काही किस्से अभिप्रायांचे

अनोळखी लोकांकडून लिखाणाला मिळालेल्या प्रतिसादाच्या या काही नोंदी आहेत. काही ह्रुद्य का कायशाश्या आहेत तर काही मजेशीर आहेत. काही थोड्या डोक्याला ताप झाला वाटावं अशाही आहेत. पण जोपर्यंत आपल्या हातात नंबर ब्लॉक करणे, इमेल स्पॅम मधे ढकलणे हे पर्याय आहेत तोपर्यंत तितकासा ताप डोक्याला मी करुन घेत नाही. एरव्ही सगळं हहपुवा मोड मधे करमणूक करुन जातय ना तोवर चालसे.

हे लिहून ठेवलं पाहिजे ही आयडीयेची कल्पना खरतर ललिता प्रीतिची. काही दिवसांपुर्वी व्हॉटस ऍप चॅट करताना तिने ती बोलून पक्षी टाईप करुन दाखवली होती. आज आलेल्या फ़ोनमुळे परत त्या कल्पनेने मनात उचल खाल्ली आणि मी टायपायला घेतलं.

तर आज सुरवात व्हायची कारण ठरला मला अमरावतीहून आलेला एक फ़ोन कॉल. गेल्यावर्षीच्या माहेर दिवाळी अंकातली "क्रश्मक्रश" नावाची कथा त्या गृहस्थाच्या आईने वाचली. त्यांना आवडली आणि त्यांनी ती त्यांच्या सुपुत्राला वाचायला दिली. (जनरली आदल्या वर्षीचे अंक ग्रंथालय कमी किमतीत वाचकांना उपलब्ध करुन देते आणि नविन अंकांसाठी ग्रंथालयात जागा करते. असाच सवलतीतला अंक त्यांच्या हाती लागला असावा हा अंदाज) सुपुत्राने वाचून आवडल्याचं कळवायला मला फ़ोन केला. आवडलं सांगून झालं मग त्याने त्याचा रेझ्युमे वाचून दाखवला. अगदी त्या गृहस्थाचा जन्म मुंबईच्या मुलूंड नामक उपनगरामधला असून पासून सुरू झालेला बायोडेटा त्याची शाळा, महाविद्यालय, बहिणीच महाविद्यालय, ते पार त्यांच्या इथल्या आठवणींवर येऊन पुर्ण झाला. कथा वाचून शाळा कॉलेजचे दिवस आठवून नॉस्टाल्जिक झाल्याचं ते जे म्हणत होते मला फ़ोनवर अधूनमधून ते असं त्यांनी सप्रमाण सिद्धही केलं. मुंबई बाहेर बरीच वर्ष रहात असल्याने मुंबईबद्दलचही ते नॉस्टाल्जिक होणं होतं. माझ्या कथेने फ़क्त त्यांना नॉस्टाल्जियात जाण्याच एक दार उघडून दिलं होतं हे त्यांच्या भरभरुन बोलण्यातून जाणवत होतं. या फ़ोनचा अनुभव तसा काही वाईट नव्हता फ़क्त, "मुलुंडला येणार आहे फ़ॅमिलीसोबत तेव्हा भेटू जमल्यास...ओळखीही होतील" या वाक्याने "नहीऽऽऽऽ असं मनातल्या मनात ओरडून घेतलं आणि सावध होत काहीच रिऍक्ट न करता मी फ़ोन कट केला. अर्थात असं कोणी दरवेळी भेटू म्हंटलं तरी ते खरच भेटूया अशा अर्थी नसतं म्हणा पण काय करणार काही अनुभव आलेत असेही की जरा भिती वाटते. तेव्हा वाटलं आता या फोनानुभवासोबतच पुर्वी आलेले काही मजेशीर, काही डोक्याला ताप वाले अनुभव उतरवून काढूया. अजून काही वर्षांनी मलाही नॉस्टाल्जिक व्हावसं वाटलं तर हे वाचून माझ्याकरताही एक दार उघडलं जाईल कदाचित. तर असं नमनालाच भरपूर तेल घालून मुद्याकडे येते.

दोन वर्षांपुर्वी माहेरच्याच दिवाळी अंकात माझी "प्रेमाची गोष्ट" कथा छापून आली. हा छापील दिवाळी अंकांमधला माझा पहीलावहीला प्रवास. त्यामुळे मलाही ओळखीचे वगळता इतर कोणी ती वाचेल का? वाचली तर कळवतील का? वगैरेंबद्दल थोडी धाकधूक थोडी उत्सुकता होती.

एकेदिवशी खरच मला पहिला वहीला फ़ोन आला. नागपूरच्या एका ७५ वर्षाच्या आजोबांनी फ़ोन करुन कथा आवडल्याचं कळवलं. त्यांना त्यांच्या पहिल्या प्रेमाची आठवण झाली असं सांगून वर मला "थोडक्यात" त्यांचीवाली प्रेमकथा ऐकवून झाली आणि इन डिटेल इमेल करतो माझी ही कथा. त्यावरपण लिहायला मटेरिअल मिळेल म्हणत त्यांनी फ़ोन ठेवला. वर सल्लाही दिला प्रेमाचा की मी हॅपी एन्डींग दाखवलं असतं तर माझ्या कथेला ३ रं बक्षीस न मिळता ते १ लं मिळालं असतं. मी आपलं वयाचा मान राखत बर म्हंटलं आणि फ़ोन ठेवला. त्यांचं इमेल काही आलं नाही त्यामुळे प्रेमकथा पार्ट २ मात्रं पेन्डींग राहीलाय. हा मला आलेला पहिला फ़ोन. घरी नवरा मला म्हणत होता "नंबर कशाला दिलास कथेखाली टाकायला?" "कोणी माथेफ़िरू किंवा गैरवापर करणारे निघाले म्हणजे!" पण तरी मी तो देऊन चुकले होतेच. त्याला म्हंटलं मराठी दिवाळी अंक वाचणारा वर्ग असा गैरवापर करणारा निघेल याची शक्यता कमी वाटतेय मला आणि निघालच कोणी माथेफ़िरू तर बघून घेऊ.

त्याची जीभ काळी नसून पण त्याची भिती इतक्या लवकर खरी ठरेल असं वाटलं नव्हतं मला. एक इसम खरच माथेफ़िरू चिकटू टाईप निघाला. कथा आवडली वगैरे सांगून वर त्याने कुठे रहाता कुठे कामाला जाता इ.चौकशा आरंभल्या. फ़ेसबूकावर शोधून फ़्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली. मग रोज एसएमएचा रतिब लावला. मी उलट रि देत नाही म्हणून नंतर नंतरच्या एसएमएस नंतर फ़ोन करुन एसएमएस केल्याची आठवण द्यायला सुरवात केली. तरी मी संभाषण वाढवत नाही म्हंटल्यावर मग त्याने मल तुम्ही बहिणीसारख्या आहात असा मेसेज केला. मला बहिण नाही तुमच्या रुपाने बहिण मिळाली असं स्वत:च डिक्लेर करुन वर म्हणे मला तुम्हाला भेटायला यायच आहे. मी आधी सौम्य शब्दात नकार कळवला तर पुन्हा मेसेज की तुम्हाला राग आला का? माझ्या मनात काही वावगं नाही इ.इ. मग एकदा स्पष्ट सांगून पाहीलं की मला असं मुद्दाम नातं जोडायला नाही आवडत मग ते बहिणीचं असो किंवा मैत्रीचं. तुम्हाला कथा आवडली. लिखाण आवडलं त्याबद्दल धन्यवाद पण मला असं सतत एसएमएस, फ़ोन वगैरे नका करु. तरी पालथ्या घड्यावर पाणी. बरं समोरचा अश्लील बोलत नाहीये, की शिव्या देत नाहीये हे मान्य करुन पण मला इतकी सलगी नकोय तर नकोय ना? हे का पटत नाहीये त्या प्राण्याला? अनोळखी लोकांशी घट्‍ट मैत्री होते हा अनुभव मायबोली/ मैत्रिणमुळे घेतला आहे आणि घेतेय पण तिथे मला चॉईस असतो ना मैत्री स्विकारायचा नाकारायचा. हा गळेपडूपणा मला नकोय. समोरचा भलेही चांगला असेल पण मला हे नातं चिकटवून घ्यायचं नाहीये. सौम्य पण स्पष्ट शब्दात अपमानास्पद वाटू नये समोरच्याला अशा भाषेतलं बोलणं रिझल्ट देत नव्हतं. समोरचा प्राणी ऐकत नाही म्हंटल्यावर मी आधी जुजबी उपाय म्हणून नंबर ब्लॉक केला तर त्या प्राण्याने दुसऱ्या नंबरवरुन फ़ोन करुन मलाच झापायला सुरवात केली की माझा नंबर का ब्लॉक केला? आत्ताच्या आत्ता नंबर अनब्लॉक करा वगैरे वगैरे. मग माझीपण तार सटकली आणि पोलिसात तक्रार करेन असं सांगून एक घाव दोन तुकडे करुन मामला मिटवला. पण नंबर दिल्यामुळे उद्भवलेला हा एकमेव डोक्याला ताप प्रसंग. बाकीचे तसे हॅन्डल करायला जमण्यासारखेच किस्से.

मजेशीर किश्श्यांवरुन सर्वात पहीले त्याचा फोन आठवला. एका व्यक्तीने कथा आवडल्याचं सांगायला फ़ोन केला होता. त्यावेळी मी स्वयंपाकघरात झटापट करत होते कुठल्यातरी नव्या पाककृतीशी त्यामुळे नवऱ्याने मदतनीसाची भुमिका स्विकारत फ़ोन त्याच्या हातात पकडून स्पिकरमोड्वर टाकला. समोरचा बोलणारा गृहस्थ कुठल्याश्या खेडेगावातला होता. आमचं संभाषण पुढील प्रमाणे झालं. (माझे हात खरकटे असल्याने फ़ोन नवऱ्याच्या हातात, स्पिकर मोड ऑन आणि आम्ही बोलतोय)

तो: "गोश्ट आवडली मॅडम आपल्याला (ष्ट वर अनुस्वार नाही आहे तेव्हा तो विदाऊट अनुस्वारच वाचावा) पन एक विचारायचं होतं. ही गोष्ट हाये ना ती तुमचीच हाये का?"

मी: नाही काल्पनिक आहे

तो: होय काय? मला वाटलं तुमचीच हाये. बर्बर असुदे. पन थोडं बोलायचं होतं.

मी: बोला (आता काय बोलायचय बाबा याला? आणि कितीवेळ बोलणार आहे हा? म्हणजे थोडक्यात आटपणार असेल तर ठीक नाहीतर तो किचन पसारा बाजूला ठेवून हात धुवून टाकावे झालं... हे सगळं मनात. आणि तिकडे मदतनीसही "घे तुझा फ़ोन तुच हात धुवून" वाला लुक देत काय बोलायचय याला ते ऐकायला उत्सुक. स्पिकरवर जम्माडी जम्मत चाल्लेली म्हणून लेकही हा चकटफ़ू करमणूकीचा कार्यक्रम बघायला हजर)

तो: (थोडा पॉज घेऊन पुढे जरा अतीच हळू आवाजात) थोडं खाजगी हाये. बोलू का?

खाजगी शब्दाने सगळे एकदम अलर्ट. नवरा हातात फ़ोन धरुन कंटाळलेला तरिही हा प्राणी बायकोला काय खाजगी सांगतोय ही उत्सुकता "हात धुवून तुझा तू फ़ोन धर ग हातात" असं बोलायला भाग पाडेना. लेकही खाजगी मज्जा ऐकायला तिथेच उभी. तिचे त्यावेळचे टॉप सिक्रेट टॉक्स म्हणजे "रुचाने डब्यात गुपचूप डेरीमिल्क आणलेली. टिचरना कळ्ळच नाही आणि मॅथ्सच्या पिरीएडला इशानला झोप लागलेली, मी आणि चार्मी फ़ुल्लीगोळा खेळलो बोअर झालं म्हणून". त्यामुळे तिला या खाजगी वाल्या गप्पांचं कुतूहल अधीक. एकुणात त्याच्या एका शब्दाने घरातले तिनही मेंबर्स अलर्ट होऊन कान देऊन ऐकायला सज्ज झाले.

आणि त्याचा पुढचा चेंडू येऊन आदळला आमच्यावर

तो: माजी एक गर्लफ़्रेन्ड होती

मी: बर (पण हे हा मला का सांगतोय?)

तो: होती म्हंजी हाये

मी::अओ:

तो: म्हंजे काही म्हैन्यांपुर्वी ती होती. मंग तिच्या घरी आमच्या बद्दल कळ्ळ ना. तिच्या बापाने आनि भावाने मला जाम मारला. त्यानी पोलीस कप्लेन्ट पन केली आनि तिने पन पोलीसान्ला तिच प्रेम न्हाई सांगितलं. सांगा आसं आसतय का प्रेम? पन त्याहून जास्तं टेन्शन म्हंजे आता ती परत आलीय, म्हंती तिच्या घरच्यांनी जबरदस्तीने तसं कराया लावलं. तर आता मला सांगा मी आता काय कराचं? तिच्याशी लगीन कराचं का न्हाई?

मी: ते मी कसं सांगणार?

तो: न्हाई तुमी प्रेमाची गोष्ट लिवली ना मंग तुमाला म्हाईत असल ना. तुमी सांगा. आता ती परत सोडून न्हाई ना जानार जर लगीन लावलं तर? आनि माज्या बरोबर पळून जाऊन लगीन लावल का? परत पोलीस कप्लेन्ट तर न्हाई कर्नार ना?

मी: (आता आली का पंचाईत. कोण कुठची ती आणि कोण कुठचा तो. ज्यांना ना कधी बघीतलय ना काही ओळखपाळख आहे अशांच्या बाबतीत मी कसं काय काही सांगणार. हे आपलं मनात) प्रकट मात्र - "तिच्याशीच बोला की हे सविस्तर जे काही आहे मनात ते. आणि मग दोघे मिळून ठरवा"

तो: असं म्हंताय मंग बोल्तो आता तिच्याशी. अजून काहीतरी ब्ला ब्ला बोलून त्याने फ़ोन ठेवला.

त्याचा फ़ोन आला त्यावेळी एकीकडे मी त्याचा आवाज माझ्या कोणा अवलिया मित्राशी जुळतोय का? आणि कोणी मला बकरा बनवतय का वर विचार करत होते. दुसरीकडे तो खराच कोणी इसम असेल आणि हे प्रॅन्क माझ्या ओळखीच कोणी खेळत नसेल असं मानलं तर उत्तर काय द्यायचं हे ही चाचपत होते. मधे दोन वेळा फ़ोन कट झाला. तेव्हढ्यात मी नेट ऑन केलं जेणेकरुन ट्रू कॉलरवर नाव दिसेल. नाव दिसलं, कन्फ़र्म झालं हा प्रॅन्क नाही मग मी जमेल तस न्युट्रल उत्तर दिलं आणि फ़ोन कट झाला. इकडे मी हुश्श केलं आणि तिकडे इतका वेळ फ़ोन हातात पकडून हात दुखलेल्या नवऱ्यानेही हुश्श केलं.

या एका कथेने माझ्याकडे बऱ्याच किश्श्यांची बेगमी केली. पहिली कथा आणि पहिलेवहीले किस्से म्हणून ते अजून लक्षातही राहीलेत. काहींनी मला फ़ोन करुन "शेवटी अभी काय म्हणाला रियाला? हे सांगा. त्यांचं लग्न झालं ना शेवटी? नाही त्यांचं लग्न लावाच. शेवट हॅपी करा पार्ट टू लिहून" असं मला झोपेतून जागं करत पण ऐकवून घेतलय. एक शेख नावाच्या इसमाने मला औरंगाबादला त्याच्या घरी सहकुटूंब यायचं आमंत्रण देऊन माझी रहाण्यापासून ते औरंगाबाद फ़िरण्यापर्यंतची सगळी व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलय. अर्थात अशी आश्वासन खरी निघतात का हे पहायचा वेडेपणा मी करणार नाही आहे पण लोकांसाठी तुम्ही अनोळखी रहात नाही तुमच्यासाठी जरी ते अनोळखी असले तरी हे अशा टाईपच्या फ़ोन्समुळे जाणवून गेलं. आणि हे ही जाणवलं की प्रत्येक आमंत्रण आपल्याला अन्कम्फ़र्टेबल नाही करत आहे. म्हणजे त्या भाऊबीज किश्शामुळे मला वाटायला लागलेलं की तो पुरुषाने केलेला कॉल होता म्हणून का मी इतकी अस्वस्थ झालेले आणि कॅज्युअली घेतलं नव्हतं मी? पण विचार केल्यावर जाणवलं की हे जेन्डर बेस्ड इरिटेशन नाही आहे तर कॉल्स मधल्या टोन मुळे मला गळेपडू भावना वाटली की इरिटेट व्हायला होतय मग तो बाईचा कॉल असो की पुरुषाचा.

मधे काही दिवस गेले चला आता यावर्षीचे कॉल संपले असं वाटलं आणि एकदिवस एक व्हॉटस ऍप मेसेज आला. सुरवात अर्थात "कथा आवडली" या वाक्याने झाली. मग मी आपलं धन्यवाद वगैरेचे सोपस्कार केले आणि अगदी सभ्यपणे "आपण कोण बोलताय?" वगैरे विचारलं. उत्तरा दाखल व्हॉटस ऍप वरच आली "एक जुडवाची स्मायली त्यापुढे जुडवा हा शब्द आणि त्याखाली पैचान कौन?"

च्यामारी! कोडी कसली घालताय (हे मनात) जाहीर फ़क्त येव्हढच लिहीलं "आपण ओळखतो का?"

त्यावर रिप्लाय "अगं काय तू? मला वाटलं लगेच ओळखशील. ओळख ओळख? तुझ्या कथेत तू हे जुडवा वापरलयस बघ. तसच काहीसं आहे. आता क्ल्यु दिलाय ओळख

मी तरिही भंजाळलेले. माझी कथा बहुतेक तिने नुकतीच वाचून संपवलेली पण ती लिहून मला सहा महिन्याच्याही वर काळ लोटलेला त्यामुळे तिने असं रॅन्डम वाक्य टाकल्यावर मला कसं बर लगेच क्लीक होणार? आणि आता क्ल्यु दिलाय कळल्यावर पण मला कळेना की त्याचा तिच्याशी काय संबंध? माझ्या मेमरीनुसार ते वाक्य कथेतली नायिका कथेतल्या नायकाला टाईप करुन पाठवते. इथे ही मला का पाठवतेय? मला विचाराचसं वाटलं बरं मग त्याचं काय? पण जाहीर रित्या मात्र मी सौम्य शब्दात रिप्लाय पोस्ट केला. "सॉरी तुम्ही म्हणताय त्याचा काही संदर्भ मला आत्ता लागत नाही आहे. कृपया कोड्यात न बोलता सरळ लिहून सांगाल का?" एकतर हे संभाषण चाललं होतं रात्रीच्या १०.३० च्या पुढे. डोळ्यावर आलेली झोप ही वेळ आहे का कोडी सोडवण्याची असं ओरडून ओरडून मनात घुमत होती. शेवटी गुडनाईट म्हणून मेसेज टाकला तेव्हा तिचा रिप्लाय आला

"तिचही नाव कविता आहे. वर हे ही लिहीलं "मला वाटलं जुडवा म्हंटल्यावर तुला कळेल". रितसर नाव आडनाव सांगून झालं तिचं. मग म्हणे तुझा फ़ोटो दाखव ना मला? मला बघायचय हि कथा लिहीणारी व्यक्ती कशी दिसते?"

मला फ़ुल्ल डाऊट यायला लागला की ही बाई कुणाचातरी डु आय आहे. बायकांचे फ़ोटो बघायला म्हणून कथेचं घोंगडं वापरतेय. म्हणून मग मी मग मी व्हॉटस ऍप बंद करुन झोप उडवून फ़टाफ़टा ट्रु कॉलर, फ़ेसबूक यांना कामाला लावलं आणि तिची माहिती तपासायला घेतली. ती सगळी माहिती खरी निघाली. बाई जेन्युइन होती, कथेमुळे तिने माझ्याशी नाळ जोडून टाकली होती पण माझी नव्हती ना जुळली नाळ तिच्याशी. कथा लिहून मी त्या कथेतून बाहेर पडले होते. त्यामुळे अंमळ संशयानेच बघत होते. त्यात तो बहिण मिळाली तुझ्या रुपाने, तुला भेटायचय वाला भाऊबीज किस्सा ताजा होता. मग यथावकाश जुजबी ओळख झाली तिच्याशी पण तेव्हा या पैचान कौन ने वात आणलेला मला.

गेल्यावर्षी कॉमेडी कट्‍टा मधे "आम्ही लोकलकरणी" लेख आला होता तेव्हा एका घाऊक फ़ोन करणाऱ्या काकांचा अनुभव आलेला मला. लेख आवडला. मुंबईच्या लोकलच्या महिलांच्या डब्यातून प्रवास केल्याचा फ़ील आला वगैरे छापील संवाद झाले. (मला एकदम सारे समय केवल महिलाओंके लिए असलेल्या डब्यात त्या काकांचा अदृश्य वावर दिसायला लागला) काकांनी त्यानंतर संभाषण डायरेक्ट पुण्यात नेलं. मला म्हणे "या एकदा पुण्याला. माहेर समजून या आमच्याकडे" मी आपलं तोंडदेखल्या हो हो. धन्यवाद. जरुर. ओके म्हणत दि एन्ड करायचा प्रयत्न केला पण त्यांना संभाषण अजून पुढे रेटायचं होतं. मग त्यांनी मला पुढे त्यांचा कोथरुड मधला पत्ता सांगितला. वर हे ही सांगितलं की त्यांची खाणावळ असून ते डबेही करुन देतात. कोणाला हवे असतील तर सांगा सांगत उकडीचे मोद्क ही त्यांची स्पेशॅलिटी असल्याची मौखीक जाहिरात करुन झाली. फ़ोन ठेवताना मला प्रश्न पडलेला की माझा लेख वाचून खरच तो आवडला होता म्हणून फ़ोन केलेला की हा मार्केटींगचा नवा फ़ंडा होता?

असा प्रश्न पडायचं अजून एक कारण म्हणजे हा असाच सेम फ़ोन संवाद त्याच काकांचा त्याच दिवशी ललिता-प्रीतिसोबतही झाला होता. दोघींनाही उकडीचे मोदक, खानावळ, डबे इ. त्याच क्रमाने सांगितलं होतं. म्हणुन मी त्याला घाऊक फ़ोन म्हंटलं. असा एक घाऊक फ़ोन याही वर्षी आला होता. याही वर्षी तो मला आणि ललिता-प्रीतिला एकाच दिवशी एकाच प्रहरी वगैरे आला होता. या वर्षी फ़ोन करणाऱ्या व्यक्तीशी माझं संभाषण खालील प्रकारे झालं

तो: तुमची अनुभव मासिकातली कथा वाचली. कविता आवडली (कथा वाचून कविता आवडली म्हणजे काय? कोणास ठावूक. आणि हाईट म्हणजे अनुभव साठी मी काही लिहीलच नव्हतं. मी लिहीलं होतं युनिक फ़िचर्सच्याच गेल्या वर्षीच्या इतर दोन अंकात मुशाफ़िरी आणि कॉमेडी कट्‍टा करता)

मी: (तरिपण शंका बाजूला ठेवून छापील उत्तर दिलं) आवर्जुन कळवल्याबद्दल धन्यवाद.

तो: हा तुमचं काय पुस्तक पब्लिश झालय का?

मी: नाही माझं काही पुस्तक वगैरे पब्लिश झालेलं नाही

तो: का?

मी: (हा काय प्रश्न झाला? नाही झालय तर नाही झालय. मी काय मोठी प्रतिथयश वगैरे लेखिका आहे का असं पुस्तक वगैरे छापून यायला? - हे आपलं मनात) (जाहीर मात्र...) पुस्तक छापलं जावं इतकी मी अजून मोठी झाले नाहीये (किती तो विनय)

तो: हो का? म्हणजे तुम्ही अजून लहान आहे का? काय वय? कॉलेजात जाता काय?

मी: (विनयशीलतेची ऐसी की तैसी) अहो! म्हणजे मी लेखिका म्हणुन इतकी मोठी नाही झाले असं म्हणायचय मला

तो: हो का? हा हा हा

या व्यतिरिक्तही काही विवाह मंडळ चालवतेय की काय मी असं वाटायला लावणारे किस्से जमा झालेत एक दोन पण एकुणात जमा झालेले किस्से तसे फ़ारसे उपद्रवी नव्हतेच. त्यामुळेच यापुढेही असे अनुभव जमा करायला मी नंबर देत रहायचं ठरवलं आहे . अता बघूया हे वर्ष अजून काय किस्से पोतडीत जमा करतय ते.

तळटिपः

माझ्यासारख्या नवख्या खेळाडूच्या वाटेला असे अनुभव येतात मग इथल्याच आपल्या अनुभवी मैत्रिणींकडे किती किस्से जमा झाले असतील असं वाटत राहीलं आणि म्हंटलं आपण लिहून काढू मग त्यांनाही पोतडी सोडून अनुभव शेअर करावेसे वाटतील. चला तर मग येऊद्यात तुमचेही अनुभव

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle