जपानी खाद्यसंस्कृती भाग १: बेंतो अर्थात जपानी डबा

मला कधी पासून जपानी खाद्यसंस्कृतीवर लेख लिहायचा आहे पण त्या विषयाचा आवाका एकतर प्रचंड आहे आणि त्यात माझ्या डोक्यात इतके काही आहे की ते सलग उतरवून होणार नाही. तेवढा वेळ पण नाही आहे सध्या. कदाचित अशा छोट्या छोट्या गोष्टींचे काही लेख लिहू शकेन.
तर सुरूवात बेंतो पासून. कारण हा पण जपानी खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य घटक आहे आणि डब्यातला खाऊ या धाग्यावर बर्‍याच जणींना हे बेंतो प्रकरण आवडले म्हणून हा लेखप्रपंच!

अमेरिकेत रहाणार्या बर्‍याच जणांना नक्कीच Bento Box Lunches माहिती असतील. लाकरच्या सुंदर बॉक्स मधे निरनिराळे पदार्थ छोट्या छोट्या प्रमाणात भरलेले हे बेतो आधी डोळ्यांना आणि आणि मग जीभेला आणि पोटाला आनंद देतात. तोत्तोचान या पुस्तकात पण "काहीतरी समुद्रातले आणि काही तरी डोंगरावरचे/जमिनीवरचे" असे वर्णन असलेला बेंतो अर्थात खाऊचा डबा आपल्याला भेटतो. इथे जपान मधे तर ठायी ठायी त्याचे अस्तित्व आहे. आया त्यांच्या मुलांसाठी बनवतात, प्रेमात पडलेल्या मुली त्यांच्या मित्रांसाठी बनवतात, बायका नवर्‍यांसाठी बनवतात आणि कुणीच नसेल तेव्हा कन्विनियन्स स्टोअर्स, मोठी डिपार्ट्मेंट स्टोअर्स आणि अगदी स्टार रेस्तराँ सुद्धा सगळ्यांसाठी बनवतात. कधीही, कुठेही हव्या त्या किंतीमधे डबा उपलब्ध असतो. अगदी ३५० येन पासून १०,००० येन पर्यंत सर्व पर्याय आहेत.

या बेंतोंची सुरुवात साधारण इ.स. १२०० मधे झाली असे मानतात. तेव्हा प्रामुख्याने डब्यात भात असायचा आणि डबा न वापरता पिशवी वापरायचे. बेंतोचे आत्ताचे स्वरूप साधारण इ.स. १६०० मधे तयार झाले जेव्हा जपानने पूर्णपणे स्वतःला बाहेरच्या देशांपासून कोंडून घेतले होते. त्या काळात जपानमधे प्रचंद सांस्कृतिक भरभराट झाली. विविध कलांचा उगम आणि विकास झाला. लाकरवेअर हे त्यातलेच एक. नोह आणि काबुकी या जपानी (नाटक्/नृत्य) कार्यक्रमांच्या मधे २ प्रवेशांधल्या काळात पडदा पडलेल्या वेळी, सुंदर लाकरवेअरच्या डब्यात निरनिराळे पदार्थ भरलेले बेंतो खाणे हा एक आनंदी कार्यक्रम असायचा. अनेक जुन्या जपानी चित्रांमधे हे दृश्य चितारले आहे.
हे एक त्यातले चित्र.
139[1].jpg
त्याचबरोबर जपानी हानामी म्हणजे चेरी ब्लॉसम बघायला जाताना पण असे सुंदर बॉक्स बेंतो घेऊन जाणे पण तेव्हाच सुरू झाले.
हानामी चे दृश्य
main[1].jpg

218209260_624[1].jpg

त्यानंतर एदो काळात कोणत्या प्रसंगी कोणता बेंतो बनवायचा, काय पदार्थ, कसे भरायचे, कसे सजवायचे याचे शास्त्र विकसित झाले. पुस्तके लिहिली गेली. दस्तावेजीकरण झाले. आणि बेंतो हा संस्कृतीचा एक महत्वाचा घटक बनला.
त्यानंतर मेइजी काळात शाळात आणि कार्यालयांमधे जेवणाची सोय नसल्याने बेंतो मुलांनी आणि पुरुषांनी नेणे आणि आणि बायकांनी/आयांनी ते बनवणे हे चांगलेच लोकमान्य झाले होते. नंतरच्या काळात शाळांनी जेवण द्यायला सुरू केल्याने, कार्यालयांमधे जेवण मिळणे अथवा बाहेर वेगवेगळे पर्याय उपलब्ध होणे, स्त्रिया मोठ्या प्रमाणात नोकरी करू लागणे अशा कारणांनी बेंतो थोडे मागे पडले तरी हानामी, क्रीडामहोत्सव, सहली अशा खास प्रसंगांसाठी बेंतो बनवले जातच होते. सध्याच्या कन्विनियन्स आणि रेडी टू इट जगात परत एकदा हेल्दी लाईफस्टाईल कडे वळताना लोकांना बेंतोंची आठवण झाली आहे. हा झाला थोडक्यात बेंतोचा इतिहास.

आता बेंतोची काही मूलबूत तत्वे/नियम बघू.
परिपूर्ण आहार मिळावा या दृष्टीने बेंतो बनवला जातो. एक अगदी सोपा नियम म्हणजे रंग. जेवढे रंग जास्त तेवढा बॅलन्स्ड बेंतो. कार्ब्स, प्रोटीन्स या आडख्यांएवजी रंग बेस म्हणून वापरले जातात.
पांढरा : भात, बटाटा, तोफू,नूडल्स, अंडी
पिवळा/केशरी : कॉर्न, गाजर, तोफू, भोपळा, कॅण्टलूप, रताळे,अंडी
हिरवा: पालेभाज्या, बीन्स, सिमला मिरची, लेट्यूस, ब्रोकोली, अ‍ॅस्परअ‍ॅगस इ.
लालः टोमॅटो, चेरीज, लाल भोपळी मिरची, लाल कोबी
ब्राऊनः मश्रुम्स, चिकन, बीफ,पोर्क इत्यादी
नॉर्मली, यापैकी थोडे थोडे वापरून बनवलेला बेंतो दिसायला तर आकर्षक दिसतोच पण परिपूर्ण पण असतो.

दुसरा अगदी नो नॉन्सेन्स नियम म्हणजे, कार्ब्सःप्रोटीन्सःभाज्या/फळे यांचे गुणोत्तर ४:२:२ अशा प्रमाणात ठेवणे. हा नियम जपानच्या न्यूट्रीशन गाईडलाईन वरून बनवला आहे. प्रत्येक देशाची न्यूट्रीशन गाईडलाईन असते. फूड पिरॅमिडस वगैरे म्हणजेच न्यूट्रीशन गाईडलाईन.

बेंतो भरण्याचा एक सिक्वेन्स असतो.
आधी भात भरायचा, कारण तो सर्वात जास्त जागा व्यापतो. त्याच्या आजोबाजूला बाकी गोष्टी रचायच्या असतात. तो नंतर घालता येत नाही. त्यानंतर प्रोटीन्स घालायची. कारण ते पण बह्धा जागा व्यापते. त्यानंतर जास्तीची प्रोटीन्स, साईडदिश वगैरे आणि सर्वात शेवटी भाज्या, फळे वगैरे अ‍ॅक्सेण्ट्स.

बेंतो भरण्याचे काही नियम म्हणा किंवा गाईडलाईन्स असतात. जपानच्या हवामानामुळे पदार्थ खराब होऊन फूड पॉयझनिंग वगैरे होण्याची शक्यता असते. सर्व पदार्थ अगदी टाईटली पॅक करावे लगतात नाही तर जागा रहिली की जाण्यायेण्यात डबा हलून सगळे पदार्थ त्यांची जागा सोडून सगळा डबा विस्कळीत होऊन जातो. भरपूर फिलर्स वापरावे लागतात त्यामुळे. झाकण लावण्यापूर्वी सर्व पदार्थ नीट गार व्हावेत. नाहीतर आत वाफ जमा ओऊन आर्द्रता राहून पदार्थ खराब होऊ शकतो. कच्चे मासे डब्यात देऊ नयेत (सुशी/साशिमी वगैरे), पदार्थ नीट शिजवावेत, उन्हाळ्यात आइसपॅक द्यावा, डबा अतिशय नीट स्वछ करून, निर्जंतूक करून मगच भरावा इत्यादी.

जपानी लोक तसेही खाण्यापिण्याच्या आणि आरोग्याच्या बाबतीत खूप चोखंदळ आहेत. बाकी सर्व जेवणांप्रमाणेच डबा देखिल त्यांना दिसायला आकर्षक आवडतो. त्यामुळे बेंतो बनवणे ही एक कला बनली आहे. यातूनच उगम झाला क्याराबेनचा. हे कॅरॅक्टर बेंतो चे छोटे रूप आहे. या मधे पदार्थांना वेगळ्या कार्टून किंवा रिअल लाईफ कॅरॅक्टर च्या आकारांमधे डब्यात रचले जाते. प्राथमिक शाळां किंवा प्ले ग्रूप्समधे जाण्यार्‍या मुलांच्या आयांमधे मध्यंतरी याचे फार स्तोम माजले होते. त्यातून नोकरी करणार्‍या मुलांच्या आया ज्यांना हे जमायचे नाही त्या मुलांना शाळेत चिडवणे वगैरे प्रकार सुरू झाल्याने बर्‍याच शाळांनी आता यावर बंदी घातली आहे. याचे क्लासेस वगैरे पण असतात. या विषयाला वाहिलेली मॅगझिन्स, पुस्तके, वेबसाईटस अर्थातच आहेत.

हे काही क्याराबेन्स
1106b823009de52336cd2fe43f02d4ee[1].jpg

mig[1].jpg

1252fe0881bd4d108728f896c0546f65320ff188.36.2.3.2[1].jpg

दुसरा एक प्रकार म्हणजे एकीबेन. एकी म्हणजे स्टेशन. जपान मधे ट्रेन्सचे जाळे आहे. प्रवासामधे वेगवेगळ्या ठिकाणचे स्थानिक पदार्थ भरलेले बेंतो सर्व स्टेशन्सवर विकायला असतात. ते खाणे हे प्रावासातला एक आनंदाचा भाग असतो.
काही एकीबेन्स एवढे फेमस असतात की काही वेळा डिपार्ट्मेंटल स्टोअर्स मधे या फेमस एकिबेन्स चा महोत्सव असतो आणि एरवी तिथे त्या स्थानकावर जाऊन खाता येत नाही म्हणून लोक अशा महोत्स्वामधे रांगा लावून हे एकी बेन खातात.

10329415[1].jpg

बाकी अजूनही हानामी ला स्पेशल बेंतो बनवून बागांमधे साकुरच्या झाडाखाली बसून आप्त-मित्रंबरोबर खाणे हे जपानी लोक करतातच. हा हानामी स्पेशल बेंतो.
DETQ_5508253a4e3351426597178[1].jpg

हे बघितल्यावर लक्षात आले असेलच की हे बेंतो बनवणे जरा कलाकुसरीचे आणि वेळकाढू प्रकरण आहे. पण जपानी लोकांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यात पण सोय, सुविधा आणि परफेक्शन यावे म्हणून प्रयत्न केला आहे. बेंतोसाठीचे असंख्य प्रकार इथे बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या बेंतोबॉक्सेस पासून,आत ठेवायचे पेपर कप्स, पदार्थांना आकार द्यायचे मोल्डस, कटर्स, क्लीपर्स अशा गोष्टींची रेलचेल असते. हे बघा काही प्रकार. अगदी डॉलर शॉप सारख्या १०० येन्च्या दुकांनामधे पण खूप काय काय प्रकार मिळतात.

1487669273_1[1].jpg

98398924b2b8d1b7c2fed2501f5c4b0d5e96f228_l[1].jpg

तर, थोडीशी मेहनत, थोडी पूर्वतयारी, थोडी इछाशक्ती आणि थोडी साधनांनी/पर्यायांची मदत घेऊन कोणी पण असे आकर्षक तरीही न्यूट्रीशनली बॅलन्स्ड बेंतो बनवू शकतो. पूर्णवेळ नोकरी करणारी मी पण बहुतांशी रोज बनवते. हे मी केलेले काही बेंतो.

2017-10-10-PHOTO-00001845_0.jpg

2017-10-10-PHOTO-00001846_0.jpg

2017-10-10-PHOTO-00001847_0.jpg

2017-10-10-PHOTO-00001848_0.jpg

FullSizeRender_1.jpg

Lunch 2.jpg

Lunch 4.jpg

Lunch 5.JPG

Lunch 6.jpg

Lunch1.jpg
माझे प्लॅनिंगः
भात : रात्री इलेक्ट्रीक राईस कूकरला टायमर लावून ठेवते, सकाळी ताजा भात तयार असतो. कधी जमणार नसेल तेव्हा १-२ पोर्शन्स फ्रीज केलेले असतात. ते ही शक्य नसेल तेव्हा सिंगल सर्व्ह फ्रोझन राईस पॅकेट्स वापरते. भाज्या,मीट घालून भात करायचा असेल तेव्हा पण रात्री सगळे घालून राईस कूकरला टायमर लावून ठेवते. पण शक्यतो उन्हाळ्यात हे करायला जात नाही.
प्रोटीन्स:
मीटबॉल्स :घरचे. केले तर किमान २ दा वापरता येतील असे करून ठेवते. क्वचित विकतचे वापरते. पण मुलाला ते जास्त आवडत नाहीत.
हॅम्बर्ग पॅटी. घरची किंवा विकतची आणून फक्त ग्रिल करून आणि सॉस मधे घालून.
मिन्स्ड चिकन :जपानी किंवा थायी पद्धतीने ५ मिनिटात होते.
चिकन : असंख्य प्रकारे. तळून,ग्रिल करून, शिजवून
फिशः वास येतो म्हणून शक्यतो देत नाही पण क्वचित दिला तरी सामन किंवा ट्यूना राईसबॉल मधे घालून.
अंडे : उकडून, जपानी स्क्रॅम्बल्ड, भातात घालून
तोफू : भाजीबरोबर, भातात घालून
भाज्या :
उकडलेली ब्रोकोली मेयॉनिज किंवा मीठ/मिरपूड किंवा मॅजिक सॉल्ट घालून, कधी चीज घालून
उकडून बटरवर परतलेले कॉर्न्स
परतलेल्या भाज्या :कांदा, रंगीत भोपळी मिरच्या. मश्रूम्स, झुकिनी, भेंडी,अ‍ॅस्परअ‍ॅगस
परतलेल्या/उकडलेल्या पालेभाज्या वरून सोयासॉस किंवा मीठ घालून. क्वचित बेकन घालून
उकडलेला भोपळा, बटाटा, हॅम-काकडी घालून पोटॅटो सॅलड
चेरी टोमॅटो
कच्ची काकडी, किंवा व्हिनेगर मधली काकडी
मीठ लावून उकडलेल्या एदामामे(सोयाबीन्स)
यापैकी २-३ गोष्टी फ्रिजमधे तयार करून ठेवते. ऐनवेळेला डब्यात भरायला बरे पडते.

फळे: कोणत्याही सिझनल फळाचे तुकडे. चेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, पीच,पेअर, अ‍ॅपल, कॅण्टलूप, मेलन, किवी, अननस, ग्रेप्स
बहुधा सकाळी स्नॅक्सला दिलेल्या फळाचे तुकडे थोडे डब्याला वापरते किंवा मग चेरी, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ड्राय मँगो असे वापरते.

खेरीज बरोबर एक दह्याचा/ताकाचा/ज्यूसचा/याकुल्टचा पॅक सिझनप्रमाणे असतो.क्वचित कधी तरी जेलो, कुकी,चॉकलेट अशी ट्रीट पण Wink

माझा मुलगा फार वेळ घराबाहेर नसतो म्हणजे ८ ते ४:३०. पण तो खूप खेळतो (स्विमिंग, कराटे, रनिंग आणि क्रिकेट) त्यामुळे एकूणच मला त्याच्या खाणाकडे जरा लक्ष ठेवावे लागते. कारण माझा डोळा चुकवून जन्माला आल्यासारखा एकदम हाडका आहे :-)
हे सगळे दिसत खूप असले तरी सगळ्याची क्वांटीटी फार नसते त्यामुळे १०-१५ मिनिटात संपते सगळे. आवडीचे असल्याने पटकन संपून खेळायला पण वेळ मिळतो.लंच नीट होत आहे हे होम रूम टीचर बघते. इंटरनॅशनल स्कूल असल्याने डब्यात काय द्यायचे याचे नियम नाहीत. काहीही चालते.
मुलगा सायकलनेच शाळेला जातो, डबा मोठा दिसत असला तरी बंद केला की नीट कॉम्पॅक्ट होऊन स्कूलबॅगमधे बसतो. दुसरी वेगळी बॅग त्याला पण कॅरी करायला आवडत नाही.
नीट तयारी असेल तर सकाळी हा डबा बनवायला मला २०-२५ मिनिटे लागतात. काही कारणाने मला जमणार नसेल तर मी मुळीच एखाद्या दिवशी हेल्दी डब्याचा अट्टाहस करत नाही. तेव्हा मग कॅफेटेरियामधे, जवळच्या कव्हिनियन्स स्टोअर मधे तो लंच घेतो.

आणि एवढे सगळे करूनही मला पण अमूक अमूक ची आई कसले ऑस्सम चिकन बनवते किंवा राईसबॉल्स बनवते किंवा तू मला सारखे तेच तेच डब्यात देतेस त्याने बोअर होते हे ऐकायला मिळतेच :-)

(सर्व चित्रे इंतरनेटवरून घेतली आहेत. प्रताधिकार कायद्याने इथल्या नियमांत बसत नसतील तर काढून टाकेन. मी केलेले डब्याचे फोटो माझे आहेत आणि जुन्या जपानी डब्यांची छायाचित्रे माझ्या ऑफिसच्या आर्काईव्ह्ज मधून परवानगी घेऊन टाकली आहेत.)

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle