कॅरट-वॉलनट केक

मी फारसे बेकिंग करत नाही. पण काही ठराविक गोष्टी मात्र वर्षानुवर्ष करत आले आहे. केक मधे कॅरट केक, बनाना ब्रेड, कॉफी मार्बल केक आणि चॉकलेट केक हे त्यापैकी काही. अजिबात काही फॅन्सी नसलेले, साधे सोपे केक अहेत हे. आयसिंग/फ्रॉस्ट काही सुद्धा नसते या माझ्या केक्स वर. त्यातलाच एक कॅरट वॉलनट केक परवा केला होता. त्याची ही कृती.

साहित्य:

(मेजरिंग कप वापरा)
१ कप ऑल पर्पज फ्लावर अर्थात मैदा (पूर्ण गव्हाचा केला आहे पण थोडा गच्च होतो. मी इथे मूळ रेसिपी देत आहे)
१ कप साखर (इथली थोडी बारिक आणि अगोड असते साखर. भारतातली कदाचित पाऊण कप पुरे होईल. मला अती गोड केक आवडत नाही.)
२ अंडी ( मी L साईझची वापरली. अंड्याला माझ्याकडे पर्याय नाही. मी एगलेस बेकिंग करू शकत नाही.)
१ कप भरून गाजराचा कीस
३/४ कप कुकिंग ऑइल (अधिक टीपा पहा)
१ टेबलस्पून तुकडे करून हलके रोस्ट केलेले आक्रोड
१ टीस्पून दालचिनी पावडर
१ टीस्पून बेकिंग पावडर
१ टीस्पून बेकिंग सोडा

कृती

नेहेमीचीच केक ची कृती
१) अवन २०० डिग्री सेल्सिअस ला प्रीहिट करत ठेवायचा
२) मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, आणि दालचिनी पूड एकदा एकत्र चाळून घ्यायची
३) अंडी हलकी फेटून घ्यायची. दालचिनी असल्याने अंड्याचा वास येत नाही पण हवाच असेल तर १/२ टीस्पून व्हॅनिला इसेन्स घातला तरी चालेल.
४) त्यातच तेल घालून परत बीट करायचे(इलेक्ट्रीक किंवा साधा हँड बीटर चालेल. फक्त सगळे नीट मिक्स करायचे आहे.)
५)यात साखर घालून परत बीट करायचे.
६) त्यातच गाजराचा कीस आणि आक्रोड घालून परत सगळे मिश्रण नीट ढवळून घ्यायचे.
६) सर्वात शेवटी मैदा आणि बेकिंग पावडर वगैरेचे मिश्रण घालून नीट एकत्र करायचे. क्रीमी कन्स्टिस्टन्सी आली पाहिजे.
७) केक मोल्डला बटर/ऑइल लावून त्याला पार्चमेंट पेपर ने लाईन करून घ्यायचे म्हणजे केक सहज सुटून येतो आणि मोल्ड घासायला पण सोपा जातो.
८) त्यामधे वरचे मिश्रण ओतून, प्रीहिटेड अवन मधे १७० डिग्री वर साधारण ३० मिनिटे बेक करायचे.
९) सुरी वगैरे केकच्या मध्यभागी २-३ ठिकाणी खुपसून बघून झाला का याची खात्री करावी. केक पूर्ण गार होऊन द्यावा आणि तुकडे करावेत.
१०) गाजर असल्याने बाहेर लवकर खराब होतो. शक्यतो फ्रीज मधे ठेवून खाताना मायक्रोमधे १० सेकंद गरम करून खावा.

अधिक टीपा
१) मी अनेकवेळा हा केक केला आहे. बटर वापवून पण केल आहे पण यात कुकिंग ऑईलच चांगले लागते. बटर नक्कीच वापरू शकता वाईट लागत नाही. ऑइल ने छान मॉइस्ट केक होतो. कोणतेही बिनवासाचे ऑइल वापरू शकता. कनोला, राईसब्रॅन, सॅलड ऑइल वगैरे रिफाईंड ऑइल्स चालतील. ऑलिव्ह ऑइल, तीळाचे तेल, मोहोरीचे तेल, खोबरेल तेल इत्यादी आपल्या जबाबदारीवर वापरावीत.

२) हा केक नुसता खायला पण छान लागतो. पण हलका गरम करून व्हॅनिला आयस्क्रीमच्या स्कूपबरोबर पण मस्त लागतो. आधी करून ठेवला तर ऐनवेळी चांगले डिझर्ट होते.

३) या केकचा थिक स्लाईस विथ क्रीम चीज फ्रॉस्ट हे कॉम्बो केवळ उच्च लागते पण कष्ट आणि कॅलरीज फार वाढतात.

४) याच मिश्रणाचे कपकेक्स पण चांगले होतात. बेकिंगचा वेळ कमी लागतो.

५) आक्रोड आवडत नसतील तर वगळले तरी चालतात. आक्रोडाऐवजी रेझिन्स पण छान लागतात.

६) एकूणच ही रेसिपी फार गुणी आहे. चुकण्याचे चान्सेस फार कमी. अगदे झोपेत केली तरी छानच होते.

हा फोटू
CakePic.jpg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle