मध्यंतरी विजया बाईंचं " झिम्मा" वाचून संपवलं. एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारं. आपल्या नेहेमीच्या, चार-चौघांच्या आयुष्यापेक्षा निराळं, एका वेगळ्या स्तरावरच्या अनुभुतींनी आपल्याला भारावून सोडतं हे पुस्तक. पुस्तक वाचत असताना ठायी-ठायी मनात येत रहातं.. एका वेगळ्या, आवडीने निवडलेल्या क्षेत्रात पार गरूड भरारी घेण्याची, त्यात सर्वोत्तम ते करून दाखवण्याची संधी मिळण्याची, त्या संधीचं सोनं करून दाखवण्याची आणि ते करताना आयुष्याला पुरतील असे उत्कट अनुभव पदराशी जमा होण्याची संधी किती लोकांना मिळते? विजयाबाई ह्या त्यातील एक!!
ही आत्मकथा आहे, बाईंच्या धडाडीची, प्रयोगशील वृत्तीची - कुठल्याही आवर्तनात गुंतून न पडता वेगवेगळे मार्ग चोखाळून बघण्याची, वेगवेगळी आव्हानं पेलून ती यशस्वी करून दाखवण्याची! विजू जयवंत - विजया खोटे - विजया मेहता - असा वैयक्तिक आयुष्याच्या मांडलेल्या प्रवासाबरोबर - त्यांच्या क्षेत्रात - नाट्यक्षेत्रात, त्यांनी केलेल्या निरनिराळ्या सर्जनशील प्रयोगांचा हा आलेख! त्यांच्या शब्दात सांगायचं तर 'द मॅजिक ऑफ थिएटर' - त्या अक्षरशः स्वतः जगल्या. त्यांनी म्हटल्याप्रमाणे "नाट्यकलेतून उभे रहाणारे क्षण विलक्षण असतात. श्वास घ्यायला जेवढा वेळ लागतो, तेवढ्या अवधीत ते वेचायचे, पकडायचे असतात, नाहीतर ते विरून जातात - विजयाबाईं आयुष्यात देखील हे तत्व जगल्या. मिळालेली प्रत्येक संधी हेरून तिचं सोनं करून दाखवलं. हे पुस्तक म्हणजे त्यांच्या 'झिंगाट' आयुष्याचा प्रवास आहे आणि तो वाचताना आपण वाचकही 'झिंगून' जातो!
बाईंच्या अफाट प्रवासाची सुरुवात होते ती, कॉलेजमधील छोट्या- मोठ्या नाटकांनी. त्यात आपली छाप पाडून लवकरच त्यांना मुंबई मराठी साहित्य संघाचे 'ऑथेल्लो' चे मराठी नाटक - झुंजारराव यात काम मिळते. केवळ आठ दिवसांच्या तालमीवर त्यांनी उभ्या केलेल्या कमळजाचं (डेस्डीमोना) अफाट कौतुक होतं. याच काळात बाईंना त्यांचे आयुष्यभराचे गुरू लाभले. त्यांचा वर्गमित्र - शिनॉय व विख्यात दिग्दर्शक इब्राहिम अल्काझी! या पहिल्या-वहिल्या गुरूंकडून मिळालेल्या काही शिकवणी त्यांनी आयुष्यभर उराशी बाळगल्या. उदा. Love the art in you, not yourself in the art.
यानंतर बाईंच्या आयुष्याने एक वेगळं, फार महत्वाचं वळण घेतलं. अल्कांझींच्या थिएटर युनिटमध्ये बाई वर्षभर प्रशिक्षणासाठी जाऊ लागल्या. आधीचं मराठं-मोळं मुंबई मराठी साहित्य संघाचं विश्व ते थिएटर युनिटचं अमराठी विश्व - बाईंच्या शब्दात - "कलाविश्वातील वेगवेगळी वलयं एकमेकांत मिसळून गेली आणि त्यांचं व्यक्तीमत्व संपन्न झालं; रंगभूमीचं एक सुजाण, समृद्ध भान त्यांना १८ वर्षाच्या कोवळ्या वयात मिळालं. यानंतर त्यांनी प्रशिक्षन घेतलेल्या संस्थेतून Indian Academy Of Dramatic arts मधून त्यांना अजून दोन महत्वाचे गुरू लाभले - अदी मर्झबान व दुर्गाबाई खोटे. मर्झबान यांच्याकडून बाईंनी केवळ अभिनयच नाही तर दिग्दर्शनाचे धडेही गिरवले. याच काळात बाईंनी अनेक नाटकं व नाट्यविषयक पुस्तकं वाचली - ज्याचा त्यांना पुढे फार उपयोग झाला.
यानंतर 'श्रीमंत', 'शितू' यासारखी नाटके करताना त्या body image बद्दल जो खोलवर विचार करीत त्याचं वर्णन बाईंनी केलं आहे. "रंगभूमीवर एखादी भूमिका जिवन्तपणे ऊभी करायची असेल तर कलावंताला स्वतःचं शरीर-मन आणि नाटककारानं रेखाटलेल्या पात्राचं शरीर-मन यांच्यातलं नातं नेमकेपणे शोधावं लागतं. अभिनय हा परकायाप्रवेश असतो. पात्र म्हणून प्रेक्षकांना आपण कसे दिसत असू याचा विचार करायचा आणि त्यावर विश्वास ठेवायचा" - याला बाई बॉडी इमेज म्हणतात.
दुर्गाबाईंनी विजयाबाईंना अभिनयाबरोबरच दिग्दर्शनाकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यानुसार वयाच्या २१व्या वर्षी, विजय तेंडुलकरांच्या 'श्रीमंत' या नाटकाच्या दिग्दर्शनाने त्यांनी सुरुवात केली. या त्यांच्या पहिल्या नाटकापासूनच विजयाबाई नाटकाचा सेट, एकंदर आखणी याचा किती मूळातून, खोलवर विचार करत असत ते दिसून येतं. याच काळात तेंडुलकरांनी त्यांना बाई म्हणायला सुरुवात केली आणि ती पदवी त्यांना आयुष्यभराकरीता चिकटली. तेंडुलकर आणि बाई यांचा जो स्नेह या काळात जमला, तो पुढे अनेक वर्ष टिकून राहिला. ॑
हा काळ बाईंकरीता मोठा उभरता होता. या काळात विजयाबाईंची ओळख पुलंशी झाली, श्रीमंत नाटकातून जमलेल्या मैत्रांबरोबर निरनिराळे उत्तम देश-विदेशी चित्रपट- नाटकं बघणे, उत्तम मैफिली ऐकणे, अमेरिकन- युरोपिअन नाटके वाचणे, त्यावर मंथन करणे - अश्या अनेक गोष्टींमधून बाई घडत होत्या, फुलत गेल्या.
पु लंच्या पहिल्या-वहिल्या नाटकात 'तुझे आहे तुझपाशी' बाईंनी काम केले आणि त्यानंतर 'सुंदर मी होणार', 'वार्यावरची वरात'. त्याकाळातल्या पुल घेत असलेल्या तालमी,तालमींनंतरची मौज याचे बाईंनी सुंदर वर्णन केले आहे. पुलंच्या एकंदरीत आपल्याला माहिती असलेल्या प्रतिमेला अनुसरूनच - त्यांच्या तालमी म्हणजे धम्माल! बाईंच्या इतक्या तरुण वयात पुल आणि सुनिताबाईंचा सहवास त्यांना भरभरून लाभला.
पुढे बाईंनी 'रंगायन' या प्रायोगिकतेवर भर देणार्या नाट्यसंस्थेची स्थापना केली.जागतिक रंगभूमीवर गाजलेल्या कलाकृती आपल्या प्रेक्षकांकरीता सादर करणे, अनेक आगळे-वेगळे - सूजनशील प्रयोग सादर करणे असे अनेक प्रयोग रंगायनने केले. 'नाट्यकलेची प्रयोगशाळा' असं रंगायनचे वर्णन त्या करतात. नाटक हा रंगायनचा मूळ हेतू असला तरी संगीत, चित्रपट, चित्रकला आणि साहित्य याचा परामर्श घेणारे अनेक कार्यक्रम रंगायनने सादर केले. काही खूप यशस्वी, काही साफ पडलेले, काही आपल्या प्रेक्षकांना न झेपलेले तर काही या मातीत रुजू न शकलेले! अनेक स्नेही या काळात बाईंनी जोडले तर काही सुहृद गमावले. काही दिग्गज, मान्यवरांशी तात्विक वाद झाले. पण या सर्वांतून काही ना काही शिकत गेलेल्या, अनुभवसंपन्न होत गेलेल्या विजयाबाई आपल्याला गवसत जातात.
याच काळात बाईंच्या आयुष्यात झालेली उलथापालथ - अवघ्या तिशीत अचानक आलेले वैधव्य, नविन आयुष्याची परत एकदा सुरुवात, याकाळात त्यांच्या आयुष्यात आलेले ताण- तणाव या सार्यांचं बाईंनी थोडक्यात परामर्श घेतला आहे. फरोख मेहता या त्यांच्या नविन पतीने त्यांना आणि त्यांच्या पहिल्या लग्नातून झालेल्या दोन मुलांना स्वतःच्या आयुष्यात सामावून घेतले.
फारुख मेहता यांच्या कामानिमित्त इंग्लंडला २ वर्षाकरीता जाण्याची संधी बाईंना मिळाली आणि त्यांनी त्याचं अक्षरशः सोनं केलं. तिथली नाट्यशिबीरं, बघितलेली असंख्य नाटकं यातून त्यांच्या जाणीवा अजूनच विस्तारत गेल्या. या नाट्यशिक्षणातील मुख्य सूत्र - कलावंताचं मन अधिक संवेदनाक्षम-सजग कसं होईल हे बघणे, त्याची निरीक्षणशक्ती वाढावी म्हणून कलाकारांकडून वेगवेगळे रियाझ करवून घेणं - हे सर्व बाईंनी पुढे त्यांच्या दिग्दर्शनात वापरलं.
'रंगायन' ही प्रयोगशील संस्था काही वर्ष चालवल्यावर मग मग बाई आणि त्यातले इतर दिग्गज (विजय तेंडुलकर) यांच्यात मदभेद वगैरे होऊन रंगायनची फाटाफूट झाल्यावर बाई व्यवसायिक नाट्यभूमीकडे वळल्या. इथून त्यांच्या आंतरराष्ट्रीय घोडेदौडीला सुरुवात झाली ती पुढील २० वर्षे अव्याहत चालू होती. 'बेनेव्हिटझ' ह्या जर्मन दिग्दर्शकाबरोबर गाठ पडल्यावर जर्मन लेखक व नाटककार 'ब्रेश्त' याच्या 'कॉकेशिअन चॉल्क सर्कल' या नाटकाचा 'अजब न्याय वर्तुळाचा' हे मराठीकरण केवळ भारतातच नाही तर प्रत्यक्ष मूळ लेखकाच्या देशी पू. जर्मनीत सादर करण्याची संधी बाईंना मिळाली आणि केवळ सादरच नाही तर त्या तिथल्या प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवून आल्या.
तो संपूर्ण अनुभव वाचावा असा आहे. अंगावर काटे आणणारा अभुतपूर्व अनुभव - वारंवार झालेले कर्टन कॉल्स, थंपिंग ओव्हेशन! त्यानंतर असे अनेक अनुभव त्यांना आले. अनेक नाटकं त्यांनी पुढील २० वर्षांत जर्मनीत सादर केली. अनेक मराठी/ संस्कृत नाटकं जर्मनीत, काही वेळेला जर्मन कलाकारांना घेऊन बाईंनी केली. त्याकाळातले त्यांचे संपूर्ण कथन मूळातून वाचण्यासारखे आहे. प्रत्येक नाटकाकरीता केलेला अभ्यास, सादरीकरणाकरीता घेतलेली मेहेनत आणि त्याचं झालेलं चीज - हे सर्व वाचताना झपाटून जायला,अवाक व्हायला होतं.
जर्मनीतले प्रयोग व दिग्दर्शन यांना नीट न्याय देता यावा म्हणून पुढे बाईंनी नाट्यप्रयोगात काम करणं बंद केलं. त्या पूर्ण वेळ दिग्दर्शनाकडे वळल्या. दिग्दर्शक म्हणून काम करताना त्यां कलाकरांना वाक्य कसं बोलायचं, कसं चालायचं हे दाखवणे टाळत आल्या. तसं केल्याने कलाकाराची उपजत उर्जा झोकाळते असं त्यांचं ठाम मत! त्यामुळे तो शोध घेणं त्या कलाकारांवरच सोडत. त्यांच्या भारतात व जर्मनीत गाजलेल्या प्रयोगांचे त्यांनी वर्णन केले आहे, त्याचप्रमाणे पडलेल्या नाटकांची चिरफाड देखील त्यांनी केली आहे. एखादं नाटक तेवढं चाललं नाही तर त्याची कारणमिमांसा करणे, त्यातून धडा घेणे हेदेखील दिग्दर्शकाला आवश्यक आहे.
पुढे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा चे अध्यक्षपद, चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन, दूरदर्शन वर काही गाजलेल्या नाटकांचे सादरीकरण अश्या बर्याच वाटा त्यांनी जोखाळल्या. मूळात एखाद्या कामात तोच-तोचपणा जाणवू लागला की काहीतरी नविन प्रयोग करणे हा बाईंचा स्वभाव. ६-७ वर्ष दूरदर्शन वर मालिका सादर केल्यावर १९९३ साली त्यांनी एन. सी. पी. ए. च्या संचालकपदाची धुरा घेतली ते २०१० पर्यंत सांभाळली. जेआरडी टाटां व जमशेद भाभा यांनी बघितलेलं एन.सी.पी. ए. चं स्वप्न प्रत्यक्ष्यात साकार केलं - त्याची कथा बाईंनी सांगितल्ये - ती देखील भारावणारी आहे.
एकूणातच बाईंच्या या झिम्म्यात आपणही रंगून जातो. पुस्तक वाचून खाली ठेवताना एका भारावलेल्या जीवनाच्या झिम्म्याची गुंज आपल्याही कानात गुंजत रहाते. बाई त्यांची प्रत्येक भूमिका अक्षरशः जगल्या. जी गोष्ट करायची ती किती जीव ओतून करायची - हे बाईंकडे बघून शिकावे. आपल्या पिढीचं दुर्दैव असं की ही सारी नाटकं आपल्याला बहुतेक बघायला मिळाली नाही आहेत. आज ही मूळ नाटकं कुठे उपलब्ध आहेत याची कल्पना नाही. काही नाटकं नविन कलाकार घेऊन परत निर्मिली गेली. पण बाईंचं काम, दिग्दर्शन असलेली नाटकं कुठे मिळतील कोण जाणे!!
