कांजी एक जपानी अनुभव!

सारखे सारखे काय जपान बद्दल लिहायचे? कंटाळा नाही का येत? येतो ना.. पण लिहायला दुसरे काहीच नाहीच आहे. मग गप्प बसावे. ते जमले असते तर??? असो.

तर कांजी म्हणले की काय आठवते? गाजराची कांजी? दिल्ली कडच्या भागात हिवाळ्यात खातात किंवा पितात ती. (ही कशी असते ते मला माहिती नाही. ऐकले आहे फक्त.) पण आज विषय त्या कांजीचा नसून जपानी कांजीचा आहे. जपानीत कांजी म्हणजे चित्रलिपी. चीनकडून उधार घेतलेली लिपी. जी शिकता शिकता भल्याभल्यांचे जीव मेटाकुटीला येतो ती. पण आजचा विषय त्या कांजीचा पण नाहिये. ही/हा कांजी म्हणजे जपानमधे जो पार्टी/गेट टुगेदर अ‍ॅरेंज करतो ती व्यक्ती. त्यात काय विशेष, पार्टी तर अ‍ॅरेंज करायची आहे त्याला असा माणूस असाईन करून वेगळे पद कशाला निर्माण करायला हवे असे मला पण जपान मधे आले तेव्हा वाटायचे. आता फक्त अंगावर काटा येतो ते नाव ऐकले तरी. आज हे आठवायचे कारण आज फारा दिवसांनी मला कांजी म्हणून काम कर अशी लापि वाजवणारी मेल आली आणि मला माझे पहिले वहिले कांजीपण आठवले.

शांत वाटलेल्या त्या दिवसाची सुरुवात पण एका मेलने झाली. माझ्या टीम मधल्या एका सिनियर मॅनेजरची ती मेल होती. दर वर्षी १ जुलै ला बर्याच जपानी कंपन्यांमधे वार्षिक विभाग बदल होतात. एंप्लॉयी, मॅनेजर्स, बोर्ड मेंबर्स हे एका विभागातून दुसर्‍या विभागात, एका देशातून दुसर्‍या देशात, एका पदावरून दुसर्‍या पदावर जातात. अगदी धामधूम चालू असते. नवीन लोक, नवीन कामे, नवीन जागा आणि त्यांच्या साठीच्या अ‍ॅरेंजमेंट्स करण्यात सगळे गुंतून जातात. त्यातच अजून एक भर म्हणजे जाणार्‍या लोकांना फेअरवेल आणि येणार्या लोकांसाठी वेलकम पार्टीज करणे. माझ्या तेव्हाच्या ग्रुपचे हेड हे कंपनीत बर्याच वरच्या पदाला होते. अगदी स्पष्टच सांगायचे तर चेअरमन आणि प्रेसिडेंट यांच्यानंतरचे तीन क्रमांकाचे बोर्ड मेंबर होते. तेव्हा ते भावी प्रेसिडेंट होण्याची चिन्हे अगदीच होती(काही कारणांनी झाले नाहीत ते वेगळे). तर तेही जुलैमधे ग्रुपमधल्या दुसर्या कंपनीचा पदभार स्वीकारत असल्याने, त्यांच्यासाठी फेअरवेल पार्टी करायचे ठरले. मी नवीन म्हणून मला त्या पार्टीच्या कांजी ची असिस्टंट म्हणून काम करायचे आहे असे सांगणारी ती मेल होती. फार मनावर न घेता मी ठीक आहे असे म्हणून कामाला लागले, तोवर आउटलुक मधे स्केडूल येऊन पडले. पार्टीच्या अ‍ॅरेंजमेंट साठी मिटींग. पुढे काय वाढून ठेवले आहे हे मला साधारण कळले पण इलाज नव्हता.
तर त्या मिटींगपासून सुरुवात झाली. आधी दिवस ठरवणे. मग बॉस च्या सेक्रेटरी कडून त्यांचा महिन्याभराचा प्लॅन मिळवणे. त्यातही मग एकेक दिवसाचा प्लॅन बघून त्या दिवशीच्या त्यांच्या मिटींग्सची संख्या बघून त्यांच्या थकव्याचा अंदाज घेणे,(रिअली??), एवढेच नाही तर त्या मिटींग्जचे विषय बघून मूडचा अंडाज घेणे (दुसर्या दिवशी कॉर्पोरेट मिटींग असल्या की त्यांचा मूड जरा टेन्स असतो ही नवीन माहिती) , आदल्या दिवशी च्या डिनर मिटींग्स वरून पोटाचा अंदाज बांधणे( म्हणजे साधारण कोणते जेवण आणि कोणते अल्कोहोल पोटात गेले आहे), लंच, ब्रेकफास्ट मिटींग्स वरून परत असेच अंदाज घेणे. शुक्रवार शक्यतो नको कारण दुसर्‍या दिवशी त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर आनंदात घालवता आला पाहिजे. देवा, त्यापेक्षा सरळ त्यांना विचारणे किती सोपे आहे असे विचार मनात येत होते. पण जपानी हाय काँटेक्स्ट कल्चर असल्याने असले काही अकलेचे तारे तोडणे ते पण नवीन असताना अलाऊड नसते. पण या सगळ्या गाळणीतून एक दिवस मिळाला देखिल. मग सगळ्यांना सहभागी होणार्या जनतेला मेल पाठवून तो दिवस रिकामा ठेवायची सूचना देणे.पण हे कांजीपण इथे थांबत नाही. पुलंच्या नारायणाच्या अंगात जसे लग्न शिरते तसे कांजीच्या अंगात ती पार्टी हळूहळू शिरायला लागते.

पुढचा शोध असतो व्हेन्यू अर्थात रेस्तराँचा.मग परत एकदा त्यांच्या सेक्रेटरीला गार्‍हाणे घालून त्यांच्या मुळातल्या आवडी निवडी, सध्याच्या आवडीनिवडी, अ‍ॅलर्जीज चा आढावा. मग पुढचे मागचे दिवस बघून फूड टाईप (कोणत्या देशाचे फूड) रिपीटेशन होत नाहीये ना याची खात्री करणे. या गाळणीतून फ्रेंच आणि इटालियन रेस्तराँ राहिले. मग शोध सुरू. ठिकाण खूप स्वस्त नको पण बजेट मधे बसेल असे हवे. १५ लोकांना वेगळी खोली(??) मिळेल असे हवे. म्हणजे कामाच्या गप्पा पण मारता येऊ शकतील. बाहेर ऐकू न जाता आणि आतल्या लोकांना बाहेरचा आणि बाहेरच्या लोकांना आतला व्यत्यय येणार नाही असे हवे. त्या दिवशी जर पाऊस असेल तर ऑफिस पासून टॅक्सीने जाता यावे (बजेट मधे हे गृहित धरायची सूचना) असे हवे.रेस्तरॉची एखादी सिग्नेचर डिश हवी म्हणजे कसे चांगले वाटते. रेस्तरॉंने स्पेशल कोर्स मेन्यू विथ मिनिमम २-३ ऑप्शन्स पर कोर्स दिले पाहिजेत. या आखूडशिंगी बहुगुणी जागेच्या शोधात आम्ही दोघे फोनवर फोन करतोय. जवळ ठिकाण असेल तर बघून येतोय. पण तोक्योच्या रेस्तराँच्या लोकांना पण या बहुधा या सगळ्या अतरंगी पणाची सवय असल्याने एवढ्या सगळ्या नियमांमधे बसणारे रेस्तराँ पण मिळते. तात्काळ बुकिंग करून परत एकदा सगळ्यांना जागा, वेळ, जायची व्यवस्था, मॅप इत्यादी मेल करण्यात आली.हुश्श!!
पण हे इथेच संपले तर काय मजा ना!! त्यानंतर मुख्य व्यवस्थापन. त्यांना द्यायच्या पुष्पगुच्छाचे काय? तो कोण आणणार, फूलवाला आणून देणार का आपण जाऊन कलेक्ट करायचा, किती वाजता देणार,बजेट किती, कोणती फुले, कशा प्रकारचा गुच्छ, खालच्या रिबन ला गाठ कशी बांधायची( जोक नाहिये, या गाठी प्रसंगानुसार ठरलेल्या असतात.) देव पण कसल्या गाठी मारतो आपल्या आणि आपल्या कर्मस्थळाच्या!!
त्यानंतर मग गिफ्ट काय द्यायची यासाठी परत एकदा सेक्रेटरी ची भेटः त्यांना नुकत्याच मिळालेल्या गिफ्ट्स, आवडी-नावडी इत्यादी बद्दल गहन चर्चा), मग उपलब्ध बजेट मधे बसणारी सर्वात उत्तम गिफ्ट ठरवणे, परत एकदा फुलांच्याप्रमाणेच सगळेच प्रश्न आणि उत्तरे ठरवणे.कोण, कधी कुठे कसे गिफ्ट आणणार वगैरे वगैरे. शिवाय जसजसे हे ठरत जाईल तसतसे एक्सेल शीट मधे भरत जायचे.
त्यानंतर मग सिटींग अ‍ॅरेंजमेंट. कोण कोणाशेजारी कसे बसणार, दारू कोण मागवणार, सुरूवातीचे चार शब्द कोण बोलणार, शेवटचे आभरप्रदर्शानचे गोड काम कोण करणार अशा बारीक बारीक गोष्टी ठरवल्या जातात. आणि हे सगळे करता करता आपले नेहेमीचे काम पण वेळेत करणे अपेक्षित असते. त्यामुळे खुद्द पार्टीच्या दिवशी, कांजी अजिबात एंजॉय करू शकत नाही अशी परिस्थिती असते.

आज परत कांजी म्हणून विनंतीची मेल आली आणि हा सगळा प्रसंग आठवला.यावेळची कांजी माझ्या ऑफिसमधे असणार्‍या माझ्या युनिव्हर्सिटी मधून बाहेर पडलेल्या सगळ्यांच्या गेट टुगेदरची आहे. यातला सगळ्यात मोठा भाग स्केज्युलिंगचा असतो. जेवण युनिव्ह्र्सिटीच्या क्लबवर असते आणि मेन्यू पण बराचसा ठरलेलाच असतो. जोडीला एक असिस्टंट पण असेल त्यामुळे काम सोपे असेल पण तरी कांजीचा भोग परत आला आहे हे खरे!!

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle