नवजागर २०१७ - मारायला दिली नाही माझी लेक तुला!

हा लेख मी यापूर्वी एका मराठी संस्थळावर लिहिला होता. त्यानंतर तो माझ्या ब्लॉगवर आणला. आणि आज इथे मैत्रीणवर प्रसिद्ध करत आहे.

<<<<<<

"आज आपण शिकलेलो आहोत, सुशिक्षित आहोत, आपल्याला कायद्याची जाण आहे. म्हणून कुणी आपला फायद घेऊ शकत नाही. पण माझं हृदय अशा स्त्रियांसाठी तुटतं ज्या अशिक्षित आहेत. त्याना कायदा माहित नाही. नवर्याने, सासूने मारलं की रडायचं इतकंच माहिती आहे. अशा स्त्रियापर्यंत आपल्या संस्थेचं काम पोचलं पाहिजे. त्याना आपली मदत झाली पाहिजे..."

नरिमन पॉइंटच्या फाईव्ह स्टार हॉटेलमधे वाळकेश्वरसारख्या ठिकाणी राहणार्या या श्रीमती समाजसेविका यांचे भाषण. आता मला ते भाषण आठवायचं कारण मात्र वेगळंच होतं.. हॉस्पिटलमधे माझ्या बाजूला बसलेली एक विधवा आई आणि तिच्यासोबत एकोणीस वर्षाची मुलगी.

आई कुणबी मामी नेसतात तशी गुडघ्यापर्यंतची नव्वार नेसलेली. गळ्यात सोन्याची चेन. अख्ख आयुष्य उन्हातान्हातून गेलय याचा पुरावा देणारा तो कोकणी रंग. तंबाखूने लाल झालेले दात. मुलीची गोल पाचवारी साडी. हातभर बांगड्या. गळ्यात छोटंसं मंगळसूत्र. एकंदर परिस्थिती दारिद्र्य रेषेखालचीच.

मुलीचे डोळे रड रडून सुजलेले. आई चिंतेत. तिला राहवत नाही. ती मुलीला पाणी प्यायला देते. मुलीच्या घशातून एक अस्फुट हुंदका येतो न येतो.. पाणी नको म्हणते. आई उठून नर्सकडे जाते. "अजून किती वेळ? पोरीला बसवत नाही". नर्स म्हणते अजून दोन तीन नंबर आहेत.

माझा नंबर त्या मुलीनंतर आहे. त्यामुळे मी निवांत. ती परत येऊन बसते. "कालजी नको करू" ती पोरीला समजावते.

मी त्या दोघींकडे अजून बघतेच आहे. मला नाही तरी दुसरं काय काम??

"दोन महिने झाले होते.." आई माझ्याशी बोलते. मी नुसती बघते.
"मग नर्सला सांगा जर काही इमर्जन्सी असेल तर लवकर डॉक्टरकडे न्यायला,,"
"बाईनं तपासलं मगाशी. सोनोग्रापी करा म्हणलेत म्हणून थांबलोय.." आई मला सांगते. मुलगी खाली मान घालून बसलीये.

"अच्छा.." मला पुढे काय बोलायचं सुचत नाही. पण आता आईला ऐकायला कोणतरी मिळालय.

"चांदेराईवरून आलो. पोरीचं लग्न करून देऊन चार महिने पण नाही झालं. काल रातीला आनून सोडली तिला. मार मार मारलं तिच्या सासूने."
मला धक्का बसतो. जणू सासूने सुनेला मारणं मी आयुष्यात कधी पाहिलंच नाही. बरोबर, मी पांढरपेशी मध्यमवर्गीय गृहिणी. आमच्याकडे नाही हो सासवा अशा मारत. त्याचा वेगळा सुशिक्षित सासुरवास असतो.

"बालाला काय झालं ते बघायचय. तसा हिला काही त्रास नाही. थोडं अंगावरून गेलं असं सकाळी म्हणत होती. पन बाई म्हनल्या आतून तपासूनच बघूया. म्हनून थांबलो.." आई आता दवाखान्यात असल्याचं बहुतेक विसरल्या. ऐटीत तंबाखूची चंची बाहेर आली. नर्सचं लक्ष नव्हतं म्हणून नशीब!!!

"मला तीनच पोरी. ही सर्वात मोठी. चार वर्साची होती तेव्हा बा गेला तिचा. मी काय.. काय करनार. भाजीपाला हाय, आंब्याची चार. माड पोफली हाय पाच सात.. त्याच्यावर घर चालवनार. बारावी शिकली आनि लग्न केलं.. पुडं शिकायचं होतं. पन मंग आमच्याकडचे पोरं शिकली पोरगी नको म्हणतात म्हनुन शिकणं थांबवलं.. "

मी मनात म्हटलं आमच्याक्डे तरी कोण पोरगे स्वतःपेक्षा जास्त शिकलेली मुलगी पसंद करतात???
"सासूने मारलं तर पोलिसात तक्रार वगैरे काही केलीत का?" मी परत मध्यमवर्गीयपणा दाखवला. माझ्या सासूने मारलं असतं तर मी गेले असते का पोलिसात.. हा प्रश्न स्वतःला न विचारता.

"पोलिस कशाला?? आधी पोरीचं सगलं ठिक होउदे मग बघू या..."

तेवढ्यात नर्स तिला सोनोग्राफीला बोलावते. माझा पण नंबर येतो. मी डॉक्टरच्या रूमकडे जाते.

तसं बघायला गेलं तर प्रसंग माझ्या लक्षात पण राहिला नसता.. जर आई आणि तिची मुलगी मला परत हॉस्पिटलच्या बाहेर पार्किंगजवळ दिसले नसते तर.

मुलीच्या चेहर्यावर जरा हायसं होतं,, म्हणजे एकूण सर्व नॉर्मल असावं. रडणं पण थांबलं होतं. आणि ती आपल्या आईकडे कौतुकानं बघत होती.
आईने शिस्तीत हातात मोबाईल घेतला होता. पलीकडे कोण बोलतय सांगायची गरजच नव्हती...
आई आता नुसती "आई" नव्हती. रणचंडिका होती. तिला शोभेल असा आवाज होता आणि भाषा होती...

"ए.. ##डे... तुला मारायला दिली होती का गं माझी लेक... नाय येत तिला भाकरी बडवायला.. मी नाय शिकवलं तिला.. म्हनुन तू कोन तिच्यावर हात उचलनारी.. तिच्या हातच्या स्वैपाकाला चव नसेल तर तुझं तू शिजवून घेत जा. पोर काय तुझं ताट वाढायला म्हनून दिली मी???? याद राख.. एकली बाई आहे म्हनून उगाच समजून नकोस. आज तिच्या पोटातल्या बालाला काय झालं असतं ना घरी येऊन तुझी तंगडी मोडेन मी. हां.. माजी लेक काय मला जड नाही झाली. एकोणीस वर्षं सांभालली तशी अजून पन सांभालेन.. समजून र्हा. परत माझ्या पोरीच्या अंगाला हात जरी लावलस ना तर तुज्या गावात येऊन व्हानेनं जीव घेन तुझा. तू मारावं म्हनून दिली नाही माझी लेक तुला.."

Keywords: 

उपक्रम: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle