परवा एका दुकानात पुस्तके चाळता चाळता एक वेगळेच उठून दिसणारे कव्हर दिसले म्हणून पटकन उचलले. एक रिकामी अनंत विश्वाची चौकट - काळ आणि रक्ताला झाकून टाकणारी.. रिकामा आणि खुणावणारा काळा कॅनव्हास. उत्सुकतेने चाळले तर चक्क कला, राजकारण आणि इतर समकालीन गोष्टींची बांधलेली मोटच सापडली.. आपल्याकडे कलेवर लिहिणारे लेखक फार कमी, त्यातही जुन्या चित्रकारांची मीठमसाला लावलेली आत्मचरित्रच मिळण्याची शक्यता जास्त!
कुठलेही पूर्वग्रह किंवा माहिती न वाचताना घेतलेले हे पहिलेच पुस्तक. शांता गोखलेंचे 'रिटा वेलिणकर' वाचून फार काही आवडले नव्हते. पण पाटी पूर्ण कोरी ठेवून 'त्या वर्षी' वाचायची सुरुवात केली. 'ते' वर्ष आहे २००४. सुनामीच्या लाटा आदळण्याचे वर्ष.. हि अख्खी कथा म्हणजे एक मूळ धरत मोठमोठी होत जाणारी सुनामी आहे जी शेवटी आ वासून आपल्यावर आदळते आणि सगळा तळ हलवून टाकते.. मागे राहतात उधळलेले, छिन्न विचार..
यातली सगळी माणसे कलेच्या धाग्यांनी जवळ आली आहेत नाहीतर नात्यांच्या. हिंसेच्या राजकारणामुळे सिद्धार्थला गमावून बसलेली अस्वस्थ अनिमा, तिचा स्वतःच्याच शोधात असलेला चित्रकार भाऊ अशेष यांची जरी हि गोष्ट असली तरी त्यांच्याबरोबर येणारे त्यांचे मित्र मैत्रिणी, त्यांचे बेपत्ता झालेले तत्त्ववादी वडील आणि स्वतःतच मग्न असलेली आई, तिला सोबतीची वाट दाखवून आपले अंतस्थ हेतू पूर्ण करून घेणारे डॉ. भास्कर हेही तितक्याच जोरकसपणे आपले अस्तित्त्व अधोरेखित करतात.
एकाच वेळी अनेक पातळ्यांवर हि गोष्ट सुरु रहाते. एकाच वेळी चित्रकाराचे मनोविश्व, प्रेरणा ते शारीर भाव यातून सुरु होऊन स्वस्त आणि भडक कलेचा मांडलेला बाजार त्यातले दांभिक दलाल आणि खेचली जाणारे माणसे, सौंदर्यवाद विरुद्ध आधुनिकवाद, संगीतातील परंपरावाद आणि मुख्य अभिव्यक्ती, मनस्वीपणा ते विकले जाण्याची हातोटी, स्त्री पुरुषांचे आदिम प्रेम ते विखार अश्या कितीतरी गोष्टींना हुषारीने स्पर्श करते. वारली आदिवासींचे मुक्त समाज जीवन आणि ते संपुष्टात आणायला टपलेली सो कॉल्ड समाजसेवकांची टोळी, हिंसा आणि अहिंसेच्या मधली नष्ट होत जाणारी सीमारेषा हे सगळे सगळे हळूहळू ती सुनामीची लाट तयार करत आपल्यावर चाल करून येतात.
वाचता वाचता आपल्या आजूबाजूला सुरु असणाऱ्या इतक्या गोष्टींशी आपोआप तुलना होऊन घडलेल्या गोष्टी आठवत जातात आणि आपण एक समाज म्हणून कुठे चाललो आहोत तेही लक्षात येत जाते. अलिप्तपणे लिहिलेल्या ह्या सगळ्या व्यक्तीरेखा मनाला स्पर्शून जातात तश्याच हि सगळी सुनामी ओसरल्यावर आपापली छिन्न मने सांधून-जोडून त्या आशादायी कोलाजमुळे आयुष्य जगण्याची उभारीही देतात.
सद्यपरिस्थितीत नक्कीच वाचायला हवं असं काही.. 'त्या वर्षी'.
