ट्रेकिंगची हौस

नऊ - दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या कंपनीत आमचा एक ट्रेक करणारा ग्रुप होता. पुण्याच्या आसपास छोटे मोठे ट्रेक करायचो. कधी सकाळी जाऊन संध्याकाळी परत तर कधी मुक्कामी. फार भारी वाटायचं. कुठंही ट्रेकला जाताना नवीन कोणी सोबत येत असेल तर त्याला काय काय सोबत घ्यायचं , काय करायचं , कसं वागायचं याच्या असंख्य सुचना आम्ही द्यायचो. ट्रेकिंग म्हणजे 'अपने बायें हात का खेल'' असं झालं होतं. अशातचं एका मित्राने बातमी आणली कि नाशिक जवळ कुठेतरी दहा पंधरा दिवसांनी एक ट्रेकिंगची स्पर्धा होणार आहे. स्त्री, पुरुष आणि मिश्र अश्या तीन गटांत स्पर्धा होणार होत्या. मग काय आमची ग्रुप जुळवा जुळवीची तयारी सुरु झाली. एक एक जण काहीतरी कारण देऊन सटकु लागला. शेवटी फक्त दोन मुलं आणि मी असे तिघेच उरलो. त्यामुळे मिश्र गटाचा असा आमचा ग्रुप ठरला. रोज सकाळी उठुन दोन किमी पळायचं संध्याकाळी जवळच्या टेकडीवर जायचं असा ट्रेनिंग प्लॅन ठरला.
मी पळायला जायला तसा आळसचं केला. सकाळी वाटायचं संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर पळायला जाऊ आणि संध्याकाळी घरी आल्यावर काही ना काही कारण निघून राहून जायचं. तसं नाही म्हणायला दोन - तीन वेळा जवळच्या टेकडीवर जाणं झालं. तेच माझं ट्रेनिंग. बाकी दोघे मला सांगत होते कि ते रोज पळायला जातायेत. माझ्यामुळे ग्रुप मागे नको पडायला असे वाटुन मी पण मग एक दोन दिवस गेले पळायला. जास्त वेळचं नव्हता हातात. आज पळायला जाऊ उद्या पळायला जाऊ करता करता स्पर्धा उद्यावर येऊन ठेपली होती.
स्पर्धा नाशिक जवळ होती आणि रविवारी सकाळी लवकर सुरु होणार होती त्यामुळे आम्ही आदल्या दिवशीच नाशकात जाऊन राहिलो. दुसऱ्या दिवशी सात वाजता आयोजकांनी सांगितलेल्या ठिकाणी पोचलो. तिथून एक बस आम्हाला स्पर्धा जिथे सुरु होणार तिथे घेऊन जाणार होती. बसमध्ये आमच्या सारखेच इतर ग्रुप होते. त्यांच्याकडे बघून आम्ही कोण कोण आपल्याला 'कांटे कि टक्कर' देऊ शकतात याची चर्चा करु लगलो. आता थोडं दडपणही जाणवायला लागलं होतं. पण आम्ही आपले १००% देऊन स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला.
शेवटी एकदाचा तो स्पर्धा सुरु झाली असे जाहीर करणारा क्षण आला. आयोजकांनी शिट्टी वाजवली आणि एक एक ग्रुप पुढे सरसावू लागला. त्या बसने आम्हाला एका घाटात मध्येच सोडले होते. तो घाट उतरून आम्हाला आधी बसगड नावाच्या गडावर जायचे होते. त्यानंतर मध्ये थोडं जंगल आणि नदी पार करून हरगड नावाचा दुसरा गड सर करायचा होता. तो स्पर्धेतला शेवटचा टप्पा असणार होता. एका कागदावर स्पर्धेचा साधारण मार्ग दर्शवणारा नकाशा आम्हाला दिला होता. तोच आता आमचा मार्गदर्शक होता.
नियमांनुसार स्पर्धेच्या मार्गावर टाईम कंट्रोल (टिसी) आणि पॅसेज कंट्रोल (पीसी) असे दोन प्रकारचे थांबे अधून मधून असणार होते. आमच्याकडे एक कार्ड देण्यात आले होते. प्रत्येक थांब्यावर आमच्या कार्डावर शिक्के मारण्यात येणार होते. पीसी तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गानेच जात आहात कि नाही ते तपासण्यासाठी आणि टाईम कंट्रोल तुमच्या ग्रुपची एकंदर वेळ नोंदवण्यासाठी होते. साधारण ८ वाजता स्पर्धा सुरु झाली. उत्साहाने आम्ही जवळपास पळतच तो घाट उतरला. बराच वेळ डांबरी रस्त्यावरून चालत पळत गेल्यावर एकदाचा पहिला टिसी थांबा आला. इथं पर्यंत पोचे पर्यंत आम्ही थोडे थकलो होतो. काही ग्रुप आमच्या पुढे होते तर काही मागे. अजुनही मिश्र गटात चुरस होती. खुल्या गटात मात्र एक गट विशेष लक्षवेधक ठरला होता. ही तीन मुले स्पर्धेच्या सुरुवाती पासून पळतच होती ती कधीच आम्हाला चालताना दिसली नाही. टाईम कंट्रोल थांब्यावरही सगळ्यात आधी तेच पोहोचले होते. या थांब्यानंतर मात्र डांबरी रस्ता सोडून जंगलातली वाट सुरु होत होती. आम्ही इथपर्यंत पोचायला दोन तास घेतले होते.
इथून पुढे बसगडाची चढाई करायची होती. आम्ही दिलेल्या नकाशाच्या आधारे मार्गक्रमण करत होतो. मध्ये एक दोन पीसी लागले आम्ही तिथे अजून गडमाथा किती लांब आहे याची चौकशी केली. पण अजून थोडं पुढे जा एक दोन टेकड्यांनंतर पोचालचं तिथे असे त्यांनी सांगितले. पुढच्या एक दोन टेकड्या म्हणजे जणुकाही एक दोन गडचं होते. त्यासंपेपर्यंत आमचा उत्साह बराच मावळला होता. आम्हाला तिघांना एका गतीने चढणे अवघड होत होते. मी चढताना सारखीच थांबत होते आणि त्यामुळे आमचा वेग मंदावला होता. कसही करुन गडमाथा गाठू आणि मग उतरताना जरा वेगात उतरू म्हणजे जे काही स्पर्धक आपल्या पुढे असतील त्यांना गाठता येईल अशी आमची खलबते चालू होती. अधून मधून तिघांच्याही पायात गोळे येत होते आणि मग आम्ही थांबुन पाणी पी ग्लुकॉन-डी खा असे करत पुढे जात होतो. वेळ भर दुपारची असली तरी वाटेवर बरीचशी झाडी असल्यामुळे उन्हाचा एवढा त्रास होत नव्हता. गडावर पोहोचण्याच्या थोडं खाली एक अतिशय चिंचोळी आणि धोकादायक वाट होती. एका बाजूला खडा काताळ आणि एका बाजूला खोल दरी. सावधपणे आम्ही तो टप्पा पार पाडला. ती पळणारी मुले गड उतरुन खाली येत होती. अजुनही ती पळतच होती. आम्हाला बघून थांबली. त्यांच्याकडुन कळालं कि ते पोलीस भरतीची तयारी करत होते आणि रोज १० किमी पळण्याचा त्यांचा सराव खूप दिवसांपासून चालू होता. पोचाल गडावर ५ -१० मिनिटात असा धीर आम्हाला देऊन ते पुन्हा पळायला लागले. आम्हाला तेव्हढं अंतर पार करायला अर्धा तास लागला. शेवटी गडावर पोचलो. टीसी थांब्यावर शिक्का मारून घेताना कळालं की पुढच्या टीसीला आम्ही २ पर्यंत नाही पोचलो तर आमचा ग्रुप स्पर्धेतून बाद होईल. ते ऐकून सगळं बळ एकवटून आम्ही गड उतरायच्या मागे लागलो. आता उतरणीवर तर सटसट खाली येऊ असं वाटलं होतं पण कसचं काय आमच्या ग्रुप लीडरला उतरताना पायात बरेच गोळे येऊ लागले. त्यामुळे त्याची चाल खूपच मंदावली होती. गडमाथ्यावर आम्ही एक वाजता होतो. गड चढायला जरी आम्हाला तीन तास लागले होते तरी आपण एका तासात गड उतरून सहज पुढच्या टीसी थांब्यावर दोन पर्यंत पोचू असे आम्हाला वाटले होते. प्रत्यक्षात दोन वाजता आम्ही त्या थांब्या पासून फारच लांब होतो. जसे दोन वाजून गेले तसे आधी हळहळ आणि नंतर दडपणातून सुटका अश्या विचित्र मनस्थितीतून आम्ही गेलो. आता आपण स्पर्धेतून बाद झालो आहे तेव्हा जाऊ निवांत. आता घाई करायची काही गरज नाही असं आम्हाला वाटलं. कसे बसे तीन वाजता आम्ही त्या पुढच्या टिसी थांब्यावर पोचलो. आम्ही स्पर्धेतून बाद झालोच होतो पण आमच्या सारखेच खुल्या आणि मिश्र गटातले एक दोन ग्रुप तिथे होते जे आमच्या सोबत बाद झाले होते. सर्वानुमते आता हरगडाला जायची काही गरज नाही असे ठरले.
मग आता इथून लवकर बाहेर पडू म्हणुन जवळ नाशिकला जायला वाहन कुठे मिळेल याची चौकशी केली. तर हाय रे कर्मा तिथून अजून आठेक किलोमिटर चालून गेल्यावर एका पाड्याजवळ एसटी थांबा आहे आणि संध्याकाळी सहा ला तिथे नाशिकला जाणारी शेवटची बस येते असं कळालं. मग पुन्हा फरफट सुरु झाली. पण आता आमच्या सोबत बाकीचे ग्रुपवालेही होते. दिवसाच्या सुरुवातीला एकमेकांकडे स्पर्धक म्हणुन बघणारे आम्ही आता सहप्रवासी झालो होतो. त्यांचीही अवस्था आमच्या ग्रुपपेक्षा वेगळी नव्हती कोणी गड घाईत उतरताना पायाला लागून घेतलं होतं तर कोणाच्या पायाला चालून चालून फोड आले होते. सगळेच धीम्या गतीने एकमेकांना धीर देत चाललो होतो. हरगड जरी सगळ्यांनी टाळला होता तरी एक नदी आमच्या वाटेत आम्हाला ओलांडावीच लागणार होती. नदीत जास्त नाही पण गुडघाभर तरी पाणि होते. शूज ओले होऊ नये म्हणुन सगळ्यांनी ते हातात घेतले आणि त्यामुळे नदीतले गोटे टोकदार दगड लागून पायांना अजून जखमा झाल्या. पण सांगता कोणाला ? सगळे अर्जुन झाले होते. त्या पक्षाच्या डोळ्यासारखी आम्हाला ती सहाची एसटीच फक्त दिसत होती. आमची नऊ जणांची फौज क्षणभरच विश्रांती घेऊन पुन्हा चालायला लागली. एकमेकांना आधार देत 'साथी हात बढाना' सारखी गाणी म्हणत आम्ही चाललो होतो.
स्पर्धेच्या मार्गातून बाहेर पडुन आम्ही हा वेगळाच मार्ग घेतला होता त्यामुळे मध्ये टिसी ,पीसी नव्हते. त्यामुळे अंतराचा अंदाज येत नव्हता. जरी सांगणारा आठ किमी वर बसथांबा आहे म्हणाला होता तरी तो नक्की तेव्हढ्याच अंतरावर असेल याची काही खात्री नव्हती. एव्हाना साडेचार वाजून गेले होते आणि आम्ही एका कच्च्या रस्त्याला लागलो होतो. विशेष म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला स्पर्धक आणि आयोजक सोडून दुसरा एकही माणूस दिसला नव्हता. त्यामुळे कोणाला रस्ता बरोबर आहे कि नाही हे विचारण्याचा प्रश्नचं नव्हता . आम्ही जो दिसेल तो रस्ता पकडून चाललो होतो. सुदैवाने अजून थोडावेळ चालाल्यावर एक आदिवासी पाडा लागला. त्यातल्या एकाशी बोलून कळाले कि आम्ही बरोबर रस्त्यावर आहोत आणि अजून अर्धा एक तास चाललो कि पोचू बस थांब्यावर. ऐकून हुश्श वाटलं. चालायला हुरूप आला. आपण वेळेत गाडी पकडणार अशी अशा वाटायला लागली. त्यामुळे कि काय आमची पाऊले त्यातल्या त्यात झपाझप पडू लागली.
आता थोडं अंधारून पण यायला लागलं होतं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झाला होता. रस्ता चढणीचा होता त्यामुळे सगळ्यांचा वेगही मंदावला होता. कोणीतरी पुढं जाऊन बस दिसली तर तिला थांबवावं असं सगळे म्हणत होते. पण पुढे जाणर कोण सगळेच लंगडे घोडे झाले होते. चढण संपेपर्यंत सहा वाजत आले होते. चढण पार केल्या केल्या आम्ही उभे होतो त्या उताराच्या खाली आम्हाला पडीक असा एसटी चा थांबा दिसल्या. सगळ्यांनी हुर्रे च्या आरोळ्या ठोकल्या. तेवढ्यात लांबून एसटी सुद्धा येताना दिसली. अरे देवा! आम्हाला अजून तो उतार उतरून त्या थांब्या पर्यंत पोहोचायला आमच्या गतीने पाचेक मिनिटं तरी नक्की लागणार होती. आता तो एसटीवाला नक्की आपल्याला सोडून जाणार म्हणून सगळे निराश झाले , दुसर्‍याच क्षणी उतारता उतरता कोणीतरी जोर जोरात ओरडायला सुरुवात केली. सगळ्यांनी मग त्याचं अनुकरण करत ओरडणे आणि हातवारे सुरु केले. त्यावेळी आम्ही किती दीनवाणे दिसलो असू ते त्या एसटी ड्रायवरलाच माहित. आमचा आरडाओरडा कामाला आला होता. ड्रायवर चक्क आमची वाट बघत थांबला होता. गाडीपाशी पोहोचून आम्ही त्याला असंख्य धन्यवाद दिले. त्याच्या चेहऱ्यावर 'त्यात काय एवढं?' असे भाव होते. अर्थात त्याला आमची फरफट माहित नव्हती म्हणून.
सगळेच एवढे थकून गेलो होतो कि तिकिटे काढून झाल्या झाल्या कधी डोळे मिटले ते कळालं हि नाही. नाशिक बस स्टँड वर उतरताना पाय अक्षरश: मणा-मणाचे झाले होते. कसेबसे पाय फरफटत एका बस मधून उतरून दुसऱ्या पुण्याला जाणाऱ्या बस मध्ये चढलो. पहाटे कधीतरी आपापल्या घरी पोहोचलो. पेन किलर खाऊन मी झोपून गेले. दुपारी लंच नंतर जाऊ ऑफिसला असा विचार करून जरा उशीराचाच गजर लावला. सकाळी मैत्रिण जाताना हलवून गेली तिला पण लंच च्या वेळी फोन करून मी उठल्याची खात्री कर असं सांगुन मी परत झोपले. दुपारी तिचा फोन आला तरी मी झोपलेलेच होते. बापरे आता उठावं म्हणुन उठायला गेले तर एक सणसणीत कळ पायातून मस्तकात गेली. मला स्वत:च्या जोरावर पाय इकडून तिकडेही करता येत नव्हते. आता आपल्याला परत चालता येईल कि नाही या विचाराने मला रडू यायला लागलं. पण थोड्याच वेळात स्वत:ला सावरून मी हाताच्या आधाराने उठून बसले. पाय भयानक दुखत होते. पण थोडे थोडे हलवता येत होते. संध्याकाळी मैत्रिणीच्या आधाराने डॉक्टरकडे जाऊन आले. कोणतीही शारीरिक तयारी न करता अतिश्रम केल्याने आणि स्नायुंच्या डी-हायड्रेशन मुळे असे झाल्याचे त्यांनी मला सांगितले. मला याची थोडीफार कल्पना होतीच पण एवढा भयानक त्रास होईल असे वाटले नव्हते. तिथेच दृढ निश्चय केला कि इथून पुढे कोणताही ट्रेक किंवा असल्या स्पर्धा पुर्ण तयारीशिवाय करणार नाही आणि पुढच्या मोठ्या ट्रेकच्या तयारीसाठी मनात मनोरे रचायला सुरुवात केली.
*********************************************************************************************************************************
लेख मासिक श्री व सौ'च्या जानेवारी १६ अंकात आणि इतरत्र पूर्वप्रसिद्ध

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle