बहरला मनी पारिजात

पावसाचं आणि आपल्या केशरी देठाच्या नाजूक पांढऱ्या शुभ्र फुलांचं सारं वैभव धरणीमातेला अर्पण करणाऱ्या पारिजातकाचं माझ्या मनात अगदी घट्ट नातं आहे . काळ्या भोर डांबरी रस्त्यावर पावसाची फुलं उमलू लागली की पारिजातकाच्या सगळ्या आठवणी माझ्या मनात दाटी करतात ... न चुकता .. दरवर्षी .

पारिजातकाची अगदी पहिली आठवण खुप लहानपणीची आहे . वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे आम्ही खूप घरं बदलली . त्या पैकी एका घराच्या अंगणातच खूप मोठं परिजातकाचं झाडं होतं . श्रावण महिन्यात ते बहरलं आणि रोज अंगणात फुलांचा सडा पडू लागला . आमची आजी देवभोळी होती . तिने प्राजक्ताचा लक्ष शंकाराला वहाण्याचा संकल्प केला . पहाटेच्या वेळी फुले वेचणे, त्यांचे दहा दहाचे वाटे करून ती मोजणे, वहीत त्याची नोंद ठेवणे ही सगळी कामं आम्हा मुलांकडे . उजाडतानाच ती आणि तिच्या बरोबर आम्ही ही देवळात जात असु. शंकराच्या काळ्या भोर पिंडीवर ती केशरी पांढरी नाजूक फुले फार शोभून दिसत असतं. एवढा बहरलेला प्राजक्त दारात आणि फुल वेचणारी उत्साही सेना घरात... तिचा संकल्प बघता बघता पुरा झाला . आमची आजी म्हणजे खरी गोष्टीवेल्हाळ . पुराणातल्या गोष्टींचा तिच्याकडे स्टॉक ही भरपूर होता . तिनेच आम्हाला हे फुल कसं स्वर्गात होत, श्रीकृष्णाने ते कसं पृथ्वीवर आणलं आणि ती फुले का पडती शेजारीची गोष्ट.. असं सगळं रंगवून रंगवून सांगितल्याचं आज ही आठवतंय .

पाच पाकळ्यांच केशरी देठाचं हे नाजूक फुलं लहानपणी आवडत होतं कारण ते स्वर्गातून आलं होतं म्हणून . तसंच ‘टप टप पडती अंगावरती प्रजकाची फुले’ ही कविता ही त्यातल्या गेयते मुळे म्हणायला आवडायची . पण जस जशी मोठी होत गेले, मराठी साहित्य वाचू लागले तस तशी हे फूल साहित्यिकांच आणि प्रेमीजनांच ही आवडतं आहे हे समजू लागलं आणि मग ते आणखीनच आवडायला लागलं. जसं .. रमाबाईंच्या हातातली न कोमेजलेली प्राजक्ताची फुलं बघून ‘स्वामी’ मधलं माधवरावांनी त्यांचं केलेलं कौतुक किंवा ‘आहे मनोहर तरी ‘ मध्ये सुनीता बाईंवर पु. ल. नी झाड हलवून केलेला प्राजक्ताचा वर्षाव.. … हे आजही तेवढाच आनंद देतात . ‘उभा तुझ्या अंगणी स्वरांचा अजूनही पारिजात आहे’ ही गझल मात्र हुरहूर लावल्या शिवाय रहात नाही .

दिवस पळत होते . माझं लग्न झालं आणि मी मुंबईला आले. ते ही गिरगावात . तिथे कुठली झाडं आणि कुठली फुलं ? सगळा मोलाचाच मामला . प्राजक्ताची फुलं खूप नाजूक असतात म्हणून फुलवाल्यांकडे ती मिळणार नाहीत त्यामुळे हा श्रावण आपल्याला प्राजक्ता शिवायच काढायचा आहे अशी मी माझ्या मनाची समजूत घातली . मात्र माझ्या मंगळागौरीच्या दिवशी यजमानानी सकाळीच बनाम हॉल लेन मधल्या वसईवाल्यांकडून माझ्यासाठी प्राजक्ताची फुलं विकत आणली . मी अगदी हरखून गेले . त्यावेळी काय वाटलं हे सांगणं शब्दातीत आहे . ती फुलं ओंजळीत घेऊन मी खोलवर श्वास घेत तो वास मनात साठवून घेतला . नजरेतूनच त्यांना थँक यू म्हणाले . त्यात प्रेम, आपुलकी, माया, विश्वास सगळंच होतं . ह्या नाजूक फुलांमुळे लग्नानंतरच्या नव्या दिवसातलं आमचं नवं नातं मात्र चांगलंच दृढ झालं . माझी मंगळागौर त्या फुलांनी सजली आणि माझं मन भरून आलं.

मी कोकणात आमच्या घरी पहिल्यांदा गेले ती पावसाळ्यात आणि ते ही दिवेलागणीच्या वेळी . मी खळ्यात पाऊल टाकलं आणि पारिजातकाच्या सुगंधाने माझं स्वागत केलं . त्या नवख्या वातावरणात नि अनोळखी माणसात मला माझा जिवा भावाचा सखा मिळाल्या सारखं वाटलं आणि मी निश्चिन्त झाले . थोड्या वेळाने पुतण्याने ‘काकू, ही घे तुला’ असं म्हणून जेव्हा फुलं माझ्या हातात दिली तेव्हा तर परकेपणा नाहीसाच झाला. आमच्या पूर्वजांनी दूर दृष्टीने हे झाड पुढच्या खळ्यातच लावले आहे . त्यामुळे पाव्हण्याचे आपोआपच सुगंधी स्वागत होऊन पाव्हणा खुश होतो . रात्रीच्या वेळी तर ओटीवर ही पारिजातकाचा सुवास भरून राहतो.

पुढे ही आयुष्यात वेळोवेळी प्राजक्त भेटतच राहिला . वाघा बॉर्डर बघायला गेले होते . दोन्ही बाजूने असलेले लष्करी गणवेशातले जवान , त्यांचे टॉक टॉक वाजणारे बूट, त्यांचं चाललेलं संचलन, त्यांचे कडक सॅल्युट, जोरदार आवाजातल्या घोषणा, आणि एकंदरच सगळा कोरडा लष्करी कारभार ... मन अगदी उदास होऊन गेलं होतं . तशातच अचानक एका फुललेल्या प्राजक्ताने माझं लक्ष वेधून घेतलं आणि ती फुलं पाहून उदासी कुठच्या कुठे पळाली . तीच गोष्ट जालियनवाला बाग इथली . जिथे इंग्रजांनी बेछूट पणे गोळीबार करत शेकडो निरपरराध भारतीयांची हत्या करून अमानुषतेचा एक नवा इतिहास रचला तिथला हा प्राजक्त शांतीचा संदेश तर देत नसेल ? ह्या दोन्ही ठिकाणी ज्याने प्राजक्त लावला त्याच्या रसिकपणाला मी मनोमन दाद दिली . असो. प्राजक्ताची कलमी झाडं मी पहिल्यांदा बघितली शेगावच्या आनंद विहार मध्ये. मावळतीच्या प्रकाशात असंख्य कळ्या अंगा खांद्यावर मिरवणारी ती छोटी छोटी झाडं फार सुंदर दिसत होती.

आम्ही सध्या राहतोय त्या सोसायटीत नवीन झाडं लावायचं ठरलं. मी साहजिकच प्राजक्त सुचवलं आणि खरोखरच आमच्याच दारात प्राजक्ताच रोप लावलं गेलं . झाड दिसामासानी वाढू लागलं . रोज त्याला कौतुकाने न्याहाळणे हा माझा छंदच झाला . थोड्याच दिवसात झाड तरारल. . साधारण दीड वर्षातच त्याला पहिली फुलं आली. मला कोण कौतुक त्याच ! संध्याकाळी घरी येताना चार अर्धोन्मीलित कळ्या घेऊन येणं आणि त्या देवाला वहाणे हा नित्य नेमच झाला . परंतु थोड्याच दिवसात झाड मोठं झाल्याने त्याच्या कळ्यांपर्यंत हात पोचेनासा झाला . पण त्यामुळे एक फायदा झालाय . गॅलरीतून आता झाड अधिक चांगल्या तऱ्हेने बघता येत . ग्रीष्मात झडमडलेलं झाड वसंताची चाहूल लागली की हिरवगार होतं आणि वर्षा ऋतूत फुलांनी बहरतं . सकाळी खाली फुलांचा इतका सडा पडतो की चालणं ही मुश्किल होऊन जातं . दररोज सकाळचा पहिला चहा मी प्राजक्ता बरोबर जिवा भावाच्या गोष्टी करतच घेते . ते चार क्षण फक्त आमच्या दोघांचेच ! सुट्टीच्या दिवशी सकाळी फुलं वेचून आणते आणि मग त्यांचे हार करताना परत एकदा बालपणात फिरून येते . जेव्हा माझ्या मुलीची मंगळागौर ही याच्याच फुलांनी नी पत्रीने सजली तेव्हा अगदी सार्थक झाल्या सारख वाटलं.

प्राजक्त आमच्या दारात उभा आहे पण एक हुरहूर मनात कायम होती . त्याच्या झाडावरच्या फुलांचा मनाजोगता फोटो मला काढता येत नव्हता . रात्री फोटो नीट यायचा नाही आणि सकाळी फुलं सगळी गळून जात झाडावरून . पण लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाने ती माझी इच्छा पूर्ण केली . आम्ही लेण्याद्री चढायला सुरुवात केली अगदी भल्या पहाटे . जेमतेम दिसायला लागलं होतं . थोड्या पायऱ्या चढले आणि अचानक समोर प्राजक्त उभा ! तो ही फुलांचं वैभव आपल्या अंगावर मिरवत ! कलम असल्यामुळे झाड ही जास्त उंच नव्हतं . नीट निरखता येत होतं . पहाटेच्या प्रकाशात आकाशातल्या चांदण्याचं जणू झाडावर अवतरल्याचा भास होत होता . मोकळ्या वातावरणात तो नेहमीचाच प्राजक्त किती वेगळा भासत होता . मी त्याचे फोटो काढले . अगदी झाडावरच्या फुलांचे .. खूप हरखून गेले होते अचानक अशी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली म्हणून . खाली पडलेली थोडी फुलं मी वेचून घेतली आणि त्याच आनंदात लेण्याद्री कधी चढले ते कळलं पण नाही . हातातली फुल गजाननाच्या चरणी अर्पण केली. मनोभावे नमस्कार केला ... माझ्या पूजेची सांगता झाली .

तर अशा माझ्या आठवणी .. दरवर्षी पावसाच्या आगमना बरोबर ही आठवणींची कुपि उघडली जाते आणि मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते ...

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle