कर्करोग - २

आज आपण कर्क रोग कसा होतो त्यावर जरा विस्ताराने चर्चा करूया. जसे आपण आधी पहिले, कर्क रोग म्हणजे पेशींची अनिर्बंध वाढ जी आटोक्याबाहेर जाते. त्यातल्या काही पेशी मूळ स्थान सोडून जेव्हा शरीरात इतरत्र पसरतात तेव्हा त्याला मेटॅस्टॅसिस असं म्हणतात. मेटास्टॅटिक पेशी नवीन ठिकाणी परत वाढायला लागतात. वेळेत निदान न झाल्यास व उपचार न केल्यास, कर्क रोग शरीरात अनेक ठिकाणी पसरू शकतो.

असं काय होतं ज्यांनी अचानक सरळमार्गी पेशी अश्या बेताल होतात?
थोडं विषयांतर होतंय पण उत्तरा आधी आपण थोडी पार्श्वभूमी बघूया. आपलं संपूर्ण शरीर हे विविध प्रकारच्या पेशींनी बनलेलं असतं. प्रत्येक प्रकारच्या पेशिनची एक ओळख असते, एक आकार, ठरलेली कार्य / जवाबदाऱ्या असतात. माणसाची सुरुवात एका पेशीपासून होते (शुक्राणू आणि बीजांड एकत्र येऊन बाळाची पहिली पेशी बनते). त्या पेशीचा रिप्लिकेशन होऊन एक समूह तयार होतो. या समूहामध्ये आजून वाढ होऊन, त्यातल्या काही पेशींची एक आयडेंटिटी विकसित व्हायला लागते (त्याला differentiation असं म्हणतात). अश्या differentiated पेशींच प्रयोजन हळू हळू ठरत जातं. म्हणजे त्यापैकी काही त्वचेचा पेशी बनतात तर काही हाडांच्या इ. अश्या differentiated पेशी अतिशय नियंत्रित असतात. जसा बाळ तयार होत, तसं या differentiated पेशींचं प्रमाण वाढत जातं आणि undifferentiated पेशी ज्यांना स्वतःचं व्यक्तिमत्व नसतं, अशा पेशींचं प्रमाण घटत. अजून माहिती साठी हे बघा: https://en.wikipedia.org/wiki/Human_embryogenesis
प्रौढ व्यक्तींमध्ये तुलनेने undifferentiated पेशी थोड्या प्रमाणात असतात ज्यांना स्टेम cells म्हणतात. या अतिशय नियंत्रित असतात आणि त्यांचही कार्य थोड्याफार प्रमाणात ठरलेलं असतं (स्टेम सेल्स हा फारच इंटरेस्टिंग विषय आहे पण परत, व्याप्तीच इतकी मोठी आहे की त्याबद्दल लिहिणं इतक्यात शक्य होणार नाही. कधीतरी नंतर बघते).

हे सगळं रामायण सांगण्याचं कारण असं की, कर्क रोग हि प्रक्रिया पूर्ण उलटी करतो. तंतोतंत नाही पण साधारणतः. म्हणजे, उदाहरणार्थ, आपल्या त्वचेच्या पेशी आयताकृती असतात. कर्क रोगात त्यांच्यावरच नियंत्रण जातं, आकार बिघडतो आणि त्या साधारण गोलाकार किंवा थोड्या वाकड्या तिकड्या दिसायला लागतात. त्यांच स्वत्व हरवून बसतं. त्याला de -differentiation अस म्हणतात. एका रेषेत वाढायच्या ऐवजी एकमेकांवर चढायला लागतात. वेगळे पदार्थ स्रवायला लागतात. संख्या वाढते, पोषण कमी पडायला लागतं आणि अधिक पोषण मिळावं म्हणून पेशी शरीराच्या आतल्या भागात शिरायला लागतात. पोषणासाठी नवीन आणि अनैसर्गिक रक्तवाहिन्यांची वाढ व्हायला लावतात. असे अनेक बदल घडवून आणण्याची क्षमता या पेशींमध्ये असते. आता हे सगळं घडत असताना आपली रोगप्रतिकार शक्ती झोपलेली असते का? तर नाही.. पण फसवली जाते. सोपं उदाहरण देते. आपण तांदूळ निवडताना पटकन काळे (निराळा रंग) खडे ओळखू शकतो. पण जर खडे पांढरे आणि साधारण तांदळासारखे दिसणारे आणि फील असले तर खडे निवडणं अवघड जातं. त्यात अपुऱ्या प्रकाशात हे अजूनच अवघड होऊन बसत. तसंच, या पेशी आपल्याच असतात आणि त्यांनी स्रवलेल्या पदार्थांमुळेही रोगप्रतिकार शक्ती व्यवस्थित काम करू शकत नाही.. त्या पेशींचं उच्चाटन हवं तसं होत नाही.

थोडं आजून खोलात जाऊया. पेशींमध्ये काय बदल होतात? का अनियंत्रित होतात? याचं उत्तर अनेक पदरांच आहे आणि बराच गुंतागुंतीचं. थोडक्यात बघूया. प्रत्येक पेशी मुळात ३-४ प्रकारच्या घटकांनी बनलेली असते - deoxyribonucleic acid (DNA), ribonucleic acid (RNA), sugars, proteins आणि lipids. कर्क रोग हा जनुकीय मनला जातो. म्हणजेच, अनेक कारणांनी आपल्या DNA मध्ये असे बदल घडून येतात की ज्यामुळे कमीत कमी खालील गोष्टी होतात - १. जनुकीय अस्थैर्य २. चुकीची proteins निर्माण होणे ३. जनुकांवरच्या नियंत्रणात बिघाड ४. ह्या सगळ्या चुकांवर लक्ष ठेवणाऱ्या यंत्रणेत बिघाड. पेशी जेव्हा replicate होतात तेव्हा अतिशय कडक QC आणि स्टॉक टेकिंग असते. जर काही कमी असेल, चुकीचा DNA तयार झाला, तर सगळ्या गोष्टी जेथल्या तेथे थांबवल्या जातात. कर्क रोगात हे नियंत्रण हरवून बसल्याने, DNA तल्या चुका वाढतच जातात, पोषण पुरेसं नसलं तरी पेशी वाढतात आणि आजून पोषण मिळावं म्हणून आक्रमक होतात. सर्व संरक्षक पदर भेदत रक्तात प्रवेश करतात आणि नवीन घर थाटतात. बऱ्यापैकी साधर्म्य दिसतंय ना माणसांच्या मानसिकतेबरोबर ? :)

आता हे सगळं खरं असलं तरी आपण काय करू शकतो म्हणजे कर्क रोगाचं लवकर निदान होईल आणि आटोक्यात आणता येईल? पुढच्या भागात आपण यावर चर्चा करूया. अंमळ लांबला आजचा भाग.. वाचल्याबद्दल धन्यवाद.

-

नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle