सय- माझा कलाप्रवास- सई परांजपे

सय- माझा कलाप्रवास
सई परांजपे
राजहंस प्रकाशन, ३५८ पानं, ३०० रूपये.

नावाजलेल्या लेखिका-दिग्दर्शिका म्हणून सई परांजपे या नावाचा चांगलाच दबदबा आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं, तर पुणे आकाशवाणी, बालरंगभूमी, दूरदर्शन, लघुपट, नाटक आणि चित्रपट अशा सर्वच मंचांवर त्यांनी बरेच ’धाडसाचे उद्योग’ केले आहेत. या सर्व माध्यमांतला प्रवास आणि त्या वेळेला आलेले अनुभव यांचा आढावा म्हणजेच ’सय- एक कलाप्रवास’.

त्यांनी हे लेखन कटाक्षाने केवळ त्यांच्या कलाप्रवासापुरतंच सीमित केलेलं आहे. पुस्तकात वैयक्तिक आयुष्याला मुळीच आणलेलं नाही. आत्मचरित्र का लिहिलं नाही हे स्पष्ट करताना सई म्हणतात, “प्रांजल आत्मकथा ही हातचं काही राखून ठेवत नाही. आयुष्यातली प्रत्येक नाट्यपूर्ण घटना, गौरव, मानहानीचे प्रसंग, प्रणयगाथा, प्रेमभंग, कलह, ठाऊक असलेली इतरांची लफडी-कुलंगडी- अशा कितीतरी उजेडात आणाव्या लागतात. कोणत्याही आत्मकथेमधला समरप्रसंगाचा वृत्तांत चवीनं वाचताना एक विचार नेहेमी माझ्या मनात डोकावतो- ही झाली तुमची बाजू. पण विरुद्ध पार्टीचं काय? अर्थात या एकतर्फी कथनामधून ते आपल्याला कधीच समजू शकत नाही. म्हणून मला आत्मचरित्र हा लेखनप्रकार हा नेहेमी दीड दांडीनं चोरटं माप देणारा तराजू वाटतो. त्याच्या वाटेला मी कधी गेले नाही. आपलं खाजगी आयुष्य बासनात गुंडाळून ठेवलं.”

पुस्तकाचा अवकाश अशा रीतीने स्पष्टपणे सीमित करून टाकलेला असला, तरी ’सय’ची झेप मोठी आहे. सई परांजपे या लेखिका असल्यामुळे प्रत्येक प्रकरणात एक प्रवाहीपण आहे, प्रत्येक प्रकरण वाचनीय आहे. त्यांची माध्यमांतरं अगदी सहज एकापाठोपाठ एक उलगडत गेली. त्यांचा प्रवास अवचित सुरू झाला तो पुणे आकाशवाणीमधून. तिथून त्यांचा प्रवेश झाला तो बालरंगभूमीवर. मग एफटीआयआय, एनएसडी, स्वत:ची नाटक कंपनी, दिल्ली दूरदर्शन, मुंबई दूरदर्शन, परदेशात मिळालेली शिष्यवृत्ती, मराठी आणि हिंदी नाटकं आणि हिंदी चित्रपट अशा एका मोठ्या परीघाच्या वर्तुळातून सई फिरून आल्या.

जिथे जाऊ तिथे काहीतरी वेगळं करू, तिथे स्वत:चा ठसा उमटवू या वृत्तीमुळे सई यांच्या हातून उल्लेखनीय काम झालं. त्यांच्या लघुपटांना, चित्रपटांना अनेक नामवंतांचे पुरस्कार मिळाले. ’द्वयी’ या त्यांच्या नाटक कंपनीतर्फे त्यांनी काही हिंदी-मराठी नाटकं सादर केली, काही नाटकं वेगळ्या निर्मात्यांबरोबर केली. त्यातलं ’सख्खे शेजारी’, ’जास्वंदी’, ’मोगरा फुलला’, ’पुन्हा शेजारी’ सारखी नाटकं पुष्कळ चाललीही. त्या नंतर हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून त्या ’मास अपील’ असलेल्या क्षेत्रात जरी शिरल्या तरी ’स्पर्श’, ’चष्मेबद्दूर’ आणि ’कथा’सारखे वेगळे, कमर्शियल नसलेले सिनेमे त्यांनी केले. हे तिन्ही चित्रपट आजही आपलं स्थान टिकवून आहेत त्यातच त्यांचं यश सामावलेलं आहे.

अर्थात, या सक्सेस स्टोरीजबरोबर अपयशांनाही त्यांना सामोरं जावं लागलं, काही नाटकं, काही सिनेमे इच्छा होती तितके चालले नाहीत, काही जितके पोचायला हवेत तितके पोचले नाहीत. सई यांनी या सर्वांबद्दलच भरभरून लिहिलं आहे. पुस्तक आठवण स्वरूपात असल्यामुळे एकेक काम समोर ठेवून त्याच्याशी निगडित असलेल्या घटना, क्रम आणि मजा अशी एकंदर मांडणी आहे. ही मांडणी तारखेनुसार नाहीये. तरीही वाचनात कुठेही अडखळायला होत नाही, हे विशेष. याचं श्रेय त्यांच्या शैली आणि मिस्किलपणाला जातं. कोणताही सिनेमा किंवा नाटक लिहिणं हे त्यातल्यात्यात सोपं काम. ते प्रत्यक्षात उतरवणं आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोचवणं हे एक शिवधनुष्यच. त्यामुळे एकेक कलाकृती ’पब्लिक’ होईपर्यंत कोणकोणत्या दिव्यातून लेखकाला जावं लागतं याचं बहारदार वर्णन सईंनी केलेलं आहे. त्यामुळे आपण एक वाचक म्हणून गुंग होऊन जातो आणि ’पुढे कशाबद्दल लिहिलंय?’ ही उत्सुकताही कायम राहते.

पुस्तकाची एकच पडती बाजू मला जाणवली. पुस्तक वाचताना ’काहीतरी राहिलंय’ असं सतत वाटत राहतं. काही प्रकरणं शेवटपर्यंत नेलेली आहेत, पण काही तशीच सोडून दिली आहेत. ’साज’ चित्रपटाची तर जवळपास संपूर्ण पटकथाच दिली आहे, ज्याची खरच गरज नव्हती. पुस्तकाची सुरूवात होते, ती त्यांच्या आईपासून- शकुंतला परांजपे यांच्यापासून, पण ते कथनही अपूर्ण आहे. आजोबा रॅंगलर परांजपे यांचा उल्लेखही ओझरता आहे. अरुण जोगळेकर, विनी आणि गौतम हेही जिथे उल्लेख हवेत तेवढ्यापुरतेच आहेत. उलट त्या जिनिव्हाला त्यांच्या वडिलांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटायला गेल्या होत्या, तेव्हाचं वर्णन मात्र अगदी विस्तृत आहे. हो, हे आत्मचरित्र नाही. पण या सख्ख्या माणसांचे फोटो अगत्याने दिले, मात्र त्यांच्याबद्दल एकही वाक्य आपणहोऊन सांगितलेलं नाही हे ठळकपणे जाणवतं. ही माणसं त्यांच्या आयुष्याशी निगडितच आहेत. त्यांचा या कलाप्रवासात काही ना काही वाटा होताच ना. त्यांचा उल्लेख गरजेपुरता इतर माणसांबरोबर करणं मला फारसं पटलं नाही.बर, तेही सोडलं, तरी आता सई स्वत: काय करत आहेत, कुठे राहतात, कसा वेळ घालवतात याबद्दलही काहीच येत नाही. त्यामुळे संपूर्ण वाचनाचं समाधान न मिळाल्याची रुखरुख लागून राहते.

बाकी पुस्तक वाचनीय आहे हे वर लिहिलंच आहे. ज्यांनी सई यांची नाटकं, सिनेमे पाहिलेले आहेत, त्यांच्यासाठी हे पुस्तक म्हणजे trip down the memory lane होऊ शकेल, कारण आता कलाकृतीबरोबरच पडद्यामागे काय घडलं होतं तेही वाचकांसमोर उघड केलेलं आहे. True to her word, सई यांनी आपला समग्र कलाप्रवास मस्त आरामात उलगडून सांगितला आहे.

वर
0 users have voted.