ते एक वर्ष

परवाच वर्तमानपत्रात बातमी वाचली- ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात स्त्रियांची अरेरावी आणि परत एकदा ’ते एक वर्ष’ डोळ्यापुढून तरळून गेलं. ते एक वर्ष जेव्हा मीही पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास केला होता. ते एक वर्ष ज्यामध्ये मला कित्येक अनुभव पहिल्यांदाच मिळाले. ते एक वर्ष जेव्हा ख-या अर्थाने मी स्वत:च्या पायावर उभी राहिले आणि ते एक वर्ष जेव्हा मी एका झॉंबीसारखी जगले. ते एक वर्ष- खूप खूप वर्षांपूर्वीचं, पण अजूनही लख्ख आठवणारं आणि मधूनच ’आता मला लिहून काढ म्हणजे निचरा होईल सगळा’ असा टाहो फोडणारं ते एक वर्ष.

का लिहून काढायचंय ते सगळं? त्यात काही नाट्यपूर्ण आहे का? नाही. काही भयानक आहे का? सुदैवानं नाही. खूप काही भारी आहे का? नाही. मग असं घडलं तरी काय? खरं सांगायचं तर काहीच विशेष नाही. आणि तसं म्हणलं तर खूप काही.

ते एक वर्ष- १

पार्श्वभूमी

परवाच वर्तमानपत्रात बातमी वाचली- ट्रेनच्या पहिल्या वर्गाच्या डब्यात स्त्रियांची अरेरावी आणि परत एकदा ’ते एक वर्ष’ डोळ्यापुढून तरळून गेलं. ते एक वर्ष जेव्हा मीही पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास केला होता. ते एक वर्ष ज्यामध्ये मला कित्येक अनुभव पहिल्यांदाच मिळाले. ते एक वर्ष जेव्हा ख-या अर्थाने मी स्वत:च्या पायावर उभी राहिले आणि ते एक वर्ष जेव्हा मी एका झॉंबीसारखी जगले. ते एक वर्ष- खूप खूप वर्षांपूर्वीचं, पण अजूनही लख्ख आठवणारं आणि मधूनच ’आता मला लिहून काढ म्हणजे निचरा होईल सगळा’ असा टाहो फोडणारं ते एक वर्ष.

का लिहून काढायचंय ते सगळं? त्यात काही नाट्यपूर्ण आहे का? नाही. काही भयानक आहे का? सुदैवानं नाही. खूप काही भारी आहे का? नाही. मग असं घडलं तरी काय? खरं सांगायचं तर काहीच विशेष नाही. आणि तसं म्हणलं तर खूप काही. एका तळ्यातल्या माशाला समुद्रात आणून सोडलं तर त्याचं काय होईल? किंवा सुरक्षित कुंडीतल्या रोपट्याला जंगलात लावलं तर? क्लिशे प्रश्नाचं क्लिशे उत्तर क्रमांक एक की तो मासा किंवा ते रोपटं आधी घाबरेल, भांबावेल आणि मग रुळेल आणि झपाट्याने वाढेल किंवा क्लिशे उत्तर क्रमांक दोन की तो मासा किंवा ते रोपटं तो वेग न झेपून मरून जाईल. पण माझं असं काहीच झालं नाही. मी घाबरलेही नाही, भांबावलेही नाही आणि मेले तर नाहीचे (हेहे!), पण मी केवळ ते अनुभव अंगावर येऊ दिले. ते जगले. त्यातून तेव्हा शिकावं, धडा घ्यावा इतका विचार तेव्हा केला नाही. पण शिकले निश्चित. नाहीतर ते एक वर्ष अजूनही बरोबर चालत राहिलं नसतं.

मला मांडायचेत केवळ अनुभव. मला आलेले. वैयक्तिक. हे युनिव्हर्सल नाहीत. कोणी यातून काही शिकावं असं मुळीच नाही. फार तर मी एक माणूस म्हणून कशी आहे इतकं यातून कळेल. पण तेव्हाही आणि आजही मी ग्रेट नव्हते, नाहीये. तरी का? याचं प्रामाणिक उत्तर खरंच माझ्यापाशी नाही. बस, लिहायचंय. माझ्यासाठी. कदाचित ते वाचणा-यांसाठीही. मी सगळं खरं-खरं लिहू शकेन का? तेव्हा जे जे वाटलं, अनुभवलं, जाणवलं तेते मांडू शकेन का? का आता मॅच्युरिटी आल्यानंतर काही गोष्टी वगळेन, काही लपवेन आणि काही शुगरकोट करेन? मला सगळं आठवतंय- तेव्हा काय झालं होतं, हवा कशी होती, माझा ड्रेस कोणता होता… शप्पथ! तरीही मी जे लिहिणार आहे त्यातल्या ९०% घटना ख-या आहेत. १०% फोडणी आहे. काय खरं आणि काय फोडणी हे सहज समजणार नाही (बहुतेक). हे लिहिता लिहिता कदाचित मी परत स्वत:ला सापडत जाईन. मला वीस वीस वर्षांनी मित्र-मैत्रिणी भेटतात आणि सहज उद्गारतात- तू आहेस तशीच आहेस! हे सुखावणारं असतं यात वादच नाही. पण शारीरिक ठेवण आहे तशी आहे, यापेक्षाही मी माझ्यातला साधेपणा जपून ठेवू शकले आहे, माझं भाबडेपण, निरागसपण, कदाचित मूर्खपणही- हे मला जास्त सुखावणारं वाटतं. त्या महत्त्वाच्या एका वर्षानंतरही ते बदललं नाही याचंच मला जास्त अप्रूप! तर खूप झालं इन्ट्रो पुराण. आता वेळ कसोटीची…

****
Disclaimer- Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष- २

मुंबईत दाखल!

माझं पदवी, पद्व्युत्तर आणि व्यावसायिक शिक्षण अगदी सुरळीतपणे पार पडलं. पण बरंच काही सुरळीत पार पडलं की धक्के बसणं नैसर्गिक न्यायाचं असतं. त्या अनुसार शिक्षण झाल्यानंतर टक्केटोणपे खायला सुरूवात झाली. नोकरीचा शोध. जिथे इन्टर्नशिप केली होती, तिथून नकार आला. हे म्हणजे सर्व सोय बघून शेजारच्या बालमित्राबरोबर ’प्रेमविवाह’ करायचा असं ठरवल्यानंतर बालमित्राने ’मला लग्नच करायचं नाही’ असं डिक्लेअर केल्यासारखं होतं. जिथे मी इन्टर्नशिप केली तिथून नकार येईल अशी अपेक्षाच नव्हती. पण त्यांना ट्रेनीच हवे होते, पर्मनन्ट पोझिशन नको होती. ओके. वडील म्हणाले करा पायपीट, मारा चकरा, बघा जग कसं असतं ते. चक्क पेपरातून, व्यावसायिक मॅगझिन्समधून ’नोकरी’ विषयक जाहिराती पाहून अर्ज द्यायला लागले. इकडे अर्ज दिला, की तिकडे लगेच कॉल यायचा. अशी आठेक स्थळं तरी पाहिली पुण्यात. मुलगी (म्हणजे मी) सर्वांना पसंत होते, पण याद्या करतेवेळी मुलाचे काका किंवा मावशीचे मिस्टर हमखास शिंकायचे. की नकार! काही कारणाने नोकरी मिळतच नव्हती. एक दिवस वडिलांना मुंबईतलं स्थळ मिळालं. पाठवला अर्ज, कॉल आला. मग मात्र धाबं दणाणलं. इथून चक्क होकार आला तर? वडील म्हणाले, त्यांच्याकडून ऑफर आली तर घे. रहा पुण्याबाहेर. तोही अनुभव घे. मी हो म्हणाले. म्हणजे नाही म्हणायची टापही नव्हती आणि तसं तीव्रतेने नाही म्हणावं असं वाटलंही नाही. ऑफिस होतं अंधेरीला. दादरपर्यंत पुण्याहून ट्रेन जाते. पुढे कसं जायचं? वडील म्हणाले तोंड उघडायचं, विचारायचं. डोळे आणि कान उघडे ठेवायचे. पाच-दहा लाख लोक रोज प्रवास करतात लोकलमधून. आपल्याला का नाही येणार? ते भाबडे होते, की त्यांचा माझ्यावर जरा जास्तच विश्वास होता याचं उत्तर मला अजूनही माहित नाही. मी हरवले असते तर? मला कोणी पळवलं असतं तर? मी परतच आले नसते तर?- हे प्रश्न त्यांना पडले नाहीत का? का ते आत्ता वाटतायेत तसेच वेडगळ तेव्हाही त्यांना वाटले काय माहित! असो. देव पाठीशी होता. मुंबईवाले भले होते. आणि तुमचं नशीब बांधलेलं असतं असं म्हणतातच ना. पुण्यात अक्षरश: कंपन्यांचे उंबरठे झिजवले. पण मुंबईत सहज नोकरी मिळाली. कुठेही चुकले नाही. गांगरले नाही. घाबरले नाही. मला कोणी गंडवलं नाही. गैरफायदा घेतला नाही. काऽऽही नाही. ती कायनात की काय ती एकत्र आली होती; म्हणत होती- हिला त्रास देऊ नका रे. हिला इथवर सुखरूप पोचवा. तरच ती नोकरीला येईल. (मग एकदा मुंबईत आली की दाखवू हिसका!) असो. ऑफिस शोधलं, मुलाखत उत्तम झाली, लोक चांगले वाटले, पगार बरा होता. फक्त राहण्याचा प्रश्न होता. तोही मिटला. कायनात कायनात म्हणाले ना… आईच्या ऑफिसातल्या मैत्रिणीची मुलगी काहीच महिन्यांपूर्वी चकाल्यात नोकरीला लागली होती आणि पार्ल्यात पीजी म्हणून रहात होती. तिथेच समोरच्या बिल्डिंगमध्ये पीजीसाठी जागा रिकामी होती. ’जोशी’ यांच्याकडे. वडिल म्हणाले, चला भरा कपडे.

इथे खूप वेळा ’वडिल म्हणाले, वडिल म्हणाले’ झालंय ना? ह्म्म. वडिलांनीच माझ्या शिक्षणाचे आणि करियरचे निर्णय घेतले. प्रथमपासून मी अभ्यासात चांगली होते. ज्या शाखेला गेले असते, तिथे चमकले असते. पण त्यामुळे माझा फार गोंधळ व्हायचा. वडील अर्थातच मला पूर्ण ओळखून होते. त्यामुळे ते निर्णय घेत गेले आणि ते चुकीचे नसतील या विश्वासाने मीही त्यांनी सांगितलं तसं करत गेले. ते सांगतात ते ऐकणं आणि तसं करणं जास्त सोपं आणि सोयीचंही होतं माझ्यासाठी.

असो. तर अंधेरीत नोकरी. पार्ल्यात घर. मुंबई असूनही लोकलचा प्रवास नाही! बसचा प्रवास, २० मिनिटात ऑफिस! सुख सुख म्हणतात ते हेच! सामान घेऊन जोशी आजींकडे दाखल झालो. आजींकडे आणखी एकच मुलगी होती. एकूण तिघींची सोय होती. टिपिकल घर. पुढे मोठी सामायिक बाल्कनी, मग व्हरांडा टाईप बंद खोली, एक मोठी खोली, मग स्वयंपाकघर आणि बाथरूम- आगगाडीचा डबा. सामान ठेवायला फडताळ. झोपायला गादी. सोडायला वडील आले होते. सामान लावलं. मी तशी मजेत होते. एक्सायटेड होते. नवी जागा, उद्यापासून नवी नोकरी, एक नवं न अनुभवलेलं आयुष्य... ’नीट रहा’- वडिलांनी निरोप घेतला आणि निश्चयी पावलं टाकत गेलेच कंपाऊंडबाहेर. इथे पहिली जाणीव झाली. एकटेपणाची. पोटात खड्डा पडला. पाय कापायला लागले. अचानक प्रचंड रडू आलं. मी मुंबईत आले होते.

****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष- ३

ऑफिस ऑफिस

मी सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. तेव्हा जबरदस्त आयटी बूम होता. अनेक स्टार्ट-अप्स उगवत होते. त्यात एकात माझीही वर्णी लागली- अर्थात फायनॅन्स डिपार्टमेन्टमध्ये. कंपनीचे सरळसरळ दोन भाग होते- एक भाग ज्यात एमडी आणि अन्य एक डायरेक्टर होते, एचारचे दोन लोक- विकास (हा व्हीपी) आणि अरुंधती (त्याची अत्यंत आगाऊ आणि स्वत:ला शहाणी समजणारी ज्युनिअर), अकाऊंट्स-फायनॅन्सचे तीन (डिपार्टमेन्ट हेड- सुनिथा, नीलेश आणि मी) आणि एक सुंदर रिसेप्शनिस्ट (रेवा) आणि दोन ऑफिस बॉईज किशोर आणि सुब्बू- असे दहा आणि दुसरा भाग म्हणजे टेक्निकल डायरेक्टर आणि त्याच्या हाताखाली अजून पंधराएक संगणक अभियंते. छोटा संसार होता. ऑफिस मोठं होतं, पुषकळ रिकामी क्युबिकल्सही होती. कंपनी तळमजला आणि बेसमेन्ट अशी होती- हे मात्र माझ्यासाठी सॉलिड नवलाचं होतं! पुण्यात ’वरच्या मजल्यावरची’ ऑफिसेस पाहिली होती. पण जिना ’उतरून’ खाली ऑफिस हे मला फार भारी वाटलं होतं. वॉल-टू-वॉल कार्पेट आणि सेन्ट्रल एसी असलेली ती जागा माझ्यासाठी एक वेगळ्या ग्रहावरचं जगच होती.

दोन भागांचं ड्रेसिंगही अतिशय विसंगत होतं. पहिल्या भागातले लोक एकदम टिपटॉप, वेलग्रूम्ड असायचे नेहेमीच. सूट्स, टाय्ज, चकचक बूट. रेवा तर फक्त शॉपर्स स्टॉपचे कपडे घालायची. माझी इमिजिएट बॉस सुनिथा तमीळ होती. ती जरीच्या नाहीतर सिल्कच्या साड्या नेसायची कायम. अरुंधती कूल ट्रेन्डी शर्ट्स-ट्राऊझर्समध्ये. किशोर आणि सुब्बूला तर युनिफॉर्मच होता. हा तळमजला. बेसमेन्टमधले सोळा मात्र तू कळकट का मी अशा चढाओढीत असायचे. दाढ्या वाढलेल्या, बर्म्युडा, चुरगाळलेले जीन्स-टीशर्ट्स असा नॉर्मल पेहराव. ’आम्ही किती काम करतो बघा’ हा शोऑफ असायचा. टीडीही असाच रहायचा. खरं तर एमडी आणि टीडी मित्र. पण स्वभाव, वागणं एकदम भिन्न. एमडीचे पैसे आणि टीडीचं डोकं अशी सरळ विभागणी होती. तू तुझं बघ, माझ्या कामात ढवळाढवळ करू नको असं एकमेकांना निक्षून सांगितलं असावं त्यांनी.

वरचे आणि खालचे सर्व लोक पक्के बॉम्बेआईट्स होते. इथेच जन्मलेले किंवा शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत आलेले आणि सरावलेले. इथली लाईफस्टाईल, इथला कूल कोशन्ट अंगी अगदी मुरलेला, किंवा आव तरी आणायला जमत होता त्यांना मस्तपैकी. आणि यात मी कुठे होते? माझं बावळट सदाशिव पेठी ध्यान होतं! काय कपडे होते माझे! एक तर शिवलेले पंजाबी ड्रेस मी घालायचे. (जीन्स घालायला तळमजल्याला परवानगी नव्हती.) नव्वद टक्के कपडे हस्तकलामधल्या हॅन्डलूम कॉटनचे. उर्वरित प्रिन्टेड टॉप्स आणि प्लेन सलवार-ओढणी कॅटॅगरीत. केसांचा जन्मसावित्री पोनी. हातात घड्याळ, दुसरा तसाच. कानात टॉप्स, डूल एकही नाही. सगळे कपडे डिसेन्ट होते, चांगले होते. पण फॅशनच्या नावाने शून्य. एकाच प्रकाराचे सगळे ड्रेस. अर्थात म्या बावळटाला हे जाणवलंही नव्हतं. रेवाने मला एकदा विचारलं, तू वेगळं काही घालत नाहीस का? मी म्हणाले, जीन्स घालते की. ती म्हणाली, तसं नाही. ड्रेसेसमध्ये वेगळं. मी घालते तसे. तेव्हा कुठे माझी ट्युब पेटली. पण इतकी जवळीक होऊन बोलायला सहज तीनेक महिने झाले होते तोवर. मी लोकांना पहायचे, मनातल्या मनात- काय मस्त कपडे आहेत हे असं म्हणायचेही. पण स्वत: तसं काही करावं, घालावं याचा विचारही कधी डोक्यात आला नाही.

माझं काम म्हणजे सुनिथा जेजे सांगेल तेते करायचं- कंपनी लहान होती. अकाऊंट्स, फायनॅन्स आणि लीगल सगळं सुनिथाच पहायची. तिचा भार हलका करायला मी आणि नीलेश. माझ्याकडे फायनॅन्स आणि लीगल होतं. कॅश, पगार, रोजचा हिशोब नीलेशकडे. ऍडव्हायजर म्हणून एक शहा वकील होते. त्यांच्या सल्ल्यानेच एमडीचे पैसे हलायचे. मी जॉईन झाले आणि काही दिवसांतच कंपनीमध्ये महत्त्वाच्या वाटाघाटी चालू झाल्या. सुनिथा, शहा, मी आणि एमडी अशा आमच्या सतत मीटिंग्ज चालू होत्या. आम्ही कागदपत्र तयार करत होतो. मला खूप शिकायला मिळत होतं, शिकलेलं आचरणात आणत होते. शहा या बाबतीत एकदम प्रोफेशनल होते. सुनिथा, शहा आणि मी आमचा मेळ बसत होता हळूहळू. वाटाघाटी अंतिम स्टेजला आल्या आणि अचानक एक दिवस एमडीच्या घरी मीटिंग आहे आणि आपल्याला त्याच्या घरी जायचं आहे असं सुनिथाने सांगितलं. माझ्या पोटात गोळा. एकदम घरीच?

मुंबईला गेल्यापासून मला माझ्या आत असलेल्या आणखी एका मुलीचा शोध लागला होता. आपल्याला संपूर्णत: अपरिचित प्रसंगाला सामोरं जायचं आहे असा आदेश मेंदूने देताच ती मुलगी आतल्याआत एकदम थंडगार पडत असे, पण त्याचवेळी बाहेरच्या मला घाम फुटत असे. परिणामत: मी एकदम गप्प होत असे. आताही तसंच झालं. खरंतर मला टेन्शन यायचं काय कारण होतं? एमडींच्या घरीच तर जायचं होतं. शहा, सुनिथा आणि आणखी काही मोठे लोकही तिथेच येणार होते. मला सुनिथाची असिस्टंट म्हणून काम होतं फक्त. तरी… तरी या आधी कधीही न अनुभवलेली कसलीतरी भीती माझ्या मनाची पकड घ्यायची आणि मला बंद बधीर करून टाकायची हे मात्र खरं.

हा भाग खूप मोठा होतोय. मीटिंगची गंमत पुढच्या भागात…

****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष- ४

ऑफिस ऑफिस (२)

तर त्या एमडींकडच्या मीटिंगबद्दल मी सांगत होते. एमडी त्या दिवशी घरीच होते. शिवाय ज्यांच्याबरोबर वाटाघाटी चालू होत्या तेही त्यांच्या घरीच भेटणार होते. म्हणून सर्व कागदपत्र घेऊन त्यांनी आम्हालाही घरीच बोलावलं होतं. आम्हाला न्यायला त्यांची गाडी आली. तेव्हा फॅशनमध्ये असलेली भयंकर महाग अशी गाडी होती ती. हे सगळंच मला नवीनच होतं. मी पुण्यातही काम केलं होतं. पण घरी-बिरी काही आम्हाला कोणी बोलावलं नव्हतं बुवा कधी. कार वगैरे तर आमच्या सरांकडेही नव्हती तेव्हा. मुंबईचा प्रकारच वेगळा होता. तर पुढे ड्रायव्हर, त्याच्याशेजारी शहा, मागे मी आणि सुनिथा असे निघालो. एसी गाडी होती. आम्ही कुठे जात होतो कोणास ठाऊक? मी आपली मान खाली घालून कागद पुन्हापुन्हा तपासत होते, नीट करत होते. सुनिथा मला काय-काय विचारत होती त्याला मी हं, येस, या इतकंच उत्तर देत होते. तिचं आणि शहांचं बोलणं चालू होतं, मी ऐकत होते. शेवटी तीच मला म्हणाली, ’We are going to Pali Hill. Been there before?’ काय येडी की काय? असं अर्थातच मनातल्या मनातच म्हणाले मी. मान मात्र जोरात हलवली. ’It’s a beautiful place. But lots of traffic on the way’. खरंच होतं. दीड तास लागला. पण शोफर ड्रिव्हन कारचं सुख काय असतं मला त्या दिवशी कळलं.

शेवटी वळणावळणाचा एक वर वर जाणारा रस्ता घेत आम्ही घरी पोचलो. भारी लोकॅलिटी होती. एमडीचं घर कसलं ते? बंगला होता. बागेसकट. मी वेडीच झाले होते. ही मुंबई होती? हे मुंबईमधलं घर होतं? साईड बिझनेस म्हणून सिनेमांना शूट करायला दिलं असतं घर तर शब्दश: घरबसल्या कमाई झाली असती. हॉलमध्ये गेलो. काय ती भव्यता!! पांढ-या शुभ्र भिंती, पांढरे शुभ्र सोफे, शोकेसेस, त्यातल्या नाजूक वस्तू… हॉलची उंची भरपूर होती. दोन संगमरवरी खांबांनी ती पेलून धरली होती. माझे डोळे बटाट्याएवढे झाले असणार नक्की ते सगळं पाहताना. पण दीड तासांचा प्रवास आणि एसी यामुळे रेस्टरूमची निकडीने आवश्यकता होती. विचारायचं कसं? पण सुनिथालाही गरज होती. मी हुश्श केलं. मला स्त्री बॉस मिळाली आहे यासाठी मी देवाचे आभारच मानले. बाथरूमही संगमरवरी, सुगंधित. पार्ल्यातल्या घरातली पुढची खोली होती, तेवढी तर नक्की होती ती बाथरूम. मला तर रडूच यायच्या बेतात होतं. असो.

मीटिंग पार पडली. मला बोलायचं काही कामच नव्हतं. वाटाघाटी चालू होत्या. ऍग्रीमेन्ट, क्लॉजेज यावर चर्चा झाली. सह्या मात्र झाल्या नाहीत. त्या नंतर कधीतरी होणार होता, मग जेवण!! तेही तिथे होतं? देवा. मला परत एकदा कॉम्प्लेक्स आला. भव्य डायनिंग टेबलवर आता आम्ही गेलो. एमडीची सुंदर, सुरेख, मेक-अप केलेली बायकोही सामील झाली. जेवण वाढायला नोकर होते. ती त्यांना मस्त हुकूम सोडत होती. असूयाच वाटली मला तिची, खरं सांगते. परत एकदा पांढ-या शुभ्र ताटल्या, कटलरी, पाणी प्यायला काचेचे ग्लास आदी समोर आले. मध्ये एकदा (तिकडे वाटाघाटी टेबलवर बसलेलो असताना) शुभ्र पांढ-या आणि एकच सोनेरी नाजूक किनार असलेल्या कपांतून चहा झालाच होता. सगळं पांढरंशुभ्र पाहून डोळे पांढरेच होत होते माझे (हो अगदी क्लिशे उपमा आहे, माहितेय, तरी.) लोक at ease होते. कोणी माझ्याकडे विशेष लक्ष देत नव्हतं. माझ्या मनात मात्र उगाचच हा ग्लास फुटला तर किती नुकसान होईल वगैरे सॅडिस्ट विचार येत होते. जेवण मस्त होतं. मी नेहेमीइतकीच जेवले, तरी उगाचच आपण खूप तर खाल्लं नाही ना हा गिल्ट वाटत राहिला. जेवताजेवता मी परत- ही मिसेस एमडी थोडीच स्वयंपाक करतेय? नोकर आहेत हाताखाली. एखादा सण आला की आई बिचारी सकाळपासून एकटी खपत असते, तिला दोन नोकर मिळाले असते तर?- असलेच विचार करत बसलेली.

शेवटी निघालो बाबा एकदाचे तिथून. मजल दरमजल करत परत अंधेरीला आलो. उतरताना शहा म्हणाले, ’Come to my office tomorrow.’ आणि हसले.

ते का हसले हे मला दुस-या दिवशी कळालं.

****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष- ५

प्रवास प्रवास (१)

दुस-याच दिवशी सकाळी ऑफिसात गेल्यागेल्याच मला सुनिथाने सांगितलं, “Go to Shah’s office. Its in Fort. Will you be able to find it alone?”
माझा चेहरा साशंक. अजून एक adventure मला नको होतं. मी ताबडतोब नकारार्थी मान हलवली.

“Ya, thought so. Ok, Nilesh will come with you.”

नीलेश रोजचं अकाऊंटिंग बघायचा. मुंबईचाच होता. मला मुळीच आवडायचा नाही. स्वत:ला भयंकर शहाणा समजायचा आणि मला बळंच खुन्नस द्यायचा. तो सहा महिने जुना होता, साहजिकच ऑफिस-स्पेसिफिक काही गोष्टी त्याला माहित होत्या, मला नाही. तर त्याचा याला गर्व! “याच्याबरोबर?” असा चेहरा झालाच माझा, पण दुसरा पर्यायच नव्हता. मी माझ्या शिरस्त्याप्रमाणे गप्प झाले. आम्ही ताबडतोब निघालो. कालच्याच वाटाघाटींचे आणखी काही प्रिन्ट आऊट्स, मिनिट्स ऑफ द मीटिंगच्या नोट्स वगैरे शहांना दाखवायचे होते आणि ते काही कागद देणार होते ते घेऊन यायचे होते. हे सर्व काम माझं होतं. पण नीलेशला माझी ’जबाबदारी’ घ्यायला लागली असल्याने सर्व कागदही त्यानेच ताब्यात घेतले. पेटी कॅशही घेतली आणि निघालो आम्ही. कालच्याप्रमाणे आजही सूर्य तळपत होता, पण कालच्याप्रमाणे आज एसी कार नव्हती दिमतीला. निमूटपणे रिक्षात बसून आम्ही अंधेरी स्टेशनाकडे निघालो. काय गर्दी होती! ठिकठिकाणी ट्रॅफिक जॅम्स! सीप्झ जंक्शनला सुमारे नव्वद टक्के ट्रॅफिक वळायचा. पण त्या सिग्नलला कायमच मरणी गर्दी असायची. बसेसच तर किती असायच्या. असो. घामेघूम होत पोचलो स्टेशनला.

नीलेशने माझ्यावर कृपा करून तिकिटं काढली. फर्स्ट क्लासची. तिकिट माझ्या हाती देताना म्हणाला, “एमडीने मुझे डे वन से बोलके रखा है. नीलेश, if you are on office work, always take a taxi or first class ticket.” तो असं नेहेमी feeling द्यायचा की तो एमडीच्या कित्ती जवळचा आहे! त्याचा तो स्वर ऐकूनच चिडचिड व्हायची माझी. होक्का?- असं एक्प्रेशन देऊन मी एक स्माईल दिलं त्याला. मग त्याने वर बघत, ट्रेन स्लो आहे का फास्ट पाहिलं. स्लो येणार होती. म्हणाला, “ये वाली जाने देते है. इसके बाद में फास्ट आयेगी. उस में जायेंगे. हमे फोर्ट उतरना है. याद रखना.” म्हणलं ठीके. आणि यानंतर हा चक्क निघालाच तिथून. मला म्हणाला लेडीज डबा इथे येईल, मी मागे जातो, जनरलचा तिकडे येतो. परत म्हणलं ठीके. स्टेशनवर ठीकठाक वर्दळ होती. अनाऊन्समेन्ट्स होत होत्या. ट्रेनची वेळही झाली होती. रश आवर संपल्यामुळे गर्दी बेताची होती. ट्रेन आलीच. ती आल्यावर जी नेहेमीची लगबग होते ती झाली. मी शांतपणे उभी होते. यात चढायचं नाहीये असं सांगितलं होतं त्याने. ट्रेन निघाली. चार डबे पास झाले आणि एका डब्यात नीलेश चढलेला दिसला!! माझ्या समोरून गेला तो चक्क! I had the shock of my life! मी शब्दश: जागच्याजागी थिजले. हा समोरून ओरडतोय- “अरे यही फास्ट ट्रेन है. अनाऊन्समेन्ट सुनी नही क्या?” इतकं मी ऐकेपर्यंत तो आणि ट्रेन दोन्ही गेलेदेखील!! प्लॅटफॉर्म अचानक ओस पडला. नक्की काय झालंय हे समजायलाच मला पाच मिनिटं लागली. प्रचंड राग आला नीलेशचा. Useless pompous fool. काय प्रकारचं वागणं होतं हे? बेजबाबदार नुसता!! कधी झाली अनाऊन्समेन्ट? आणि काय मूर्ख आहेत हे ट्रेनवालेसुद्धा? अशी स्लो ट्रेनची फास्ट ट्रेन करतात का? बर करतात, तर हा कितीसा लांब होता? वीसेक फूट? मला येऊन सांगता येत नाही याला की हीच ट्रेन घ्यायची आहे? किंवा ओरडायचं तरी तिथूनच. हा मला एकटीला सोडून चढतोच कसा नालायक? त्याला माहितेय मी कधी लोकलचा प्रवास केलेला नाही. मला गाईड करण्यासाठीच तर बरोबर आला होता ना तो? नाहीतर शहांकडे याचं काय काम होतं? ’शहा’ डोक्यात येताच मात्र माझ्या चेह-यावर एक wicked की कायसं स्माईल आलं. तिकिट काढण्यासाठी जाताना याने कागदपत्रांचा फोल्डर माझ्याकडे दिला होता. तो माझ्याचकडे राहिला होता. हा नुसताच हात हलवत पुढे गेला होता मूर्ख. सग्गळी हीरोगिरी फुकट गेली त्याची. अहाहा. या विचाराने मी एकदम शांत झाले, आणि ’आता पुढे काय करायचं?’ याचा विचार करायला लागले.

कागद महत्त्वाचे होतेच. आज शहांकडे जायचंच होतं. पण कसं जायचं मला माहित नव्हतं. पोस्टल ऍड्रेस होता. चर्चगेटपर्यंतचं ट्रेनचं तिकिट हातात होतं. सुनिथाला फोन करावा असं मी ठरवलं. स्टेशनवर पाहिलं. कोप-यात बूथ होते. ऑफिसात फोन केला. नीलेश मला सोडून गेला हे ठासून सांगितलं आणि पुढे काय करू विचारलं. तिने मला सांगितलं की आता तू एकटीच जा. पैसे आहेत ना? चर्चगेटला उतर, टॅक्सी घेऊन हॉर्निमन सर्कलला जा. सर्कलला अशी अशी बॅंकेची बिल्डिंग आहे. तिथून चालत रहा. कुठेही वळू नकोस. हेहे दिसेल, तेते बघ. आणि हीही बिल्डिंग येईलच. तिथेच नववा मजला. Don’t worry. You’ll be fine. Call me if you get confused. But deliver and get papers. Has to be done today. सुनिथाच्या जागी मला माझे वडिलच दिसायला लागले आणि एकदम confidence आला. परत प्लॅटफॉर्मवर गेले, पुढची ट्रेन येतच होती. परत तीच गर्दी, तीच गडबड. डब्यांकडे बघत मीही घुसले. फक्त एकदा शेजारी उभ्या असलेल्या टिपटॉप बाईला विचारलं, ये चर्चगेट जायेगी ना? (आता विचार करून मला स्वत:वरच हसायला येतं. काय कमाल idiotic प्रश्न होता हा! पण त्या वेळी मात्र मी कोणताही चान्स घेऊ शकत नव्हते!) तिने माझ्याकडे एक अत्यंत द्रयार्द्र-कम-तुच्छ कटाक्ष टाकला. पण मान डोलावली. हुश्श करत मी पहिल्यांदाच लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात चढले.
****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

Keywords: 

लेख: 

ते एक वर्ष- ६

प्रवास प्रवास (२)

फर्स्ट क्लासमध्ये गर्दी खूपच कमी होती. खूपच आधुनिक कपडे घातलेल्या काही, लिपस्टिक लावलेल्या काही, आपल्याला मुळीच न शोभणारे कपडे घातलेल्या काही अशाही होत्या. मी त्या डब्यातच न शोभणारी होते ते एक सोडा, पण माझ्याकडे अधिकृत तिकिट होतं! कोण्णी कोण्णाशी बोलत नव्हतं. शक्यतो eye-contact होणार नाही असा बेतानं सगळ्या शांत गप्प मख्ख बसून होत्या. मला विन्डो सीट मिळाली. मीही त्यांच्यासारखीच शांत बसले. ऊन तळपत होतं, पण वारंही येत होतं. परत एकदा सकाळपासून काय-काय झालं आणि आता आपल्याला काय-काय करायचं आहे याची उजळणी केली. फार काही न घडता चर्चगेट आलं आणि अहो आश्चर्यम!! लेडीज फर्स्ट क्लासच्या डब्यासमोर चक्क नीलेश उभा!! त्याच्याकडे खुन्नसने पाहतापाहताच मी हसले आणि कागद घट्ट कवटाळले.

“अरे तुमने सुना नही क्या? Announcement हो रहा था. होता है कभी कभी. स्लो ट्रेन फास्ट करते है. इसलिये टाईम पे और announcement पे ध्यान देना चाहिये” परत प्रवचन सुरू! वैतागलेच मी.

“मुझे नही था पता नीलेश. ये तुम्हे पता होना चाहिये ना? Anyways लेकिन तुम क्यूं रुके? Why did you not go to Mr Shah’s office or back to Andheri?”

“मैं जानेवाला था अपने ऑफिस. लेकिन सुनिथा ने मुझे बोला रुकने के लिये.”

“अच्छा. तुम्हारी बात हुई क्या उससे? But you can go back. I’ll go alone. I have also talked to her.”

“नही. नही. मैं आता हूं ना. अब यहांतक आये है तो… और शहाका ऑफिस भी कहां मालूम है तुम्हे?”

“I will find out. You can go. Seriously.”

“नही, नही. I’ll come. Let’s go.”

त्याला पुरेसं खजील करून आम्ही निघालो. तो बरोबर आहे हे बरंच होतं माझ्यासाठी. आता मला सोडून भलतीकडे जाण्याचं धाडस त्याने केलं नसतं. मलाही शोधाशोध न करता शहांकडे जाता आलं असतं. टॅक्सी करून आम्ही हॉर्निमन सर्कलला आलो आणि I was impressed. कसला भारी, पक्का ऑफिस एरिआ दिसत होता तो! मुंबईची hustle-bustle ठासून भरली होती तिथे. सगळेजण घाईत. पण प्रत्येकाच्या चेह-यावर एक कामाची व्यग्रता. कोणाला टाईमपासला वेळ म्हणून नाही. तो परिसरही किती भव्य, मोकळा, काहीसा अंगावर येणारा होता. सर्कलला असलेला पुतळा, त्याच्या चहूबाजूने असलेल्या मजबूत, दगडी, नव्या-जुन्या बिल्डिंग्ज, लोकांची लगबग आणि एकूणच त्या हवेत असलेलं चैतन्य! मस्त वाटलं मला एकदम तिथे. नीलेशपाठोपाठ मी चालायला लागले. घाम मात्र भयंकर यायचा मला तिथे आणि वैतागायला व्हायचं. (पुण्यात असं कद्धी व्हायचं नाही!) केस आणखीच चिप्प बसायचे. चेहरा घामटतेलकट व्हायचा. थोडं चाललो आणि आलीच शहांची बिल्डिंग. सुनिथाने पर्फेक्ट खुणा सांगितल्या होत्या. मी एकटी येऊ शकले असते. शेजारून चाललेल्या नीलेशकडे पाहून उगाचच मी नापसंतीचा चेहरा केला.

शहांचं ऑफिस होतं ती कमर्शियल बिल्डिंगच होती. मधोमध एक पॅसेज आणि चहूबाजूनी फक्त ऑफिस स्पेसेस. कोंदट, छोटी-छोटी ऑफिसेस आणि त्यात टाय वगैरे घातलेले कोंबून बसवलेले लोक. नववा मजला. माझ्या आयुष्यात प्रथमच मी इतक्या उंच गेले (लिटरली!). पुण्यात अरोरा टॉवर्समध्येही माझं ऑफिस चौथ्याच मजल्यावर होतं. घर तिस-या आणि बाकी कामं तर तळमजल्यावरच होती. पुण्याचं मेलं स्टॉक एक्सचेन्जही पाच मजली!! लिफ्टमध्येही गर्दी होती. लोक चढत-उतरत होते. एकदाचा नववा मजला गाठला आम्ही. मला एकदा खाली डोकावून पहायचं होतं. पण मी मोह आवरला. शहांचं ऑफिस शोधलं. कित्ती छोटुसं ऑफिस होतं!! माणूस इतका पॉवरफुल, त्याचा क्लायंट (म्हणजे आमचा एमडी) इतका पैसेवाला, पण यांचं ऑफिस किती लहान!! पार्ल्याच्या पुढच्या खोलीइतक्या दोन खोल्या होत्या. मागे अर्ध्या जागेत काचेचं पार्टिशन करून शहांची केबिन. बाहेर दोन ज्युनिअर. उरलेल्या जागेत दोन खुर्च्या, दोन मिनी खुर्च्या, दोन कॉम्प्युटर्स आणि असंख्य फायली आणि जाडी लीगल पुस्तकं जागा मिळेल तिथे, अगदी जमिनीवरही खच्चून भरली होती. (एक मात्र होतं, की हे ऑफिस चक्क एसी होतं!) मला एकदम पुण्यातल्या सरांचं ऑफिस आठवलं. असंच सेम टु सेम, पण जरा मोठं होतं (आणि तिथे एसी नव्हता). एकदम ’आपलंवालं’ फमिलियर फीलिंग आलं.

आम्हाला पाहून शहा केबिनमधून बाहेर आले आणि माझ्याकडे पाहून हसले. कालच्या एमडीच्या घरापुढे हे ऑफिस म्हणजे अगदी ऍन्टी-क्लायमॅक्स आहे ना? असं म्हणाले. मला एकदम संकोचल्यासारखं झालं. त्यांना स्वत:च्या ऑफिसचा अभिमान वाटत होता का नव्हता, त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, का मला चिडवत होते मला कळलं नाही. कुठून हिंमत केली माहित नाही, पण मी एकदम म्हणून गेले, “I like this office better.” ते परत एकदा माझ्याकडे पाहून हसले. त्यांना माझं उत्तर आवडलं असावं. मग आम्ही त्यांच्या केबिनमध्ये बसून काम केलं. नीलेश बाहेरच्या मिनी खुर्चीतच बसलेला होता हे पाहून मला उगाच उकळ्या फुटल्या. शहा तसे बोलायला रफ होते. शिवाय वजनदार माणूस. तरी माझ्याशी नेहेमी ते एक प्रोफेशनल कर्टसीने बोलत. मला कामाशी संबंधित प्रश्न विचारत. मी चुकले तर फक्त हसत आणि योग्य उत्तर सांगत. मला काम करायला आवडत होतं त्यांच्याबरोबर. ते अधूनमधून बोलता बोलता एमडीच्या चुका काढत तेव्हा तर मला फारच मजा वाटायची :-) असो. मध्ये चहा झाला. सर्व अपेक्षित काम झालं. मी आणि नीलेश परत निघालो. येताना मात्र लिफ्टची वाट पहात असताना मी पॅसेजच्या झरोक्यातून खाली डोकावून पाहिलंच. आपण किती वर आहोत आणि जग किती खाली असं वाटलं. वेगळंच फीलिंग होतं ते.

पार संध्याकाळी पार्ल्याच्या घरात बसलेली असताना मी गेल्या दोन दिवसांचा विचार करत होते. झापडबंद सगळं चालू असताना हे दोन दिवस टोटली वेगळेच होते. कुठे ती पाली हिल, ते चकाचक घर, तो श्रीमंती थाट, कुठे ते फोर्टचं इतकुसं ऑफिस, काय ते बेसमेन्ट असलेलं निराळंच ऑफिस आणि कुठे हे शेअरिंगमधलं घर. पुण्याचं माझं घर, ते चिरपरिचित वातावरण डोळ्यापुढून सरकत होतं. मी प्रचंड होमसिक झाले. कोणाला तरी हे सांगावं, बोलावं असं तीव्रतेनं वाटलं, पण असं शेअरिंग करावं असं कोणीच नव्हतं. ’मला अशा जागी, अशा ठिकाणी रहायचंय का? करियर करायचंय का? मला नक्की काय करायचं आहे? मी खुश आहे का नक्की? इथे घरापासून लांब येऊन मी काय मिळवलं?’ असे अनेक विचार डोक्यात येत होते उत्तरं सापडत होतीही आणि नव्हतीही.

मुंबईला गेल्यापासून हे प्रश्न मला सतत पडत असत. त्या प्रश्नांवर विचार करता करता आणि त्यांची उत्तरं शोधता शोधता तेव्हाही आणि त्यानंतरही अनेकदा मी माझ्यातच अगदी एकटी पडत जात असे. आपण एका तळघरात इतके खाली उतरत आहोत की पुढची वाटही दिसत नाहीये आणि मागचा प्रकाशही नाहीसा झाला आहे अशी claustrophobic भावना असायची ती. पण तरीही चालत होते. का? कारण दुसरा काही मार्ग सुचत नव्हता म्हणून!

****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

Keywords: 

ते एक वर्ष- ७

कशासाठी? पोटासाठी??

पार्ल्यात रहायला आले त्या रात्री माझ्या मैत्रिण जिथे रहात होती त्या आजींनी आपुलकीने जेवायला बोलावले होते. त्या आजी एकदम प्रेमळ होत्या. ’डब्याची काय सोय केली आहेस?’ असं त्यांनी मला विचारलं. मी कसली सोय करतेय? मला सुचलंच नव्हतं. त्यांनीच एक पत्ता दिला. त्यांच्या बिल्डिंगच्या मागे एक चाळ होती. तिथे राहणा-या एक बाई डबा करून देतील असं त्यांनी मला सांगितलं. त्या बाईंना गरज होती, मलाही. डब्याची सोय अचानकच आपलीआपण झाली. मी लगेच माझ्या मैत्रिणीला बरोबर घेऊन त्यांना भेटायला गेले. ही चाळ म्हणजे अक्षरश: चाळ होती. एल आकारातली, तीन मजली. या बाई तळमजल्यावरच रहात होत्या. एकच खोली. त्यात कॉटवर झोपलेले त्यांचे सासरे, सिगरेट ओढणारा नवरा, कॉलेजमधली मुलगी आणि त्या असा संसार होता. स्वयंपाकघर असं नव्हतंच. एका भिंतीपाशी ओटा टाईप टेबल, त्यावर गॅस वगैरे मांडणी होती. सकाळी डब्यासाठी दोन पोळ्या आणि भाजी-आमटी यांचे २० रू. आणि संध्याकाळी २ पोळ्या, (तीच) भाजी, कोशिंबीर, आमटी आणि भात यांचे ३० रू. असा दर होता. पैसे रोजचे रोज द्यायचे. एकदम दोन दिवसाचे १०० रू. दिले तरी चालणार होते. मी मान डोलावली. (रेफरन्स म्हणून सांगते, मी ज्या काळाबद्दल बोलते आहे त्यासाठी हे पैसे खूप जास्त होते कारण तेव्हा वडापाव २रू.ला मिळायचा.) पण मला तेव्हा ते समजत नव्हतं. शिवाय दुसरी डबा देणारी तरी कुठे माहित होती?

ऑफिसच्या पहिल्या दिवशी लंच टाईममध्ये मी डबा उघडला आणि मला नक्की काय वाटलं मी सांगू शकत नाही. आमटीचं पाणी होतं; डाळ नव्हतीच त्यात. भाजी चक्क पाणचट होती आणि दोन पोळ्या इतक्या पातळ की सगळं मिळून अर्धी ते पाऊण पोळीचा ऐवज होता. आईची आठवण येणं अपरिहार्य होतं. जेवणात मीठ होतं, इतकंच आठवतं. चवीची बातच नव्हती. संध्याकाळी तीच भाजी आणि तेच पिवळं पाणी, भाताची दोन ढेकळं आणि काकडीची कोशिंबीरही पचपचीतच!! त्यातही पाणी होतं की काय कोण जाणे. दोडका, पडवळ, दुध्या, कोबी आणि एक दिवस उसळ- हा ठरलेला ’मेनू’ असायचा आठवड्याचा. प्रत्येक भाजी पचपचीतच असायची. चव एकसारखीच. भाजीनुसार टेक्स्चरमध्ये जो फरक पडेल तितकाच. काकडी, टोमॅटो, काकडी, टोमॅटो आणि काकडी-टोमॅटो हाही क्रम संध्याकाळी ठरलेला. आमटीच्या पाण्यात काही व्हेरिएशन होत नव्हतं. भातातही. खूप म्हणजे खूपच चांगला मूड असेल बाईंचा तर सकाळी पोळीत चटणी सरकवलेली असायची. आणि संध्याकाळी कधीतरी भाताऐवजी खिचडी. पण हे फार रेअर. बाई पैशाला पक्क्या. रोज सकाळी आणि संध्याकाळी रिकामे डबे त्यांना भरायला देतानाच पैसे द्यावे लागायचे. पहिल्या दिवशी अर्थातच मला हे माहित नव्हतं. मी नुसतेच डबे दिले. त्या तशाच उभ्या. मीही. मग मी त्यांच्याकडे डोळ्यांनीच पृच्छा केली. तर त्यांनी एकच शब्द उच्चारला- पैसे? मीच ओशाळले! दुपारी डबा खाल्ल्यावर लक्षात आलं. अशा चवीचा डबा त्या देत असतील तर साहजिकच कोण परत परत तो घेत राहील? पैसे बुडण्याचीच शक्यता जास्त. त्यामुळे पैसे हातात पडल्याशिवाय त्या डबे भरतच नसाव्यात. बिलिव्ह मी… ’पैसे?’ या व्यतिरिक्त ती बाई माझ्याशी त्या काळात एक शब्दही बोलली नाही!!

जोशी आजी- ज्यांच्याकडे मी रहात होते- त्यांच्याबद्दल सांगायलाच हवं. आजी ७५ वर्षांच्या होत्या. पण त्यांना चाळीत सर्वजण ’काकू’ म्हणत. मी गेल्यागेल्या त्यांना ’आजी’ म्हणाले कारण त्या माझ्या आजीच्याच वयाच्या होत्या. तर याचा त्यांना राग!! “मला काही कोणी आजी म्हणत नाही… तूच पहिली!” असं मला लगेच म्हणाल्या. मीही त्यांना बिनधास्त म्हणाले, “पण तुम्ही आजीच्याच वयाच्या आहात की.” “हो गं, पण कोणी म्हणत नाही” त्यांनी मुद्दा रेटला, मग मीही त्यांना जेव्हा वेळ येई तेव्हा आजीच म्हणायला लागले. उगाच काय? असो. तर आजी एकट्या होत्या. मिस्टर वारले होते, मूल-बाळ नव्हते. खमक्या होत्या. गेली काही वर्ष सोबत म्हणून मुली ठेवत होत्या. “इथे स्वयंपाक करायचा नाही. मुलींनी आपापली सोय बाहेर करायची.” असं माझ्या वडिलांना ठणकावूनच सांगितलं होतं त्यांनी. मी गेले तेव्हा अजून एकच मुलगी होती. नंतर वर्षभरात कधी तीन. कधी चार, तर कधी आम्ही पाच जणीही होतो.

आजी पहाटे पाचला उठायच्या आणि सर्वांचा चहा करून ठेवायच्या. आम्ही उठलो की एकेक जण आपापला कपभर चहा गरम करून प्यायचो. चहा इतका जेवढ्यास तेवढा केलेला असायचा, की एकीने एक घोट जरी जास्त घेतला, तर दुसरीला अर्धाच कप उरायचा! आम्ही चहा ओतला की आजी डोकावून आमचे कप बघत! नाश्त्याची बातच नव्हती. प्रत्येकीकडे बिस्किटं असायची. चहाबरोबर आपापली बिस्किटं खायची आणि आवरून निघायचं.

हे ’आपापलं’ खाणं प्रकार खूप होता. जो काही खाऊ आहे तो आपापला वेगवेगळा ठेवायचा आणि तोही मोजून असा आजींचा हुकूमच होता. बिस्किटांचा पुडा फोडल्यावर किती एकूण आहेत, मी आज किती खाल्ली आणि आता किती उरली आहेत हे रोज लक्षात ठेवायचं. हीच त-हा लाडू, चिवडे, शंकरपाळी, चकल्या यांचीही. संख्या कमी झाली तर आजींवर संशय येऊ नये म्हणून हा बंदोबस्त. “मला काय करायचंय तुमचं? माझ्याकडे आहे माझं चिकार. पण संशय वाईट. त्यापेक्षा हे बरं” असं त्या म्हणायच्या. आता चिवडे-शंकरपाळी कसे मोजणार? असा बेसिक प्रश्न मला पडायचा. पण मी त्यांना कधी विचारलं नाही. सहसा मी त्यांच्या वाट्याला जातच नसे.

सकाळी सातला चहा-बिस्किट झालं की ९-९.३० पर्यंत ऑफिसला पोचायचे. मला तोवरच परत भूक लागायला लागायची. आमचे एमडी तसे दयाळू होते. बेसमेन्टमधले त्यांचे लाडके इंजिनियर नाईट आऊट मारायचे म्हणून पॅन्ट्रीमध्ये त्यांच्यासाठी बिस्किटं असायची. किशोरला रोज अमूक पुडे फोडायचे असं फर्मान होतं. त्यातले दोन पुडे आम्हा वरच्या मजल्यांकरता असायचे आणि उरलेले तळमजल्यासाठी. मी ऑफिसला गेले की फ्रेश होऊन आधी चार बिस्किटं ताब्यात घ्यायचे. ज्या दिवशी क्रीमचं बिस्किट मिळेल त्या दिवशी दिवाळी!! ती तोंडात घोळवत १० पर्यंत खायचे. ११ ला कॉफी. दीडला डबा, जो खाऊन माझं पोट आणखीच कलकलायला लागायचं. रेवा आणि सुनिथाबरोबर मी लंच करायचे. त्यांचे डबे छान, वेगवेगळ्या पदार्थांचे, घरच्या सकस अन्नाने भरलेले असायचे. त्या अर्थातच मला ऑफर करायच्या. पण मी जे काही अन्न खात होते ते मला त्यांना उलटऑफर करणं शक्यच नव्हतं. अतीव संकोच आणि लाज यामुळे मी त्यांच्या डब्यातलं काहीही खाऊ शकायचे नाही. दुपारी चहा. तेव्हा बिस्किटं नसायची. संध्याकाळी ६ ला ऑफिस सुटेपर्यंत अक्षरश: भुकेचा आगडोंब उसळायचा. परतीच्या बसस्टॉपपाशीच एक पाणीपुरीवाला उभा रहायचा. पण मला धीरच होत नसे असं काही विकतचं खायचा. आई मला दर रविवारी पुण्याला गेले की खाऊ द्यायचीच काही ना काही. जास्तकरून लाडू. (ते मोजायलाही सोपे होते!) संध्याकाळी घरी पोचलं कीच ते खायचे हे पक्कं ठसलं होतं मनात. कधी बस उशीरा यायची, कधी वाटेत ट्रॅफिक लागायचा. अनेकदा भूक सहन न होऊन मला रडू यायचं, पित्त व्हायचं पण खाण्याच्या या पॅटर्नमध्ये काही बदल झाला नाही; किंवा मी केला नाही असं म्हणणं जास्त योग्य होईल.

का नाही केला बदल? एकच उत्तर- यात काही बदल करता येईल हेच कधी डोक्यात आलं नाही! वाचायला अत्यंत वेडगळ किंवा न पटणारं वाटू शकतं हे, पण खरंच हेच प्रामाणिक उत्तर आहे. रोज ५० रुपये मोजून आपण जे अन्न विकत घेतोय ते नि:सत्व आहे, त्यासाठी आपण जे पैसे देतो ते खूप जास्त आहेत, आपण पार्ल्यासारख्या ठिकाणी राहतो, आपल्याला अनेक ऑप्शन्स मिळतील, संध्याकाळी जो लाडू आपण घरी येऊन खातो तो आपल्याला डब्यात नेता येईल आणि वेळेवर खाता येईल, आणखी पैसे मोजून आपण फळं, नाश्ता करू शकतो- असा alternative विचार करायची अक्कलच नव्हती. शिवाय एक बिनकामाचा ईगो होता. आता आपण घरापासून लांब आहोत. आईला कोणत्याही त्रासाबद्दल सांगायचं नाही. मुंबईत आपल्याला किती एकटं वाटतंय, आपल्याला बोलायला कसं कोणीच नाहीये, आपल्याला जेवण कसं मुळीच जात नाही हे काहीकाही सांगायचं नाही. तिने काळजीने विचारलेला हरेक प्रश्न टोलवायचा, पण तिचा सल्ला घ्यायचा नाही असा काहीतरी विचित्र हेका होता मनाचा.

असो. सुमारे सहाएक महिन्यांनंतर माझी एक रूममेट पोटाच्या विकाराने आजारी पडली. बाहेरचं खाऊन खाऊन पोटाची पार वाट लागली होती तिच्या. डॉक्टरने तिला एक महिनाभर फक्त मऊ भात आणि मूगाची आमटी खायला सांगितली होती. जेव्हा जेव्हा भूक लागेल तेव्हा हेच. घरी कूकर लावायची तिने आजींना परवानगी मागितली. आजींनी साफ नकार दिला. हा मला धक्का होता. ही रूममेट आजींकडे दोनेक वर्ष तरी रहात होती. आजारी होती. तिला एक महिनाभर साधा भात लावायची परवानगी त्या देऊ शकत नव्हत्या? पथ्य म्हणूनही? ती पैसेही देणार होती. पण आजी द्रवल्या नाहीत. माणसाने रोखठोक असावं, पण तुम्हाला समोरच्या व्यक्तीची साधी गरज समजत नसेल तर काय अर्थ आहे माणूस म्हणवून घेण्याचा? आणि अशी काय अवास्तव अपेक्षा होती तिची? साधा कूकर तर लावायचा होता ना? फार लागलं मला ते. आजींशी तोवर मी फारसा संबंध येऊ देत नव्हते माझा, पण त्यानंतर तर मनातून उतरल्याच त्या. रूममेटला शेजारच्या घरातल्या काकूंनी (बक्कळ पैसे उकळून) डबा दिला महिनाभर.

ही रूममेट तशी चळवळी होती. हे सगळं झाल्यानंतर तिने आमच्याच बिल्डिंगमधली एक मुलगी शोधली. तिच्या हाताला चव होती. डबे द्यावे का असा विचार करतच होती, तोवर आम्ही गि-हाईक म्हणून हजर झालो. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण ती द्यायला तयार झाली. दोन्ही मिळून ३०रू! खरंच चांगली होती ती. हात सढळ होता तिचा, विविध पदार्थही करायची आणि जवळपास आमच्याच वयाची होती त्यामुळे आम्ही तिच्याशी गप्पाही मारायचो. सहाएक महिन्यांनंतर मी नाश्ता करायला लागले. ते एक वर्ष ऑफिसला मात्र माझ्या २०रू.वालीकडूनच डबा नेत राहिले.

आज आपण आपल्या जेवणाचा, घटकपदार्थांचा, उष्मांकाचा किती विचार करतो! पण तेव्हा कुठे गेलं होतं ते शहाणपण? रोज सकाळी आम्ही सगळ्या कमावत्या मुली चहाचे कप हातात धरून आपापाली बिस्किटं खायचो, दरिद्रीपणे आपापला खाऊ मोजायचो आणि खाण्याचा हिशोब करायचो पण मोकळेपणानी कधी आम्ही शेअरिंग केलं नाही. आजींनी नजर आमच्या खाण्यावर असेच. हावरट नव्हत्या त्या, पण अत्यंत भोचक. त्या वातावरणात निकोपपणे काहीच होऊ शकत नसे. परिणामत: मी माझ्या खाण्याचे उगाचच अपरिमित हाल करून घेतले. एखादी तरूण, स्वत:च्या पायावर उभी असलेली, उच्चशिक्षित मुलगी कशी छान कॉन्फिडन्ट दिसायला हवी! आणि मी कशी दिसत होते? निस्तेज, हडकलेली, उदास. मला तेव्हाची मी आठवते तेव्हा माझ्याचबद्दल दया आणि करूणा वाटते. मी स्वत:ला दोषही देत नाही. ती परिस्थिती बदलण्यासारखी होती, पण मी केवळ स्वत:चा गाढवपणाने आहे तशीच जगत राहिले याचं केवळ आणि केवळ दु:ख होतं.

****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष- ८

मुंबई – पुणे – मुंबई

एक वर्ष मी मुंबईत राहिले, पण मनाने तिथे कधीच रमले नाही. का कोणास ठाऊक! कदाचित मी जिथे रहात होते ते वातावरण त्याला कारणीभूत असावं. नोकरीच्या ठिकाणी रमले होते, कामही जमत होतं, लोकांशी थोडेफार बंध निर्माण झाले होते. पण नोकरीचे नऊ तास सोडता, पार्ल्यात मला करमतच नव्हतं. तिथे मला सतत उपरं वाटत असे. माझं पुण्यातलं घर आणि माणसं मुंबईत असती तर तीच नोकरी करत मी आनंदाने मुंबईत राहिले असते. पण अर्थातच हा विचार म्हणजे निव्वळ फॅन्टसी होती. त्यामुळे शनिवार उगवला रे उगवला की मी पुण्याला पळायचे. पुण्यात येऊन काही फार ग्रेट कामं असत वगैरे काही नव्हतं. पण ’आपल्या’ घरी यायचं एक वेगळंच सुख मिळायचं. पुण्यातलं घर ’माझं’ होतं, तर पार्ल्यातलं ’तडजोड’. माझ्या रूमीज मला चिडवायच्या, ’इथे मस्त फिरायचं दिलं सोडून सारखी काय पुण्याला पळतेस?’ पण त्यातली एक होती कोल्हापूरची आणि एक सांगलीची. त्यांना दर आठवड्याला घरी जाणं शक्य नव्हतं, मला होतं, म्हणून मी इमानेइतबारे प्रवास करत होते. अर्थात, कोणत्याच वीकेन्डला मी मुंबईत अजिबात राहिले नाही असं नाही. गिरगाव चौपाटी, दादरचं स्टेशनजवळचं मार्केट, मंत्रालयाची भव्य इमारत आणि त्यासमोरच असलेला मुंबईचा हीरो- समुद्र, वांद्र्याचं फुटपाथ मार्केट, व्हीटी स्टेशन अशा काही मुख्य गोष्टी मी दोन-चार weekends ना मुंबईत थांबूनच पाहिल्या. पण तितपतच.

दर सहा दिवसांनी पुण्याला जायची यातायातच असायची. पण केली मी ती. ’हे आपलं घर नाही’ ही भावना प्रबळ होती. सुरूवातीला आम्हाला ’पास’ सिस्टिम असते याचा पत्ताच नव्हता. माझे वडील बिचारे पंधरा दिवसांचं ट्रेनचं बुकिंग करत असत. मुंबईहून रात्री निघायचं नाही- असं त्यांनी मला बजावलं होतं. त्यामुळे शनिवारी सकाळी ६.०५ची इंद्रायणी आणि रविवारी परत येताना संध्याकाळी ५.२०ची प्रगती असं बुकिंग फिक्स असायचं. मग ऑफिसात किशोरने मला ’पास’चं ज्ञान दिलं. मला सॉलिड आनंदच झाला. अगदीच नाममात्र पैशात लेडीज डब्यातून पास दाखवून प्रवास करता येतो हे माझ्या दृष्टीने फार भारी होतं. मी लगेच वडिलांना कळवून टाकलं आणि पास काढून टाकला. अर्थात, पास का घी देखा था मगर बडगा नही देखा था! वो भी लवकरच देखनेको मिलाच!

पास काढल्यानंतरच्या पहिल्या शनिवारी मी पहाटे दादरला पोचले. इंद्रायणी आली. आता मी लेडीज पासहोल्डर्सच्या डब्यात दिमाखाने शिरले. आत शिरता शिरताच जाणवलं की इथे प्रचंड गर्दी आहे आणि दादा(ताई)गिरीदेखील! आत शिरते तोवर नेहेमीच्या बायकांनी सर्व बाक भराभरा अडवले. रुमाल, पर्सेस टाकून जागा पकडल्या. विन्डो सीट्स तर बघता बघता भरल्या आणि ट्रेन सुरू होईपर्यंत काही बायका चक्क संपूर्ण बाकावर आडव्या झोपल्यादेखील! तीनही सीट्स अडवून!!! मी आणि कित्येक बायका उभ्याच होतो. पण त्यांना उठवायची हिंमत माझ्यात काय, कोणातच नव्हती. त्या बायका ज्या पद्धतीने एकमेकींशीसुद्धा गुरगुरत बोलत होत्या ते पाहून मी विझलेच! असा थोडा वेळ गेला आणि मग टीसी आला. तो आला म्हटल्यावर या बायका उठल्या आणि काही लकी बायकांना बसायला मिळालं. मला अर्थातच नाही मिळालं. मी नवखी होते. माझी ओळखही नव्हती आणि वशीलाही. मी आपल्या रेग्युलर बावळटपणाने फक्त बघत राहिले. प्रवास चालू राहिला. बायकांची गर्दी दर स्टेशनला वाढतच राहिली. हळूहळू गोंगाटही वाढायला लागला. उभंही धड राहता येत नव्हतं. सगळ्या बायकाच. त्यामुळे बिनदिक्कत धक्काबुक्की करत खाणं इकडून तिकडे पास करणे, स्वत:च इकडून तिकडे जाणे वगैरे प्रकार सुरू होते. पार कर्जत आल्यावर माझ्यावर देवाची कृपा झाली. कर्जतला बराच डबा रिकामा झाला आणि मला बसायला जागा मिळाली. तोवर मेंदू आणि पाय दोन्ही बधीर झाले होते.

दुस-याच दिवशी परत येताना तर आणखीच कहर! ५.२० ला ट्रेन सुटायची. मी ५ वाजेपर्यंत पोचायचे. तशीच गेले. पासहोल्डर्सच्या डभात शिरते तर डबा खच्चून, म्हणजे लिटरली खच्चून भरलेला होता. चार-चार बायका एका बाकावर बसलेल्या होत्या आणि डब्यात अक्षरश: पाय ठेवायला जागा नव्हती. मी थक्क झाले. परत एकदा दोन सीट्सच्या मध्ये उभी राहिले. अशा उभ्या असलेल्या बायकांना बसलेल्या बायकांचे अतिशय तुच्छ कटाक्ष मिळतात. रेल्वे कशी नालायक आहे, क्षमतेपेक्षा कसे पास जास्त दिले जातात, सगळ्यांना कसे पैसे हवे आहेत, कोणीही उठून आजकाल पास काढतं (ही कमेन्ट विशेषत: उभ्यांकडे बघून) असं सगळं जोरजोरात बोलणं कोणाचाही विचार वगैरे न करता चाललं होतं. ट्रेन सुरू झाली. मी परत एकदा उभं रहायची मनाची तयारी केली. एक मुलगेलीशी बाई, स्वत:चं बाळ घेऊन टॉयलेट्स असतात तिथे जवळच वर्तमानपत्रावर बसली होती. तिने मला खूण केली आणि शेजारी बसायला बोलावलं. कदाचित मी एकटीच होते, आणि माझ्या चेह-यावर लॉस्ट लुक होता, म्हणून असेल! मला मात्र तिथे टॉयलेटजवळ बसायचा धीर होईना. मी तिला ’नको, ठीके’ असा हात केला. लगेच दुसरी एक माझ्यासारखीच मुलगी तिथे बसली. प्रवास चालू राहिला. हळूहळू खाऊचे डबे उघडले गेले, पदार्थांची देवाणघेवाण चालू झाली. माझ्याकडेही डबा होता, पण उभ्याने खायचा कसा? आता मात्र मला ती जागा न घेतल्याचा पश्चाताप व्हायला लागला. आधी मला तिथे बसायच्या कल्पनेनेदेखील कसंतरीच होत होतं पण भूक लागल्यावर ती जागाही बरी वाटायला लागली! पोटासाठी माणूस काहीही करायला तयार होतो, नाही?

अर्थात, हे अगदी पहिले प्रवास होते. मी होते संपूर्णपणे अननुभवी आणि पासधारक बायका अगदी मुरलेल्या! त्यांच्यासमोर माझा निभाव लागणं शक्यच नव्हतं. पण नंतर मीही सराईत झाले… धावत जाऊन विन्डो सीट पटकवायला लागले, कल्याणपर्यंत झोपून जाऊ लागले, चौथी सीट उभ्या असलेल्या बायकांना ऑफर करू लागले... वगैरे. पण इतपत प्रगती होण्यासाठी मात्र एका अत्यंत अपमानकारक प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. झालं काय, की एकदा पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी डब्यात चढले. नेहेमीप्रमाणे गर्दी होतीच. आता काही चेहरे ओळखाचे व्हायला लागले होते. तेव्हा डब्यामध्ये दोन अत्यंत लठ्ठ मुली, ज्यांना obese म्हणता येईल अशा असायच्या. कोणावर कमेन्ट म्हणून नाही, पण खरंच त्या खूप जास्त लठ्ठ होत्या. त्या नेहेमी समोरासमोरच्या विन्डो सीट्स पटकावून बसायच्या. त्यांच्या शेजारी बसायला एकच जागा उरायची. त्यामुळे एरवी बाकांवर चार-चार बायका बसलेल्या, पण यांच्या बाकावर मात्र दोघीच. पण त्या जरा विचित्र होत्या. आपल्या आकारमानाच्या जोरावर भरपूर मवालीपणा करायच्या, आपसातच जोक्स, कमेन्ट्स करायच्या, त्यांना पसंत पडतील अशाच बायकांना हाका मारमारून आपल्याजवळ बसायला बोलवायच्या. त्यामुळे सहसा त्यांच्या शेजारी एखादी अगदीच आजारी, किंवा मूल घेऊन प्रवास करणारी अशी एखादी ’अडलेली’ बाई बसत असे. एकदा मला कुठून बुद्धी झाली कोण जाणे! त्यातल्या एकीच्या शेजारी मी बसले. दुसरी समोरच होती. तिच्या शेजारीही एक मुलगी होती. एरवी चिकटून चिकटून प्रवास करायला लागायचा. त्या मानाने आज मी मोकळी बसलेले होते- या आनंदात असतानाच समोरची दुसरी मुलगी कुठल्यातरी स्टेशनला उतरली. त्या दुस-या जाड्या मुलीच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक! ती झटकन उठली आणि माझ्या शेजारी येऊन मला दाबून बसली! वर, माझ्यावरून विन्डोच्या जाड्या मुलीला म्हणाली, ’आज जरा गंमत बघू गं’! मी अक्षरश: त्या दोन मुलींमध्ये चिरडले गेले होते. हे मला इतकं अनपेक्षित होतं, की मी तिला काही बोलूही शकले नाही. बर, समोरचा बर्थ रिकामा झाल्यावर तो लगेच चार उभ्या बायकांनी पटकावलाच. अख्खा डबा माझे हाल बघून हसत होता… त्यांना काय फुकट करमणूकच झाली ना. आता मी काय करते?- याकडे सर्वांचे डोळे होते. शरीराने मी चिरडले जात होते, मला ठरवून बकरा बनवलं होतं आणि मी मुखदुर्बळ काही बोलूही शकत नव्हते. अशा वेळी कोणीही मदतीला वगैरे येत नसतं. सगळ्या बायका एकतर बघत होत्या किंवा फिदीफिदी हसत होत्या. त्यांना पाहून त्या दोघी जरा जास्तच सैलावल्या. माझ्या दोन्ही बाजूंना त्यांच्या शरीराचे घट्ट किळसवाणे स्पर्श होत होते. अपमानाने मला काही सुचेनासं व्हायला लागलं. खूप वेळाने, मनाची प्रचंड तयारी करून मी शेवटी उठले. ’हौस फिटली गं’ असं त्यातली एक जोरात ओरडली. मी कशीबशी शेजारच्या बर्थपाशी गेले. तिथे तिघीच होत्या. मानेनीच त्यांना मी जागा देण्यासाठी विनवलं. तर त्यांनी चक्क शेजारी त्या दोघींकडे बोट केलं- मला जणू त्या सांगत होत्या- तिथे बस. मग मात्र मी कुठे पाहिलं नाही. सरळ दारात जाऊन उभी राहिले. अपमान सहन होत नव्हता. तेव्हाच ठरवलं की बस, हा असला घाणेरडेपणा परत सहन करायचा नाही. तोंड उघडायचं. मग जे होईल ते होईल. सराईतपणा येण्यासाठी प्रत्येकालाच काही ना काही सहन करावं लागतं. मला हे सहन करावं लागलं.

…आणि प्रवास चालूच राहिला. शुक्रवारी रात्री मला झोपच येत नसे. गजराचं घड्याळ नव्हतं, मोबाईल नव्हते (त्याकाळी), त्यामुळे सतत दचकून जाग येत असे. पहाटे चारला उठून, पार्ल्याहून पाचची लोकल पकडून दादरहून सहाची ट्रेन घेऊन मी पुण्यात घरी सकाळी दहापर्यंत पोचत असे. आई-वडिलांशी तासभर गप्पा मारल्यावर मग आंघोळ वगैरे. दुपारी आईच्या हातचं जेवण, मग झोप असा अतिशय शांत दिवस जात असे. माझी आई नोकरी करत होती तेव्हा आणि तिला रविवारी सुट्टी नसायची. ती सकाळीच माझ्यासाठी रात्रीचा स्पेशल डबा, आठवड्याच्या खाऊ असं तयार करून जाई. एकही रविवार असा गेला नाही की मी आई जाताना रडले नाही. ’आता मुंबईला जायचं’ या विचाराने गलबलूनच यायचं. वडिल स्टेशनवर सोडायला येत असत. तेव्हाही मी त्यांच्याकडे न बघता झटकन स्टेशनमध्ये शिरत असे. आजीने मला एकदा विचारलं, ’दरवेळी रडतेस, तर जातेस तरी का? एक तर पुण्यात नोकरी शोध, नाही तर रडणं बंद कर आणि आनंदाने जात जा.’ तेव्हापासून मी त्यांच्यासमोर रडणं बंद केलं आणि ट्रेनमध्ये रडायला लागले. लेडीज डबा त्यासाठीच तर होता. ठराविक टोणग्या बायका सोडल्या तर बहुतांश बायका एकमेकींना अबोलपणे का होईना, पण धीर देत असत. प्रत्येक बाई कुठली ना कुठली मजबूरी म्हणूनच तर दुस-या गावी जात होती. तिथे कोण्णी कोण्णाला ’का गं बाई रडतेस?’ असं विचारत नसे. उलट समजून घेत असत. अशाही बायकांचे हृद्य अनुभव आले. ओळखदेख नसताना एकमेकींची विचारपूस होत असे, समजूतीखातर स्वत:चा डबा पुढे केला जात असे, दोन धीराचे शब्द बोलले जात. मी सराईत झाल्यानंतर मीही काही मुलींशी माफक का होईना संवाद साधू शकले, एकदोघींच्या पाठीवर जेन्युइनली हात फिरवू शकले हेच त्या ट्रेनप्रवासाचं समाधान.

*******

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

Keywords: 

ते एक वर्ष- ९

काही वेगळे अनुभव

मी ऑफिस जॉईन केलं तेव्हा अगदी मोजके लोक होतो आम्ही. पण तीनेक महिन्यांतच कंपनीचं एक मोठं डील झालं आणि खूप मोठ्या प्रमाणात इंजिनियर्सची भरती चालू झाली. त्या काळात टेक्निकल डायरेक्टर जवळपास रोजच इन्टरव्ह्यूज घेत होता आणि रोज किमान एक तरी नवा इंजिनियर जॉइन व्हायला लागला. टीडीला मुली-इंजिनियर आवडत नसत. आपलं प्रोजेक्ट खूप मोठं आहे आणि तिथे वेळकाळ न बघता काम करावं लागेल. मुली अशावेळी काही उपयोगाच्या नाहीत. त्यांच्या कटकटी आणि भानगडी जास्त- असं त्याचं स्पष्ट मत होतं, त्यामुळे मी, रेवा, सुनिथा आणि एचारची अरुंधती वगळता ऑफिसात (माझ्यासाठी) हिरवळच हिरवळ चहूकडे होती! अर्थात सगळे इंजिनियर खालीच बसत आणि आमचा-त्यांचा काहीही संबंध येत नसे. तरीपण खाली एखाद्या मिटिंगला गेलो की, कॉफी आणायला गेले की, ही मुलं वर आली की येता-जाता हिरवळ नजरेला पडतच असे. पण माझा हेतू अगदी शुद्ध होता- तो म्हणजे ऑफिसात येणारी मरगळ, किंवा त्यावेळी जनरलीच मी नेहेमी उदास असे- त्यावर उतारा म्हणून मुलं बघणे आणि दोन घटका टीपी करणे. या मुलांचे पगार सुनिथा आणि नीलेश करत. नंतर खूप जास्त भरती झाल्यावर, मीही काही लोकांचे पगार करू लागले. त्यामुळे त्यांचं नाव, पत्ता, जन्मतारीख, शिक्षण आणि पगार अशी सगळी ’व्हायटल’ इन्फरमेशन माझ्याकडे होती. त्यानुसार माहितीचा पडताळा करणे आणि तो-तो मुलगा समोर आला की त्याची माहिती त्याला फिट बसते की नाही हे बघणे असा माझा साधा सोपा सरळ छंद होता- केवळ ’बघणे’ आणि करमणूक करून घेणे- बास! यापेक्षा जास्त कशाची इच्छाही नव्हती आणि अपेक्षाही.

मैत्री न होण्याची अनेक कारणं होती. एक तर आमचा काही संबंधच येत नसे. दुसरं म्हणजे, सुरूवातीला तर एकही मुलगा मराठी नव्हता Sad सगळेच्या सगळे साऊथ नाहीतर नॉर्थचे नाहीतर गुज्जूभाय. जणू काही मराठी मुलं शिकतच नव्हती!! तिसरं म्हणजे यातल्या काही मुलांना ’आमचं काम म्हणजे सर्वश्रेष्ठ’ टाईप उगाचच एक गंड होता. एक प्रकारच्या तो-यातच वावरायची ती. मग तर अशी मुलं माझ्या ब्लॅकलिस्टमध्येच जायची. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे, समजा अगदी ओळख जरी झाली, तरी बोलणार काय? आमचं ध्यान दिसायला अजागळ, बोलण्यात (तेव्हा) मितभाषी आणि इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्सच्या पगड्याखाली! त्यामुळे मी आणि माझं बघणं असं निवांतपणे चालू होतं.

या सर्वाला एकच सणसणीत अपवाद होता. मनु गर्ग!! एकदम क्रश कॅटॅगरी! डील झाल्यानंतर त्याची पोझिशन क्रिएट केली गेली होती. बाकी टिल्लू इंजिनियर्सपेक्षा सिनियर पोझिशनचा आणि टीडीच्या इमिजिएट अंडर होता तो. बाकी इंजिनियर्स त्याला रिपोर्ट करत असत. तो वयानेही माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. उंच, कुरळे केस, दोन्ही गालांवर खळ्या, एक्स्पिरियन्स्ड असल्यामुळे आलेला आत्मविश्वास आणि एकूणच स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाची जाण त्याला होती. स्वत:ला एकदम ग्रेसफुली कॅरी करायचा. ’गर्ग’ असल्यामुळे शुद्ध आदबशीर हिंदीत जनरल संवाद साधायचा. आणि त्याचं ’मनु’ हे नावच कसलं गोड होतं! (इथे माझ्या डोळ्यात बदाम असलेली स्मायली आहे! एरवी मी ’मनु’ वगैरे बालीश नावांच्या धारणकर्त्यांवर एक तुच्छ कटाक्ष टाकला असता. पण या मनुसाठी कैपण माफ होतं!) आमच्या एम.डींची केबिन मी बसायचे त्याच्या बरोब्बर समोर होती. मनु त्यांना भेटायला अनेकदा यायचा. वर आला की आवर्जून रेवा-सुनिथाशी बोलायचा आणि मलाही ’हाय’ करायचा आणि आत कामाला जायचा. काम संपवून परत खाली जाताना एक गोऽऽऽड स्माईल द्यायचा. बस इतकंच. त्याला साधं बोलतानाही इतका effortlessly खळ्या पडत असत की मी अत्यंत अजागळासारखी त्यांच्याकडेच बघत असे. एकदाही धड त्याला मला उलट-हाय करता आलं नाही. रेवा आणि अरुंधती इतक्या सहजतेने त्याच्याशी बोलायच्या. माझं मात्र नेहेमीच त-त-प-प व्हायचं! मनु आपल्याशी, चक्क आपल्याशी बोलतोय या जाणीवेनेच माझे डोळे विस्फारायचे. गप्पा काय डोंबल मारणार मी त्याच्याशी? प्रत्यक्ष एम.डींशी बोलतानाही मी कधी फम्बल केलं नाही, पण मनुसमोर मात्र दांडी गुल! त्यामुळे इथेही मी फक्त ’देखादेखी’वर समाधान मानलं. मनुच्या बाबतीत तेही पुरेसं होतं म्हणा! (रम्य आठवणीत रमलेली स्मायली!)

एव्हाना ऑफिसात काही मराठी मुलंही आली होती. त्यांच्यापैकी अवधूत देशपांडे असं तद्दन मराठी नाव असलेल्या मुलाशी माझी लगेचच मैत्री झाली. खरंच साधा होता अवधूत आणि माझ्याच बसला असायचा. पहिल्यांदा ऑफिसला जाताना खचाखच भरलेल्या बसमध्ये आम्ही भेटलो तेव्हा भलेपणाने त्याने उठून त्याची बसायची जागा मला दिली. इतक्या सज्जनपणाची मला सवयच नव्हती. मला एकदम ’अरे नको कशाला उगाच?’ टाईप वाटलं. पण मैत्री मात्र जमली. सकाळी ऑफिसला जाताना रोज भेट व्हायचीच असं नाही. संध्याकाळी परत जाताना मात्र आम्ही एकमेकांना विचारून निघत असू. ऑफिसमध्ये इन्टर्नल मेसेजेससाठी एक मेसेज प्रोग्राम होता. मला फार भारी वाटायचा तो. (त्यावर मनुला मेसेज टाकून त्याच्याशी आपण भरपूर गप्पा मारतोय असं चिकार डेड्रीमिंग मी करत असे) त्या प्रोग्रामवर अवधूत आणि मी बरेचदा बोलायचो. जनरलच. तो ’खालच्या’ बातम्या मला पुरवायचा.

कॉफी प्यायला आत्ता येऊ नकोस, मशीनपाशी खूप गर्दी आहे;

रायन आणि आशिषचं आज भांडण झालंय, इकडे वातावरण गरम आहे;

आज तुझी तूच कॉफी पी. टीडीबरोबर मीटिंग आहे;

येतेस का कॉफी प्यायला, तुला परितोषचे भयंकर कपडे बघता येतील;

आज बिस्किटं कोणती आहेत? माझ्यासाठी दोन घेऊन ये प्लीज, तुझ्यासाठी कॉफी तयार ठेवतो;

असे हार्मलेस मेसेजेस असत.

थोड्याच दिवसांनी अवधूत आणि वेणू अशी जोडी जमली आणि मग आपसूक वेणू माझाही मित्र झाला. वेणू जुन्या लोकांपैकी एक होता. एकदम सिन्सियर आहे- अशी माहिती मला रेवाने पुरवली. बुटका, सावळा, चश्मिस वेणू हॅपी-गो-लकी मुलगा होता. टीडीने खाली इंजिनियर्सचे ग्रूप केले होते. त्यात अवधूत-वेणू यांची एक टीम झाली आणि आमचं त्रिकूट. या दोघांशी ऑफिसातलं गॉसिप मी करू लागले आणि जनरल गप्पाही. हे दोघेही मुंबईचे होते आणि पुण्याला कधीच आलेले नव्हते! याचंही मला नवलच वाटलं होतं. पुण्याला कसे काय लोक येत नाहीत?- हे वाटण्याइतकी मी साधी होते! :-) त्यामुळे पुण्याच्या गप्पा, मुंबईचं ट्रॅफिक, हमारे मराठी लोगोंमें कैसा होता है- हे वेणूला माझ्या आणि अवधूतच्या धन्य हिंदीत समजावणे वगैरेही विषय असत. वेणूला अरुंधतीवरून आम्ही उगाचच छळायचो. बाय द वे, अरुंधती खरंच एक चीज होती. एक तर ती एच.आरची असून खाली सर्व इंजिनियर्सच्या मध्ये बसायची. वर तिचे हेड- विकास सर बसत. एच.आरचे असल्यामुळे त्यांच्यात बरीच ’गुप्त’ चर्चा चालत असे. पण अरुचा आवाज असा होता, की काहीही गुप्त रहातच नसे! J ती क्युबिकलमध्ये बसायची. त्यामुळे ती काय बोलतेय, कोणाबद्दल बोलतेय ते सगळं सगळ्यांना समजत असे. तिचं आणि विकासचं क्षणभरही पटायचं नाही. ते आपले बॉस आहेत, आपण त्यांना दबून वागलं पाहिजे वगैरे तिला मान्यच नव्हतं. त्यामुळे त्यांचे फोनवरचे वादही जगजाहीर व्हायचे. आणि प्लस ती दिसायला एकदम फटाकडी होती. मस्त कपडे घालायची, मस्त रहायची आणि बिनधास्त होती. सर्वांचे डोळे आपोआपच अरुवर काही ना काही कारणानं पडत असतच. तिचं नाव घेऊन वेणूला चिडवलं की सावळा वेणू एकदम गुलाबी व्हायचा. त्यामुळे त्याला चिडवणं हा माझा आणि अवधूतचा आवडता टीपी होता.

एक दिवस अवधूतने फोन करून रेवाला कळवलं की त्याला बरं नाहीये आणि तो तीन-चार दिवस तरी येऊ शकणार नाहीये. मला जरा चुकल्याचुकल्यासारखं झालं. त्या दिवशी वेणूने अगदी आवर्जून मला कॉफीसाठी खाली बोलावलं. मी संध्याकाळी निघायच्या सुमारासही ’निघालीस का?’ वगैरे मेसेज टाकला. मला छान वाटलं. मी पार्ल्यात ज्या परिस्थितीत रहात होते, तिथे आपलं हवं-नको कोणीतरी विचारतंय हेच फार अप्रूपाचं होतं. दुस-या दिवशी निघताना वेणूने मला मेसेज टाकला- ’उद्या लंचला जायचं का सुप्रियात?’ सीप्झ रोडला ’सुप्रिया’ नावाचं एक छान हॉटेल क्विक लंचेससाठी एकदम प्रसिद्ध होतं. चांगलं जेवण, बरेच ऑप्शन्स आणि झटपट सर्व्हिस- ऑफिसातल्या लोकांसाठी एकदम आयडियल. मी सुप्रियात आधी गेले नव्हते कधी, पण रेवा कधीतरी तिथून ऑर्डर करायची, त्याची चव घेतली होती. मला एक दिवस माझ्या बोअरिंग डब्यातून सुटका अनायसेच मिळणार होती. फारसा विचार न करता मी लगेच वेणूला ’चालेल. नो प्रॉब्लेम’ असं कळवून टाकलं.

दुस-या दिवशी साडेबाराच्या सुमारास मी लंचला बाहेर जाते आहे, जाऊ ना- असं सुनिथाला विचारलं-कम-सांगितलं. तिचा चेहरा बघता तिला ते फारसं पसंत पडलं नाही असं मला वाटलं. खांदे उडवून ती म्हणाली, Ok. But don’t be too late. आमचं लंच मस्त झालं. वेणू was at his courtesy best! रिक्षाने गेलो, आलो, लंचचे पैसेही त्यानेच दिले. मला मुळीच देऊ दिले नाहीत. जेवताना आम्ही आमचं शिक्षण, फॅमिलीबद्दल बोललो. माझी होमसिकनेसची जखम तर सतत भळभळतच असायची. त्यामुळे मीही भरभरून बोलले. ’मुंबई आवडायला लागली का?’ असं त्यानं विचारलं आणि मी विचारात पडले. ’येस ऍण्ड नो’ असं माझं नेहेमीचं पेटन्ट उत्तर दिलं. ’धीरे धीरे पसंद आने लगेगी’ असं तो म्हणाला आणि विषय संपला. आम्ही वेळेत गेलो आणि वेळेत परत आलो. उगाच कोणाला बोलायचा चान्स दिला नाही.

त्यानंतर दोनच दिवसांनी वेणूची ऑफिसमधल्या काही सिलेक्टेड लोकांना ईमेल आली- It’s my Mom’s 50th birthday and we are having a small party at home. You are cordially invited. का कोण जाणे, पण ईमेल वाचताच आपण जाऊ नये असं मला तीव्रतेनं वाटून गेलं. तसंही तो शनिवार होता. वेणूच्या आईसाठी मी पुण्याला जाणं रहित करणं शक्यच नव्हतं. संध्याकाळी आम्ही भेटलो तेव्हा त्याला मी सांगून टाकलं. तो जरा खट्टू झाला. त्याने बराच आग्रहही केला. पण मला खरंच शक्यच झालं नसतं.

सोमवारी दुपारी मी, रेवा, सुनिथा आणि अरु लंच करत असताना रेवाने वेणूच्या पार्टीचा विषय काढला.

“मस्त झाली पार्टी. फार लोक नव्हते. आम्हाला वाटलं होतं तू येशील.”

“अगं मी घरी गेले होते, पुण्याला. मी सांगितलं होतं त्याला तसं…”

“हो का? तरीच वेणू थोडा उदास वाटत होता… काय अरु?”

“अरे त्यात काय? तो पूनमला स्पेशल घेऊन जाईल घरी. बरं झालं ती आली नाही ग्रूपबरोबर. नंतर एकटंएकटं जाता येईल म्हणून मुद्दामच गेलीस ना पुण्याला निघून तू? खरं सांग…”

सूर खेळकर असला, तरी हे काहीतरी हुकलंय याचा मला अखेर साक्षात्कार झाला. माझा चेहरा कम्प्लीट गंडलेला दिसत होता. काय बोलत होत्या या? असं काय बोलत होत्या या? कहर म्हणजे सुनिथानेही हात धुवून घेतले.

“Ya, you people go out for lunch dates and coffee and all. So we thought may be you want to meet his Mom alone. But I tell you its always better that it happens in a group for the first time!”

गो आ ऊट फॉर लंच डेट्स??? एकदा गेलो फक्त. कॉफी? ऑफिसात सर्वांसमोर पीत होतो. तेही पाच मिनिटं. हे असं का वळण लागत होतं? मला एकटीने का भेटायचं असेल त्याच्या आईला? Ohh God! लख्ख प्रकाश पडला. मी हादरलेच. आता हे फक्त यांनाच वाटत होतं, का वेणूलाही? मी ताबडतोब त्यांना गप्प केलं आणि प्रश्न विचारायला लागले. वेणू काही बोलला होता का कोणापाशी? स्पष्ट? का सगळं हवेतच चालू होतं? उगाच छळायला? मग एकदाच्या सगळ्या सिरियस झाल्या. रेवा म्हणाली की वेणू काही थेट बोलला नव्हता, पण त्यांना संशय होता. वेणूच्या बोलण्यात बरेचदा माझं नाव असायचं. शनिवारची पार्टीही तो जवळपास कॅन्सल करायला निघाला होता कारण ’सर्वांना’ यायला जमत नव्हतं. हे सर्व म्हणजे एमडी, टीडी आणि मी! बाकी बोलावलेले सगळे जाणारच होते. मी हे ऐकून थंडच पडले. आता मला त्याच्या अनेक प्रश्नांचा रोख कळला. हे असं व्हायला नको होतं यार! माझ्या बाजूने कधीच कधीच असं काही नव्हतं. वेणू माझा मित्र होता फक्त. मी त्याच्याशी मोकळेपणाने बोलत होते, त्याचं असं का झालं होतं? आणि अवधूत? त्यालाही माहित नव्हतं? का त्याने मला कळूनही काही सांगितलं नाही? का? मी या बायकांना बजावलं की मला वेणूत काहीही इन्टरेस्ट नाहीये आणि वेणूने त्यांच्यापाशी काही हिंट दिली तर त्यांनी हे त्याला व्यवस्थित सांगावं आणि सरळ करावं.

मी तडक अवधूतकडे मोर्चा वळवला. त्याचंही लंच झालं होतं. त्याला मेसेज टाकला- ’चल जरा एक चक्कर मारून येऊ. बोलायचंय.’ आता मुंबईच्या तळपत्या उन्हात काय चकरा मारणार दुपारी दोनला? त्याला समजलं की काहीतरी महत्त्वाचं असणार. तो वर आला, तर बरोबर वेणू! मी हबकलेच. पण म्हणलं बरंच झालं. समोरासमोरच होऊन जाऊदे. आम्ही बाहेर पडलो. मी बोलायला सुरूवात केली.

मी: यावेळी ’कांदेपोहे’ साठी नाव नोंदवून आले अवधूत मी.

अवधूतच्या चेह-यावर एकदम आश्चर्य उमटलं. पण मी सिरियस होते.

वेणू: what’s that?

अवधूत: मतलब arranged marriage केलिये नाम रजिस्टर किया उसने. कुछ समझा?

वेणू एकदम घाईघाईने म्हणाला, “अरे जल्दी क्या है? तेरेको मिल जयेगा ना कोई. तुम्हारे पसंदका. Arranged marriage कौन करता है इस जमानेमें?

मी: मैं करना चाहती हूं वेणू. और मुझे मुंबई में रहनाही नही है. मुझे पूना में ही रहना है. हमारे कास्ट में का लडका मेरे पिताजी ढूंढेंगे. मुझे ऐसेही शादी करनी है. (मी शब्द फार carefully वापरत होते जेणेकरून त्याला समजेल मला काय म्हणायचंय ते.)

वेणू: और कोई तुम्हे यहां अच्छा लगे तो? (समजलं होतं त्याला!)

मी: यहां कहा? ऑफिसमें? चान्सही नही है वेणू. मैं यहां शादी नही, करियर बनाने आयी हू. अगर मुंबई का लडका मिले तो मेरा नसीब. लेकिन उसको ढूंढना मेरे पिताजी का काम होगा, मेरा नही. मेरा फोकस क्लियर है. तुम दोनो मेरे यहां के फ्रेन्ड्ज हो. तो सोचा बतादू. चलो, lets get back to work.

सुदैवाने वेणू हुशार निघाला. त्यानंतर काही दिवस त्याने माझ्याशी बोलणंच बंद केलं. कामही वाढलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी आपोआप बोलायला लागला. तोवर पाणी पुलाखालून वाहून गेलं होतं. अवधूतला मात्र मी बरंच झापलं नंतर. तर तो म्हणे, “मला काय माहित, तुमचं नक्की काय चाललंय ते? वेणू हिंट देत होता. पण नीट काही सांगत नव्हता. मग मी कशाला उगाच पचकून व्हिलन होऊ? तसंही मी नसताना तुम्ही सुप्रियात गेलात. माझी आठवणही काढली नाहीत!”

परत एकदा सुप्रिया! एकंदर तो एक तीस रुपयांचा डबा चुकवण्याच्या नादात केलेलं ते सुप्रिया प्रकरण मला चांगलंच महागात गेलं होतं!

****

Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष - १०

ते एक वर्ष १०- कांदेपोहे

वेणूला मी कांदेपोह्यांबद्दल सांगितलं होतं ते काही खोटं नव्हतं. एव्हाना मी नोकरीत सेटल झाले होते, कमावती होते. आई-वडिलांनी मला विचारलं की आता स्थळं बघायची का, का कोणी शोधला आहेस? कोणी शोधलेला नव्हता, आणि लग्न करायचं होतं (म्हणण्यापेक्षा, लग्न न करायचं काही कारण नव्हतं) म्हणून त्यांना होकार दिला. तेही दोन-चार वधू-वर सूचक केंद्रांमध्ये ताबडतोब नाव नोंदवून आले. त्यानंतर मग जे काही सुरू झालं त्यासाठी मात्र मी मानसिकरित्या मुळीच तयार नव्हते. पार्ल्यातलं एकटेपण त्यापेक्षा निश्चितच सुसह्य होतं. असो.

कागदोपत्री माझं स्थळ उत्तम असल्याने आणि मला ’अनुरूप’ अशी अनेक स्थळं सुचवली गेली असल्याने ’बघायचे’ कार्यक्रम धडाधड ठरायला लागले. दर शनिवारी मी घरी आले, की त्या दिवशी संध्याकाळी आणि रविवारी सकाळी असे किमान दोन कार्यक्रम तरी होतच. बहुतांश वेळेला आम्हीच मुलाच्या घरी जायचो. क्वचित काही कार्यक्रम माझ्या घरीही झाले. शिक्षण संपल्यावर मी पुण्यात नोकरी शोधायला सुरूवात केली होती. पण शेवटच्या इन्टरव्ह्यूपर्यंत जाऊन माशी शिंकत होती, त्याचप्रमाणे कागदावर उत्तम वाटलेल्या स्थळाला प्रत्यक्ष भेटल्यावर काहीच होत नव्हतं. ’क्लिक होणं’ या फ्रेजशी मी नंतर परिचित झाले, पण तेव्हा खरंच कुठेही घंटा किणकिणत नव्हत्या, की व्हायोलिनचे आवाज ऐकायला येत नव्हते. तसं पाहिलं तर जात, वय, उंची, वर्ण, पगार, घरची स्थिती सगळं काही मॅच होत होतंच. सो टेक्निकली काही प्रॉब्लेम नव्हता. पण समोरासमोर बसलो, जुजबी प्रश्नोत्तरं झाली की ’आता काय?’ असं व्हायचं. ’तुम्हाला दोघांनाच काही बोलायचंय का?’ असा उदार प्रश्नही विचारला जाई आणि अशा अनेकांशी मी बोललेही. तिथेही तेच व्हायचं.

माझ्या काहीच स्पेसिफिक अपेक्षा नव्हत्या किंवा अटीही नव्हत्या. तेवढी अक्कलच कुठे होती? मला काय हवं आहे यापेक्षा काय नको आहे हे पक्कं होतं, बाकी कोणत्याची ऍडजस्टमेन्टची तयारी होती. एकत्र कुटुंबात रहायची तयारी होती. खूप जास्त ऍम्बिशियस प्लॅन्स नव्हते. टिपिकल सदाशिव पेठी असल्यामुळे ’साधी राहणी, उच्च विचारसरणी’ यावर भर होता. परदेशात मात्र मला जायचं नव्हतं. तेव्हा अनेक मुली २१ दिवसात लग्न करून अमेरिकेत जात होत्या. पण मला अमेरिकेत जायचंच नव्हतं. याचं कारण म्हणजे इकडे मी जे शिक्षण घेतलं होतं ते अमेरिकेत ठार निरुपयोगी! म्हणजे एक तर तिकडे जाऊन परत शिका नाहीतर घरात बसा. मला दोन्ही पर्याय मान्य नव्हते. (आता वाटतं, की तिकडे जाऊन शिकले असते किंवा बसले असते घरी तर काय बिघडलं असतं? इथे राहून त्या शिक्षणाचा उपयोग करून, नोकरी करून काय दिवे लावले? शिक्षणाचा असा कोणता लय भारी उपयोग केला? पण ही सगळी पश्चातबुद्धी!)

मुद्दा असा, की ’दोघेच’ जेव्हा बोलत असू तेव्हा माझ्यापाशी काही मुद्देच नसायचे डिस्कस करायला! पण किमान समोरच्या माणसाशी गप्पा माराव्यात असं तरी वाटलं पाहिजे ना? तेच नेमकं होत नव्हतं. मुलांमध्ये काही खोट होती का? नाही. काही प्रॉब्लेम होता का? नाही. विचित्र होती का? नाही. मग काय नव्हतं? क्लिक होत नव्हतं. बस हेच उत्तर.

मुलगा पाहून आलो की वडिल विचारायचे, आवडला का? मी म्हणायचे नाही. ते विचारायचे काय नाही आवडलं? मी सांगायचे, सांगता येत नाही नीट. आणि ते गप्प बसायचे. स्थळ पाहून आल्यानंतर त्यांच्याकडून काही फोनच आला नाही, तर मला हायसंच वाटायचं, पण त्यांच्याकडून ’पुढे जाऊया का?’ असा प्रश्न आला आणि मला नकार द्यायचा असेल तर मात्र माझे जाम हाल व्हायचे. होकार नाहीये हे पक्कं असायचं, पण त्यांना न दुखावता आणि मुख्य म्हणजे वडिलांचा अपेक्षाभंग न करता कसं सांगायचं हे मला काही केल्या कळायचं नाही. खूप अपराधीपणाने मी त्यांना ’नाही आवडला’ असं सांगायचे, मग ते पुढे कळवायचे.

कांदेपोह्यांच्या कार्यक्रमादरम्यान मुलं, मुली आणि त्यांचे आई-वडिल हे सगळेच एका विचित्र फेजमधून जात असतात. सगळेच तणावाखाली असतात. लग्नाच्या गाठी स्वर्गामधल्या असल्या तरी पृथ्वीतलावर त्या शोधणं कर्मकठिण. दर वेळी स्थळ बघायचा कार्यक्रम असला की ’हेच असेल का ते?’ या प्रश्नावर सर्वांचंच ध्रुवीकरण- यात मुलगेही आले आणि मुलीही. मुलांनाही धडधड, एक्साईटमेन्ट, नकाराचे अपे़आभंग असणारच की. मुली एकट्याच सफर होतात असं नाही. पण मुलींना मान खाली घालायची वेळ जास्त येते त्यामुळे ते मुलींसाठी जास्त क्लेशकारक असतं असं मला वाटतं. माझ्या बाबतीत सांगायचं, तर एक तर साधारण रूप आणि अगदीच किरकोळ शरीरयष्टी यामुळे ’दिसण्याच्या’ बळावर स्थळ मी पटकावूच शकणार नव्हते. बुद्धिमत्ता आणि कुटुंब यांच्या बळावरच जो कोणी मिळाला असता तो. त्यामुळे त्याचीच वाट बघणं चालू होतं. पण पूर्ण आठवडा एका वेगळ्याच मन:स्थितीत घालवल्यानंतर सुट्टीचा दिवसही फलश्रुती न होणा-या बघण्याच्या कार्यक्रमात घालवायचा जाम त्रास व्हायला लागला होता आणि टेन्शनही येत होतं. या दरम्यानचे हे काही किस्से.

पहिला किस्सा, मी मुलाला दिलेल्या नकाराचा- नेहेमीप्रमाणे त्यांची फॅमिली बॅकग्राउंड उत्तम होती. मुलगाही व्यवस्थित होता. आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. त्याची आजी, आई-बाबा आणि तो असे होते. बोलण्यातून दोन्ही बाजूंनी ओळखी निघाल्या आणि वातावरण अगदी अनौपचारिक झालं. माझे आई-वडिल दोघेही खुश होते. पण मुलगा ज्या पद्धतीने वावरत होता, बोलत होता ते मला काही कारणास्तव आवडतंच नव्हतं. ते सगळे लोक खूपच चांगले होते, प्रेमाने बोलत होते…’हे आपलं सासर’ असं मी इमॅजिन करू शकत होते, पण ’हा आपला नवरा’ असं काही केल्या मनातून ऍक्स्पेटच करता येत नव्हतं. खूपदा मी मनातून स्वत:ला पुश केलं, की काय हरकत आहे? पण मनातून नकारच येत गेला. माझे आई-वडिल आणि आजीही खूपच निराश झाले माझा नकार आल्यावर. सुदैवानेच त्यांनी प्रेशराईज केलं नाही.

दुसरा मुलगा होता ठाण्याचा. मस्त होता. उंच, हॅन्डसम आणि ऍम्बिशियसही. ठाण्यात राहून फोर्टला जायचा. मला एकदम पसंत होता. पण त्याच्यापुढे मी एकदमच सामान्य होते. त्याने नकार दिला, तो मला अपेक्षित होता तसा… पण तरी मनातून एक धुगधुगी वाटत होती... या नकारानंतर मी खरंच खट्टू झाले होते. असो.

त्यानंतरचा किस्सा म्हणजे खरंच क्लेशकारक आहे. अशी स्थिती कोणाच मुलीवर न येवो. सिरियसली. या मुलाची परिस्थिती सेम माझ्यासारखी होती. आई-वडिल पुण्यात, तो नोकरीनिमित्त मुंबईत, दर वीकेन्डला पुण्यात यायचा. इथे प्राथमिक बघाबघी झाल्यावर ’तुम्हाला दोघांनाच काही बोलायचं आहे का?’ या प्रश्नावर तो म्हणाला, बाहेर गेलो तर चालेल का? तोवर ’दोघांचं बोलणं’ म्हणजे घरातल्याच दुस-या खोलीत किंवा बाल्कनीत असे. त्याचा डॅशिंग प्रश्न मला आवडला. वडिलांनी परवानगी दिली आणि आम्ही त्याच्या कारमधून निरुद्देश फिरायला बाहेर पडलो. त्याकाळी मुलाकडे स्वत:ची कार असणं हीही एक रेअर गोष्ट होती :) भरपूर गप्पा मारल्या- मुख्यत्वे मुंबईच्या. तासाभराने परत सोडलं त्याने मला. जाताना म्हणाला, की पुढच्या शनिवारीही भेटूया का? त्याच्या कारमध्ये एक पुस्तक होतं. त्याने मला ते वाचायला दिलं… म्हणाला शनिवारी बोलू यावर. मला हे सगळं जरा वेगळं आणि चांगलं वाटत होतं… आजवरपेक्षा वेगळं. वडिलांना मी सगळं सांगितलं. ते म्हणाले ठीके. भेटा पुढच्या शनिवारीही. पुढच्या शनिवारी तो दुपारी चारलाच आला. आठवड्यात मी पुस्तकाचा फडशा पाडला होता. मस्त होतं पुस्तक. मी आजवर वाचलं होतं त्यापेक्षा वेगळं पण अद्भुत. याची टेस्ट अशी असेल तर फारच छान! मनाने ऑलरेडी एक चेकबॉक्स टिक केला होता. वडिलांनी साडेसातला घरी या अशी तंबी दिली. आम्ही परत लॉन्ग ड्राईव्हला गेलो. घरचे लोक, त्यांचे स्वभाव, करियर, मुंबई वि पुणे अशा कित्येक विषयांवर गप्पा मारत होतो. एक ईझ वाटत होती. मी पहिल्यांदाच एका अनोळखी मुलाशी इतकं बोलत होते. मनात कुठेतरी आशा पल्लवित व्हायला लागल्या होत्या. आम्ही मग हॉटेलमध्ये गेलो. त्याने मला विचारून वगैरे ऑर्डर दिली. माझ्याकडचे एकेक चेकबॉक्सेस हळूहळू टिक व्हायला लागले होते. अखेरीस आपला शोध संपतो आहे असं वाटत होतं. तोही निवांत गप्पा मारत होता, जोक्स मारत होता… त्याच्याकडूनही काही प्रॉब्लेम असेल असं वाटत नव्हतं.

आम्ही खाऊन निघालो आणि मला घरी सोडताना तो म्हणाला, माझी बहिण आणि मी खूप क्लोज आहोत. (तिचं लग्न झालेलं होतं आणि ती अमेरिकेत होती.) तिला तुझा फोटो पहायचा आहे (मोबाईल्स, स्काईपपूर्वीचा हा जमाना आहे), तर मला तुझा एक छान फोटो देशील का प्लीज? (माझे लग्नाळू फोटो काढलेले नव्हते. पत्रिका-माहिती पडताळून धडक चहा-पोहे मोहिमाच चालू होत्या.) इथे मला instinctively काहीतरी खटकलं होतं. पण वरवर मला काही जाणवलं नाही. मी जोरात ’त्यात काय, देते की’ टाईप्स होकार दिला आणि त्याला माझा एक त्यातल्यात्यात बरा असा फोटो दिला. त्याने पोलाईटली माझ्या आई-वडिलांचा निरोप घेतला आणि गेला. इकडे मी ऑलमोस्ट हवेत होते. काय-काय बोलणं झालं मी त्यांना सांगून टाकलं आणि ’माझी या मुलाशी लग्न करायला हरकत नाहीये’ असं थेट स्टेटमेन्ट पहिल्यांदाच केलं. आई-वडिल अर्थातच आनंदले. वडिल म्हणाले, उद्या बोलतो त्यांच्याशी.

मी रात्रभर हवेत होते. लग्नाळू मुलींच्या मानसिकता मोठी विचित्र असते. मी लग्नाळू तर होतेच, पण socially awkward ही होते आणि inferiority complex ने ग्रस्त होते. त्यामुळे ’आपण कोणाला आवडू?’ हीच शंका कायम मनात. लग्नाची खटपट सुरू केल्यापासून अनेक निराशाजनक अनुभव आलेले असल्यामुळे ’आपलं लग्न होणार आहे की नाही?’ या प्रश्नाची पायरी मी चढायला लागले होते. जी मुलं मला आवडत होती, त्यांच्याकडून नकार, जिथून होकार, ती मला आवडत नाहीत अशा विचित्र साखळीत अडकले होते. त्यामुळे एखादा मुलगा आपल्याला आवडला आहे आणि त्यालाही आपण आवडत आहोत आणि इतकंच नाही, तर कदाचित आता आपलं त्याच्याशी लग्नच होईल- ही भावना अत्यंत सुखावणारी होती. मन परतपरत त्या दोन शनिवारी एकत्र घालवलेल्या चार तासांतलं प्रत्येक मिनिट जगत होतं. स्वप्न तर रंगायला लागलीच होती. कुठेतरी एक भावनिक गुंतवणूकही झाली होती. त्या रात्री मी जवळपास तरंगतच झोपले.

दुस-या दिवशी वडिलांनी त्यांच्याकडे फोन केला. नक्की काय बोलणं झालं माहित नाही, पण वडिल आम्हाला म्हणाले, की ते एक-दोन दिवसात कळवतील. त्यांचं मुलीशी बोलणं व्हायचंय अजून. इथे मला परत काहीतरी खटकलं. मुलगी तर लग्न करून गेली. तिचं काय आहे इतकं? आई-वडिल-मुलगा यांना मी पसंत असेन तर मुलीच्या पसंतीचं काय इतकं? मी वरवर काही बोलले नाही. आई-आजी-वडिल काहीतरी तर्क मांडत होते, पण मी नीटसं ऐकलं नाही. परत मुंबईला जायची व्यवधानंही होतीच. पण तो आठवडा मात्र वाईट गेला. मन सतत त्याच-त्या आठवणी जगत होतं, पण स्वप्न बघायची की नाही याचं उत्तर मिळत नव्हतं. मध्यंतरीच्या फोनवर वडिलही काही बोलले नाहीत. पुढच्या शनिवारी घरी गेले. वडिलांनी मला समोर बसवलं, आणि म्हणाले, त्यांचा ’योग नाही’ असा निरोप आला आहे. एकाच वेळी दोन मुली त्यांनी पसंत केल्या होत्या आणि ज्या मुलीवर त्यांची अमेरिकेतली मुलगी शिक्का मारेल, तिलाच फायनल पसंती मिळणार होती. दोन्ही मुली चांगल्याच होत्या, त्यांना कोणतीही चालणार होती. पण तिने दुस-या मुलीला पसंत केलं होतं. आमचा योग नव्हता. फोटोही साभार परत आला होता. एक बारिकसं ’सॉरी’ही आलं होतं.

एका वेळी दोन मुली? कोणतीही चालणार होती?? मुलाचंही हेच मत होतं? इतकं उघडउघड शुद्ध व्यवहाराच्या पातळीवर चालू होतं म्हणजे हे? म्हणजे हा माझ्याबरोबर संध्याकाळी फिरत होता तेव्हा तो सकाळी वेगळ्याच एका मुलीबरोबर असंच फिरून आला होता? जे माझ्याशी बोलला तेच तिच्याशीही बोलला होता? तेच जोक्स केले होते? त्याच हॉटेलात नेलं होतं? मला जाणवलेली ती आमची जुळलेली वेव्हलेंथ खोटी होती? मी त्याच्यात गुंतत होते आणि तो सर्व वेळ मला केवळ साईझ-अप करत होता? सकाळच्या मुलीशी कम्पेअर करत होता? मनात नोट्स काढत होता?- या प्रश्नाला मुलगी क्र. १ ने असं उत्तर दिलं आणि मुलगी क्र. २ ने असं. १ समोर टिक, २ समोर फुली! १ समोर टोटल इतक्या टिक्स, इतक्या फुल्या. २ समोर इतक्या टिक्स, इतक्या फुल्या. एकूणात १ पसंत, २ ला नकार कळवणे. हे असं चालू होतं सर्व वेळ?????

मला इतकी शिसारी आली! किती भाबडेपणा तो आपला… लग्नसंस्थेवर विश्वास ठेवून आपण आपलं मनच कोणासमोर तरी उघडं करतो आणि त्याच्यालेखी तो सगळाच केवळ एक हिशेब असतो? इतकं भावनाशून्य? I was seriously heartbroken. खूप खूप त्रास झाला मला त्या सगळ्याचाच. माझ्या आई-वडिलांनाही हे फार जिव्हारी लागलं. तो वीकेन्ड भयाण शांततेत गेला.

पण नेमेचि येतो पावसाळा… नुसार पुढच्या रविवारीही एक स्थळ बघायला जायचंच होतं. माझी मुळीच इच्छा नव्हती. हे नुकतंच झालेलं प्रकरण खूपच दुखत होतं. कोणावर भरवसा ठेवायचा, कोणाशी काय बोलायचं नक्की आणि त्यातून निष्पन्न तरी काय होणार? मनात निराशाजनक विचार येत होते. त्यात त्यांच्याकडे जायचं होतं सकाळी आणि त्याच सकाळी मित्र-मैत्रिणींबरोबर नेमका सिंहगडाचा बेत ठरला होता. शनिवारी मी घरी कधी नव्हे ते खूप कटकट केली, खूप ओरडाआरडा केला. पण वडिल ठाम होते. झालंगेलं विसरून लग्न ठरत नाही तोवर प्रयत्न करावेच लागतात असं त्यांनी मला सांगितलं. आईने, आजीनेही समजावलं. ते सगळेच त्या वेळी मला इतके बिचारे वाटले की एका पॉइंटनंतर मी कधी ’ठीक आहे’ म्हणाले मलाच कळलं नाही.

आणि मग माझ्याच वयाचे सगळे स्वच्छंदी, आनंदी मित्र-मैत्रिणी जेव्हा खडकवासला, सिंहगड अशी मौजमजा करत होते, त्याच वेळेला मी अत्यंत निरिच्छेने एक मुलगा पहायला गेले. ते रहात होते तो भाग नवीन डेव्हलप होत होता. घर पटकन सापडलं नाही. काहीच्या काही डायरेक्शन्स सांगितल्या होत्या. माझ्या वैतागाने परत डोकं वर काढलं. कसेबसे विचारत विचारत पोचलो एकदाचे. घर अगदी नवीन होतं, नुकतेच शिफ्ट झाले होते ते लोक. दार मुलाच्या आईने उघडलं. त्याचा धाकटा भाऊ पुढच्याच खोलीत पेपर वाचत बसला होता. आम्ही बसेपर्यंत मुलगा बाहेर आला. नमस्कार वगैरे झाले. नवीन लोकॅलिटी, नवीन लोक, शेजारी वगैरे बोलणं चालू असताना मुलाची आई म्हणाली, अरे तिला घर दाखव. मी एव्हाना टोटली निर्विकार मनोभूमिकेत होते. व्हायोलिन, घंटा वगैरे आपल्या बाबतीत काहीही वाजणं शक्य नाही हे मनाने स्वाकारलं होतं. लग्न करताना तडजोडच करावी लागणार आहे हे मी जणू मान्यच केलं होतं. फक्त आधी कोण हरतं?- मी का वडिल याची वाट होती. को-या मनाने मी निघाले त्याच्यामागे घर बघायला. पॅसेजमध्ये एक दार होतं आणि दारावर चक्क उर्मिला मातोंडकरचा ’रंगीला’मधलं ’ते’ उन्मत्त पोस्टर होतं! ते बघताच मला ’चर्र’ झालं. दार बंद होतं, ते उघडण्यासाठी तो एक क्षणभर थांबला. माझी नजर सहज त्याच्या पायांकडे गेली. त्याच्या दोन्ही पायांच्या अंगठ्यांना चक्क लाल नेलपॉलिश लावलेलं होतं!!! I couldn’t believe my eyes! लग्नाळू वयाचा अक्कल असलेला मुलगा होता ना हा? आवडतात नट्या, पण आता झालास ना मोठा? आणि कसलं पोस्टर लावतोस तू स्वत:च्या खोलीबाहेर? बर याच्या लहान भावाने लावलं असेल असं एक घटका मान्य केलं, तरी हा भाऊ ही अंदाजे माझ्याच वयाचा होता. म्हणजेच ते तसलं पोस्टर ’बाय चॉईस’ लावलेलं होतं. नेलपॉलिश तर आठ-दहा वर्षाची मुलंही लावून घ्यायला लाजतात आणि याच्या पायाला लालेलाललाललाल नेलपॉलिश?? ही कसली आवड? काय प्रकार आहे हा? कदाचित त्या सगळ्यालाच एखादं लॉजिकल उत्तर असेलही, पण त्या क्षणी मात्र मी संपूर्ण हुकले. डोक्यात घण पडायला लागले. काय होतं हे? ही वेळ आली होती माझ्यावर? खरंच इतकी वाईट, इतकी गयीगुजरी होते मी? लग्न म्हणजे तडजोड आलीच हे मान्य होतं, पण अशी, इतक्या लेव्हलची करावी लागणार होती मला? एक डिसेन्ट मुलगाही मला मिळू नये? स्वत:बद्दल कमालीची शरम वाटायला लागली. ते शिक्षण, तो ईगो, ते स्वत:च्या पायावर उभं असणं सगळं केराच्या टोपलीत गेलं. लग्न या प्रकाराचाच तिटकारा येऊ लागला.

हे मी पाहिलेलं शेवटचं स्थळ!
****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष - ११

ते एक वर्ष- ११
दिल, दोस्ती, दुनियादारी

एकटेपण, कॉस्मोपॉलिटन वातावरण, विचित्र मालकीणबाई, जेवढ्यासतेवढं वागणा-या, तरीही अनोळखी शहरात एकमेव सहारा असलेल्या बरोबर राहणा-या मुली, आई-वडिलांपासून आणि आपल्या शहरापासून दुरावल्याची खंत या सगळ्या काळ्याकुळकुळीत वातावरणात मी निभावून नेलं ते केवळ माझ्या मित्र-मैत्रिणींच्या भरवशावर. गंमत म्हणजे यातले जवळपास सगळे मित्र नवे होते… ज्यांना मी कशी आहे, कशी वागते, कशी बोलते, माझा भूतकाळ, माझं कुटुंब याबद्दल कोणतीही माहिती नव्हती आणि त्यामुळे प्रीजुडायसेसही नव्हते. मी जशी बोलत होते, व्यक्त होत होते, प्रतिक्रिया देत होते त्यावरूनच त्यांना माझी ओळख पटत होती. ही नवी मैत्री मला कुठे सापडली? करेक्ट! ऑनलाईन फोरमवर.

आता व्हॉट्सॅपमुळे आणि सोशल नेटवर्किंगमुळे ऑनलाईन मैत्री हा काही फारसा नवलाचा विषय राहिलेला नाहीये. पण तेव्हा मात्र ते मला तरी अद्भुत आणि भारी वाटलं होतं. तो होता वायटुकेचा काळ. इन्टरनेट, वेबसाईट ब्राऊजिंग, ईमेल अकाऊंट्स हे सर्वांनाच नवं होतं. मोबाईल तर फारच कमी लोकांकडे होते. लॅंडलाईनवर कामं होत होती. (ब्लॅंक कॉल्स इतिहासजमा व्हायचे होते :winking: ) तेव्हा एखादा ऑनलाईन फोरम असतो, त्यावर एकाच वेळी अनेक लोक येतात, गप्पा मारतात आणि चक्क एकमेकांचे दोस्तही होतात ही संकल्पनाच बावचळवून टाकणारी होती. म्हणजे, माझ्यासाठी तरी होती.

“मायबोली”शी माझी ओळख माझ्या एका मैत्रिणीने करून दिली. ती तिथे कविता लिहायची, त्यावर लोकही कवितेतूनच उत्तर द्यायचे, चक्क कविता आणि चारोळ्यांचे सवालजबाबच घडायचे तिथे आणि तेही खेळीमेळीत! गंमतच वाटली होती मला सगळ्याची. काही दिवस मी फक्त वाचलं. मग मला नोकरी लागली. माझ्या कंपनीचा व्यवसायच संगणकाशी निगडीत होता, त्यामुळे ऑफिसात अनलिमिटेड नेट ऍक्सेस! प्रत्येक अंधा-या रात्रीनंतरच सकाळ होते, तद्वतच हा अनलिमिटेड नेट ऍक्सेस माझ्यासारख्या एकलकोंड्या आणि एकट्या पडलेल्या जीवासाठी एखाद्या लखलखीत सकाळसारखा होता. मी आता ऑनलाईन सोशल फोरमवर अधिकृतपणे प्रवेश केला.

एव्हाना, तोपर्यंत ख-या आयुष्यात असलेल्या मित्र-मैत्रिणी चांगल्याच दुरावल्या होत्या. काही मैत्रिणींची लग्न झाली होती, काहींची व्हायच्या मार्गावर होती. ज्यांची लग्न ठरत होती, त्यांचं विश्व लग्न ठरल्याठरल्या बदलूनच जात होतं. त्यांना माझ्यासाठी वेळ नव्हता, किंवा असला तरी त्यांच्या गप्पांमध्ये नवरा आणि लग्न याशिवाय दुसरा विषयच नव्हता. त्यांच्या दृष्टीनं ते काही चूक नव्हतं म्हणा. पण मला जाम बोअर व्हायचं. त्यामुळे हळूहळू मला जवळच्या मैत्रिणीच उरल्या नाहीत. कॉलेजमध्ये जे मित्र होते ते पुढच्या पोटापाण्याच्या शिक्षणासाठी तरी किंवा नोकरीत अडकले होते. उच्चशिक्षण घेत असताना कोणाशी घट्ट मैत्री झालीच नाही, किंवा होऊ शकली नाही, कारण स्पर्धा तीव्र! सगळं लक्ष अभ्यास करणं आणि पास होणं यावरच लक्ष केंद्रित होतं. पास झाल्याझाल्या मी आले मुंबईत. स्वत:लाच अनोळखी झाले!

अशा रीतीनं रियल लाईफमध्ये कोणीच उरलेलं नसल्यामुळे आणि सध्याच्या जगात नवीन कोणी प्रवेश घेत नसल्यामुळे मायबोलीच्या व्हर्चुअल जगात मी आनंदानं शिरले.

हे व्हर्चुअल जग होतंही अतिशय लोभसवाणं. इथे मनमोकळा संवाद होता, आपण काही लिहिलं की त्याचं कौतुक करणारे किंवा त्यावर काही ना काही पद्धतीनं रिऍक्ट होणारे लोक होते. इथे मी एकटी पडत नव्हते. मी जोक्स करत होते, लोकांनी केलेल्या जोक्सवर कोट्या करत होते, कविता वाचून काहीतरी नवीन अनुभवत होते, अंतर्मुख होत होते. कादंब-या, ललित लेख माझं विश्व विस्तारत होते. इथे मी कोणाला दिसतच नव्हते, त्यामुळे माझं रूप-रंग, करीयर, शिक्षण, महत्त्वाकांक्षा, स्वभाव यांबद्दल कोणालाही देणंघेणं नव्हतं. सगळेच जण केवळ दोन घटका सकस मजेसाठी इथे येत होते. कोणाकडूनही कसल्याच अपेक्षा नसल्यामुळे ऋणानुबंध आपोआपच तयार होत होते. एखाद दिवस मी दिसले नाही तर माझी चौकशी करणारे लोक मला इथेच भेटले, मी सल्ला मागितल्यावर मला तो विनासायास इथेच मिळाला, मी काही बोलले तर ’हिची आणि माझी मतं जुळतात’ असं बिनधास्तपणे लिहून मोकळे होणारेही मला इथेच दिसले. आणि काहीही न बोलता मी नुसती वाचत बसले, तरी जे व्हर्चुअल जग हात आखडता न घेता मला काही ना काहीतरी देतच होतं. असं आपापसात बोलणारं, जगणारं हे जग मला अतिशय आवडत होतं. मला माझे नवे मित्र सापडले, ते इथेच!

या ऑनलाईन विश्वातले बहुतांश लोक अमेरिकेत होते. त्यातलेही ९०% लोक मूळचे पुण्याचे किंवा मुंबईचे होते. हे लोक सुट्टीला भारतात यायचे, तेव्हापासून त्यांना भेटायच्या निमित्तानं हळूहळू मायबोली गटग सुरू झाली. स्थानिक नेहेमीचे यशस्वी लोक प्लस परदेशस्थ कोणीतरी येणार आहे हे निमित्त धरून जवळपास दर वीकान्ताला भेटी व्हायला लागल्या! ऑनलाईन गप्पा, चेष्टा आता प्रत्यक्षातही व्हायला लागली. शाळा-कॉलेजच्या मित्र-मैत्रिणींबरोबर जो कम्फर्ट सापडत होता, तो याही लोकांमध्ये मिळत होता. मी या गटग आयोजकांमध्ये कधी सामील झाले मला कळलंही नाही! मी एरवी मुंबईत असले, तरी दर शनि-रवि पुण्याला जात होतेच. त्यामुळे पुण्याच्या गटग आयोजकात मी असेच. माबोच्या कोणत्यातरी बाफ़वर कोणीतरी घोषणा करत असे, ’मी येतोय, भेटायला आवडेल’ की आमची चक्र फिरायला लागत. काय ईमेल्स करत असू आम्ही! दुसरं कोणतं साधनही नव्हतं म्हणा. चार जणांना फोन करत बसण्यापेक्षा ईमेल्स बडवणं सोपं होतं. माझ्यासारखे आणखी तीन-चार-पाच पर्मनन्ट मेम्बर्सही होते. कोणी नवं असेल तर त्यांच्याबरोबर, आणि कोणी नसेल तर आमचेआमचेच आम्ही अगदी रेग्युलरली भेटू लागलो.

या भेटण्याची इतकी सवय झाली, की आपोआपच आमचा चार-पाच जणांचा असा एक कोअर ग्रूपही तयार झाला. यात मित्र होते, तशाच मैत्रिणीही होत्या. मग पर्सनल ईमेल्स, क्वचित पर्सनल चॅट्स, फोन कॉल्स हेही सुरू झालं. ’पर्सनल’ वर लगेच डोळे टवकारू नका! :P वैयक्तिक इश्युज, गॉसिप्स, जोक्स, चांगलं काही वाचलेलं शेअर करणं असे आणि इतपतच ’पर्सनल’ प्रकार होते. किमान माझे तरी. मला तरी त्या वेळेला सर्वांचेच केवळ चांगलेच अनुभव आले. असं करत प्रत्येकाबरोबर मैत्री एक वेगळा टप्पा गाठत होती. हे क्लिशे आहे, तरीही लिहिते, की माझ्या एरवीच्या मुंबईच्या रटाळ आयुष्यात ही मैत्री खरोखर अनमोल होती. त्यामुळे एखाद्या वीकान्ताला ’कांदेपोहे’ कार्यक्रम असला आणि त्याच वेळेला गटग असलं तर ’गटगला मी येऊ शकत नाही’ हे कळवताना मला अतिशय त्रास व्हायला लागला होता. यावरून घरीही खटके उडायला लागले होते. पण त्याकडे मी फारसं लक्ष देत नव्हते.

माझे जसे ख-या मित्र-मैत्रिणींबरोबरचे बांधलेले हात सुटले होते, तसंच कमीअधिक या माझ्या ग्रूपचंही झालेलं होतं. मागचे मित्र मागेच राहिले, कामाच्या जागी तेवढ्यास तेवढी मैत्री, त्यामुळे आम्ही व्हर्च्युअल मित्र आपसुकच एकमेकांचे घट्ट मित्र झालो. आता माबो व्यतिरिक्तही शेअरिंग आमच्यामध्ये व्हायला लागलं. नुसतं बाहेर भेटणं नाही, तर एकमेकांच्या घरीही येणंजाणं वाढलं. ’कांदेपोहे’ हा विषय कमी-अधिक सगळ्यांच्याच घरात चालू होता. मुलं थोडी निवांत होती, पण मुलींच्या घरात चालू होताच. मग त्या अनुषंगानं आपली मतं मांडण्यासाठी मला तर हक्काचे कानच मिळाले. कारण माझ्या मनातली घुसमट मी आई-वडिलांशी बोलूच शकत नव्हते. मी जेव्हा एखाद्या गटगला जायचे तेव्हा सहज, ’कसे झाले गेल्या वेळचे कांदेपोहे?’, ’नाहीच का जमलं अजून काही?’, ’जो कोण हिचा नवरा होईल त्याचं काही खरं नाही बाबा!’, ’चहा तरी करता येतो का? चाललीय लग्न करायला!’ अशी चिडवाचिडवी व्हायचीच. पण एखादवेळी अगदीच डाऊन असेन, तर ’होईल गं नीट सगळं’ असा मोजक्याच, पण आवश्यक शब्दांत धीरही मिळायचा. बाकीचेही आपापल्या इश्युजबद्दल बोलायचे. कोणाचे आई-वडिल गावी होते, त्यांना मुलाचं ’शहरी’ होणं पसंत नव्हतं, कोणाच्या घरी पैशाचे प्रॉब्लेम्स होते, कोणाचे नातेवाईकांचे होते, कोणाचे पालक-मुलं या अपेक्षांबद्दलचे होते. जे काही होतं ते आम्ही आत्मीयतेनं आणि विश्वासानं एकमेकांशी बोलत होतो. व्यक्त होत होतो. बाकी, पोटापाण्यासाठी नोकरी आणि दंगा करायला सोशल नेटकर्किंग होतंच. पण या माझ्या ग्रूपमुळे ’आपल्या वयाच्या लोकांशी बोलायची’ जी भूक असते ती मात्र माझी अगदी तृप्त होईपर्यंत भागली. Owe it to all of them!

मी ते दिवस मिस करते का? नाही. मिस नाही करत. कारण त्या दिवसांच्या सुरेख आठवणी माझ्या मनात अगदी ताज्या आहेत. ’जो दूर गये ही नही, उनको पास क्या बुलाना?’ :)

****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष- १२अ

मुंबई(ने) मेरी जान (ले ली)

मी ते नेलपॉलिशवालं स्थळ पाहिलं. त्या दिवशी राग, नैराश्य, वैताग, त्रास अशा सर्व नकारात्मक भावनाच सोबत होत्या. घरी पोचल्या पोचल्याच मी कधी नव्हे ते वडिलांना उलट बोलले.

“ही असली स्थळं मी पाहणार नाही. कसा होता तो मुलगा?”

“अगं पण तिथे पोचेपर्यंत मला तरी माहित होता का तो कसा आहे ते?”

“वैतागले आहे मी या सगळ्या प्रकाराला.”

“बरोबर आहे तुझं. पण करायचं काय तेही सांग.”

“ते मला माहित नाही. मी आता पुण्याला येणारच नाहीये. किमान १५ दिवस तरी. म्हणजे ही कटकटच नको. मी एकटीनेच राहते. मला नाही पहायची स्थळंबिळं.”

“हा असला वेडेपणा चालणार नाही. पहायची नाहीत स्थळं म्हणजे? लग्न करायचंय ना?”

“घाई काय आहे हो? इतकं काय आहे तुमचं लग्नलग्नलग्नलग्न? इतकी घाई असेल तर कळवा याच मुलाला होकार. करते याच्याशी लग्न!”

“मूर्खासारखं बोलू नकोस. पसंत नसलेल्या मुलाशी कसं लग्न लावून देईन तुझं? पण पसंत पडेपर्यंत स्थळं बघावी लागतीलच हेही लक्षात ठेव. १५ दिवस यायचं नसेल तर नको येऊस. त्यानंतर मात्र परत सुरू करावंच लागेल.”

परिस्थितीपुढे आम्ही सगळेच हतबल झालो होतो. तरुण मुलीचं लग्न वेळेत करून द्यावं असं माझ्या आई-बाबांना वाटत होतं त्यात काय चुकीचं होतं? पण व्यवस्थित स्थळं येत नव्हती आणि तो सगळा प्रकारच असह्य होत होता ज्यामुळे मी फ्रस्टेट होत होते यात माझं तरी काय चुकत होतं?

शेवटी आई-आजी मध्ये पडल्या. दुपार झालेलीच होती. आम्ही जेवलो आणि जरा उन्हं कलल्यावर मी निघालेच; आता १५ दिवस यायचंच नाही असं ठरवूनच. त्यातून काय सिद्ध होणार होतं कोण जाणे. रागात घेतलेल्या निर्णयाला कधीच लॉजिक नसतं. तसाच तोही होता.

परत येताना ट्रेनमध्ये संपूर्ण वेळ मनात नुसता कल्लोळ चालू होता. उलटसुलट विचार येतजात होते. शेवटी दादरला उतरताना एक निर्णयापर्यंत आले- या पुढे ज्या स्थळाकडून होकार येईल, त्याच्याशी आपण लग्न करायचं. तशी सगळी स्थळं अनुरूपच होती. त्यामुळे क्लिकबिकच्या मागे लागायचं नाही. जे काही असेल त्याच्याशी घेऊ जुळवून. या चक्रातून आता सर्वांचीच सुटका करायची.

निर्णय घेतला खरा, पण मन स्वस्थ नव्हतं. दुस-या दिवशी ऑफिसमध्येही नरमच मूड होता. त्यात माझा कंपू नालायकपणा करत होता! आदल्या दिवशी मी जेव्हा स्थळ बघायला गेले होते तेव्हा ते सगळे खडकवासल्याला गेले होते. तिथे मस्त फोटोही काढले होते. आणि तत्परता अशी की फोटो डेव्हलप करून, ते स्कॅन करून ग्रूप ईमेलवरही टाकले होते! भयानक चिडचिड झाली माझी ते फोटो पाहून! मग बालिशपणे मीही ’जा जा, माझ्याशिवायच जा सगळीकडे. मी येणारच नाहीये आता पुण्याला’ अशी ईमेल केली. मग टपाटप आल्या सर्वांच्या ईमेली:

-गटवला वाटतं कोणीतरी मुंबईवाला. मग कशाला येतेय आता पुण्याला? आम्हीच येतो मुंबईला.

-सुटलो बुवा. ए चला रे, आता बिनधास्त पानशेतला जाऊ येत्या शनिवारी.

-अगं असं काय? पुण्याला येणार नाहीस म्हणजे? काय झालं?

-अरे!! एक गटग ठरत होतं. आता तू नाहीस तर तुझा आवाजही नाही. लोक पोचणार कसे गटगपर्यंत?

-पुण्यावर रागावून कसं चालेल? शेवटी सगळी आपली माणसं पुण्यातच आहेत ना?

चौकश्या, टोमणे, हलकटपणा असं सगळं ’युक्त’ असलेल्या त्या ईमेलींमुळे अखेर माझा मूड परत ताळ्यावर आला.
आठवड्याचे बाकीवे दिवस नेहेमीसारखेच गेले. आणि उजाडला शनिवार. आज काही मला पहाटे चारला उठायचं नव्हतं. मस्स्स्त ताणून द्यायची आहे या विचारानेच आदल्या दिवशी रात्री झोपले होते. आणि साखरझोपेत असतानाच पाय जोरात हलतोय असं लक्षात आलं. पाठोपाठ जोशीआजींचा आवाज, ’जायचं नाही का तुला? ५.१५ वाजले!’ आईशप्पथ!! यांना सांगायलाच विसरले! एरवी दर शनिवारी मी पाचला घर सोडत असे तेव्हा या डाराडूर झोपलेल्या असत. आज बरी यांना जाग आली ती! मी खडबडून उठले आणि जोरात सांगितलं, “नाही जाणारे मी आज”. “नाही का? बर बर. मला वाटलं विसरलीस की काय उठायला. म्हणलं उशीर नको, म्हणून उठवलं. मला काय…” याच्या पुढेही त्या आणखी काहीबाही बोलायला लागल्या. त्यांची ट्रेन एकदा सुरू झाली की… आजींना ऐकायला येत नसे. त्यामुळे त्या सहसा जोरातच बोलत. त्यातून पहाटेचं बोलणं! खूपच मोठ्यानं बोलत होत्या त्या. माझ्या रूमीजही बिचा-या जाग्या झाल्या. आणि परत झोपल्या. मला मात्र झोप येईना! मी नुसतीच पडून राहिले. आत्ता किती वाजले? आत्ता मी कुठे पोचले असते? आज आई काय करेल जेवायला? आज माझा ग्रूप काय करेल? मला कोणी मिस करेल का? वगैरे अत्यंत निरुपयोगी विचार करत कूस पालटत राहिले. शेवटी सातला उठलेच. पण उठून करायलाही काही नव्हतं. माझ्या रूमीज डाराडूर पडलेल्या होत्या. त्यांच्याकडे बघत नुसतीच बसले होते, तेव्हा “त्या काही नवाशिवाय उठायच्या नाहीत” अशी माहिती आजींनी तत्परतेने पुरवली. एकंदर उठल्याउठल्याच फार बोअर झालं मला. पण इलाज नव्हता.

पण नंतरचे दिवस बरे गेले. या मुली उठल्यावर आम्ही सावकाश एल्कोमध्ये एक चक्कर मारली. जेवून टळटळीत दुपारी परत आलो आणि भरपूर झोपलो. संध्याकाळी लिंकिंग रोडला गेलो, टीपी केला, थोडी खरेदी केली.

रविवारीही आजींनी झोपून दिलं नाही. परत पहाटे पाचलाच त्यांनी भाजणी भाजायला घेतली!! कसकसले वास आणि कढईत उलथनं फिरवल्याच्या आवाजाने मी आपली परत जागी! हा काय मंत्रचळेपणा होता त्यांचा!! रूमी नंतर म्हणाली, “त्या तशाच आहेत. एरवी सोमवार ते शुक्रवार आम्ही दिवसभर घरात नसताना त्या काहीही काम करत नाहीत, शनि-रवि मात्र त्यांना पहाटेपासूनच काम असतं खूप. भाजण्या करणं, लाडू भाजणं, डबे-पातेली खाली काढणं, ते पाडणं, ते आपटणं हे अगदी नॉर्मल उद्योग असतात. एकदा तर भर सकाळी ६ ला त्यांनी भजीही तळली होती!” खूप प्रकारचे खमंग, चटकदार खायचे पदार्थ करायचे आणि ते आम्हा मुलींना द्यायचे नाहीत हे त्यांचं ठरलेलं होतं. पण मुद्दाम चिडवल्यासारखं आम्ही असतानाच त्या ते का करत होत्या आणि त्यातून त्यांना कोणता विकृत आनंद मिळत होता, कोण जाणे. बाकी काही असो, लग्न झाल्यावर किमान या असल्या भयंकर बाईपासून सुटका होईल असाही एक विचार माझ्या मनात येऊन गेला.

त्या दिवशी दिवसभर आळशीपणा करून संध्याकाळी आम्ही गिरगाव चौपाटीला गेलो. जाम गर्दी होती आणि समुद्रही ठीकठाकच होता. पण ’मुंबईत समुद्रावर गेले’ हा एक टिकमार्क लागला. तसा तो वीकेन्ड खरं सांगायचं तर बोअरच गेला. त्याच्या पुढच्या वीकेन्डला मुंबईत करायचं तरी काय हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे रविवारी रात्री झोपतानाच पडला होता.

आणि सोमवारी त्याची ईमेल आली.

क्रमश:
****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: 

ते एक वर्ष १२ब- अंतिम

हसले मनी चांदणे

तो म्हणजे माझ्या कंपूपैकीच एक मित्र. तो पुढच्या वीकेन्डला मावशीकडे येणार होता मुंबईला. शनिवारी काहीतरी काम होतं आणि रविवार मोकळा होता. तर ’तू नाहीतरी पुण्याला येणार नाहीयेस, आणि मी मुंबईला येतोच आहे तर दाखव मला थोडी मुंबई’ अशी त्याच्याच शब्दात ऑर्डर होती. मला बरंच वाटलं. एक तर मी पुणे-सिक व्हायला लागले होते ऑलरेडी. मूर्ख हटवादीपणा मोडून त्या वीकेन्डला पुण्याला जावं का असा विचार मनात येतच होता. पण ती आपली हार होईल असं एक मन म्हणत होतं. यानंतर जिथून होकार येईल तिथे लग्न करायचं आहे असं ठरलेलं असल्यामुळे होता होई तो हे एकटेपण अनुभवावं असंही दुसरं मन म्हणत होतं. पण मुंबईत करायचं काय या प्रश्नाचं उत्तर त्याच्या ईमेलमुळे मिळालं. मला पुणं नाही, तर किमान पुण्याचं कोणीतरी तरी भेटणार होतं. मित्रच खरंतर. त्यामुळे माझ्यात एकदम पहिल्यासारखा उत्साह संचारला. कुठे कुठे जाता येईल? आपण न चुकता आणि आपलं फारसं हसं न करता त्याला काय काय दाखवू शकू? जेवायचं काय करायचं? दिवसभर भेटायचं का फक्त संध्याकाळपुरतं? कुठे भेटायचं? प्रश्नांवर प्रश्न! मी मायबोलीवर अंदाज घेतला, मैत्रिणी, रूमीज आणि ऑफिसमध्ये रेवा, सुनिथाचं डोकं खाल्लं आणि शेवटी चर्चगेटपर्यंत जाऊन साऊथ बॉम्बे परिसरात भागात चक्कर मारायची असं ठरवलं. एक तर तिथे जायला डायरेक्ट ट्रेन होती. रविवारमुळे गर्दी कमी आणि साऊथ बॉम्बे म्हणजे कशी पॉश एरिआ. ठरलं. ’पहिल्यांदा कुठे भेटायचं?’ यावर मात्र बराच खल झाला. त्याचं म्हणणं होतं की मी थेट आजींकडेच येतो. म्हणजे चुकामुक व्हायचा काही प्रश्नच नाही. पण जोशीआजींच्या दारात माझा एक मित्र येऊन उभा म्हणजे भयंकर रोमांचक प्रसंग झाला असता. चाळभर चघळायला खाद्य काही मला पुरवायचं नव्हतं. त्याला कशाच्या बळावर काय माहित, पण कॉन्फिडन्स होता की तो मावशीच्या माहीमच्या घरापासून पार्ल्यात नक्की पोचू शकेल. त्यामुळे मग पार्ला स्टेशनवरच भेटायचं असं ठरलं. वेळ सकाळी अकरा.

ही भेट आणि ही सर्व ठरवाठरवी ग्रूप ईमेलवर चालू होती!! म्हणजे येणार होता फक्त तो एकटाच पण सगळे मिळून बडबडबडबड करत होते, सूचना देत होते, टीपी करत होते, खेचत होते… आठवडाभर कल्ला चालू होता नुसता. मला पुण्याचा विरह झाला म्हणून माझ्यासाठी हिन्दुस्थानचे केक आणि चितळ्यांची बाकरवडीपण येणार होती. आय सिम्प्ली लव्ह्ड देम ऑल! आठवड्याचे दिवस रूटीनमध्ये आणि या एक्साईटमेन्टमध्ये सहज गेले.

शुक्रवारीच मी आजींना सांगून झोपले होते, मला उठवू नका. या वेळी सूज्ञपणे कानात बोळेही घालून झोपले, आणि जाग आली तरी जाम उठायचं नाही पहाटे असं ठरवूनच झोपले. त्यामुळे खाडकन एकदम सकाळी साडेसातलाच जाग आली! माझं रेकॉर्डब्रेक झोपणं हे. रूमीज झोपलेल्याच होत्या. खूप लोक सहज नऊसाडेनऊपर्यंत झोपू शकतात. मला कधीच जमलं नाही ते. पण सलग झोप झाल्यामुळे फ्रेश वाटत होतं. त्या दिवशी आमचा काही खास प्लॅन नव्हता. सकाळ तर टंगळमंगळ, आळशीपणा, कपडे धुणे यात गेली. संध्याकाळी पार्ल्यातच चक्कर मारली. पार्लेश्वराचं देऊळ मला फार आवडायचं. तिथे एरवीही मी ऑफिसमधून आल्यावर संध्याकाळच्या आरतीला अधूनमधून जात असे. त्या दिवशी ’देवा कंटाळा आला सगळ्याचा. काहीतरी मार्ग दाखव बाबा’ अशी प्रार्थना केलेली आजही आठवते आहे.

रविवार उजाडला. मला उगाच्च खूप एक्साईटमेन्ट वाटत होती. ऍडव्हेन्चरस वाटत होतं. खास आपल्याला भेटायला आपला मित्र येणार, इथूनतिथून नाही, तर आपल्या पुण्याहून येणार, त्याला आपण आपल्या जबाबदारीवर मुंबईसारख्या अवाढव्य जागी फिरवणार, खूप गप्पा मारणार, जेवायची ट्रीट देणार, परत ट्रेनमध्ये बसवून देणार… एकदम खूप मोठे टास्क्स समोर असल्यासारखे होते. मला लवकरच जाग आली. आज कधी नव्हं ते आजीही झोपलेल्या होत्या. हवा मस्त होती (मुंबई मस्त! ). खूप वेळ मी एकटीच गॅलरीत उभी होते. कुठूनतरी रेडिओचा आवाज येत होता. आमच्या चाळीच्या आवारात दोन मोठे गुलमोहर होते, त्यावर पक्ष्यांची हालचाल होती आणि वातावरण अगदी शांत होतं. ’आजचा दिवस छान जाणार आहे’ अशी खूण का कोण जाणे पटली.

रविवारी रिक्षाचा भोंगा वाजवत चाळीत इडलीवाला येत असे. त्याच्याकडून इडली घ्यायची असं आमचं आदल्या दिवशीच ठरलं होतं. तो बरोब्बर साडेआठला आला. मी चटकन इडली घेतली (- आमच्यापुरतीच), खाल्ली, आंघोळ केली आणि साडेनऊपर्यंत तयारही झाले! वेगळा ड्रेस वगैरेचा काही प्रकारच नव्हता. पंजाबी ड्रेसच होते माझ्याकडे, तेही एकसारखेच. सगळ्या जीन्स पुण्यालाच होत्या. त्या लोळत पडलेल्या असेपर्यंत मी तयारही झाले हे पाहून इतके दिवस कोऑपरेट करणा-या रूमीज अचानकच चिडवायला लागल्या- काय आज अगदी झटपट आवरलंस ते, ड्रेसही फार घालत नाहीस हा, आजच्यासाठी ठेवला होता वाटतं, नीट जाशील ना, परत येशील ना, का तिथूनच पुण्याला जाणारेस वगैरे. मला ते सगळंच काहीच्या काही वाटत होतं. ते इग्नोअर करत साडेदहापर्यंत वेळ काढला आणि ’ऑल द बेस्ट’च्या हाका-या ऐकत शेवटी बाहेर पडलेच.

कितीही टंगळमंगळ करत चालायचं म्हटलं, तरी तेराच मिनिटात मी स्टेशनला पोचले. जिना चढत असताना परत प्रश्नांचा फेर सुरू झाला. तो येईल ना? वेळेवर येईल ना? त्याला सापडेल ना? कितीची लोकल घेतली असेल? स्टेशनवर पहिली ’पार्ला’ पाटी येईल तिथे उभं रहायचं असं ठरलंय, डावीकडून पहिली का उजवीकडून पहिली?- मीच गोंधळायला लागले. किती वाजेपर्यत आपण वाट बघायची? हा सगळा माझ्या कंपूनं केलेला एक हलकट प्लॅन तर नसेल ना? तो येणारच नसेल, सगळे मिळून माझा पोपट करत असतील का? माझी प्रश्नसाखळी सुरू झाली की संपतच नाही. तसंच तेव्हाही झालं. मी विचार करत करतच जिना चढले आणि उतरले आणि मनाला आणि पायांना खाडकन ब्रेक लावायला लागला! समोरच तो उभा!

एक क्षण ’आईशप्पत, ’आला पण?’ झालं! तो खरंच आलेला होता. हा माझा बकरा करायचा कोणताही प्लॅन नव्हता. उलट त्यालाही माझ्यासारखेच प्रश्न पडले होते म्हणून तोही घरातून लवकरच निघालेला होता. आम्ही अगदी सेम पेजवरच होतो. मला एकदम हायसं वाटलं. त्याच क्षणी लावलेले ब्रेक सोडले गेले आणि माझी टकळी सुरू झाली! उत्साहात मी त्याला माझा प्लॅन सांगितला, तसं तो म्हणाला,

“चर्चगेट? मला खरंतर तू राहतेस ते पार्लाच पहायचं होतं!”

पार्ल्यात काय आहे डोंबल? असं न म्हणता, मी म्हणाले, “ते पाहशील नंतर. आपण चर्चगेटलाच जाऊ. तिथून साऊथ बॉम्बेला जाऊ. तो मस्त भाग आहे मुंबईचा. पाहण्यासारखा. हे आपल्या पुण्यासारखंच आहे, पार्लं.”

त्याने वाद न घालता मान्यच केलं एकदम. आज गर्दी खूपच कमी होती ट्रेन्सनाही. आम्हाला आरामात चढायला मिळालं. मी जनरलमधूनच प्रवास केला. न जाणो, तो हरवला कुठे तर? एका अनइव्हेन्टफुल प्रवासानंतर आम्ही चर्चगेटला उतरलो. उतरलो आणि माझा आत्मविश्वास जरासा डळमळीत व्हायला लागला. तशी मी पाहण्यासारखी बरीच ठिकाणं शोधून ठेवली होती. पण अचानक माझ्या लक्षात आलं, की ती बघण्यात त्याला शून्य इन्टरेस्ट असू शकेल! माझी ठिकाणं म्हणजे आरबीआय बिल्डिंग, स्टॉक एक्सचेंज आणि एशिऍटिक सोसायटी. अगदीच काही नाही, तर जहांगीर आर्ट गॅलरी! मला या यादीची उजळणी करतानाही ’पॅं’ वाटू लागलं. इथे काय जायचं? काय विचार करून मी ही ठिकाणं निवडली होती काय माहित! मला अगदीच कानकोंड्यासारखं झालं. चर्चगेटला येऊन तर पोचलो! चांगलं म्हणत होता तो की पार्ल्यातच फिरू. पण मला कोण शायनिंग मारायची हौस! आता? आज तर हॉटेलं पण बंद असतात इथली असं मला सांगितलं होतं. आयुष्यात झाला नाही इतका पोपट होणार आहे याची खात्रीच मला पटली. इतक्यात बुडत्याला काडीचा आधार मिळाला. हा! इथून वानखेडे स्टेडियमला जाता येईल. आणि ओव्हलही. हुश्श! क्रिकेटचं वेड प्रत्येक मुलाला असतंच. याच्याशी तसं क्रिकेटबद्दल कधी स्पेसिफिक बोलणं झालेलं नव्हतं, पण क्रिकेट ही सेफ बेट होती. शिवाय ते सचिनचं होम ग्राऊन्ड. सचिन तर प्रत्येकालाच आवडतो. मी त्याला वानखेडेचं दर्शन करवलं तर तो आयुष्यभर माझा ऋणी की कायसा झाला असताच! मला एकदम तरतरीत वाटलं. डळमळीत झालेला आत्मविश्वास परत आला.

“ए तुला वानखेडे बघायला आवडेल ना? इकडून जाता येईल आपल्याला.”

“वानखेडे?” (बोंबला! नेमकं क्रिकेट आवडत नाही का काय याला?)

“हो. वानखेडे स्टेडियम. सचिनचं होम ग्राऊन्ड. बघायचं?”

“त्यात काय बघायचंय?” (असा का आहे हा? मी परत डळमळीत व्हायला लागले.)

“मला वाटलं तुला आवडेल.” माझी सपशेल माघार. केलेले प्लॅन्स धडाधड कोसळतच होते. मला सरेन्डर करण्याशिवाय पर्यायच नव्हता.

“तसं आवडेलच. पण मॅच असेल तर. रिकामं ग्राऊन्ड काय पहायचंय? आणि मला नाही वाटत असं कोणालाही केव्हाही आत सोडत असतील ते पहायला. पास वगैरे लागत असेल. किंवा कोणाचीतरी ओळख.” हे माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आता मी हरलेच.

“मग? मी इथे आले होते तेव्हा फोर्ट भागात फिरले होते, तेव्हा मला फार भारी वाटलं होतं. सर्वात पॉवरफुल लोक जिथे बसतात, जिथून इकॉनॉमीची सूत्र हलतात ती ऑफिसेस आहेत तिथे. पण तुला ते पाहण्यात काय इन्टरेस्ट असणार?” माझा आवाज हळूहळू कमी कमी होत, शून्य डेसिबल्सलाच पोचला.

“बरोबर आहे तुझं. मग आता काय प्लॅन आहे?”

माझा चेहरा पडला. मी गप्प बसले. मग अखेर माझ्यावर दया येऊन तो म्हणाला, “ठीके, नो प्रॉब्लेम. चल, इथून बाहेर तरी पडू. करू काहीतरी. भटकू कुठेतरी.”

आम्ही स्टेशनच्या बाहेर आलो. कोणता रस्ता घेतला हे मला आठवतही नाहीये. कारण माझ्या प्लॅननुसार आम्हाला थेट टॅक्सीत बसून ऐटीत ऑर्डर द्यायची होती फक्त. सध्या तरी आम्ही चालतच होतो. आणि चालताचालता बोलत होतो. मुंबईत रुळलीस का, आवडायला लागलं का इथलं आयुष्य, पुण्याला का नाही आलीस, माबोवर कोण कोण काय काय बोलत होतं, तो कोणाकोणाला भेटला आहे इत्यादी वळणं घेत संभाषण चालू होतं. आणि चालताचालता अचानक आम्ही एक वळण घेतलं. तो रस्ता अगदी सरळसोट जात होता आणि समोर… समोर पोकळीच होती एक फक्त. ते बघताच माझ्या अंगावर एकदम शहारा आला. समुद्र. समुद्र होता तिथे. आम्ही दोघेही गप्प झालो आणि चालत राहिलो. ती पोकळी जणू आम्हाला बोलावून घेत होती. तिथे पोचलो आणि समुद्राचं अप्रतिम दर्शन झालं. डाव्या हाताला मंत्रालयाची प्रचंड मोठी इमारत होती, टी जंक्शनचा मोठाच्या मोठा आलीशान रस्ता होता, रस्त्याकडेला फुटपाथ होता, कठडे होते, चौपाटीवरचे ते सिनेमात बघितलेले सुप्रसिद्ध गोल लांबट दगड होते आणि भर दुपारच्या उन्हात चमचम करणारा विशाल समुद्र होता. It was breathtaking!

ठरवल्यासारखे आम्ही समुद्राकडे तोंड करून त्या कट्ट्यावर बसलो. नि:शब्द. बराच वेळ. मग अचानक मला तोंड फुटलं.

“काय सुंदर दिसतोय न?”

“ह्म्म. मस्तच!”

यानंतर परत आमचं बंद पडलेलं संभाषण सुरू झालं. बोलता बोलता तो म्हणाला,

“मी काल मावशीकडे आलो होतो, ते एक मुलगी बघायला.”

हे कानावर पडताक्षणीच माझ्या पोटात एक खोल खड्डा पडला. सावरून मी म्हणाले, “तू मुली बघतोयेस? आधी बोलला नाहीस.”

“मुली बघत असं नाहीये. पण मी परत युएसला प्रोजेक्टवर जाईन बहुतेक. दोनतीन वर्ष तरी. आई-बाबांचं असं म्हणणं आहे, की तोवर एखादी मुलगी पसंत पडली तर साखरपुडा करूनच जा. ही मुलगी मावशीच्या नात्यातली आहे. तुझ्यासारखं नाव नोंदवलं नाहीये अजून. तशी घाई नाहीये, पण विषय निघाला तेव्हा मावशी म्हणाली, की ही बघ आधी.”

“कशी आहे मग?”

“चांगली आहे की.”

का कोण जाणे, पण मला हे संभाषणच नकोसं होत होतं.

“मग कधी साखरपुडा?”

“साखरपुडा? मॅड आहेस का? तिच्याशी लग्न करायचं असतं तर आज तुझ्याबरोबर इथे आलो असतो का?”

अं? हो की. पण… म्हणजे…???

त्याने मान तिरकी केली आणि माझ्याकडे बघत म्हणाला, “घरात माझ्या लग्नाची बोलणी सुरू होऊन आठ-दहाच दिवस झालेत. हा विषय निघाला तेव्हा मी फारसा क्लियर नव्हतो, पण तू मागचा वीकेन्ड आली नाहीस, त्या नंतर मी सिरियसली विचार करायला लागलो. काल ती मुलगी पाहिली आणि मग ठरवलंच, की आता सोक्षमोक्ष लावायलाच हवा. तुला भेटलो नाही, तर मी तुला मिस करतो असं माझ्या लक्षात आलं. एक मैत्रिण म्हणून मला तू आवडतेस. तुझी चिडचिड, तुझा मोकळेपणा, तुझं हसणं, वैतागणं, इथे आवडत नसूनही एकटीनंच खंबीरपणे राहणं...सगळंच. आणि मला हे सगळंच कायम बघायला आवडेल. मला असं वाटतंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय. तर तूही माझा विचार करशील का? एक मित्र म्हणून आणि एक लाईफ पार्टनर म्हणूनही?”

त्याचा एकेक शब्द ऐकताना माझ्या हृदयातली धडधड वाढत होती. अशी धडधड मी या आधी कधीच अनुभवली नव्हती. दिल की घंटी अशीच असते का? हा माझ्यावर प्रेम करायला लागला होता, कारण त्याला मी जशी होते तशी आवडलेली होते. हा मला आहे तशीच रहा असं सांगत होता. मी मित्र म्हणून अनेकदा याच्यासमोर रडले होते, ओरडाआरडा केला होता, तावातावानं वाद घालते होते आणि अगदी मनापासून हसलेही होते. आणि तेच बघून तो मला लग्नासाठी मागणी घालत होता! त्याच्या स्वरातला सच्चेपणाच त्याच्या मनाची ग्वाही देत होता आणि माझं हृदय त्याला आपसूकच साद देत होतं. एका क्षणी ही धडधड इतकी वाढली की माझा श्वासच थांबला आणि दुस-याच क्षणी मला रडायला यायला लागलं. अगदी हुंदके देऊन. आम्ही बसलो होतो ते वातावरण, त्याने दिलेली प्रेमाची कबूली, मला झालेलं ’क्लिक’ आणि फायनली एक रीलिफ, की आता भेदलं आपण ते नकोसं चक्र- तेही नाईलाजानं नाही, तर मनासारखं माणूस भेटल्यामुळं- या सर्वांचा तो एकत्रित ईफेक्ट असावा.

पण तो गडबडला ना! “अगं! काय झालं तुला? प्लीज, रडू नकोस. तू विचार कर, ओके. काही घाई नाहीये मला उत्तराची…” त्याची ती धांदल पाहून रडतारडताच मला हसायलाही आलं.

“अगं काय तू? ठीक आहेस ना?”

मी मान डोलावली.

“मॅडच आहेस. बर, हे घे.” असं म्हणत त्याने त्याच्या सॅकमधून ती प्रॉमिस केलेली बाकरवडी आणि कपकेक काढले. आणि एक डेअर मिल्कही काढलं. जे खास माझ्यासाठी ’प्रपोजल गिफ्ट’ होतं. उन्हामुळे त्याचा बट्ट्याबोळ झाला होता. पण ते पाहूनही मला हसायलाच आलं. मला खूप खूप हसायलाच येत होतं. कसाबसा गंभीर चेहरा करून मी म्हणाले,

“मला हे खरंच अपेक्षित नव्हतं. मला हे सगळं पचवायलाच वेळ लागेल, मला दोन दिवस देशील विचार करायला प्लीज?”

“हो अगदी. चार दिवस घे. तुला जेजे वाटत असेल ते विचार, बोल. नो प्रॉब्लेम.”

मी खरंतर उगाच आखडूपणा केला होता. माझं ’हो’ म्हणायचं असं ठरलंच होतं. पण सदाशिवपेठीपणा कुठेतरी
दाखवायलाच हवा ना!

अशा रीतीनं अगदी अनपेक्षितपणे माझ्या अत्यंत आवडत्या समुद्राच्या साक्षीनं, भर दुपारी बारा वाजता मला ’जगात देव आहे’ याची खूण पटली.

नंतरचा प्रवास मग अगदी सोपाच होता. टेकडी चढून आल्यावर सपाटीवर चालल्यासारखा. अशा रीतीनं मुंबईत जाऊन, अनेक वाईट आणि थोडे बरे अनुभव गाठीशी बांधून, थोडंसं शहाणपण अंगी बाणवून पुण्यातली मुलगी परत पुण्याला आली आणि नंतर आनंदानं पुण्यातच राहिली. त्याचं मात्र पार्लं बघायचं राहिलंच!

समाप्त!

****
Disclaimer: Fact and fiction are intertwined together in this work.

लेख: