अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. या माणसाला जिवंत ठेवतात. पण या गरजांबरोबरच स्वातंत्र ही एक अशी गोष्ट आहे जी माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते. काय खायचं, घालायचं, वाचायचं, शिकायचं या आणि अशा अनेक प्रकारच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याबरोबरच, समुहात कसं वागायचं, कुठे जायचं, कधी आणि कसं भेटायचं अशा सामजिक स्वातंत्र्यावर गदा आली की माणूस, समाज अस्वस्थ होतो, त्यातून सुटायची धडपड करायला लागतो हे इतिहासाने आपल्याला वेळोवेळी दाखवले आहे. बळी तो कान पिळी आणि सत्तापिपासू प्रवृत्ती यामुळे मानवजातीचा इतिहास सत्तासंघर्ष आणि प्रजेवर अत्याचार याने भरलेला आहे. सताधार्यांपेक्षा इतर धर्म पाळणार्यांचे अनेकदा हाल झालेले इतिहासात दिसून येतात, पण समानधर्मीय देशबांधवांना धर्माचे कठोर पालन करायला लावून, त्यांना विविध जुलूमी नियम पाळायला लावून, हजारो देशबांधवांची हत्या करुन आपल्याच देशात त्यांना पारतंत्र्यात राहायला लावले ते इराणच्या १९७९ सालच्या इस्लामिक रिव्होल्युशननंतर!
२००३ साली प्रकाशित झालेले 'रिडींग लोलिता इन तेहरान' हे अझार नफिझीचे पुस्तक म्हणजे आपल्याच देशात पारतंत्र्यात राहणार्या, रोजच्या आयुष्याच्या संघर्षात कधी जिंकणर्या तर कधी हरणार्या, सताधारी लोकांच्या आणि त्यांच्या जुलुमाला बळी पडलेल्या लोकांच्या, अभिजात पाश्चिमात्य वाङमयात रमणार्या विद्यार्थ्यांच्या, या विद्यार्थ्यांबरोबर चर्चिल्या गेलेल्या पुस्तकांच्या, आणि एकंदरीत इराणच्या आठवणी आहेत. १९८१ ते १९९५ साली तेहरान युनिव्हरसिटीमध्ये इंग्लिश लिटरेचर शिकवणार्या अझार नफिझींनी इराणचे पूर्णपणे पालटलेले रूप पाहिले, बदलेल्या समाजकारणाचा अनुभव घेतला आणि या आठवणी 'रिडींग लोलिता इन तेहरान' या पुस्तकाद्वारे लोकांसमोर आणल्या.
'रिडींग लोलिता...' ची सुरुवात होते ती नफिसी आणि त्यांच्या ७ विद्यार्थिनींच्या गुप्त बूक क्लब पासून. माना, मित्रा, माशिद, नासरीन, यासी, अझिन आणि सनाझ धोकादायक परिणामांची पर्वा न करता आपल्या प्रिय शिक्षिकेच्या घरी वेस्टर्न क्लासिक्सचा अभ्यास आणि चर्चा करण्याकरता दर गुरुवारी जमत. व्लादिमिर नाबॉकॉव्ह, हेन्री जेम्स, टॉम जोन्स, जेन ऑस्टेन, फिट्झ्जेराल्ड यांची क्लासिक पुस्तके आणि त्यावर या बूक क्लब मेंबरच्या चर्चा, त्यातून उलगडत जाणारे त्यांचे वैयक्तिक, आणि इराणमधले सामाजिक आयुष्य, वाचत असलेली पुस्तके आणि तेंव्हाची परिस्थिती यांच्यातली सांगड याची एक सुंदर गुंफण म्हणजे 'रिडींग लोलिता इन तेहरान'.
सर्वात पहिले चर्चिले गेलेले पुस्तक म्हणजे नाबॉकॉव्ह याचे 'लोलिता'. क्लासिक म्हणून गणले गेलेले, पण तेवढचे वादातही अडकलेले 'लोलिता' हे एक उच्च्शिक्षित प्रॉफेसर आणि तो बलात्कार करत असलेल्या त्याच्या १२ वर्षीय सावत्र मुलीची कहाणी आहे. लोलिता हे इराणच्या तेंव्हाच्या परिस्थितीचे प्रतिक आहे, जिथे तिचे नागरिक इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डच्या जुलमी नियमांचे अत्याचार सतत सहन करत असतात. त्यानंतर नाबॉकॉव्ह याचे 'इन्व्हिटेशन टु बिहेडींग', फ्लॉबर्टचे 'मॅडम बोव्हारी', फिट्सजेराल्डचे 'द ग्रेट गॅट्स्बी', जेन ऑस्टेनचे 'प्राईड अँड प्रेज्युडाईज', हेन्री जेम्सचे 'डेझी मिलर' ही पुस्तके सतत आपल्याला भेटत राहतात. या सर्व पुस्तकांचे सुंदर विवेचन नफिसी आणि त्यांच्या मुलींच्या (त्यांचा उल्लेख 'माय गर्ल्स' असाच आहे) चर्चेतून, नफिसींच्या स्वगतांमधून आपल्यापर्यंत पोहोचते. नफिसींच्या मुली या विविध सामाजिक आणि संपत्तीक परिस्थितीमधून आलेल्या आहेत. पारंपारीक किंवा आधुनिक घरांमधून आलेल्या मुली साहित्य प्रेमाने एकत्र बांधल्या गेल्या आहेत. त्यांच्यात मतभेदही होतात, पण लोलिता आणि इतर साहित्य वाचताना, त्याबद्दल चर्चा करताना त्या परत एक होत राहतात.
सुखवस्तु कुटुंबात जन्मलेल्या नफिसींचे वडील हे तेहरानचे सर्वात कमी वयाचे महापौर होते. अझारचे शिक्षण तेहरान, त्यानंतर स्वित्झर्लंड आणि अमेरिका अशा ठिकाणी झाले. अमेरिकेतून इंग्लिश लिटरेचरमध्ये पिएच्डी संपवून जेंव्हा त्या तेहरानला १९७९ मध्ये परत आल्या तेंव्हा त्यांना भेटले ते बदललेले तेहरान. लहानपणी शहांच्या कारकिर्दीत, मोकळ्या वातावरणातल्या तेहरानमध्ये राहिलेल्या नफिसींनी इस्लामिक रिव्होलुशन नंतर बदललेलं पूर्णपणे बदललेले तेहरान अनुभवायला सुरुवात केली. अमेरिकेच्या हातातले खेळणे असलेल्या शहाच्या सत्तेला कंटाळलेल्या लोकांनी ती राजवट उलथून देण्याकरता १९७८-१९७९ साली जो उठाव केला, त्याची परिणीती त्यापेक्षा अनेक पटीने रिप्रेसिव्ह अशा कट्टर इस्लामिक राजवटीत झाली. सुप्रिम लिडर म्हणून आयातुल्ला खोमेनीची नियुक्ती झाली. मोकळेपणा जाऊन, अत्यंत जुलमी नियमांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली. स्त्रियांना हिजाब शिवाय आणि नवरा, भाऊ, मुलगा यांच्याशिवाय घरातून बाहेर पडणे अवघड होऊ लागले. कुठल्याही प्रकारचा मेकअप करणे, हिजाबमधून केस दिसणे, मोठ्याने हसणे हा स्त्रियांकरता गुन्हा ठरु लागला. घरातून, रस्त्यावरुन लोक गायब होऊन इराणी जेलमध्ये टाकली जाऊ लागले, मारले जाऊ लागले. तेहरान युनिव्हरसिटी हे मोकळ्या, आधुनिक विचारांचे स्थान, त्यामुळे तिथले तरुण विद्यार्थी हे नवीन सरकारचे खास लक्ष होते. कित्येक विद्यार्थी उचलून जेलमध्ये टाकले गेले, त्यातले अनेक जण हाल करुन मारले गेले. यात नफिसी यांचेही विद्यार्थी, विद्यार्थीनीही होते. यांचा गुन्हा होता नवीन, जुलमी राजवटीचा विरोध करणे, पारतंत्र्य झुगारण्याचा प्रयत्न करणे. या काळात कित्येक घरातली तरुण मुलं, मुली, अनेक इंटलेच्युअल्स, प्रोफेसर्स, लेखक, पत्रकार या इस्लामिक रिव्होल्युशनमध्ये मारले गेले.
या सर्व पार्श्वभूमीवर तेहरान युनिव्हरसिटीमध्ये इंग्लिश लिटरेचर विभागात नफिसी वेस्टर्न क्लासिक लिटरेचर विद्यार्थ्यांना शिकवायच्या. सरकारच्या डोळ्यात खटकणार्या वेस्टर्न क्लासिक्सचा हा वर्ग विद्याथ्यांमध्ये मात्र अतिशय लोकप्रिय होता. नियम न पाळल्यामुळे अनेकदा तंबी दिल्यानंतरही, शिकवत असलेल्या वेस्टर्न क्लासिक्सबद्दल 'उथळ', 'प्रक्षोभक' अशी सतत टिका ऐकतही नफिसी फक्त स्वतःकरता, या पुस्तकांच्या प्रेमाकरता आणि आपल्या विद्यार्थ्यांकरता शिकवत राहिल्या. पण शेवटी १९९५ साली शिकवणे सोडल्यानंतर आपल्या काही निवडक विद्यर्थिनींना घरी बोलवून या पुस्तकांचे वाचन आणि चर्चा सुरु केली. इस्लामिक राजवटीत हे करणे अतिशय धोकादायक होते, तरीही परिणामांची पर्वा न करता, (काही जणी) घरी खोटे सांगून, केवळ पुस्तकांच्या प्रेमापायी या मुली एकत्र जमत. हा वेळ या मुलींकरता एक मोकळा श्वास होता, एक स्वप्न होतं, नियम झुगारुन देण्याची एक नशा होती.
पुस्तकामध्ये नफिसींच्या गुरु स्थानी असलेल्या (ज्यांचा उल्लेख त्या 'माय मॅजिशियन' म्हणून करतात) व्यक्तीचाही उल्लेख होत राहतो. हा मॅजिशियन नफिसींचा 'फ्रेड, फिलॉसॉफर, गाईड' आहे.
या पुस्तकात निफिसींच्या या मुलींचे आणि नफिसींचे व्यक्तिगत आयुष्य, त्याकाळची इराणमधल्या प्ररिस्थितीवर भाष्य, आणि वाचत असलेल्या पुस्तकांचे सुंदर विवेचन या गोष्टी अतिशय सुरेख रितीने गुंफल्या आहेत. हे पुस्तक म्हणजे फक्त एक गोष्ट किंवा अनुभव कथन नाही तर एका अतिशय अभ्यासू, उत्कट आणि इंटलेक्चुअल व्यक्तीने लिहिलेल्या आठवणी आहे हे लक्षात येते. 'रिडींग लोलिता...' तुम्हाला अंतर्मुख करते. कमालीचे कडक नियम, तशाच शिक्षा, आयुष्याची काही शाश्वती नाही, तशात लादले गेलेले इराण-इराक युद्ध, आपल्याच राज्यकर्त्यांकडून होणारी परवड, आणि या सगळ्यात आयुष्य जगण्याची धडपड हे सगळे 'रिडींग लोलिता..' मध्ये नफिसी यांनी समर्थपणे मांडले आहे.
त.टी.
मला मिडल इस्टमधल्या देशांबद्दल नेहेमीच एक कुतुहल, आणि नागरिकांबद्दल करुणा वाटत आली आहे. अफगाणिस्तानपासून ते सौदी अरेबिया (अगदी उत्तर अफ्रिका ) पर्यंत सर्व देशांना अतिशय रिच हिस्टरी आहे. ग्रीक, रोमनांपासून ते नंतरच्या मुस्लीम राजेशाहीने या भागावर राज्य केले. विसाव्या शतकात बर्याच देशांना युरोपियन कॉलनीपासून स्वातंत्र्य मिळाले, किंवा युरोपियनांच्या हातातले खेळणे असलेल्या सत्तेच्या विरोधात उठाव करुन जनतेने स्वातंत्र्य मिळवले. पण आधी युरोपियन प्रभावामुळे बर्यापैकी आधुनिक असलेले देश हे मुसलमान मूलतत्त्ववाद्यांच्या प्रभावामुळे आता उलटा प्रवास करायला लागले. लोकांचे स्वातंत्र्य गेले, जुलमी नियम आले, स्त्रियांबर अनेक बंधने आली. इराण, अफगाणिस्तान हे याचे प्रमुख उदाहरण. बाकीही काही देशांची दुर्दैवाने तिकडे वाटचाल सुरु आहे... असो.
मी हे पुस्तक ऑडीओबूक फॉर्मॅट मध्ये ऐकले. ऑडीओबूक आवडणे किंवा न आवडणे हे नरेटर वर बरेच अवलंबून असते. या पुस्तकाचे अतिशय सुंदर अभिवाचन स्वतः नफिसी यांनी केले आहे. किंबहुना ८-१० दिवस त्यांचा अवाज ऐकायची इतकी सवय झाली होती की पुस्तक संपल्यावर मला हुरहुर वाटत राहिली. :)
नफिसींचा इराणियन अॅक्सेंट या पुस्तकाकरता अगदी योग्य वाटला. स्वतःचे पुस्तक वाचत असल्याने योग्य चढाव उतार आणि हव्या तश्या इमोशन्स त्यांच्या वाचनात छान उतरल्या आहेत. कुठल्याही अमेरिकन अॅक्सेंट असलेल्या व्यक्तीने या पुस्तकाचे वाचन केले असते तर त्याचा इंपॅक्ट कमी झाला असता असं मला उगाच वाटलं ;).
नफिसी या १९९७ साली इराण सोडून अमेरिकेत स्थाईक झाल्या. सध्या त्या जॉन हॉपकिन्स युनिव्हरसिटीमध्ये इंग्लिश लिटरेचरच्या प्रॉफेसर म्हणून काम करतात. 'रिडींग लोलिता...' नंतर त्यांनी अजून २ पुस्तके लिहिली आहेत.
