'लेडीज स्पेशल' (कथा)

आशुतोषने सकाळचा चहा पित असतांना नेहमीच्या सवयीने मोबाईल हातात घेऊन मेसेजेस, व्हॉट्स अप चॅटस,एफ. बी. बघायला सुरुवात केली. काही वेळातच त्याच्या स्क्रीनवर व्हॉटस अप पॉप अप आले. अमित अॅडेड यू....अम्याने नवा ग्रुप का तयार केला? असा विचार करतच आशुतोष त्या ग्रुपवर पोचला. अमित अॅडेड निखिल,अमित अॅडेड कुणाल असे एकापाठोपाठ एक मेसेजेस वाचत असतांनाच नंतरच्या मेसेजने आशुतोषला हसूच आले.

अमित चेंज्ड ग्रुप नेम टू ‘लेडीज स्पेशल’.

“अम्या... सकाळी सकाळी टाकली काय रे पहिल्या धारेची?” आशुतोषने पोस्ट टाकली.

पाठोपाठ निखिलही “XXXX, चार मुलांच्या ग्रुपचे नाव लेडीज स्पेशल? :thinking:

कुणालही आलाच ऑनलाईन आणि विचारता झाला , “काय रे, आहे ना आपला फॅमिली ग्रुप? शिवाय कझिन्स ग्रुपपण आहेच , मग ही भर कशाला?”

आशुतोष आणि निखिलने ताबडतोब कुणालच्या पोस्टला + १ करुन आपले टायपिंगचे कष्ट वाचवले.

“आज तारीख काय आहे रे आशु, सांग बरं”,अमित विचारता झाला.

“आज.....तारीख, १ मार्च आहे”, कालच्या मंथ एंडच्या थकवणार्‍या कामाची आठवण होतांच आशुने सांगितले.

“करेक्ट. आजपासून बरोब्बर आठ दिवसांनी काय येणार?"इति अमित

“आठ तारीख”... इति आशु

“वेरी स्मार्ट”..... इति अमित

“थँक्यु थँक्यु”.... इति आशु

“ए का पकवताय यार?” निखिल मधेच टपकला.

कुणाल टायपिंग असे दिसतांच आशुने पोस्ट टाकलीच “कुणाल निबंध लिहीतोयस का रे बाबा?”

कुणालची पोस्ट आलीच तोवर, “ए यार मी एक्झिट घेऊ का इथुन? प्लीज यार... बरेच ग्रुप्स झालेत.......सैराटतो मी इतके ग्रुप्स पाहुन”.

अमित ताबडतोब म्हणाला , “ ए थांब ए. अजुन थोडा सैराटशील. जाऊ नकोस पण.
ऐका तर आता. आठ तारखेला ‘वूमन्स डे’ आहे, ओके?”

“ओके.. मग?” -- आशु

“तर मी सहज विचार करत होतो की ईशासाठी काय करायचं या वर्षी आणि मला एक भन्नाट आयडीया सुचली की या वर्षी तुम्हाला तिघांना सामील करुन घेऊ आणि आपण चौघे मिळून आपल्या बायकांसाठी काहीतरी झक्कास प्लॅन करु .... एकदम खूश होतील त्या असं काहीतरी”.

“असं होय?... हम्म...नॉट अ बॅड आयडीया”.... आशु म्हणाला.

निखिलने +१ करुन टाकले.तसंच पलिकडे एफ. बी. वरही काहीतरी न वाचताच लाईक केले आणि परत इकडे आला.

कुणाल हे सगळं वाचून त्रासिकपणे बोललाच, “ए काय यार हे सगळं पकाऊ... श्या... मला नाही असलं काही आवडत”.

“ए गप ए, तुझ्यासाठी काही करायचंच नाहीये, वहिनीसाठी करायचंय आणि तू निमुटपणे आम्हाला साथ देणारेस.
नेहमीसारखा रडू नकोस”. अमितने खडसावले.

“ठीक आहे यार देतो साथ, पण वेळ बघा वाजले आठ “

“ओह, चला आवरायला हवं”... निखिल म्हणाला.

अमितने कंक्लुड केले, -“ सो गाईज कळला ना या ग्रुपचा उद्देश? फक्त एक करायचं आपापल्या फोन्सना पासवर्ड टाकायचे , आधीपासून असले तर चेंज करायचे. हे सगळं डिस्कशन आणि हा ग्रुपही टॉप सिक्रेट रहायला हवंय. भन्नाट सरप्राईझ प्लॅन करणार आहोत आपण. आता चला लागा कामाला, काय करता येईल याचा विचार करा, नेट सर्च, मित्र, कलीग्ज सगळ्यांकडून माहिती काढा आणि इथे पोस्टत रहा, आपण ठरवून कॉनकॉल्सही करुयात, ओके?”

“ओके”

“ओके”

“ओके”

“बाय ऑल, गूड डे.” अमितने निरोप घेतला सर्वांचा.

आणि या वेळेपासून सुरु झाला चौघांचा एकत्रित प्रवास ‘सरप्राईझ’ प्लॅन करण्यासाठी. कोणी नेट वर वन डे
पिकनिक स्पॉटस शोधुन काढले तर कोणी लेटेस्ट सिनेमाचे रिव्ह्युज चाळले. कुठे कसलं प्रदर्शन भरलंय का
याची चाचपणी झाली. चौघींच्याही आवडीनिवडी विचारात घेऊन त्या चौघी काय एंजॉय करु शकतील यावर
चर्चा झडत होत्या. त्या वेळेत चौघांच्या मुलांची जबाबदारी आपण घ्यायची यावर एकमत झाले म्हणजे
बायकांना त्यांचा ‘मी टाईम’ मिळेल. कुणालही अनिच्छेने का होईना यात सहभागी होत होता आणि मग तोही या प्रोसेसचा भाग झाला. त्यानेही मित्र मंडळींकडून मिळालेली माहिती ‘लेडीज स्पेशल’ ग्रुपवर शेअर केली. त्या माहितीची खातरजमा केली. प्रोज आणि कॉन्स तपासले.

भरपूर चर्चा, काथ्याकुट करता करता शेवटी खोपोलीजवळचं अॅडलॅब इमॅजिका हे थीम पार्क सर्वानुमते फायनल करण्यात आले. संपूर्ण दिवस चौघी तिथे मनसोक्त हुंदडतील आणि आपण मुलांची शाळा झाली की त्यांनाही किडझेनिया मध्ये पाठवू दुपारच्या सेशनला असा जबराट प्लॅन आखण्यात आला. तिकीट्स बूकींग झाले.अमितची ईशा, आशुतोषची आकांक्षा आणि कुणालची किर्ती नोकरी करणार्‍या. त्या तिघींच्या ऑफिसातील मैत्रिणींना या दिवशी त्यांना सुट्टी घ्यावी लागेल याचीही नवरोबांनी कल्पना देऊन ठेवली होती आधीच म्हणजे आयत्या वेळी सुट्टी मिळणार नाही असे व्हायला नको. नेहा तिचे काम घरुनच करत होती. त्यामुळे तिला ही अडचण येणार नव्हती. मुलांच्या शाळांमध्येही परीक्षा वगैरे नाहीत याची खातरजमा सगळ्या बाबांनी करुन घेतली. या चौघांनीही आपापल्या ऑफिसात सुट्टी घेऊन ठेवली होती. आता सगळे भलतेच एक्साइटेड होते.

सर्वांत महत्वाचे सर्वांकडून हे गुपित पाळले गेले अगदी सात तारखेच्या संध्याकाळपर्यंत आणि मग ईशा, आकांक्षा, किर्ती व नेहाला हा भन्नाट प्लॅन समजला आपापल्या नवर्‍याकडून. सर्वप्रथम हडबडल्याच चौघी. हे असं काही अपेक्षितच नव्हतं ना... एकमेकींना फोन झाले खातरजमा करुन घ्यायला, ऑफिसचे अर्जंट मेसेजेस, मेल्स पुरे केले आणि मग किती वाजता निघायचे, कुठे भेटायचे, काय घालायचे यावर त्यांचे चर्चासत्र रंगले. नवरोबांनी कार बूक करुन ठेवलीच होती. त्या गाडीचे डिटेल्स, पिक अप पॉइंटस, वेळ सर्व समजावून सांगितले मग त्यांना. सणासुदीसारखे वातावरण चारी घरात निर्माण झाले. जय्यत तयारी सुरु होती. तुमच्या खाण्या पिण्याची काही सोय करुन ठेवू का ? या प्रश्नावर चौघा आदर्श पतिदेवांनी ठाम नकार दिला. उद्या तुम्ही फक्त आणि फक्त मज्जाच करायची आहे असे ठणकावून सांगितले. दुसर्‍या दिवशींची सुखद स्वप्ने रंगवत सर्व निद्राधीन झाले.

दुसर्‍या दिवशी सकाळी नियोजित वेळी गाडी आली,एकेकीला पिक अप करत सगळ्या भेटल्या आणि त्यांची पिकनिक सुरु झाली.

घरी नवरोबांनी मुलांना तयार करुन शाळेत पाठवले. सर्व आवरुन ब्रेकफास्ट , इतर काही कामे वगैरे आटपून होईपर्यंत झालीच दुपार. मुले यायची वेळ झाली. त्यांना पिक अप करुन मग चौघे भेटले आर सिटी मॉलला. मुलांसह जेवून मुलांना किडझेनियात पाठवून मग या चौघांचा गप्पांचा अड्डा जमला मस्तपैकी. आधी बराच वेळ स्वतःचीच पाठ थोपटून घेतली त्यांनी या जबरी प्लॅनसाठी. कसे बायकोला खुश केले, आता कशी तिला तक्रार करायला जागाच नाही वगैरे वगैरे.

आपण असे वरचेवर भेटत राहिले पाहिजे, एकत्र धम्माल केली पाहिजे हे वाक्य वारंवार आळवले जात होते. यावरुन मग एकत्र वेकेशनला जायचे यावर सर्वांची गाडी येऊन ठेपली. आपापल्या आधीच्या वेकेशन्सची चर्चा , ते फोटोज एकमेकांना दाखवणे सुरु होते. कुणालच्या सिंगापूरच्या पिकनिकचे फोटोज बघत असतांना सहज म्हणून निखिल म्हणाला, "अरे या अॅडवेंचरस राईडसमध्ये किर्तीचा एकही फोटो नाही काढलास ते , ती आली होती ना?" नाही यार तिला मोशन सिकनेस आहे ना, ती नाही बसत या राईडसमध्ये त्रास होतो तिला आणि त्या क्षणाला चौघेही चपापले. एकमेकांकडे बघू लागले आणि कुणालला, आपण ही किर्तीच्या बाबतीतली इतकी मोठी गोष्ट, ही पिकनिक प्लॅन करताना साफ विसरलो याची जाणीव झाली. त्याला भयंकर ओशाळल्यागत वाटू लागले. "अरे पण किर्ती बोलली नाही का स्वतः काल, इमॅजिकाचे नाव सांगितल्यावर?" अमितने विचारलं. "नाही ना, काहीच नाही बोलली. कदाचित सगळं आधीच फिक्स केलं होतं म्हणून गप्प बसली असेल, पण मी हे विसरायला नको होतं यार शीट... काय हे मी करुन बसलो. किर्ती खरंच आज एंजॉय नाही करु शकणार, राईडस घेतल्या तर अजिबातच नाही आणि नाही घेतल्या तर एकटीच पडेल रे ती", कुणाल बोलून गेला.

" हम्म, या तिघी आहेत ना रे तिच्यासोबत, करतील काहीतरी मॅनेज, तू नको काळजी करुस. जाऊ दे आता, व्हायचं ते झालं तू मुद्दाम तर नाही ना केलंस?” अमितने कुणालला समजावत असतांना सहज खिशातून फोन बाहेर काढला. फोनसोबत कसलीशी चिठ्ठी हातात आली. कालचं मेडीकलचं बिल होतं ते, ईशाने आजसाठी काही औषधे मागवली होती. सहज म्हणून अमितने नजर फिरवली त्यावर, त्यात एक पेनकीलर विकत घेतल्याची नोंद होती. ईशाला दर महिन्यात घ्यावी लागायची ती. अर्र म्हणजे ईशाचे ‘ते दिवस' चालू आहेत?... हो की…. आठ तारीख म्हणजे असणारच, आपण कसे विसरलो? तिला तर किती त्रास होतो दरवेळी? कशीतरी ऑफिसला जाते आणि आज ही अशी पिकनिक? ओह नो, तिलासुद्धा आज त्रास होत असणार म्हणून आठवणीने गोळ्या घेतल्या सोबत. अमितला तर मेल्याहून मेल्यागत झाले. हे सगळे त्याच्याच सुपीक डोक्यातून आले होते. आपण आपल्या बायकोच्या इतक्या महत्वाच्या गोष्टी नाही लक्षात ठेवू शकत.. या अशा सरप्राईझेसना काय अर्थ आहे मग? तो बोलुन गेला. सगळ्यांचा मुडच पालटून गेला अचानक, या वास्तवाची जाणीव होताच. चौघींपैकी एक आजारी, दुसरी या थिमपार्कच्या राईडस न घेऊ शकणारी, उरल्या फक्त आकांक्षा आणि नेहा, पण यांच्याशिवाय त्या दोघीच काही कुठे जायच्या नाहीत, एकंदर काय सगळ्या पिकनिकचा फियास्को.

किर्ती आणि ईशाचे चुकलेच पण. आठवण करुन द्यायची ना? आपण लास्ट मोमेंटला सगळा प्लॅन चेंज करु शकलो असतोच की. अमित मनातल्या मनात चडफडत होता. नाही, ही माझी चुक आहे, त्यांना ब्लेम करुन काहीही फायदा नाही. त्यांनी सर्वांच्या आनंदावर विरजण पडायला नको असा सूज्ञ विचार केला फक्त, स्वतःच्या प्रॉब्लेम्सचे घोडे पुढे न दामटता.

आता काय करायचं पुढे? हा गंभीर प्रश्न चौघांपुढेही उभा होता.

"कॉल करुन बघुयात का? काय परिस्थिती आहे ते कळेल तरी" निखिल म्हणाला.

"नको रे फोन करुन काय होणार आहे? आपण काय लगेच पोचणार आहोत थोडीच?" आशु उत्तरला.

"मग काय करायचं काय आता?" कुणाल विचारु लागला.

“संध्याकाळी शांतपणे बोलणी खायची अशी बकवास पिकनिक प्लॅन केल्याबद्दल", निखिल बोलून गेला.

"ते तर आहेच रे गॄहीत धरलेलं. आपण कोणीतरी दोघे जाऊयात का तिथे? त्यांना काही मदत हवी असल्यास बरे पडेल. आणि दोघे इथे थांबू मुलांची वाट बघत", अमितने सुचवले.

कुणाल म्हणाला "नको, आता आयत्या वेळी अजून गोंधळ नको. जे काही असेल ते त्यांचं त्या निस्तरतील. हुशार आहेत रे चौघी. आपल्या आधाराची गरज नाही लागायची. आपण फक्त एक करुयात आता संध्याकाळसाठी एक मस्त प्लॅन करु."

"अरे प्लीज यार आता काही नको प्लीजच", सर्वांनी कुणालचे म्हणणे खोडून काढले.

"तसं काही खास नाही रे. पण आपण संध्याकाळी आपापल्या घरी जाणार होतो त्यापेक्षा त्यांना इथेच बोलावूयात, छान रेस्टॉरंटमध्ये सर्व मिळून डीनर घेऊ. नाहीतरी रात्री कुठे काय करणार त्या घरी जाऊन जेवायला? आणि सर्व मिळून झाल्या प्रकाराबद्दल सॉरी बोलून टाकू. सगळे एकत्र असले की बरं रे, राग विभागला जाईल त्यांचा" कुणालने पुस्ती जोडली.
एकंदर विचार करता कुणालच्या बोलण्यात तथ्य होते.जवळच एका डीसेंट रेस्टॉरंटमध्ये १२ जणांसाठी टेबल बूक करुन टाकले त्यांनी आणि तसा मेसेज चौघींना पाठवला.

हे सगळं होईपर्यंत संध्याकाळ होतच आली होती. काही वेळातच आकांक्षाने मेसेज करुन त्या तिथून निघाल्या असल्याचे सांगितले. परिस्थिती आटोक्यात असावी आणि फार काही ऐकून घ्यायला लागू नये यासाठी चौघांनी फिंगर्स क्रॉस केली.

आता मुलेही बाहेर आली, मस्त एंजॉय करुन. तिथल्या गंमती जमती बाबांना ऐकवण्याची त्यांना कोण घाई. मुलांचे धम्माल किस्से ऐकण्यात चौघेही रमून गेले. चारही मुलं बाबांवर जबरदस्त खूश होती आजच्या सरप्राईझसाठी. आईपण इथेच येणार आणि आपण आता मस्त डीनर करायचे हे ऐकून ती अजूनच खुश झाली.

काही वेळात चौघींची गाडी पोचलीच. नवरोबा पुढे सरसावले त्यांना रिसिव्ह करायला, बिचकत, घाबरत. चौघींचेही चेहरे थकलेले पण प्रसन्न दिसत होते. सकाळसारख्याच चौघीही खुश दिसत होत्या. आनंदी नजरेतूनच त्यांनी आपापल्या नवर्‍यांना "थँक्यु" म्हटले जसे काही.

ठरलेल्या रेस्टॉरंटमध्ये पोचून सारे स्थानापन्न होताच सर्वप्रथम ईशाने बोलायला सुरुवात केली. "तुम्ही सर्वांनी मिळून आमच्यासाठी आज इतके गोड सरप्राईझ प्लॅन करुन आम्हांला इतके खुश केलेत त्याबद्दल तुम्हां सर्वांसाठी आम्ही रिटर्न गिफ्ट्स आणल्या आहेत आणि त्या ही अगदी कस्टमाईझ्ड", असे म्हणत तिने हातातील पिशवीतून मोठ्ठा बॉक्स बाहेर काढला" 'ब्लॅक फॉरेस्ट केक.... वॉव...' सर्वांनी टाळ्या वाजवत पसंतीची पावती दिली. ईशाने हळूच एक छोटासा बॉक्स अमितच्या हातात दिला एका रेड रोजसह, त्यात एक रेड वेल्वेट केक होता... खास अमितसाठी..... त्याला आवडतो म्हणून...ईशाकडून". तो केक बघताच अमितला भरुन आले. आपण काय इमॅजिन करत होतो, ईशा चिडेल, भांडेल आणि काय काय. हिने तर माझ्याहून भन्नाट सरप्राईझ मला दिलेय. हलकेच तिचा हात दाबत अमित नजरेनेच ईशाला म्हणाला,"थँक्स".

आता किर्तीने बोलायला सुरुवात केली. "माझा वेंधळा कुणाल नेहमीच्याच वेंधळेपणानुसार माझ्या मोशन सिकनेसबद्दल विसरला हे मला काल संध्याकाळीच लक्षात आले. पण एकंदर तुम्हां सर्वांचा प्लॅन एकदम फक्कड होता सो मी त्याला मुद्दाम याची आठवण न करुन देता एक शक्कल लढवली. आजची तयारी करायला म्हणून बाहेर पडले आणि थोडीशी खरेदी करुन आले, ड्रॉईंग पेपर्स, कलर्ड पेंसिल्स, स्केचपेन्स वगैरे आणि या तिघींना मला माझा मी टाईम एंजॉय करु द्यात असे सांगून जबरदस्तीने राईड्स घ्यायला पाठवले. ईशाही तिला झेपेल तितक्या राईड्स घेत मजा करत होती. गेली कित्येक वर्षे वेळेअभावी दूर पडलेला माझा ड्रॉईंग हा आवडीचा छंद, आज अशा निसर्गरम्य ठिकाणी मला पुन्हा गवसला. मी भरपूर स्केचेस काढली, खरंच मला वेळेचे भानच राहिले नाही. आज एक पक्के ठरवले की ड्रॉईंग हा माझा स्ट्रेसबस्टर आहे, यापुढे हा छंद दूर सारायचा नाही.माझ्या कलेशी माझे पुन्हा नाते जोडून दिल्याबद्दल माझ्या नवर्‍याला ही माझ्याकडून सप्रेम भेट असे म्हणत तिने त्या सर्व ड्रॉईंग शीटस कुणालच्या हातात सुपुर्द केल्या. कुणाल अभिमानाने भारावून आपल्या बायकोची कला कौतुकाने न्याहाळत होता.तिने कितीतरी चित्रं काढली होती आज एका दिवसांत. निसर्गचित्रे, समोर दिसणार्‍या झाडाची, फुलाची, कुणालचेही एक पोर्ट्रेट काढले तिने. सर्वांना आज किर्तीचे वेगळेच रुप पहायला मिळाले. सर्वांनी तिच्या चित्रांचे कौतुक केले.

ज्या दोघींची दुपारपासून इतकी काळजी वाटत होती त्यांचा असा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून वातावरण एकदम हलके झाले. एकमेकांची थट्टा मस्करी सुरु झाली. आकांक्षा व नेहाला तुम्ही काय गिफ्ट आणलेत असे आशु आणि निखिलने विचारतांच एकच हशा पिकला. आकांक्षाने आपला फोन बाहेर काढत एक व्हिडीओ क्लिप सुरु केली. तिने स्वतः आशुतोष साठी बनवलेली ती एक मिनि मूव्ही होती, 'वूमन्स डे स्पेशल’ अशी. आशुतोषच्या जीवनात सुरुवातीपासून आजतागायत आलेल्या सर्व स्त्रियांचे फोटों त्यात होते. त्याची आई, आजी, बहिण, इतकंच काय तर त्याच्या मैत्रिणी, ऑफिसातील स्त्री सहकारी, तिचे स्वतःचे आणि त्यांच्या मुलीचे सुंदर सिलेक्टेड फोटो. ते पाहता पाहता आशु भुतकाळाच्या रम्य आठवणींत रमला. सलग तीन वेळा ती मूव्ही फाईल पाहून त्याने कौतुकाची थाप मारली आकांक्षाच्या पाठीवर.

आता नेहा पुढे सरसावली, तिने एक ऑडीओ क्लीप सुरु केली. ते मराठी भावगीत होते, निखिलच्या आवडीचे आणि चक्क नेहाने स्वतः गायलेले निखिलसाठी. अनेक वर्षांपूर्वी नेहा हेच गाणे कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये गात असतांना निखिलने समोर बसून ऐकले होते आणि त्या गाण्यासकट तिच्या प्रेमात पडला होता तो. कॉलेज संपून गेल्यावर हे सगळं मागे पडून गेलं आणि आज असं अचानक पुन्हा भेटलं आठवणींचे तुषार अंगावर घेऊन. तिच्या गोड आवाजाने सर्व वातावरणच भारुन गेले. सर्वांनी नेहाला 'वन्स मोअर' देत तिच्याकडून ते गाणे पुन्हा गाऊन घेतले, प्रत्यक्ष.

एकंदरीत आजचा पूर्ण दिवस सरप्राईझेसने भरगच्च भरलेला, हॅपनिंग असा होता.या चौघींच्या अनपेक्षित अशा 'कस्टमाईझ्ड गिफ्टस'ने तर या दिवसाला चार चांद लावले. कसलेही अॅडवांस प्लॅनिंग नाही की चर्चा करण्यासाठी त्यांपैकी एकीलाही कुठल्या ग्रुपची गरज भासली नाही. प्रत्येकीने आपल्या अंगचे कलागुण वापरुन, नवर्‍याच्या आवडीनुसार आणि आधुनिक तंत्रज्ञानाची थोडीशी मदत घेत आपापले गिफ्ट, पिकनिक एंजॉय करत असतांनाच बनवले, ते सुद्धा आपल्या नवर्‍यातील उणीवांकडे सहजच दुर्लक्ष करत अगदी खास 'लेडीज स्पेशल' टचसहीत.

समाप्त

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle