अनुभवसमृद्ध बनवणारा प्रवास – बाली

प्रवास आपल्याला अनुभवसमृद्ध बनवतो. वेगवेगळे प्रदेश, तेथील संस्कृती, चालीरीती, किंवा भेटलेली माणसे खूप काही शिकवून जातात. सगळ्याच गोष्टी कोणी सांगून शिकायच्या नसतात, काही गोष्टी या निरीक्षणातून शिकायच्या असतात. जर तुमची निरीक्षण क्षमता चांगली असेल ना; तर एक साधा प्रवाससुद्धा बरंच काही शिकवून जातो. दोन वर्षापूर्वीचा बालीचा प्रवास माझ्यासाठी खूप काही शिकवणारा ठरला. बाली हे इंडोनेशिया द्वीपसमूहातील एक बेट आहे. या बेटाची राजधानी आहे देन्पासार. दुबई वरून प्रथम सिंगापूरला आणि तिथून बालीला गेलो.
बालीच्या विमानतळावर उतरल्यावरच तेथील वातावरणातील वेगळेपण आम्हाला जाणवले. दुबईच्या रोजच्या धावपळीत येणारा ताण तिथल्या वातावरणात नव्हता. भारतीय नागरिकांना तिथे विमानतळावरच व्हिसा (visa on arrival) मिळतो. व्हिसा घेवून आम्ही विमानतळाच्या बाहेर आलो तर आम्हाला घ्यायला येणारा हॉटेलचा ड्रायव्हर आमची वाट बघत होता. आम्ही राहणार ते शहर ‘उबुद’ विमानतळापासून एक तासाच्या अंतरावर आहे.
उबुद हे पारंपारिक नृत्य, संस्कृती, डोंगर उतारावरील भात शेती यांचे शहर आहे. उबुदची अजून एक ओळख म्हणजे पारंपारिक वनौषधी तिथे पिकवल्या जातात आणि वापरल्यासुद्धा जातात. तुम्ही जर एलिझाबेथ गिल्बर्ट चे ‘इट, प्रे, लव्ह (eat, pray, love) हे पुस्तक वाचले असेल तर तुम्हाला लगेच संदर्भ लागेल उबुदचा. त्या पुस्तकामुळेच मला उबुदला भेट द्यायची होती. आमच्या हॉटेलच्या आजूबाजूला खूप सारी भात शेती होती. वातावरण एकदम शांत आणि प्रसन्न होते.
उबुदमध्ये हिंदू संस्कृती बघायला मिळते. तिथे ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांना मानले जाते. खूप सुंदर प्राचीन देवळे आहेत. त्यांच्या भिंतींवर सुंदर कोरीव काम केलेलं आहे. तेथील लोक रामायण वाचतात आणि राम-सीतेची पूजा करतात. त्यांचे पारंपारिक नृत्य ‘केकाक’ हे रामायणावर आधारित आहे. त्या नृत्याची संकल्पना, हनुमान रामाला रावणावर विजय मिळवायला मदत करतो अशी आहे.
हिंदु संस्कृती असल्याने आपल्या आणि त्यांच्या रीतीरीवाजांमध्ये थोडेफार साम्य आहे. तिथे फिरताना एक गोष्ट लक्षात आली, रोज सकाळी प्रत्येक घराबाहेर रांगोळी काढून केळीच्या पानावर नैवेद्य ठेवून फुले वाहिली जातात आणि उदबत्ती लावली जाते. म्हणून कुतूहलाने तेथील लोकांना विचारले तर आम्हाला असे कळले कि तो नैवेद्य आपले पूर्वज आणि गायीला ठेवला जातो. पुन्हा दुपारच्या जेवणाचा नैवेद्य ठेवला जातो. रस्त्यावरून चालताना लोक तो नैवेद्य ओलांडत नाहीत. रोज ते सर्व निर्माल्या गोळा करून शेतात खत बनवले जाते. त्यामुळे कुठेही घरासमोर कचरा, घाण नाही. एकदम स्वच्छ. आपल्याकडे आपणपण गोग्रास बाजूला काढतो. सणासुदीला नैवेद्य दाखवतो. फक्त स्वरूप थोडे वेगळे आहे.
ते लोक सर्व गोष्टीत देव बघतात. एखादे मोठे झाड असेल तर त्याला देवस्वरूप मानून तोडत नाहीत तर उलट त्याचे संरक्षण करतात. रस्त्यात एखाद्या मूर्तीला किंवा झाडाला एक काळे पांढरे चौकोन असलेला कपडा गुंडाळलेला दिसेल. त्या कापडाला ‘सापुत पोलेंग’ म्हणतात. जिथे जिथे हा कपडा दिसतो त्या झाडावर आपले पूर्वज राहतात असा एक समज आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळीस गाड्यांचे प्रखर दिवे कमी केले जातात. लोक त्या झाडाला किंवा मूर्तीला नमस्कार करतात. निसर्गामध्ये देव बघणारी माणसं आहेत. जर झाड तोडायचेच झाले तर त्याची पूजा करून, नैवेद्य दाखवून, माफी मागून मगच तोडतात. आपल्याकडे पण रस्त्याच्याकडेला शेंदूर लावलेला दगड असतो किंवा छोटी देवळी असते. त्याला नमस्कार करून, हॉर्न वाजवून आपण पुढे जातो. तसंच मला आठवते, माझे आईबाबा आम्हाला लहान असताना सांगायचे, झाड तोडण्यापुर्वी त्याला नमस्कार करावा, माफी मागावी आणि मगच तोडावे.
तेथील लोक नमस्कार करताना आपल्याप्रमाणेच दोन्ही हात जोडतात आणि ‘ओम स्वस्तिस्तु’ असे म्हणतात. ज्याचा अर्थ ‘देवाची कृपा तुमच्यावर असु दे’ असा आहे. निघताना ते पुन्हा हात जोडून ‘ओम शांती शांती ओम ‘ असे म्हणतात. तिथे सर्व लोक ओळख असो किंवा नसो तुम्हाला असाच नमस्कार करतील.
एक खूप मोठा फरक आहे त्यांच्या आणि आपल्यामध्ये. एक दोन उदाहरणे देते म्हणजे तुम्हाला आपोआपच कळेल मला काय म्हणायचे आहे. आम्ही एकदा उबुदवरून दुसरीकडे जात असताना रस्त्यात गर्दी होती. साधारण एक तासभर वाहतूक खोळंबली होती. पण कुणीही उगाचच हॉर्न वाजवत नव्हते कि रस्ता मिळेल तिथून गाडी दामटत नव्हते. आम्हाला खूप आश्चर्य वाटले म्हणून आमच्या ड्रायव्हरला विचारले तर तो म्हणाला, “ अहो, हॉर्न वाजवून काय फायदा? इथे कोणी राहायला आले नाही रस्त्यात. पुढचा रस्ता मोकळा झाला कि आपोआप लोक जातील पुढे.” किती हा समंजसपणा! आम्ही इथे सिग्नलला उभे राहिलो तरी हॉर्न वाजवतो. चुकीच्या बाजूने आम्ही जातो आणि बरोबर बाजूने येणार्‍यालाच दम भरतो “दिसत नाही का गाडी येतेय”.
अजून एक उदाहरण देते – आमचा ड्रायव्हर हॉटेलमधून गाडी बाहेर काढत असतानाच शेजारच्या गल्लीतून एक गाडी थोड्या वेगाने आली. आमच्या ड्रायव्हरने लगेच ब्रेक लावाला. आम्हाला वाटले आता बाचाबाची होणार. पण झाले उलटेच; आमचा ड्रायव्हर गाडीतून उतरला तर नाहीच उलट त्या दुसर्‍या गाडीच्या ड्रायव्हरला हसून हात दाखवला. आम्ही विचारले कि तुम्ही त्या माणसाला काहीच का बोलला नाहीत? तर जे उत्तर आमच्या ड्रायव्हरने दिले ते म्हणजे आमच्या डोळ्यात अंजन घातल्यासारखे होते. तो म्हणाला, “ त्याने मुद्द्दामहुन असे केले नसेल. त्याची काही अडचण असेल. जावू दे. भांडून वेळ कशाला वाया घालवू? “
मग तर आमचे कुतुहूल आम्हाला शांत बसू देईना, आम्ही परत विचारले तुम्ही रस्त्यात भांडत नाही का? अजून एक चपराक.. तो म्हणाला, “ आम्ही हिंदू आहोत, आमचा धर्म सांगतो सगळे माझे बांधव आहेत. मग जर आपण आपल्या घरी भावाशी भांडत नाही तर रस्त्यात का भांडायचे? “
या दोन तीन गोष्टींवरून आमच्या लक्षात आले कि येथील लोकांना सामाजिक भान आहे, जबाबदारीची जाणीव आहे. प्रत्येक जण आपल्यामुळे दुसर्‍याला त्रास होवू नये याची काळजी घेतो. ज्या दिवशी आपली कर्तव्य न चुकता प्रत्येक जण पार पाडेल त्या दिवशी हक्कासाठी भांडायची वेळ कमी येईल.
लेखाचा उद्देश एकच आहे– जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे... बाकी आपण इतरांकडून काय शिकायचे ते आपण ठरवायचे.
ओम शांती शांती ओम!

विशेष सूचना : सदर लेख काही वृत्तपत्रात / मासिकात प्रसिद्ध झाला आहे.

प्रचिती तलाठी-गांधी
prachititalathi@gmail.com

/* */ //