'प्रेम'

'प्रेम' नक्की काय असतं, ही नक्की कसली भावना असते, किंवा जाणीव असते, या सगळ्याचे विचार मध्ये एक पुस्तक वाचायला मिळालं, त्यावरून परत चालू झाले. त्यात असं काहीसं लिहिलेलं, 'प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीचे त्याचा स्वभाव, व्यक्तिमत्व, त्याचे गुण-दोष या साऱ्याचे आपल्या त्या वेळच्या मनातील भावानुसार केलेले सकारात्मक मूल्यमापन... मग ते प्रसंगानुरूप कमी जास्तही होते. जसे आनंद, दुःख या भावना असतात तशीच प्रेम ही भावना... जी इतर भावनांसारखीच उत्पत्ती, विकास, ऱ्हास या अवस्थांमधून जाते.' ही प्रेमाबद्दलची मांडलेली थोडी कोरडी वाटणारी व्याख्या आजवर पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंगानुसार पडताळून बघणं ओघानंच होत गेलं.

'आवडणे', 'आकर्षण वाटणे' आणि 'प्रेम वाटणे' या तिन्हीच्या सीमा इतक्या जवळ जवळ आहेत कि त्यात आपली भावना नक्की कोणती आहे हे ओळखता येणं कधी कधी अवघड होऊन बसतं. एखादं पुस्तक आवडणं, एखादा ड्रेस आवडणं, एखादं ठिकाण आवडणं, पदार्थ आवडणं, एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडणं, बोलण्याची ढब आवडणं... आवड, ही एक बाब...या बाबतीतली आवड ही जाणीव एका वेगळ्या पातळीवरची असू शकेल, म्हणजे थोडी वरवरची, उथळ नाही पण तितकीशी खोलही नाही. अर्थात एखाद्या गोष्टीबद्दलची आवड, म्हणजे, त्या गोष्टीपासून आनंद मिळाला पण म्हणून ती गोष्ट मिळालीच पाहिजे असं नाही. अट्टाहास नाही.

आता एखादी कलाकृती पाहताक्षणी डोळ्यांत भरणं, मग ते एखादं चित्र असो, नृत्य असो, संगीत असो, कलेचा कोणताही अविष्कार असो, जे परत परत टिपावं असं वाटत राहतं, मग ते एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य, तिचं दिसणं टिपताना पापणी लवू नये असं वाटणं, तिला न्याहाळत नेत्रसुख मनापासून उपभोगावं वाटणं... हे कदाचित 'आकर्षण' या सीमेपर्यंत पोचत असावं का. जिथे इंद्रियांच्या संवेदनक्षमतेनुसार आकर्षणाची तीव्रता कमीजास्त असू शकते. यात भावनिक ओढ, गुंता ही पानं कोरी राहात असावीत. पण ते मिळण्याची जबरदस्त ओढ मात्र नक्की असते, ते परत परत मिळावंच वाटणं या जाणीवेचा पाया आकर्षणाच्या संकल्पनेभोवती फिरत असावा का?

आणि आता जिथे मनाच्या संवेदनशीलतेचा संबंध येतो ती प्रेम ही भावना असावी. अगदी सहज, कुठलाही कृत्रिमपणा न जाणवता, एखाद्या व्यक्तीच्या जवळ असण्यानं आतून बहरून गेल्याचं फीलिंग येणं, शांत, हलकं वाटणं, त्याला समजून घेता येणं सहज घडणं, व्यवहारापलीकडची त्याची निरपेक्ष आस लागणं, स्वतःची माणूस म्हणून स्वतःला असलेली ओळख न सांगता त्याला जाणवणं, वासनेच्या पलीकडचा स्पर्शानुभव आत खोलवर पोचणं, त्यात अगदी समरसून, जीव ओतून ती हळुवार जाणीव अनुभवणं. या धाग्याभोवती प्रेम ही संकल्पना बांधली गेली असावी का? ज्यात हळवेपणा असेल, सुख, आनंद आणि समाधानही असेल पण ते मिळालंच पाहिजे हा अट्टाहास मात्र नसेल. या जाणिवेत कधी कधी आड येणारी, शिक्षण, हुद्दा, पैसा, ज्ञान याची स्वतःच्या व्यक्तिमत्वाभोवती असलेली वलयं किंवा याच सगळ्यांच्या केंद्राभोवती फिरत असलेली अभिमान, गर्व, आत्मसन्मान ही अजून आतली वलयं, या साऱ्याचे परीघ त्या ज्या एका आंतरिक भावनेमुळे, रुंदावतात, शिथिल होतात, ही जाणीव म्हणजे प्रेम असावं का?

मग ते आईचं/ वडिलांचं त्यांच्या मुलांवरचं प्रेम असेल, बहीण-भावांमधलं प्रेम असेल, किंवा दोन मित्रांमधलं असेल किंवा पती पत्नीमधलं असेल. खरंतर नात्यांची ही अशी नावं ही समाजाभिमुख आहेत. पण त्या नात्यानुसार प्रेम भावनेचे स्वरूप वेगवेगळं कसं असू शकेल. म्हणजे, त्या नाट्यानुसार त्यांच्यातील प्रेम किती दृढ आहे याचे निकष लावणे मला आधारहीन वाटते. थोडक्यात आईचं तिच्या मुलांवरचं प्रेम हे सर्वश्रेष्ठ आणि प्रियकर- प्रेयसी मधलं त्यामानानं कमी दर्जाचं याला काहीच आधार मला सध्या तरी मिळत नाहीये. प्रेम व्यक्त करण्याचे, ते दाखवण्याचे मार्ग वेगवेगळे असू शकतील, म्हणजे आई तिच्या मुलावरचं प्रेम, वेगळ्या प्रकारे दर्शवील आणि मित्र वेगळ्या तर्हेने. पण ते आहे हे अनुभवता येण्याची जाणीव मात्र खऱ्या प्रेमावर आधारित प्रत्येक नात्यात एकसारखीच असावी. मनाच्या संवेदनशीलतेवर त्याची तीव्रता अवलंबून असेल कदाचित, पण ज्या जाणिवेनं, समाधानाची ती एक तृप्त पातळी स्वतःला अनुभवता येणं ही त्या प्रेमाची स्वतःलाच जाणीव करून देण्यासारखं आहे. मग ते नातं रक्ताचं आई-मुलाचं, बहीण-भावाचं असो, किंवा वाटेवर अगदी सहज भेटलेल्या दोन व्यक्तीमधलं असो.

अर्थात हे माझे विचार आहेत....कदाचित चुकीचे, न पटणारे असतील. म्हणूनच त्यावर लिहावे वाटले, जेणेकरून त्या बाबतीतल्या माझ्या कल्पना मलाच नीट स्पष्ट होतील. यावर तुमचं मत जाणून घ्यायची खूप इच्छा आहे.

--- अश्विनी वैद्य

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle