रनकोलाज - १

आज अशक्य थंडी आहे. पण आता इम्युनिटी वाढलीय. नाहीतर मागच्या वर्षी याच दिवसात मी अनेक शारिरिक आणि मानसिक ताणातून जात होते. जरा काही झालं की अंथरूण धरावं लागायचं. पळण्याची कपॅसिटी वाढलीय. मला न दिसताही, कसलाही मेकपचा स्ट्रेक नसताना माझी मीच पळताना स्वतःला छान दिसतेय. म्हणजे मला छान वाटतंय. पॉवरफुल. एक मार्ग , एक ठरलेला मुक्काम. आता कुठलं वळण घ्यावं हा विचार करायचा नाहीय हे किती बरंय. किती वेळ लागतोय हेही एक अ‍ॅप सांगतंय, मोजतंय तुमची पावलं, गती आणि प्रगती. माझ्या मैत्रिणी पुढंमागं आहेत. एकटं पळण्याचे फायदे तोटे आहेतच. आत्ता मिळून पळण्याचे फायदे दिसतायेत.
अनेक कामं एकमेकात अडकून पडलेली. त्याचा ताण मी यशस्वीपणे एका कोपर्‍यातल्या डिझायनर बॅगमधे भरून ठेवून दिलाय. नीट लावून. मग कधी कधी उघडून परत सॉर्ट करून , रचून परत त्या बॅगेत भरून ठेवते. त्यातल्या एखाद्याबद्दल आत्ता मी काही करू शकत असेन तर तो तेवढा बाहेर काढून ठेवते. मग बॅगच्या सौंदर्याकडे एकदा पाहून मनातल्या मनात कौतुक करते आणि तो वर्केबल ताण उचलून चालू लागते.
आमचे इतर पळसखे स्वतःच्या त्या दिवशीच्या कपॅसिटी आणि प्लॅनप्रमाणे एक रूट निवडतात आणि तो पूर्ण करतात. आम्ही अजून अडखळतोय. आज किती पळायचं हे आम्ही भेटलो की ठरवतो. मग रूट ठरवतो. पण पळताना काही वाटलं तर बदलतो पण. आज कोचनी ४ किमि रन सांगून पण पाय दुखतायत म्हणून फक्त २ किमी चालून आम्ही परत आलोय. याबद्दल आम्ही स्वतःचं स्वतः माफ ही करून टाकलंय. परवा नाही का ३ किमीचं टार्गेट असताना ७ केले होते? तर चालतंय.
एक गोष्ट लिहायला घेतली होती. ती हरवली. त्यातले ते, अधूनमधून चमकून जातात. रूटच्या वळणावर नेहमीचे पळसखे ओझरते दिसतायत. रुटस क्रॉस होईतो. नेहमीप्रमाणे गोष्ट तिची आहे. अन् नेहमीप्रमाणे तो आता जास्त भेटतोय. पहिल्या भेटीत आवडला नव्हता. एक देखणा मित्र ब्रेकपमधून सावरतच नव्हता तेंव्हा कुणीतरी मित्रत्वाच्या कर्तव्यातून म्हटलेलं, " भूल जा यार, तू उस्से कितना ज्यादा अच्छा है दिखनेमे. उस्से कई गुना अच्छी लडकी मिल जायेगी. " तेंव्हाचं त्याचं उत्तर. "अरे आंखोको आदत पड जाती है चेहरेकी, कानोको आवाजकी. बाकी खूबसूरती, पहली बार और आते जाते ठीक है." मला आदत पडायच्या आत या दोघांची गोष्ट पूर्ण होईल?
आता आम्ही शेवटच्या टप्प्याला आलोय. एक मैत्रीण भेटते. ही खूप मोठा पळ करून आलीय. " किती पळालात गं?" ती रोजच्याप्रमाणे जाब विचारतेय.
आम्ही रोजच्याप्रमाणे हसतोय. " आज दोनच. "
" का?"
" अगं थंडी कितीय. "
आम्ही जमेल-तेवढं गृपचे मेम्बर आहोत. कुणाशी स्पर्धा करत नाही. खरंतर स्पर्धा करायला कुणी उरलंच नाहीय मागं. सगळे ओवरटेक करून पुढं गेलेत. मग आता नाहीतरी गती, प्रगती नाही तर बाकी मज्जा करू हा बॅकबेंचर अ‍ॅटिट्युड कायम ठेवलाय.
फर्स्ट बेंचर्स आमचे मार्क बघून हसतात. आम्ही त्यांचे हेवेदावे बघून हसतो.
" हो आज थंडी कितीय. उठवत नव्हतं आज." फर्स्ट बेंचर मैत्रीण उद्गारते.
" मला पण. पण बघ मी आलेय. " मी तिच्या खांद्यावर रेलत म्हणते.
" माझ्या बेडवर इतकी मस्त उन्हं येतात ना. त्यामुळं अजून डिटर्मिनेशन लागतं" ती म्हणते.
"मी तर माझा बेस मास्टर बेडरूममधून गेस्टरूममधे हलवलाय. तिथं उन्ह येतं म्हणून. " मी सांगते.
ही खोली आधी रिकामी होती. मग तिथं नकोशा, स्वतःची जागा नसलेल्या पण टाकावं का नाही ठरत नसलेल्या वस्तू जमा व्हायला लागल्या. मग क्राफ्टसचा कच्चा माल. मग एक दिवस डोक्यात आलं की ही खोली युटिलाईझच नाही होत. मग एक बेड बनवून घेतला. आता हिवाळ्यात लक्षात आलं की ही खोली उबदार आहे.
" पण आता आलात तर करायचं की जास्त " फर्स्ट बेंचर.
जमेल-तेवढं ग्रूपमधली मैत्रीण जवळ येऊन म्हणते , " अगं हिचे पाय दुखतायत"
ही मैत्रीण आधी नुसतीच ओळखीची होती. दोन वर्षं. अचानक आम्हाला शोध लागला की आम्ही सारख्याच आळशी आहोत, सारख्याच निवांत आहोत ( म्हणजे कूल). त्यामुळं आता भेटण्यासाठी तरी सकाळी येतोच. आणि मग आलोच आहोत म्हणून पळतो पण. मग पळतोच आहोत तर टार्गेट पण ठरवलंय. प्लॅन पण बनवून घेतलाय. अजून एक अशीच लॉस्ट पोरगी आम्हाला जॉईन झालीय.
" चल घरी तुला पराठे खाऊ घालते. आलूचे आवडतात का पनीर ? " फर्स्ट बेंचर मैत्रीण लाड करत म्हणते.
" आज नको. येते एक दिवस. आलूवाले खायला. आज धूपवाली बेड बुला रही है|"
घरी येऊन मी चहाचा मग घेऊन, लॅपटॉपसकट या थोड्या छोट्या, अजून थोडा पसारा असलेल्या, एक स्लायडिंग नीट चालत नसलेल्या, एटॅच्ड बाथरून नसलेल्या पण उबदार अस्लेल्या आणि उन्हाच्या सोनेरी झुलीत रुबाबात झुलणार्‍या खोलीत येऊन बसलेय. आणि तिथूनच लिहीतेय हे.

धूपवाली बेड..

कुछ गाने शफलपर चलाके,
कुछ खयाल दिमाग पर चढाके,
एक फोन, एक लॅपटॉप,
एक क्विल्ट और एक तकिया,
एक-आधी मैं,
और एक धूपकिनारीवाली बेड..
सर्दिया सुनहरी हुई है|
और कहानीका सबसे इग्नोअर्ड किरदार
आदतसे मिलता रेहता है हर मोडपर|
मै इतना बुरा नही हू जान,
मेरी भी एक कहानी है, सुन तो लो|
मै करवट लेकर, धूपसे चेहरा सेकती हू,
वो पीठपीछेसे एक बाजू मुझपर डालकर ,
लपेट लेता है मुझे, अपनी बाहोमे|
शफलसे सुर झरते रहते है, लफ्जोंकी कतारोंसें मायने मिलने लगते है,
और सर्दियोंकी धूप चढकरभी नर्म रहती है|
- संघमित्रा

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle