शांततेचे २०१६ चे नोबेल पारितोषिक विजेते: ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन!

लेखिका - धारा

Juan_Manuel
चित्र सौजन्य : http://www.asianews.it

नोबेल पारितोषिक विजेते : ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस कॅल्देरोन (Juan Manuel Santos Calderón)
विभाग : शांतता
जन्म : ऑगस्ट १०, १९५१ (सध्या वय : ६५ वर्षे)
देश : कोलंबिया

पन्नास वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला अंतर्गत सशस्त्र नागरी संघर्ष संपवून शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कोलंबियाचे अध्यक्ष ह्युअ‍ॅन मॅन्युएल सॅन्तोस यांना २०१६चा नोबेल शांतता पुरस्कार दिला जाणार आहे.

नागरी संघर्षाची पार्श्वभूमी :

स्पॅनिश राजवटीतून मुक्त झाल्यानंतरही कोलंबियामधल्या सामान्य माणसाने स्वातंत्र्य म्हणजे काय, हे अनुभवलेच नव्हते. एकीकडे तिथली शेकडो एकर जमीन मुठभर जमिनदारांच्या ताब्यात, तर दुसरीकडे अनेकांकडे उदरनिर्वाहासाठी जमिनीचा हातभर तुकडाही नव्हता. पोटातली भूक आणि वर्षानुवर्षांची खदखद या शेतकऱ्यांना, भूमिहीनांना एकत्र घेऊन आली. त्यांची 'नागरी अधिकार आणि जमिनीवरच्या मालकी'ची मागणी वाढली, तेव्हा त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी जमीनदारांनी दबाव आणून लष्कर पाठवलं. मग सारंच बिनसलं. इतके दिवस शांत असलेले शेतकरी खवळले. स्व-संरक्षणासाठी त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि त्यातून कोलंबियात प्रदीर्घ यादवीचं बीज पेरलं गेलं. कोलंबियातली सर्वात मोठी बंडखोर संघटना फार्क (revolutionary armed forces of Colombia)चा जन्म झाला. याच काळात ईएलएन म्हणजे ‘नॅशनल लिबरेशन आर्मी’ ही आणखी एक डावी संघटना जन्माला आली.

छोट्या-छोट्या गटांमध्ये बांधणी, गनिमी काव्याने लढण्याचं तंत्र आणि दाट जंगलातलं लपणं, यामुळे प्रदीर्घ काळ फार्कचे हे बंडखोर टिकून राहिलेत. काळासोबत बदलत तरुण शेतकऱ्यांसोबत बायका आणि अगदी लहान मुलंही बंदुका खांद्यावर घेऊन संघटनेत आली. कोलंबियाची सुरक्षा दलं, पोलिस स्टेशनं, लष्करी ठाणी, गस्ती पथकं हे बंडखोरांचे लक्ष्य असायचे. पुढे त्यात तेलाच्या पाइप लाइन उडवणे, वीज वाहिन्या तोडणे, पूल उडवणे, सरकारी कार्यालयांवर बॉम्ब हल्ले करणे असेही उद्योग सुरू झाले. शेकडो सामान्य निरपराध लोक यात मारले जाऊ लागले. संघटनेला लागणार्‍या पैशासाठी खंडण्या, अपहरण यांचं सत्र सुरू झालं. सरकारी अधिकारी, उद्योगपती, परदेशी पत्रकार यांचं अक्षरशः हजारोंच्या संख्येत अपहरण झालं. त्यापुढे कोकेनच्या व्यवसायातल्या टोळ्यांशी संधान बांधता बांधता हे लोकच त्यात उतरले. पैशांचा ओघ सुरू झाला.

इकडे बंडखोरांचा उपद्रव वाढला, तसे जमीनदार आणि अंमली पदार्थांचे व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी एयूसी (United self defense force of Colombia) ही संघटना तयार केली. लष्कर आणि बड्या राजकीय नेत्यांशी त्यांचे थेट संबंध होते. त्यांनीही हत्याकांडं घडवली. डाव्या बंडखोरांशी चकमकी झाल्या.

गेल्या दशकात या उजव्या आणि डाव्या बंडखोरांपेक्षा कोलंबियात उच्छाद मांडलाय तो BACRIMS ने. हे लोक आधी सक्रिय बंडखोर होते. तिथून बाहेर पडून कोकेनचे उत्पादन, व्यापार यात उतरलेत. भरपूर पैसा आणि आंतरराष्ट्रीय टोळ्यांशी संबंध यामुळे ते प्रचंड धोकादायक झालेत. कसलाही राजकीय कार्यक्रम नाही, केवळ हिंसा आणि पैशांची भाषा बोलणारे BACRIMS कोलंबियाच्या सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरलीय.

ह्युअ‍ॅन यांची कामगिरी आणि शांततेसाठी निभावलेली भूमिका :

एखादा देश तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ हिंसाचाराच्या छायेत राहतो. तीन चार पिढ्या याच वातावरणात वाढतात, हे भयंकर आहे. बंडखोरांमध्ये तर कोवळ्या वयात जंगलात गेलेल्या अनेकांनी बंदूक आणि हिंसेशिवायचं सामान्य जगणं कधी अनुभवलेलंच नाही. भरपूर साधनं संपत्तीचे स्रोत असूनही घरातले वाद सोडवताना हा देश अक्षरशः मेटाकुटीला आलाय.

गेल्या दहा-पंधरा वर्षांत बंडखोरही थकलेत. सुरक्षा दलांकडून सतत हल्ले होताहेत. अंमली पदार्थांच्या व्यापारामुळे आणि माफियांमुळे वैतागलेल्या अमेरिकेने कोट्यवधी डॉलर बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी कोलंबियाच्या सरकारला दिलेत. बंडखोरांनी त्यांचे अनेक नेते या काळात गमावले. लढाऊ सदस्यांची संख्या घटून २० हजारांहून ७ हजारांवर आली. तरुणांना बंदुकीशिवायचं जगणं अधिक आकर्षक वाटू लागलं. ‘आता हिंसाचार पुरे’ ही मानसिकता वाढली. गेले दशकभर त्यासाठी देशभरातून मोठा दबाव होता. सरकारवर आणि बंडखोरांवरही.

२००६ मध्ये संरक्षण मंत्री बनलेल्या ह्युअ‍ॅन यांनी अमेरिकेच्या पाठिंब्यावर फार्कवर कठोरपणे कारवाई करण्यास सुरवात केली. त्यांच्या आदेशानुसार झालेल्या कारवाईत फार्कचे अनेक प्रमुख म्होरके मारले गेले. २०१० मध्ये अध्यक्षपदावर आरूढ झालेल्या ह्युअ‍ॅन यांनी मध्यममार्ग स्वीकारत फार्कशी बोलणी सुरू केली. बंडखोरांवरच्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयं, शरणार्थींना सौम्य शिक्षा आणि कोलंबियाच्या काँग्रेसमध्ये फार्कसाठी १० जागा ठेवाव्यात, यावर समझोता झाला. त्यांच्याच प्रयत्नांमुळे, यापुढे अपहरण आणि खंडणी वसूल करणार नसल्याचे फार्कने जाहीर केले. ह्युअ‍ॅन यांच्या धोरणांमुळे आणि फार्कचीही क्षमता कमी झाल्याने २०१४ पासून त्यांचा सैन्याबरोबर असलेला थेट संघर्ष कमी झाला.

शांतता करारावरील सार्वमत आणि कोलंबियाचे भविष्य :
फार्कसोबत झालेल्या या शांतता करारानंतर देशात सार्वमत घ्यायचं ठरलं. तर जनतेनं ५०.५ विरुद्ध ४९.५ अशा काट्यावरच्या मतांनी हा करार नाकारला! हा अनेकांना धक्का होता. राजकीय विश्लेषकांच्या मते बंडखोरांना या करारात झुकतं माप दिलं गेलंय. शिवाय यावेळी मतदानही केवळ ३७.४ म्हणजे २२ वर्षांतलं नीचांकी असं झालं.

पण तरीही सॅन्तोस आणि बंडखोर - दोघांनाही शांतता प्रक्रिया पुढे न्यायची आहे. त्यामुळे नजीकच्या काळात तरी फार्क आणि सुरक्षा दलांमध्ये चकमकी होण्याची शक्यता नाही. सगळ्या देशभर सकारात्मक वातावरण तयार झालंय. त्यामुळे दोन्ही बाजूंवर शांततेसाठी मोठा दबाव आहे.

सार्वमत मिळवण्यात यश आलेलं नसलं तरी त्या दृष्टीने सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल घेत नोबेल निवड समितीने यावर्षीच्या नोबेल शांततेच्या पारितोषिकासाठी सॅन्तोस यांची निवड केली. कोलंबियामध्ये अराजकतेचे वातावरण असताना शांततेच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचेही या वेळी समितीने म्हटले आहे. शिवाय समितीने कोलंबियाच्या नागरिकांचेही कौतुक केले आहे. प्रचंड नुकसान सहन करूनही या नागरिकांनी शांततेची आशा सोडलेली नाही. गेल्या पाच दशकांत कोलंबियामधील अंतर्गत संघर्षात जवळ जवळ दोन लाख साठ हजार नागरिकांचा बळी गेला असून, ४५ हजार नागरिक बेपत्ता आहेत.

इतर काही खास:

  • सॅन्तोस नोबेल पारितोषिकाची रक्कम हिंसाचारात पोळलेल्या पीडितांना देणार आहेत.
  • आपली अध्यक्षपदाची कारकीर्द संपेपर्यंत आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी जीवतोड मेहनत करू असं सॅन्तोस म्हणताहेत. लोक, विशेषतः तरुण त्यांच्यासोबत आहेत.
  • सॅन्तोस यांची मुलाखत
  • सॅन्तोस यांची अधिकृत वेबसाईट

संदर्भ :

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle