.
..
.
"हाय"
तो आवाज तिला ओळखीचा वाटला.
तिने वर पाहिले तर नकुल तिच्या समोर उभा होता. नेहमीप्रमाणे हात खिशात नव्हते.
ती त्याला एकदम आलेलं पाहून गोंधळलेल्या अवस्थेत उठून उभी राहिली. तो गंभीर दिसत होता आणि तिच्या डोळ्यांत काहीतरी शोधत असल्यासारखा तिच्याकडे पहात उभा होता.
तिला एकदम अवघडल्यासारखं झालं. काहीतरी बोलायचं म्हणून तिने विचारलं,
"गेले सगळे घरी?"
त्याने एक मोठा श्वास घेऊन सोडला.
खाली मान घालून काहीतरी ठरवल्यासारखं करत तिच्याकडं पाहीलं.
"मला चुकीचं समजू नकोस, ओके? याचा काहीच अर्थ नाहीये."
तो काय म्हणाला ते तिला कळण्याआधीच त्याने पुढे होऊन तिला मिठीत घेतलं. ती प्रचंड गडबडली. तिच्या हृदयाची धडधड वाढली. त्याला हात तिच्या पाठीवरून फिरवावासा वाटत होता पण त्याने ती इच्छा आवरली आणि तिच्या खांद्यावर थोपटू लागला. तिच्याकडून तिचं सगळं नियंत्रण सुटत चाललंय, असं तिला वाटलं. फार विचार न करता तिने दोन्ही हात त्याच्याभोवती आवळले. तिच्या एका हाताच्या बोटात धरलेली किल्ली किणकिणली. त्याने ओढल्यानंतर छातीवर लँड झालेलं तिचं डोकं तिने तसंच तिथे घुसळलं. ती कशी रिऍक्ट होईल याबद्दल नकुलला अजिबात खात्री नव्हती, तोवर तो अगदी ताठ, अंग चोरून उभा होता, तिच्या हातांची पकड जाणवताच तो रिलॅक्स झाला. त्याची हनुवटी त्याने तिच्या डोक्यावर ठेवली आणि तिच्या डोक्यावर हात नेला. हाताला वुडन क्लिपचा स्पर्श झाला तसा तिचे ट्विस्टस् विस्कटतील असं वाटून त्याने हात पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवला. मघापासून अडलेले अश्रू तिच्या गालावर ओघळले. अशीच थांबले तर इथेच रडायला लागेन, असं वाटून तिने अजिबात इच्छा नसताना त्याच्याभोवतीचे हात काढून घेतले. ते जाणवताच तो तिच्यापासून दूर झाला.
डोळे पुसत, श्वास घेत ती सरळ उभी राहिली. त्याच्याही डोळ्यात पाणी भरलं होतं.
"सो वी गुड?" तिने फुसफूस करत विचारलं.
"वी गुड" घसा साफ करत तो म्हणाला. "चला, वर जाऊयात. राखण करायला आपल्याकडे वॉचमन काका आहेत"
तिला खुदकन हसू आलं.
दोघे जिन्यापाशी आले तेव्हा त्याने तिला विचारले.
"लिफ्ट?"
"नाही, मी जिनाच वापरते"
"चला, आपल्यात एक तरी गोष्ट कॉमन आहे" तो हसत म्हणाला.
त्याचवेळी दोघांच्या बाबांबद्दलचा विचार त्याचा डोक्यात आला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 10 - नकुल

आज सकाळी उठल्यावर बऱ्याच दिवसांनी त्रिशाला संपूर्ण मोकळं वाटत होतं. उठल्यानंतर पंधरा वीस मिनिटे तिने बेडवर बसून कालच्या सगळ्या गोष्टींची उजळणी करण्यात घालवले, विशेषतः रात्री तिच्यात आणि नकुल मध्ये जे काही घडलं होतं त्याची. पहिल्या दिवसापासून त्यांच्यात चाललेलं शीतयुद्ध काल रात्री कोणी काहीच न बोलता संपलं होतं यावर तिचा विश्वास ठेवूच शकत नव्हती. रविवार चा दिवस यापेक्षा अजून चांगला काय असू शकतो? मीनाक्षीचा आज दिवसभर ओम बरोबर वेळ घालवण्याचा प्लॅन होता त्यामुळे चक्क सुटीच्या दिवशी रडत का होईना ती उठून आवरायला लागली होती. त्रिशाही तिचं सगळं उरकून निवांत टीव्हीसमोर जाऊन म्युजिक चॅनल सर्फ करत बसली. मीनाक्षी बाहेर पडल्यानंतर ती दार लावायला उठली तेव्हा नकुल जिन्यातून वर येताना दिसला.
"हेय" नकुलने तिला पाहून हात वर केला, नेहमीच्या मोठ्ठ्या स्माईल ऐवजी नाजूक हसला.
क्युट!! एका रात्रीतच दृष्टीत केवढा बदल होऊ शकतो या विचाराने तिला हसू आलं. पापण्या फडफडवत तिने डोक्यातले विचार झटकले आणि दारातून बाहेर आली.
"व्हाट्स सो फनी?" नकुलने त्याच्या दाट भुवया गोळा करत विचारले.
"नॉट फनी!" त्रिशा हसत म्हणाली.
"त्या तुमच्या एडवर्डला बेलाच्या मनातलं ऐकू येत नाही म्हणून तो का फ्रस्टेट होत असेल ते मी समजू शकतो"
त्रिशा मनमोकळी हसली.
"ठीक आहे, थेटच विचारते. काल जे घडलं त्याबाबत आपण कधी बोलणार आहोत?"
"नेमकं कशाबद्दल?" नकुल काहीच न घडल्यासारखं दाखवत असला तरी ते त्याला जमत नव्हतं.
"माझ्याबद्दल तुझं मत एकदम कसं बदललं?" त्रिशा त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली.
"ओह! दॅट वज नथिंग. आधीच खूप ताणलं गेलं होतं, आता संपवून टाकणं गरजेचं होतं. दॅटस् ऑल! " असं म्हणत तो त्याच्या घराच्या दाराकडे निघाला. त्रिशाने पुढे होऊन त्याचा दंड धरला. त्याने मागे बघत आधी हाताकडे आणि मग वर तिच्याकडं पाहीलं.
"मला जाणून घ्यायचंय"
त्याने मोठ्याने श्वास सोडला.
"ठीक आहे!" तो तसं म्हणल्याबरोबर त्रिशा तिच्या घरात जाऊन फ्रीज सोडून जे काही बंद करण्यासारखं होतं, करून त्याच्याकडे आली.
तोवर तो सोफ्याला टेकून, पायावर पाय टाकून खाली फरशीवरच बसला होता. हातातल्या रिमोट ने चॅनेल सर्फ करत होता. ती त्याच्या शेजारी त्याच्या दिशेने तोंड करून मांडी घालून बसली.
"आशिष कुठेय?" तिने बसल्याजागी आत डोकावत विचारलं.
"सकाळीच पायलला, त्याच्या बहिणीला भेटायला गेलाय. कालच्या पार्टीत तिला येता आलं नाही म्हणून. त्याच्याकडून लंच उकळल्याशिवाय तिला राहवलं नसतं"
त्रिशा यावर फक्त डोकं वर खाली हलवून त्याच्याकडे पहात बसली.
त्याचं तिच्याकडे लक्ष जाताच त्याने मान हलवली.
"ओके,ओके" थोडं थांबून शब्द गोळा करत तो बोलायला लागला "तुला बाबा नाहीयेत हे काल मला कळलं"
ती काही म्हणणार त्या आधीच तो पुन्हा बोलायला लागला.
"मीनक्षीला बाकीच्यांनी सहज तुझ्याबद्दल विचारलं म्हणून तिने सांगितलं, हेही सांगितलं की तुला त्याबद्दल बोलायला आवडत नाही."
"हम्म म्हणजे सिम्पथीमुळे तू मागचं एवढं महाभारत विसरलास"
" सिम्पथी? हो. पण फक्त तेवढंच नाही" बोलताना मध्येच तो थांबला "काही वर्षांपूर्वी मी ही यातून गेलो आहे, त्यामुळे मला जेव्हा कळलं त्यानंतर मी तुला हार्ड टाईम देऊच शकलो नसतो."
त्रिशा शांत बसून त्याच्याकडे पहात होती. तिला त्याच्याबद्दल अजुन जाणून घ्यायचं होतं. यु लिटल हिपोक्रीट! स्वतःबद्दल कोणाजवळ बोलायला तुला नको असतो! ती स्वतःशी म्हणाली. पण नकुलला तिने तसं विचारण्याची गरज नव्हती, त्याला सांगायला कधीच हरकत नव्हती.
"माझी दहावी झाली आणि त्या सुट्ट्यातच बाबा गेले. त्या आधी जवळजवळ सहा महिने ते बेड पेशन्ट होते"
नकुल शून्यात बघत आठवत म्हणाला.
"शाळेत असताना मी एकदम भटका होतो. कायम बाहेर मित्रांबरोबर, त्यांच्या मित्रांबरोबर भटकत असायचो. मी घरी येत नाही तोवर आई, बाबा, ताई सगळ्यांच्या डोक्याला वैताग असायचा. बऱ्याचदा भांडणं घेऊन यायचो ते वेगळंच"
"त्याबद्दल मला अजिबात शंका नाहीये " त्रिशा त्याला बाहेर आणण्यासाठी म्हणाली.
"त्यावरून मी खूपदा बाबांचे बोलणे खाल्ले होते. आमचं नातं साधारण असं होतं. मी काहीतरी करणार आणि ते मला रागावणार, आणि रिपीट. त्यांच्या बोलण्याचा मला नंतर नंतर काही फरकही पडत नसायचा. मी दहावीत होतो तेव्हा एक मोठा मॅटर झाला. माझ्या त्याच मित्रांनी थ्रिल म्हणून एक दिवस गावातल्या कोणाच्यातरी गाडीचा पार्ट चोरला, तो विकला आणि मिळालेल्या पैशात पार्टी केली. वेल, चोरताना मी त्यांच्यात नव्हतो पण नंतर त्या पैशात मजा करताना होतो. चोरणारे भुरटेच, एका दिवसांत पकडले गेले. गोष्ट पोलिसांपर्यंत गेलेली पाहून माझे हातपायच गळाले. एवढे दिवस फक्त रागवून सोडून देणारे बाबा आता माझी कशी पूजा बांधतील त्याचा विचार करूनच मी अर्धमेला झालो होतो. पोलीस स्टेशन मध्ये आम्ही पाच सहा जणं, आमचे पालक, ज्याचा पार्ट चोरला तो मालक अशी सगळी जत्रा जमली होती. आमच्यातले दोघे सोडले तर आम्ही सगळे अंडर एज होतो. बऱ्याच चर्चा, बोलणी आणि आमच्यावर शिव्यांचा वर्षाव झाल्यानंतर त्या मालकाने आणि पोलिसांनी मिळून आम्हा सगळ्यांकडून त्या पार्ट ची नुकसान भरपाई आणि वर चोरल्याबद्दल दंड अशी रक्कम घेऊन मग आम्हाला सोडायचे ठरवले. मला वाटलं होतं, पैसे तर सोडाच पण बाबा मला घरातून कायमचं हाकलून लावतील. पण बाबा तो पूर्ण दिवस काही बोलले नाही. माझ्या वाटेला आलेली रक्कम त्यांनी जमा केली. रात्री आई आणि ताई मात्र माझ्यावर भडकल्या. पोलीस स्टेशन ची पायरी चढावी लागली हे तर होतंच, वर भुर्दंड भरावा लागला त्यामुळे त्या जास्त तळतळ करत होत्या. पण त्यापेक्षा बाबांचं गप्प बसणं मला खूप लागत होतं. त्यांनी माझ्याशी संबंधच तोडून टाकलाय अशीच माझी खात्री झाली होती. अशाच तंग वातावरणात आमचं जेवण उरकलं. रात्री हॉल मध्ये मी एकटा नुसताच पडून राहीलो होतो तेव्हा बाबा आले आणि एव्हढंच म्हणाले,
"भानगडी जेव्हा स्वतःच्या स्वतःला निस्तरता येतील आणि बापाची गरज लागणार नाही अशाच वेळी कर. तोपर्यंत आम्ही सांगतो तसं वाग"
त्या एका वाक्याच्या जोरावर मी पूर्ण वर्ष अगदी शहाण्या मुलासारखं काढलं. एवढं होऊन सुद्धा दुसऱ्याच दिवशी ते ऑफिसवरून येताना माझ्यासाठी फुटबॉल विकत घेऊन आले होते. मागे वर्षभरापूर्वी त्यांनी मला मित्राकडे होता तसा क्रिकेटचा महागडा सेट घेऊन दिला नव्हता आणि मी चिडून तीन चार दिवस त्यांच्याशी बोललो नव्हतो, ते आठवून मला स्वतःचीच लाज वाटली. त्या पूर्ण वर्षात पुढे जाऊन बाबांना मला त्यांचा मुलगा म्हणायला अभिमान वाटेल असं काहीतरी करण्याबद्दल बरंच काही मी ठरवलं होतं. पण नंतर बाबाच राहिले नाहीत.
ते गेले तेव्हा आम्ही सगळ्या बाजुंनी कमकुवत झालो. मानसिक आर्थिक. म्हणायला माझे काका होते पण पैशांचा प्रश्न आला तसे त्यांनी हात वर केले. त्या काळात मी आणि ताई काही ना काम करून खर्चाला हातभार लावत होतो. माझं इंजिनिअरिंग करण्याचं स्वप्न होतं पण आता तेवढा खर्च करण्याची आमची परिस्थिती नव्हती. सेव्हिंज त्यावर उडवण्याइतका घरच्यांचा माझ्यावर विश्वास नव्हता. दुसरं काही करण्याची माझी इच्छा नव्हती. .मी पुन्हा पहिल्यासारखा झालो. तोवर बारावीत आलो होतो, अभ्यास, करियर हे विषय सोडूनच दिले होते. पण बाबा कदाचित अजूनही माझ्या पाठीशी होते.
गौतम समदरिया, म्हणजे आशिष चे वडील होलसेल गुडस् चे व्यापारी आहेत. आशिष टपोरीगिरी करण्यात आमच्यात कधीच नव्हता पण आमची मैत्री त्या आधीपासून होती. आम्ही बरोबर मोठे झालो होतो. ताई, मी आशिष, पायल आणि त्यांची चुलत भावंडं आम्ही सगळे लहान होतो तेव्हा जवळपास रोज त्यांच्या त्या मोठ्या दुकानात खेळायचो. बाबा आणि त्यांचीही चांगली ओळख होती. कुठूनतरी त्यांना माझी अवस्था कळली. एक दिवस त्यांनी मला दुकानात बोलावून घेतलं, काही प्रश्न विचारले आणि थेट तुझ्या शिक्षणासाठी मी खर्च करतो म्हणाले. त्या बदल्यात रोज कॉलेज झाल्यांनंतर इथे येऊन काम करावं लागेल ही अट घातली. नंतर कमावता झाल्यावर मग जमेल तसं ते पैसे परत करण्याची मुभा दिली. आमच्या पूर्ण एरियात माझी विशेष ख्याती असतानाही त्यांनी एवढी तयारी दाखवल्यामुळे मी भारावून गेलो. कुठलाच विचार न करता मी त्यांच्या अटी स्वीकारल्या. आणि खरोखर त्यांच्याकडे मी अजिबात न कुरकरता पडेल ते काम केलं. दुकानातल्या मुख्य अकाउंटंट च्या हाताखाली करण्यासाठी अकाउंटिंग चं काम शिकून घेतलं, रोज रात्री कॅश मोजणं, बिल्स लावून ठेवणं, वेळ आली तर सामानांची खोकी, पोते उचलायला मदत करणं इथपासून ते आशिष ची आई- साधना समदरिया, त्यांनी कॉलेजातून येताना आणायला सांगितलेली भाजी आणणं, स्वयंपाकघरातलं गॅस सिलेंडर बदलून देणं, त्यांच्या घरातल्या लहान मुलांना आणून नेऊन सोडणं इथपर्यंत कामं केली"
इथे त्याने बोलता बोलता एक पॉज घेतला. बोलण्याच्या ओघात एखादी गोष्ट वगळून सांगायची असल्यास तसा.
"कॉलेजमधून आलो की रात्री दहापर्यंत मी तिथेच असायचो.तिथुन पुढे अभ्यास. पुष्कळ वेळा मला कॉलेजला दांडी मारायचीही वेळ येत असायची. फक्त परीक्षा असतील त्या काळात आधी आठ दिवस आणि परीक्षेचे दिवस ते मला सुट्टी द्यायचे. मी आणि आशिष बरोबर शिकलो. त्याला माझे कष्ट पाहून त्याच्या पपांचा राग येत असायचा. त्याच दिवसांमध्ये आम्ही अजून चांगले मित्र झालो. सो फार, ते दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात कठीण आणि सगळ्यात चांगले दिवस होते. बाबा तेव्हा असायला हवे होते असं नेहमी वाटतं. पुढे माझं इंजिनिअरिंग झालं, कमवायला लागलो. त्यांचे पैसे चुकते करणं ही प्रायोरिटी ठेवली. फक्त बाबांच्या नावामुळे त्यांनी माझ्यासाठी एवढं केलं होतं. त्यांना माझ्याकडून फुकट काम करून घेण्याचीही गरज नव्हती, केवळ माझी परीक्षा म्हणून आणि मला पैशांची किंमत कळावी यासाठी ठरवून त्यांनी हे केलं, हे मला नंतर मी कमवायला लागल्यावर कळलं. या सगळ्यांतून मी जे काही शिकलो ते माझ्या या शिक्षणापेक्षा खूप जास्त होतं. आज माझ्यात जे काही चांगले गुण असतील ते केवळ माझे बाबा आणि या माणसांमुळे आहेत"
त्रिशा एव्हढ्यावेळ त्याच्याकडे एकटक बघत ऐकत होती. शाळेत जाणारा नकुल, पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोलिसांऐवजी बाबांना घाबरणारा नकुल, रात्री दहापर्यंत काम करून घरी आल्यावर अभ्यास करणारा नकुल हे सगळे नकुल तिला डोळ्यापुढे दिसले. आता त्याच्या प्रत्येक आठवणींबरोबर ती स्वतःच्या आठवणींची तुलना करून पहात होती. शेवटी त्याने हात तिच्या चेहऱ्यावरसमोर नेऊन हलवला तेव्हा ती वर्तमानात आली.
"आपण स्वतःवर आलेल्या परिस्थितीचा केवढा बाऊ करतो याचा विचार करत होते. तुझ्या अर्ध सुध्दा मी हँडल करू शकले नाही आणि अजूनही करू शकत नाही. तू ज्या सगळ्यांतून गेला आहेस, त्यामानाने मी खूप जास्त आरामात, लाडात वाढलेय आणि तरी.. " डोन्ट.." त्याने त्याची बोटं तिच्या ओठांवर ठेवली. त्याने काढून घेतल्यानंतर तिने त्याचा हात दाबून धरला.
" आपल्यावर आलेली वेळ आपली असते, दुसऱ्यांबरोबर कमी-जास्त अशी तिची तुलना होऊच शकत नाही. करायची पण नाही. परीक्षेत सगळ्यांना सारखे मार्क पडत नसतात, मला वेळीच मदत मिळाली नसती तर मी नापास झालो असतो."
"नाही" त्रिशा मान हलवत म्हणाली " मी अजून त्यातून बाहेर आले नाहीये. मी बाबांच्या नसण्यावरून अजून पूर्ण मूव्ह ऑन झालेली नाहीये. कितीही प्रयत्न केला तरी मला अजूनही जमत नाहीये"
" कोणी सांगितलं तुला मूव्ह ऑन होण्यास?त्याच्या बरोबर जगायचं शिकून घे. हे सगळं घडलेलं आपली स्ट्रेंथ आहे, विकनेस नाही"
यावर त्रिशाकडे बोलायला काहीच नव्हतं. हा दृष्टिकोन तिच्यासाठी नवा होता. आजवर तिने हे सगळं कोणाजवळ बोलून न दाखवल्यामुळे ती तिच्याच गुंत्यात अडकून पडली होती. तो कुठल्यातरी अगम्य भाषेत बोलतोय अशा नजरेने ती त्याच्याकडे पहात राहीली. शेवटी त्याने मान हलवत डोळे मिटून एक मोठा श्वास घेऊन सोडून दिला, तिने अजूनही धरून ठेवलेला हात सोडवून घेतला, स्टेडी फास्ट मोशन मध्ये तिच्याकडे पूर्ण वळून तिचे ओठ ओठात घेतले. दोन सेकंड हलकासा किस करून तो पुन्हा बाजूला झाला. तिचा ब्लडफ्लो डोक्यापासून ते पायापर्यंत प्रवास करत गेला तरी यावेळी दोघांसाठी हे अगदीच अनपेक्षित नव्हतं.
"याचा पण काहीच अर्थ नसेल ना?"
पाय सरळ करत त्याच्या दंडाला हाताने वेटोळा घालून टीव्हीतली चित्रं बघत ती म्हणाली
त्याला हसू आलं.
"मला कळला की सांगतो" म्हणत तो परत रिमोट घेवून चॅनेल सर्फ करायला लागला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 11 - तटबंदी

"आणि त्याने किस केलं!" दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर चहा घेत त्रिशाने मीनाक्षीला पार्टीनंतरचा आणि नंतर सकाळचा वृत्तांत दिला.
"त्रिशा? एवढं सगळं दोन दिवसांतच? आणि तुमच्यात?
"झालं खरं!"
"माझ्याकडे आता सध्या खूप प्रश्न आहेत पण आधी त्यातल्या एकाचं मला मनापासून उत्तर दे"
"शूट"
"त्या किसबद्दल तुला काय वाटतं?"
" किस चं विचारशील तर तो आमच्यासाठी एक इमोशनल मोमेंट होता. त्याहून जास्त, मला रिलॅक्स करण्यासाठी त्याची ती रिऍक्शन होती. ते जे काही होतं, मला हवंसं वाटलं. पण मीनू, त्याच्या आदल्या दिवशी त्याने खाली येऊन मला hug केलं त्याचा मी कितीही उलटसुलट विचार करून पाहीला तरी प्रत्येक एल्स मध्ये मला काही प्रमाणात इनव्होल्वमेंट च्या खुणा दिसल्या. फक्त त्याच्याकडून नाही, आमच्यात अबोला होता त्या दरम्यान हे सगळं कधी संपेल आणि तो माझ्याशी बाकीच्यांशी वागतो तसा कधी वागेल याबद्दल मी नकळत अधीर झाले होते. त्याचं एकाएकी माझ्याबद्दल मत कसं बदललं हा माझ्यासाठी धक्का च होता. आमचे भूतकाळ रिलेटेबल आहेत ही गोष्ट असली तरी फक्त तेवढ्याच गोष्टींमुळे आमच्यात हे बाकी घडलं हे मला तरी पटत नाहीये"
मीनाक्षी लक्ष देऊन ऐकत होती.
"अजून मनातलं सांगू, त्याच्याकडे पाहिलंयस् तू आणि माझ्याकडे? लूक वाईज? त्याच्यासारख्या मुलाबरोबर एखादी मुलगी इमॅजिन करायची असेल तर ती कमीतकमी 5'8 , शिडशिडीत, त्याच्यासारखी कॉन्फिडंट अशीच दिसते मला. फक्त भांडण मिटण्याच्या आणि जास्तीत जास्त फॉर्मल मैत्रीच्या पलीकडे आमच्यात काही होऊ शकतं हे मला स्वप्नातसुद्धा शक्य वाटलं नव्हतं, हे फार अनपेक्षित आहे माझ्यासाठी"
"हे देवा.." मीनाक्षी डोळे बंद करत मान हलवत म्हणाली. "या गोष्टी कुठून डोक्यात भरून घेतल्याएस तू त्रिशा? सगळीकडे उंची आणि लुक्स पाहून रिलेशन तयार व्हायला हा काही मुव्ही किंवा सिरीयल आहे का?
"पण आपण परफेक्शन त्यालाच म्हणतो ना?"
" म्हणतो, ठीक आहे, पण प्रत्येकाला तेवढंच अपेक्षित नसतं. आणि आता एक हजार एक वेळेला सांगतेय, तू गोड दिसतेस ठिके? तू जेवढा बाऊ करतेस तू तेव्हढी चबीही नाहीयेस्. एक दिवस एक्सरसाईझ चुकली तर अदनान सामी सुद्धा एवढा पॅनिक होत नसेल तेवढी तू होतेस. कारण नसताना तुझ्या पॅनिक होणाऱ्या कारणांची तर लिस्ट होईल त्रिशा! ओके ठीक. आता काय वाटतंय तुला? पुढं काय?"
"त्याला काय वाटतंय ते मला माहीत नाहीये पण मी माझं ठरवलंय, या सगळ्याला वेळ द्यायचं, कुठलीही घाई न करता. मोठी आणि टिकाऊ तटबंदी बांधतेय मी सध्या माझ्या भोवती, साधारण सहा फुटांना पुरेल एवढी" त्रिशा तिच्या चारही बाजुंनी तसे हातवारे करत म्हणाली.
"ह्या तटबंदया वगैरे मेणाच्या असतात हे लक्षात असू दे फक्त, जरा उष्णता वाढली की वितळल्याच!"
यावर दोघी हसल्या.
"तुला काय वाटतं मीनू? म्हणजे तुला कसा वाटतो? थर्ड पार्टी म्हणून? ."
"वेल, तो एकदम मनमोकळा आणि स्वीट वाटतो मला, पहिल्यांदा भेटल्यापासून, पण त्याच्या भूतकाळाबद्दल तू जे काही सांगितलं त्यावरून तो जेन्यूईन वाटायला लागला मला"
त्रिशा त्यावर विचार करत म्हणाली.
"मीनू.. मला किती बरं वाटतंय तुला सगळं सांगून. मी माझ्या गोष्टी कधीच लवकर सांगत नाही तुला पण तू नेहमी समजून घेतेस"
"झाली मला आता त्याची पण सवय" मीनाक्षी खोटा राग आणत म्हणाली.
" खूप कॉम्प्लिकेटेड आणि स्केअरी आहे सगळं"
"एवढं कळालंय ना तुला, मग अर्धं काम झालं तुझं.
बरं.. हाऊ वज दॅट किस एनिवे?" मीनाक्षी गंभीर मोड मधुन बाहेर येऊन डोळा मारत म्हणाली.
"वन साईडेड! माझ्या आयुष्यातला पहिला किस, जो हार्डली दोन सेकंद होता, त्यात ही मी पुतळ्यासारखी बसले होते आणि मला काही कळायच्या आत संपला पण होता! "
मीनाक्षी हसायला लागली.

संध्याकाळी b1 बिल्डिंगच्या छोट्याश्या कॅज्युअल मिटींगसाठी सगळ्यांना खाली बोलावलेलं होतं. नेहमीप्रमाणे बऱ्याच लोकांनी कारणं सांगून टाळलं होतं आणि नेहमीचीच ठराविक मंडळी तेवढी जमली होती. सुरू होण्यास अजून वेळ होता तोवर त्रिशा लोकांच्या घोळक्यात उभी होती. सेक्रेटरी बोलू लागले तसे लोकांच्या गप्पा थांबल्या. त्रिशा मान उंचावून त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती तेवढ्यात बिल्डिंगच्या पार्किंग लॉट मधून आशिष आणि नकुल येताना दिसले. त्रिशा आणि नकुल ची नजरानजर झाली आणि नकुल तसाच त्रिशा च्या शेजारी येऊन उभा राहीला. तो शेजारी येताच त्रिशा दीड पायांवर उभी होती ती सरळ झाली. उगीचच तिची धडधड वाढली. दोन मिनिटे जात नाहीत तोच,
"ओहह, काय बोअर मिटींग" नकुल हळूच कुजबुजला. समोरच्या काकांनी मागे वळून पाहीलंच.
"श्शश.." त्रिशा सेक्रेटरीचं बोलणं ऐकता ऐकता म्हणाली.
"इमेल नाहीतर व्हॉट्सऍप करा ना जे काही आहे ते, मिटिंगची काय गरज आहे?"
"श्शश्शश.. त्रिशाने त्याच्याकडे बघत डोळे वटारले. समोर बघत म्हणाली, "सरळ पुढे निघून जायचं होतं मग, इथे यायला कोणी सांगितलं होतं?".
"सरळच चाललो होतो" म्हणून मग त्याने त्रिशाकडं पाहीलं. त्रिशाने त्याच्याकडे पाहीलं तशी त्याने बारीकशी गोड स्माईल केली. त्रिशाचं मिटींगमधलं लक्ष उडालं. समोरचा माणूस काय बोलतोय हे क्वचितच तिच्या डोक्यात शिरलं. पंधरा वीस मिनिटांनी मिटिंग संपली तशी दोघं आपोआप गेट च्या दिशेने जाऊ लागली.
"एवढी काय मन लावून ऐकत होतीस ते बोअर"
"मला नाही वाटत ते बोअर. दोन वर्षे मी कमिटीचं काम केलंय, लोकांच्या सोसायटी चे पैसे जमा घेऊन ठेवणं, पावती देणं वगैरे... आता तू मला बोअरिंग समजत असशील" म्हणत त्रिशाने त्याच्याकडे पाहीलं.
"नाही. तोडीस तोड भांडणारी मुलगी बोअरिंग असू शकत नाही. परत, तुला पीजे पण मारता येतात"
त्रिशाला हसू आलं
"फक्त, कम्फर्ट झोन मध्ये राहणं पसंत करतेस" तो पुढे बोलला.
"हीच तर डेफिनिशन आहे बोअरींग असण्याची. बाय द वे, सो कॉल्ड फन लविंग लोकांनाही हे अप्लाय होऊ शकतं, तो त्यांचा कम्फर्ट झोनच झाला एकप्रकारे"
"टेक्निकली, यप! पण कधीतरी कम्फर्ट झोन च्या बाहेर पडायला हरकत नाहीये" नकुल त्याच्या विचारात बोलत होता. "खाऊन पाहिल्या शिवाय चव कशी कळणार?"
त्याचं वाक्य ऐकून त्रिशाला त्यांचा किस आठवून हसू फुटलं. नकुल हसू ऐकून विचारातून बाहेर आला. त्याला संदर्भ लागला तसा तोही हसला.
"बघ, म्हणालो ना मी तू बोअरिंग नाहीयेस. भरपूर काही चालू असतं त्या डोक्यात" नकुल डोळ्यांनीच तिच्या डोक्याकडे इशारा करत म्हणाला.
" तू माझ्या बारीक सारीक गोष्टी नोटीस करतोयस, लक्षात पण ठेवतोएस. ऍम ग्लॅड. "
नकुल त्यावर फक्त हसला.
दोघे एव्हाना गेट च्या बाहेर पडले होते. हे एवढं सगळं रँडम बोलणं चालू आहे पण तो कालबद्दल काहीच का बोलत नाहीये असा विचार त्रिशाच्या मनात आला. तिला ते जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्रिशाने अजून वाट पाहण्याचं ठरवलं.
"बाय द वे, आज तुला ऑफिसमधून यायला उशीर झाला का?
जनरली तू माझ्या आधी आलेली असतेस. मी घरात आल्यानंतर मला तुमच्या दाराचा आवाज आला" बाहेर येऊन रस्त्याच्या डाव्या बाजूला येताना नकुलने विचारलं.
" हल्ली मी ऑफिसवरून आले की तशीच साल्सा क्लास ला जाते. इथल्या स्वे मध्ये"
"हो? हे कधी झालं?" नकुल एकदम तिच्याकडं बघत म्हणाला.
"एवढ्यातच, तीनेक दिवस झाले असतील."
"वाह! तू डान्स पण करतेस, अजून एक नॉन बोरिंग गोष्ट!"
"करत नाही शिकतेय" त्रिशा हसत म्हणाली. "अ ब क पासून तेही. मला फक्त आवड होती. बरेच दिवस मी टाळत होते, शेवटी ठरवून टाकलं"
सिरियसली नकुल, हवं तर मी तुला नंतर डेमो देते इथं भर रस्त्यात, पण मुद्द्यावर ये आता लवकर! त्रिशा स्वतःशीच म्हणाली.
तेवढ्यात पावसाची भुरभुर चालू झाली. त्रिशा एक हात डोक्यावर ठेवत किलकिल्या डोळ्यांनी वर पाहू लागली तेव्हा नकुल म्हणाला.
"चल, तिथे त्या दुकानाच्या शेड खाली थांबू"
"थांबायचं कशाला? इथेच तर राहतो आपण, पटापट चाललो तर पोहचून जाऊ, चल"
त्रिशा वळणार तसा तो तिचा दंड धरून तिला थांबवत म्हणाला. तिला त्या स्पर्शाने शहारा आला.
"मग आपल्याला बोलता येणार नाही" भुरभुरीची रिपरिप झाली होती. नकुल ने बोटाने दाखवलेल्या शेड मध्ये दोघे पळतच आले. कपडे झटकत उभे राहीले. नकुल जरा अंतरच ठेऊनच खिशात हात टाकून उभा राहीला.
"त्रिशा, मला कालबद्दल बोलायचंय" त्रिशा कानात प्राण आणून उभी राहीली.
"मला वाटतं आपण घाई करायला नकोय" काही गोष्टी क्लिअर झाल्याशिवाय नाही. दुसरं वाक्य तो मनात म्हणाला. त्रिशाने थोड्यावेळापूर्वीच स्वतः असंच ठरवलेलं असलं तरी आता तो भेटल्यावर त्याने त्याच्या अगदी विरोधात बोलावं असं तिला वाटत होतं. ते ऐकून तिचा मूड एकदम कुठेतरी तळाशी जाऊन बसला.
"मला माहितीये. मलाही असंच वाटतं" ती एकदम बारीक आवाजात म्हणाली
"पण, मी हे म्हणत नाहीये की ते सगळं एकदमच नकळत होऊन गेलं आणि आता मला पश्चाताप होतोय. हो, तो त्या मोमेंट चा परिणाम होता पण मला व्यवस्थित समजत होतं मी काय करतोय ते"
"माहितीये"
दोघेही सरळ उभा राहूनच बोलत होते.
" थोडे दिवस थांबुयात"
"हो"
"त्रिशा, तुला राग आलाय का माझा" नकुल आता तिच्याकडे बघत म्हणाला.
"नाही, राग नाही आला. पुढे काय होईल त्याबाबत मला खात्री वाटत नाहीये, सगळं धूसर दिसतंय."
"आताच त्याचा विचार करायला नको" नकुल पुन्हा सरळ बघत म्हणाला. एखादा मिनिट तसाच गेल्यानंतर त्रिशा नकुलचं निरीक्षण करत म्हणाली,
"नकुल, आज मला तू खूप शांत वाटतोयस. काय झालंय?"
"कुठे शांत आहे? तुला कदाचित आपल्या भांडणाची जास्त सवय झालेय." नकुल खोटं हसत म्हणाला. त्रिशाला याची कुणकुण लागेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. तो चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचा प्रयत्न करत होता.
"काहीतरी आहे तुझ्या मनात, तू सांगत नाहीयेस" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली. तिला त्याचा हात धरण्याची खूप इच्छा झाली पण तिने ते टाळलं. एव्हाना भुरभुर बंद झाली होती.
"असं काही नाहीये. तुला हे सगळं कसं सांगावं, तुझी त्यावर काय रिऍक्शन असेल, तू माझ्याबद्दल काय विचार करशील, हे सगळं माझ्या डोक्यात होतं. पण आता नाही, मला वाटतं तोपर्यंत आपण भांडकुदळ शेजारी म्हणून राहू शकतो."
त्रिशा तरीही त्याच्याकडे पहात होती.
"चल निघुया, पाऊस थांबलाय." नकुल शेड च्या बाहेर हात काढत थेंबांचा अंदाज घेत म्हणाला. " नाहीतर मीनक्षीला वाटेल तू खालच्या खाली किडनॅप झालीयेस"
"ती समोरच्या घरात जाऊन बघेन आधी" त्रिशा हसत म्हणाली.
"तिला सांगितलं तू सगळं? " नकुलने विचारलं.
"मला शेअर करायचं होतं. तसही, मी तिला कधीच काही सांगत नाही, असं तिला नेहमी वाटतं. उद्या मला सोडून गेली तर काय करू? तू सांगितलं आशिषला?"
"नाही, पण तो नोटीस करेलच, तेव्हा बघेन"

बिल्डिंगखाली येइपर्यंत, जिने चढताना दोघे काहीच बोलले नाही. त्यांच्या मजल्यावर आले. नकुल त्यांच्या दारापुढे उभा राहीला.
"गुड नाईट"
"गुड नाईट" मनात नसताना त्रिशा म्हणाली. अजून काही वेळ तो बरोबर असावा असं तिला वाटत होतं.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 12 - फ्रॉम 305 विथ....

सकाळी पावणे सात वाजता त्रिशाची अंघोळ उरकली. ऑफिससाठी कपाटातुन कुर्ता बाहेर काढत असताना तिला खालच्या कप्प्यात ठेवलेली कापडी पिशवी दिसली. सुमंत काकूंनी गिफ्ट दिलेलं पर्पल क्रोशे जॅकेट! आज याचं उदघाटन करावंच असं ठरवून तिने तिचा प्लेन ब्लॅक कॉटन कुर्ता बाहेर काढला. जॅकेट पिशवीतून काढून हातात घेऊन दोन्ही हात लांब करत उलटं सुलटं बघून घेतलं. ग्रेट जॉब काकू, मशीन ने विणल्यासारखं फाईन विणलंय हे! गळ्यापासून पोटापर्यंत आलेले लोकरीचे दोन धागे आणि त्यांना लावलेले पॉम पॉम तिला विशेष आवडले होते. ऑफिसातल्या मुली पाहून वेड्याच होतील आणि याची रिप्लिका दुकानात कुठेच मिळणार नाही म्हणुन अजून वेड्या होतील! आज संध्याकाळी घरी आलोत की मीनीला तिचं जॅकेट घालायला लावून एक सेल्फी काढू असं तिने मनाशी नोट केलं. तिने आवरलं, जॅकेट चढवलं. आरशात तिच्या बाऊन्सी स्टेप कट ला हातानेच शेवटचं सेट केलं. गळ्यात लाल आयडी अडकवून, मीनक्षीला दार लावून घ्यायला उठवण्यासाठी शेवटचं गदागदा हलवून तिने दार उघडलं.
"ओह, हाय" नकुलला त्याच्या दारात उभा पाहून काही सेकंद डोक्यात आलेल्या सगळ्या विचारांना घालवत ती म्हणाली. हे आता रोजचं दृश्य असणार आहे त्रिशा, गॅदर योरसेल्फ!
त्याने काहीच न बोलता फक्त हेल हिटलर सारखा हाय करून नेहमीची डॅझलिंग स्माईल दिली.
"सकाळी सकाळी असा भालदारा सारखा काय उभा आहेस दारात" त्रिशा मागे वळून दार ओढून घेत म्हणाली.
"दहा मिनिटे झाली उभा आहे, तुला कळायला पाहीजे ते"
सिरियसली, हा असं काही बोलल्यावर काय प्रतिक्रिया द्यावी तेच सुचत नाही. खरंच..हे तळ्यात मळ्यात कधी संपणार देव जाणे!
त्रिशा काहीच न बोलता त्याच्याकडे पाहतेय ते पाहून तोच म्हणाला.
"एवढ्या लांब दोऱ्या? काहीही काय फॅशन करता तुम्ही मुली?"
"काय? त्रिशा जागेवर येत तिच्या जॅकेट कडे पहात म्हणाली. "किती गोड आहे हे! उलट हेच जास्त आवडलंय मला" त्रिशा एक गोंडा हातात घेत म्हणाली.
"गोड? बस मध्ये जाताना अडकल्या ना त्या दोऱ्या कुठे तरी कळायचं नाही, धडपडशील! हे म्हणजे ओपन शू-लेस सारखं आहे! कम हिअर.." तिने काही प्रतिक्रिया देण्याच्या आत तो पुढे आला. लोंबणारे धागे हलक्या हाताने धरून ओढले. त्याबरोबर तीही अडखळत पुढे आली. दोघांच्या मध्ये फक्त त्याचे हात बसतील एवढंच अंतर राहीलं. पुन्हा आफ्टरशेव्ह! तिने डोळे मिटून घेतले. तो दोन्ही धागे हातात घेऊन शू-लेस बांधतात तशी बटरफ्लाय नॉट बांधायला लागला.
"प्च!" लांब धागे आणि गोंडयांच्या वजनामुळे त्याला बटरफ्लाय करताना अडचण येत होती. एकदा दोऱ्यांकडे एकदा त्रिशाच्या चेहऱ्याकडे बघत अखेर त्याने पॉम पॉम चे पाय असलेलं बटरफ्लाय बनवलं. तिच्या खांद्यावर आधीच नीट बसलेलं जॅकेट पुन्हा नीट करत तिच्या चेहऱ्याकडे बघत त्याच्या बेस असलेल्या आवाजात पुटपुटला.
"नाऊ, यु आर गुड टू गो"
त्रिशाच्या मागे घराच्या दाराच्या मागून कडीचा आवाज आला तशी ती मागे झाली.
तिने मान खाली करून त्या बटरफ्लाय कडे पाहीले.
"काये हे नकुल .." ती हसत म्हणाली.
"आता ते नीट झालंय, युसलेस फॅशन" नकुल मागे जात म्हणाला.
"ए, खास व्यक्तीने दिलेलं खास गिफ्ट आहे ते, काही म्हणायचं नाही त्याला" त्रिशा त्याच्याकडे बोट करत म्हणाली.
"कोण व्यक्ती? " भुवया गोळा करत त्याने विचारताच त्रिशाचा फोन वाजला. तिने पर्समधून फोन बाहेर काढला.
"आईचा फोन! ओके नकुल, बाय आणि नो थँक्स फॉर धिस" त्रिशा बटरफ्लाय चे पाय हातात घेत म्हणाली. फोन रिसिव्ह करून जिना उतरू लागली.
आईशी बोलून झाल्यावर स्टॉप वर बस ची वाट पाहात असताना तिने सहज जवळ उभा असलेल्या कार च्या खिडकीच्या काचेत डोकावून पाहीलं. बटरफ्लाय ची गाठ सोडण्यासाठी त्याचा एक पाय धरला, हसून परत तसाच राहू दिला.
संध्याकाळी ऑफिसवरून येताना बस मध्ये बसल्या बसल्या तिच्या मनात तिच्या आणि नकुलच्या सध्याच्या फेज बद्दल विचार घोळत होते. नक्की आम्ही वेळ देतोय म्हणजे काय करतोयत? नकुल च्या मनात आपल्याबद्दल फिलिंग्ज आहेत हे तर स्पष्ट होतंय. उद्या तो अचानक आपण डेट वर जाऊ असं म्हणाला तर मीही तयार होईल. किसनंतर आम्ही दोघे ऑकवर्ड फेज मध्ये जायला हवे होतो पण तसंही नाही झालं, उलट आम्ही एकमेकांबाबत जास्त कम्फर्टेबल झालो आहोत. मग आता अजून थांबून असं काय साध्य होणार आहे? अजून किती दिवस असं काहीच नाव नसणारं नातं वागवत पुढे जायचं?
ट्राफिक नसल्यामुळे बस ने स्टेडी स्पीड पकडलेला होता. पाऊस ढगात दाटून राहिलेला होता पण पडण्याचं नाव घेत नव्हता, कानात बेथ हार्ट कोणा स्ट्रेंजर ला "योर हार्ट इज ऍज ब्लॅक ऍज नाईट" म्हणत होती. ते त्रिशाला अजून अस्वस्थ करत होतं, तरीही ती ऐकत राहीली.
त्रिशाचा साल्सा क्लास उरकल्यानंतर चालत ती बिल्डिंगजवळ पोहोचली. सहा जिने चढून तिसऱ्या मजल्यावर आल्यानंतर तिला तिथे बरेच नवीन आवाज आले. ती त्या आवाजांची चाहूल घेत पुढे आली तोच आशिषच्या घरातून एक पांढरे कपडे, सोनेरी चष्मा घातलेला घातलेला पुरुष आणि मोठमोठी फुलं असलेल्या शिफॉन च्या साडीचा उलटा पदर डोक्यावरून घेतलेली बाई असं जोडपं बाहेर पडलं. पाठोपाठ आशिष ही बाहेर आला.
"हाय त्रिशा"
"हाय" त्रिशा त्या सगळ्यांकडे पहात म्हणाली. एव्हाना नकुलही बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ एक मुलगी पायातल्यांचा आवाज करत बाहेर पडली. त्रिशाला एकदम आशिष च्या बहिणीचा, पायल चा नकुल ने केलेला उल्लेख आठवला. तिने नकुलकडे परत पाहीलं, तो रागात होता की वैतागला होता तिलाच कळलं नाही. त्रिशाकडे पाहील्यावर त्याने चेहरा सरळ ठेवत डोळ्यांनी ओळख दिली.
"हे माझे मम्मी, पप्पा. ही त्रिशा, समोरच्या फ्लॅट मध्ये राहते" आशिष म्हणाला. गौतम आणि साधना समदरिया. त्रिशाला नावं आठवली. तिने मान खाली वर हलवून स्माईल करत त्यांच्याकडे पाहीलं.
"आणि ही माझी बहीण पायल"
"हाय त्रिशा.." पायल हात वर करत हाय करत म्हणाली.
"हाय.."आशिष आणि तिचे डोळे सारखेच घारे आहेत, त्रिशाने नोटीस केलं. पायलला भेटण्याआधीच तिने काल मीनाक्षीकडे तिचं वर्णन केलं होतं. नकुल ला शोभणारी मुलगी!
त्रिशाची थोडीफार चौकशी केल्यानंतर ते लिफ्टकडे निघाले.
"नकुल, ये तू पण" गौतम समदरिया लिफ्ट च्या दारावर हात ठेवत म्हणाले.
"तुम्ही चला काका, मी येतो पायऱ्यांनी" म्हणून नकुल खाली उतरायला लागला.
त्रिशा मुद्दाम सावकाश तिचे सँडल्स काढत हे सगळं बघत होती.

त्रिशा घरात आल्यानंतर मीनाक्षीने तिचे जॅकेट पाहीले.
"ए तू आज उदघाटन केलंस?"
"येस, तू पण घाल,आपल्याला सेल्फी काढायचाय"
"ओके, आलेच, तू तोवर फ्रेश हो"
"येस" म्हणत त्रिशा आत निघून गेली.
त्रिशा फ्रेश होऊन आली, दोघी एका मागे एक उभा राहील्यावर मीनाक्षीने सेल्फी काढला. 'काकूंना दाखव' असं कॅप्शन टाकत मी दि त्रि ग्रुपवर टाकला.
त्रिशा पुन्हा कपडे बदलून, केस वर घेऊन क्लचर मध्ये अडकवून हुश्श करत खुर्चीत पसरून बसली. तिच्या डोक्यात विचार सुरू झाले. काल संध्याकाळी शांत असलेला नकुल, आज सकाळचा फ्लर्टी नकुल आणि आताचा कपाळाला आठ्या पाडून उभा असलेला नकुल! काय चाललंय याच्या आयुष्यात? हा दरवेळी मनात बऱ्याच गोष्टी लपवुन ठेवल्यासारखा का वाटतो?
त्रिशा, कदाचित तुलाच त्याचं अति निरीक्षण करायची सवय लागल्येय. त्याच्या आयुष्यातली प्रत्येक मिनिटांची प्रत्येक गोष्ट तुला कळलीच पाहीजे हे तुझं ऑब्सेशन निव्वळ रिडीक्युलस आहे. सध्या फक्त त्याच्या तुझ्याशी संबंधित गोष्टींवर फोकस कर, बाकी हळुहळु कळेलच. गिव्हन ऑल धिस, संध्याकाळी बस मध्ये ती त्यांच्या रिलेशन ने स्पीड धरला पाहीजे असा विचार करत होती, त्याला आता बाद ठरवून तिने तो बाजूला टाकला. मोबाईलचं नेट ऑन केल्या केल्या तिला तिच्या स्वे ग्रुपवर संध्याकाळी त्यांच्या ट्रेनर ने साल्सा मुव्ह्ज रेफर करण्यासाठी काही व्हिडीओज च्या लिंक्स पाठवल्या होत्या, त्यातली एक उघडून एक हात हनुवटीखाली ठेवत लक्षपूर्वक तो व्हिडीओ बघण्यात गुंग झाली.
मीनाक्षी आतून येऊन टीव्ही समोर जाऊन बसली. सेट मॅक्स वर बाहुबली एकचा शेवटचा काही भाग शिल्लक होता ते बघत बसली. तेवढ्यात दारावर टकटक झाली. तो आवाज येता क्षणी त्रिशा व्हिडीओतुन बाहेर आली आणि ताडकन खुर्चीवरून उठून "मी बघते" म्हणत दाराकडे जाऊ लागली. मुव्हीत एकाग्र झालेली मीनाक्षी जोरात दचकली. आपल्या दारावर नॉक कोण करतं हे एव्हाना दोघींना चांगलं माहीत झालं होतं.
"प्रकाशाचा वेग, लोकहो, प्रकाशाचा वेग स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलाय मी आत्ता" मीनाक्षी मान हलवत त्रिशाकडे बघत म्हणाली.
दाराकडे चाललेल्या त्रिशाने पुन्हा मागे येऊन जोरात मीनाक्षीचे गाल ओढले. मीनाक्षी ओरडली तेव्हाच सोडले आणि पुन्हा दाराकडे गेली. दार उघडल्या उघडल्या,
" काय म्हणत होतीस तू सकाळी, स्पेशल गिफ्ट, खास व्यक्ती? कोण नक्की?" नकुलने एक हात दाराजवळच्या भिंतीवर ठेवत विचारलं.
त्रिशा काही सेकंद ब्लॅंक होऊन त्याच्याकडे बघत राहीली.
"थांब, कसलं गिफ्ट?" मग तिची ट्यूब पेटली. "ओह, ते जॅकेट, ते काकूंनी, सुमंत काकूंनी दिलंय, ते निघून जात होते त्या दिवशी."
"काकूंनी दिलं होतं... त्याचवेळेस सांगितलं असतं तर! दिवसभर त्या अनोळखी व्यक्तीला मनातल्या मनात शिव्या घातल्या मी"
"काय..?" म्हणत त्रिशा संपूर्ण तिसऱ्या मजल्याला ऐकू जाईल असं हसायला लागली. नकुल ला अजूनच राग आला.
"व्हॉट डिड आय मिस, व्हॉट डिड आय मिस.."म्हणत मीनाक्षी आतून पळत बाहेर आली.
" सांगते.. सांगते मी तुला मीने थोड्या वेळात" त्रिशा हसू आवरत म्हणाली. नकुल रागातच दोघींकडे आलटून पालटून पहात होता.
मीनाक्षी आत निघून गेली तशी त्रिशा म्हणाली.
" एवढं करण्यापेक्षा मला एक कॉल करायचा होता.., ओहह..., आपल्याकडे एकमेकांचे नंबर नाहीयेत नाही का अजून! "
नकुल अजूनही रागातच बघत होता.
"नकुल तू इन डिरेक्टली आमच्या काकूंना शिव्या दिल्यास?"
"तू अर्धवट बोलणं टाकून निघून गेलीस.."
त्रिशा त्याला बघून परत हसायला लागली. आता नकुल ने पुढे होऊन, तिचे खांदे धरून तिला वळवलं आणि हलकेच घरात लोटून दिलं, मागून त्यांचं दार ओढून घेतलं. आतून नकुलला त्रिशाचा हसण्याचा आवाज येतच होता. आणखीन काही मिनिटांनी दोघींचे हसण्याचे आवाज त्याला त्याच्या हॉल मध्ये ऐकू आले.
दहा मिनिटांनी त्याने पाहीलं तर त्याच्या दाराच्या फटीतून आत एक कागद आलेला होता. तो रिमोट खाली ठेऊन सोफ्यावरून उठून दारापाशी गेला. कागद उचलून पाहीला,त्यावर एक नंबर लिहिलेला होता. त्याने स्वतःशीच स्माईल केलं. मागे शाईच्या खुणा दिसल्या म्हणून कागद त्याने उलटून पाहीला.
"फ्रॉम 305 विथ ????" लिहिलेलं होतं.
परत एक स्माईल करत कागद घेऊन तो सोफ्यावर जाऊन बसला.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 13 - फिल्टर कॉफी

"किचन इमर्जन्सी.." त्रिशाने दार उघडल्या उघडल्या नकुल म्हणाला.
"काय झालं?"
"बटाटेवडे, काहीतरी फसलंय...चल तू आधी, दाखवतो"
नकुलच्या मागोमाग त्रिशा त्यांच्या स्वयंपाकघरात गेली.
"बघ"
त्रिशाने पाहीलं तर कढईतल्या तेलात बटाटेवडे उकलून आतली भाजी तेलात पसरली होती. कढईच्या तळाशी जळालेल्या भाजीचे काळे कण साठले होते. एका डिशमध्ये काळपट, तेल पिऊन मंद झालेले दोन-तीन बटाटेवडे अर्धवट तळून बाहेर काढलेले दिसत होते.
"काय करून ठेवलंएस हे नकुल"? त्रिशा तो सगळा पसारा बघत म्हणाली.
"माहीत नाही, रेसिपीनुसारच तर केलं सगळं, पण समहाऊ हे नीट तळले जात नाहीयेत"
"तू आयटीवाला आहेस ना? युनिट टेस्टिंग नावाचा प्रकार ऐकला असशीलंच.. आधी फक्त एक वडा टाकून पाहीलं असतं तर?" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
"ऑफकोर्स, मी नेहमी तळतो आणि परफेक्ट तळतो, हा वड्यातच काय लोच्या झाला कळत नाहीये"
"बघू दे मला, तोवर हे तेल गाळून ठेव तू"
त्रिशा एखाद्या कडक शिक्षकासारखी त्याला सूचना देताना पाहून त्याला हसू येत होतं. तो गुपचूप त्याला सांगितलेलं काम करायला लागला. त्रिशा त्याच्या मागून जाऊन सिंक मध्ये हात धुवून आली.
"ओके, तुझा बॅटर तर व्यवस्थित आहे" ती बॅटर हाताने चेक करत म्हणाली. मग भाजीकडे वळली. त्याने आधीच बरेच गोळे करून ठेवले होते, त्यातला एक हातात घेऊन तिने टॉस केला.
"इथे घोटाळा आहे.." युरेका! नकुल त्याचं काम करत करत ऐकू लागला.
"बटाटे जास्त उकडले गेलेत, त्यामुळे तेलात टाकले की फुटताहेत."
"आता?" नकुल ते ऐकून हाताची घडी घालून तिच्या शेजारी ओट्याला रेलून उभा रहात म्हणाला.
"काही नाही, हे बॅटर अजून घट्ट करू, पिठाचा डबा आण"
नकुलने फॉलो केलं. त्रिशाने बॅटरमध्ये थोडं पीठ मिसळून ते घट्ट केलं. चव वर खाली झाली असेल म्हणून मिठापासून बाकी सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या पुन्हा घातल्या. गाळून स्वच्छ झालेल्या तेलाची कढई पुन्हा गॅसवर ठेवली. एकदोनदा बॅटर चेक करून झाल्यावर तिने भाजीचा गोळा त्यात बुडवून तेलात सोडला. यावेळी वड्याने तग धरला.
"ब्रिलीयंट त्रिशा उपाध्ये!" नकुल आवाज नसलेल्या टाळ्या वाजवत म्हणाला. "मला वाटलं होतं आता पोळ्या आणून पोळी भाजी खावी लागतेय"
"पोळ्या येत नाहीत म्हणजे"
"नोप, मी फक्त असे चमचमीत पदार्थ करतो" नकुल कढईत डोकावत म्हणाला.
"आईची ट्रिक बाय दे वे!" त्रिशा वडा खाली वर करत म्हणाली. "आम्ही असे घोटाळे केले की अशा ट्रिका तिच्या पोतडीतुन बाहेर येतात." त्रिशा तो वडा खाली काढून झाऱ्या त्याच्या हातात देत म्हणाली "आणि आता यु ओव मी समथींग!"
"काय? फक्त पीठ मिसळण्यावरून? आठाणे देतो!"
नकुल चेहरा सरळ ठेवून पुढे कंटीन्यू करत म्हणाला.
"झालं माझं काम, जा आता घरी"
त्रिशा भुवया उंचावून त्याच्याकडं पहात उभी राहीली.
"ठीक आहे! माझा वडा घेऊन जाते" तिने तळलेला वडा उचलून ती तिथून बाहेर पडली.
"दार लावून जा", आतून आवाज आला. लावून घेण्यासाठी धरलेलं हँडल उलटं लोटून दार सताड उघडं टाकत ती तिच्या घरात गेली.
अर्ध्या तासाने पुन्हा दार वाजलं. त्रिशाने उघडलं तर बाहेर नकुल हातात तीन वडापाव, तळलेल्या मिरच्या, चटणी असलेली डिश घेऊन उभा होता.
"माझं पोट दुखलं असतं.." म्हणत डिश तिच्याकडे देऊन निघून गेला. वडापाव बरोबर एक घडी केलेला कागद तिला दिसला. तिने उघडून पाहिला.
"त्या दिवशी तू मसाला पाव खाल्ला नव्हतास् म्हणून एक एक्स्ट्रा!"
समोर दाराकडे पहात स्माईल करून त्रिशाने दार लावून घेतलं.

जेवण उरकून रात्री नेहमीप्रमाणे त्रिशा बाहेर पडली. नकुलला कॉल करून बोलावण्याचा विचार तिच्या मनात आला पण परत कदाचित भेटेल खालीच म्हणत पुन्हा काढून टाकला. ती पायऱ्या उतरून बिल्डिंग बाहेर पडली तोच नकुल कोणा मुलीशी बोलत असताना तिला दिसला. तिने अजून थोडंसं पुढे जाऊन पाहिलं. ती पायल होती. गोल मोठ्या गळ्याचा व्हाइट शॉर्ट कुर्ता, व्हाइट पटियाला आणि वर गडद लाल लहरिया डिझाइनच्या ओढणीत गोड दिसत होती. अशा ड्रेसवर मस्ट असतात असे मोठे सिल्व्हर झुमकेही कानांत होते. त्यांना उगीचच बघून न बघितल्यासारखं करत ती त्यांच्या शेजारून जाऊ लागली. पण नकुल आणि पायल दोघांनीही पाहिलंच.
"हाय त्रिशा", नकुल तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत म्हणाला.
"हाय! ओह, हाय पायल!" तिने पायलला पाहिलंच नव्हतं, असं दाखवत म्हणाली.
"हाय" ती हात पुढे करत म्हणाली."तुला नाव लक्षात राहिलं माझं!"
त्रिशा हात मिळवत नुसतीच हसली.
"बरं झालं तू आलीस ते, हा मुलगा प्रचंड बोअर आहे" नकुलच्या खांद्यावर एक गुद्दा मारत म्हणाली. "नकुल, आता हिला घेऊन जाऊया आपण आपल्याबरोबर कॉफी प्यायला, तेवढंच मला बोलायला कंपनी होईल."
"पायल, तिला काम असेल, आपण जाऊ, चल..." नकुल पायलच्या हाताला निसटता स्पर्श करत म्हणाला.
"मी तिला विचारतेय नकुल, तू का उत्तर देतोयस? त्रिशा, काय म्हणतेस? चल आमच्याबरोबर, तेवढीच आपली अजून चांगली ओळख होईल."
त्रिशा आलटून पालटून दोघांकडे बघत होती.
"पायल..."
नकुल पुढे बोलणार तेवढ्यात त्रिशा म्हणाली.
"ओके, येते"
"कूल" पायल उत्साहात म्हणाली.
त्रिशाने नकुलकडे पाहिलं, त्याला आवडलेलं नाहीये हे तिच्या लक्षात येत होतं. तिघे सोसायटीच्या गेटच्या दिशेने निघाले. पायल चालता चालता मध्येच हॉस्पिटलमधली कुठलीतरी गंमत सांगायला लागली. ते ऐकून त्रिशाने मध्येच विचारलं.
"तू डॉक्टर आहेस?"
"हो. सॉरी, आपण आजच भेटलो ना तशा, मी माझ्याच नादात सांगत बसले"
"ग्रेट" त्रिशा म्हणाली.
"आणि तू काय करतेस?" पायलने विचारलं.
"स्टॅटिस्टिशियन"
"ओह वॉव, मॅथस् वगैरे, बाकी मेडिकलवाल्यांसारखा माझाही ऑप्शनलाच होता"
नकुल शांतच आहे, हे त्रिशाने नोटीस केलं.

असेच रँडम बोलत तिघे चालत होते. जास्त करून त्रिशा आणि पायल दोघीच बोलत होत्या, त्यातही पायल. चालताना सलग तिच्या पायांतल्यांच्या घुंगरांचा आवाज होतच होता. ती नकुलला काहीतरी उद्देशून सांगत असताना तो केवळ "हम्म" मध्ये प्रतिक्रिया देत होता.
"बघितलंस? बोअर आणि रुड!" त्रिशाकडे बघून असं म्हणत असताना तिने हाताने नकुलच्या दंडाभोवती वेढा घातला. नकुल जरासा गोंधळला. त्रिशा ते दोन्ही बघून सरळ बघत चालू लागली.
चालत चालत तिघे सोसायटी बाहेर आले. तिथल्याच एका लहानशा कॅफेत शिरले. नकुल कॉफी सांगायला जाणार तोच
"तू थांब इथं, ही कॉफी माझ्याकडून" म्हणत पायल काउंटर जवळ गेली पण. नकुल आणि त्रिशा रिकामा टेबल बघून समोरासमोर बसले. नकुल आधीच अवघडल्यासारखा झाला होता आता त्याला एकदम तोफेच्या तोंडासमोर बसल्याचं फिलिंग आलं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, तोवर पायल फिल्टर कॉफीची ऑर्डर सांगून आली.

कॉफी घेत त्रिशा आणि पायल बोलत होत्या. पायल मधूनच बोलताना नकुलला हात लावत होती. त्रिशा ते नोटीस करत होती आणि नकुल अधूनमधून त्रिशाकडे नजर टाकत होता. नकुलने जेवढ्यास तेवढं बोलणं चालू ठेवलं होतं. कसेबसे पंधरा एक मिनिटे गेली.
"नकुल, माझं ठीक आहे, ती तुझी शेजारी आहे तिच्यासमोर तरी नीट वाग"
त्रिशाने नकुलकडं पाहिलं.
"पण त्याच्या या वागण्यावर जाऊ नकोस, तो खूप गोड आहे. आणि हुशार, आणि मेहनती, बघून वाटत नसेल, तरीही" पायल त्याच्याकडे कौतुकाने बघत म्हणाली.
नकुलला आता तिथे बसणं अशक्य झालं. तो घडाळ्यात बघत पायलला म्हणाला.
"पायल, काका काकू तुझी वाट बघत असशील, उशीर झालाय"
"हम्म ओके, ठिकेय निघते मी आता"
तिघे कॅफेतुन बाहेर पडले.
"ओके त्रिशा, नाईस टू मिट यु. पुन्हा आले इकडं की नक्की भेटून जाईन, बाय."
"नक्की आणि कॉफीबद्दल थँक्स! नीट जा घरी" त्रिशा तिला म्हणाली.
"येस! नकुल, सी यु सून" असं म्हणत तिने तिथेच त्याला मिठी मारली. नकुलने वरवर तिच्या पाठीवर थोपटत ती परत केली. पायल पुढे गेली तसा नकुल त्रिशाला म्हणाला,
"मी तिला रिक्षात बसवून येतो, तोपर्यंत इथेच थांब, बरोबर जाऊ आपण"
नकुल दोन मोठी पावलं टाकत मग पायलच्या बरोबरीने चालायला लागला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 14 - सेफ्टी पिन

दहा मिनिटे होत आली होती. त्रिशा कॅफेसमोर रस्त्यावरच्या रहदारीचं निरीक्षण करत उभी असताना असताना समोरून नकुल परत येताना दिसला. कुठल्याशा पांढरट की तसाच नक्की शेड सांगता येणार नाही अशा अगदी साध्या, डल राउंड नेक टी शर्टमध्ये आणि ग्रे जीन्समध्ये तो प्रचंड हॅन्डसम दिसत होता. त्याच्या क्रू कटमुळे तर हा एखादा फुटबॉल प्लेअर वगैरे म्हणून नक्कीच शोभला असता, त्रिशाला वाटलं. या मुलाच्या आयुष्यात पूर्वी किती मुली येऊन गेल्या असतील, कमीत कमी प्रपोजल्स तरी, याला माहीत नाही अशा मुलींचा क्रश तर जरूर असेल हा! आज अचानक पायल येऊन गेल्यानंतर हा आपल्याला जास्त हँडसम वाटायला लागलाय, असं त्रिशाला वाटलं. एव्हाना नकुल जवळ आलेला होता.
"सॉरी, रिक्षाच मिळत नव्हती, त्यात जवळ कुठं जायचं म्हणलं की ही माणसं अजून कटकट करतात." दोघं चालायला लागली.
"आज अचानक पायल कशी आली?" त्रिशाने थेट मुद्द्याला हात घातला.
"अचानक नाही, येते ती अशी महिन्या दीड महिन्यातून एकदा. ती ज्या हॉस्पिटलमध्ये आहे ते जरा शहराबाहेर आहे, त्यामुळे ती राहते पण तिकडंच."
त्रिशा ऐकत होती.
"इथून जवळ तिची एक मावशी राहते. आशिषचे आई-बाबा, आशिष कालपासून त्यांच्याकडंच आहेत. आज त्यांची कसली पूजा होती म्हणून ही पण सुट्टी घेऊन आली होती, प्लस त्या सगळ्यांना त्यांचा म्हणजे आम्ही राहतो तो फ्लॅटही पहायचा होता. त्यामुळे सगळे काल आमच्याकडे आले होते."
"तिला आवडतोस तू." त्रिशा नकुलकडं पहात म्हणाली.
"माहितीये."
"फक्त आवडतो नाही, मला वाटतं त्याहून जास्त.."
"तेही माहितीये.. तेही आज नाही, आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हापासूनच, मेबी त्याच्याही आधीपासून."
"मग"?
"काय मग?"
"तुला माहितीये काय मग, उगीच वेड पांघरु नकोस." त्रिशा शांततेत म्हणाली.
नकुल मोठा श्वास घेऊन सोडत म्हणाला.
"आशिष जसा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे, तशीच ती ही आहे. पायल चांगली मुलगी आहे, मलाही आवडते, पण मैत्रीण म्हणून, दॅटस् ऑल."
"हे तिला माहित आहे?"
"हा काय प्रश्न आहे? तिने दरवेळी तिच्या फिलिंग्ज दाखवल्या तर मी सांगत बसू का, नो, यु आर जस्ट फ्रेंड म्हणून? हे तिला कळत नसेल असं नाहीचेय पण समहाऊ तिला अजूनही माझ्याकडून होप्स असाव्यात. आणि ती दर भेटीत मला प्रपोज करत नाही की मी ते रिजेक्ट करायला आणि विषय संपायला. खरं म्हणजे तिने अजून ऑफिशियली प्रपोज केलंच नाहीये मला" नकुल वैतागला होता. पायल आणि त्रिशाची अशी भेट होणं त्याला आत्तातरी नको होतं.
"एवढं चिडायला काय झालं? मला जे वाटलं ते विचारलं फक्त"
नकुल काही सेकंद थांबून शांत होत म्हणाला.
"तिच्या घरच्यांसमोर तिला माझ्याशी जरा फॉर्मल वागावं लागतं, म्हणून कधीतरी एकटी येऊन भेटून जाते."
"हम्म"
एव्हाना ते त्यांच्या बिल्डिंगपाशी आले होते.
त्रिशाचं अजूनही समाधान झालं नाहीये असं वाटून तो तिच्याकडे बघत म्हणाला.
"हे सगळं तिच्याकडून आहे, मी आजवर माझ्याकडून कधीही तिला एनकरेज केलेलं नाही. मी, पायल, आशिष आमचे संबंध फार जुने आहेत, शाळेपासूनचे, त्यामुळे तिला कायमचं दूरही करता येत नाही. तिला सतत असं इग्नोर करणं मला आवडत नाही. आय होप एक दिवस तीच ट्राय करायचं सोडून देईल. मुळात तिची आणि माझी भेटच कधीतरी होते, त्यामुळे त्याच्यावर फार विचार करावा असं मला कधीच वाटत नाही."
नकुलने हे सगळं संगितल्यावर त्रिशाला आता अजून पायल हा विषय नको होता. दुसरं काहीतरी बोलायचं म्हणून ती म्हणाली, "या विकेंडला मी घरी जाऊन येण्याचा विचार करतेय."
ती अचानक विषय बदलेल तेही हे सांगायला, असं त्याला वाटलं नव्हतं.
"ओह..चांगलंय", काहीतरी म्हणायचं म्हणून तो म्हणाला.
"वर जाऊयात", त्रिशा म्हणाली.
कोणीही काहीच न बोलता दोघे त्यांच्या घरापर्यंत पोहोचले. त्रिशाचं बिनसलंय हे त्याला कळत होतं.
ती दार उघडून तिच्या घरात जाणार तोच नकुल न राहवून तिला म्हणाला, "त्रिशा"
त्याचा आवाज येताच तिने मागे बघितलं.
"हे जे काही घडलं त्यामुळे तू चिडलीएस का.?"
बिल्डींगच्या खाली पायल भेटल्यापासून ते नकुलने सगळी कथा सांगेपर्यंत तिने जो 'प्लेयिंग इट कूल'चा आव आणला होता, तो या प्रश्नामुळे एकदम गळून पडला.
"ओह अजिबात नाही मि. नकुल ठाकूर, आपल्यात असं काहीच नाहीये ज्याच्या बेसिस वर दुसऱ्या मुलीला तुझ्यात इंटरेस्ट आहे हे पाहून मला राग येईल. पण मानलं पाहिजे, तुझ्यात कॉन्फिडन्स प्रचंड आहे."
ती एकदम चिडलेली पाहून तो चमकला. तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला.
"मला असं म्हणायचं नव्हतं.. "
तिला राग येण्याचं कारण सर्वस्वी पायलच होती, हे तिला मनातून माहित होतं. त्याचाही तिला राग आला होता.
"मग कसं? " त्रिशा त्याच्याकडे पहात म्हणाली.
चुकीचा प्रश्न होता नकुल! तो स्वतःशीच म्हणाला.
आता त्यातून बाहेर येण्याचा कोणताही मार्ग नाहीये हे त्याला समजलं होतं. तो गप्प बसला.
तो काहीच बोलत नाहीये हे पाहून त्रिशा जरा वितळली. पण आता तसं दाखवायचंही नाही असं ठरवून ती मागे वळत सरळ घरात निघून गेली.

त्रिशा त्याला जे काही म्हणाली त्यात मात्र तथ्य आहे हे नकुलला कळत होतं. त्यालाही आता या अधांतरी नात्याचा कंटाळा आला होता. पायल विषय अजून पूर्ण संपलेला नव्हता, त्याचा पुढे या दोघांवर त्याचा कसा परिणाम होईल याची त्याला अजिबात खात्री नव्हती, त्यामुळे होता होईल तितका तो वेळकाढूपणा करत होता. त्यापेक्षा तो ते सांगण्यासाठी शब्द गोळा करत होता.
रात्रीचे दीड दोन झाले. त्याने वेब सिरीज कंटीन्यू करण्याचा प्रयत्न केला, गेम खेळण्याचा प्रयत्न केला पण त्याचं कशातच मन लागेना, झोपही येत नव्हती. त्याने त्याचा मोबाईल उघडला, त्रिशाला पाठवण्यासाठी 'हाय' असा मेसेज टाईप केला, पुन्हा खोडला, 'आर यु देअर?' असं टाईप केलं पुन्हा खोडलं. शेवटी विचार करून त्याने तिला एक ब्लॅंक मेसेज पाठवला. पुढच्या अर्ध्या मिनिटात त्याला त्रिशाकडून ब्लॅंक रिप्लाय आला. त्याला एकदम हुश्श झालं, डोक्यावरचं ओझं बरंचसं उतरलं. मोबाईल ठेऊन तो डोळे मिटून पडला. पुढच्या काही सेकंदात त्याची मेसेज टोन पुन्हा वाजली, त्याने उघडला तर पुन्हा ब्लॅंक मेसेज! त्याने हसून 'इनफ!' असा रिप्लाय केला. इकडे त्रिशाला तो मेसेज त्याच्या आवाजात ऐकू आला. कॉनवरसेशनची एक सायकल पूर्ण झाली म्हणून तिला बरं वाटलं.

"बाय मीने.."
"बाय.."
मीनाक्षी आणि ओमचा आज सकाळीच टेकडीवर फिरायला जाणे आणि मग ब्रेकफास्ट असा कार्यक्रम ठरला होता. सकाळी साडे सहालाच ती बाहेर पडली.
त्रिशा ऑफिसला निघण्याच्या तयारीला लागली. तिच्या ऑफिसचा आज वर्धापन दिन असल्यामुळे आदल्या दिवशीच त्यांना ट्रॅडिशनल ड्रेसकोड देऊन ठेवलेला होता. सगळ्या मुलींनी सिल्कच्या साड्या नेसायचं ठरवलं होतं. त्रिशाकडची मस्टर्ड कलर आणि त्यावर गोल्डन सिल्क थ्रेडचं भरगच्च काम असलेली साडी तिने बाहेर काढून ठेवली. केसांचं विशेष काही करण्यासारखं नव्हतंच, ते मोकळेच ठेवले. वेळ घेत चापून चोपून साडी नेसली. पदराच्या घड्या घालून खांद्यावर टाकला. फॉलिंग पदर तिला अनकम्फर्टेबल वाटायचा, त्यात बसमध्ये चढणं उतरणं, ऑफिसमध्ये दिवसभर काम म्हणल्यावर आपला गुड ओल्ड, सुटसुटीत पूर्ण पिनअपच केलेला बरा असा विचार करत तिने सेफ्टी पिन लावायला घेतली. दोनदा तीनदा प्रयत्न केला, तिन्ही वेळा पिना वाकड्या झाल्या. आधीच साडीचा पोत जाडसर, त्यात पदराच्या एकावर एक घड्यांमुळे पिन आत शिरतच नव्हती. तेवढ्यात कचरा गोळा करणाऱ्या मावशींनी बेल वाजवून आवाज दिला.
"ओह, आज डस्ट बिन बाहेर ठेवलीच नाही गडबडीत.." म्हणत ती बिन घेऊन बाहेर गेली. मावशी तोवर दुसऱ्यांच्या घरापुढे थांबून आवाज देत होत्या. तिने बिन ठेवली आणि आत येणार तोच समोरून नकुल बाहेर आला. तिला वरपासून खालपर्यंत बघत म्हणाला.
"वोह, मिस लग्नाळू कॉम्पिटिशन दिसतेय आज!"
"राखून ठेव तुझं सगळं, आता मी प्रचंड घाईत आहे."
तिने असं एकदम शस्त्र टाकून दिलेलं त्याला काही पचलं नाही.
"कसली गडबड आहे एवढी?"
"दिसतंय ना? ऑफिसला जाण्यासाठी आवरतेय"
म्हणत तिने दार लावून घेतलं.
घड्याळ पुढे सरकत होतं, तिला तिचा पीक अप गाठायचा असेल तर अजून पंधरा वीस मिनिटांत निघणं गरजेचं होतं. पीनेचं काही जमेना.
"मिनी नेमकी गरजेच्या वेळेला नसते." वैतागून ती स्वतःशीच म्हणाली
साडी रद्द करून आता कुठलातरी पंजाबी सूट किंवा अनारकली घालायचा विचार तिच्या डोक्यात येत होता. ती आत गेली, कपाटात ड्रेस शोधू लागली तशी तिला नकुलची आठवण झाली. त्याला विचारावं का? काय हरकत आहे, पिन तर लावायचीये! हो-नाही करत तिने त्याला कॉल केला.
"काय झालं?" तिचा कॉल पाहून त्याला उगीचच शंका आली.
"काही नाही, मला जरा मदत हवीये."
"ओके.."
आपण त्याला सांगायला नको होतं, असं तिला वाटायला लागलं. तोवर दारावर नॉक झालंच. तिने बाहेर येऊन दार उघडलं.
"हे बघ, नेमकी मिनी नाहीये आणि मला आता घाई आहे म्हणून तुला बोलावलं."
"रिलॅक्स.. काय काम आहे."?
त्रिशा चौथी पिन हातात घेत म्हणाली,
"ही पिन पदराला लावता येत नाहीये."
नकुलला हे काम अजिबातच अपेक्षित नव्हतं.
"तुला कमीतकमी आयडिया आहे का कसं लावतात?" त्रिशाने विचारलं.
"नाही.." तो मान डोलवत म्हणाला.
"मग जाउ दे, जा तू" त्रिशा वैतागत म्हणाली.
"थांब जरा, वैतागण्यापेक्षा ती एनर्जी मला एक्स्प्लेन करायला वापर, ते काय रॉकेट सायन्स नाहीये"
त्याच्याकडं बघत तिने जरा विचार केला. पटकन जाऊन तिने आतून रुमाल आणला.
"हे बघ"
म्हणत तिने रुमालावर पीनेचा डेमो दिला.
"कळलं?"
"अर्थात! सोपं आहे"
"थांब मग इथेच"
ती पटकन आत गेली, पुन्हा पदर लावून घेतला आणि त्याला हाक मारली. तो आत आला तेव्हा ती आरशासमोर उभी होती. तो तिच्या मागून येऊन उभा राहीला.
"कुठे लावायचीये?"
तिने आरशात बघत त्याला जागा दाखवून खांद्यावरचे केस एका बाजूला घेतले.
भुवया गोळा करत,एखादं किचकट टास्क दिल्यासारखं तो पिन घेऊन लावायला लागला. त्याच्या बोटांचा तिच्या खांद्याला स्पर्श झाला तसं तिने अंग चोरून घेतलं. तिच्या एकदम तशा रिऍक्शनमुळे त्याची तंद्री मोडली. त्याने आरशातच तिच्याकडं डोळे वटारून पाहिलं.
त्याने पुन्हा सुरुवात केली, ती परत जराशी हलली.
"स्टँड.. स्टील! बोचकारत नाहीये मी तुला.." एकतर जरा अवघडल्यासारखं झालं होतं.
तो बोलला तसं ती श्वास घेऊन सावधान अवस्थेत उभा राहीली. त्याने बॉम्ब डिफ्यूज करतानाच्या आवेशात पुन्हा सुरुवात केली. आरशात आता त्याच्या चेहऱ्याकडं बघून त्रिशाला हसू येत होतं. पिन त्यालाही साथ देत नव्हती, तरी त्याने हलक्या हाताने एकेक घडीतून पिन पास करत अखेर काम फत्ते केलं. लावून झालं की आरशात बघून ते चेक करत म्हणाला,
"झालं बरोबर"?
"परफेक्ट" ती त्याच्याकडे वळाली. "थँक्स"
त्याने हसून फक्त मान खालीवर हलवली.
"बाय द वे, ऍम ग्लॅड..! तुला माझी आठवण झाली"
ती यावर काही म्हणणार त्याआधी तोच म्हणाला.
"आपल्यात काहीही होवो, तुला कधीही, कसलीही मदत लागली तर तू असंच आधी माझ्याकडे यावंस अशी माझी इच्छा आहे.."
हा असं का म्हणाला, असं त्रिशाला वाटलं. पण तिची निघण्याची वेळ झाली होती, तात्पुरता तिने तो विचार बाजूला टाकला.
"असं म्हणतोस? मग आजच्या दिवस मला स्टॉपपर्यंत ड्रॉप कर, नाहीतर माझी बस जाईल." ती हसत म्हणाली.
"मी फक्त म्हणालो काय, तुझ्या डिमांडच चालू झाल्या!" तो नकुल मोडमध्ये येत म्हणाला. "ओह, पण हे करण्यापेक्षा" त्याने पिनेकडं बोट दाखवलं " मी तुला दहा वेळा पिक अँड ड्रॉप करेन. घाम फुटला मला तर.." तो डोळा मारत म्हणाला.
"आवरा.. निघू आता" त्याला बाजूला करत ती तिथून बाहेर पडली.

त्यांच्या बाईकचा आणि बसचा लँड होण्याचा टाईम एकच झाला. ती उतरून त्याला बाय करून बसमध्ये चढायला लागली.
"धडपडू नको कुठं" तो मागून मोठ्याने म्हणाला. ते ऐकत ती हसत हसतच वर चढली. बसमध्ये चढून खिडकीतून तिने त्याला परत एकदा बाय केलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 15 - अंडरग्राउंड क्लब

पुढचा पूर्ण दिवस नकुलचं लक्ष ऑफिसच्या कामातून उडालं होतं. आजचा सकाळचा प्रसंग खासकरून नकुलवर जास्त परिणाम करून गेला होता. तिला तो आवडतो ही गोष्ट आता जुनी झाली होती पण त्यांच्यातल्या अडकून पडलेल्या गोष्टी आणि पायल प्रकरण होऊन सुद्धा त्रिशा सारख्या कॉन्शस मुलीला तिच्या एवढ्या पर्सनल गोष्टीसाठी त्याच्यावर अवलंबून राहावंसं वाटणं, ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यांच्या नात्याचा पाया पक्का होताना त्याला दिसत होता. त्यांच्या एकमेकांबद्दलच्या फिलिंग्ज वाढत गेल्या तसा तिचा स्वभाव ओळखून तो त्याच्या केअरफ्री स्वभावाला ठरवून बांध घालून तिच्याशी वागत होता. त्याच्या कोणत्याही वागण्याने ती हर्ट होऊ नये किंवा त्याला चुकीचं समजू नये याची काळजी घेत होता. अगदी तिला पहिल्यांदा hug आणि किस करतानाही या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात होत्या. आज सकाळी तिने त्याला त्याच्या बेडरूम मध्ये बोलावलं तेव्हा इच्छा नसूनही तो पेशन्स ठेवून वागला होता. त्यावरून त्याने मनातल्या मनात स्वतःच स्वतःची पाठ थोपटली!

भांडणाभांडणा मध्ये दोघांत नकळत निर्माण होत गेलेलं attraction ,तिचा साधेपणा, स्वतःच्या गुणदोषांमध्ये कम्फर्टेबल असणं, तिचा सेन्स ऑफ ह्युमर, दोघांचा रिलेटेबल भूतकाळ ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल झाल्याच होत्या पण ह्या सगळ्यांपासून स्वतंत्र अशी आपोआप जमून आलेली केमिस्ट्री त्यांच्यात होती. कुठल्याही रँडम विषयावर ते गप्पा मारू शकत होते, भांडू शकत होते, एकमेकांना जज करू शकत होते, दे वेअर लाईक बेस्ट फ्रेंड विथ फिलिंग्ज. दोन अगदी ऐल पैल व्यक्ती! एक एका किनाऱ्यावर , दुसरा दुसऱ्या आणि मध्ये समुद्र. भेटायचं असेलच तर कोणालातरी दुसऱ्याच्या किनाऱ्यावर जाणं भाग आहे. पण समहाऊ त्यांना एक नाव मिळाली होती, मध्ये कुठेतरी भेटण्यासाठी आणि त्या समुद्रावर तरंगत राहण्यासाठी!
नकुल आता अजून थांबू शकत नव्हता. ती त्याला आता त्याच्या आयुष्यात कोणत्याही इफ्स आणि बट्स शिवाय हवी होती. आजवरच्या आयुष्यात त्याने पहिल्यांदाच कुठल्या एवढ्या हव्या असलेल्या गोष्टीसाठी त्याने एवढे पेशन्स ठेवले होते, आता इथून पुढे अशक्य होतं.
त्रिशा त्याच्या आयुष्यात येण्यापूर्वी पायलला फक्त होकार देण्याचाच नाही तर तिच्याबरोबर सेटल होण्याचा त्याचा निर्णय जवळपास पक्का झालेला होता. त्रिशा आली आणि त्याच्या सगळ्या प्लॅन्स ला तडे गेले. पायलबरोबर सेटल होण्यामागे त्याचा जो हेतू होता ती आत्तापर्यंत महत्वाची वाटणारी गोष्ट त्याला एकाएकी थेट नकोशी झाली होती. त्रिशाशिवाय त्याला आयुष्यात दुसरं कोणीही नको होतं. त्यासाठी त्याची एवढे वर्ष स्वतःशी केलेलं प्रॉमिस मोडून टाकण्याची तयारी होती.
प्रश्न फक्त आता त्रिशा त्यावर कशी रिऍक्ट होते त्याचा होता आणि त्याचं मन त्याला निगेटिव्ह सिग्नल च देत होतं. हे सगळं साऊथ जाणार याचीच शक्यता जास्त होती. त्रिशाला जाणून घेणं यापेक्षा अधिक त्याला एवढ्या वर्षांपासून पक्क्या झालेल्या माईंडसेटला बदलण्यासाठी वेळ हवा होता. आता अजून त्याची गरज नाहीये याची जाणीव त्याला आज झाली होती. काही करून त्रिशासमोर त् कन्फेस करून त्याला पुढे जे काही होईल त्याला सामोरं जायचं होतं.

रात्रीच्या जेवणानंतर त्रिशा नकुल रोजच्यासारखं फिरायला खाली जात होते. पावसाची भुरभुर चालू होती. दोघांनी आपापले हुडी असलेले पावसाळी जॅकेटस् घातले होते.
"बाय द वे तुझा साल्सा क्लास कसा चालू आहे?" नकुल पायऱ्या उतरता उतरता तिला म्हणाला.
" मस्त! आयुष्यात असा पहिला क्लास आहे जो मी एवढा एन्जॉय करतेय... मध्येच काय विचारलं?"
"माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे."
"प्रपोजल? बापरे..एवढा मोठा शब्द वापरण्यासारखं काय आहे असं?" प्रपोज करायला नको याला, प्रपोजल्स मांडतोय.. मूर्ख!
"एक अंडरग्राउंड क्लब आहे. मोस्टली डान्सर्स साठी. म्हणजे नुसतंच चिल आउट करायला ही जातात लोक. मी आणि आशिष तर तेवढ्यासाठीच जातो."
"अंडरग्राउंड? माझ्या डोळ्यासमोर त्या रेव्ह पार्टीज चालतात किंवा इललीगल फाईट क्लब्ज असतात, तसं काहीतरी आलं"
"एक्जॅक्टली.. हाही तसाच आहे. म्हणतात की तो लीगल आहे, पण आम्हाला तसं वाटत नाही. पण इथे तू म्हणतेस तसं काही नसतं, डीजे, ड्रिंक्स, डान्स एवढंच."
एव्हाना ते बिल्डिंग बाहेर पडले होते. बाहेर आल्याबरोबर त्रिशाने हुडी डोक्यावर घेतली.
"पण प्रपोजल काय आहे? थांब, डोन्ट टेल मी तू मला तिकडे येण्यासाठी विचारतोयस"
"येस"
"सॉरी, आय विल पास" त्रिशा खांदे उडवत म्हणाली. "मला अशा इल लीगल जागा आवडत नाहीत. जगात चांगल्या, नॉर्मल लोकांसाठीच्या जागाच राहिल्या नाहीयेत ना? बरोबरे तुझी चूक नाही."
"तुझ्या डोक्यातल्या त्या इमेजेस जरा पुसून टाक. परफेक्टली नॉर्मलच आहे हा. तिथे येणारे लोक सुद्धा नॉर्मलच आहेत. पण आता क्लब्ज म्हणलं की थोडेफार सगळ्याच प्रकारचे लोक तिथे असणारच! ते कुठं नसतात? दोन तीन हौशी मुलांनी मिळून चालू केलाय तो, त्या मुलांना पण आता आम्ही बऱ्यापैकी ओळखतो. तुझ्यासारखे डान्सर्स लोक, इनक्लुडींग मुली, हमखास येतात तिथे. आमच्यासारखे बसून वियु बघायला आणि वातावरण एन्जॉय करायला जातात. "
"तुला चिल आउट करायला असं ठिकाण आवडतं? मी मैत्रिणीबरोबर दोनदा पब मध्ये गेलेय, दुसऱ्या वेळेस चक्क बाय करून आले, लाऊड प्लेसेस आर नॉट माय कप ऑफ टी."
"ऑफकोर्स, क्वाएट जागा मलाही आवडतात. इथला गोंगाट म्हणजे हॉर्न, ब्रेक्स, गर्दीच्या आवाजाचा गोंगाट नाहीये. तिथल्या गोंगाटात, वातावरणात जादू आहे. एखाद्या कॉन्सर्टला गेल्यावर तुला तो गोंगाट वाटतो का? तसं काहीसं. आय बेट, तो तुझ्यासाठी अमेझिंग अनुभव असेल. "
"मग रेग्युलर,जमिनीवर असणारे पब काय वाईट आहेत?" एवढा छान पाऊस पडतोय, कसले विषय घेऊन बसलाय हा!
त्याला हसू आलं.
"या क्लब ला जे कॅरेक्टर आहे ते त्यांना नाही, हा त्यांच्यासारखा चकाचक टाईल्स, लाईट इफेक्ट्स, डिझायनर फर्निचर वाला नाहीये. आय हेट देम! तिथल्या आणि रस्त्यावरच्या गोंगाटात विशेष फरक वाटत नाही मला. हा क्लब म्हणजे वेगळंच जग आहे, फार लोकांना माहीत नाही आणि काही तुझ्यासारखा विचार करणारे आहेत म्हणून खूप गर्दी ही नसते, शिवाय त्यांच्या एका दिवसाच्या ठराविक एंट्रीज फिक्स असतात."
"स्टिल, मी कम्फर्टेबल नाहीये अशा ठिकाणी जाण्यात."
चालत चालत ते गेटपासून मागे वळून आले. थोडं पुढं येऊन सोसायटीच्या आयताच्या ओल्या पायऱ्यांवर टेकले. संध्याकाळ पासून चालू असलेल्या पावसाच्या भुरभुरीमुळे लोकांनी घरातच बसणं पसंत केलेलं दिसत होतं.
"हे बघ, मी तुला कुठल्याही वाईट ठिकाणी नेणार नाही ठिकेय? पण तुला नाही जावंसं वाटत तर दॅटस् ऍबसोल्युटली ऑल राईट!"

"ओके." ती त्याच्याकडे बघत स्माईल करत म्हणाली. "तसही मी डान्सर नाहीये, शिकतेय."
"त्याची काळजी नाही, तिथे बिगीनर्स ते एक्स्पर्ट सगळी माणसं असतात, काही तर तेवढे ही नसतात. नो बडी जजेस एनीबडी. इट्स ऑल फन!"
"हम्म" ती विचार करत असल्यासारखी म्हणाली. तिच्याकडे पहात
त्याने तिने गुडघ्यावर ठेवलेल्या तिच्या हातात सावकाश त्याचा तळहात सरकवला. त्याच्या स्पर्शाने ती एकदम भानावर आली. त्याच्याकडे आश्चर्याने पहायला लागली. त्यांच्या किस नंतर आज पहिल्यांदाच ते हात धरत होते. पावसाळी हवेमुळे गार पडलेल्या तिच्या हाताला त्याचा उष्ण हात लागला तसा तिने डोळे सावकाश मिटून उघडले. त्याने तिच्या बोटांत बोटे अडकवली.
"क्लब विषय बंद. आपल्याला जायचं असेल तेव्हा तुला हव्या त्या ठिकाणी जाऊ."
तिला हो म्हणायची पण इच्छा नव्हती. तिचं पूर्ण लक्ष त्यांच्या हातात गुंतलं होतं.
"सो, घरी जायचं ठरलं?" ती काहीच बोलत नाहीये ते पाहून तो म्हणाला.
"हो उद्या ऑफिस झालं की तशीच तिकडं जाईन" ती त्याच्याकडे बघत म्हणाली.
"मला वाटतंय, मी ही जावं घरी या विकेंडला, तसही आई मागच्याच आठवड्यात बोलवत होती."
"कमाल आहे, तुझं गाव कोणतं हेही मला माहित नाहीये अजून.." ती हसत म्हणाली.
"तुझं माहीत झालं होतं मला, आशिष च्या पार्टीत मीनाक्षीने तुम्हा दोघींचा इन्ट्रो दिला होता.
बाय द वे कर्जत ,रायगडातलं.." तो म्हणाला.
"वाह, डोंगरदऱ्या आणि धबधब्यातला आहेस म्हणजे तू"
"पावसाळ्यात घरी अंघोळ बंद, थेट धबधबा!"
ती हसायला लागली.
"तसंही, हा विकेंड इथे राहून जड जाईल मला" तो तिच्याकडं बघत म्हणाला.
ती नुसतंच हसली. बोटांची पकड तिने आणखी घट्ट केली.
"इन दॅट केस.." तो बसल्याजागी मागेपुढे सरकत म्हणाला " आय थिंक, आय डीझर्व्ह अ गुडबाय किस.."
त्याने तसं म्हणताच तिने एकदम त्याच्याकडे बघितलं.
"ऑन चीक, ऍट लिस्ट!" म्हणत त्याने गाल पुढे केला.
ती हसली. त्याला किस करायला पुढे झाली आणि परत मागे आली.
"आपल्या 'वाट बघूया' कराराचं काय? नो टच करार तर ऑलरेडी मोडला आपण.." ती त्यांच्या हातांकडे बघत म्हणाली.
"हे करार आपणच बनवलेत, लेट्स प्रिटेंड वि नेव्हर ब्रोक देम...." तो खांदे उडवत म्हणाला. " बरं कुठे होतीस तू?" म्हणत त्याने पुन्हा गाल पुढे केला.
हसून किस करायला तिने ओठ त्याच्या गालाजवळ नेताच तो पटकन तिच्याकडे वळला आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले... तिचे डोळे आपोआप गच्च झाकले गेले. त्याने तिच्या हातात नसलेला दुसरा हात तिच्या गालांवर ठेवून सपोर्ट दिला आणि किस अजून खोलवर नेला. सकाळचे विचार, आतापर्यंतच्या दडवून ठेवलेल्या पॅशन्स तो त्या किस मध्ये ओतत होता. पुढे त्यांच्यात बिघडलं तर त्या दोघांसाठी ही आठवण तो तयार करून ठेवत होता. यावेळी तिनेही स्वतःला थोपवून न धरता त्याला सारखंच रिस्पॉन्ड केलं. काही सेकंद तसेच गेल्यानंतर एक क्षण श्वास घेण्यासाठी त्याने त्यातून ब्रेक घेतला आणि पुन्हा तिच्या ओठांचा ताबा घेतला. तिने त्याच्या जॅकेट ची कॉलर धरून त्याचा ताबा आणखी घट्ट केला. एव्हाना तिचं हृदय धडधडुन बाहेर पडतंय की काय असं तिला वाटत होतं! बंद डोळ्यांसमोर पांढराशुभ्र उजेड पडला होता..
शेवटी त्याने बाजूला होऊन त्याचं डोकं तिच्या कपाळाला टेकवलं दोघांनी काही क्षण तसेच थांबून लांब श्वास घेतले. पावसाची भुरभुर चालूच होती...

तिथून उठून काहीच न बोलता तसेच हातात हात घालून ते आपापल्या घरासमोर आले. एकमेकांकडे वळून उभा राहीले. वर येताना हुडी खाली घ्यायची ती विसरली होती, तिने ती आता खाली घेतली.
"हॅपी जर्नी..बी सेफ, कम सून.."तिच्या हनुवटीला हलकासा स्पर्श करत तो म्हणाला.
"यू टू.. " ती म्हणाली.
"मला वाटतं दोन तीन दिवस पुरेल इतकं फूड फॉर थॉट्स दिलंय मी तुला.." त्याची तीच भुरळ पडणारी आणि पोस्टर वरचे दात दाखवणारी मोठी स्माईल करत तो म्हणाला.
ती हसली आणि पुढे येऊन त्याच्या ओपन जॅकेट मधून हात घालून त्याला आवळलं
"आय विल मिस यु, नकुल ठाकूर.."
"यु बेटर.." त्यानेही ती मिठी परत केली.
पण लगेच तसंच थांबून हातांची पकड ढिली करत म्हणाला,
"वेट अ मिनिट! कालच विचारायचं राहून गेलं, तुला माझं आडनाव कसं माहीत? मी तुला सांगितल्याचं मला तरी आठवत नाही."
"आशिष च्या पार्टी दिवशी आम्ही गिफ्ट आणायला बाहेर पडलो होतो, तेव्हा परत येताना वॉचमन काकांच्या रजिस्टर मधली तुझी जुनी एन्ट्री पाहिली होती." ती मान वर करून त्याच्याकडे बघत म्हणाली.
"यु लिटल स्नीकर.." त्याने हसत पुन्हा तिला मिठीत घेतलं..

"आय विल थिंक अबाऊट युअर क्लब" दुसऱ्या दिवशी ऑफिस झाल्यानंतर फलटण च्या बसमध्ये बसल्या बसल्या तिने त्याला मेसेज केला.
"थिंक अबाउट मी टू.." काही सेकंदात त्याने रिप्लाय केला.
स्माईल करून तिने हेडफोन्स घातले. ऍनी लेनोक्स चं "आय पुट अ स्पेल ऑन यु" ऐकत ती बस च्या वेगाशी सिंक झाली..
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 16 - कॅफे

घरी जाऊन आईला, बहिणीला भेटून त्रिशाला रिचार्ज झाल्यासारखं वाटलं. दरवेळी ती गावी आली की नोकरी सोडून देऊन लहानपणी असायचो तसंच इथं कायमचं रहावं असं तिला वाटत असे. यावेळीही तसंच वाटलं. तिची खोली, घराच्या लहानशा बागेतला झोपाळा, फुलझाडं, लहानपणापासून पहात आलेली कपाटं-डबे-भांडी-खिडकीतून दिसणारं तेच दृश्य, डोकं टेकवायला आईची मांडी, ताईगिरी दाखवण्यासाठी बहीण, जुने शेजारी.. आपली जागा! हल्ली काही वर्षांपासून घरी आली की तिला बाबांची कमी जाणवत असे. यावेळीही झालीच पण नकुल म्हणाला तसं " बरोबर घेऊन जगायचं" चा प्रयोग करून बघण्याचा ती प्रयत्न करत होती.
दुसऱ्या दिवशीची रात्रीची जेवणं उरकली. त्या तिघी बाहेर अंगणात येऊन बसल्या. त्रिशा झोपाळ्यावर उशी ठेऊन, पडून गुढगे मुडपून घेत आकाशातल्या ढग आल्यामुळे अंधुक झालेल्या चांदण्या बघत पडली होती. आई, शलाका खुर्चीत बसल्या होत्या, शलाका मोबाईलवर मैत्रिणींशी चॅट करत होती.
मूड चांगला दिसतोय बघून आईने विषय काढला.
"त्रिशा"
"हम्म"
""बाबांच्या बरोबर असायचे ते करपे माहीत आहेत ना तुला?"
"हो, त्यांचं काय?"
"त्यांचा मुलगा सुमित, पुण्यातच असतो."
"हो माहितेय ना, CA, तोच ना"?
"तोच, ते त्याच्यासाठी विचारत होते तुला, म्हणजे थेट नाही म्हणाले पण मला विचारलं, तुम्ही स्थळ बघताहेत का म्हणून वगैरे? म्हणलं नाही अजून तरी" आई तिच्या कलानं घेत होती.
शलाका ते ऐकून मोबाईल मध्ये बघतच फिस्कन हसली. त्रिशाने तिच्याकडं मान वळवून पाहीलं, पुन्हा सरळ झाली.
"हम्म. बरं झालं तसं सांगितलंस ते" घरी आल्यापासून आता पहिल्यांदा तिला नकुलची आठवण झाली. काल आल्यापासून आपण त्याला एक मेसेजही केला नाहीये!
"पण बघायला काही हरकत नाही असं मला वाटतं"
"आई.. एवढ्यातच नाही हा, बघू नंतर" त्रिशा झोपाळ्यावर उठून बसली." "एक दिवस झाला मला येऊन आणि कटवायच्या गोष्टी काय करते गं?" त्रिशा वैतागत म्हणाली.
" बरं, बंद विषय" आई असं म्हणताच तिने पडून घेतलं.
मोबाईल उघडून पडल्या पडल्याच त्रिशाने नकुलला एक ब्लॅंक मेसेज केला.
त्याचा रिप्लाय आला.
"अच्छा आहेस होय, मला वाटलं गेली बिलीस की काय.."
"नोट मध्ये तुझं नाव ठेऊन जाईन, काळजी नको" तिने हसत हसत पुन्हा मेसेज केला.
शलाका मोबाईल मधूनच डोकं वर काढत तिरक्या नजरेने बघत होती.
"ओके, कोणतं कारण तयार आहे मग कालपासून एक ही मेसेज न करण्याचं" नकुल.
"तू करायचा ना मग एवढं होतं तर... "
"मी तुला टेस्ट करत होतो.."
"मी इकडे आले की मला जगाचा विसर पडतो. हे कारण नाही आणि फॅक्ट आहे.." त्रिशा हसतच होती.
" ओह, म्हणजे ते मिस यु वगैरे खोटं होतं तर.."
"नाही, आता येतेय मला तुझी आठवण..."
त्याचा काहीच रिप्लाय आला नाही.
इथे आल्यापासून तिचा सगळ्याच गोष्टींशी कसा संपर्क तुटतो ते पाहून तिलाच हसू येत होतं. आह, ट्रँकिल! म्हणत तिने डोळे मिटून घेतले. परत डोळे उघडून त्याला मेसेज केला.
"ओके, आता मी तुझा विचार करतेय.. आपला म्हणजे.. पावसात पायऱ्यांवर बसलेले आपण.. "
मोबाईल पोटावर ठेऊन डोळे मिटून ती त्यांचे कालचे पावसातले क्षण रिप्ले करायला लागली. अंगणातल्या बदामाची पानं सळसळत होती.
शलाका नजर ठेवूनच होती.
"आई.. , यावर्षी उरकूनच टाकू ताईचं आपण, झालंय वय आता तिचं"
त्रिशाने पडल्या पडल्या खाली पडलेला फांदीचा तुकडा उचलून तिच्याकडे फेकला.

दुसऱ्या दिवशी सकाळी नकुल आईला साखरआंब्यासाठी कैऱ्या किसून देत होता.
"पायल पण आलीये कालच इकडे, काल मी भाजी आणायला बाहेर पडले तेव्हा रस्त्यात भेटली." आई म्हणाली.
"पायल आली? अच्छा."
त्याने किसता किसता बराच उलट सुलट विचार करून पायलला भेटायचं ठरवलं. त्याचं काम झालं की आईला सांगून लगेच तो घराबाहेर पडला आणि पायलला फोन केला. ती डायनिंग टेबल वर बसल्या बसल्या आईशी बोलत सफरचंद खात होती. फोनवर नकुलचं नाव दिसलं की लगेच तिच्या रुम मध्ये आली.
"नकुल? तू कसाकाय फोन केलास आज मला"
"तू आलीस असं कळलं आईकडून. पायल, मला तुला भेटायचंय. कधी जमेल तुला?आत्ता जमेल?"
"का? काय झालं"?
"तुझ्याशी जरा बोलायचंय. आत्ता जमत असेल तर बघ."
"ओके, मी बाहेरच पडणार होते थोड्यावेळाने, निघते आता. कुठे भेटायचं"?
"कॉर्नरवरच्या कॅफेत?"
"चालेल"
"मी तिथंच जाऊन थांबतो मग ठिके? ये तू."

नकुल कॅफेत जाऊन पायल ची वाट पहात बसला. पायल ला सांगितल्यावर तिची काय रिऍक्शन असेल हे माहीत असून त्याला काळजी वाटत होती. पायल इथून पुढे आपल्याशी संबंध ठेवेल की नाही, याचीही त्याला खात्री वाटत नव्हती. पण हे तिला कळायलाच हवं असं त्याला वाटत होतं. त्रिशाला सांगण्यापूर्वीच पायलशी बोलण्याचा योग येईल असं त्याला वाटलं नव्हतं, पण तिला नंतर सांगावंच लागेल तर मग आताच का नाही असा त्याने विचार केला.
पंधरा मिनिटे झाल्यानंतर पायल आली.
"हाय नकुल..कसली इमर्जन्सी आहे इतकी?" पायल तिच्या उत्साही आवाजात म्हणाली.
तिचा चांगला मूड पाहून नकुलने बोलण्याचं रद्द करायचं जवळजवळ ठरवलंच होतं.
"तू ही इथं येणार आहेस हे माहीत नव्हतं, म्हणजे आशिष काही म्हणाला नाही तसं"
वेटरने पायल आलेली पाहून नकुलने सांगून ठेवलेली कॉफीची ऑर्डर आणून दिली.
"मलाच माहीत नव्हतं,खरं म्हणजे. माझे दोन ऑफ पेंडिंग होते, लास्ट मिनिट ला ठरवलं यायचं"
नकुल ने खाली वर मान हलवली.
"पायल, मला तुला दोन गोष्टी सांगायच्या आहेत."
"काय?आणि एवढा सिरीयस का दिसतोयस? सगळं ठीक आहे ना?
"हो" तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला. "तू त्रिशाला भेटलीयेस ना त्या दिवशी?"
"हो, तिचं काय?" आता पायल लक्ष देऊन ऐकायला लागली.
"आय ऍम इनव्हॉल्वड इन हर, म्हणजे आम्ही दोघे ही.."
पायलला आधी आश्चर्य वाटलं. नकुल तिला आता या वेळी असं काही सांगेल हे तिला अपेक्षितच नव्हतं. त्यात त्रिशाबद्दल तर मुळीच नाही. आता तिचा चेहरा पडला. काही क्षण तिने कसलीही रिऍक्शन दिली नाही. नकुल तिचं निरीक्षण करत राहीला. पुढची गोष्ट सांगावी की नाही असा विचार त्याच्या डोक्यात आला.
"ओह, नाईस. सरप्राइजिंग होतं जरा. पण मला आनंद झाला ऐकून. चांगली मुलगी वाटते ती, शांत आहे ना पण जरा" पायल खोट्या उत्साही आवाजात म्हणाली.
नकुल त्यावर काहीच बोलला नाही. पायलला तिचा मूड ऑफ झालेला लपवताना पाहून त्याला वाईट वाटत होतं.
"आणि दुसरी गोष्ट?" तिला आता काहीच ऐकायची इच्छा नव्हती, तरी तिने विचारलं.
"जाउदे, ते नंतर बोलू आपण. विशेष काही नाही." नकुल तिच्याकडे बघत म्हणाला. त्याला स्वतःला आता खूप ताण आला होता.
"नाही, बोल आताच, पुढे आता आपली भेट पुन्हा कधी होईल, सांगता येणार नाही" पायल त्याला बघत म्हणाली.
तेही खरंच होतं.
पायलचं हृदय अजून तोडायचं त्याला जीवावर आलं होतं. पण अखेर मनाशी ठरवत तो म्हणाला.
"तुला तुझी बर्थडे पार्टी आठवतेय? आपण कॉलेजमध्ये होतो, माझं लास्ट इयर होतं. तुझ्या फक्त इथल्या काही मैत्रिणी आणि त्यांच्या आया आल्या होत्या. माझ्याही आईला बोलवलेलं होतं"
पायलला त्या दिवशीचा प्रसंग आठवला.
"हो माझ्या चांगला लक्षात आहे."
"खरंतर" नकुल शब्द गोळा करत म्हणाला." त्या दिवसापासून त्रिशा नव्हती तोपर्यंत माझं पुढे जाऊन तुझ्याबरोबर सेटल व्हायचं जवळजवळ ठरलं होतं"
पुढे नकुलने पायलला पूर्ण गोष्ट सांगितली.
तो जसजसं बोलत होता, तसेतसे पायलच्या चेहऱ्याचे भाव बदलले. उदास झालेली पायल आता हर्ट झाली, चिडली.
"आय ऍम सॉरी, तूलाही हे माहीत असावं म्हणून सांगितलं" शेवट तो एवढंच म्हणाला.
"मला विश्वास बसत नाहीये, तुझ्या प्लॅन साठी तू फक्त माझा वापर करून घेणार होतास. आणि मी तुला प्रपोज करण्याचा विचार करत होते! "
"पायल.."
त्याचं बोलणं न ऐकता पायल खुर्चीतुन ताडकन उठून गेली.
नकुलला हे अपेक्षितच होतं.

दुपारी नकुलला त्रिशाचा कॉल आला.
"एवढा राग? कठीण आहे" त्रिशा म्हणाली.
"नाही, कामात होतो जरा" तो बळच हसत म्हणाला.
त्याचा आवाज ऐकून त्रिशाने त्याला विचारलं
"काय झालंय आवाज वेगळाच येतोय."
"कुठे काय.. मग तू क्लब च काय ठरवलंस्? "
"काहीच नाही! सिरियसली, तू का एवढा उतावीळ आहेस् मला तिकडं नेण्यासाठी?"
"तुझ्यासाठीच! मला माहित आहे, तुझ्यासाठी ग्रेट एक्सपिरियन्स असणार आहे तो, मला तुझ्यासाठी करायचंय हे"
"ठिके ठिके, ठरवलं की सांगते."
नकुल थोडावेळ थांबून म्हणाला,
"त्रिशा, मला हे फोनवर सांगायचं नव्हतं पण.. आय लव यु..
नो धिस ऑलवेज ओके?"
काही तरी झालंय, त्रिशाच्या मनात विचार आला, तो बाजूला सारत ती म्हणाली,
"हो, समोरच सांगायला हवं होतं तू, म्हणजे मला योग्य रिप्लाय देता आला असता." त्रिशा हसून म्हणाली.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 17 - रस्टिक फर्निचर, ऍबस्ट्रॅक्ट ड्रॉईंगस्

नकुल ऑफिसमधून आला. समोरच्या बंद दाराजवळ येऊन त्याने बेल वाजवली. दार मीनाक्षीने उघडलं. ती काही बोलणार तोच त्याने मीनाक्षीला इशाऱ्यानेच "त्रिशा कुठेय?" विचारलं. त्रिशा घरून थेट ऑफिस करून, साल्सा ला दांडी मारून नुकतीच फ्रेश होऊन आईने बरोबर दिलेला चिवडा, लोणचं, पापड बॅगेतून काढून ठेवत होती. मीनाक्षीने नकुल कडे बघत आतल्या दिशेला अंगठ्याचा इशारा केला.
"कोण आहे मीने?" त्रिशाने आतूनच आवाज देऊन विचारलं.
"कोणी नाही, सेल्समन होता, गेला." मीनाक्षीने उत्तर दिलं.
पाठीवरची बॅग हॉलमध्येच टाकत नकुल मांजरीच्या पावलांनी आत गेला. त्रिशा पाठमोरी उभा राहून कपड्यांच्या घड्या घालून कपाटात ठेवत होती. नकुल सावकाश चालत गेला आणि त्रिशाला मागून मिठी मारली. तिच्याच नादात असलेली त्रिशा जोरात दचकली, मग हसून मागे वळाली.
"ओह, मिस्टर सेल्समन.. काय विकायला आणलंय तुम्ही?" ती त्याच्या भोवती हातांचा विळखा घालत म्हणाली.
"हृदय! सिंगल पीस आहे, घेऊन टाका." हृदयावर हात ठेवून नकुल चीजी स्टाईल मध्ये म्हणाला
"सॉरी.. एक आहे आधीच, सध्या गरज नाही, नंतर या!" चेहऱ्यावर खत्रुड भाव आणून म्हणत ती त्याच्यापासून लांब जायला लागली. ती मागे जायला लागली तसं त्याने तिला धरून ओढलं, ती जवळजवळ त्याच्यावर आदळलीच.
"मॅम, मार्केटिंग स्किल्स दाखवण्याची संधी तरी द्या.." म्हणत त्याने तिला जोरदार किस केलं. काही सेकंद तसेच गेले. नंतर त्यातून सावरून त्रिशा हसत म्हणाली.
"ओके, आय ऍम सोल्ड, फुकट तेही!"
दोघे खाली पाय सोडून तिच्या बेड वर बसले.
"मग, कशी झाली होम ट्रिप? घरी जाऊन चांगलंच तूप साखर खाऊन आली दिसतेयस दोन तीन दिवस.." नकुल तिचे गाल ओढत म्हणाला. तिने त्याच्या हातावर चापट मारली.
"मग खाणारच.. " म्हणत त्रिशा तसेच खाली पाय सोडून दोन्ही हात आडवे लांब पसरून बेडवर पडली. "काय छान वाटतं घरी जाऊन आलं की!"
तिला तसं पाहून त्यानेही तसंच पडून तिच्या पसरलेल्या एका हातावर डोकं ठेवलं. तिच्या उंचीला ऍडजस्ट करता करता त्याला अवघडल्यासारखं झालं. ती त्याच्याकडे बघून त्याच्या केसांतून बोटं फिरवू लागली.
"बाय द वे, ते फोनवर काय म्हणालास? लव यु वगैरे? एवढ्या पटकन म्हणशील असं अजिबात वाटलं नव्हतं" ती हसत म्हणाली. "म्हणजे एवढे दिवस थांबू थांबू म्हणत थेट उडी?"
नकुलला पायलची झालेली भेट आणि नंतरची तिची रिऍक्शन आठवली. त्या भेटीपासून नकुलला अस्वस्थ वाटत होतं. त्रिशाला हे कळेल तेव्हा त्रिशाही अशीच वागू शकते असं त्याला नंतर वाटत राहिलं. त्यामुळे त्याने त्याला तिला जी कबुली राईट मोमेंट निवडून द्यायची होती ती न राहवून फोनवर देऊन टाकली होती.
"आता न सांगण्यात मला तरी काही पॉइंट दिसत नाही. पण मी तुला घाई करत नाहीये. मला माझं सांगायचं होतं ते सांगितलं." नकुल हातांची घडी घालत वर सिलिंग कडे पहात म्हणाला. त्रिशा हसली.
" पाच मिनिटं होऊन गेली आणि चक्क तू एकदाही क्लब चा विषय काढला नाहीस, कमाल झाली." ती त्याला टोमणा मारत पुढे म्हणाली.
"तू ठरवलं नाहीयेस असं गृहीत धरून आहे मी."
" हम्म, घरी असताना ठरवलं नाही खरं, पण येताना बस मध्ये ठरवून टाकलं."
"काय?" तो वरच बघत म्हणाला.
"मला वाटतं मी येऊ शकते. कम्फर्ट झोन च्या बाहेर जावं कधीकधी असं कोणीतरी म्हणालं होतं मला मागे." त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
"काय? खरंच?" त्याची एकदम कळी खुलली.
"काय आनंद झालाय! ..सिरियसली नकुल, काय आहे काय तिथे एवढं"
"तुला जे सांगितलं तेच, बाकी अनुभव तू तुझा घेशीलच."
" ओके ओके, मग कधी जायचं आपण..?
"उद्याच.."
" उद्याच? मला वाटलं विकेंड ला वगैरे म्हणशील?
"नोप, उद्याच. आता तू हो म्हणाली आहेस, अजून कारणं सांगायची नाहीत." तो अवघडल्या स्थितीतून जरासा उठत स्वतःच्या हाताने डोक्याला आधार देत तिच्याकडे वळला.
"आय कान्ट वेट.." तिच्याकडे टक लावून पहात म्हणाला.
"काय, क्लबमध्ये जाण्यासाठी?" त्रिशाने मुद्दामच विचारलं.
"कशासाठीच.." म्हणून तो तिच्या जवळ गेला तोच बाहेरून मीनाक्षीने आवाज दिला. आवाज आल्याबरोबर डोळे गच्च मिटून निराश होऊन तो तसाच त्रिशाच्या खांद्यावर डोकं ठेऊन पडला. त्रिशाला हसू आलं.
"गाईज, तुमचं चालू द्या, मी फक्त निरोप सांगायला आलेय की ,नकुल.. तुझा रुममेट तुला शोधतोय."
नकुल उठून बसला.
"ओके, उद्या साडे आठ वाजता.. तयार रहा."
" ठीके, एका अटीवर, मला जर तिथे आत जाताना थोड्या जरी निगेटीव्ह वाईब्ज आल्या तर तिथूनच मागे फिरायचं, ठिके?"
"बरं, सायकीक माते" तो 'काही खरं नाही हिचं' भाव देत उठत म्हणाला.
त्रिशा आता मघाशी नकुल जसा एका हातावर रेलून झोपला होता तशा स्थितीत आली. त्याला जाताना पहात म्हणाली,
"यु लूक सो हॉट इन फॉर्मल्स."
ते ऐकून तो चालता चालता थांबला आणि मागे वळाला.
"वेल, आय नो दॅट! पण हेच जर मी आल्या आल्या म्हणाली असतीस तर? एनिवेज, बाय"
तो निघून गेल्यावर त्रिशा थोडावेळ तशीच पडून राहीली.

दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत त्रिशा आवरून तयार होती. ब्लु जीन्स आणि ब्लॅक टॅंक टॉप वर तिने ब्लॅक नेट टॉप घातलेला होता. बाहेर वर जाणाऱ्या जिन्याच्या पायरीवर एकेक पाय ठेऊन व्हाईट कॅनव्हास शूज च्या लेस बांधत होती.
" साल्सा करणारेस् म्हणजे मी सेनोरीता सारखा लाल फ्रॉक, कानावर लाल फुल बिल एक्स्पेक्ट करत होतो"
डल व्हाईट टी शर्ट, नेव्ही ब्लु जॅकेट आणि आकाशी जीन्स घातलेला नकुल समोरच्या दारातून बाहेर येत म्हणाला.
"फ्रॉक?" त्रिशा सरळ उभा राहत हसायला लागली.
ड्रेस म्हणतात त्याला, ड्रेस"
"ड्रेस हा कॉमन असतो, लाईक सेट. शर्ट, पॅन्ट, टी शर्ट हे सबसेट्स! मॅथस् वाली असून माहीत नाही तुला?" नकुल भूतकाळातला वार परतून लावत म्हणाला. त्रिशाला मागचा संदर्भ आठवून हसू आलं.
"शत्रूसुद्धा एवढं लक्षात ठेवत नाहीत नकुल."
"मी ठेवतो"
दोघे खाली पार्किंग लॉट मध्ये आले. नकुलने त्याची युनिकॉर्न बाहेर काढली.
"माझी अट लक्षात आहे ना?" त्रिशा तिचं स्वेट जॅकेट घालत बाईकवर मागे बसत म्हणाली.
"आधी जावं लागेल पण त्यासाठी तिथे.. " म्हणत नकुलने बाईक स्टार्ट केली.
वाटेत एका मॅकडॉनल्ड मध्ये अर्धा तास घालवत त्यांनी डबल डेकर बर्गर आणि मिल वर ताव मारला. तिथून पुढे अर्धा तास राईड झाल्यानंतर ते गल्लीबोळातून जात एका अंधाऱ्या एरियात आले. ढग आल्यामुळे तिथे अजूनच अंधार वाटत होता. एका बिल्डिंग समोर बऱ्याच बाईक्स, कार्स आणि सायकल सुद्धा पार्क केलेल्या होत्या, तिथेच जागा पाहून त्यांनी त्यांची बाईक पार्क केली. त्या तीन मजली जुनाट बिल्डिंग मध्ये कोणी राहात असावं असं अजिबातच वाटत नव्हतं. तिथल्या रिकाम्या पार्किंग लॉट मध्ये येउन एका स्लोप ने दोघे खाली खाली आले. त्रिशाला ती जागा जरा क्रीपी वाटायला लागली होती. कुठून इथे येण्यासाठी तयार झाले असा विचार करत नकुलचा हात घट्ट धरून ती एकदम अलर्ट अवस्थेत चालत होती.
जशी क्लब ची जागा जवळ येऊ लागली तसा दबक्या म्युजिकचा आणि त्याच्या बेस चा आवाज कानावर येऊ लागला. सकाळच्या वेळी अंधाऱ्या कालव्यातून जात पुन्हा उजेडात खुल्या रस्त्यावर यावं तसा पुढे पुढे गेल्यावर फिकट उजेड दिसायला लागला होता. दोघे अजून पुढे आले तसं जाळीच्या एका उंच भक्कम गेट समोर तेवढाच भक्कम मानव उभा असलेला दिसला.
"काय म्हणतेय तुझी सायकीक पॉवर, जायचंय मागे की आत जायचंय?"
त्रिशा त्या अंधाऱ्या वातावरणाशी जुळवून घेत होती.
"नाही जाऊया आत, आत जाऊन मग ठरवते" नकुल तिच्याकडे बघत मान हलवत हसला.
मोबाईल काढून त्याने त्या भक्कम माणसाला मेसेजमधला एक कोड दाखवला. ते बघून त्याने गेट उघडत आत जाण्याचा मार्ग मोकळा केला. एंटरन्स मध्ये आता म्युजिक चा आवाज वाढला होता. दोघे क्लब च्या मुख्य जागेत आले. तिथल्या भिंती अगदी जुनाट, रंग उडालेल्या होत्या. ठिकठिकाणी ग्लिटरी स्प्रे ने वेगवेगळे जोमेट्रिकल आकार, स्लोगन्स, अगम्य ऍबस्ट्रॅक्ट चित्रे काढलेली होती. पण ती ही कुठेही अस्ताव्यस्त न काढता विशिष्ट अंतराने काढली होती. छताला पिवळट रंग फेकणारे स्ट्रीट लाईट वाटावेत असे जाड पांढऱ्या दोऱ्या अडकवलेले लॅम्प लटकत होते. तसेच काही भिंतीवर पण होते. एरिया रेग्युलर पब्ज पेक्षा लहान होता पण एसी मुळे कोंदट वाटत नव्हता.जास्तीत जास्त चाळीस ते पन्नास लोक असावेत. आत गेल्यावर समोरच बार एरिया होता. क्लब मध्ये जेवढं फर्निचर होतं सगळं रस्टिक आणि वुडन होतं. बाकी सगळीकडे लाईट्स पिवळे, डीम होते, फक्त मधल्या चौकोनी डान्स फ्लोर वर जरा ब्राईट लाईट्स होते, तिथेच एका टोकाला डीजे मन लावून काम करत होता. थोडक्यात एखाद्या आधुनिक आणि मोठ्या फॉरेन ढाब्यावर आल्यासारखं वाटत होतं. नकुल म्हणाला होता तसं जागेला खरोखरच कॅरेक्टर होतं. आत आल्यापासून नकुल अधून मधून त्रिशाचे एक्सप्रेशन्स बघत होता.
"सो, काय मत आहे?" त्याने विचारलं
"इंटरेस्टिंग.. तू म्हणालास तसं वेगळ्या जगात आल्यासारखं वाटलं."
नकुलने यावर हसून प्रतिक्रिया दिली.
दोघे बार काउंटर समोरच्या स्टूल वर जाऊन बसले. काळ्या चकचकीत ड्रेस मधल्या, डोळे भरून काजळ आणि नोज रिंग घातलेल्या बारटेंडर मुलीने नकुलला ओळखीची स्माईल दिली. त्रिशा काउंटर वर कोपर टेकवून दोघांकडे आलटून पालटून बघत होती. त्यांचं 'जिव्हाळ्याचं' बोलून झाल्यावर त्रिशाने भुवया उंचावून नकुलकडे पाहीलं. बिअर आणि लो अल्कोहोल कॉकटेल चे ग्लासेस समोर आल्यानंतर नकुलने बसल्या बसल्या त्याचा स्टूल त्रिशाकडे सरकवला. ती काही म्हणण्याआधी तो म्हणाला.
"आम्ही इथे पूर्वी बऱ्याचदा आलोयत सांगितलंय मी तुला, दीपिका इथली जुनी एम्प्लॉयी आहे."
"हम्म" त्रिशा तिच्याकडे बघत म्हणाली. तिचं नाव नाव दीपिका असेल असं त्रिशाला अजिबात वाटलं नव्हतं.
शब्द नसलेलं म्युजिक चालूच होतं. त्या सगळ्या वातावरणाशी मॅच झालेलं होतं आणि चक्क कर्कश्य ही वाटत नव्हतं. त्रिशाचा मूड आता खुलत चालला होता.
"गोंगाटाबद्दल तू जे सांगितलं होतं तेही एकदम खरं. परफेक्ट आहे उलट, पब्ज सारखं लाऊड नाही आणि रेस्टोरंट सारखं सायलेंट पण नाही. " त्रिशा कॉकटेल सिप करत मागे, इकडे तिकडे बघून म्हणाली.
"आय नो. सो जागा आवडतेय तुला"
"आय थिंक सो!" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
पंधरा वीस मिनिटे त्यांनी एकमेकांशी गप्पा मारण्यात आणि आजूबाजूच्या गर्दीचं निरीक्षण करण्यात घालवली. एकेकटे येऊन अंधारात आपल्याच नादात ड्रिंक करत बसलेले, मित्र मैत्रिणींच्या ग्रुप सोबत आलेले, कोणी फक्त कपल्स- त्यातही नुकतेच प्रेमात पडलेले असल्यासारखे एकमेकांशिवाय दुसरीकडे कुठेही न बघणारे, काही हातात हात घालून बसलेले मुरलेले, काही प्रमाणापेक्षा जास्त कोझी होत चाललेले, काही चालू आहे त्या म्युजिक वर डान्सफ्लोर वर जाऊन नाचत असलेले असे सगळे प्रकार उपलब्ध होते.
तिकडे पाहून त्रिशा नकुल ला म्हणाली,
"तू डान्सर्स बद्दल म्हणाला होता, इथं तर सगळा दम मारो दम क्राऊड दिसतोय."
"अजून दहा मिनिट थांब." नकुल घड्याळात बघत म्हणाला,
त्यांच्या गप्पा पुढे चालू राहिल्या. अचानक म्युजिक मध्ये बदल झाला आणि गर्दीने चिअरफुल आवाज केला तसं दोघांनी एकदम मागे पाहीलं.
"इट्स टाईम, लेट्स गो" नकुल त्रिशाचा हात धरत म्हणाला.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 18 - मिस्टर रोमँटिक

दोघेही तिथून उठून डान्स फ्लोर च्या कडेकडेने गोलाकार उभ्या असलेल्या गर्दीत जाऊन उभे राहीले. नकुलने त्रिशाला त्याच्या पुढे उभी करून तिच्या खांद्यावर हात ठेवले. तिने त्याचे हात मफलर सारखे गळ्याभोवती गुंढाळून घेतले.
म्युजिक पुन्हा बदललं, आता गाणी चालू झाली. आवाज वाढला तसं आत्तापर्यंत असलेलं तिथलं रहस्यमयी, गूढ, गंभीर वातावरण एका क्षणात एनर्जीटिक झालं. एकेक गाणी, फ्युजन्स, मशप सुरू झाले. त्या त्या गाण्याच्या प्रकारानुसार तसे डान्सर्स गर्दीतून बाहेर येऊन डान्सफ्लोअर वर जाऊन परफॉर्मन्स देऊ लागले. त्रिशाने नकुलकडे पाहून 'वॉव' चे एक्सप्रेशन्स दिले. एकच माहोल तयार झाला होता. एकदम नेमक्या वेळेला येऊन बारटेंडर दीपिका ने आग भरलेल्या तीन हिरव्या बिअर बॉटल्स हवेत उडवत आणि झेलत फायर बॉटल जगल चा स्टंट केला. शिट्या, टाळ्या आणि चिअरअप करून गर्दीने तिला अप्रिशिएट केलं.
"वाह, तुझी जुनी मैत्रीण तर टॅलेंटेड निघाली! "
त्रिशा नकुलला म्हणाली.
"माझ्या सगळ्या मैत्रिणी अशाच आहेत." असं नकुल म्हणाला आणि एकदम त्याला पायल ची आठवण झाली. त्याने तो विचार बाजूला सारला.
डान्सर्स गर्दीतून जादू झाल्यासारखे तयार होऊन बाहेर येत होते आणि अडीच तीन मिनिटे परफॉर्म करून पुढच्याला जागा देत होते. ही सगळी माणसं एवढ्या वेळ त्यांच्याबरोबर क्लब मध्ये होती यावर त्रिशाला विश्वासच बसेना. प्रत्येक डान्सर किंवा ग्रुपच्या एन्ट्रीला गर्दी खुलून चिअर अप करत होती. डीजे दोन टोकांच्या म्युजिक ची गाणी एकाला एक जोडून कमाल करत होता. हिप हॉप, फ्री स्टाईल, बेली, ब्रेक यांच्याबरोबर कथक, भरतनाट्यम चे फ्युजन्स आले तेव्हा लोकांनी अजूनच दंगा केला. ओळखीच्या आणि फेमस गाण्यांना थोडा जास्तच रिस्पॉन्स मिळत होता. गाण्याच्या मूडनुसार बदलणारे लाईट्स त्या वातावरणात भर घालत होते. हे परफॉर्मन्सेस अजिबात प्लॅन केलेले नव्हते तरी ते रिहर्स करून बसवलेल्या परफॉर्मन्स पेक्षा स्पेक्ट्याक्युलर होते. नकुल आणि त्रिशा चिअर अप मध्ये आपोआप सामील झाले.
"सिरियसली, मला स्टेप-अप लाईव्ह पाहिल्यासारखा वाटतोय." एक्साईट होऊन मान वर करत त्रिशा नकुलच्या कानात म्हणाली.
"एक्जॅटली." नकुल म्हणाला.
"ऐक, तुझा टाईप कधी येतोय ते लक्ष ठेव आणि घे उडी तू पण" तो पुढे म्हणाला.
त्याचं बोलणं ऐकून ती एकदम डोळे मोठे करत म्हणाली.
"मी? नो नो नो! एवढ्या गर्दीत? शक्यच नाही"
"काय शक्य नाही? कशाला आलोयत मग आपण इथे?" लाऊड म्युजिक मध्ये त्याला तिच्या कानापाशी जाऊन पण ओरडून बोलावं लागत होतं.
" नाही, शक्यच नाही" ती मान हलवत म्हणाली.
तो तिची हनुवटी धरून तिचा चेहरा त्याच्याकडे वळवत म्हणाला.
"बिनधास्त जा, ओके? हे सगळे लोक आपल्यासारखेच आहेत. आणि मी इथे उभा राहून बघतोय तुला, गो मेक अ मेमरी.."
त्रिशा परीक्षेत प्रश्नपत्रिका हातात घेण्याआधी मुलं जसे आपोआप एक दीर्घ श्वास घेतात तसे घेऊ लागली. अखेर तिने मनाची तयारी केली.
एक दोन बाकी राउंड झाले आणि 'लोला लोला' चं ओपनिंग म्युजिक सुरू झालं तसे एकेक लॅटिन डान्सर्स आत येऊ लागले. डीजे ने त्याचे स्किल्स वापरून गाण्यात आणखी बिट्स मिक्स करत त्याचा स्पीड वाढवला.
"माझा टाईप!" म्हणत ती नकुल कडे बघितलं.
"जा, जा!" नकुल तिला खांद्यावर टॅप करत म्हणाला तसं ती बाकी लोकांबरोबर डान्स फ्लोर वर गेली. सगळे मिळून दोन मुलं आणि दोन मुली जमल्या आणि थेट कपल साल्सा सुरू झाला. त्रिशाला क्लास मध्ये कोणत्याही रँडम पार्टनर बरोबर कपल डान्स ची प्रॅक्टिस होतीच. दोन्ही कपल ने आपापल्या पार्टनर्स ना ऍडजस्ट करत डान्स सुरू केला. नकुलने शिटी वाजवून त्रिशाला चिअर अप केलं.
त्याच्याकडे पहात त्रिशाने तिच्या पार्टनर बरोबर डान्स करतच मोठ्ठी एक्सायटेड स्माईल केली. लगेचच ती परफॉर्मन्स मध्ये शिरली. आत्तापर्यंत शिकवलेल्या, बघितलेल्या सगळ्या साल्सा स्टेप्स तिने त्यात वापरून टाकल्या. डान्स करता करता पार्टनर कडून काही नव्या स्टेप्स पण उचलल्या. एवढ्या वेळ भीती दाखवणाऱ्या गर्दीला आता ती एन्जॉय करायला लागली होती. दोन्ही कपल्स मधलं कोओर्डीनेशन आपोआपच झकास जमून आलं होतं. नकुल गाण्यांवर जागच्याजागी मूव्ह होत पूर्ण वेळ चेहऱ्यावर मोठी स्माईल घेऊन तिच्याकडे आश्चर्याने, कौतुकाने पहात होता. एवढ्या लवकर ती एवढी ट्रेन झाली असेल हे त्याला अपेक्षित नव्हतं.
लोला संपून आता 'लायबेरीयन गर्ल' आणि हिंदी 'नशे सी चढगयी' चं मशप वाजू लागलं, तसा डान्सर्स ना अजून उत्साह आला. काही सोलो, काही कपल स्टेप्स करून ,जसा जसा गाण्याचा टेम्पो खाली येऊ लागला, तसं त्यांनी फायनल स्टेप्स करत डान्स संपवला. त्रिशा नकुल कडे पळत येऊन तिच्या जागेवर उभी राहीली.
"सो हॉट अँड ग्रेसफुल...इम्प्रेसड्" नकुल तिच्या कानाजवळ येऊन म्हणाला.
तिने उत्तर म्हणून त्याच्या गालावर किस केलं.
आता परफॉर्मन्स संपले होते. डान्स फ्लोर वर आता सगळेच जमा होऊ लागले. डीजेने आधीच्या कमी लाऊड आवाजात 'मिस्टर रोमांतिक' प्ले केलं. त्याचं ओपनिंग म्युजिक सुरू झालं तसं त्रिशाने नकुलकडे बघत "ओह, आमच्या क्लास मधलं हिट गाणं आहे हे.." म्हणत त्याचा हात धरून त्याला फ्लोर वर आणलं. गाण्याच्या बिट्स वर दोघे बॉल रूम डान्सच्या पोज मध्ये उभा रहात मूव्ह होऊ लागले.
"आय विश, तू माझा साल्सा पार्टनर असायला हवा होतास.."
"ओह, असे लेफ्ट,राईट,टर्न वाले टेक्निकल डान्स माझा टाईप नाही. बेबी ब्रिन्ग इट ऑन, चिकनी चमेली किंवा इश्क तेरा तडपावे लावलं असतं तर मी आग लावली असते इथे!"
"मला आवडेल आग बघायला, लग्नाला वगैरे जाणार असशील तर मला बोलाव."त्रिशा खळखळून हसत म्हणाली.
"डन"
बिट्स फॉलो करत नकुलने मध्येच तिचा हात धरून तिला गोल फिरवलं.
"वाह.. येतं तुला म्हणजे." त्रिशा भुवया उंचावत म्हणाली.
"आजोबा आजींना पण येतं हे आजकाल.." त्रिशा हसली आणि संपत आलेल्या गाण्यावर ती लीप सिंक करू लागली.
"इ मे दिहो आसी, मिस्टर रोमांतिक.." ही ओळ ती त्याच्याकडे बोट दाखवत साल्सा ची हलकीशी हिप मूव्हमेंट करत म्हणाली.
नकुल हसला.
"यु थिंक आय ऍम मिस्टर रोमॅंटिक? " तो खाली तिच्याकडे बघत म्हणाला.
"मला थोडीशी शंका आहे तशी, पण तू प्रुव्ह करू शकतो.."
त्रिशा स्माईल करत म्हणाली.
"ओके, मग हे त्यात काऊंट होतं का ते सांग.."
म्हणत नकुलने एकदम खाली वाकत तिला उचलून घेतलं. आज त्रिशाच्या हार्ट बीट्सना काही आराम नव्हता. ती एकदम सरप्राईज झाली. ती त्यातून बाहेर येण्याआधी त्याने तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला खोलवर किस केलं. तिने तिचे दोन्ही हात त्याच्या गालांवर ठेवत त्याला तसाच रिप्लाय दिला. मागून कुठूनतरी शिट्या आणि टाळ्यांचा आवाज आला तसे ते दोघे हसत त्यातून बाहेर आले, डोक्याला डोकं टेकवून थांबले.
"आय थिंक आय लव यु टु, नकुल ठाकूर" त्रिशा
डान्सफ्लोर च्या ब्राईट लाईट मध्ये कॉफी ब्राऊन दिसणाऱ्या त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाली.
"आय नो." तो तिला पुन्हा हलकंसं किस करत म्हणाला. त्रिशाला आपल्याला काही सांगायचंय ते त्याला पुन्हा आठवलं. त्याचे बदललेले भाव तिला कळू नयेत म्हणून त्याने तिला खाली ठेवलं.
" शंका दूर झाली?" त्याने विचारलं.
"शंभर टक्के! " त्रिशा बुद्धांसारखी हाताची मुद्रा करत म्हणाली.
नकुल एकदम खोटं वैतागत बोलू लागला "इनफ इज इनफ! थांबणे, वाट पाहणे या शब्दांना काही अर्थच ठेवला नाहीये आपण. इन फॅक्ट ,इथून पुढे आपल्यात थांब चा अर्थ बी क्विक असंच समजणार आहे मी! सो हा शब्द वापरताना आता विचार करून वापर.. इफ यु नो व्हॉट आय मिन" पुढचं वाक्य तो तिच्याकडे बघत खोडकर हसत म्हणाला.
तो बोलायला लागला तसं ती हसतच होती.

गाणं संपलं तसं दोघे फ्लोर वरून खाली येऊन ड्रिंक्स चे अजून एक राउंड घेऊन एका भलताच अगम्य आकार असलेल्या रस्टिक टेबलवर खुर्च्यांवर बसले.
"मग, कसं वाटतंय तुला?" नकुल ने तिला विचारलं.
"आह, अमेझिंग. मी डान्स माझ्यासाठी शिकत होते पण असं फ्लोर वर सेंटर ला येऊन, अनोळखी व्यक्तीबरोबर एवढ्या गर्दीसमोर परफॉर्म करेन असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं.अजून हवेतच आहे मी तर. क्रेडिट गोज टू यु! त्रिशा म्हणाली.
"पण तू बिगीनर अजिबातच वाटली नाही मला, यु वर सो कम्फर्टेबल आणि तुला खूप काही येतं त्यातलं"
"आवडणाऱ्या गोष्टी पटकन कॅप्चर होतात." ती म्हणाली.
"बाय द वे, मी आल्यापासून कुठेही क्लब च नाव पाहीलं नाहीये, गेटजवळ पण नाही."
"इललीगल, नो नेम." नकुल म्हणाला. "पण नाव नाही हेच परफेक्ट आहे. नाव मिळालं की जागेची ओळख त्या नावात बंदिस्त होऊन लिमिटेड होऊन जाते."
"सहमत... खूप आवडतो ना तुला हा क्लब?"
"यप, आज मी नेहमीपेक्षा जरा वेगळं एन्जॉय केलं पण. नाहीतर जास्तकरून त्या तिथल्या टेबल वर किंवा बारकाउंटर च्या स्टूल वर मित्रांबरोबर ठाण मांडून असतो." नकुल बोटाने दाखवत म्हणाला.
"पण एवढा छान क्लब त्याचे ओनर लीगल का करत नाहीत? अजून रिस्पॉन्स मिळेल, खासकरून माझ्यासारख्या लोकांकडून."
"बजेट, जागेच्या भानगडी कदाचित. पण थ्रिल हेच मुख्य कारण असावं. तो डीजे पाहिलास ना, तो ओनर्सपैकी एक आहे"
"हो? टॅलेंटेड आहे तो." त्रिशा तिकडे बघत म्हणाली.
गप्पा अशाच चालू राहिल्या. थोडा वेळ झाल्यानंतर नकुल त्रिशाला म्हणाला,
"तुला अजून इथे थांबायचंय? की आपण बाहेर कुठेतरी शांत ठिकाणी जायचं?"
"येस प्लिज, जाऊयात आता. बाहेरच कुठेतरी म्हणजे, मला आताच घरी जाण्याची इच्छा नाहीये."
त्रिशाने एकदा सगळीकडे पाहून घेतलं, तिचे, त्या दोघांचे सगळे क्षण मनातल्या मनात तिने रिप्ले केले. आले होते त्याच वाटेने दोघे तिथून बाहेर पडले.
"मला तुला काही सांगायचंय." बाहेर येताना नकुल त्रिशाला म्हणाला.
क्रमशः

गाणी:
लोला लोला - रिकी मार्टिन
लायबेरीयन गर्ल- मायकल जॅक्सन
मिस्टर रोमँटिक - माईक स्टॅनली

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 19 - सो कॉल्ड ध्येय

"काय?एवढी प्रस्तावना करतोयस म्हणजे काहीतरी विशेष दिसतंय" त्रिशा हसत म्हणाली.
"लेट्स जस्ट गो समव्हेर." नकुल म्हणाला.
त्याने बाईक स्टार्ट करून बाजूला घेतली.
"काही सरप्राईज असेल तर राखून ठेवलं तरी चालेल. एक महिन्यांचा सरप्राईज कोटा भरलाय आता माझा." त्रिशा मागे बसत म्हणाली.
नकुलने काहीच उत्तर न देता बाईक त्या आतल्या एरियातून बाहेर मुख्य रस्त्यावर आणली. एव्हाना साडे अकरा झाले होते. जरा पुढे जाऊन त्याने बाईक फुटपाथला लागून उभ्या असलेल्या एक गाड्याजवळ थांबवली. पांढऱ्या शर्टातले काका डावाने चहाचं आधण ढवळत होते. ते दोघे आत होते तोवर बाहेरच्या जगात पाऊस पडून गेलेला दिसत होता. डांबरी रस्त्याला पडलेल्या छोट्या मोठ्या अमिबा खड्ड्यांत पाणी साठलेलं होतं. काही वाहने, काही त्यांच्यासारखे निशाचर सोडले तर बाकी शांतता होती.
"परफेक्ट" त्रिशा गाड्याकडे बघत म्हणाली. "एसी ने कान बधीर झाले होते माझे."
"आह, कितीतरी दिवसांनंतर या वेळेला मी बाहेर आहे" त्रिशा गोल फिरत आजूबाजूला बघत म्हणाली." असलेच कधी तर प्रवासाच्या निमित्तानेच फक्त!"
नकुल काकांकडून दोन कटिंग घेऊन आला. दोघे चांगली जागा पाहून खाली फुटपाथवरच टेकले. त्रिशा नकुलचं निरीक्षण करत होती. क्लब मधून बाहेर पडल्यापासून ती एकटीच बोलत होती हे तिला कळत होतं.
"आय डोन्ट लाईक धिस नकुल, जेव्हा जेव्हा तू असा शांत असतो, काहीतरी घडलेलं असतं" दोन्ही पंज्यात ग्लास धरून चहाचा घोट घेत त्रिशा म्हणाली.
" त्रिशा, मला तुला बऱ्याच दिवसांपासून काहीतरी सांगायचंय" नकुल म्हणाला.
"सांगशील का आता प्लिज? उगीच टेन्शन देऊ नको मला" ती त्याच्याकडे पाहून टेन्शनमध्ये आलीच होती.
"आपली भेट होण्याआधी मी पायल ला होकार देण्याचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन भविष्यात तिच्याबरोबर सेटलच व्हायचं ठरवलं होतं" तो तिच्या दिशेने लांब कुठेतरी बघत म्हणाला.
"काय? तू तर म्हणाला होतास की तुला तिच्यात इंटरेस्ट नाही म्हणून?" त्रिशा अर्धवट संपलेला ग्लास ठेवत म्हणाली.
"ते खरंच आहे, ती मैत्रिणीच आहे फक्त." नकुल तिच्याकडे बघत म्हणाला.
"ओके, आता अजून घोळ न घालता स्पष्ट सांग. आणि आता ही पायल कुठून आली मध्येच?"
नकुल थेट मुद्द्यावर आला.
"माझं कॉलेज चं लास्ट इयर होतं. पायल पण तेव्हा सुट्टीसाठी घरी होती. तुला मी सांगितलंच होतं की कॉलेज संपलं की मी त्यांच्याकडे जाऊन काम करायचो."
त्रिशाने मान खालीवर डोलवली.
"तर त्या दिवशी पायलचा वाढदिवस होता. पार्टी घरगुतीच होती. तिच्या तिथल्याच काही मैत्रिणी आणि तिच्या आईच्या ओळखीच्या म्हणून त्यांच्या आया एवढ्याच बोलावलेल्या होत्या. एकंदरीत फक्त बायकांचं गेट टुगेदर होतं. आम्ही त्याच गल्लीत राहतो, माझ्या आईची ओळख म्हणून तिलाही बोलावलं होतं. मी तेव्हा खाली दुकानात होतो. गौतम काकांकडे कोणीतरी गेस्ट आले म्हणून त्यांनी चहाचं सांगायला मला वर पाठवलं. मी गेलो तेव्हा पार्टी उरकत आल्याचं दिसत होतं. मी आलेलो काकूंनी पाहीलं होतं की नाही ते माहीत नाही पण मला हा प्रकार दिसला"
नकुल काही क्षण थांबत म्हणाला.
"मला अजूनही याबद्दल बोलायला आवडत नाही."
राग, दुःख असे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर एकत्र दिसत होते.
" त्यांनी माझ्या आईला तिथल्या सगळ्या खरकट्या दिशेस, कप बशा आत नेऊन ठेवायला सांगितलं. मी दोन मिनिटं शॉक झालो, जागेवरच थांबलो. ते सांगणंही अगदी गोड शब्दांत, सहज, पोलाईटली, घरच्या माणसाला मदतीसाठी विचारतो तसं. त्याचा मला आणखीनच राग येत होता.माझी आई म्हणजे आईच. तिने काही एक न बोलता,दाखवता ते सगळं उचललं आणि आत ठेवायला लागली. पायलने त्यावर आक्षेप घेतला, काकूंना सांगायचा प्रयत्न केला. पण काकूंनी तिकडे दुर्लक्ष केलं. आता मला राहवलं नाही म्हणून मी अजून आत गेलो. काकूंनी मला पाहून आईला 'ती भांडी लगेच धुवून ठेवली तरी चालेल' म्हणाल्या. माझा प्रचंड संताप झाला. मी तसाही ओझ्याखाली होतोच, कुठलंही काम करतच होतो. आईने भांडी घासायला सुरुवात केली तसं मी आईला बाजूला करत ते मी करतो म्हणालो. तिने माझं ऐकलंच नाही, मला अडवलं. काय वाईट काम नाहीये हे, करूदेत मला म्हणाली. माझ्यासाठी ते जर एवढं करताहेत तर आपल्याला ही थोडा कमीपणा घेणं भाग आहे असं तिच्या मनात असावं.
"काकूंना मी कधीच आवडत नव्हतो हे मला आधीपासूनच माहीत होतं. माझी एकंदरीत ख्याती पाहून लहानपणापासूनच मी आशिष, पायल मध्ये मिसळलेलं त्यांना अजिबात चालायचं नाही. पण आम्हा मुलांना वेगळं करणं त्यांना शक्य नव्हतं. नंतर काकांनी मला शिक्षणासाठी सपोर्ट करायचं ठरवलं, त्यात आता मी उरलेला दिवस त्यांच्याच घरात असणार होतो. त्यावरून त्यांच्यात किती आणि काय वाद झाले असतील हे मला माहीत नाही, पण काकूंना हे अजिबातच मान्य नव्हतं हे मला कळत होतं"
"मी तिथे जाऊ लागलो, तेव्हापासून त्या माझ्याशी फक्त कामापुरतंच बोलायच्या आणि उरलेल्या वेळेत माझ्याकडे तिरस्काराने पहात असायच्या. तुला मागे म्हणालो तसं, त्या मला त्यांची घरातली कामं पण बऱ्याचदा सांगायच्या. कदाचित मी ते करणार नाही आणि त्यांना काकांजवळ वाढवून माझी तक्रार करता येईल असं वाटत असावं. पण मी कशाला नाही म्हणायचं ठरवलेलं होतंच. ट्रस्ट मी, मला या गोष्टीचा कधीच काडीचाही फरक पडला नाही. शिवाय, मला माझ्याबद्दल त्यांचं मत कधी बदलायचं नव्हतं किंवा त्यांच्याकडून कसलं अप्रुवलही नको होतं. पण त्यांनी त्यावरून माझ्या आईचा असा अपमान करायला नको होता. ह्या गोष्टीबद्दल विचार न करणं ही माझ्यासाठी सगळ्यात कठीण गोष्ट होती"

त्रिशाला हे सगळं ऐकून वाईट वाटलं. ती शांत बसून ऐकत राहिली.

"पायलला मी आवडतो हे मला चांगलं माहीत होतं. त्या प्रसंगापासून पायलने कधी स्वतःहून मला विचारलंच तर लगेच हो म्हणून टाकायचं मी ठरवलं. ती मला तसं विचारणार याबद्दल मला खात्री होतीच, उलट मध्ये जेवढा वेळ जाईल तेवढं चांगलंच होतं. मी सेटल झाल्यावर तिच्याशी लग्न करायचं इथपर्यंत ठरवून टाकलं. आपल्या डोळ्यात खुपणारा मुलगा आपल्या मुलीबरोबर पाहून त्यांना किती त्रास होईल याचा विचार करून मला खूप बरं वाटत होतं. अर्थात, आईच्या अपमानावरून मला जेवढा त्रास झाला मानाने त्यांना होणारा त्रास कमीच होता. पायल आशिष नाहीये, तिच्या मेडिकलला जाण्यावरही तिच्या आईचा आक्षेप होता. इथेच राहून जे करता येईल ते कर असं त्यांचं म्हणणं होतं. पायलने बंड केलं. शेवटी त्यांना तिचं ऐकावंच लागलं. पायल माझ्यासाठीसुद्धा घरच्यांशी भांडू शकते हे मला माहित होतं.

पायल हा नको असलेला विषयच आज हेडलाईन झालेला होता आणि त्रिशाला त्याचा मनस्वी राग येत होता.

"पण तू म्हणाला होतास, तू तिला तुझ्याकडून कधीही एनकरेज केलं नाहीस." त्रिशा म्हणाली.
"नाहीच केलं, पण मी तिला दूर ही लोटलं नाही."
"तू असंही म्हणाला होतास की ती तुझी जुनी मैत्रीण आहे आणि म्हणून तुला तिचं मन दुखवायचं नाहीये."
"तेही एक कारण होतंच." नकुल म्हणाला. त्रिशाच्या चेहऱ्यावर धोक्याचं निशाण त्याला दिसायला लागला तसं तो पुढे म्हणाला.
"नंतर तू माझ्या आयुष्यात आलीस आणि मी माझं सो कॉल्ड ध्येय आणि तुझ्यात पूर्ण कन्फ्युज झालो. आधीपासून मी जे थांबू, वाट पाहू म्हणत आलो ते एवढ्यासाठीच. एवढ्या दिवसांपासून मनाने पक्की केलेली गोष्ट एकदम सोडून देणं मला जमत नव्हतं आणि थांबणं ही जमत नव्हतं"
"हे पायलला माहीत आहे?" त्रिशाने विचारलं.
"आधी नव्हतं, आता मी घरी गेलो होतो तेव्हा सगळं सांगितलं."
"पायल तिकडे कशी काय होती तेव्हा?"
"योगायोग."
"तिला जर माहीत नव्हतं तर तुला तिला हे सांगावंसं का वाटलं? तिला दुसरीकडून कळायला मार्ग ही नव्हता, कधीच कळालं नसतं तिला."
"तिला मला आपल्याबद्दलही सांगायचं होतं. एवढे दिवस मी तिला नाही ही म्हणत नव्हतो, हो ही म्हणत नव्हतो, हे तिच्या लक्षात येतच होतं. दोन्ही गोष्टी सांगून मला हा चाप्टर क्लोज करायचा होता.
त्रिशाला ती घरी असताना नकुलने केलेला फोन तिला आठवला. त्याच्या एकेक वाक्यावर ती विचार करत होती.
"आणि आता तू हे मला का सांगतो आहेस? मलाही नसतंच कळालं कधी." आणि तेच चांगलं झालं असतं, त्रिशाला वाटलं.
"तुला सांगण्यामागे हे तुला माहीत असावं एवढाच उद्देश्य होता. एनिवेज पायल तुझ्याही आयुष्यात आलीच होती. ही गोष्ट डोक्यातून कायमची काढून टाकण्यासाठी मला मदतच होणार होती यामुळे."
"आणि पायल मला भेटली नसती तर?"
नकुल विचार करत म्हणाला.
"माहीत नाही, तसा विचारच नाही केला."
त्या दिवशी पायल भेटल्यांनंतर तो नंतर एवढा अस्वस्थ का होता आणि त्रिशाला घालवून द्यायला का बघत होता ते तिला आता कळत होतं.
"पण मग तुझ्या सो कॉल्ड ध्येयाचं काय?" त्रिशा हळूहळू अस्वस्थ होत चालली होती.
"मी ती गोष्ट कधीच विसरू शकत नाही, ना मी साधना समदरियांना त्याबद्दल माफ करू शकत. पण आता मला पायलशी संबंध जोडणं शक्य नाही. त्यावेळी माझ्या आयुष्यात कोणीच नव्हतं म्हणून मी हे ठरवू शकलो." नकुल तिच्याकडे बघत म्हणाला.

त्रिशा एक मोठा श्वास सोडून दोन्ही हात केसांतून फिरवत, हात पुन्हा गुडघ्यावर ठेवून बसली. एकदम कळलेली एवढी सगळी माहीती प्रोसेस करणं तिला कठीण झालं. दिवसभराचं ऑफिस, नंतर क्लब, तिथला एनर्जीटिक वेळ, एसी, थंड ड्रिंकस्, आताचं पाऊस पडून गेल्यानंतरचं कोंदट, दमट वातावरण आणि वर सगळ्यात कहर म्हणजे तिला कधी चुकूनही वाटल्या नव्हत्या अशा गोष्टी तिच्या कानांवर पडल्या होत्या. ती जागेवरून उठली. फुटपाथवर तशाच इकडून तिकडे फेऱ्या मारायला लागली. एव्हाना तीन चार लोकांना चहा सर्व्ह करून काकाही रिकामे झाले होते. तेही तिच्याकडं पहायला लागले.दोनेक फेऱ्या झाल्या तसा नकुल तिच्याजवळ गेला.
"त्रिशा, तू काहीच बोलत नाहीयेस."
"मला काहीच सुचत नाहीये. "
"डोन्ट थिंक नाऊ, आपण निघुया आता.उद्या बोलू."
त्रिशाने एक दोन फेऱ्या अजुन मारल्या. मग सरळ ते बसले होते तिथे गेली, त्यांचे अर्धवट संपलेले दोन्ही ग्लास उचलले, तिची स्लिंग पर्स उचलली आणि गाड्याजवळ गेली. काका आता दिवस संपवण्याच्याच बेतात होते.
"चहा खूप छान होता काका" ग्लास गाड्यावर ठेवत ती म्हणाली. पर्समधून पैसे काढले ,त्यांना दिले. तोवर नकुल तिथे आलाच. तिचा एकंदर राग रंग पाहून तो "इथेच थांब, मी बाईक काढतो." एवढंच म्हणाला.
तो वळाला तसं ती त्याला आवाज देत म्हणाली,
"नकुल, मी रिक्षाने जाण्याचं ठरवलंय,"
"त्रिशा, प्लिज. आलोच मी. " नकुल असं म्हणत पुन्हा वळाला. त्रिशा म्हणाली,
" मला आता या वेळेला एकटीला राहायचंय, या सगळ्या गोष्टींवर नीट विचार करायचाय. तू बरोबर असताना ते अजिबात शक्य नाही. मी जाईन."
"मूर्खासारखं बोलू नको त्रिशा, मी तुला आणलं होतं, पोहोचवून मला माझं काम पूर्ण करू दे." एवढ्या रात्री तिला एकटीला जाऊ देणं त्याला पटत नव्हतं. त्याने तसं म्हणताच तिने त्याच्याकडे रागाने पाहीलं.
"मी मॅनेज करू शकते." ती म्हणाली.
नकुलचं पुढचं वाक्य न ऐकताच ती काकांकडे पहात म्हणाली.
"काका, मला रिक्षा मिळेल का इथे कुठे?"
नकुल पुढे आला.
"तू का ओव्हर रिऍक्ट करतेयस एवढी? तू घरी जाऊन मग विचार करू शकतेस ना?"तो वैतागत म्हणाला.
"सगळं तूच ठरवणार का ?" त्रिशा त्याच्याकडे बघत म्हणाली.
आता तिला अजून पुश करण्यात काहीच अर्थ नव्हता हे त्याला कळलं.
"ठीक आहे. मी पाहतो रिक्षा."
"मी पण येतेय." ती म्हणाली.
दहा मिनिटे दोघे काहीच न बोलता रिक्षा शोधत राहिले. शेवटी त्यांना रिक्षा मिळाली, त्यातही ठिकाण संगितल्यावर त्याच्याशी हुज्जत घालावी लागली. सगळं ठरल्यावर ती रिक्षात बसली.रिक्षावाल्याला चालू करायला सांगून नकुलकडे बघत "बाय" एवढंच म्हणाली.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 20- ट्रस्ट इश्यूज

त्रिशा रात्री घरी पोहोचली आणि थेट झोपली. दुसऱ्या दिवशी आठवडाभरासाठी सेट केलेल्या साडे पाचच्या अलार्मनेच तिला जाग आली. तिला उठावसं तर वाटतंच नव्हतं उलट आज इमेल करून सिक लिव्ह टाकावी असं वाटत होतं. ती बेडवर उठून बसली , मोबाईलवर इमेल टाईप करायला लागली. पुन्हा थांबली. ऑफिसला दांडी मारून काय होणार आहे? मला या सगळ्या प्रकारात स्ट्रॉंग राहण्याची गरज आहे. त्यासाठी अशा बारीक बारीक वुलनरेबल क्षणांना हरवावं लागेल. मनाशी म्हणत तिने इमेल पुन्हा खोडून टाकला. कशालाच दांडी मारायची नाही, असा विचार करून अंगावरचं पांघरून झर्रकन बाजूला केलं. ब्रश करून टेरेस मध्ये एक्सरसाईझ करायला गेली. व्यायाम करताना तिच्या मधूनच मुव्ह्ज चुकत होत्या, बॅलन्स जात होता. दोन मिनिटे ब्रेक घेऊन तिने पुन्हा चालू केलं.
एक्सरसाईझ झाली, अंघोळ करून तिचा डबा करून घेतला. नेहमीप्रमाणे मीनक्षीला हलवून ती दाराबाहेर पडली.
नकुल दारात उभा असेल असं तिला अपेक्षित होतं, पण तो नव्हता. काल आपल्याला तो बरोबरही नको होता तरीही आपण त्याला इथे एक्सपेक्ट करतो आहोत! तिला स्वतःचाच राग आला. आधीपासूनच त्याच्या प्रभावाखाली न येता खरोखर सावकाश सगळ्या गोष्टी होऊ दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती असं तिला वाटत होतं. कालच्या नकुलने सांगितलेल्या गोष्टींनंतर वेगळाच नकुल तिच्या पुढे उभा राहीला होता. पण ती त्याच्याशी अबोला धरणार नव्हती, तिला त्याच्याशी अजून बोलायचं होतं. ह्या गोष्टी एकट्याने एकाच बाजूने विचार करून सुटणाऱ्या नाहीत, हे तिला समजत होतं. काल रिक्षात बसून तिला एकटीला त्यावर विचार करायचा आहे असं जरी ती म्हणालेली असली तरी घरी येईपर्यंत ती अक्षरशः मंद होऊन बसली होती. कसलाही विचार तिने केला नाही. रिक्षात मुद्दाम दाराजवळ बसली, इंजिनच्या त्या ठराविक आवाजाशी सिंक होत, बाहेरून चेहऱ्याला, अंगाला लागणारं गार वारं घेत ती डोळे मिटून बसून राहिली होती. रिक्षा कधीच थांबू नये असं तिला वाटत होतं.

ती चालत स्टॉपपर्यंत पोहोचली, बस मधून ऑफिसला गेली. पूर्ण दिवस यांत्रिकपणे काम करून घालवला. अधून मधून सवयीने ती मोबाईल चेक करत होती. दिवसभरातून त्यांच्यात एखादं तरी युसलेस टेक्स्टिंग होत असे. काहीच नसेल तर ब्लॅंक टेक्स्टिंग तरी.
"हा ब्लॅंक टेक्स्टिंग चा काय प्रकार चालू केला आहेस तू?" एकदा तिने त्याला विचारलं होतं.
" ऍकच्युली, मी 'शोध' लावलाय त्याचा." तो त्याच्या नेहमीचे बढाई मारतानाचे एक्सप्रेशन्स देत म्हणाला.
"म्हणजे ,आता तुझ्याशी बोलण्यासारखं काही नाहीये, माझ्या डोक्यात फक्त तुझा विचार आला आहे, पण त्यातही सांगण्यासारखं काहीच नाहीये, त्याचा अर्थ हा ब्लॅंक टेक्स्ट."
आय मिस हिम! आय मिस हिम सो मच. त्याची स्माईल, त्याचं बोलणं, दिसणं सगळं मिस करतेय मी. कदाचित ही फक्त सवय असेल. मोडायला हवीये ती. पण नाही, एवढ्यात कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचायचं नाहीये. बोलल्याशिवाय नाही.
असे उलटसुलट विचार करत तिने दिवस ढकलला.

नकुलचा दिवस तिच्यापेक्षा वेगळा नव्हता. त्याचं एक ओझं कमी होऊन नवीन ओझं तयार झालं होतं. तो तिथे रहायला आल्यापासून त्रिशा आणि तो दिवसातून एकदाही भेटले नाहीत असं झालं नव्हतं. पण आता त्रिशाचं 'मला एकटीला रहायचंय' हे त्याने मनावर घेतलं होतं. काहीही झालं तरी कालच्या बाबत ती जो विचार करत असेल त्यात तिला राहू द्यावं. तिला जेव्हा स्वतः बोलायचं असेल तेव्हाच बोलायचं असं त्याने ठरवलं होतं. यावेळी थांब म्हणजे थांबच. काल क्लब मध्ये त्याने उलटे अर्थ ठरवलेले आठवून त्याला हसू आलं. आय होप, याचा लवकर निकाल लागावा, त्याने विचार केला. आय होप समदरिया आणि ती या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत हे तिला कळावं.

रात्री जेवण झाल्यावर त्रिशा खाली फिरायला गेली. तिने बोलून प्रश्न सोडवण्याचं ठरवलेलं होतंच, ती आता तयार होती. खालून वर आल्यानंतर तिने नकुलला ' वॉन्ट टू टॉक' असा मेसेज केला.
काही सेकंदानी नकुलने 'घरात ये' असा रिप्लाय केला.
ती दारातच होती, तिने बेल वाजवली. नकुलने दार उघडलं. तो दिसला तेव्हा एखाद्या लांबच्या एकट्या प्रवासानंतर आपल्या घरी आल्यावर वाटतं तसं तिला वाटलं. काही क्षण ती त्याच्याकडं तसंच बघत राहीली.
"आत ये." तो म्हणाला.
तिच्या मागे दार जरासं ढकलून देत ती आत गेली. सोफ्यावर एकेका हाताला टेकून एकमेकांकडे तोंड करून दोघे बसले.
"आशिष?' तिने विचारलं.
"तो जरा बाहेर गेलाय. म्हणूनच तुला इथे बोलावलं." नकुल म्हणाला. नकुलचा आवाज कालसारखाच डाऊन होता.
"खरंतर मी कालच्या बाबत कसलाच विचार केला नाहीये. मला थेट तुझ्याशिच बोलायचं होतं." ती म्हणाली.
"हम्म"
"तो प्रसंग ऐकून मला खूप वाईट वाटलं. खरंच, पायलची आई तुझ्या आईबरोबर जे काही वागली ते खूप चुकीचं होतं. तुझ्या फिलिंग्ज, राग ही मी समजू शकते."
ती पुढे म्हणाली.
"पण या सगळ्यात तू जिला तुझी चांगली, जुनी मैत्रीण मानतो त्या पायल चा काय दोष होता? पायल चा विषय निघालेला मला अजिबात आवडत नाही, लेट मी कन्फेस, आय ऍम जेलस ऑफ हर. जेव्हा तू तिच्याबद्दल बोलतो ते मला अजिबात सहन होत नाही. पण काल तू जे मला सांगितलं तेव्हापासून माझ्या डोक्यातुन ती जातच नाहीये. तू तिच्या भावनांचा वापर तुझ्या रिवेंज साठी कसाकाय करून घेऊ शकतो हे माझ्या अगदी डोक्याबाहेरचं आहे. तुला एकदाही आपण तिच्याबरोबर चुकीचं करतोय असं वाटलं नाही? आणि तुला तिच्यात इंटरेस्ट नसताना तू स्वतच्याही पूर्ण आयुष्याचं प्लॅनिंग करून बसला होतास? कसं करावं वाटलं तुला हे.?
नकुल तिचं सगळं बोलून झाल्यानंतर शांतपणे म्हणाला.
"फर्स्ट ऑफ ऑल, तुला जे वाईट वाटलं तू म्हणते आहेस हे म्हणजे एखादा दुःखी सिनेमा, डॉक्युमेंट्री, बातमी किंवा कोणा अनोळखी माणसाबरोबर काहीतरी वाईट घडलं की आपल्याला जसं वाटतं तसं आहे"
त्रिशाला हे पटलं नाही, त्याचं बोलणं तोडत ती काहीतरी म्हणणार, तेवढ्यात नकुल तिला थांबवत बोलायला लागला.
"नो, मला माहितीये हे तुला मान्य होणार नाही अँड आय गेट इट. ज्याच्यावर, ज्याच्या जवळच्या माणसावर परिस्थिती येते त्यालाच याची इंटेंसिटी जाणवते, त्यात बाकी लोकांचा दोष नाहीये. पायलचा मी युज करत होतो हे मी अमान्य करत नाहीये. पण मी तिच्याशी लग्न करून सेटल होणार असं ही म्हणालो. मला फक्त रिवेंज च घ्यायचा असता तर मी इतकी वर्षे तिने स्टँड घ्यावा म्हणून का थांबलो असतो? काही काळापुरता तिचा बॉयफ्रेंड होऊन, तिच्या घरच्यांना दाखवून माझा प्लॅन पूर्ण झाला की त्यातून मोकळा झालो असतो. पण मी इतका वाईट वागूच शकत नाही, ठरवूनसुद्धा. ती माझी मैत्रीण आहे त्याची जाण आहे मला. इन केस आमचं रिलेशन असतं तर मी तिचा वापर करून तिला अबँडन करणार नव्हतो. साउंडस् रिडीक्यूलस राईट? " तो त्रिशाचा चेहरा वाचत म्हणाला. "पण हे असं होतं. त्यासाठी मी मध्ये जेवढा वेळ जाईल, जाऊ देत होतो. मला तिचं आयुष्य मिजरेबल करायचं नव्हतं. राहीला माझा प्रश्न, लोकांची अरेंज मॅरेजेस होतात, तसं माझंही झालं असतं, दॅटस् ऑल. माझ्या आईचा झालेला अपमान माझ्यासाठी इतका महत्वाचा होता."
त्रिशाला ते पटलं नव्हतं.
"थोडक्यात पायलचा वापर करून वर तिच्यावर उपकार करणार होतास तू!" त्रिशा म्हणाली.
"तिला हे कधीच माहीत झालं नसतं. आयुष्यभर बर्डन मलाच राहीलं असतं."
"पायल चा वापर हा मुद्दा तरीही तसाच राहतो."
"ते मी अमान्य करत च नाहीये. कुठेतरी मनाविरुद्ध जाऊन वागावं लागणारच होतं, तरीही तिच्यासाठी जेवढं मला करता येईल तेवढं करायचं मी ठरवलं होतं"
"आणि माझ्याबद्दल? हे सांगण्याआधी क्लब मध्ये येण्यासाठी आग्रह करणं वगैरे, तू तुझ्या नावावर गुड पॉईंट्स वाढवत होतास?"
"ते मी फक्त तुझ्यासाठी केलं. हे सगळं तुला आधी कळालं असतं तर पुन्हा आली असतीस तू माझ्याबरोबर? त्रिशा, तू माझ्या हो ला हो कधीही करणार नाहीस हे मला माहित होतं, तरीही तुला मी सगळं आहे तसं सांगितलं. मला जर फक्त गुड पॉइंट्स वाढवायचे असते तर जे चाललं होतं, तेच चालू दिलं नसतं? "
"तुझा प्रॉब्लेम काय आहे माहीत आहे नकुल? तू एवढं सगळं करून स्वतःला जस्टीफाय करतो आहेस. तू सगळ्यांना सगळं सांगतो आहेस पण तुला स्वतःला त्याबद्दल जराही गिल्ट नाहीये. आणि याचाच मला त्रास होतोय. तुझ्या इतक्या प्रॅक्टिकली मी या गोष्टीकडे पाहू शकत नाही."
"मी गिल्टी का वाटून घ्यायला हवं? हे सगळं चालू त्यांनी केलं, त्यांनी मला असं वागायला भाग पाडलं."
" डोन्ट जस्ट ब्लेम देम. तू तुझ्या बुद्धीने हे सगळं ठरवत होतास. तुझ्यात आणि काकूंत फरक काय राहीला मग? पायलचे बाबा, आशिष या लोकांनी तुला सपोर्ट केला, त्यांचाही विचार तुझ्या डोक्यात आला नाही? "
"त्यांना मी कधीच विसरलो नाहीये. त्यांनी माझ्यासाठी जे केलं, त्याचं कर्ज चुकतं करूसुद्धा त्याची परतफेड झालेली नाहीये. पण मग तुला काय वाटतं मी काहीच करायला नको होतं? घरी जाऊन दोन तीन भांडी आदळलायला हवी होती, आईवर चिडायला हवं होतं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जाऊन काहीच न घडल्यासारखं वागायला हवं होतं? यु नो, तू जशी इथे आली आहेस, तसं तुला फक्त पायल दिसतेय. त्या दिवशी लोकांसमोर एवढा मोठा प्रसंग घडला, पायलने गौतम काकांना हे का सांगितलं नाही? तिने नाही तर त्यांच्या घरात बाकी नोकर माणसं असतात, कुठून न कुठून हे त्यांच्यापर्यंत गेलं नसेल असं तुला वाटतं? तुला काय वाटतं, काकांनी हा विषय कधीच का काढला नसेल? मी त्यांच्या कर्जात होतो म्हणून माझी, माझ्या आईची किंमतच करायला नको?
प्रत्येकजण तिथे जर आपल्या माणसाला पाठीशी घालत होता तर मी माझ्या आईसाठी काही केलं म्हणून मीच गिल्टी वाटून घ्यायला का हवंय?"
त्रिशा यावर गप्प बसली. नकुलच्या या मुद्द्यात कुठेतरी तथ्य होतं. त्रिशाच्या मनात नकुलची एक प्रतिमा तयार झाली होती आणि तो एवढं टोकाचं प्लॉटिंग कसं करू शकतो इथेच ती अडकून बसली होती. त्याच्या दृष्टिकोनातूनही विचार करण्याइतकं तिचं मन व्यापक होत नव्हतं.
" पण आता काय? आता तुझ्यासाठी तुझ्या आईचा अपमान महत्वाचा नाही?"
"माझा नाईलाज झाला त्रिशा. सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. या निर्णयापर्यंत येणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. हे सगळं मी आपल्यासाठी, तुझ्यासाठी सोडून देण्याचं ठरवलं आहे. मला यातून, समदरिया फॅमिलीवरूनच मूव्ह ऑन व्हायचंय, तुझ्याबरोबर तेही."
नकुलच्या कुठल्याच स्पष्टीकरणाने त्रिशाचं सध्या तरी समाधान झालं नव्हतं. तो चुकीचं वागणार होता आणि ते त्याला कळायला हवंय असंच तिच्या मनात पक्कं झालं होतं. अखेर तिच्या मनातला तिला सगळ्यात सतावणारा प्रश्न तिने बोलून दाखवला,
"तू पायलबरोबर जे करायला जाणार होतास, कशावरून तू पुढे माझ्याशी असं वागणार नाहीस्?"
तिचं बोलणं ऐकून नकुल हर्ट झाला. तिचे प्रत्येक प्रश्न झेलून त्यावर आहे ती उत्तरं देण्याचं त्याने ठरवलं होतं. पण हे त्याला सहन झालं नाही. तो उठला तिच्यासमोर येऊन बसला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला,
"क्लिअरली, तुला आता माझ्याबद्दल ट्रस्ट इश्यूज तयार झाले आहेत. पण माझ्याकडेही आता सांगण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. मी जे काही करणार होतो, तो माझ्यातला एक पार्ट होता, त्यामागे काही कारणं होती. ज्या नकुलला तू ओळखतेस, तो ही मीच आहे. यापुढे तू ठरव कोणत्या नकुलला तुला महत्व द्यायचंय. मी त्यात ढवळाढवळ करणार नाही. कारण मी आता सतत तुझ्या समोर नसेनच. मी इथून निघून जाण्याचं ठरवलंय. एवढं सगळं झाल्यानंतर मला आता आशिषबरोबर राहणं जमणार नाही.त्याला कळेल तेव्हा तोच मला इथे राहू देणार नाही."
काहीही घडलं तरी नकुलच्या एकाएकी दूर जाण्याला ती अद्याप तयार नव्हती. हे ऐकून तिला धक्का बसला. तिला अजूनच राग आला. त्याच्या हातातून तिने हात काढून घेतला.
"वाह नकुल, सगळं करायचं, सगळं सांगून मोकळं व्हायचं आणि आता तुम्हीच काय ते ठरवा म्हणून दुसऱ्यांवर गोष्टी सोडून जायच्या. उद्या जर मी सगळं तोडून टाकलं तर तू म्हणायला मोकळा, निर्णय तुझाच होता. बरोबर?" तोडून टाकणं हा विचारही तिच्या मनात अजून आला नव्हता.
"माझ्या प्रत्येक गोष्टीचा उलटा अर्थ घ्यायचा असं ठरवूनच आलीयेस तू आज." नकुलचे पेशन्स आता संपत आले होते." तुला काय वाटतं? या सगळ्याचा मला काहीही फरक पडत नाहीये? इथून निघून जाणं माझ्यासाठी खूप कठीण असणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, तू काहीही ठरव, मी तुला कधीही ब्लेम करणार नाही."
"तुला हक्कच नाहीये तसा." त्रिशा त्याला सोडून द्यायला तयारच नव्हती."
"हो नाहीये हक्क. जे होईल त्याचा ब्लेम माझ्यावर असेल.आय जस्ट होप, तुझा निर्णय आपल्या बाजूने असावा. जे काही झालं, त्यातलं काही एक प्रत्यक्षात घडलं नाहीये एवढं लक्षात ठेव."
"हो, पण ती व्यक्ती तर तूच आहेस ना?"
नकुल त्यावर काहीच बोलला नाही.
"इतक्या सहज तुला यातून बाहेर पडता येणार नाही." त्रिशा उठत म्हणाली.
"मी फक्त जागा सोडतोय त्रिशा." तो म्हणाला.
इथून पुढे काहीच न बोलता त्रिशा तिथून तडक बाहेर पडली.
नकुलला आता आशिषला तोंड द्यायचं होतं.
क्रमशः

Keywords: 

ऐल पैल -21 बु नसल वेदा! (व्हॉट काइंड ऑफ फेअरवेल इज धिस?)

सकाळी त्रिशा ऑफिसला निघण्यासाठी बाहेर पडली तेव्हा समोरचं दार उघडंच होतं. तिने जवळ जाऊन पाहीलं. नकुल त्याच्या बॅग्स एकत्र आणून ठेवत होता. तो जाणार हे तो म्हणाला होता तरी रात्रीतूनच त्याचं ठरेल हे त्रिशाला अजिबातच अपेक्षित नव्हतं. तिला आलेली पाहून त्याने वर पाहीलं.
"तू निघालास? " त्रिशा आश्चर्यचकित होऊन म्हणाली.
बॅगेची चेन लावून तो उभा राहीला.
"हो. तुझीच वाट पहात होतो."
"रात्रीतूनच ठरलं? आशिष म्हणाला तसं? "
" त्याने मला दुसरी जागा सापडेपर्यंतची मुदत दिली. ही इज काइंडेस्ट मॅन. त्याच्याजागी मी असतो तर मला इतकं शांत राहणं जमलं नसतं."
"तुम्ही दोघे जुने मित्र आहात, तो काही वेगळं वागला नाही." त्रिशा म्हणाली.
तू ही असाच वागला असता हे वाक्य त्याच्याकडे बघत तिने मुद्दामच गिळून टाकलं.
त्रिशाला नकळत मध्येच त्याच्या आत डोकावून बघण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं त्याचं निरीक्षण करायची सवय लागली होती. नकुलला ते माहीत होतं. तिचं होईपर्यंत तो पण तसाच तिच्याकडे बघत थांबला. दोघांना आता घाई होती, पण निघावंसं वाटत नव्हतं.
"पण तू एवढ्या ऐन वेळी जाणार कुठे? राहण्याची व्यवस्था?" त्रिशाने विचारलं
"ते मी मॅनेज करू शकतो. माझे भरपूर मित्र आहेत, जागेचा इश्यू नाहीये. मधल्या वेळेत मी दुसरं पर्मनंट ठिकाण शोधेन."
थोडं थांबून तो म्हणाला,
"इश्यू आपल्यात आहे आणि आय होप तो इश्यूच असावा."
तो पुन्हा त्याच्या सामनाकडे गेला. नकुल कालपेक्षा खूपच स्थिर होता. गेले दोन दिवस त्याच्या चेहऱ्यावर जी अनिश्चितता, काळजीचं सावट होतं ते आज पूर्ण हटलेलं होतं. उलट तो आज सगळ्या गोष्टी ताब्यात असल्यासारखा आत्मविश्वासाने वावरत होता.
त्याला स्थिर पाहून त्रिशाचा शांतपणा ढळत होता.
"करूच शकतो तू मॅनेज. नवी जागा, नवे लोक, नवं वातावरण. सगळ्या गोष्टी सोप्या होतील तुझ्या त्याच्यामुळे. उलट आनंदी राहशील तू आणखीनच." त्रिशा उपरोधिक स्वरात म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून तो मागे वळाला.
" तुला काय हवंय नक्की त्रिशा? मी सतत गिल्ट मध्ये, दुःखी दिसावं अशी इच्छा आहे का तुझी?"
"तू स्वतःला गिल्टी मानत नाहीस हे तू काल अगदी स्पष्ट सांगितलं आहेस, मग विषयच मिटला."
"मी सांगितलं पण तुला ते पचत नाहीये बरोबर?" म्हणत तो झपकन तिच्यासमोर आला. "वेल, मी तुला माझी बाजू, माझी कारणं सांगितली आहेत. त्यावर हवा तेवढा विचार कर, एवढं करून जर नाहीच पटलं तर मोकळी हो. डोन्ट वरी, मी तुला ब्लेम करणार नाही, वी आर नॉट मेंट टू बी, असं आपण समजू अणि पुढे जाऊ."
म्हणत तो पुन्हा वळून निघून गेला.
त्रिशाला ते खोलवर लागलं. तिच्या मनात नसताना ती भांडण उकरून काढत होती. काही क्षण तशीच थांबून ती त्याच्या मागे गेली. इतक्या तडकाफडकी त्याला जावं लागताना पाहून तिला वाईट वाटत होतं. या परिस्थितीत त्याला एकट्याला सोडून जाण्याची तिची इच्छा होत नव्हती.
"नकुल, तुला शिफ्टिंग मध्ये काही मदत हवीये? मी ऑफिसला उशिरा जाऊ शकते." मदत केल्याने असं काय होणार आहे, ती स्वतःला समजावत म्हणाली.
तो तिच्याकडे वळाला. तिच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या हृदयाचे तुकडे होताहेत असं त्याला वाटलं. त्याचा मघाशीचा राग एकदम खाली आला.
"नाही. हे बघ, एवढंच सामान आहे माझं." तो त्याच्या कपड्यांच्या दोन मोठ्या बॅग आणि दोन बाकी वस्तूंची मोठी खोकी दाखवत म्हणाला."लिफ्टमधून एकाच फेरीत खाली नेता येईल.आता नेतोच आहे मी खाली सगळं."
"ठीक आहे, या दोन बॅग्ज मी घेऊन जाते. तू बाकी घेऊन ये, तोवर मी कॅब कॉल करते." त्रिशा म्हणाली.
"त्याची गरज नाहीये त्रिशा."
"पत्ता काय टाकू?" ती त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाली.
ती ऐकणारच नाहीये पाहून त्याने पत्ता सांगितला.
खांद्याला अडकवलेली पर्स सांभाळत तिने त्याच्या दोन्ही बॅगज् बंदांना धरून तिच्याकडे ओढल्या. उचलून पाहिल्या, थोड्या जड होत्याच.
तो काहीतरी म्हणणार तेवढ्यात ती म्हणाली.
"काही विशेष नाही, लिफ्ट मध्ये तर न्यायच्या आहेत."
त्याला तिच्याकडे पाहून हसू आलं, तिला आपली मदत करावीशी वाटतेय पाहून भरूनही आलं. ते सगळे विचार त्याने बळच बाजूला केले.
"ठिकेय, चाललीच आहेस तर, " तो त्याची लॅपटॉप ची बॅग आणत म्हणाला. " ही पण घेऊन जा. मी अडकवतो थांब." तिची प्रतिक्रिया न पाहता त्याने तिच्या मागे जाऊन कोट घालायला मदत करतात तशी बॅग तिच्या खांद्याना अडकवून दिली.
" गुड टू गो." बॅगवर एक धपाटा मारत तो म्हणाला. तिला हसू आलं.
ती त्याच्या दोन्ही बॅग उचलत, तोल सांभाळत लिफ्टकडे निघाली.
"डाव्या हातातली बॅग, त्यात इस्त्री केलेले कपडे आहेत, एकदम सरळ ठेव." मागून तो आवाज देत म्हणाला. त्रिशाने ऐकून त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
नंतर नकुल कॅबमधून जाईपर्यंत ती तिथेच थांबली. मागच्या खिडकीतून बाहेर पहात त्याने हात वर करून तिला बाय केलं. ती तसंच बघत राहीली.

संध्याकाळी त्रिशा ऑफिसमधून आली, जिने चढत तिसऱ्या मजल्यावर आली. चप्पल स्टँड समोर उभी राहून एकेक सँडल काढताना तिचं लक्ष समोरच्या दाराकडे गेलं. बऱ्याच दिवसांपूर्वी जेव्हा सुमंत कुटुंब निघून गेलं होती तेव्हा ऑफिसमधून आल्यावर तिला असंच एकटं वाटलं होतं. त्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा परत घडताहेत असं तिला वाटलं. दाराची बेल वाजवताना तिला पुन्हा कायम नॉक करणारा नकुल आठवला. मीनाक्षीने दार उघडलं, नकुल गेल्याचं तिला नंतर कळलं होतं. ती त्रिशाचा मूड तपासू लागली. त्रिशा नेहमीप्रमाणे आल्या आल्या आत जाऊन फ्रेश न होता तशीच पर्स जमिनीवर ठेवून खुर्चीत बसली. तिला पाहून मीनाक्षी ती बसलेल्या खुर्चीच्या हातावर टेकून तिच्या खांद्यावर हात टाकून बसली.
"डोन्ट वरी त्रिशा, तुम्ही सॉल्व्ह करताल हे सगळं."
"मी त्याच्याबाबत शंभर टक्के श्योर नाहीये मीनू. आमच्याबाबतीत कुठलाही निर्णय घेण्याची भीती वाटते आता मला."
"गिव्ह इट टाईम, आताच सगळा विचार करु नको" मीनाक्षी तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
"ऐक, एक छान कल्पना आहे. तू, मी आणि ओम आपण तिघे आज डिनर ला जाऊ."
त्रिशा तिचं ऐकून खुर्चीतून उठत म्हणाली.
"नको मीनू, मला आता बाहेर कुठंच जाण्याची इच्छा नाहीये. खूप कंटाळले आहे मी."
" अहं , उलट तुला बाहेर पडण्याची, माणसांमध्ये मिसळण्याची, गर्दीची, आवाजाची गरज आहे. तुला जे काही डीप, अलोन थिंकिंग करायचंय ते छान भरपेट खाऊन आल्यावर कर ओके? उलट आणखी एनर्जी येईल तुला." मीनाक्षी तिच्या मागे जात म्हणाली.
"प्लिज मीनू, तुम्ही दोघे जा" त्रिशा चेहऱ्यावर पाणी मारत म्हणाली. " तुमची डेट बिघडवायची नाहीये मला."
"हजारवेळा डेट ला जातो आम्ही ठिके? कधीकधी बोलायला सुद्धा विषय नसतो, गप्प बसून खात असतो फक्त. तू आलीस म्हणजे आपल्याला जरा वेगळ्या गप्पा मारता येतील. मी करतेय ओम ला कॉल."
डिनरला निघण्यासाठी मध्ये एक तास शिल्लक होता. तोवर त्रिशाने रोजचे कपडे काढून घेण्यासाठी कपाट उघडलं. सगळ्यात खालच्या एका कप्प्यात कपड्यांच्या शेजारी शेजारी असलेल्या दोन थरांची उंची खालीवर झाली होती. त्रिशाने ते पाहून तो पूर्ण कप्पा बाहेर काढला. नीट असलेल्या घड्या विस्कटून पुन्हा घड्या घालत बसली. मीनक्षीने तिला डिस्टर्ब केले नाही.

डिनर च्या निमित्ताने ओम आणि मीनाक्षीला एकमेकांच्या चुगल्या करायला त्रिशा आयतीच मिळाली होती. मीनाक्षी म्हणाली तसंच झालं. तिचा वेळ नवीन गप्पा, चेष्टा मस्करीत चांगला गेला. पण कुठल्याही कामात, विचारात असताना मागे अस्तित्व जाणवू न देता माणसाचा श्वासोच्छ्वास जसा सुरूच असतो, तसा नकुल चा वावर तिच्या मनांत होता. गेल्या दोन वर्षांपासून एकत्र असणाऱ्या ओम मीनक्षीला पाहून तिला त्यांचं कौतुक वाटलं. इतकं साधं, सरळ, एफर्टलेस रिलेशन आपल्या नशिबात असेल का, त्रिशाला वाटून गेलं. रेस्टॉरंट मधल्या रँडम प्लेलिस्ट मध्ये तुर्की भाषेतलं ' बु नसल वेदा' सुरू झालं तसं ओम, मीनाक्षी आणि आजूबाजूचे आवाजकमी कमी होत जाऊन त्रिशाला कधीतरी गुगल करून पाहिलेले त्याचे इंग्लिश शब्द आठवले.
Believe, I want to believe in you
Explain everything from the beginning
Even if you love again, you must go
I think you are a liar!
What kind, what kind of a farewell is this?

रात्रीचे साडे दहा वाजले होते. नकुल क्लब मध्ये बार काउंटरवर एकटाच बसून आजूबाजूचं निरीक्षण करत होता. तिकडे डान्सर्स चे राउंड सुरू झाल्यामुळे सगळी गर्दी तिकडेच लोटली होती. क्लब म्युजिक आणि गर्दीच्या आवाजाने दणाणून उठला होता. नकुलचा पूर्ण दिवस शिफ्टिंग, ऑफिस आणि नंतर पुन्हा दुसऱ्या जागेचा शोध असा धावपळीत गेला होता. त्यांच्या या परिस्थितीत जास्त इनसेक्युर नकुलच होता. पहिला स्टँड घेण्याचा हक्क त्रिशाला देऊन टाकल्यामुळे तोवर तिच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी तिच्याशी तो कॉन्टॅक्टही करू शकत नव्हता. त्यांची प्रश्नोत्तरे चालू असताना त्रिशा ' तुला यातून सहज बाहेर पडता येणार नाही' असं म्हणाली होती, या वाक्याचा तेवढा त्याला दिलासा होता.
बारटेंडर दीपिका तिचा स्टंट करून पुन्हा तिच्या कामाला लागली होती. नकुलला एकटाच विचारात बसलेला पाहून ती म्हणाली,
"हेय, आज एकटाच? मित्र नाही, गर्लफ्रेंड नाही."
गर्लफ्रेंड ऐकून तो बळच हसला.
"सध्या ते सगळे मला सोडून गेलेत."
दीपिका ला drunk लोकांच्या स्टोरीज ऐकण्याची सवय होती, पण नकुलने आल्यापासून ड्रिंक ला हातही लावला नव्हता.
"यु वॉन्ट समथींग? फ्री..ऑन द हाउस" तिने ग्लास पुसता पुसता सहानुभूतीने विचारलं.
"थँक यु." दीपिकाला हवी असलेली त्याची स्माईल करत तो म्हणाला. "सम अदर टाईम."
म्हणून नकुल पुन्हा गर्दीच्या आवाजाशी समरूप होत त्याच्या विचारात गढून गेला.

नकुल-त्रिशात आता समज-गैरसमजाला जागा राहिली नव्हती. नकुलचा निर्णय आहे तसाच होता. सगळ्या घटना आणि त्यांची कारणं त्रिशालाही आधीच माहीत झालेली होती. आता फक्त त्यावर निष्कर्ष काढणं बाकी होतं, जे त्रिशावर अवलंबून असणार होतं. तोपर्यंत त्यांनी अप्रत्यक्षरित्या ठरवल्याप्रमाणे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचा संपर्क असणार नव्हता.

एका आठवड्यानंतर रात्री नकुलकडून त्याच्या नवीन पर्मनंट जागेचा पत्ता असलेला मेसेज त्रिशाला आला. पत्ता सोडून त्यात दुसरं काहीच नव्हतं. त्रिशाने काहीच रिप्लाय न करता तो सेव्ह करून ठेवला.

बु नसल वेदा गाण्याची लिंक
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 22 - नॉस्टॅल्जीया

नकुलला दुसरीकडे रहायला जाऊन महिना होत आला होता. त्रिशाच्या ऑफिस- साल्सा- घर- नकुल या क्रमाने गोष्टी चालूच होत्या आणि नकुल नंतर पायल चा भाग येऊन गाडी पुन्हा स्क्वेअर वन येत होती. फरक एवढाच होता, त्रिशाला आता त्याचा त्रास होत नव्हता. ही परिस्थिती तिच्या सवयीची झाली होती.
नकुल समोर असताना मनातला राग, कन्फ्युजन, सारासार विचार जाऊन पुन्हा त्याची जागा नकुलच कधी घेत हे तिलाही कळत नसायचं, त्यामुळे संपर्क तोडून टाकणं हा उपाय कामाला आला होता. मनात एक पोकळी घेऊन चाकावर फिरत राहण्याऱ्या उंदरासारखं आयुष्य सतत चालत असून तिथेच रहात होतं.

त्रिशा ऑफिसमधून निघाली. बसमध्ये बसल्या बसल्या तिने सहज पर्सनल इमेल अकाउंट उघडून पाहीलं. इमेल स्क्रोल करत असताना 'रिचा वर्मा' नावाचा इमेल तिने उघडून पाहीला आणि पाहून ती एकदम उडालीच. बऱ्याच दिवसांपासून पेंडिंग असलेला निओलॉग मधला तो इंटरव्ह्यू कॉल होता. तिने तिथेच बसल्या बसल्या तीन दिवसांनंतरची तिची अवेलेबिलिटी कळवून टाकली. त्या इमेलने काही आठवड्यांपासून चाललेल्या तिच्या स्थिर, संथ, अस्वस्थ आयुष्यात थोडीशी excitement आली.
घरी आल्यानंतर जेवण आटोपून लगेचच तिने कपाटातून बेसिक्स ब्रश अप करण्यासाठी म्हणून जुन्या नोट्स, पुस्तके काढली. हॉल मध्ये येऊन खुर्चीत मांडी घालून नोट्स ची पाने चाळू लागली. घरात येतानाच समोरच्या घरातून आज जास्त माणसांचे आवाज येत असल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. नकुल गेल्यापासून तिचा त्या घराशी संबंध तुटला होता. आशिष येता जाता दिसलाच तर फक्त ओळख दाखवणे आणि फॉर्मल चौकशी करणे एवढंच बाकी राहीलं होतं.
बसून तिला कसाबसा अर्धा तास होत नाही तोच समोरून मोठ्याने टिव्हीत चाललेली क्रिकेट कॉमेंट्री, टिव्हीतल्या आणि बाहेरच्या माणसांचा जल्लोष ऐकू येऊ लागला. त्रिशाने दोन तीन वेळा दुर्लक्ष केलं. पण जसं ती थोडंसं एकाग्र होण्याचा प्रयत्न करायची, तसा मोठा आवाज होऊन ते भंग व्हायचं. पाच मिनिटे त्रिशा तशीच बसली. शेवटी न राहवून दार उघडून ती समोरच्या दारासमोर जाऊन थांबली. हो नाही करत तिने बेल वाजवली.
दार उघडले गेले तसा आवाज वाढत गेला आणि समोर पायल येऊन उभा राहीली. त्रिशा एकदम भांबावली. तिच्याच नादात बाहेर आलेल्या पायलचं हसू त्रिशाला पाहून मावळलं.
"ओह, हाय पायल." त्रिशा हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
"हाय."
"तू कधी आलीस इथे?" त्रिशाने अडखळत विचारलं.
"संध्याकाळीच."
"अच्छा."
"मी आशिषला बोलावते." म्हणत पायल तिथून जाण्याचं बघत होती.
"नाही, ठिकेय. मी खरंतर हॉल मध्ये जरा इंटरव्यू साठी प्रिपेर करत बसले होते, खूप मोठा आवाज येत होता, म्हणून सांगायला आले होते." त्रिशा अडखळतच बोलत होती.
"ओह, सॉरी, मी सांगते. माझे कझीन्स पण आहेत त्यामुळे गोंधळ अजूनच वाढला."
"थँक यु." त्रिशा ऑकवर्ड हसत म्हणाली.
"ओके." पायल आत जात दार लावून घेऊ लागली तोच त्रिशाने मनाशी काही ठरवत पुन्हा तिला आवाज दिला.
"तुला दहा पंधरा मिनिटे वेळ आहे? मला जरा बोलायचं होतं."
"माझ्याशी?" पायल पुन्हा बाहेर येत म्हणाली.
"हो. तुला वेळ असेल तर."
" नकुलबद्दल?" पायलने तिच्याकडे रोखून बघत थेट मुद्द्याला हात घातला.
त्रिशा गोंधळली. पायल काही म्हणणार तोच सावरून म्हणाली,
"नाही, तुझ्याबद्दलच."
पायलच्या भुवया आपोआप गोळा झाल्या. तिच्याकडून नकार येणार असल्याचं ओळखून त्रिशा आधीच म्हणाली.
"प्लिज पायल, फक्त दहा मिनिटे."
"ठीक आहे." पायल विचार करत म्हणाली.

घरात येऊन दोघी समोरासमोर बसल्या. बाहेरून टीव्ही आणि जल्लोषाचा आवाज येतच होता.
"नकुलने मला सगळं सांगितलं. तुला अंधारात ठेऊन त्याने परस्पर जे ठरवलं होतं ते मलाही पटलं नाही." त्रिशा म्हणाली.
पायलने खांदे उडवले.
"झालं ते झालं."
"तू कशी आहेस आता?" त्रिशाने विचारलं.
"ओके, म्हणजे काय करू शकते अजून? खूपच अनपेक्षित होतं सगळंच." पायल जेवढ्यास तेवढं बोलत होती.
ती काही सेकंद थांबून पुढे म्हणाली.
"सो, तुमचं कसं चालू आहे? त्याने सांगितलं होतं मला तुमच्याबद्दल." पायलने उगीचच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं.
"नकुल इथून गेल्यापासून आमचा संपर्क नाहीये."
पायलने एकदम त्रिशाकडे पाहीलं.
"काय? हे सगळं घडलं म्हणून?"
त्रिशाने मान खालीवर हलवली.
"त्याने मला ती घटना, त्यामागची कारणं सगळं काही सांगितलं. हे सगळं कळल्यानंतर मला पहिल्यासारखं त्याच्याकडे बघताच येत नाहीये. म्हणून काही दिवस आम्ही असंच चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याने सांगितलं हे चांगलं केलं पण."
"वॉव.. तुमच्यात एवढे कॉम्प्लिकेशन्स तयार होतील असं मला अजिबातच वाटलं नव्हतं." पायल म्हणाली.
त्रिशाने त्यांच्याबद्दल सांगितल्यानंतर पायलला तिच्याशी बोलायला जरा मोकळं वाटायला लागलं. थोडंसं थांबून ती म्हणाली.
"वी गो लॉंग बॅक यु नो. शाळेत असल्यापासून. आम्ही एकत्र खेळलो, मोठे झालो. ममाला तो आमच्यात खेळलेला आवडायचा नाही, त्याचे बाहेर बरेचसे उद्योग चालायचे म्हणून. त्याच्या त्या ग्रुपबद्दल मला मात्र प्रचंड उत्सुकता असायची. त्याच्याकडून मी त्यांच्या सो कॉल्ड अडवेन्व्हचर्स ची सगळी माहिती घेत असायचे."
पायल नॉस्टॅल्जिक होऊन बोलत होती.
" एकदा त्या मुलांनी एक चोरीचं प्रकरण करून ठेवलं होतं, त्यातून त्यांना पैसे ही मिळाले होते. लॉंग स्टोरी." नकुलने मागे त्रिशाला हे सांगितलं होतं ते तिला आठवलं.
"ते तर माझ्यासाठी खूपच थ्रिलिंग होतं. त्याला मी सहज म्हणाले, मला पण आवडलं असतं तुमच्याबरोबर येऊन ते पैसे उडवायला. मी म्हणाले काय, शाळेतून येताना तो मला बरोबर घेऊन गेला. त्याच्या वाटेला त्यातुन जे पैसे आले होते, त्यात आम्ही चोरून मस्त काय काय खाऊन आलो होतो. नंतर पोलीस वगैरे भरपूर लोचे झाले होते. आपण पण त्यात सामील आहोत हे पाहून अजूनच भारी वाटलं होतं मला "
पायल हसत म्हणाली.
"त्याला काही म्हणून दाखवलं, की ते केल्याशिवाय त्याला चैन पडायचं नाही. मागे आम्ही कॉलेजमध्ये होतो तेव्हा गावात रात्री बारा नंतर वेताळ देवळाजवळ एक बाई फिरताना दिसते अशी अफवा होती. ही मुलं तिथे जाऊनही आली होती आणि आम्हाला ती बाई दिसली असं सगळीकडे पसरवून दिलं होतं. एंटर्स पायल! मी आशिषला जाण्याबद्दल म्हणाले, त्याने नेहमीप्रमाणे ते उडवून लावलं. मग मी नकुल ला म्हणाले, काही झालं तरी मला ती बाई पहायचीये. ती सगळी अफवा आहे असं त्याने मला सिक्रेटली सांगितलं पण मला कमीतकमी तिथे जाऊन येण्याची इच्छा होती. बस, म्हणायचा उशीर, मला घेउन जायला तो एका पायावर तयार झाला. आम्ही दोघे प्लॅन करून रात्री घरच्यांना चुकवून दोन किलोमीटर चालत जाऊन तिथे गेलो, थोडावेळ तिथेच थांबलो. त्याला काहीच त्रास नव्हता, पण मी मध्यरात्री माझ्या घरातून चोरून रात्री बाहेर पडतेय , तेही भूत बघायला, हे माझ्यासाठी मोठं अडवेन्चर होतं. झोपलेच नाही मी त्या रात्री! "
त्रिशाने कॉलेजमधल्या पायल-नकुल ला डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. ती साल्सा शिकते हे कळल्यानंतर क्लब मध्ये घेऊन जाण्यासाठी तो किती मागे लागला होता हे तिला आठवलं.
"मला तो आवडायचा त्या मागे कारणं होती यु नो" पायल त्या आठवणींतुन बाहेर येत म्हणाली. "अर्थात, त्याच्या चार्ममुळे मी त्याच्याकडे attract झालेच होते, पण या सगळ्या गोष्टी तो माझ्यासाठी करायचा त्यामुळे मला अगदी स्पेशल वाटत असायचं. सॉरी, मी तुझ्या बॉयफ्रेंड बद्दल बोलतेय, पण आम्ही जास्त जुने आहोत ना? " पायलचा मूड पुन्हा बदलला.
"मग तो प्रसंग घडला आणि आता चार-पाच वर्षांनंतर मला हे सगळं कळालं. केवढी भ्रमात होते मी? खूप कठीण आणि अनबिलिवेबल होतं हे सगळं. "
"मी समजु शकते." त्या प्रसंगावरून पायल नकुलच्या बाजूने काहीतरी बोलेल अशी त्रिशाला अपेक्षा होती. नकुल पायल ने काकांना का सांगितलं नाही आणि काकांपर्यंत ते का गेलं नाही याबद्दल म्हणाला होता, त्रिशाला त्यात आता तथ्य वाटत होतं.
ती पुढे म्हणाली,
"मला तुझ्याशी त्यामुळेच एकदा बोलायचं होतं. आशिषकडून तुझा नंबर घ्यावा असं मला कित्येकदा वाटलं पण कुठलं कारण सांगावं हे कळलं नाही. त्यात यामध्ये तुमचा फॅमिली मॅटर ही गुंतलेला होता, त्यामुळे तुमच्याकडे तो विषय काढायला मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं. "
" नकुलने त्यानंतर मला दोन वेळा कॉल केला पण मी उचलला नाही. एवढ्यात मी पुन्हा त्याच्याशी बोलेन असं नाही वाटत मला." पायल म्हणाली.
"हम्म" त्रिशा त्यावर विचार करत एवढंच म्हणाली. "थँक्स पायल. तुझ्याशी बोलून मला खूप बरं वाटलं. हे सगळं तुझ्यासाठी खूप मोठं आहे पण सगळं विसरून जा एवढच म्हणेन मी." हे म्हणणं किती सोपं आहे, ती मनाशी म्हणाली.
" मीही तुला हेच सांगेन. अर्थात तुझा, तुम्हा दोघांचा निर्णय." पायलला त्या दोघांचा एकत्र उल्लेख करायला जड जात होतं. ती उठली.
"ओके, मी जाते आता. माझे भाऊ म्हणतील कुठे गायब झाली अचानक."
"ओके, भेटू पुन्हा." त्रिशा म्हणाली
पायल घरात गेली त्यानंतर काही सेकंदांनी टीव्हीचा आवाज कमी झाला. सगळ्या गोष्टींवर विचार करून त्रिशा पुन्हा नोट्स चाळायला लागली. नकुल आणि पायल दोघांकडे पहायला तिला वेगळा दृष्टिकोन मिळाला होता.
.............

"Congratulations and welcome to the organization! You will get an email from HR for further details."
"Thank you." म्हणत त्रिशाने स्माईल करत मॅनेजर बरोबर हात मिळवला. एकाच वेळी तिला जड आणि हलकं दोन्ही वाटत होतं. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आज मै उपर फिलींग घेऊन धडाधड पायऱ्या उतरत ती खाली आली. आल्याबरोबर तिने मीनाक्षीला कॉल केला.
"मीनू, सिलेक्शन झालं! " फोन उचलल्याबरोबर ती ओरडली.
"येयss पार्टी" तिकडून मीनाक्षी दबक्या आवाजात ओरडली. तिच्या बाजूने माणसांची वर्दळ ऐकू येत होती.
"कधीही , कुठेही." त्रिशा इकडून म्हणाली.
मीनाक्षीशी बोलत ती बिल्डिंग च्या गेट मधून बाहेर पडली. बोलता बोलता तिचं लक्ष समोर गोल करून उभा असलेल्या ग्रुपकडे गेलं. पाठमोरा, खिशात हात घालून उभा असलेला असं ओळखीचं दृश्य तिला दिसलं.
क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 23- भेट

"ओके मीनू, घरी आले की बोलू." त्रिशाने त्याच्याकडे बघत फोन ठेऊन दिला.
ग्रुपमधल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघत ती पुढे आली. जशी ती त्यांच्याजवळ येत होती तसं तिच्या दिशेने तोंड करून उभा असणाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे जाऊ लागलं. त्यांना तसं बघताना पाहून त्यानेही मागे वळून पाहीलं.
त्याला पाहून त्रिशाचा नकळत आ झाला आणि एकदम तोंडावर हात ठेवत ती हसायलाच लागली. तो आश्चर्याने डोळे मोठे करत तिच्याकडे पूर्ण वळून उभा राहीला. ती एवढी का हसतेय ते कळून तोही हसायला लागला. किती दिवसांनी त्याचं आजूबाजूचा आसमंत उजळवून टाकणारं मोठ्ठं हसू तिला दिसलं होतं. त्यावरून बळच नजर हटवून तिने बाकी लोकांकडे पाहीलं.
"सॉरी.." ती हसत हसतच म्हणाली.
"तू जरा बाजूला येतोस?" पुन्हा त्याच्याकडे पहात हसू आवरत म्हणाली. अनपेक्षित भेटीने दोघेही आतून हलून गेले होते. काहीच न बोलता ग्रुपपासून दोघे लांब आले.
"काय झालं हे तुला नकुल?" त्याच्याकडे वळून उभा रहात ती हसत म्हणाली.
नकुलचा नेहमीचा क्रू कट जाऊन केस जरा वाढलेले होते. मुलांचा एरव्ही असतो तसा रेग्युलर हेअर कट तयार झाला होता.
"एवढं हसू येण्यासारखं काही नाहीये. " तिच्या हसण्यावर नकुल रागावत, हसत, थोडासा लाजत म्हणाला.
"आणि तू चक्क लाजतोयस?" म्हणत ती अजूनच हसायला लागली. "अगदीच साधा, सभ्य मुलगा दिसतोयस ! नकुल ला कुठे सोडून आलास?"
ती तसं म्हणल्यावर त्याने चेहऱ्यावरचे सगळे भाव घालवून दिले.
"मला सगळ्यांकडून कॉम्प्लिमेंट्स मिळल्यात उलट." तो मान जरा वर करत म्हणाला.
"अर्थात...मी नाही कुठं म्हणाले." ती त्याच्या डोळ्यांत खोलवर बघत म्हणाली
"नकुल वाटत नाहीयेस्, असं म्हणाले."
चेहऱ्यावर हलकंसं हसू घेऊन ती त्याचा उभा नाजूक चेहरा, कॉफी डोळे, धारदार लांब नाक, पातळ गुलाबीसर ओठ, कान, गळा सगळ्याचे निरीक्षण करू लागली. किती दिवसात तिला तिच्या आवडीचं हे दृश्य दिसलं नव्हतं. आजूबाजूची पर्वा न करता सरळ जाऊन त्याला घट्ट मिठी मारुन त्याच्यात लपून जावं आणि परत कधीच बाहेर येऊ नये असं तिला वाटलं. त्या विचारांनी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती.
तिचं हसू ओसरून ती त्याच्याकडे एकटक बघायला लागली तसा तोही तिचा चेहरा वाचत तिच्या एकेका डोळ्याकडे आलटून पालटून बघत राहिला. त्याच्या घशाला कोरड पडली. नकळत त्याने एक मोठा श्वास घेतला.
"कसा आहेस नकुल?" त्रिशा तसंच एकटक बघत म्हणाली.
तिचं बोलणं ऐकून पापण्या फडफडवत तो भानावर आला.
" कसा दिसतोय?"
" नेहमीसारखाच. चार्मिंग."
तो खाली बघत हसला.
"तू? जरा बारीक झाल्यासारखी वाटतेयस्." तिच्याकडे खालून वर बघत म्हणाला.
"खरंच? हल्ली भरपूर गोड खातेय पण." ती म्हणाली.
"मला सगळ्या गोड गोष्टी वर्ज्य आहेत हल्ली." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
ती ओठ न उघडता हसली. त्याच्या प्रत्येक वाक्याने आणि आवाजाने तिला भरून येत होतं.
"बाय द वे, इथे कसा?" त्रास देणारे विषय बदलत ती म्हणाली.
"हे मी तुला विचारलं पाहीजे. हा माझा एरिया आहे."
"तुझं ऑफिस इथे नाहीये." ती म्हणाली.
" ऑफिस इथून पंधरा मिनिटांवर तर आहे. ते समोरचं सेवन सीज बघतेयस? " तो मागे बघत म्हणाला. "महिन्यातून एकदा तरी आम्ही तिथे जेवायला असतो."
तिने डोकं वर खाली हलवलं.
"इथल्या निओलॉग मध्ये माझा आज फायनल इंटरव्ह्यू होता, सिलेक्ट झाले." ती म्हणाली.
"रियली? Congrats.. " खुश झाल्याचा अभिनय करत त्याने हात पुढे केला. या सगळ्या औपचारिक गोष्टी बोलण्याची त्याला अजिबात इच्छा नव्हती.
तिने हात मिळवला. तो तसाच ओढून त्याला तिला जवळ आणत नेहमीसारखं खोलवर किस करावंसं वाटलं. बळच त्याने हात सोडला, त्याने धरून ठेवलेला हात खाली घेत तिने त्याची मूठ वळवली.
"हे सगळं कुठल्या आनंदात?" ती त्याच्या डोक्याकडे डोळ्यांनीच इशारा करत म्हणाली.
"सहज, बदल म्हणून. डोक्यावर जास्त केस असले म्हणजे उबदार पण वाटतं."
ती खळखळून हसली. ती आपल्यामुळे हसतेय बघून तो स्माईल करत राहिला.
"शर्ट पण नवा दिसतोय." त्याच्या रॉयल ब्लु, ब्लॅक चेक्स असलेल्या फॉर्मल शर्ट कडे पाहत ती म्हणाली.
त्याने शर्ट कडे पाहून परत वर पाहीलं.
"तू कसं ओळखलं?"
"अंदाज." ती खांदे उडवत म्हणाली. "आधी कधीच पाहीला नव्हता."
तो तिला काही म्हणणार तेवढ्यात मागून ग्रुपमधल्या मुलीचा आवाज आला.
"ठाकूर.. येतोएस का? "
तेवढी काही मिनिटे आपण कुठेतरी बाहेर आहोत, आपल्या आजूबाजूला लोक आहेत हे सगळं दोघे विसरून गेले होते. आजूबाजूचं सगळं धूसर झालं होतं. तिच्या आवाजाने दोघे पुन्हा सध्याच्या जगात परत आले.
त्याने एकदा मागे वळून पुन्हा त्रिशाकडे पाहीलं. तिने त्या मुलीकडे पहात भुवया उंचावून पुन्हा सरळ रेषेत आणल्या.
"मला जावं लागेल" नकुल म्हणाला.
"मलाही."
खिशात हात घालून डोकं खाली वर करत दोन पावलं उलटे चालत तो वळाला.
पुढे गेल्यानंतर मागे वळत त्याने तिला बाय केलं. बाईकवर बसल्यानंतर हेल्मेट घालताना त्याने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहीलं. तिने खालच्याखालीच हात उंचावून त्याला प्रतिसाद दिला.

ऑफिसला जातानाच्या प्रवासात इंटरव्ह्यू, सिलेक्शन सगळं काही विसरून ती बसच्या खिडकीला टेकून डोळे मिटून नकुलचा विचार करत राहीली.
भेट होणं किती गरजेचं असतं! लांब राहून विचार स्वच्छ राहात असतील, विचार करायला वेळ मिळत असेल पण नुसतंच विचारांमध्ये किती दिवस एखाद्याला जिवंत ठेवायचं.. आज जर अशी अचानक भेट झाली नसती तर मी स्वतःहून त्याला भेटायचं ठरवलं असतं...? तो म्हणाला असता तर मी गेले असते की पुन्हा तू घाई करतोयस म्हणाले असते...? एवढे दिवस संपर्क तोडून मी काय तीर मारला होता..? पायलशी भेट होइपर्यंत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकले असते का मी..? आणि ती भेटलीच नसती तर हे चक्र असंच सुरू राहीलं असतं... त्याच्या सगळ्या चांगल्या गोष्टी सोडून फक्त त्याची एक अर्धवट चूकच लक्षात ठेवून हळूहळू त्याच्यापासून दूर जात राहिले असते... शेवटी मलाच काही फरक पडला नसता... त्याच्याबद्दल जे नकारात्मक मत बनवून घेतलं होतं, पुढे जाऊन स्वतःला त्याला सोडून दिल्याचं तेच कारण सांगितलं असतं आणि तेच खरं मानत आले असते... आणि त्याचं काय? तो कसलीच तक्रार न करता कधीतरी माझा निर्णय होईल या भरवशावर थांबून आहे...पुढे फक्त त्याची सवय मोडली म्हणून त्याला मी नाही म्हणून सांगितलं असतं तर त्याला काय वाटलं असतं..?
तिने एक मोठा श्वास घेतला.
भेट झाली ते चांगलंच झालं... इतके दिवस रुटीन आपलंसं करत न संपणाऱ्या चक्रात अडकून बसले होते, त्यालाही अडकून ठेवलं होतं... त्याला आज भेटून मला परत कळून चुकलंय की मला तो किती हवा आहे..!

ऑफिसमध्ये उशिरा दिवस सुरू झाल्यामुळे रोजच्या ठराविक तासांचं काम , रिजाईनच्या प्रोसिजर्स मुळे तिला तिथून निघायला उशीर झाला होता. घरी येऊन जेवण आटोपून ती हॉल मधल्या मऊ खुर्चीत, समोरच्या कॉफी टेबल वर पाय ठेऊन, मान मागे टाकून, डोळे मिटून निवांत बसली. आईला नव्या जॉबबद्दल फोन करून सांगायचं ही तिला नको झालं होतं. उद्या सकाळी निघताना सांगेन असा विचार करून ती अजून पसरून बसली.
एखाद्या मिनिटाने टेबल वर ठेवलेला फोन वाजलाच.
"प्लिज नको." ती तशीच डोळे मिटून म्हणाली.
रिंग वाजतच होती. तिने लांब हात करून फोन घेतला. नकुल चं नाव झळकताना पाहून तिचे डोळे टक्क उघडले. खूप वर्षांनंतर स्क्रीनवर नकुल चं नाव दिसतंय असं तिला वाटलं. तिने पटकन हिरवं बटन सरकवलं. हॅलो म्हणण्याच्या आधीच तो बोलायला लागला.
"मला वाटलं होतं तू दिवसभरात मला एखादा कॉल करशील."
त्याचा आवाज शांत आणि गंभीर ऐकू येत होता.
तिचं पुढचं बोलणं तोडत तो पुन्हा बोलला,
"एखादा टेक्स्ट तरी करशील असं वाटलं होतं"
त्याचा तो स्वर ऐकून टेबलवरचे पाय तिने खाली घेतले. ताठ बसली.
"नकुल, मी करणारच होते." काहीच न सुचून ती म्हणाली.
"इनफ... इतके दिवस मी स्वतःला समजावत होतो, काही झालं तरी तुला डिस्टर्ब करायचं नाही. आज आपली भेट झाली, तीही चुकूनच, त्यानंतर तुझ्याकडून आपण नक्की कुठे आहोत याचं काहीतरी स्टेटस मिळेल असं मला वाटलं होतं. एखादं जेस्चर तरी.
क्लिअरली, तू सगळं विसरली आहेस, तुला आता कशाचाच काही फरक पडत नाहीये."
तो न थांबता बोलला.
" नकुल असं नाहीये." ती कळवळून म्हणाली.
" मग कसं? दिवसभरात साधा एक टेक्स्ट ही न करण्याचं कोणतं कारण आहे तुझ्याकडे?"
"मी आज खूप बिझी होते, त्यात रिजाईन वगैरे.."
तो पलीकडून उपरोधिक हसला, तिचं बोलणं थांबलं.
"हेच म्हणतोय मी. तुझं ऑफिस, तुझ्या बाकी पर्सनल गोष्टीच तुझ्यासाठी नेहमी प्रायोरिटी वर आहेत, मी कधीच ओल्ड न्यूज झालोय. मीच इकडे मूर्खासारखा कुठल्यातरी बारीकशा धाग्याला धरून आशा ठेऊन बसलो होतो." तो रागावून बोलत होता.
"नकुल, असा एकही दिवस नव्हता जेव्हा मी तुझा विचार केला नाही. मी ठरवतेय, ट्रस्ट मी! " ती म्हणाली.
"आय ऍम डन त्रिशा. मी खूप कंटाळलोय या सगळ्या अधांतरी गोष्टींना. तुही बाकीच्यांसारखा फक्त स्वतःचा विचार करतेयस. इतके दिवस मला तसं वाटत नव्हतं पण तू मला फक्त गृहीतच धरून होती हे आज व्यवस्थित कळतंय."
तिचं पुढचं बोलणं तोडत तो म्हणाला,
"मला वाटतं मी तुला भरपूर वेळ दिला. तू म्हणतेस तसं महिनाभर विचार करूनही तू अजून कन्फ्युजच असशील तर पुढेही त्याला काही होप्स नाहीयेत. हे संपवलेलंच बरं. हो, तुला ब्लेम ची काळजी आहे ना? मी माझ्याकडूनच आधी तसं सांगतो. इट्स ओव्हर!"
"नकुल, प्लिज.. "
तिचं बोलणं पूर्ण न ऐकताच त्याने फोन ठेऊन दिला.
त्रिशाने नंतर तीन- चार वेळा त्याला फोन केला, प्रत्येक वेळी पूर्ण रिंग वाजून बंद झाला. शेवटी तिला स्वीच्ड ऑफ चं रेकॉर्डिंग ऐकू आलं.

क्रमशः

Keywords: 

लेख: 

ऐल पैल 24 - Sway again! (शेवट)

सकाळी उठल्यानंतर त्रिशाने पुन्हा एकदा नकुल ला कॉल करून पाहिला. उत्तर नाहीच. त्यांचं बोलणं झाल्यापासून ती अस्वस्थ झाली होती. रात्री उशिरा कधीतरी तिचा डोळा लागला आणि दोन तासानेच रोजच्या अलार्म ने तिला जागं केलं. रिजाईन केल्यामुळे पुढचे दोन महिने ऑफीसला दांडी मारणे ही शक्य नव्हते. कपाटातून तिचा ब्लॅक टी शर्ट आणि डेनीम जीन्स काढताना तिला तिच्या क्रोशे जॅकेट चा गोंडा खाली लटकताना दिसला. तिने तेही बाहेर काढून ठेवलं.
नकुल कडून निर्वाणीची वाक्ये आल्यामुळे त्रिशा एकदम खडबडून जागी झाली होती. काहीही करून त्याच्याशी लवकरात लवकर बोलणं गरजेचं होतं. ऑफिसला जाताना बस मध्ये बसल्यावर तिने तिच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवलेला त्याचा पत्ता उघडून पाहीला.

दिवसभर तशीच कामं उरकल्यानंतर निघायला अर्धा तास बाकी राहीला होता. डेस्कवर बसल्या बसल्या ती इकडे तिकडे बघत डाव्या पायाची जोरजोरात हालचाल करत होती, मधूनच घड्याळाकडे बघत होती. मिनिट काटा एकेका तासानंतर सरकतोय असं तिला वाटत होतं.
"इनफ.." स्वतःशीच म्हणत तिची पर्स घेत ती उठली. तिला अशी धडाधड चालताना तिची कलीग बघतच राहिली. कॉर्नरवर जाऊन उभ्या असलेल्या रिक्षांपैकी एका रिक्षात जाऊन बसली.

पंधरा मिनिटांनी रिक्षावाल्याने लँडमार्क पाहून रिक्षा थांबवली. तिथून पुढचा घराचा पत्ता तिने चालता चालता भेटलेल्या माणसाला विचारून घेतला.त्याने सांगितल्याप्रमाणे ती बंगल्यांची रांग असलेल्या एका गल्लीत शिरली. पाट्यांवरची नावं वाचत "श्री. जगन्नाथ गोळे" नाव असलेल्या एका लोखंडी गेटसमोर जाऊन थांबली. गेटवर अडकवलेली अर्धगोल कडी दुसऱ्या बाजूला टाकत एक दार उघडून ती आत गेली. मागे पाहून गेट पुन्हा लोटून दिले. दोन्ही बाजूंनी डोकावत, कानोसा घेत ती हळूहळू चालायला लागली. त्या वाटेच्या दुतर्फा सीताफळ, पेरू, डाळींबाची झाडे होती. घराच्या डाव्या बाजूला पारिजात, आंबा, नारळ असलेली घरगुती छोटीशी बाग होती. बागेच्या कडेकडेने गुलाब, शेवंती, अबोली अशी लहान लहान फुलझाडे होती. पानांच्या आणि फुलांच्या मिश्र सुगंधाने तिला प्रसन्न वाटलं. सात वाजून गेले होते तरी बराच उजेड होता. दोन तीन पायऱ्या चढून तिने दाराची बेल वाजवली.
मरून, छोट्या त्रिकोनांची किनार असलेल्या पिवळ्या कॉटन च्या साडीतल्या एक गोऱ्यापान आजी बाहेर आल्या.
"कोण?" नाकातल्या आवाजात बोलल्या.
" नकुल ठाकूर इथेच राहतो का? मला त्याने हाच पत्ता दिला."
"अगं पण तू कोण?" त्या अजूनच किनऱ्या आवाजात बोलल्या.
"मी त्रिशा. तो अजून आला नसेल ऑफिसातून, मी तोवर बाहेरच थांबते. "
त्रिशा चं नाव ऐकून त्यांना काहीतरी आठवल्यासारखं झालं.
"त्रिशा म्हणजे त्याची गर्लफ्रेंड त्रिशा?" त्यांनी भुवया गोळा करत विचारलं.
गर्लफ्रेंड? त्रिशा आश्चर्याने बघत राहिली.
तेवढ्यात आतून निळा,कॉलर असलेला टी शर्ट आणि बिज बर्म्युडा घातलेले आजोबा बाहेर आले.
"कोण तू?"
त्रिशा बोलण्याआधी आजीच बोलल्या.
"अहो, ही म्हणतेय ही त्रिशा आहे, नकुल ला भेटायचं म्हणतेय."
" तीच का ही?" आजोबा आजींकडे बघत म्हणाले.
"तीच दिसतेय."
त्यांच्या आपापसात काय सूचक खाणाखुणा चालल्या होत्या, त्रिशाला काही कळेना , ती नुसतीच आलटून पालटून दोघांकडे पहात राहिली.
"त्याला अजून अर्धा तास तरी लागेल यायला, तोवर तू इथे घरात थांब. ये." आजोबा म्हणाले.
"नाही नको, मी बाहेर थांबते. तो नक्की कुठे राहतो ते कळेल का?" त्रिशा अवघडत म्हणाली.
"डावीकडच्या बागेतुन वर जिना जातो, तिथेच राहतो तो. बाहेर बसण्यापेक्षा तू आतच बस जरा, चल." आजी आग्रह करत म्हणाल्या.
"बरं,थॅंक्यु आजी."
" काकू, काकू म्हणायचं मला." आत जाता जाता त्या म्हणाल्या.
"ओह,सॉरी." त्रिशा परत अवघडली.

आजी आजोबांनी थोडी इकडची तिकडची चौकशी केली.
नकुल आणि तिच्याबाबत प्रश्न विचारले. त्रिशाने अगदी थोडक्यात , काही वेळेस अगदी हो, नाही अशीच उत्तरं दिली. दोघे जास्तच भोचकपणा करताहेत असं तिला वाटलं. ती जास्त बोलत नाहीये पाहून दोघांनी प्रश्न विचारणे बंद केले.
अर्धा तास झाला, एक तास झाला नकुलचा पत्ता नव्हता. त्रिशाने मध्येच उठून दारापाशी जात त्याला कॉल केला. त्याने उचलला नाही. आजी आजोबांनी टिव्हीत मराठी मालिका लावल्या होत्या. तसे ते प्रेमळ वाटत होते, पण त्रिशाला त्या अनोळखी लोकांमध्ये थांबण्याचा मनस्वी वैताग आला होता. त्यात ते दोघे मधूनच तिचं निरीक्षण करत होते. नकुलच्या ऑफिसबाहेर जाऊन थांबले असते तर बरं झालं असतं तिला वाटलं.
"काकू, मला एक कॉल करायचाय, मी जरा बाहेर जाते." त्रिशा तिथून सटकण्याच्या बेताने म्हणाली.
"बरं." त्या म्हणाल्या.
ती तिथून बाहेर पडली. बाहेर आता पूर्ण अंधार पडला होता. घराच्या बाहेरच्या बाजूने लावलेल्या दिव्यांमुळे दुतर्फा झाडांच्या लांब , तिरप्या सावल्या त्या पायवाटेवर पडल्या होत्या.
तिने तिथेच दोन तीन फेऱ्या मारल्या. फिरताना नकळत ती तिच्या जॅकेट च्या गोंडयांशी खेळत होती. तिच्या लक्षात आल्यावर हसून तिने त्या लोकराच्या दोऱ्यांचं बटरफ्लाय बनवलं.
गेट उघडण्याच्या आवाज आला तसं तिने पटकन मागे बघितलं. एका खांद्यावरची बॅग सांभाळत नकुल गेट लावत मघाशीची अर्धगोल कडी पुन्हा पहिल्या जागेवर टाकत होता. तिने भुवया गोळा करून नीट पाहिलं. त्याचा क्रू कट परत आला होता. सगळं काही ठीक असल्याची खात्री होऊन ती हसली.

तो वळाला आणि समोर त्रिशाला पाहून किंचित थबकला. परत चालायला लागला. तिच्याकडे न बघता तिच्या शेजारून जात तसाच घराच्या डावीकडे वळाला. त्रिशाने त्याला एकदा आवाज दिला, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तशी ती त्याच्या मागे गेली.

तशीच मागे जात तिने जिना चढला. काहीच न बोलता त्याच्या प्रत्येक हालचाली चं निरीक्षण करायला लागली. त्याने शूज काढले, दार उघडलं. आत जाऊन लाईट लावला. किल्ली खिडकीतल्या बाउल मध्ये ठेऊन दिली. आत जाऊन बाहेर आला, खांद्यावर आता बॅग नव्हती. फॉर्मल ग्रे पॅन्टला लावलेल्या ब्राऊन लेदर बेल्ट चं बक्कल मोकळं करून बेल्ट ओढून काढून सोफ्यावर टाकला. ती आपल्याकडे एकटक बघतेय हे त्याला जाणवत होतं. त्याने टक केलेला प्लेन ऑलिव्ह शर्ट बाहेर काढत मोकळा केला, दोन्ही बाह्यांची बटणं काढत त्या कोपरापर्यंत फोल्ड केल्या. ते सगळं दृश्य ती हातांची घडी घालून मन लावून पहात होती.
त्याचं तिच्याकडे लक्ष जाताच ती त्यातून बाहेर आली.
"नकुल.." ती काही म्हणणार तोच तो म्हणाला.
"का आली आहेस तू इथे? "
"तुला भेटायला.." म्हणत ती पुढे येऊ लागली तसा तो पटकन म्हणाला.
"तिथेच थांब, पुढे येण्याची गरज नाहीये. तिथूनच, त्या खुर्चीत बसून काय बोलायचंय ते बोल."
ती अजून जवळ आली की संपलं! त्याला माहीत होतं. ती निमूट खुर्चीत बसली.
"मी कालच जे आहे ते तुला स्पष्ट सांगितलंय." नकुल म्हणाला.
"तुला माझा खूप राग आला आहे , दॅटस् इट. नकुल, मी समजू शकते. मी तुला खरंच कॉल किंवा टेक्स्ट करायला हवा होता."
तिने एकदमच सगळं मान्य करून टाकल्यामुळे त्याला बोलायला काहीच राहिलं नाही. तो आत गेला. बाथरूम मध्ये जाऊन चेहऱ्यावर पाणी मारलं. किचनमध्ये जाऊन कॉफीच्या तयारीला लागला.
थोड्यावेळ कोणीच काही बोललं नाही. त्रिशा आजूबाजूचं निरीक्षण करत बसली.
"आज उशीर झाला तुला.." त्याला आत ऐकू येईल अशा आवाजात म्हणाली.
आतून काहीच आवाज आला नाही.
"ऑफिस? की मित्रांबरोबर?" त्याला बोलतं करण्यासाठी ती मुद्दाम हलकेफुलके विषय काढत होती. तोवर तो कॉफीचे दोन मग घेऊन बाहेर आला. एक मग तिच्या जवळच्या टेबलवर आदळला. कॉफीचे दोन तीन थेंब टेबलवर उडाले. हॉलच्या दुसऱ्या टोकाला सोफ्यावर जाऊन बसला.
"तू पाहुण्यांसारखं वागवणार आहेस का आता मला?" ती म्हणाली. तो शांतच. " बाय द वे काकूंकडे चहा झाला होता माझा"
"फेकून दे मग ती कॉफी." तो पटकन म्हणाला. तिने मग हातात घेतला. कॉफी सिप केली.
"तू सांगितलं नाहीस तुला का उशीर झाला ते."
"दीपिकाबरोबर होतो." तो तिच्याकडे बघत म्हणाला.
क्लब मधली बारटेंडर दीपिका.. तिला आठवलं.
"क्लब मध्ये? एवढ्या लवकर ?"
"बाहेर."
"ओह! का पण?"
"आपल्याला समजून घेणाऱ्या व्यक्तीबरोबर वेळ चांगला जातो."
ते ऐकून त्रिशाने भुवया गोळा केल्या. मग टेबलवर ठेवून ती खुर्चीतून उठली. त्याच्या दिशेने गेली.
"तुला तिथेच थांब म्हणलोय ना मी?"
"आय डोन्ट केअर." म्हणत त्याच्या शेजारी सोफ्यावर अंतर ठेवून बसली.
"नकुल, माझा निर्णय झालाय, काल तुला भेटून ऑफिसला निघाले तेव्हाच मी तिथवर आले होते."
त्याची काहीच प्रतिक्रिया नाही आली.
"तुला सांगून टाकण्याचं मी ठरवलंच होतं. घरी यायला उशीर झाला, नुकतीच सगळं आटोपून बसले होते, तेवढ्यात तुझा कॉल आला आणि तू प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. मला काहीच सुचलं नाही."
"म्हणजे तुझा निर्णय शंभर टक्के झालेलाच नव्हता. " तो कॉफीचा मग खाली ठेवत शांत आवाजात म्हणाला. "कशासाठी एवढा त्रास देतेयस स्वतःला? "
त्याच्या त्या वाक्याकडे दुर्लक्ष करून ती थोडं जवळ सरकून त्याच्याकडे वळून बसली.
"पायल भेटली होती मला."
त्याने तिच्याकडे पाहीलं.
"आशिषकडे आली होती तेव्हा. "
"आशिष कसा आहे?" त्याने तिच्याकडे न पाहता मध्येच विचारलं.
"ठीक. तिला भेटून मला दोन गोष्टी समजल्या" ती पुढे म्हणाली. "एकतर तिला तुझ्याबरोबर, तुझ्या आईबरोबर जे घडलं, त्याबद्दल काहीही सहानुभूती नव्हती. दुसरं, तिच्यापेक्षा तू, तुझी बाजू माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. तिला सहानुभूती दाखवताना काहीही गरज नसताना तू तिला, मला सगळं सांगून टाकलं त्याकडे मी साफ दुर्लक्ष केलं. दुसऱ्यांची काळजी करत तुला दूर केलं. आता नाही, हा, तू असं काही करायला निघालास तर भांडेन जरूर.."
तो ऐकत होता. तिने त्याचा मांडीवर ठेवलेला हात सरळ करून, तिचा हात हातात सरकवून त्याच्या बोटांत बोटे अडकवली. त्याने यावेळी प्रतिसाद दिला.
" झालं ते झालं, ते आपण पुसून टाकू शकत नाही. काल आपण भेटलो तेव्हापासून त्या गोष्टी आता मला महत्वाच्या देखील वाटत नाहीयेत. त्या भूतकाळातल्या अर्धवट गोष्टींमुळे आपल्यात आता जे आहे ते बिघडवायचं नाहीये मला. मलाही मुव्ह ऑन व्हायचंय."
तिने त्याच्या गालावर हात ठेवला.
"नकुल, तुझ्यापासून लांब राहून दुसऱ्यांकडून बरंच जाणून घेतलं तुझ्याबद्दल, आता तुझ्या जवळ राहून जाणून घ्यायचंय."
त्याने काही क्षण तिच्या एकेका डोळ्यांत आलटून पालटून बघितलं.
"तू खूप वाट पहायला लावलीस मला." म्हणत त्याने तिच्या गालावर एक हात ठेवत, तिला अजून जवळ आणत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. तिने हाताने त्याचा शर्ट ओढून धरला. त्याने ओठ हळुहळु आणखी खोलवर नेले.
काही क्षणांनंतर तो बाजूला झाला तसं तिने त्याच्याकडे हसून बघत त्याच्या गालावर किस केलं.
"माय प्रिटी बॉय इज बॅक..." त्याच्या परत आलेल्या क्रू कट कडे पाहात म्हणाली.
"प्रिटी?"तो तोंड वाकडं करत म्हणाला.
"येस प्रिटी..विथ धिस स्माईल अँड प्रिटी हॉट..विथ धिस लूक" ती नजर खाली वर करत म्हणाली.
"प्रिटी कनविंसिंग.. पण ते तर माझ्या नावातच आहे! " तो मान वर करत म्हणाला. "न -कूल"
"ते तुझ्या स्वभावात पण आहे. बाय द वे, हे कधी आणि?" ती त्याच्या शिल्लक आहे तेवढ्या केसांना विस्कटण्याचा असफल प्रयत्न करत म्हणाली. "मी जोरजोरात हसले पाहून त्यानंतर?"
"नाही, मी इट्स ओव्हर म्हणालो त्यानंतर."
ती तशीच मनमोकळी हसली.
"म्हणजे ओव्हर वगैरे नाटकं होती."
"राग अगदी खरा होता. बट इट वर्कड्, डीडन्ट इट? "
त्रिशाने ओठ आवळून मान हलवली.

"तुझ्या त्या आजी कम काकू आणि आजोबांचा काय मॅटर आहे? त्यांना कसं माहीत आपलं?" तिने एकदम आठवत विचारलं.
तो हसायला लागला.
"झाली दिसतेय तुझी भेट. हो त्यांना आजी म्हणलेलं आवडत नाही. फार कूल आहेत पण ते दोघे. आपली सगळी स्टोरी, रोज त्यांच्याकडे माझी एक सहज चक्कर होते तेव्हा माझ्याकडून एपिसोड सांगितल्यासारखी सांगायला लावली होती त्यांनी. त्या निमित्ताने मलाही जुन्या आठवणींमध्ये जाता यायचं." तो म्हणाला.
"ओह, तरीच मला पाहून त्यांच्या इतक्या खाणाखुणा चालल्या होत्या."
"आत्तापर्यंत फक्त तुझं नावच माहीत होतं ना त्यांना."

बोलता बोलता तिच्याकडे हसून पहात त्याने तिच्या बटरफ्लाय ची नॉट घट्ट केली. "हे बांधत असताना पाहीलं मी तुला बाय द वे."
तिने त्याच्या हातावर चापट मारली.
"डोन्ट टच इट, नाजूक आहेत ते."
"मला नाजूक गोष्टींबरोबरही डील करता येतं." तो तसाच हसून म्हणाला.
"रियली? दीपिकाबरोबर काय करत होतास?" त्रिशाने भुवया गोळा करत विचारले.
त्याच्या चेहऱ्यावरचं हसू मावळलं.
"तिची पुन्हा भेट होईल की नाही म्हणून आज भेटलो.."
"का? काय झालं?"
"क्लब बंद झाला."
त्रिशाला हे अगदीच अनपेक्षित होतं.
"काय? कसा काय बंद झाला"?
"इल लीगल! कोणीतरी जाऊन बातमी दिली, बंद करावा लागला. अर्थात ओनर्स काही शांत बसणारे नसतात पण पुन्हा सुरू करण्याच्या आधी बराच काळ जाईल आता."
"मला तुझ्याबरोबर अजून एकदा तरी तिथे जायचं होतं." ती म्हणाली. त्याला तो क्लब किती प्रिय होता हे तिला माहीत होतं. तिने त्याचा हात धरून दाबला.
"दॅटस् फाईन, आय ऍम फाईन. तू आली आहेस ना आता."
एनिवेज, एवढ्या दिवसांत तुझ्या आयुष्यात काय विशेष घडलं?" त्याने विचारलं.
"काहीच नाही. हो, आज माझ्या साल्सा चा शेवटचा दिवस होता, मी गेलेच नाही! पण नो वरीज" ती सोफ्यावरून उठत म्हणाली.
"माझ्याकडे पार्टनर आहे, इथे मी प्रॅक्टिस करू शकते." खाली वाकत तिने नकुलचा हात धरून त्याला उठवलं.
नकुलने लाईट बंद करून टाकला.
"मच बेटर" त्रिशा भुवया उडवत म्हणाली. कॉलनीतल्या स्ट्रीट लाईट चा मंद पिवळसर उजेड खिडकीतून आत येत होता. वाऱ्याने मध्येच झाडांची पाने सळसळत होती.
नकुलने त्याचा अमेझॉन एको लावला, त्याच्या निळ्या हिरव्या लाईट्स चा उजेड मंद उजेडात मिसळून गेला.
जरासा विचार करून ती म्हणाली,
"अलेक्सा प्ले 'स्वे बाय मायकल बबल'."
गाणं सुरू झालं तसं दोघे बॉलरूम डान्स च्या पोज मध्ये उभे राहीले.नकुलने तिचा एक हात वर घेउन खाली वाकत, स्माईल करत तिच्या कपाळावर डोकं टेकवलं. दोघे गाण्याच्या रिदम वर मूव्ह होऊ लागले.
गाण्याची चाल बदलली तशी त्रिशा त्याचा हात धरत लांब जाऊन गाणं लीप सिंक करत साल्सा वॉक करत पुन्हा त्याच्या जवळ आली. तो तिच्याकडे बघतच राहीला. त्याने तिचा हात वर धरून तिला गोल फिरवत तसाच हवेत सोडून दिला. तिचे दोन्ही खांदे धरून तिला काही कळायच्या उलटं चालवत नेऊन सोफ्याच्या हातावर टेकवलं.
"युसलेस.." तिच्या जवळ जाऊन म्हणत क्रोशे जॅकेट च्या बटर फ्लायचा एक पाय धरून हळूच ओढला. तिची स्माईल पूर्ण होण्याआधीच तिच्या ओठांवर ओठ टेकवत तिला या जगातून बाहेर घेऊन गेला....

...........
"बघा, मी म्हणाले होतं ना, तिच येईल म्हणून? काढा शंभर रुपये." खाली आजी आजोबांना म्हणत होत्या."पुढची बेट...येत्या तीन- चार महिन्यात दोघे एंगेजमेंट करतील."
"शक्य च नाही." आजोबा म्हणाले.
"तेही शंभर रुपये आताच देऊन ठेवा मग."
टिव्हीत पुढच्या मालिकेचं शीर्षक गीत सुरू झालं तसा दोघांचा वाद त्यात विरुन गेला...

(समाप्त)

Keywords: 

लेख: