माझी कैलास-मानस सरोवराची यात्रा भाग-७ (परिक्रमा महाकैलासाची)

दिनांक २३ जून २०११ (दारचेन ते डेरापूक)

7-01

आज आमची कैलास परिक्रमा सुरू होणार होती. परिक्रमा मार्गावर फोनची सोय नाही. त्यामुळे सगळ्यांनी घरी फोन करून आपापली खुशाली कळवली. परिक्रमा संपवून पुन्हा दारचेनला आलो, की नंतरच घरच्यांचा आवाज ऐकायला मिळणार होता. तीन दिवसांनी पुन्हा ह्याच कँपवर येणार होतो. त्यामुळे परिक्रमेच्या तीन दिवसाकरता लागेल तितकेच सामान लहान सॅकमध्ये घेतलं होत. बाकीचं सामान इथे दारचेनला ठेवलं होतं.

7-02.jpg

२०,२१,२२ जून तीन दिवस आराम झाला होता. आता परत चालायला सुरवात करायची होती. हे चालणं साधं-सरळ नव्हतं, खूप कठीण होतं. तीन दिवसांच्या आणि ५४ किलोमीटरच्या परिक्रमेला दारचेन ह्या १५५५० फुटांवर असलेल्या कँपपासून सुरवात होते. परिक्रमेचा पहिला मुक्काम २२ किलोमीटर दूर फुटांवरील डेरापुक ह्या ठिकाणी असतो. त्या जागेची समुद्रसपाटीपासून उंची १६३०० आहे.परिक्रमेतील सगळ्यात उंच ठिकाण म्हणजे ‘डोल्मा पास’ किंवा ‘पार्वती शीला’ १८६०० फुटांवर आहे. एव्हरेस्ट बेस कँपची उंची १७,६०० फूट आहे. म्हणजे आम्ही एव्हरेस्ट बेस कँपपेक्षाही जास्त उंची गाठणार होतो. दारचेनच्या आधीपासूनच कैलासपर्वताचे दर्शन व्हायला सुरवात होते.

7-03.jpg

दारचेन कँप गाठेपर्यंत आमच्या बॅचमधील सर्व यात्रींची तब्येत उत्तम होती. किरकोळ खरचटणे किंवा पायाला चालून-चालून फोड येणे ह्याव्यतिरिक्त कोणाला काही झाले नव्हते. आमच्या बॅचमध्ये दोन डॉक्टर होते. पण अजून त्यांना आपले कौशल्य दाखवायला काही संधी मिळत नव्हती. पण देवाला सगळ्यांची काळजी असते! दारचेनला आल्यापासून डॉक्टरांना भरपूर काम मिळायला लागलं. तकलाकोट कँपचं अस्वच्छ स्वयंपाकघर, गाठलेली उंची, विरळ हवा ह्या सगळ्या कारणांनी एक-एक भिडू गारद होऊ लागला. सगळ्यात पहिला मान आमचे चित्रकार तावडेजी ह्यांनी मिळवला. दारचेनला रात्री त्यांचं पोट भयानक दुखायला लागलं. सगळे काळजीत. डॉक्टर, एल.ओ.सर सगळ्यांची पळापळ. त्यांना खूपच त्रास होत होता. पण त्यांनी जिद्दीने परिक्रमेला येण्याचं ठरवलं. बाकीचे यात्री मदतीला होतेच. मलासुद्धा खूप अशक्तपणा जाणवत होता. अगदी थोडंसं अंतर चाललं, तरी भलामोठा डोंगर चढल्यासारखा थकवा येत होता. परिक्रमेचे ५७ किलोमीटर चालणं अशक्य वाटत होतं. जिथे घोड्यावर जाता येईल तिथे घोड्यावरून जायचं असं मी मनाशी ठरवून टाकलं. अती विरळ हवेचे फार भयानक परिणाम होऊ शकतात. तो धोका पत्करण्यात काही अर्थ नव्हता.

दारचेन कँपचा नियम असा होता, की खोलीच्या किल्ल्या हव्या असतील, तर १०० युवान डिपॉझिट ठेवायला लागणार होत. ‘कुठे एक रात्रीसाठी उपद्व्याप,’ असा विचार करून आम्ही काही किल्ल्या घेतल्या नव्हत्या. पण आमच्या नारंग सरांनी घेतल्या आणि रीतसर हरवल्या सुद्धा!! सरांची मजामजा चालली होती. पण अश्या त्यांच्या गमतीशीर वागण्यामुळे संपूर्ण यात्रेत ते आम्हाला आमच्यातलेच एक वाटले. सगळ्यांबरोबर गप्पा करणारे, फिरायला जाणारे, गोंधळ घालणारे! ते कोणीतरी मोठे ऑफिसर आणि आम्ही यात्री, अस वातावरण नव्हतं.

सकाळी कसली तरी संशयास्पद भाजी आणि पुऱ्या खाऊन आम्ही दारचेन कँप सोडला. कैलास परिक्रमा संपवून आम्ही इथे एक रात्र राहणार होतो. नंतर मानसची परिक्रमा करून तकलाकोटला परत जाणार होतो. बसमधून साधारण अर्धा-एक तास गेल्यावर ‘यमद्वार’ ही जागा आली. ह्या जागेपासून परिक्रमा सुरू होते. ह्याचा शब्दशः अर्थ ‘यमाचा दरवाजा’ असा होतो. इतर अनेक ठिकाणी दिसलेल्या तिबेटी-बौद्ध धर्मात महत्त्वाच्या असलेल्या पताका यमाद्वार येथेही होत्याच. त्या पताकांना ‘तारबोचे’ असा शब्द आहे. ह्या पताका उंच काठीवर असतात किंवा मग एका जागी सुरू होऊन लांबलचक पसरतात. त्यांचे रंग आणि क्रम ठरलेला असतो.निळा, पांढरा, लाल, हिरवा आणि पिवळा असे रंग ह्याच क्रमाने असतात. त्यांचा संदर्भ आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ह्या पंचमहाभूतांशी असतो.

7-04.jpg

यमद्वारला सर्व यात्रींनी प्रदक्षिणा घातल्या. थोडी पूजा-अर्चा झाली. इथून बस परत जाणार होती. आमचे दोन गाईड ‘तेम्पा’ आणि ‘डिंकी’ मात्र आमच्यासोबत होते.

7-05.jpg

तिथेच पोर्टर आणि पोनीवाले गोळा झाले होते. सगळ्यांना पोर्टर-पोनी मिळाल्यावर वाटचाल सुरू झाली. हवा अगदी स्वच्छ होती. आभाळ निळेभोर दिसत होते. डाव्या बाजूला लांछू नदी आणि उजव्या बाजूला कैलास पर्वताचे सतत दर्शन होत होते. लांबपर्यंत रस्ता दिसत होता.

7-05.jpg

7-06.jpg

माझी तब्येत ठीक नसल्याने मी घोड्यावर बसले होते. भारतातले आमचे पोर्टर-पोनीवाले फार आपुलकीने, प्रेमाने वागायचे. इथे तसं चित्र नव्हतं. एक तर भाषेचा मोठा अडसर होता. त्यातून एकूण मामला तीनच दिवसांचा. नंतर कोण तुम्ही कोण आम्ही? त्यामुळे पोर्टर-पोनीवाल्यांकडून घोड्यावर बसताना-उतरताना मदत न करणे, यात्रींना घोड्यावर बसायचं असेल तेव्हा गायब होणे, पाण्याची बाटली भरून आणायलाही नकार देणे, असले प्रकार वारंवार होत होते. चालताना घोड्यांची आपसात आपटा-आपटी झाली, तरी पोनीवाले थंड! ह्या सगळ्यात यात्रींची मात्र घाबरगुंडी व्हायची.

7-07.jpg

सगळा वाळूचा, दगडधोंड्यांचा प्रदेश होता. जागोजागी जुन्या बौद्ध गुहांचे भग्न अवशेष विखरून पडले होते. मोठ्या झाडांच्या अनुपस्थितीत सगळा भाग काहीसा वैराण, रुक्ष वाटत होता. आपल्या डोळ्यासमोर सृष्टीसौंदर्याची एक ठाशीव कल्पना असते. घनदाट झाडी, समृद्ध जंगल असं काहीही नसतानासुद्धा हा सगळा प्रदेश कल्पनातीत सुंदर होता. स्तब्ध, शांत सौंदर्य! प्रदूषण, धूर ह्या शब्दांचा अर्थही विसरायला होईल इतकी स्वच्छ हवा होती. त्या अनुभूतीच वर्णन शब्दात करणं, मला खरंच शक्य नाही. ती ज्याची त्याने अनुभवायची अशी गोष्ट आहे.

7-08.jpg

7-09.jpg

आजचा रस्ता ८ किलोमीटरचा होता. साधारण दोन-अडीच तासानंतर कँप दिसायला लागला. रस्त्यात एक छोटासा झरा होता. थोडं पाणी साठलं होतं. त्याच्या अलीकडे पोनीवाल्याने उतरवलं. तिथून कँपपर्यंत जेमतेम पंधरा मिनिटांचा रस्ता होता. तेवढाही मला जड झाला. पाय ओढत, धापा टाकत कशीतरी कँपपर्यंत पोचले. ह्या कँपपासून चार किलोमीटर गेल्यावर ‘चरणस्पर्श’ ही जागा आहे. कैलास पर्वताच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याची ही जागा. इथे पोनीवाले येत नाहीत. मला अजिबात चालण्याचे त्राण नव्हते. त्यामुळे जीवावर दगड ठेवून मी न जायचा निर्णय घेतला. आमच्यापैकी वीस लोक जाऊन आले. त्यांचे फोटो पाहून अजूनही काळजात एक कळ येतेच. पण त्या संध्याकाळपासून माझं पोट पारच बिघडलं. चरणस्पर्शला जाऊन कदाचित अजून त्रास झाला असता, अशी स्वतःची समजूत करून घेण्यापलीकडे आता काही करू शकत नाही. असो.

7-10.jpg

उद्या ह्या यात्रेतला सर्वात उंच भाग ‘डोल्मा पास’ किंवा ‘पार्वती शीला’ गाठायची होती. त्याची खूप काळजी वाटत होती. भरीत भर म्हणून पोटाच्या त्रासाने सारखं उठावं लागत होतं. अशी ती रात्र कशीबशी ढकलली.

दिनांक २४ जून २०११ (डेरापूक ते झोंगझेरबू)

पहाटे पहाटे आमचे पोर्टर-पोनीवाले आले. भाषा येत नसल्याने सगळा खाणाखुणांचा मामला! सगळे तिबेटी चेहरे सारखेच वाटतात, त्यामुळे पहाटेच्या अंधुक प्रकाशात धमाल उडाली होती. शेवटी यात्री आणि त्यांचे मदतनीस ह्यांची जुळवाजुळव होऊन सगळे मार्गस्थ झाले.

अजूनपर्यंतच्या यात्रेतील लीपूलेख खिंडीचा रस्ता सगळ्यात अवघड असे वाटत होते. पण डोल्मापास हा त्याहूनही कठीण असे अनुभवी यात्री सांगत होते. सगळ्या प्रवासातील उंच म्हणजे १८६०० फूट आणि सगळ्यात दूरचा पल्ला २५ किलोमीटर आज पार करायचा होता. त्यात भरीला भर म्हणून ह्या सर्व प्रदेशातील लहरी हवामानाचा प्रदेश म्हणूनदेखील ह्या डोल्मापासची ख्याती आहे. बघता बघता कधी हिमवादळ आणि हिमवर्षाव सुरू होईल ह्याचा काही नेम नसतो. अनेक भाविकांना ह्या लहरी वातावरणाचा फटका बसल्याने आपली परिक्रमा अर्धवट टाकून परत फिरावे लागल्याची अनंत उदाहरणे आहेत. रस्ता तर चालायला अवघड आहेच, त्यात विरळ हवा आणि वादळ-वाऱ्याची टांगती तलवार असल्याने सर्वात कठीण प्रवास समजला जातो.

7-11

कडाक्याची थंडी पडली होती. त्या प्रचंड थंडीत, बोचऱ्या वाऱ्यात कोणी पायी चालत तर कोणी घोड्यावर बसून मार्गस्थ झाले. चालणाऱ्या लोकांना थोडी ऊब तयार होते. घोड्यावर बसणारे मात्र काकडून जातात. थंडीने मग झोप येते, डोळे मिटायला लागतात. त्याच्यावर उपाय म्हणून सगळे ‘ॐ नमः शिवाय’चा जप करत राहतात. डोल्मापासचे उंचच उंच कडे पार करताना सगळ्यांची दमछाक होत होती. एकामागून एक डोंगर-दऱ्या आम्ही पार करत होतो. रस्ता काही संपत नव्हता. रस्ता अतिशय खडकाळ, डोंगराळ, उभ्या चढणीचा असल्याने श्वास फुलत होता. कापराचा वास घेत घेत श्वास काबूत आणायचा प्रयत्न सगळेच करत होते.

हवा आजही छान होती. त्याबाबतीत आम्ही अगदी नशीबवान होतो. यात्रा सुरू झाल्यापासून हवा बहुतेक दिवशी चांगली होती. रेनकोट वापरायची वेळ फारशी आली नव्हती.

7-12.jpg

पुण्यात फिरताना जिकडे तिकडे पर्वती दिसते, तसंच डोंगरांच्यामधून कैलास पर्वताचे दर्शन होत होते. परिक्रमेत सगळ्या बाजूंनी कैलास पर्वताचे दर्शन होते. अर्थातच ही कैलासाची प्रदक्षिणा असते. आपण त्यावर चढाई करत नाही. बऱ्याच वर्षांपूर्वी काही परदेशी गिर्यारोहकांनी हा पर्वत पादाक्रांत करायचा प्रयत्न केला होता. पण त्यांना त्यात यश आलं नाही. आता मात्र पर्वताचे पावित्र्य लक्षात घेऊन चीन सरकार त्यावर चढायची परवानगी नाकारते.

माझी तब्येत ठीक नव्हती, पोट पारच बिघडलं होत. विरळ हवेमुळे हा त्रास इथे बऱ्याच जणांना होतो. थंडी, अशक्तपणा आणि श्वास घेताना होणारा त्रास ह्याने मी अगदी मेटाकुटीला आले होते. मला माझ्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज येत होता. पाठीतून कळा येत होत्या. इच्छाशक्तीच्या जोरावरच मी आणि माझे सहयात्री चाललो होतो.

7-13

पुढे जाता जाता आजूबाजूला सर्वत्र जुन्या कपड्यांचा खच पडलेला दिसायला लागला. आपल्याकडील जुन्या वस्तू इथे टाकल्या की आपले दारिद्र्य इथे राहते आणि पुढील आयुष्यात आपल्याला समृद्धी येते असा तिबेटी लोकांचा समज आहे, त्यामुळे ते आपल्या वस्तू इथे टाकतात. कोणाच्या काय चालीरीती, समज असतील ते सांगता येत नाही. पण ह्या सगळ्यातून तिथले प्रदूषण, कचरा मात्र वाढतो आहे हे नक्की.

कैलास पर्वताच्या उत्तर भागाचे दर्शन होत होते. दिवस वर आल्यामुळे आता शिखर चांदीने मढवलेले वाटत होते. पुढे काही अंतर गेल्यावर डोंगरावर सर्वत्र लहान-मोठे दगड एका विशिष्ट आकारात रचलेले दिसत होते. बरोबरचे तिबेटी लोक तिथे प्रार्थना करत होते. तिथे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून, त्यांना सद्गती मिळावी अशी प्रार्थना केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते अशी समजूत असल्याचे कळले.

7-14.jpg

ह्या सगळ्या जागांना महाभारतातील संदर्भ आहेत अस म्हणतात. मी तिथे ऐकलेल्या गोष्टीप्रमाणे, सर्व पांडव द्रौपदीसह ह्या परिक्रमेसाठी आले होते. यमाद्वार येथे द्रौपदीचा मृत्यू झाला. भीमाने विचारले,’ ही का पडली?’ युधिष्ठिराने सांगितले,’ तिने मनापासून प्रेम फक्त धनंजयावर केले म्हणून. तू पुढे चल’. असे एक-एक पांडव कैलास परिक्रमेत मृत्यू पावले. उरला फक्त युधिष्ठिर आणि त्याच्या बरोबर सुरवातीपासून चालणारा कुत्रा. परमेश्वराने कुत्र्याला स्वर्गात येता येणार नाही, असे सांगितल्यावर धर्मराजाने एकट्याने स्वर्गात जायला नकार दिला. शेवटी दोघेही स्वर्गात पोचले.

7-15

लवकरच आम्ही डोल्मापासला पोचलो. त्या शीळेला असंख्य रंगीबेरंगी पताका लावल्या होत्या. तिथल्या निळ्याभोर आकाशाच्या पार्श्वभूमीवर त्या पताका, समोर दिसणारा पांढराशुभ्र कैलास पर्वत! ते सगळं दृश्य इतकं विलोभनीय होत, की अजूनही ते आठवून अंगावर रोमांच उभे राहतात. सर्व यात्रेकरू, तिबेटी लोक तिथे भक्तिभावाने प्रार्थना करत होते. आम्ही मराठी यात्रींनी मिळून तिथे ‘दुर्गे दुर्घट भारी, तुजविण संसारी’ ही आरती जोरात म्हणून मराठी आवाज घुमवला!

7-d

ती शिळा म्हणजे पार्वतीने शंकराला प्रसन्न करण्यासाठी जिथे बसून प्रार्थना केली होती, तेच स्थान. पूजाअर्चा झाल्यावर सगळे तिथे शांत बसले होते. पण अजून बराच पल्ला बाकी होता. तिथे हवा अत्यंत विरळ असल्याने आणि हवामानाचा भरवसा नसल्याने फार वेळ थांबणं धोक्याच होत. नारंग सर ज्यांची पूजा झाली, त्यांना पुढे पाठवत होते.

7-16

पुढचा रस्ता उताराचा होता. तो चालतच पार करायचा होता. इतक्या वळणांच्या, खडकाळ रस्त्यावर घोड्यावर बसणं, फार धोक्याच होतं. त्या उतरणीच्या रस्त्यावर पांढरा-वीस मिनिटे चालल्यावर एका दरीमध्ये पाचूसारख्या चमकत्या हिरव्यागार रंगाचे ‘गौरी कुंड’ दिसायला लागले. मी उभी होते, तिथून त्या दरीची खोली एक-दीड हजार फूट तरी असेल. आकाराने साधारण दोनेक किलोमीटरचा परिसर असेल. चारही बाजूंनी उंच, भव्य पर्वत होते. हे सरोवर उमेसाठी शंकराने निर्माण केले अशी आख्यायिका आहे.

7-17

सगळे यात्रेकरू गौरीकुंडाचे पाणी पवित्र तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात. पण तिथपर्यंत पोचण्याचा रस्ता खोल जाणारा, खडकाळ आणि वितळलेल्या बर्फामुळे अजूनच निसरडा झालेला होता. बरोबरचे पोर्टर-पोनीवाले पाच युआन घेऊन तीर्थ आणून देत होते. आमच्या बॅचमधले काही हौशी लोक आणि नारंग सर खाली उतरून गेले. बाकी आम्ही जनरल पब्लिक पुढे चालायला लागलो. उताराचा रस्ता असला तरी चांगलाच थकवा जाणवत होता. नदी काठाला कोरडा भाग बघून सगळे थांबले. जवळचा सुका मेवा, बिस्किटे असं थोडं खाऊन घेतल्यावर जरा तरतरी आली. थोडी विश्रांती आणि पोटात पडलेलं अन्न ह्यांनी जरा ताजेतवाने होऊन झोंगझेरबूकडे चालायला सुरवात केली.

7-18

7-19

थोड्याच वेळात पोनीवाले येऊन पोचले. घोड्यावर बसून आरामात इकडे तिकडे बघत सरळ-सपाट रस्त्यावरून जाऊ लागले. नदीच्या किनाऱ्याने, कधी खडकाळ पायवाट, कधी चिखल, कधी झरे असा रस्ता होता. चालताना कितीही जपलं तरी बूट ओले झालेच होते. पायांना संवेदनाच नव्हती. एका जागी दोन यात्री थांबले होते.

त्यांनी हात केल्यावर मीही त्यांच्याजवळ जाऊन बसले. सुरवातीचं, आता सवयीचं झालेलं 'ॐ नमः शिवाय' झाल्यावर त्यातले एकजण म्हणाले, 'कलसे देख रहा हुं, आप घोडेपे जा रहे हो, क्या हुआ? लीपूलेखतक तो आप अच्छेसे पैदल चल रहे थे?' मी तब्येतीचं कारण सांगितल्यावर ' अरे, सबका यही हाल हैI कोई नहीं, आप तो बडे बहादूर हो, अकेले इतनी दूर आये होI अभी हमारे साथ चलियेI' त्यांच्या ह्या आश्वासक बोलण्यावर खूष होऊन मी त्यांच्याबरोबर चालायला लागले. थोडं चालल्यावर त्यांनी 'महाराष्ट्रकी लेडीज तो झासी की रानीयाँ होती है, बडी बहादूर!' असं म्हणून मला फार म्हणजे फार म्हणजे फारच खूष केलं! त्या वाक्यावर मी उरलेलं अंतरही चालू शकले!

ह्याच रस्त्याने येताना आमच्या बॅचमधले ७० वर्षांचे कालरा अंकल घोड्यावरून चांगलेच जोरात पडले, अशी वाईट बातमी कँपवर पोचल्यावर पोचली. जवळचे यात्री, पोनीवाले सगळेच मदतीला धावले. तिघा-चौघांनी मिळून त्यांना परत घोड्यावर बसवलं. उत्साही, सर्वांशी मिळून-मिसळून वागणाऱ्या काकांची अवस्था केविलवाणी झाली होती. त्यांच्या कमरेला चांगलाच मार लागला होता. वेदनाशामक गोळ्या दिल्या, स्प्रे मारला.

असा हा आमचा अक्षरशः तोंडाला फेस आणणारा प्रवास दुपारी एकदाचा संपला.

दिनांक २५ जून २०११ (झोंगझेरबू ते दारचेन)

7-20.jpg

आधीच्या रात्रीसुद्धा मला पोटाचा त्रास होत होताच. माझ्यामुळे नंदिनी आणि इतर बरोबरच्या मैत्रिणींचीही वारंवार झोपमोड झाली होती. आजचा चालायचा रस्ता त्यामानाने सोपा होता. फार चढ-उताराचा नव्हता. अंतरही आठ किलोमीटरचेच होते. माझ्या तब्येतीमुळे तेही मला मोठे वाटत होते. त्यातल्या त्यात आनंदाचा भाग म्हणजे तेवढे आठ किलोमीटर पार केले की बसमध्ये बसून दारचेनला जायचं होत. पुढची मानसची परिक्रमा चालत करावी लागत नाही. थेटपर्यंत बस जाते. थोडे दिवस विश्रांती मिळाली असती.

7-21.jpg

7-22.jpg

झोंगझेरबू हे पूर्वी तिबेटी संस्कृतीचे मोठे माहेरघर होते. पण कालच्या वाटचालीत सगळीकडे उद्ध्वस्त अवशेष दिसत होते. कदाचित काही वर्षांपूर्वी इथे लेणी, गुंफा, मंदिरे असतीलही. आज मात्र फक्त भग्नावशेष, माती, दगड दिसत होते. कँपच्या आसपास असलेल्या डोंगरांवर सुरेख निळसर झाक होती. ह्या कँपचा परिसर अतिशय सुंदर होता. मोठा सपाट मैदानी प्रदेश, त्यातला लांबवर दृष्टीस पडणारा रस्ता आणि सोबत नदीचा प्रवाह. हा सगळा प्रवास फार आल्हाददायक होता. डोल्मापास पार करण्याचा ताण संपला होता. बॅचमधल्या पन्नासही यात्रींची परिक्रमा नीट पार पडली अश्या समाधानात मजा मस्ती करत सगळे चालले होते. दोनेक तासात आम्ही बसपाशी पोचलो. स्वप्नवत वाटणारी ही खडतर परिक्रमा पूर्ण झाल्याच्या आनंदाने बहुतेकांच्या डोळ्यात पाणी आलं होत. पंढरीच्या वारकऱ्यांसारखे सगळे एकमेकांच्या पाया पडत होते.

7-23.jpg

जरा वेळाने आम्ही बसमध्ये बसून दारचेनला रवाना झालो. दारचेनला हवा थोडी खराब होती. जवळच्या अष्टपद गुहा बघायला जायचं होतं. ‘हवा सुधारली तर ६-६ जणांना घेऊन जाऊ. तोपर्यंत आराम करा’ अस आमचा आता मित्रच झालेला गाईड ‘तेम्पा’ ह्याने सांगितलं. दुपारी चारच्या सुमारास हवा थोडी स्वच्छ झाली. लगेच आम्ही ६ जण जीपमध्ये बसून निघालो. रस्ता जेमतेमच होता. वाळू पसरली होती. वळण भयानक होती. आमचा चालक मात्र द्रुतगती मार्गावर असल्यासारखा जोरात गाडी चालवत होता. चाक पंक्चर होणे हा एक नेहमीचा यशस्वी कार्यक्रम पार पाडून आम्ही तासाभरात अष्टपदला पोचलो. तिथून कैलासाचे छान दर्शन होत होते. डोंगराच्या टोकाला परंपरागत तिबेटी पताका दिसत होत्या. इतक्या निसरड्या डोंगराच्या टोकाला पताका लावणाऱ्याच्या हिमतीला आणि दूरवरून दिसेल अशी जागा निवडणाऱ्याच्या सौदर्यदृष्टीला दाद द्यावीशी वाटली.

7-24.jpg

अष्टपद येथील गुंफा बौद्ध आणि जैन धर्मीयानं फार महत्त्वाच्या वाटतात. ह्या गुंफांमध्येच जैन धर्मातील पहिले तीर्थंकर आदिनाथ वृषभ देवांनी तपश्चर्या केली. इथेच त्यांना निर्वाणप्राप्ती झाल्याचा जैन ग्रंथात उल्लेख आहे, असं म्हणतात. नंदिनी आणि इतर जणांनी जवळचा एक छोटा डोंगर चढून कैलासाचे अजून जवळून दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मी आणि अजून एक यात्री तिथेच बसून राहिलो. त्या अती उंचीवरच्या गुंफांजवळ शांत वाटत होत. आपल्या मनातल्या विचारांचा आवाजही गोंगाटासारखा वाटत होता. इथल्या ह्या नीरव शांततेची मला आता चटक लागली होती.

7-26

7-25

हळूहळू पुन्हा ढग आले. हवा खराब होऊ लागली. सगळे आल्यावर जीपमध्ये बसून आम्ही परत दारचेनला आलो. घरी फोन करून परिक्रमा नीटपणे पूर्ण झाल्याची बातमी दिली. दुसऱ्या दिवशी उठायची घाई नव्हती. बारा तास झोपता येईल, ह्या सुखद विचारात सगळे यात्री आपापल्या खोल्यांत गुडुप झाले! सगळे स्वप्नात बहुधा माझ्यासारखीच मानसच्या परिक्रमेची स्वप्न बघत असतील!!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle