‘प्रकाशवाट’ - मराठी अनुवाद - वंदना करंबेळकर - ग्रंथाली प्रकाशन of ‘Woman Unbound' - व्होल्गा !!!

जगण्याचा अवघड घाट ओलांडत जगणार्‍यांच्या कथा....
October 19, 2013 at 11:53pm

माणूस हा समाजप्रिय प्राणी समाजात स्वत:ला सामावून घेताना रूढी-परंपरांमध्ये अडकतो, कधी अन कसा हे त्याचं त्यालाही समजत नाही. स्त्रीच्या बाबतीत तर तिने कसं असावं-दिसावं-वागावं, काय करावं, काय करू नये हे लग्नाआधी तिचे आई-वडील ठरवत असतात आणि लग्नानंतर नवरा आणि/ किंवा मुलं! तीदेखील त्यांच्या ‘प्रेमळ’ आग्रहाखातर तशीच वागते.‘श्शी, काय रंग आहे! माझ्याबरोबर येताना ही साडी नको हं!’ नवरा असं म्हणाला की ती म्हणणार, ‘जाऊ दे! उगाच थोडक्यासाठी वादावादी नको.’ आणि मग कधीतरी आई-वडिलांजवळ कुरकुर केली की ते म्हणणार, ‘एकत्र असताना तो म्हणेल तसंच करत जा ना! एरवी तू तुझ्या मनाप्रमाणे वागू शकतेस ना, मग अशा छोट्या गोष्टींत उगाच वाद वाढवू नयेत!’झालं.. मग तीही मुकाट्याने तसं वागायला सरावते. इकडे नवरा खुश(!) आणि तिकडे आई-वडील हुश्श! मात्र, असं सगळ्यांचं सगळं म्हणणं ऐकण्याची सवय अंगवळणी पडली की कालांतराने ‘तिला’ स्वत:ला काय हवंय ह्याचा विचारही ती करेनाशी होते.
‘अहो वहिनी, तुमचे डोसे किती मस्त होतात!’ असं ऐकलं की वहिनींचा उत्साह दुणावतो आणि चुलीशी तासंतास उभं राहून, घामाघूम होत वहिनी डोसे घालत रहातात.

असं का होतं? तिला स्वत:चा काही पर्यात असतो की नसतो? तो जर तिला वापरायचाच नसेल तर मग बोलणंच खुंटलं. पण जर शक्य असेल तर ती तो वापरते का? स्त्रीने स्वत:ला सोयीचा पर्याय वापरला - स्वीकारला की तिचं जगणं सोपं होतं किंवा कसं त्याच्या गोष्टी सांगणारं पुस्तक... ‘प्रकाशवाट’! ‘Woman Unbound' - व्होल्गा ह्या लेखिकेच्या मूळ तेलुगु कथांचा इंग्रजी अनुवाद अल्लादि उमा आणि एन. श्रीधरन ह्या प्राध्यापक-द्वयीने केला आहे. त्याचा मराठी अनुवाद केलाय वंदना करंबेळकर ह्यांनी आणि प्रकाशक आहेत ग्रंथाली प्रकाशन.

आपण कुणाच्या पोटी, कोणत्या कुटुंबात जन्माला येतो ह्याचं स्वातंत्र्य कुणालाच नसतं. पण ‘मी’ची ओळख झाल्यानंतर स्वतंत्र बाण्याने जगणार्‍या व्यक्ती, स्वत:मध्ये विचार-परिवर्तन घडवून आणत ‘आपण जसे आहोत तसे’ जगण्यातला आनंद उपभोगतात. स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या जबाबदारीचं त्यांना पुरेपूर भान असतं. अशी व्यक्ती जर स्त्री असेल तर तीसुध्दा मनाची कुचंबणा होऊ न देता ती मजेत जगते.कोंबडं झाकून ठेवलं तरी उजाडायचं थांबत नाही आणि स्व-जागृतीची अन आत्मभानाची जोड अन ओढ असेल तर जाग येण्याला कुणी अडवू शकत नाही.

‘प्रकाशवाट’ ह्या कथेतील सरस्वती. तिची ‘घडणावळ’ आई-वडिलांच्या इच्छेनुसार होते. आई तिच्यावर वेगवेगळे धार्मिक संस्कार करते, धर्मग्रंथातील गोष्टी सांगते आणि सणाच्या दिवशी ठराविक आशिर्वाद देते - ‘चांगला नवरा अन सुखी वैवाहिक आयुष्य लाभू दे!’ तिची उपजत हुशारी लक्षात घेऊन तिचे वडिल तिला कलेक्टर बनण्यासाठी प्रोत्साहन देतात. एकाच वेळी ती वधूपरीक्षा आणि सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देते. दोन्हींतही उत्तम पास होते. लग्नानंतर नवर्‍याच्या मर्जीनुसार नोकरी करू लागते. नोकरीत बढत्या होत राहतात. मात्र, मोठ्या हुद्द्यावर काम करत असताना तिथेही ती नवर्‍याच्या म्हणण्यानुसार कामाच्या फाईल्स सरकवत रहाते. ऑफिसातील तिचे निकटचे सहकारी तिला धोक्याची जाणीव करून देतात, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष करून नवर्‍याच्या ताटाखालचं मांजर रहाणं ती पसंत करते. आजूबाजूला वावरणार्‍या स्वावलंबी स्त्रियांना बघताना तिला स्वत:चा राग येतो. पण नवर्‍याच्या म्हणण्यानुसार वागण्याची अंगी भिनलेली सवय घालवणं मात्र जमत नाही. कृती... नवरा सांगेल तशी आणि विचार... स्वत:च्या मनापाशी! तिची घुसमट व्हायला लागते. आई-वडिलांजवळ तक्रार करूनही काही फायदा होत नाही. ते त्याच्या हुशारीचंच कौतुक करत राहतात अन ती नकळत स्वत:ला दोषी ठरवू लागते. ह्याच सुमारास एक नवीन अधिकारी तिच्या हाताखाली काम करण्यास रुजू होतो. थोडक्या कालावधीत तिची बिकटावस्था तो ओळखतो आणि तिला जरा कडक भाषेत सुनावतो, ‘तुम्ही एक वेश्या आहात. ती पोटासाठी देह विकते, तुम्ही तरी वेगळं काय करतायं? तुमचा देह, तुमची अस्मिता, तुमचं सर्वस्व त्या नवर्‍याला तुम्ही विकलंय.’ हे ऐकल्यावर तिची अवस्था काय होते? ती आपल्या जगण्याचा पुनर्विचार करते का?
स्त्री मिळवती असली तरी तिचं जगणं तिच्या मनाप्रमाणे असतं की इतरांच्या मनाप्रमाणे?

‘अन्वेषी’ कथेतील क्रांती, आजच्या पिढीची प्रतिनिधी जणू! आई-वडिलांचं आयुष्य ती जाणतेपणे समजून घेत असते. एकेकाळी एका चळवळीचे कट्टर कार्यकर्ते असलेले ते दोघे! तिच्या आईने तिच्या आईच्या मनाविरूध्द त्यात उडी घेतलेली असते. परंतु एका टप्प्यानंतर त्या दोघांनाही चळवळीतील फोलपण जाणवून ते त्यातून बाहेर पडतात. साधा-मध्यममार्गी-चाकोरीबध्द जीवनक्रम आपलासा करतात. त्यांच्या मते त्यांच्या मुलीने, क्रांतीनेही तसंच जगावं, चांगलं शिकावं, डॉक्टर व्हावं. क्रांतीला ते अमान्य. तिला स्वत:चे आदर्श आणि ध्येय स्वत:च्या पध्दतीने शोधायचे असतात. तिच्या मते पूर्वीच्या लोकांच्या आदर्शाच्या कल्पना एका चौकटीतून दुसया चौकटीत फिरणार्‍या असतात. ह्या प्रत्येक चौकटीचं दडपण असतं. ती म्हणते, ‘मला त्याच्यात अडकायचं नाही. मैत्री-प्रेम ह्यातून निर्माण होणारी बंधनं मला मान्य नाहीत. याच्या बाहेर पडून मला स्वत:चा शोध घ्यायचा आहे.’ असं म्हणून ती घराबाहेर पडते. नकळत वडिलांच्या मनातील व्यावहारिक सूडबुध्दी जागी होते. ते म्हणतात, ‘ तिला असं काहीच सापडणार नाही आणि तिची खोड चांगली जिरून ती घरी परत येईल. आपण त्या दिवसाची वाट बघू या.’ आणि तिची आई, आधी तिच्यावर खूप रागावलेली! ‘जे आपण करू शकलो नाही ते मुलीनं केलं’ ह्याचा आनंद तिला होतो का? ती तो मोकळेपणाने व्यक्त करू शकते का? की निव्वळ मनातल्या मनातच म्हणत रहाते? ‘माझ्या मुलीचा पराभव कधीही न होवो!’...

‘प्रकाशवाट’मधील कथा फक्त स्त्रियांच्या नाहीत तर पुरूषांचं जगणंही रूढी-परंपरांमध्ये कसं अडकलेलं रहातं हे सांगणार्‍या आहेत.‘साथसंगत’ कथेतील विजयालक्ष्मी. नवर्‍याच्या मृत्यूनंतर, मुलांकडे जाण्याचं नाकारून, एकटीने स्वत:च्या मर्जीने आयुष्य जगण्याचा आनंद घेते. व्हायोलिन वादनाचं शिक्षण घेते. हे बघून तिच्या शेजार्‍याला, विधुर गंगाधरलाही स्वत:च्या परावलंबी जगण्याची प्रकर्षाने जाणीव होते.

पुरूषप्रधानता, स्त्री-पुरूष दोघांनाही सारखीच जाचक असते. कोणा एकाचं वर्चस्व असणं अन केवळ त्यानेच सत्ता गाजवणं कुटुंबसंस्थेला अन पर्यायाने समाजालाही हानीकारकच ठरतं. अशा समाजात ‘अयोनी’मधील ‘मी’ सारख्या बालिका उमलण्यापूर्वीच खुडल्या जातात आणि ‘प्रयोग’मधील नरेंद्र संसारात भरडला जातो.

‘प्रयोग’ कथेतील नरेंद्र. आदर्श लग्नाच्या-सहजीवनाच्या कल्पना मनात असूनही भित्र्या स्वभावाने त्याची ससेहोलट होते. त्याच्या बायकोच्या माहेरची माणसं त्याच्या कुटुंबियांविरूध्द त्याचे कान भरतात आणि त्याला त्यांच्यापासून वेगळं बाहेर काढतात. बायकोच्या मर्जीनुसार त्याला जगावं लागतं. त्याच्या मैत्रीणीने सावध करूनही तो तिचं म्हणणं ऐकत नाही अन शेवटी पस्तावतो. इतका हताश होतो की घर सोडून त्याला मैत्रीणीचा आधार घ्यावासा वाटतो. ती त्याला म्हणते, ‘शंभर वर्षांपूर्वी जुन्या प्रयोगशाळेत प्रयोग करून सिध्द झालेल्या निष्कर्षांचे प्रयोग पुन्हा करतात, तसा तू अजूनही आहेस. तुला त्या नेहमीच्या मूर्ख भावनिक चिखलामधून बाहेर पडण्याची भिती वाटते. कारण तुम्हां पुरूषांच्यात जे सामर्थ्य असतं ते तुम्ही स्वत: कमावलेलं नसून समाजाने तुम्हांला दिलेलं असतं.’ तो जेव्हा घरच्या परिस्थिरीला वैतागून तिच्याबरोबर जाण्याचं ठरवू लागतो, तेव्हा ती त्याला सुनावते, ‘दुसर्‍याच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवता येत नाही. लग्न हा आयुष्याच्या प्रयोगशाळेतील असा प्रयोग आहे की ज्यात अनेक माणसं अयशस्वी होतात. पण प्रयन्त करायचे थांबत नाहीत.’

शेवटची ‘अयोनी’ ही कथा लैंगिक शोषणाने आयुष्याला विटलेल्या एका बालिकेची आहे. वाचताना अंगावर काटा आणणारी. अशा मुली कशा जगत असतील ह्या कल्पनेनेही शहारायला होतं. वर्तमानपत्रांतून अशा घटना जवळजवळ रोजच आपण वाचतो अन नाईलाजे विसरून जातो, कारण त्याविरूध्द आपण काहीही करू शकत नसतो.

स्त्री काय अन पुरूष काय, कोणा एकाने सत्ता गाजवायची आणि दुसर्‍याने त्याखाली भरडलं जायचं हे सर्वांना सारखंच त्रासदायक असतं. दर्जेदार अन समाधानी आयुष्य जगण्याच्या इच्छांची पूर्ती करणं हे सर्वस्वी ज्याच्या-त्याच्या/तिच्यावर अवलंबून असतं. उपजत हुशारी, चतुरस्त्रपणा यांच्या जोडीने सहनशीलता अन चिकाटी ह्या गुणांच्या सहाय्याने अवघड तरीही शक्य आहे ना असं जगता येणं?

०३.०२.२०१० (वाचकघर ३९)
पूर्वप्रसिध्दी: लोकसत्ता-लोकरंग-पुस्तकांचे पान

Prakashvaat-VK-Cover_0.jpg

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle