हार

"अगं चल ठेवते मी फोन...बोलू परत " असं म्हणून मेघानं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणीचा फोन ठेवला. "अगं आई, त्यांनी टॉस जिंकलाय, अँड decided to बॅट, ये लवकर, सुरु झाली मॅच "
"अरे देवा, हो का... त्यांनी जिंकला टॉस, पण ठीक आहे, खेळतील आपल्या पोरी चांगल्या... आलेच मी, स्वयंपाक उरकलाय लवकरच, राहिलेली आवराआवर करते आणि आलेच ५ मिनिटात. "

" झाली का गं मॅच सुरु, मी पण अगदी प्रत्येक बॉल बघणार आहे बाई..." मेघाची आजी आतल्या खोलीतून बाहेर येत म्हणाली. तिला असं लगबगीनं बाहेर येताना पाहून स्वतः सोफ्यावर निवांतपणे टेकत बंडोपंत बोललेच, "आजी तुला काय कळतं गं क्रिकेट मधलं..."
"असू दे रे, पोरी खेळताहेत ना आपल्या... ते बघायचंय मला पण, आणि नाही कळलं तरी तू आहेस कि सांगायला, पोरांचा वर्ल्ड कप बघायला बसलेलात ना घरी दहा जण गोळा करून गोंधळ घालत आणि आपण वाईट्ट हरल्यावर असे लांबट चेहरे करून त्याच खेळाडूंना शिव्या दिल्यात, ज्यांना डोक्यावर घेऊन नाचलात. आज आपल्या पोरी हारो नाहीतर जिंको, इथवर आल्यात ना... म्हणून त्यांचा खेळ बघणार आहे मी आज. "
"गप रे बंड्या, तुला काय त्रास आहे, आजी तू मॅच बघ गं निवांत, मी सांगते तुला आऊट झालं की, फोर-सिक्स मारला की... फुल्ल धम्माल करू आपण लेडीज स्पेशल "
यावर कुत्सितपणे हसत दोन ओव्हरमधल्या ब्रेक मध्ये लागणाऱ्या ऍड बघत बंडोपंत उदगारले "अगदी परवा पर्यंत इंडिया टीमची कॅप्टन कोण हे पण माहीत नव्हतं कि गं तुला मेघा आणि आता फायनलला गेली टीम कि पार लगेच उर अगदी भरून आला तुझा...."
" हो नव्हती माहीत मला कॅप्टन बद्दलची डिटेल इन्फो, पण महिला क्रिकेटचा कॉमन पीपल मधला अवेअरनेस न वाढायची कारणं यावर बरीच वादावादी करून झालीय आपली याआधी, सो तू काही बोलूच नकोस.... परवा घरी आलेल्या तुझ्या मित्राला विचारलं, काय रे वूमेन्स वर्ल्ड कप करतोयस का फॉलो... तर चक्क हसायला लागला जोरजोरात... वर म्हणतोय कसा, काहीही काय, वेडी आहेस का, मी नाही बघत वूमेन्स क्रिकेट, किती स्लो खेळतात त्या. आम्ही इथे ग्राऊंडवर सुद्धा खूपच बरं खेळतो त्यांच्यापेक्षा... आणि यावर अजून गम्मत म्हणजे, त्यानं परवाच्या सेमीफायनल नंतर भारताच्या महिला क्रिकेट संघाचं कौतुक करणारी फेसबुक पोस्ट टाकली. कसले मित्र आहेत रे तुझे.... हाहाहा "
"ए गप गं, बघ मॅच, फिल्डिंग नीट नाहीये आपली. गेला बघ फोर" बंड्या
" किती लहान दिसतीये गं ती चेहऱ्यावरून... कोण आहे ती " इति आजी
"आई, अहो दीप्ती शर्मा आहे ती... एकोणीस वर्षांची फक्त " आई
"अगंबाई हो का... किती लहान पोरी खेळताहेत. अगदी आपल्या सारख्यांच्या घरातून गेल्या असतील या पोरी, नाई.... कधी कुठल्या जाहिरातीत या आधी दिसल्या नाहीत गं, त्या कोहली वैगेरे सारखं"
"तशाही आता मात्र पोचतील या पोरी आपल्या सारख्यांच्या घरा-घरात, ते सचिन, कोहली आपल्याच घरातले लोक असल्यासारखे वाटतात ना सगळ्यांना तसंच." आजी
"येस काढली बघ विकेट त्यांची... धाताड ताताड...टपार टपार... " मेघा
"बसा शांत, अजून वे to गो...!" बंड्या
"अरे वाह, छान... खेळा गं बाई पोरींनो अशाच नीट... अगं ती बघ, अगदी तोंडावर हात ठेवून कशी गोड हसतीये... इंग्लंडच्या पोरी आपल्या पोरींपेक्षा पारच धष्टपुष्ट आहेत बाई, नाई का गं मेघा" आज्जी
"आजी मॅच बघण्यापेक्षा तुझी बडबडच जास्त चालूये... बघूया ना शांतपणे..." बंड्या
" आई, ही बघा... ही आपली कॅप्टन, मिथाली राज, ती पूनम राऊत... हो ती छोटे केस आहेत ना तीच पूनम राऊत, मुंबईची आहे ती" मेघा आणि बंड्याची आई
"खरंच छान वाटतंय गं, यांच्या घरच्यांनी त्यांना क्रिकेट खेळू दिलं नसतं, पोरांचे खेळ कसले खेळता म्हणून हटकलं असतं, पुढं प्रोत्साहन दिलं नसतं, तर कशा आल्या असत्या ना इथवर.... घर, लग्न, संसार, घराला हातभार म्हणून फार तर एखादी नोकरी, आणि मग म्हातारपण, संपलं आयुष्य, सगळ्यांसारखं सरधोपट... हे क्रिकेट खेळणं कुठच्या कुठं उडून गेलं असतं या पोरीचं... म्हणून कौतुक वाटतं गं त्यांचं." आजी
"येय, अजून एक विकेट घेतली आपण आजी...पाहिलंस का तू ? ते बघ रिप्ले मध्ये दिसेल आता. पटापट विकेट घ्यायला हव्या, स्कोरचा डोंगर नको रचू द्यायला... मग आपण जिंकू आरामात... आई मस्त चहा टाक ना सगळ्यांसाठी" मेघा
" आज बंड्या चहा करणार आहे आपल्यासाठी.... मी काही आता इथून लंच ब्रेक शिवाय उठायची नाही. " आई
"फिमेल डॉमिनेटेड घर झालंय आपलं, आज बाबांना पण नेमकं वर्किंग आलंय... ताई, माई आजी टाकतो मी चहा, तुम्ही निवांत मॅच बघा हं... " बंड्या थोडा चिडचिडतच उठला
"दोनशेच्या वर नकोय स्कोर जायला रे, आऊट करा गं पोरींनो पटापट त्या इंग्रज पोरींना, आलं टाक रे चहात" आई
"बंड्या गेलाय तशा पटापट विकेट निघत आहेत ना त्यांच्या, हो ना गं आई. ए बंड्या, तू इकडे येऊच नकोस रे, तिथेच बस, तसही फोन आहे तुझ्याजवळ, व्हाट्सअप वरून अपडेट्स कळतीलच तुला, तू नको येवूस इकडे, तसंही टुकार कमेंट देत बसतो काहीतरी. " मेघा
"हा काय गं वेडेपणा, मिटक्या मारत चहा पिशील की आता, झाला कि आण रे बाळा आणि ये बघायला तू ही" आजी
"अगं आजी, तुला माहितीये का, इंडिया-पाकिस्तान फायनल होती ना ती आठवतीये का, चॅम्पयन्स वर्ल्ड कप पुरुषांचा, त्यासाठी बंड्याचा एक मित्र असतो ना तिकडे इंग्लंडला तो १३०० पौंडचं तिकीट काढून गेला होता ती मॅच बघायला, किती सट्टेबाजी, कितीतरी कोटींची उलाढाल, आणि शेवटी काय तर त्यात नामुष्कीचं हरलो, त्याच दिवशी इंडिया पाकिस्तान वूमेन्स मॅच मात्र आपण जिंकलो होतो पण ते तर कोणाच्या गावी पण नव्हतं...अशी आपली लोकं आहेत बघ. " मेघा
"हं, आठवतंय ना... पण बदलेल आता परिस्थिती, मुलींनी दिलय दाखवून, आम्हाला कमी नका समजू.... आम्ही मुलांपेक्षा कमी नाहीयोत. हे घे रे बंड्या कप, ठेव ओट्यावर, छान झाला होता चहा." आजी
" मुली मुलांपेक्षा कमी कुठल्या, चार पावलं पुढच... २२९ करायचेत ना आपल्याला, आरामात करू ,खेळणार पोरी छान . "

या विश्वासानं आपली इनिंग बघायला साखरेला मुंग्या चिकटव्यात तसे सगळे परत टीव्हीला चिकटले... आई, आजी, मेघा, अगदी ओरडून ओरडून बाऊंड्रीज वैगेरे सेलेब्रेट करत होत्या. पूनमचे ८६ वर आऊट होणे पूनम प्रमाणेच आईलाही लवकर झेपले नाही. त्यानंरच्या प्रत्येक बॉलला धडकी भरत आजीही खुर्चीतून उठत होती. बंड्याला तर अनलकी ठरवून घराबाहेर कधीच काढला होता. कृष्णमूर्तीचा एखादा फोर आजीच्या चष्म्यातून हसरी लकेर सांडत होता. पॉवरप्ले चालू झाला तशा तिघी एकमेकींना सांगत होत्या, आरामात जिंकू आपण, जेवढे बॉल तेवढेच तर रन करायचेत नक्की होतील, फक्त विकेट टिकवल्या म्हणजे झालं. हे तेच तेच परत परत एकमेकींना सांगत बजावत होत्या. आजी तर 'आत्ता माझ्या हातात बॅट असती तर मीच सिक्स मारला असता' या अविर्भात हातवारे करून बोलत होती. पण शेवटी, ज्याची भीती वाटत होती तेच झालं, मनोबळ टिकवायला आपल्या पोरी शेवटच्या घडीला थोड्या कमी पडल्या आणि हातातोंडाशी आलेला वर्ल्डकप हातातून निसटला. मेघा आणि आई एकदम मटकन खुर्चीत बसल्या. आजी अजून तशीच उभी होती. मॅच सुरु झाल्यापासूनचा तिचा आवेश, तिचा उत्साह, हे तिच्या वयाचा तिला विसर पाडत होतं. मुलींना असं इंग्लंडच्या लॉर्डस वर खेळताना बघून झालेला आनंद, अभिमान असं सगळं दाटून आलं होतं. मेघा अगदी कळवळल्या स्वरात म्हणाली, "आजी हरलो गं आपण"

यावर आजी जे बोलली ते ऐकून दारातून येणारे बाबा आणि बंड्या दोघेही तिथेच थांबले, आवक होऊन आजीचं हे वेगळं रूप डोळ्यात साठवत.

"पोरींनो, तुम्ही मानाने हरलात... वर्ल्ड कप मिळाला नाही देशाला...पण ज्या जिद्दीने तुम्ही इंग्लंड सारख्या बलाढ्य देशाला त्यांच्याच देशात ऐतिहासिक वारसा असलेल्या लॉर्डस वर हारवण्याचे स्वप्न आम्हा सर्व भारतीय महिला मुली बायकांना दाखवलत यासाठी तुम्ही आमच्यापुरत्या तर जिंकला आहात. इंग्लंडला तोंड द्यायचं आव्हान तुम्ही कमकुवत रित्या नाही पेललं. ज्या मुलींना इतर देशातल्या त्या त्या खेळात प्रावीण्य असलेल्या मुलींसारखा पाठिंबा घरातूनच मिळणं अवघड असतं अशा पार्श्वभूमी मधून तुम्ही आलेल्या....वर्ल्डकप फायनल पर्यंत पोचलात हेही काही कमी नव्हतं. क्रिकेट हा मुलींनी खेळायचा खेळ असतो याला भारतासारख्या देशात भूतकाळ आणि भविष्य या दोन्हींची शाश्वती नव्हती, त्याला तुम्ही भविष्य दिलंत आणि त्यातून इंग्लंड सारख्या प्रगत देशातल्या टीमला तितक्याच ताकदीनं तोंड दिलत याचं खरंच कौतुक आहे." आजी टीव्हीकडे बघत तिच्याही नकळत हे सगळं बोलून गेली.

--- अश्विनी वैद्य
२४.०७. १७

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle