एवढ्यात वाचलेलं पुस्तक- ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम

हाय मुलींनो.. मी आता एवढ्यातच एक पुस्तक वाचून पूर्ण केलं. कविता महाजनांचं ‘ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम’. याआधी त्यांची दोन पुस्तकं वाचली होती, ब्र आणि भिन्न. कविताच्या पुस्तकांतून दरवेळी काही तरी वेगळं मिळतं म्हणून मी आवर्जून पुस्तकं खरेदी करते.

हे जे पुस्तक आहे, अफाट आहे. पुस्तकाची सुरुवात होते ती पद्मजाच्या आत्मसंवादाने. पद्मजा हि या पुस्तकाची नायिका. ती एक अभिनेत्री आहे, चरित्र अभिनेत्री म्हणतात ती, म्हणजे नायिकेच्या भूमिका तिने फारशा केल्या नाहीत. मराठी, हिंदी चित्रपट आणि मराठी नाटकांमधून तिने चरित्र भूमिका केल्यायत. अतिशय सुंदर, सोज्वळ चेहऱ्याची आणि हिरव्या डोळ्यांची पद्मजा.. अधिकाधिक भूमिका या सोज्वळ, सहनशील आईच्या, म्हणजे गाजर का हलवा आणि मैने नौ महिने तुम्हे अपनी कोख मे पाला, अपना दुध पिलाया टाईपच्या. एका टप्प्यावर तिलाहि खूप कंटाळा आला या भूमिकांचा आणि सतत सोज्वळ बनून राहण्याचा पण इलाज नाही. नवीन काही लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून आहे ते चालवायचं. मग पद्मजा ठरवते कि आत्मचरित्र न लिहिता ते नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवायचं. ती आपलं आयुष्य त्या नाटक-आत्मचरित्रातून लोकांसमोर ठेवते. लहानपणापासून केलेले संघर्ष, फसवून पळून गेलेले वडील, हतबल झालेली आणि परिस्थितीमुळे हीचा दुस्वास करणारी आई, हिचे प्रियकर, नवरे, काही प्रियकारांचा मृत्यू, नंतर एकटीने रहायचा निर्णय, स्पर्म बँकेतून स्पर्म घेऊन जन्माला घातलेली फक्त ‘तिची’ अशी मुलगी आणि खूप खूप काही... सगळे प्रसंग वाचताना वाटतं कधी हि पद्मजा म्हणजे निरुपा रॉय असेल का? कधी एकदम वाटतं नाही, अरुणा इराणी असावी.. मग वाटतं बहुदा रीमा असावी.. पद्मजाच्या प्रवासात आलेल्या पुष्कळशा अभिनेत्री, दिग्दर्शकांची नावं खरी खरी वापरलीयेत, अर्थात ते खरे ‘हे’ असं म्हणणं कितपत योग्य ठरेल माहित नाही उदा. थेट उल्लेख येतात विजयाबाई, भक्ती, मुक्ता, रीमा, वंदना, प्रशांत यांचे आणि अप्रत्यक्षरित्या सलमान, ऐश्वर्या वगैरे हि डोकावून जातात. पण प्रत्येक पात्र म्हणजे खात्रीशीर हि किंवा हा असं म्हणता येत नाही. या वेळेपर्यंत पद्मजा जवळजवळ साठीला आली असावी असं वाटतं.
मग तिने बोललेलं कमी आणि तिच्याबद्दल बोललेलं जास्त येतं पुस्तकात. म्हणजे तिची मुलगी अनाहिता आणि डॉ. गायत्री पद्माजाबद्दल बोलतायत, प्रसारमाध्यम बोलतायत, असं. कारण या वेळेपर्यंत पद्माजाला अल्ज़ाइमर झालाय आणि ती कुणालाहि ओळखू शकत नाहीये.

आणि ......

आता जरा थांबा.. इथे काहीसा सस्पेन्स उघड होणार आहे waiting आधी पुस्तक वाचायचं असेल तर वाचून घ्या

मग येतो खरा धक्का.. वाचकांसाठी.. वाचता वाचता एकदम कळतं की ज्या पद्माजाने हे सगळं लिहिलंय असं आपण म्हणतोय, ती अभिनेत्री तर होती पण अगदी अल्पावधीसाठी. पंचविशी-तिशीच्या आसपास तिच्यात स्किझोफ्रेनियाची लक्षणं दिसायला लागलीत. त्या भरातच तिने आपल्या आईला ठार केलं. तिला कायम आपलं मूल हवं होतं पण ते झालं नसावं. ज्या सगळ्या फिल्मी दुनियेबद्दल तिने लिहिलंय ती आभासी आहे, तिने स्वतःसाठी तयार केलीये. आणि खतरनाक धक्का- ती ज्या पहिल्या प्रियकराच्या मृत्यूबद्दल आधी बोललेली आहे, तो कधी तिचा प्रियकर नव्हताच. तो आहे तिचा आताचा डॉक्टर.

अतिशय बोल्ड आणि स्वतंत्र विचारांची नायिका, जी कधी कधी गोंधळते देखील पण तरी सगळी उत्तरं अगदी स्पष्ट शोधू शकते हि कविताची खासियत वाटते मला. वाचताना कौतुकच वाटतं कि कसं काय हे इतकं चपखलपणे मांडता येतं या बाईला! या पुस्तकात इतक्या सुरेखपणे धागे गुंफले आहे कविताने की पुढे पुढे सरकत जाताना मी अगदी हरवून गेले. आणि शेवटी जे धक्के शेवटी मला बसले, त्यातून बाहेर यायला मला दोन दिवस नक्की लागले. मला माझंच जग आभासी वाटायला लागलं. surprise

एका अर्थी मी सस्पेन्स उघड करून टाकला पण त्याशिवाय पुस्तकाबद्दल लिहिताच आलं नसतं. जमलं तर नक्की वाचा. ज्यांनी वाचलं असेल त्या सांगू शकतील की वाचून काय वाटलं.

/* */ //