बक्लावा - खाऊगिरीचे अनुभव ३

नवीन सदस्य

  • मन्जु
  • सुखी
  • आऊ
  • Prajakta P
  • संगीता

बक्लावा - खाऊगिरीचे अनुभव ३

न्यूकासलला जेसमंड मॉलमध्ये मिशेल्स नावाचं एक केक्स आणि पेस्ट्रीजचं दुकान होतं. मला तेव्हा केक्स आणि पेस्ट्रीजचं फारसं आकर्षण नव्हते. भारतीय गोड पदार्थ जास्त आवडत होते. परदेशी गोड पदार्थ फारच अगोड वाटायचे. एक दिवस नवरा म्हटला की "चल तुला मिशेल्समध्ये बक्लावा खाऊ घालतो". तेव्हा बक्लावा हे काय प्रकरण आहे ते मला अजिबातच माहित नव्हतं. मी त्याला विचारलं "हे काय असतं?" तर तो म्हटला "एक टर्कीश गोड पदार्थ असतो. आवडेल तुला" म्हटलं बघुयात तरी काय आहे हे. आम्ही एकेक बक्लावा घेऊन तिथे खायला बसलो. तेव्हा सुद्धा फोटो काढलेले नाहीत. खालचे फोटो इंटरनेटवरून घेतले आहेत.

तर बक्लावा म्हणजे चिरोट्यासारखे पापुद्रे असलेले स्तर मध्येच अक्रोडची पूड सँडविच सारखी भरलेली. आणि हे सगळे एकत्र राहावे म्हणून प्रचंड प्रमाणात वापरलेला मध. सुरुवातीला एक घास खाल्ला आणि गोडमिट्ट चवीने अगदी तोंड फिरायची वेळ आली होती. पण तेव्हाच कळले होते की मी ह्या बक्लाव्याची लाईफटाईम फॅन असणार आहे. त्यानंतर मिशेल्समध्ये बक्लावा खाणे हा आमच्याकडे नियमित समारंभ होता. पण बक्लावा मी खरा खाल्ला ते स्कॉटलंडमध्ये येऊन. येथे आल्यानंतर एका महिन्यात लगेचच येथील स्थानिक इंटरनॅशनल मार्केटला भेट देणे झाले. तेथे टर्किश स्टॉलमध्ये विविध प्रकारचे बक्लावे खायला मिळाले. विविध आकाराचे, कधी शेवया, वापरून केलेले, कधी नुसतेच चिरोट्यासारखे स्तर असलेले, कधी अक्रोड, कधी बदाम तर कधी पिस्ता वापरून केलेले.

त्यानंतर बक्लावाबद्दल थोडेसे वाचन करता कळले की हा पदार्थ केवळ टर्कीश नसून मेडिटरेनियन देश, इराण, इराक, इत्यादी ठिकाणीसुद्धा खाल्ला जातो. आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणविली म्हणजे बक्लावा कसाही केलेला असला तरी त्याच्या चवीमध्ये फारसे वेगळेपण येत नाही. कारण त्यातील घटक फारसे बदलत नाहीत. पण हा माझा मोठ्ठा गैरसमज होता. आणि तो दूर केला ते माझ्या नवऱ्याच्या इराणी आणि इराकी विद्यार्थ्यांनी. हे लोक घरी गेले की प्रेमानी त्यांचे स्थानिक बक्लावे आमच्यासाठी आणत होते. तेव्हा कोठे मला कळले की इतके दिवस मी अस्सल साजूक तुपातील बक्लावे कधी खाल्लेच नव्हते.

अस्सल (ऑथेंटिक) खाण्याचे महत्व काय असते ते तेव्हा मला कळले. पदार्थाची चव अस्सल आहे की नाही हे कळण्यासाठी एखाद्या स्थानिक माणसाची मदत आवश्यक असते. अनेक वर्षे आपण अस्सल चवीचा आहे असे समजून एखादा पदार्थ खात असतो पण असे काही अनुभव आले की कळते की पदार्थाच्या अस्सलपणास एखाद्या स्थानिक माणसाने दुजोरा देणे आवश्यक असते. हल्ली नवीन प्रयोग करताना आवर्जून आम्ही असा दुजोरा घेत असतो.

भारतासारख्या देशात मात्र पदार्थाच्या "अस्सलपणाला" अनेक कंगोरे आहेत. जसे वैविध्यपूर्ण हवामान आहे तसे जातीनुरूप आणि प्रदेशानुरूप वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात. एकाच पदार्थाची चवसुद्धा जातीनुरूप आणि प्रदेशानुरूप बदलते. मी महाराष्ट्रात वाढलेली आहे त्यामुळे हे फरक थोड्याफार प्रमाणात मला समजतात. इतर प्रांतातील (अगदी भारतातीलसुद्धा) पदार्थांचे असे सूक्ष्म फरक कळायला कदाचित उभे आयुष्य जावे लागेल.

पदार्थाच्या अस्सलपणावरून मला एक गमतीशीर किस्सा आठवला. येथे तो अवांतर आहे तरीही लिहिते. न्यूकासलमध्ये माझ्या नवऱ्याचा एक ऑस्ट्रेलियन मित्र त्याला म्हणायचा "तुझ्या डब्यात जशी पोळीभाजी असते तशी कोणत्या भारतीय रेस्टॉरंटमध्ये मिळते ते सांग. मला तुझ्या डब्यातील पोळीभाजी जास्त आवडते." तेव्हा आम्ही त्याला सांगितले की "जे पदार्थ रेस्टॉरंटमध्ये मिळतात ते आम्ही घरी खूप कमी वेळा बनवितो. किंवा अजिबात बनवीत नाही असे म्हटलेस तरीही चालेल. आणि अशी पोळीभाजी तुला केवळ लोकांच्या घरांमध्येच बनविलेल्या जेवणातच खायला मिळेल". ह्या प्रसंगावरून पदार्थाच्या अस्सलपणाबद्दल जो घ्यायचा तो धडा आम्ही घेतला होता.

पदार्थाच्या अस्सलपणावरचा एवढा धडा मिळाला असला तरीही येथे मिळणारा बक्लावा माझ्या आवडीच्या गोड पदार्थांच्या यादीत पहिल्या पाचात आहे. आजही इंटरनॅशनल मार्केट लागले की आम्ही बक्लावाच्या स्टॉलला भेट दिली नाही असे होत नाही. अर्थात अस्सल बक्लाव्याला झुकते माप आहेच. पण अस्सल असो वा नसो जे आपल्याला आवडते ते खावे हेही तितकेच खरे!!!

Share this

Add comment

Login or register to post comments
Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle
आत्तापर्यंत मैत्रीण.कॉम वर 997 मैत्रिणींची अकाउंट्स मंजूर झाली आहेत. अकाउंट अ‍ॅप्रुव्ह न होण्याचे कारण फोनवर किंवा इमेलवर संपर्क न होणे हे असते. कृपया रजिस्ट्रेशन करताना अचूक फोन नंबर/ इमेल आयडी देणे.

सदस्य आगमन

Hindi/Marathi
इंग्लीश

Use Ctrl+\ to toggle

मैत्रीण.कॉम अ‍ॅडमिन व इतर टीम मेंबर्स

अ‍ॅडमिन टीम :

बस्के/admin
मृदुला

Contact admin team : adminATmaitrin.com

मैत्रीण टीम :

बस्के/admin
मृदुला
तेजु
भावना
धारा
लोला
मॅगी
प्रफे

मैत्रीण टीम

Contact Maitrin Team : maitrinteamATmaitrin.com