शिमगो ... कोकणातलो

गणपती आणि शिमगा ... होळी नाही, या दोन सणांशी कोकणातल्या लोकांचे अगदी जिवा भावाचे आणि अतूट नाते आहे . हे दोन सण म्हणजे कोकणी माणसाच्या मनातला अगदी हळवा कोपरा आहे. या दोन सणांना जगाच्या पाठीवर पोटासाठी कुठे ही फिरणारा कोकणी माणूस आपल्या कोकणातल्या मूळ घरी येण्यासाठी जीवाचं रान करतो आणि जर नाही शक्य झालं कोकणात येणं तर मनाने तरी या दोन सणांना तो कोकणातच असतो. इथे होळीच्या सणाला शिमगा असं म्हणतात.

देवगड तालुक्यातल्या आमच्या या छोट्याशा गावची प्रथा म्हणजे अख्ख्या गावची म्हणून एकच असते होळी . ती आमच्या ग्राम देवतेच्या देवळा पुढल्या प्रांगणात पेटविली जाते . होळी साठी जे झाड तोडायचं ते फळणार नसावं आणि मालकाची परवानगी घेतल्या शिवाय कोणतंही झाड तोडायचं नाही ही आमच्या गावची परंपरा , जी पर्यावरणाचं रक्षण करणारी अशीच आहे . दुसरी एक गोष्ट म्हणजे होळीला कोणी ही बोंबाबोंब नाही करत आमच्या गावात. त्यामुळे आमच्या गावातल्या लहान मुलांना होळीची बोंबाबोंब माहीतच नाहीये .

होळी झाली की दुसऱ्या दिवसापासून शिमग्याच्या सणाला सुरवात होते . शिमगा हा एकच सण असा आहे कोकणात कि जेव्हा देव अब्दागिरी आणि तरंगांच्या रूपाने गावातील मानकऱ्यांच्या हस्ते गावातल्या अगदी प्रत्येक घरी जातात . यांच्या बरोबर खेळे ही असतात . . देव साधारण कधी कोणत्या घरी येतील याचे एक वेळापत्रक ठरलेले असते .

साक्षात देवच घरी येणार म्हणून आमच्या घरी ही दोन दिवस आधी पासून याची तयारी सुरु होते . आमचं खळं आम्ही पाण्याने धुऊन स्वच्छ करतो . अगदी आमची घाटी हि झाडून पुसून स्वच्छ केली जाते . अब्दागिरीला घालण्यासाठी आम्ही मोठा हार आणि झेंडूच्या फुलांची माळ ही आदल्या दिवशीच तयार करतो. प्रसाद म्हणून सुक्या खोबऱ्याची खिरापत ही आदल्या दिवशीच तयार केली जाते. . तसेच गुळाचा ही प्रसाद असतोच . खेळे करणाऱ्यांना श्रम परिहार म्हणून दरवर्षी लिंबू सरबत , अमृतकोकम, पन्ह असं काहीतरी ही बनवतो . मानकऱ्यांना द्यायचे मानाचे नारळ ही तयार ठेवले जातात .
त्या दिवशी सकाळ पासूनच धामधूम सुरु असते . घरातील वृद्धात वृद्ध व्यक्ती ही देव घरी येणार म्हणून नवीन कपडे घालून स्वागताला तयार असते . खळ्यात पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढली जाते . पूजेचे सगळे साहित्य खळ्यात नीट मांडले जाते . पूजा करणारी व्यक्ती ही टोपी वगैरे घालुन जय्यत तयारीत असते .
वाजत गाजत आगमन

IMG_20170320_144534_0.jpg

अखेर ढोल ताशांच्या गजरात तरंग आणि अब्दागिरी रुपात देवांचे खळ्यात आगमन होते . घरातले सगळेच जणं चार पावलं स्वागताला पुढे जातात . मोठ्या मांनाने देव आमच्या खळ्यात विराजमान होतात.

तरंग आणि अब्दागिरी
IMG_20170320_145130.jpg

त्यांची यथासांग पूजा केली जाते. घरातले सगळे मेम्बर भक्तिभावाने नमस्कार करतात . यावर कोकणातल्या लोकांची इतकी श्रद्धा आहे की कधी कधी नवस ही बोलले जातात इथे . इकडे पूजा होत असतानाच खेळे आपल्या नाचाला प्रारंभ करतात.

खेळे

HqIMG_20170320_145535.jpg

हे खेळे म्हणजे आमच्याच गावातील काही तरुण मंडळी असतात, जे ढोल ताशाच्या गजरात गरब्या सारखा नाच करतात . ह्यांची वेशभूषा वर फोटोत दिसते आहे तशी असते. शिमग्याच्या आधीपासूनच भरपूर सराव केल्या मुळे खेळे सुंदर नाच करतात . भान हरपून मंडळी त्यांचा परफॉर्मन्स पाहत असतात . ह्यात आमच्याकडे रोज कामाला येणारे ही काही जण असतात पण पूर्ण निराळ्या मेकप आणि वेशभूषे मुळे नीट निरखून बघितल्या शिवाय ते आम्हाला ही ओळखु येत नाहीत . पंधरा वीस मिनिट खेळे चालतात. शेवटी मानकरी यजमानाच्या सुख समृद्धी साठी कोकणातलं फेमस गाऱ्हाणं घालून आशीर्वाद देतात .

खेळयाना मग गूळ पाणी दिले जाते . प्रसाद दिला जातो . श्रमपरिहारासाठी सरबत, चहा, लाडू असं काहीतरी ही दिलं जात . खेळे ही एक लोक कलाच आहे आणि पैशाच्या पाठबळा शिवाय कोणतीही कला टिकणे शक्य नाही या विचाराने खेळ्याना भरघोस मानधन दिले जाते . नंतर हे तरंग आणि अब्दागिर वाजत गाजत दुसऱ्या घरी जातात तेव्हा सुद्धा यजमान मंडळी निरोपा दाखल चार पावलं त्यांच्या बरोबर चालतात .
खरं तर खेळे घरी असतात जेमतेम अर्धा पाऊण तास पण तरी ही ते गेल्या नंतर खळं मोकळं मोकळं आणि उदास भासायला लागत पण त्याचं बरोबर देव आपल्या घरी येऊन गेले आपण यथा शक्ती त्याचं स्वागत केलं हे मोठं समाधान ही असतंच .
असा हा खेळयांचा खेळ गावातल्या प्रत्येक घरी जातो . हा कार्यक्रम चांगला आठवडाभर तरी चालतो . पंचमीला घरा घरातली छोटी मुलं रंग लावून रंगपंचमी साजरी करतात . ह्यात मोठ्यांचा सहभाग बिलकुल नसतो . खेळे घरोघरी जाऊन आले की तरंग आणि अब्दागिरी परत देवळात स्थानापन्न होतात त्यापुढे मानाचा नारळ ठेवला जातो आणि शिमगोत्सवाची सांगता होते .

तसं बघायला गेलं तर खेळे ही एक लोककलाच आहे पण त्याला धर्माची ही जोड दिल्यामुळे काळाच्या ओघात ही कोकणातून नष्ट होणार नाही असा विश्वास वाटतो.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle