माझी लग्नकथा

परवा अंजूताई रिलायन्समध्ये भेटली - मुलींसाठी ऑनलाईन स्थळे बघते म्हणाली, मी गारच! म्हणजे ऑनलाईन स्थळेही बघता येतात? सोपं काम आहे म्हणे.. म्हणजे आपली प्रोफाईल क्रीएट करायची फोटो, bio-data इतकं टाकून आणि आपल्याला कोणी इंटरेस्टिंग वाटले तर त्याला/ तिला अ‍ॅप्रोच करायचे, मग concerned व्यक्ती फोन्स, इमेल्स, व्हॉट्स अ‍ॅप, इतकं करून date वर जातात. लग्न ठरवतात नाही तर मग बाय बाय करतात एकमेकांना. मला माझी वेळ आठवली, बाबांची पूर्ण भरत आलेली स्थळांची डायरी आठवली.

मी अभ्यासात तशी बरी होते, म्हणजे बारावीला पीसीएममध्ये चांगले मार्क वगैरे मिळवणारी होते. त्यानंतर कॉम्प्युटर्स शिकायचे असे ठरवले होते, पण तेव्हा कॉम्पुटर्स हे नवीन काहीतरी होतं. आणि इंजिनीरिंगला ऍडमिशन मिळत असताना हे काय करतेस, असं बाबा म्हणाले म्हणून आम्ही सरळमार्गे इंजिनीयर झालो. त्या काळी कशीतरी, खूप काम आणि अगदीच कसातरी पगार असलेली नोकरी पण मिळवली. नोकरी पण अशी की बारा महिने तेरा तास कामच काम आणि सगळ्या प्रकारचे काम, तेव्हा स्वेटशॉप हा शब्द माहित नव्हता. जेव्हा कळलं तेव्हा ती पहिली नोकरीच आठवली. कॉलेज संपल्याचं मला खूप दुःख नव्हतं, कारण स्वभाव futuristic का काय म्हणतात तसा आहे; म्हणजे पुढे जायचा आहे. नोकरी करायला बरं वाटत होतं, कारण घरी जाऊन अभ्यास नसतो ( Heehee ).

माझ्या ग्रुपमधल्या अर्ध्या मैत्रिणींनी कॉलेजमधेच लग्न ठरवलेली. मी तशी शांत, आणि खूपच बावळट. त्यामुळे स्वतः लग्न ठरवण्याचा प्रश्नच नव्हता. मग आई-बाबानी तो प्रश्न सोडवायचा ठरवलं आणि तीन चार ठिकाणी नाव नोंदवलं. तेव्हा वधू-वर सूचक मंडळ असायचे आणि तिथे मोठया फाइल्समधे स्थळं असायची. आम्ही फॉर्म भरला, फोटो काढला - तो ड्रेसमध्ये का, साडीत का नाही, असं विचारल्यावर आई 'साडीतील फोटो काढूया का' म्हणून म्हणाली पण माझं एक पहिल्यापासून होतं की आपण जसे आहोत, तसे कोणाला आवडलो तर अर्थ आहे. म्हणजे रोज साडी नेसत नाही तर कशाला साडी साडी करायचं.

मग दोन वर्ष मी भरपूर मुलं पाहिली आणि बऱ्याच मुलांनी मला पाहिलं. सगळे नमुने झाले. पत्रिका न जुळल्यामुळं बाबांच्या डायरीतली अर्धी स्थळे आधीच गळायची. मला तर शेवटी मंगळावरच जावे लागते की काय वाटत होते... आणि मुलांच्या आईच्या अपेक्षा ऐकून माझं बेसिक upbringing का काय ते चुकीचं आहे, असा समज होत होता. काय तर 'मुलीने साडीच नेसली पाहिजे', 'सगळा स्वयंपाक केला पाहिंजे'. हे ही ठीक आहे, खायला मला पण आवडते. पण कडी म्हणजे 'रोज वेळच्यावेळी घरी आलंच पाहिजे ऑफिसमधून - उशीर होता कामा नये.' म्हणजे इंजिनियर मुलगा प्रोजेक्ट्सच्या मागे लागून उशिरा घरी आला तर चालेल, पण मी नाही... इंजिनियर असूनसुद्धा??. अजून एक गंमत होती- मला चष्मा आहे तेव्हा मी कधीतरी लेन्सेस वापरायचे. पण माझे डोळे आईला आवडले नाहीत म्हणून नकार. मग मला वाटलं की, त्यालाच आवडले नसतील, आईच्या नावावर खपवले.

मीसुद्धा नकार दिलेच. एक जण एका दिवसात ४ मुली बघून पसंत करून १५ दिवसांमध्ये USला वापस जाणारा होता. त्याला कंपलसरी नोकरी न करणारी मुलगी हवी होती. मला घरी राहायला प्रॉब्लेम नव्हता पण कंपलसरी? आणि वर्क फ्रॉम होम मिळाला तर? अजून एकाला बायकोने पोस्ट ग्रॅड आणि अजून पुढे शिक्षण घ्यायला हवे होते आणि घरचे सर्व सांभाळून ते करावे, नोकरी चालणार नाही, असं होतं. मला चाललं असतं, पण त्याला मुलींनी टू-व्हिलर चालवलेली चालत नव्हती. सगळीकडे बसनेच जायचे, पुण्यातसुद्धा. एक महाशय बघायला आले तर जरा फिरून येऊ म्हणाले. आम्ही गेलोसुद्धा तर असा शोध लागला की तो नाही म्हणणार होता, कारण दुसरी कोणीतरी आवडत होती - ठीक आहे ते. पण मी उद्धट वाटते म्हणून नकार, असं का म्हणावे? असो . ह्या सगळयात भर म्हणजे आम्हाला प्राणी आवडतात --घरी कुत्रा होता. मी अगदी 'डॉग पर्सन' म्हणतात तशी आहे. ते बघून लोक नकोच म्हणत.

आणि मग अचानक योग्य म्हणतात तसा आला. माझा होणारा नवरा स्वतः पत्रिका घेऊन घरी आला. त्याला आमच्या कुत्र्याने पाहिला आणि पसंत की हो केला!!! सहा महिन्यात लग्न झालेसुद्धा. त्याचं आणि माझं "must love dogs " असं होत, दोघांचे शिक्षण सेम होतं, त्यालाही चष्मा होता आणि मुख्य म्हणजे मी नोकरी अथवा अजून काही करावं की नाही, हे मी ठरवलेलं त्याला चालणार होतं. माझी "to read" ची लिस्ट त्याला अर्ध्यापेक्षा जास्त आधीच माहित होती, माझा कुत्रा त्याच्यावर फिदा होता.

नंतर मला कळलं की साडी, नोकरी, चष्मा ह्याने काही फरक पडत नाही. संसार करायला मनं जुळायला लागतात.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle