जावई इन हवाई

प्रभात रोडला राहणार्‍या पांढरकवडे काकूंनी लिहिलेला लेख नुकताच (पुन्हा) वाचनात आला. ('प्रभात रोडला राहणार्‍या' असं लिहिलं त्याला कारण आहे. आईला पांढरकवडे आडनावाच्या तीन मैत्रिणी आहेत. एक प्रभात रोडला राहतात, दुसर्‍या बिबवेवाडीत आणि तिसर्‍या सिडनीत!) आईने त्यांच्यासाठी दिलेलं पार्सल (अर्धा किलो उपवासाची भाजणी. आमच्या घराशेजारच्या किराणादुकानात त्यांच्या घराशेजारच्या किराणादुकानापेक्षा पंचाहत्तर पैशांनी स्वस्त मिळते. खेरीज रोज मी जीआरईच्या क्लासला त्यांच्या घरावरूनच जाते.) त्यांच्याकडे पोचवायला गेले होते, तेव्हा त्यांनी लॅमिनेट करून घेतलेलं लेखाचं कात्रण हळुवारपणे माझ्या हातात ठेवलं. 'आता हाच लेख (खरंतर त्यावरच्या प्रतिक्रिया!) मी परवाच ऑनलाईन वाचलाय.' हे सांगायचं मनात आलं खरं, पण म्हटलं र्‍हाऊंद्या, काकूंचं मन राखलं पाहिजे. पांढरकवडे काकू आईची शाळामैत्रीण आणि त्यांची बबडी ताईची शाळामैत्रीण! (माझ्या वयाच्या जवळपासच्या वयाचा त्या घरात काकूंचा मुलगा यश आहे. तो डिट्टो हृतिकसारखा दिसतो. असो.) बबडी आता हवाईत सेटल झाली आहे. तिकडे जाऊन अडीच वर्षं झाल्यावर तिने काकाकाकूंच्या अमेरिका ट्रिपसाठी तिकिटे पाठवली. अमेरिकेला जायचं ठरलं तसं काकूंनी लगेचच एक 'क्रिएटिव्ह रायटिंग'चा कोर्स जॉईन केला. आजकाल अमेरिकावारी झाली/सुरू असली की किमान एकतरी लेख लिहिला पाहिजे(लेखसंख्येला अप्पर लिमिट नाही!), असा काहीसा नियम आहे म्हणे! जावयांतर्फे झालेली अमेरिकावारी असेल तर परतताना जावयांवर लिहिलेल्या लेखाची प्रिंटआऊट इमिग्रेशन अधिकार्‍यांना सादर करावी लागते. त्यातली जावयांची क्रेडिटकार्डे, त्यांनी घडवलेल्या अमेरिकांतर्गत सहली आणि एकंदरीत जावयांची स्नेहयुक्त वागणूक याबद्दलची माहिती जावयांशी संबंधित संस्थांना (म्हणजे त्यांची कंपनी, जावयांना क्रेडिट कार्डं देणार्‍या बँका, इ.) पुरवली जाते. ग्रीनकार्ड प्रोसेसमध्ये असेल तर हा लेख आवश्यक डॉक्युमेंट म्हणून सादर करावाच लागतो. असो.

तर पांढरकवडे काकू लेख लिहिण्यासाठी आपल्यापरीने जय्यत तयारी करून गेल्या होत्या. ("हो बाई, आपल्याकडून काही कमी पडायला नको. कुलकर्णीबाईंच्या अमेरिकावारीत काय झालं होतं ठाऊकाय ना? त्यांनी लेख लिहिला हो एवढा चारपाच हात, पण जावयांच्या क्रेडिटकार्डांबद्दल, आपल्या पॉश कारमध्ये ते कसे स्मार्टपणे आपणच गॅस भरतात, वगैरेंबद्दल अवाक्षर नाही. आम्ही कसे सराइतासारखे विमानं बदलत जावयांकडे पोचलो, मग पुढे एकेकटेच कसे अमेरिकाभर फिरलो, पुढे कॅनडात मुलाकडे कसे आपले आपण गेलो अशी स्वत:चीच कौतुकं! त्यांच्या जावयांना त्यानंतर नवीन क्रेडिटकार्ड मिळवायला इतका त्रास झाला की ज्याचं नाव ते! त्यांच्या मुलीचं दुसरं बाळंतपण जवळ येईपर्यंत सासूसासरे नि जावई बोलतसुद्धा नव्हते..." - इति काकू.) काकूंची ट्रिप छानच झाली. आमच्याकडे फोटो दाखवायला (बबडीच्या मुलीचं नाव मायरा ठेवलं आहे. 'मायरा म्हणजे अ‍ॅडमायरेबल' असं यश माझ्या कानात कुजबुजला. ते फारच अ‍ॅडमायरेबल होतं. असो. '.. दोघांनी कित्ती वेबसाईट्स पालथ्या घातल्या. पुस्तकं धुंडाळली. शेवटी जावयांनीच असं वेगळंच नाव शोधून काढलं हो!' - काकूंच्या या कॉमेंट्रीमुळे आईचं नि त्यांचं लक्ष आमच्याकडे नव्हतं, हेही कित्ती अ‍ॅडमायरेबल! पुन्हा एकदा.. असो.) नि चॉकलेटं द्यायला त्या येऊन गेल्या. "सहा महिने कसे मजेत निघून गेले कळलंच नाही.." म्हणत होत्या. मी त्यांच्या म्हणण्याला मनापासून दुजोरा दिला. (ते दोघं इथे नव्हते तेव्हा शनिवार-रविवार यश दुपारी जेवायला आमच्याकडे यायचा. त्याला सुटीच्या दिवशीच्या लंचमध्ये साधंवरण भात नि लिंबाचं लोणचं लागतंच. सण असला तर चितळ्यांच्या दुकानातलीच मिठाई!) तर ते असो.

काकूंनी बराच मोठा लेख लिहिला होता. विशेष म्हणजे प्रसंगावधान राखून तो जावयांकडून आधीच 'पास' करून घेतला होता. इथल्या वर्तमानपत्रांना त्यांच्या दुर्दैवाने (दुर्दैव वर्तमानपत्रांचंच!) अशा नीट रिव्ह्यू केलेल्या लेखांची कदर नसल्याने त्यांनी संक्षिप्त आवृत्तीच छापली. पण त्यामुळे त्या लेखाचं महत्त्व कमी होत नाही. तर हा असा महत्त्वाचा दस्तऐवज आपण आता पाहूया. आठवल्या तेवढ्या ऑनलाईन आवृत्तीतल्या प्रतिक्रिया सोबत कंसात दिल्या आहेत. ('बर्गर म्हटला की चिली केचप पाहिजेच.' असं यश म्हणतो. आम्ही दोघं काकूकाका ट्रिपला गेले असताना तीनदा केएफसी आणि दोनदा बर्गर किंगमध्ये गेलो होतो.) काकूंनीही कंसांत बरेच काय काय टाकल्याने प्रतिक्रियांच्या कंसात 'ऑ.प्र.' असे लिहिले आहे.
***

गेल्या महिन्यात आम्ही लेक-जावयाकडे हवाईला विमानाने आलो. (ऑ. प्र. - विमानाने नायतर काय रिक्षाने जाणार? लिहिलेलं छापलं जातंय हे पाहून हे लोक काय वाट्टेल ते लिहित सुटतात.) हे अमेरिकेतले सगळ्या राज्यांमधील नवीनतम राज्य आहे व बेटांनी बनलेले आहे. त्यामुळे तिकडे खूप बीच आहेत. तिकडे सगळे लोक बीचवर जातात व गळ्यात ऑर्किड फुलांची माळ घालतात. कपडे पुरेसे घालतातच, असं नाही. आमच्या जावयांनी क्रेडिट कार्डांची माळ घातली होती. क्रेडिट कार्ड ही अमेरिकेतली आत्यंतिक महत्त्वाची गोष्ट आहे. जावयांकडे जगातील प्रत्येक प्रख्यात बँकेचे क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे ती माळ घालून ते सगळ्या लोकांत उठून दिसत होते. मी वाळूत बसले, तर मला बसूनही दिसत होतेच. (ऑ. प्र. - तुमच्या जावयाची उंची किती आहे? त्यांनी लहानपणी व्यायाम केला होता का?)

आमचे जावई श्री. सुखमल मोटवानी (सुखमल मोटवानी हे जावयांचे नाव नव्हे, इंजीनियरिंग कॉलेज स्थापन केले त्यांचे! जावई मराठीच आहेत. बबडीने मराठी बाणा जपल्याचा मला अभिमान आहे.) इंजीनियरिंग कॉलेज या प्रसिद्ध कॉलेजातून बीई झाले. पांढरकवडा गावापासून तीस मैल उत्तरेला एका निसर्गरम्य टेकडीवर हे कॉलेज वसले आहे. (पांढरकवडा हे आमचे मूळ गाव. जावई बबडीच्या प्रेमात पडण्याचे एक कारण हेसुद्धा आहे.) निसर्गसौंदर्य असलेल्या ठिकाणीच राहण्याची सवय जावयांना तेव्हापासूनच लागली. इंजीनियरिंगच्या चौथ्या वर्षाला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये त्यांनी अनेक बड्या कंपन्या डावलून, योग्य कंपनी येईपर्यंत संयम राखून 'कूलसॉफ्ट' या कंपनीची निवड केली. (ऑ. प्र. - ओ काकू, सरळ सांगा ना आधी येकापण कंपनीत जॉब भेटला नाही जावयाला. डोंबलाचा सय्यम!) त्यांना कंपनीच्या वरणगाव येथील हेड ऑफिसला पोस्टिंग मिळाले. तसेच, फास्ट कोडिंग आणि डोळे बंद करून कोडिंग या स्किलसाठी सलग दोन वर्षं बक्षीस मिळाले. मग त्यांची बदली आळंदी(देवाची) येथे झाली असताना आमची बबडी त्यांना भेटली. आळंदीसारख्या शुभ स्थळी असल्याने त्यांनी घरच्यांची परवानगी घेण्यात वेळ न घालवता ताबडतोब लग्न केले. (ऑ. प्र. - आळंदीत मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस आहे का हो? गेल्यावर्षी माझा मित्र पळून तिकडे गेला होता तर तिकडे सापडले नाही. मग त्याने देवळात लग्न केले, नंतर पोरीच्या बापामुळे पोलिसचे लफडे झाले.) त्यावरून आमचे हे खूप नाराज झाले होते. (ऑ. प्र. - काय काका, बिनखर्चाने पोरीचे लग्न झाले त्यात आनंद मानायचा, ते नाही. तुम्हांला लग्नात सहासात लाख खर्चावे लागते असते म कळले असते.) त्याच काळात तळपायाला भेगा पडण्याचा आजार झाल्याने मी बिछान्यावर पडून होते. या कठीण काळात जावयांनीच आमची फोनवरून सतत विचारपूस केली व माझ्यासाठी खास अ‍ॅक्युप्रेशर चपला व यांच्यासाठी इंपोर्टेड ब्लडप्रेशर गोळ्या आवर्जून भेट म्हणून पाठवल्या. (ऑ. प्र. १ - अमेरिकेतला जावई झाला तरी काय झालं? कुठल्याही गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्या. ऑ. प्र. २ - काकू, तुम्ही पायाला क्रॅक क्रीम लावली असती तरी तुमचे पाय बरे झाले असते. ऑ. प्र. ३ - कोकमतेलाचा दगड हा तळपायाच्या भेगांवर सर्वोत्तम उपाय आहे. दुर्दैवाने आपल्याकडचे लोक हे जुने उपाय विसरत चालले आहेत आणि अ‍ॅलोपॅथीच्या क्रीमला जवळ करत आहेत. ऑ. प्र. ४ - ओ काका, तळपायाला ते कोकमतेल लावून काकू चालायला लागल्या आणि सटकून पडल्या तर काय भावात जाईल? त्यातून काकांना ब्लडप्रेशर.) बबडीच्या पायगुणाने त्यांचे प्रमोशन होऊन ते हवाईला आले. त्यांनी तिथून आवर्जून यांना पाठवलेल्या 'आय लव्ह हवाई' टीशर्टामुळे सासरा-जावई दुरावा खूपच कमी झाला व आम्ही हवाई ट्रिपसाठी आलो.

आम्ही खास हवाईत आलो म्हणून चिनी रेस्टॉरंटात गेलो. (ऑ. प्र. - तिथेही चायनीजच खाल्ले? हिंदी चिनी भाई भाई..) तिथे आम्हांला काही ते चिनी लिपीतले नाव वाचता आले नाही. पण जावयांनी घडाघड वाचले आणि ऑर्डर घ्यायला आलेल्या वेटरला विचारले - "पार्ले-वू फ्रॉन्से?"

तेव्हाच वेटरला आकडी आली. (तो दुष्ट म्यानेजर म्हणे, तुमच्या जावयांच्या भयंकर प्रश्नामुळेच आली. कुजका मेला!) तर जावयांनीच त्याला प्रथमोपचार केला. त्यावर त्याने आम्हांला नूडल खायच्या बांबूच्या काड्या फुकट दिल्या. ही अजून एक अमूल्य भेट आम्हांला जावयांमुळेच मिळाली. (माझ्या लेकीची पुढच्या महिन्यात डिलिव्हरी आहे.) (ऑ. प्र. - तेच म्हटले, एवढा खर्च जावयांनी केला त्यामागे काही कारण असणार...) त्याआतच नायगारा उरकून घ्यायला आम्ही जाणार आहोत, जावयांनी त्यांच्या एअरलाईनमधल्या मित्राच्या ओळखीने बिझनेस क्लास तिकीटं काढली आहेत. (ऑ. प्र. १ - नायगारावरचा लेख कधी लिहिणार काकू? लिहून टाका. आम्ही वाचायला आहोतच. ऑ. प्र. २ - अमेरिकेतल्या अमेरिकेत प्रवास करायला बिझनेस क्लास कशाला? हेच लोक भारतात असतात तेव्हा एसी व्हॉल्व्होने न जाता एस्टीने जातात आणि तिकडे जाऊन जिथे तिथे बिझनेस क्लास. ऑ. प्र. ३ - बिझनेस क्लास? फेकता का काकू? नशीब जावयांचे प्रायव्हेट जेट आहे, असे नाही लिहिले.) ते खूपच काळजी घेतात आमची!(मित्र नव्हे, जावई!) आमच्या ह्यांना जरी बबडीने लव्हमॅरेज केलेले आधी आवडले नव्हते, तरी आता मात्र हे पूर्ण निवळले आहेत.

असे हे हवाई आणि असे आमचे जावई!

***

वरच्या प्रतिक्रियांवरून काकूंचा लेख ऑनलाईन तरी सुपरहिट ठरला, हे लक्षात आलंच असेल. मी लेख मन:पूर्वक वाचला. काकूंचं आणि लेखाचं कौतुकही केलं. मी लेख वाचेपर्यंत यश तयार होऊन आला. (माझ्या मराठी वाचनाचा वेग तसा बराच कमी आहे.) मग आम्हां दोघांनाही कॉफी आणि दडपे पोहे देऊन काकू त्यांच्या भिशीमंडळाच्या बायकांबरोबर पूर्ण दिवसाच्या पिकनिकला जाण्यासाठी निघाल्या. यशच्या कंपनीत दहा दिवसांचा अ‍ॅन्युअल शटडाऊन असल्याने तो घरीच असणार होता. आमची लास्ट टर्म सुरू व्हायलाही अजून दहा दिवस आहेत. असो.

इति भरतखंडे अमेरिकापुराणे पांढरकवडे-काकूंचा-लेक (अर्रर्र! टायपो.. मला लेख म्हणायचे होते.) नामं अध्याय: संपूर्णम्|

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle