तमसो मा ज्योतिर्गमय - अनोखे लक्ष्मी पुजन

आज दिवाळीनंतर तब्बल एक आठवड्यानंतर मी याबद्दल लिहितेय. :P

या लेखात दिव्यांचे, रोषणाईचे कसलेही फोटो, वर्णन नाही. त्यामुळे हा लेख या उपक्रमात फिट होईल की नाही माहीत नाही. मात्र, या वर्षी लक्ष्मीपुजनाच्या दिवशी अंधारातून प्रकाशा कडे नेणार्‍या एका अनोख्या जगाशी ओळख झाली माझी. स्वतःला काही अंशी तरी समॄद्ध करणारा हा माझा अनुभव, मैत्रिणींसह शेअर करावासा वाटला, म्हणून लिहितेय इथे.

त्या दिवशी तारीख होती - ३० ऑक्टोबर - डॉ. होमी जहांगीर भाभा या विख्यात शास्त्रज्ञाचा हा जन्मदिवस. याच दिवशी डॉ. होमी भाभा यांच्या संकल्पनेतून व परिश्रमातून साकार झालेली मुंबईतील वास्तू - 'टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च' या संस्थेला भेट देण्याची दुर्लभ अशी संधी मिळाली.

झाले असे की निमिषच्या एका शिक्षिकेचे मामा या संस्थेत शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत काही १०-१५ शालेय विद्यार्थ्यांना ही संस्था, प्रयोगशाळा व तिथे चालू असलेले प्रयोग याबद्दल माहिती देण्यासाठी या दिवशी (टी आय अएफ आर )इथे येण्याचे आमंत्रण मिळाले. निमिषला सिलेक्ट केले आहे हे त्याला कळताच तो भयंकर खूश होता.

ठरलेल्या वेळी प्रत्येक विद्यार्थ्यासह एक पालक असे आम्ही २६-२७ जण तेथे पोचलो. काही ठिकाणी केवळ विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला गेला तर रेडिएशन प्रोन एरियात मुलांना परवानगी नाकारली व आम्हाला ते दाखवण्यात आले. सर्वप्रथम सायंटीस्ट काकांनी (हे मुलांनी त्यांना दिलेले नामाभिधान) मुलांशी ओळख करुन घेतली, त्यांचे छंद, विशेष आवडीचे विषय जाणून घेतले व या संस्थेची माहिती देण्यास सुरुवात केली.

विज्ञानाच्या विविध शाखांत सखोल संशोधन करण्यासाठी एक स्वयंपूर्ण, स्वदेशी संस्था असावी हा ध्यास घेतलेल्या डॉ. भाभांनी सरकारकडून या उपक्रमासाठी जागा मिळवली आणि टाटा उद्योग समूहाशी बोलणी , चर्चा करुन त्यांचे वित्तसहाय्य घेऊन ही वास्तू उभारली. आजही या संस्थेच्या डायरे़क्टर बोर्डात श्री. रतन टाटा आहेत.

या संस्थेबद्दल अधिक माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळेलच. पण सायंटीस्ट काकांनी इथली प्रवेशप्रक्रिया समजावून सांगितली ती थोडक्यात सांगते.

विज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी मिळवलेला द्विपदवीधर (एम एस सी फर्स्ट क्लास) विद्यार्थी प्रवेश परीक्षा देऊ शकतो. मात्र एम. एस सी ला १ वा २ च मेजर विषय असतात. तर या प्रवेश परीक्षेत विज्ञान व गणिताच्या कोणत्याही शाखेतील, काहीही प्रश्न येऊ शकतात. तुम्हाला सर्व शाखांचे सर्वसमावेशक ज्ञान असलेच पाहिजे, ही किमान अपेक्षा असते. साधारण दहा हजार विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा देतात. ती पास झालेले काही म्हणजे १०० - १५० विद्यार्थी क्लिष्ट अशा मुलाखतीला सामोरे जातात व त्यांतून केवळ २० विद्यार्थी दरवर्षी इथे पुढील ५ वर्षांसाठी नेमले जातात. या ५ वर्षांत त्यांना त्यांची पी. एच. डी पूर्ण करायची असते. शिकत असताना त्यांना रिसर्च स्कॉलरशिप मिळत असते. पण नगण्य. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर केवळ विज्ञानावरच प्रेम करणार्या आणि पैसा गौण मानणार्यांनीच इथे यावे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आधी प्रत्येक प्रयोगशाळेत काही दिवस काम करावे लागते (त्यांचा विषय नसला तरीही) त्यानंतर त्यांची आवड, मिळालेली क्रेडिटस यांवरुन त्यांना स्वतःचा रिसर्च त्यांचे मेंटर त्यांच्याशी चर्चा करुन नेमून देतात. पाच वर्षांत किंवा त्याआधीही पी. एच डी पूर्ण करुन ते इथून बाहेर जाऊ शकतात किंवा इथेच रिसर्च सायंटीस्ट म्हणून नोकरी स्वीकारु शकतात.
ही वास्तू कुलाब्यातील नेव्ही एरियात असून समोरच शास्त्रज्ञांची निवासस्थाने आहेत. स्वतःचे एक उद्दिष्ट ठरवून त्या ध्येयाने झपाटलेले असे कैक जीव तिथे पाहिले. अक्षरशः घरी जेवतांना, काही काम करतांनादेखील स्वतः चा रिसर्चच डोक्यात घोळवत असलेले हे लोक काही एक धागा गवसला की तडक आहे त्या स्थितीत , कपड्यांत आपापल्या प्रयोगशाळेत येऊन दाखल होतात. वेळ-काळाचे बंधन जराही न पाळता. तासंतास न खाता पिता प्रयोग, निरीक्षणे करत राहतात, हे आजवर पुस्तकांत वाचलेले जे त्या दिवशी स्वतः अनुभवले.

आता इथे सध्या चालू असलेल्या संशोधनाबद्दल थोडेसे:-

१. स्पीच थेरपी- प्रत्येक व्यक्तीचा विशिष्ट आवाज, ओठांची हालचाल रेकॉर्ड करुन ती माहिती पासवर्ड म्हणून वापरणे व त्यायोगे हॅकींग व तत्सम बाबींना आळा घालणे.

२.रसायनशास्त्र - सल्फर फ्लुओराईड यातील १ सल्फर व ६ फ्लुओरीनचे अणू शून्य तपमान असलेल्या प्रयोगशाळेत अभ्यासणे

३. अणू उर्जा- अणूतील प्रोटॉन्स धनभारीत व इलेक्ट्रॉन्स ॠणभारीत विरुद्ध प्रभारअसल्यामुळे एकत्र बांधलेले असतात. मात्र दोन प्रोटॉन्स वा २ इलेक्ट्रॉन्स असे समान प्रभार एकत्र आणण्यासाठी बर्याच मोठ्या प्रमाणात वोल्टेज वापरावे लागते. ४० मीटर उंचीवर एका सिलिंड्रीकल पाईपमधून हे हाय वोल्टेज वापरुन, ते खाली आणत, त्यात वेगवेगळ्या तापमान, दाबावर असे प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स काय-काय बदल दाखवतात हे अभ्यासणे

या ३ प्रयोगशाळा आम्हाला बघता आल्या. त्यांचे फोटो काढण्याची परवानगी अर्थातच नव्हती.

नजीकच्या भविष्ययकाळात या आजच्या प्रयोगांवर आधारीत उपकरणे बाजारात आली असतील. तेव्हा या सार्या शास्त्रज्ञांचे अविरत कष्ट नक्कीच आठवतील.

लक्ष्मी पुजनाच्या दिवशी या लक्ष्मीच्याच भव्यदिव्य अशा 'विद्या' रुपाशी झालेली ही ओळख ! तिच्यापुढे नतमस्तक होऊन आम्ही परतीचा मार्ग क्रमू लागलो. 

Keywords: 

सृजनाच्या वाटा: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle