जित्याची खोड

आयुष्यातला पहिला पिझ्झा खाल्ला तेव्हा किती मीठ आणि मिरची त्यात घालू असं झालं होतं. तरीही त्याला चव नव्हतीच. तीच गोष्ट बर्गरची. इतका छान वडा पाव मिळत असताना त्यात संपर्क बर्गरसाठी ३५ रुपये का घालवायचे असा मला प्रश्न पडायचा. पुढे हळूहळू महाराष्ट्रीय जेवण सोडून बाकी पदार्थांची ओळख होऊ लागली. त्यातही गुजराती जेवण गोड असेल तर त्यात थोडं मीठ घालायची इच्छा व्हायचीच. इडली डोसे, सांबार चटणी मात्र जशी ची तशी आवडली आणि पंजाबी जेवणही. अर्थात हे सर्व त्या त्या प्रदेशात न खाता त्यांचं मराठी रूप पाहिलेलं त्यामुळे ते कितपत खरं-खोटं माहीत नाही.
भारताबाहेर आल्यावर मला सर्वात पहिली जाणीव झाली ती म्हणजे पदार्थ 'फिका म्हणजे किती फिका' असू शकतो. सॅलड म्हणून कच्च्या भाज्या कशा खाऊ शकतो कुणी? अर्थात पाण्यात पडल्यावर पोहयाला तर लागणारंच होतं. त्यामुळे वेळ पडेल तसे आळणी चिकन, कधी नुसत्या उकडलेल्या भाज्या कधी कच्ची सिमला मिर्च असलेले सॅलड असे पदार्थ घशाखाली ढकलावे लागलेत. आणि एकेकाळी, 'लोक काय ते सॅलड खातात' म्हणून नाक मुरडणारी मी आता पाचही दिवस ते खाऊ शकते. अर्थात हे बदल व्हायला कमीत कमी १० वर्षं लागली. आता मी पिझ्झा वर केच-अप घेणाऱ्या लोकांकडे बघून भयानक लुक देऊ शकते. माझी एक मैत्रीण शिकागो मधल्या एका भारतीय बफे मध्ये जायला नको म्हणायची. का तर, तो म्हणे हक्का नूडल्स मध्ये हळद घालतो. मला फार हसू आलं होतं. अजूनही येतं. ते हळद घातलेले नूडल्स आठवून. नशीब त्याने त्यात मोहरी घातली नव्हती. :)
तर मुद्दा हा की, भारतीय जेवण इतके सवयीचे पडले आहे की बाकी कुठलेही पदार्थ दिले तरी ते तशाच पद्धतीच्या चवीचे असावेत असा आपण आग्रह धरतो. विशेषतः तिखट घालण्याबद्दल तर बोलायलाच नको. आमचे दोघांचेही आई-बाबा इथे आलेले असताना कुठल्याही हॉटेल मध्ये गेले तरी तिथे सर्व पदार्थात मीठ आणि मिरेपूड घालायचेच. आता एखाद्या आळणी पदार्थात कितीही मिरेपूड घातली तरी काय फरक पडणार आहे? पण प्रयत्न करायचेच. एखादा रोल घेतला किंवा त्यातल्या भाज्या बाहेर येऊन मग त्या रोलसोबत पोळी भाजी सारख्या खायच्या. चायनीज खातानाही आपण खरे-खुरे चायनीज खात नाही. आपण खातो ते इंडियन-चायनीज असते. म्हणजे प्रत्येक पदार्थ 'इंडियन' केल्याशिवाय आपल्याला जातच नाही. इमॅजिन, चायनीज माणसाने 'पनीर टिक्का मसाला' मध्ये सोय सॉस घालून खालले तर?
खरं सांगायचं तर मला नेहमी वाटायचे की भारतीय जेवणच खूप भारी आहे आणि अजूनही ते खरेच आहे. पण काही काही गोष्टी जाणवल्या त्या म्हणजे:
१. आपण जेवण बहुदा गरजेपेक्षा जास्त शिजवतो. त्यामुळे बरेचदा जेवणातील सर्व जीवनसत्व नाहीशी होत असतील. त्यापेक्षा कच्चे सॅलडही खाऊ शकतो.
२. प्रत्येक गोष्टीला तिखट किंवा मीठ सोडूनही बाकी चव असते. शिवाय आपण बाकी गरम मसाले घालतोच. पण त्यामुळे जो पदार्थ खाणार आहे त्याची चव राहात नाही ना. म्हणजे मोड आलेल्या उसळी, स्टर-फ्राय केलेल्या भाज्या यांनाही त्यांची स्वतःची अशी चव असते. पण त्यांना आपण मसाले घालून पार चव मारून टाकतो. म्हणजे माझी भरली वांगी कितीही छान वाटली मला तरी त्यात बिचारं वांगं कुठेतरी हरवून गेलेलं असतं.
३. तिखट हा सर्वात कॉमन असलेला मसाला. प्रत्येक राज्याची स्वत:ची मिरची वेगळी, त्याने बनवलेला घरगुती मसाला वेगळा, त्या मिरचीचा रंग वेगळा, तिखटपणा वेगळा. पण बरेचवेळा त्या तिखटपणा मुळे बाकी कुठल्याही मसाल्याची चव लागत नाही. म्हणजे नुसती मिरपूड आणि बटर लावून केलेला टोस्टही छान लागतो. किंवा फक्त बेसिल घालून बनवलेला पास्ता किंवा थाईम असलेले सूप यांची स्वतःची चव असते. केवळ एकाच मसाल्याला प्राधान्य देऊन केलेल्या पदार्थाची चव घेण्यातही मजा असते.
या सर्व आणि अनेक गोष्टी मी गेल्या काही वर्षात मी शिकले. मध्ये दोन वर्ष पुण्यात असताना मला बाहेर कुठे जेवायला जायचे म्हणले तर फक्त इंडियन जेवण जेवायचा कंटाळा आला. एक दोनदा चायनीज आणि इटालियन जेवायला गेले आणि त्यातही इंडियन चव आल्यावर थोडीशी चिडचिड झाली. अर्थात त्यांचा तरी दोष काय? या अशा सवयी बदलणे खरंच अवघड आहे. :) पण माझं म्हणणं असं की एकदा थोडा दुसऱ्या चवीलाही चान्स देऊन बघायला पाहिजे, हो की नाही? पण खरंतर हे बोलायचा मला काही हक्क नाहीये. :) कालच एका सूप मध्ये मी थोडीशी लाल मिरची पूड घातली होती. सानूने खूप तिखट आहे म्हणून एक चमचा पण खाल्ला नाही. पुढच्या वेळी मला माझा हात आखडता घ्यावा लागणार आहे. पण जित्याची खोड ती अशी थोडीच जाते? :)

विद्या भुतकर .
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle