गर्ल्स डे आऊट इन लंडन

चला चला राणीच्या राज्यातल्या मैत्रिणींनो आत्ता आपण भेटलेच पाहिजे Party अशी माधुरीची हाक आली आम्हांला,मग काय विचारता.. थंडी, वारा, पाऊस या सगळ्याचा विचार करत करत आम्ही समस्त युकेवासी मैत्रिणी "हो हो भेटायचेच" असा निश्चय करून तयारीला लागलो. :hhh: भावनाने लगेच ४ फेब्रुवारीचा मुहूर्त ठरवून टाकला. मग आमची चर्चा कोण कोण येणार, कोण काय खाणार, कोण नक्की किती लेअर्स घालणार अशा अनेक वळणांचा प्रवास करू लागली. दिवस ठरला, सगळ्या तयार झाल्या आणि मग चर्चेने एकदम मध्ये अल्पविराम, स्वल्पविराम मोड ऑन केला. ३ तारीख आली पण सगळे तसे शांत शांतच.. मग सगळ्यात आधी भावनाला विचारले, "उद्याचे नक्की फिक्स आहे ना?" तर ती म्हणे "डोन्ट वरी आपण भेटतोय". हुश्श चला मनात म्हटले, चला अजून तरी काही बदल नाहीये तर. तर मग मी, माधुरी, भावना, मृदुला आणि पुष्करणी आम्ही ४ फेब्रुवारीला भेटणार हे नक्की झाले. खरंतर चैत्रबनसुद्धा येणार होती पण अचानक तापाने तिला पकडून ठेवले. फायनली मृदुलाने आमचा ग्रुप बनवला आणि गर्ल्स डे आऊटची सुरवात तिथूनच झाली.

४ फेब्रुवारी .. अखेर हा दिवस सुरु झाला. मनात सकाळपासुनाच "लंडनला जाते मी" (हे लग्नाला जाते मी ह्या चालीवर म्हणा सगळ्याजणी) गडबड सुरु झाली. माझा शनिवारचा सकाळी सकाळी काम उरकण्याचा उत्साह बघून शेवटी नवरा म्हणालाच, काय तो आनंद ओसंडुन जातोय.. अशा सगळ्या कॉमेंटसकडे दुर्लक्ष करत माझी निघण्याची तयारी सुरु झाली. आमची भेटण्याची वेळ ठरली होती, सकाळी ११.३० आणि ठिकाण होते लेस्टर स्केअर स्टेशन. भावनाने आधीच तिला उशीर होणार हे सांगितले होते. मी आणि माधुरी लंडनमध्ये तशा जवळून येणार होतो आणि बाकीजणी बर्याच लांबुन येत होत्या. त्यामुळे कोण कुठे आले, कोणाची ट्रेन कुठे थांबली ह्यावर यथासांग चर्चा सुरु झाली. भावना आणि मृदुला ह्या नेहमी सुखी माणसांचे कपडे घालून फिरतात ह्यावर माझे आणि पुष्करणीचे एकमत झाले. तेव्हा पुढील भेटीत आम्ही हयांचे सुखी सादरे (आय मीन कपडे) घेणार आहोत. मी नक्की कोणाच्या सदर्यात मावेन ह्याची मला आता शंकाच आहे :ड

मी घरातून निघताना रिपरिप पाऊस (रिमझिम म्हणायचे तर आमच्या युकेच्या पावसाचा अपमान होईल) सुरु होताच.. तर तिकडे मृच्या गावी एकदम लख्ख ऊन होते. मैत्रीणचा कंपु भेटत आहे म्हटल्यावर आमच्या युकेवर नेहमीच रुसून असणारा सनुबाबा पण घाबरला बहुदा.. मृने लंडनला येता येता सोबत सनुबाबाला पकडुनच आणले. पाऊस जाऊन निदान ऊन दिसू लागले. तर ठरल्यावेळेप्रमाणे सगळ्यात आधी पोहचलो मी आणि माधुरी. तू कुठे, मी कुठे सुरु झालेच.. मी कित्ती हुशार सांगते तुम्हांला, निदान भेटायचे त्यांचे फोटो तरी बघून घ्यावे की नाही आधी पण नाही. भेटण्याच्या उत्साहामध्ये हे केलेच नव्हते. माधुरी, मृदुला, भावना आणि पुष्करणी आधी एकमेकींना भेटल्या होत्या. मी भावना आणि पुष्करणीला भेटले होते. पण समोर मोबाईलमध्ये डोकं खुपसून जी मुलगी तावातावाने मेसेज करत आहे ती मीच आहे हे माधुरीने चटकन ओळखले आणि अजिबात वेळ न दवडता मला समोरून येऊन विचारले, तू विशाखा ना :). :waving: मला खरंतर तिने फारच रेकॉर्ड ब्रेक टाईममध्ये ओळखले. ह्यानंतर भावनाने लंडनमध्ये एंन्ट्री घेतली पण आम्ही भेटायच्या ठिकाणी काही तिचा पत्ता नव्हता. मी आणि माधुरी जरा आजुबाजुला चकरा मारत होतो आणि गप्पा तर सुरूच होत्या. तेव्हढ्यात माधुरीने लेस्टर स्केअर स्टेशनसमोर सेल्फी घेणार्या मृला बघितले. ही बघ ग मृदुला असे म्हणत, आम्ही दोघींनी मृकडे धाव घेतली. तेव्हा लक्षात आले की समोरचा सिग्नल सुरु होऊन टँक्सी आपल्याकडे येत आहेत.. नशिबी जोरावर म्हणुन आम्हांला हॉर्न नाही दिला कोणी. मृ बिचारी तिला काही कळेचना की इतका मस्त मी सेल्फी घेत आहे आणि अचानक ह्या दोघी कुठून आल्या. मग गळाभेट घेत आम्ही आमचे एक फोटोसेशन झाले. तेवढयात दुसर्या बाजूने पुष्करणी आलीच. परत गळाभेट राउंड आटपून घेतला. ह्या दोघी आल्या मात्र सगळ्यात आधी लंडनमध्ये प्रवेश करून भावना मात्र कुठे राहिली ह्यावर जरा विचारविनीमय सुरु झाला. लेस्टर स्केअर सटेशनला एकूण ३ एक्झिट दिसत होत्या तेव्हा आता ही इथून येते की तिथून ह्याची वाट आम्ही बघत होतो. तेवढयात भावना आली.. हुश्श भेटलो एकदा सर्वजणी..

"ढिशुम"ला जाऊन वडापण आणि कटिंग चहा खायलाच पाहिजे हे आधीच ठरले होते. तेव्हा आमची गाईड माधुरी हिने, ये चला ग आता ह्या बाजूने जायचे सांगितले. मग पुणे, सातारा, औरंगाबाद, रत्नागिरी आणि मुबंई ह्यावर हा हा हि हि हू हू करत आम्ही ढिशुमकडे निघालो.. एका सिग्नलला अचानक बाजूने मराठी आवाज आला, "तुम्ही पुणे कि मुंबईच्या".. आम्ही सगळ्या एकमेकींकडे अशा बघत होतो कि तू बोलते की मग मी. शेवटी २ ओळींचा वार्तालाप करून आम्ही तिथून पळालो. आता डेस्टिनेशन होते "ढिशुम".. नशीबाने आम्हांला फारच लगेच टेबल मिळाले. वडापाव, पावभाजी, ओकरा फ्राय, चीझ चिली टोस्ट, कटिंग चाय, डिकॅफ कॉफी Coffee आणि लिम्का अशी ऑर्डर देवून झाली मग बस नुसत्या गप्पा. फारच पटकन खायला आले आणि मग काय आधी पोटोबा हा विचार सगळ्यांनी केला. सगळ्या पदार्थांचा इन नो टाईम फडशा पाडुन, आता जरा सगळ्यांच्या चेहर्यावर मस्त तरतरी आली. जरावेळ तिथेच टाईमपास करून गप्पा मारत आम्ही आता बाहेर पडलो "कोव्हेंट गार्डन" कडे.

कोव्हेंट गार्डन मार्केटमध्ये सगळे स्टॉल बघत बघत आमच्या अखंड गप्पा, दंगा सुरूच होता. कोव्हेंट गार्डन खरंतर ऐतिहासिक वास्तू आहे आणि त्याबद्दल एक वेगळा लेखचं होईल. कोणाला हयाबद्दल अधिक वाचायचे असल्यास https://en.wikipedia.org/wiki/Covent_Garden इथे माहिती उपलब्ध आहे. जरा अवांतर झाले की काय आहे :) सगळे स्टॉल खूपच मस्त होते. एकसे एक हॅन्डमेड वस्तु होत्या इथे. बॅग्ज, ज्वेलरी, हॅन्ड पेंटेड टिशर्ट, स्कार्फ, बुकमार्कस, डायरीज, पेंटिंग्जस आणि काय काय.. आपण सगळे बघूनच बाहेर पडायचे असा निश्चय केल्यासारख्या आम्ही मस्त फिरून बघत होतो :). इतके फिरून काहीच घेतले नाही की काय असे वाटत असताना, मृ आणि पुष्करणीने शॉपिंग करून आमची लाज राखली. ह्या शॉपिंग दरम्यान आम्हांला पुष्कीचे नवनवीन गुण लक्षात आले. ही एक फुल ऑन सरप्राईज पेकेज आहे. पुढच्यावेळी जुने कपडे घेऊन आपण गोधड्या शिवूयात असाही एक प्लॅन तयार झाला.. :)

मध्येच ब्रेक मध्ये आंबा पोळी, अळुवडी आणि पुष्करणीने घेतलेले इटालियन जिलाटो ह्याचा फडशा पडला. पुष्कीने माझ्यासोबत कोणी खाता का ग जिलाटो विचारले तर नको ग नको ग केले आम्ही पण तिने आम्हांला नीट ओळखले होते तेव्हा दुकानातून येतानाच ज्यादाचे चमचे घेऊन आली ती. मग कशाला उगाच तिचे मन मोडायचे असे म्हणत आम्ही सगळ्यांनीच जिलाटो फस्त केले :)

घड्याळ बघितले तर ४ वाजून गेले होते मग काय माधुरीने चार्ज ताब्यात घेतला आणि आम्हांला आता कुठे खायला जायचे ते सांगा विचारले. मग परत इंडियन खायचे कि थाई कि अजून काही ह्याचा विचार सुरु झाला. मध्येच आम्हांला फेमस चायना टाऊनचे दर्शन झाले. गेल्याच आठवड्यात चायनीज नवीन वर्ष सुरु झाल्याने सगळीकडे मस्त सजावट केलेली होती. काय मस्त वातावरण होते. जिथे जमेल तिथे आमचे फोटो सेशन सुरूच होते. विलियम्स शेक्सपिअरच्या स्टॅचूजवळ तर पुष्कीने सिक्सर हाणला. तर झाले असे आमच्या सगळ्यांचा फोटो काढायला आम्ही एक बकरा पकडला. तर तो बिचारा ह्या सगळ्या आणि स्टॅचू हे सगळे एका फ्रेम मध्ये कसे मावेल हयाचा विचार करत असेल बहुदा तर पुष्कीने अत्यंत प्रेमळ आवाजात हाताची ऍक्शन करत त्याला "असा असा कर फोन" असे शुद्ध मराठीत सांगितले. त्याही बिचार्याने हाताची ऍक्शन बघुन बहुदा आमचा नीट फोटो काढला. आता मात्र मसाला झोनकडेच जाऊया असे माधुरीने सांगितले पण मग मध्येच आम्हांला चिपोटले दिसले तर कुठे इटालियन. माधुरी मस्त गाईड करत होती, हे खाणार का तुम्ही, इथे हे मस्त मिळते आम्ही आपल्या एक एक गल्ली पार करत पुढे जाताच होतो. शेवटी बहुदा आता बस म्हणून तिने आम्हांला सोहो स्केअरजवळ "बाबाजी" मध्ये नेले. मग आलेल्या मेनूमध्ये नक्की काय आपण खाऊ शकतो ह्याची यथासांग चर्चा झाली. २ वेगवेगळे पिडे, २ चिकन शीग, हल्लूमी चीझ, हर्बल टी, लेमनेड आणि अर्यन (पुष्की हे असेच लिहायचे ना) अशी ऑर्डर दिली गेली. मग परत गप्पा सुरूच.. खरंतर इतका वेळा आम्ही नक्की काय काय बोललो, कशावर चर्चा केली ह्याबद्दल जास्त आठवत नाहीच आहे. आठवत आहे ते नुसते खिदळणे, मस्ती :). खाऊन झाले तरी आमचे बस्तान तिथेच. परत मस्त गप्पा सुरु. शेवटी आम्हांला तुम्हांला अजून काही हवे आहे का असे विचारण्यात आले मग आम्हांला आता तिथून निघण्याची पक्की हिंट मिळालीच.

आता मात्र घरी निघणे गरजेचं होते सगळ्यांना कारण ७ वाजून गेले होते. मग सगळ्याजणी सोबत आलो पिकॅडली सर्कसजवळ. मी सगळ्यांना बाय केले कारण मी तिथून बसने निघणार होते.

फुल ऑन दंगा, मस्ती, खादाडी आणि अखंड गप्पा ह्यांनी भरलेला एका भरगच्च दिवस. थॅन्क यु गर्ल्स. खूप मज्जा आली. माधुरी, मृ तुम्हांला मी पहिल्यांदा भेटत आहे असे खरच वाटले नाही इतक्या गप्पा मारल्या आपण.. भाव, पुष्की ऑफ कोर्स तुम्हांला भेटुन मस्तच वाटले. परत भेटु आपण नक्कीच. Thumbsup Bighug

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle