कर्करोग - ३

कर्क रोग होण्याची कारणं थोडक्यात आपण मागील भागात पहिली. या भागात आपण कर्क रोगाचे लवकर निदान करता येऊ शकतं का नाही त्यावर चर्चा करूया. प्रत्येक रोगाचं कमीत कमी दोन प्रकारच representation असतं - १. Physical २. molecular. पहिलं तसं म्हंटलं तर दुसऱ्यावर अवलंबून असतं. Physical representation म्हणजे काय? दृष्टी, स्पर्श किंवा इतर संवेदनातून ज्याची जाणीव होते, ज्याला आपण बरेचदा रोगाची लक्षणं दिसणे असं म्हणतो. दीर्घकाळ हळू हळू वाढणाऱ्या बाकीच्या रोगांप्रमाणेच जसे की मधुमेह, कर्क रोगाची लक्षणे पटकन लक्षात येणं अवघड असतं. उदाहरणार्थ, पचन संस्थेचा कर्क रोग झाला तर पोट बिघडते किंवा पित्त वाढू शकते आणि असे झाल्यास नेहमी ती कर्क रोगाची लक्षणं असतात असेही नाही. अश्या अस्पष्ट लक्षणांमुळे बरेचदा कर्क रोगाचे निदान खूप उशिरा होते. बहुतेकवेळा अशी लक्षणं नेहमीचे उपचार करूनही बरी होत नाहीत आणि त्याबरोबरच अचानक वजन घटते किंवा बाकीच्या तक्रारी सुरु होतात. अश्यावेळी मग कर्क रोगाच्या चाचण्या केल्या तर तो बराच वाढला असल्याचं दिसून येतं. हे जरी खरं असलं तरी निदान होण्याच्या या विलंबात बऱ्याच प्रमाणात पचन संस्थेचे अवयव आपल्याला दिसत नाहीत किंवा स्पर्श करता येत नाहीत या गोष्टींचा सहभाग आहे. थोडं लक्ष ठेवलं तर स्तनाचा कर्क रोग तसा वेळेत ओळखता येऊ शकतो. हाताच्या तळव्याला स्तनाच्या कर्क रोगाची गाठ जाणवू शकते आणि दुर्लक्ष केले नाही तर बरेचदा औषधे आणि शास्त्रक्रियेवर काम भागते. त्वचेच्या कर्क रोगाचीही तशीच कथा.

दुसरं वर म्हणाले ते molecular representation. म्हणजेच, प्रत्येक प्रकारच्या कर्क रोगाचं गुणवैशिष्ट्य सांगणार DNA, RNA, proteins इ. घटकांचं profile असतं. बरेच संशोधक हेच profile लवकर कसं ओळखता येईल यावर काम करत आहेत जेणेकरून निदान आणि कर्क रोग बरा करण्याची शक्यता वाढते. प्रत्येक स्तरावरच्या चाचण्या आज वापरात आहेत. Protein-based चाचण्या बऱ्याच ठिकाणी वापरात आहेत, जसे की, स्तनाच्या कर्करोगाच्या उपप्रकारांचे निदान करण्यासाठी, protein-based (ER, PR and HER२) चाचण्या जगन्मान्य आहेत. जसे आपण मागच्या लेखात पहिले, कर्क रोग हा जनुकीय मानला जातो. याचाच अर्थ, रोगाचं लवकर निदान करायला जनुकीय चाचण्या केल्या पाहिजेत हे तार्किक उत्तर आहे. तांत्रिक दृष्ट्याही जनुकीय चाचण्या म्हणजेच DNA/chromosome -based tests करणं जास्त सोपं आणि scalable आहे. अर्थातच त्या दिशेने बरंच संशोधन झालाय आणि सध्या त्यातले काही यशस्वी प्रयोग वैद्यकीय चाचण्या म्हणूनही वापरल्या जातात. या चाचण्यांमागच्या तर्काचा विचार करूया.

एखाद्या वेळी तुम्हाला तुमच्या डॉक्टरनेही विचारले असेल की, 'तुमच्या कुटुंबात कोणाला कधी कर्क रोग झाला होता का? कधी, कुठला, आईच्या का बाबांच्या बाजूच्या नातेवाईकांना?' हे प्रश्न जर तुम्हाला विचारले गेले नसतील, तर ते नक्की स्वतःला विचारा. जर एका बाजूच्या एकापेक्षा जास्त नातेवाईकांना कर्क रोग झाला असेल, तर नक्की तुम्हाला स्वतःला किती धोका आहे ह्याची चाचणी करून घेणं उपयुक्त ठरेल. संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की काही प्रकारचे कर्करोग होण्यासाठी काही जनुकांमधील विशिष्ट बदल एकटे सुद्धा पुरेसे आहेत. उदा. BRCA जनुकांमधील काही बदल आणि स्तनाच्या कर्करोग. असे बदल जर शुक्राणु आणि / किंवा बीजांडातून पुढच्या पिढीत गेले तर पुढच्या पिढीलाही धोका असतो. उदाहरणादाखल खालील चित्र पहा :
classic_brca1.jpg
https://www.meb.uni-bonn.de/Cancernet/CDR0000062855.html
यामध्ये गोल म्हणजे स्त्रिया, चौकोन म्हणजे पुरुष, भरलेले गोल / चौकोन म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचे निदान झाले आहे आणि छाट मारलेले म्हणजे मृत.
ह्या कुटुंबामध्ये, BRCA१ नामक जनुकामधला विशिष्ट बदल अनेक पिढ्यांमध्ये दिसतो ज्याने अंडाशय (ovarian) किंवा / आणि स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता फार वाढते. आपल्याला तसेच चित्र या वंशावळीत दिसते.
सोलोमन आणि त्याच्या सहकार्यांनी २०१४ ASCO meeting मध्ये फारच महत्वाचा मुद्दा मांडला ज्यामुळे रोगाचा कौटुंबिक इतिहास फक्त आई-वडील यांच्यापुरता मर्यादित ठेवून चालणार नाही हे पटते (Solomon et al., ASCO meetings, 2014) . त्यांच्या अभ्यासानुसार जर बाकीच्या नातेवाईकांची आरोग्यासंबंधित माहिती घेतली नसती तर अनेक संभवनीय कर्करोगींचें लवकर निदान होणे चुकले असते. हे खालील चित्रावरून स्पष्ट होते:
hboc_missed_patients.jpg
https://new.myriadpro.com

जनुकीय बदल, ज्यामुळे कर्करोग होण्याचा धोका संभवतो, तपासणाऱ्या विविध चाचण्या सध्या उपलब्ध आहेत. सगळ्या प्रकारचे कर्करोग या चाचण्यांमध्ये समाविष्ट होत नसले तरी आपण आपल्या डॉक्टर किंवा/आणि जनुकीय तज्ज्ञ सल्लागारांशी नक्की बोला. आपली जनुकीय रचना आणि बाकीच्या अनेक घटकांचा विचार करून योग्य सल्ला मिळाला तर भविष्य सुकर आणि सुरक्षित होऊ शकतं. योग्य माहिती असणे, जागरूक असणे आणि वेळेत पाऊल उचलणे महत्वाचे आहे. चला, संवादाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करूया.

ह्या संकेतस्थळावरील माहिती जरूर वाचा:
https://www.cancer.net/cancer-types/hereditary-breast-and-ovarian-cancer...

-

नंदिनी सहस्रबुद्धे, Ph.D.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle