तोलून-मापून

मुंबईच्या मध्यवर्ती भागातील एक सरकारमान्य खाजगी शाळा. रविवार असल्यामुळे वर्दळ अशी नाहीच. एकच वर्ग तेव्हढा उघडा आणि बर्‍यापैकी भरलेला, तोही लहान मुलांनी नाही तर मोठ्या माणसांनी. 'पॉझिटिव्ह थिंकिंग' या विषयावर कसलीशी कार्यशाळा आयोजित केली होती या वर्गात. मीसुद्धा तिथेच, त्या वर्गातच हजर होते, निपचित पडून जे कानावर पडतंय ते ऐकत होते. तसंही टेबलावर धुळ खात पडलेल्या माझ्याकडे इतर कुणाचं लक्ष जाणार नव्हतंच. व्याख्याता बोलत होता, सकारात्मक रहायाला कसं शिकायचं? आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या चांगल्या घटनांची उजळणी मनातल्या मनात करायची, त्यामुळे आपल्याला खूप छान , प्रसन्न वाटतं आणि सकारात्मकता जोपासली जाते. वाटलं बघुया, आपणही प्रयोग करुन...

गत जीवनातील घडामोडी आठवण्याचा प्रयत्न करत असतांनाच डोळ्यांसमोर आली, ती साधारण वीसेक वर्षांपूर्वीची घटना, सकारात्मकता वाढवणारी होती की नाही, माहीत नाही, पण हेच आठवले खरे ... या इथेच, याच वर्गात सावंत बाई मला हातात धरुन त्या चिमुरड्या राजूला मारत होत्या अन राजू कळवळत होता. हातावर वळ उमटले होते बिचार्‍याच्या. आई गं.... माझंही मन गलबललं ते बघून, चूक काय तर गॄहपाठ केला नव्हता राजूने, शिवाय त्याला सोडवायला सांगितलेलं गणितही चुकला होता तो... आज इतक्या वर्षांनीही तो प्रसंग जसाच्या तसा डोळ्यांसमोर तरळतोय आणि मन हळहळतंय.....पण आता काही महिन्यांपूर्वी त्याच राजूच्या बॅचचं रियुनियनही झालं होतं इथेच, याच वर्गात सावंत बाईंना उद्देशून राजू बोलला होता की ‘बाई, मी इतक्यांदा तुमच्या हातचा, पट्टीचा मार खाल्लाय, की आजही कोणतेही गणित सोडवताना तुमची आठवण होते आणि चुकुनही हातचा घ्यायला विसरत नाही मी.” सर्व वर्गात खसखस पिकली होती ते ऐकून. तो मार खाणारा राजू आज मोठ्ठया कंपनीत मॅनेजर झालाय, कसला रुबाबदार दिसतो आता. सावंत बाईंसारखंच काहीसं मलाही वाटलं राजूचं बोलणं ऐकून की माझ्यामुळे याच्या हातावर वळ उमटले असतील पण त्या वळांमुळेच आज त्याच्या जीवनाला योग्य वळण लागलं,राजूला हे दिवस बघायला मिळाले,खरंच माझाही वाटा आहे ना राजूला घडवण्यात..... अरे वा.... आठवली तेव्हा अप्रिय वाटणारी घटना शेवटाला मात्र खरोखर पॉझिटिव्हिटी देऊन गेली की..... हे व्याख्याते बोलतायत त्यात तथ्य तर आहेच.

इतकी खूश झाले मी ! हा असा विचार मी कधी केलाच नव्हता. स्वतःला शिक्षकांच्या हातात पाहून चळचळा कापणारी मुलं आठवून फक्त उदासच होत होते मी आणि आतल्या आत कुढतही होते, आपण कुणालाच हव्याशा वाटत नाही या विचाराने.पण याच गोष्टीला असलेली, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्याची, तेव्हा अदॄष्य असणारी व आता लकाकून दिसणारी झालर माझेही मन मोहरुन गेली. नकळत मला हा छंदच जडला, गतजीवनातील अशा घटना आठवून त्यांवर विचार करण्याचा.

हळूहळू माझेही मन माझ्यातील सकारात्मक गोष्टी शोधू लागले, त्या म्हणजे, मी म्हणजे काही फक्त द्वाड, बेरक्या, बेशिस्त मुलांना शिक्षा करण्याचे साधन नाही, तर माझा मूळ उपयोग, ज्यासाठी माझा शोध लागला तो फार मोठा आणि तितकाच महत्वाचा आहे. मोजमाप, आखीव-रेखीवपणा या शब्दांना माझ्यामुळेच अस्तित्व आले असावे. अगदी चिमुरड्या मुलालाच काय, थोरामोठ्यांनाही सरळ रेघ काढण्यासाठी मी लागतेच ना! माझ्या शरीरावरील अर्थपूर्ण रेघोट्यांनी मानवजातीला ‘मोजमापाचे’ एक अवाढव्य दालन खुले करुन दिले आहे. वस्तूची लांबी, रुंदी,उंची मीच मोजून देते माणसांना. माझ्यामुळेच माणूस तुलना करु शकतो दोन वस्तूंच्या परिमाणांची. खरंच, मी म्हणजे आधुनिक विज्ञानाशी सांगड घालून देणारी उपयोगी वस्तूच.... माझ्या नावाचा उपयोग करुन एखाद्या व्यक्तीचा कलागुण वाखाणला जातो. 'अगदी ‘पट्टीची’ गायिका आहे हो ही', आले ना माझे नाव? माझ्याशिवाय का कुणाचं पान हललंय? हस्तकला, चित्रकला, भूमितीतील आकॄती, रसायन-भौतिक शास्त्रातील विविध प्रयोग, , अभियांत्रिकी, स्थापत्यकला, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, झालंच तर स्वयंपाकपाणी या सगळ्यांमध्ये माझा सक्रीय सहभाग आहेच की. अगदी अल्प काळात मी किती क्षेत्रे काबीज केलीत... आज विचार करायला गेले तेव्हा जाणवलं माझं मला. कोणतंही काम हे क्षूद्र नसतं, तसंच कोणतीही निर्जीव वस्तूसुद्धा क्षूद्र नसते याचं मूर्तिमंत उदाहरण आहे मी !!

मात्र एक गोष्ट तितकीच खरी की आताशा माझा शाळेत फारसा वापर होत नाही. काय टाप लागलेय कुठल्या शिक्षकाची, मला हाती धरुन एखाद्या विद्यार्थ्याला मारायची , मारणं तर दूरच नुसती उगारायची? 'छडी लागे छमछम' चे दिवस गेले आता. कुणा शिक्षकाला विद्यार्थ्याला मारल्यामुळे कोर्टात जायला आवडेल? मग भले तो न शिकेना का? त्याला त्याचा पगार मिळतोच आहे ना. शिवाय साईड इंकम ही आहेच शिकवण्यांचा. शाळेतच जीव तोडून शिकवण्याचे दिवस राहिलेत कुठे आता? ही एव्हढी मोठी कोचिंग क्लासेस इंडस्ट्री नफ्यात चालायला नको?

हे सारे आपले माझ्या कानांवर पडते ते सांगतेय हं, मी कुठे गेलेय सगळे तोलून मापून जोखायला? आताशा तर शाळेत शिक्षक आकॄती काढून शिकवण्यासाठीही मला वापरत नाहीत फारसे. ‘एड्युकॉम सॉफ्ट्वेअर’ आलेय प्रत्येक शाळेत, सगळं प्रोजेक्टरवरच शिकवलं जातंय हल्ली. म्हणूनच मघाशी म्हटले ना, की मी आपली टेबलावर धूळ खात पडली आहे.

नाही नाही, हताश होऊन नाही बोलत मी हे, मला आनंदच आहे मानवजातीची प्रगती पाहून. स्वतःची प्रगती करण्यासाठी त्याने जी साधने शोधली, त्या साधनांचीही आता त्याला निकड भासेनाशी झाली आहे. पण.....

पण या मोजमापाच्या गदारोळात माणूस फारच गुरफटला गेला, ते पाहून जरा मन खट्टू होतंच. फक्त भौतिक साधनांचे मोजमाप करायचे असते हा गाभाच विसरला तो. व्यक्तिगत जीवनातील भावभावना, नातेसंबंध, मैत्र या बाबतीत माझा आधार नसतो घ्यायचा हे कदाचित त्याला त्याच्या कोणत्याही शिक्षकाने शिकवलेच नाही. शिक्षकांना त्याची गरज आहे असे वाटलेच नसावे बहुदा, पण ते तसे नाही. अरे माणसा, या गोष्टी शिकून घेण्याची वेळ आली आहे. नको करुस इतके मोजमाप प्रत्येक बाबतीत, सोडून दे मला आणि जग भरभरुन मुक्तपणे. सकाळी जाग येताक्षणीपासून वेळेचे मोजमाप, फिटनेस, कॅलर्‍या यांचे मोजमाप करुन तोलून मापून आहार, विहार, शोकेसमधे ठेवल्यासारखे तोलून मापून गुडीगुडी फॉर्मल बोलणे, अरे हस कधीतरी मनमोकळा निवांत, मित्र मैत्रिणींच्या गळ्यात पडून, मग असे ना बघत कुणीही, एक दिवस तरी असा ठरव की मी आज काहीही तोलून मापून करणारच नाही, जे जेव्हा हवे ते, हवे तसे स्वच्छंदी जीवन जगेन, बघ रे किती मजा असते यात, तू भोगलेयस हे सारे लहानपणी. कधी बस म्हातार्‍या आई- वडीलांसमोर जरा निवांत, ऐकून घे त्यांनाही, नको पाहूस तेव्हा लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये, अरे त्यांनी नाही केले रे कधी मोजमाप तुला वाढवतांना खाव्या लागणार्‍या खस्तांचे. आज काही घरांत असेही दॄष्य दिसतेय की आई-वडीलांचीदेखील मुलांच्या संख्येनुसार, वर्षाच्या समसमान महिन्यांत विभागणी - तोलून-मापून अगदी, ना एका मुलाकडे एक दिवस जास्त रहायचे ना एकाकडे कमी….समजतंय रे मला की तुमच्याही अडचणी आहेत न संपणार्‍या, पण त्यावरचा उपाय म्हणजे चोख मोजमाप हा नसावा असे वाटते रे, म्हणून बोलतेय मी बापडी.

यात सर्वस्वी तुमचाच दोष आहे असं नाही म्हणायचंय मला. लहानपणापासून ज्या जीवघेण्या स्पर्धेला सामोरं जावं लागलंय तुम्हाला त्या स्पर्धेचा, तीत टिकून राहण्यासाठी करावी लागणारी प्रचंड मेहनत, या सार्‍याचा परिपाक आहे हा. यातून मग समाजमान्य ठोकताळे, नियम यांतून तावून सुलाखून निघतांना तुमचीही कसरत होतेय, प्रत्येक क्षणी, प्रत्येक पातळीवर स्वतःला सिद्ध करावं लागतंय नाहीतर मागे लगेच आहेच कुणीतरी तयार तुमची जागा घ्यायला. यांतून साध्य काय होणार? याचं उत्तर आहे पैसा, श्रीमंती, मानमरातब, यश, हो बरोबर, हे सारं हवंच की आयुष्यात, फक्त थोडं थांबा. ब्रेक नका मारु, तर एक गियर कमी करुन, छोटासा पॉझ घेऊन जरा विचार करा स्वतःच्याच वागण्याचा. तुमचं तुम्हालाच कळून चुकेल की किती गोष्टी आपण अशा करतोय ज्याची खरंच गरज नाहीये, या न करताही आपण स्पर्धेत टिकूच टिकू, एव्हढेच नव्हे तर, यशस्वी देखील होऊ. थोडं कामाचं नियोजन, प्राथमिकतेनुसार वर्गवारी, हाताखालच्यांवर विश्वास ठेवून त्यांवर सोपवलेली कामे, कधीतरी नकार देण्याची तयारी आणि आपल्याला एक 'कुटुंब आहे आणि कौटुंबिक जीवन आनंदाने जगण्याचा हक्कही आहे याची जाणीव’, या इतक्या बाबी जरी साधल्यात तरी चालण्यासारखं आहे की... मुलांना वेळ देता येत नाही म्हणून त्यांचे अतोनात लाड करण्यापेक्षा त्यांना रोजचा तुमचा दर्जेदार वेळ देऊन अगदी माझा वापर करुन बोचरी शिस्तही लावा की, काय बिघडतंय? माझा मार सोसूनच तुम्हीही तयार झालात ना, तशीच ही नवी पिढीही होऊ दे दणकट, भक्कम.

एक मात्र नक्की कराच, मुलांना जेव्हा माझा उपयोग करायला शिकवाल ना तेव्हा माझे अ‍ॅप्लिकेशन करतांना 'नातीगोती, मैत्री’ यांना आवर्जून वगळा यादीतून. त्यांना निसर्गाचं उदाहरण द्या. बघा म्हणावं हा निसर्ग कसा मुक्तहस्ताने स्वतःकडची संपत्ती मनमुराद उधळत चालला आहे, लुटून घेतोय आपण सारे हा खजिना पण त्याने कधी मोजदाद केली? कधी त्याचे ब्रँडनेम पाहिलेय कुणी या पावसावर, फुला-फळांवर? 'निसर्ग छाप पाणी' असे काहीसे? नाही ना? आईच्या मायेनं तो लेकरांना भरभरुन देतच आलाय, त्याच्याकडून हे शिका, बाळांनो की प्रत्येक बाबतीत मोजदाद नसते करायची, आपले माणूसपण जपायचे असेल तर काही बाबतींत आपले ' तोलून मापून' वागणे - बोलणे आवरते घ्यायलाच हवे, मात्र तेही भोवतालच्या परिस्थितीचा, इतर माणसांचा, अदमास घेऊन, डोळसपणे अर्थात अगदी तोलून - मापूनच.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle