हेअरकट पार्ट २

दोनेक आठवड्या पूर्वी मी केस कापून आल्यावर मोठया तोऱ्याने एक पोस्ट टाकली होती की कसे केस कापणे, रंगवणे किंवा लांब ठेवणे हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग आहे. मग प्रोफाईल लाही तोच फोटो लावला. आणि हो शिवाय, ऑफिसमध्येही भरपूर हवा करून घेतली. अगदी,"वाटत नाहीस हो आई!" असेही. Wink बोलत बोलत त्या कोरियन बाईने केस कापून कसे सेट केलेत हे काय पाहिलेच नव्हते. आणि इतक्या छोट्या केसांना काय लागतंय? त्यामुळे काय एकूण मजाच होती पहिला आठवडा तरी. पुढे त्याचा पार्ट २ होणार आहे असं बिलकुल वाटलं नव्हतं.

पहिल्या रविवारी, "आता पहिल्यांदा घरी सेट करायच्या आधी मेहेंदीही लावून घेऊ" असा विचार केला . शिवाय इतक्या कमी केसांना लावायची म्हटल्यावर अजून खूष झाले. पण केस धुतल्यावर त्या केसांच्या 'कॉपरच्या तारा' वर दिसत आहेत असे संदीपने म्हटल्यावर मूड गेलाच जरासा. एरवी मोठे केस असले की निवांत क्लिपमध्ये टाकून कामाला लागता येते. पण म्हटले जरा चांगले दिसायचे तर कष्ट घेतले पाहिजे ना? म्हणून मी माझी अस्त्र(हेअर ड्रायर आणि हेअर स्त्रेटनर) घेऊन कामाला लागले. "आपल्याला कधीही आवरायला वेळ मिळत नाही आणि सारखं मुलांचंच आवरत बसायला लागत" अशी तणतण करत मी थोडेफार केस सेट केले आणि आम्ही तासभर उशिराच निघालो. आम्ही बीचवर गेलो होतो. तिथल्या वाऱ्याने केस सगळे उलट सुलट होऊन गेले होते. समुद्राच्या वाऱ्याने फक्त हिरोईनचेच केस हवे त्या दिशेने छान उडतात. आपल्यासारख्या पामरांसाठी ही सोय नाही. त्यामुळे संध्याकाळी घरी बहिणीला फोटो पाठवले तर,"सत्य साईबाबा" अशी कमेंट आली. Sad

आता वीकेंडला असे उलट सुलट झालेले केस घेऊन परत ऑफिसला कसे जाणार? काय सुखात होते आधी मी. एकदा केस धुतले की पुन्हा आठवडा भर बघायला नको. अगदी तेलकट झाले तरी तसेच बांधून जायचे. आठवड्यातून दोन चार वेळा त्यात वेळ वाया घालवायला, वेळ आहे कुणाला? पण नव्याचे नऊ दिवस अजून चालूच होते. त्यामुळे नेहमीपेक्षा अर्धा (अर्धा !!) तास लवकर उठून मी बाकी सर्व आवरले आणि केस सेट करायला लागले. बिचाऱ्या संदीपलाच पोरांचं आवरावं लागलं. नेहमीपेक्षा ५-१० मिनिट उशीरच झाला. बरं हे रात्री सेट करूनही झोपता येत नाहीत. नाहीतर अजून उलट सुलट झाले तर कोण बघणार? सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर पडणारे सुंदर केसही फक्त हिरोईनच्याच नशिबात. आमचं नशीब इतकं चांगलं कुठे? त्यामुळे कडमडत गेलेच ऑफिसला. जरा स्मार्ट दिसणाऱ्या एकाने 'छान दिसतोय कट' म्हटल्यावर कष्टांचं चीज वगैरे झाल्यासारखं वाटलं. पण त्यासाठी सकाळची अर्धा तास झोप गमवावी लागली त्याचं काय?

बरं दिवसभर कीबोर्ड सांभाळायचा की केस? मीटिंगमध्ये बोलता बोलता सारखं कितीवेळा केस मागे सारणार? मिटिंग जाऊ दे, जेवतानाचे काय? कधी कॅफे मध्ये ट्रे बघू की डोळे असा महत्वाचा प्रश्न पडतो. ओले असताना तर अगदी तेरे नाम च्या सलमान सारखे दिसतात. त्या फेज मधून कधी बाहेर पडणार याची वाट पाहत आहे. ट्रेनमधेही एक खांद्याला पर्स आणि दुसरा हात आधाराला वर लटकलेला. पण ते खालचा ओठ वर करून फुंकर मारून केस वर उडवायला फक्त जुही चावलाच हवी. आपण केलं तर ट्रेनमधले अजून चार लोक बघतात. त्यापेक्षा गप केस डोळ्यावर घेऊन उभं राहायचं.

घरी आल्यावरही या त्रासातून सुटका नाही. लांब असले केस की पटकन वर टांगून कामाला लागताना अगदी पदर खोचल्याचं फीलिंग येतं. घरी त्यातल्या त्यात निवांत म्हणजे डोक्याला सान्वीचा पट्टा लावणे. तो बेल्ट लावला तरी जेवणात एखादा केस येणार नाही याची १०० टक्के खात्री नाहीच. शिवाय सानूचे केस आता माझ्यापेक्षा मोठे असल्याने ते बेल्ट जागेवर मिळत नाहीतच. परवा तर शेवटी गाडीत एक होता तो लावला. मध्ये एक दोन वेळा तो बेल्टही मिळाला नाही. म्हणून मग जेवण बनवताना लावायला क्लिप शोधल्या. त्याही एका रंगाच्या मिळाल्या नाहीत. चिडचिड नुसती. रविवारच्या रेससाठी सुध्दा आदल्या दिवशी बाकी सर्व सामानासोबत एक बेल्ट आणि दोन एकाच रंगाच्या क्लिपा शोधून एका जागी ठेवल्या. पहाटे कोण शोधत बसणार? पळतानाही दोन चार वेळा एक बाजूची क्लिप घसरत होती. च्या मारी. फोटोमध्येही कुठेतरी कानामागे तुरे दिसत होतेच.

हे असं किती दिवस चालणार? मला माझे जुने केस हवेत. निदान बांधून टाकले की बाकी कामाला रिकामे. बाकी पोरी कितीही स्टायलिश असल्या तरी हे प्रकरण आपल्यासाठी नाही. पुढचे दोन-चार महिने तरी हे कष्ट करावेच लागतील. नाहीतर आज केले तसे ऑफिसला जातानाही दोन क्लिपा लावायच्या आणि जायचं. हे सेट वगैरे करणाऱ्या मुली नेहमी कशा करतात आणि त्या आवरत असताना त्यांची पोरे काय करतात? आणि हे सर्व करून वेळेत सर्व ठिकाणी पोचतात का? असे अनेक प्रश्न मनात आहेत. खरंच असं नेहमी छान केस सेट करणाऱ्या सर्वांबद्दल मला आता कुतुहूल आणि आदर दोन्हीही वाटत आहे. असो. व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे ठीकेय पण पुढच्या वेळी केस कापायची खुमखुमी आलीच तर आठवण करून द्यायला म्हणून आताच लिहून ठेवते. रिमाइंडर नक्की द्या. :)

विद्या भुतकर.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle