अनोखी वेल (कथा)

अनोखी वेल (कथा)
(पूर्वप्रकाशित)

नेहमीप्रमाणेच मनू वर्गाबाहेर दिसणार्‍या झाडावरील वेलीला न्याहाळत होती. मधल्या सुट्टीत अशीच स्वतःच्या बाकावर बसून ती समोर दिसणार्या त्या वेलीकडे बघत राही.हा छंदच जडला होता तिला. झाडाच्या मजबूत बुंध्याला बिलगून , त्याच्या आधारे त्या वेलीचं जीवन किती आश्वस्त झालं होतं! बघता बघता बहरत, फुलत ती वेल आता चांगलीच फोफावली होती. उंच उंच पोहोचली होती. शाळा सुटली तरीही तिच्या मनातून त्या वेलीचे विचार जाता जाईनात. मी पण अशीच आहे ना? या वेलीसारखी? कुणाच्या तरी आश्रयाने जगणारी? तिच्या डोळ्यांपुढे ते गावचं घर आलं. दुसर्याच्या शेतात मोलमजुरी करणारे आई-वडील आणि तिच्यामागची दोन भावंडं. कितीही ढोर मेहनत केली तरी हातातोंडाशी गाठ पडणं मुश्कील अशी परिस्थिती. अठरा विश्वं दारिद्र्य पाचवीला पुजलेलं. नाही म्हणायला तालुक्याच्या शहरात राहणारी आत्या हा एक मोठा दिलासा होता मनूचा.

आत्या माहेरी आली की भरपूर खाऊ आणि कपडेलत्ते घेऊन येत असे. खाऊन पिऊन सुखी होतं आत्याचं सासर. आत्याचा मुलगा कपिल तिच्याहुन दोन वर्षांनी मोठा. त्याच्याशी खेळायला भारी गंमत वाटायची तिला. नाहीतर इथे आपलं कायम धाकल्या भावंडांना सांभाळा. मनू दिसायला नीटस आणि चुणचुणीत, हुशार.आत्याचाही भारी जीव होता भाचीवर. आत्या माहेराला आली की मनू कायम आत्याच्या मागे भुणभुण लावत असे की मलाही तुझ्यासंगं घेऊन चल. मी तिथे तुझ्या घरी राहीन. कपिलच्या बरोबर शाळेत जाईन. सुट्टीत आत्या मनूला नेतही असे तिच्यासह तिच्या चाळीच्या दोन खोल्यांच्या घरी. गावच्या हलाखीच्या जगण्यापेक्षा हे इथलं जीवन मनूला भुरळ घालत होतं. त्यामुळेच ती त्या चाळीतल्या अंधार्‍या खोल्यांत अगदी आनंदाने राहत असे.बघतां बघतां मनू सातवी पास झाली, पहिलीच आली होती वर्गात. पण यापुढे तिला शिकवण्यापेक्षा आपल्याबरोबर मजूरीवर नेलं तर चार पैसे सुटतील असा विचार तिचे आई-बाप करु लागले. घराकडे आणि धाकल्या भावाकडे लक्ष द्यायला मधली आली होतीच हाताशी. मनूच्या हे कानावर पडताच पोर बिथरलीच मात्र. मला शिकायचं आहे अजुन , मी मजूरीवर येणार नाही, यावर ठाम राहिली ती. आई-बापांनी परोपरीने समजावलं की तू शिकुन किती एव्हढी शिकणार आहेस? आपल्या गावात तर पुढे शाळाही नाही. पण मनूने मनाशी पक्कं ठरवलं होतं की आत्याकडे जाऊन पुढे शिकायचंच. आत्याला तसं पत्रही पाठवलं तिने. पत्र वाचून मात्र आत्याने तिच्या सासू-सासर्‍यांचा, यजमानांचा कल पाहिला. एक मुलगी काही जड नव्हती त्यांना. मॅट्रीक झाली तरी मोलमजूरी करावी लागणार नाही, लहानशी नोकरी तरी मिळेल तोपर्यंत तीन वर्षे राहील आपल्याकडे असा विचार करुन आत्या, भावाला आणि वहिनीला समजावून मनूला घेऊन आली. इथे येताच तिला आठवी इयत्तेत शाळेत प्रवेश घेऊन दिला आत्याने. भारी खूश होती मनू. तिचं शिकण्याचं स्वप्न साकार होत होतं. त्या वेलीच्या निमित्ताने तिला सारा घटनाक्रम आठवला.

हुशार तर मनू होतीच. त्यामुळे शाळेत चमक दाखवत होतीच ती, शिवाय घरकामातही आत्याला,तिच्या सासूला जमेल तशी मदत करत होती. अशी हुशार, मनमिळावू, कामसू मुलगी आपली नातसून व्हावी हा विचार आजीबाईंच्या मनी वरचेवर डोकावू लागला. कपिल तर मनूचा सवंगडी. आता तर एका घरात, एका शाळेत होते. आजी आडून आडून त्या दोघांचा जोडा कसा शोभून दिसतो वगैरे सुचित करायची. मनू मात्र खुदकन हसून तिथून काढता पाय घेत असे.

एक दिवस मनू अशीच वर्गात बसून तिच्या आवडत्या वेलीला न्याहाळत होती आणि अचानकच तिला जाणवले की आपल्याला कोणीतरी न्याहाळतंय. तिने इतस्ततः नजर फिरवताच तिच्या लक्षात आलं, तो श्रेयस बर्वे होता, तिच्याच वर्गात शिकणारा. त्याला असं टक लावून आपल्याकडे पाहतांना बघून मनू एकदम बावचळली आणि पटकन वर्गाबाहेर आली निघून. पण हे असं रोजचंच होऊ लागलं. रोज मनू वेलीला निरखत असे आणि श्रेयस लांबून तिला. अधे-मधे श्रेयस काहीतरी कारण काढून तिच्याशी बोलायचा, ओळख वाढवायचा प्रयत्न करत असे. पण मनू मात्र त्याला अजिबात भाव देत नव्हती. जेवढ्यास तेव्हढं बोलून ती वेळ मारुन नेई. ती बरी आणि तिचा अभ्यास बरा. दिवस सरत होते. बघतां बघतां आठवीचं वर्ष सरत आलं.

परीक्षा संपली त्या दिवशी श्रेयसने सर्व वर्गमित्रांना घरी बोलावले होते. मनूलाही त्याने आमंत्रण दिले होते. सर्वांच्या आग्रहामुळे मनू श्रेयसच्या घरी जायला तयार झाली, अर्थात आत्याची परवानगी घेऊनच. घर कसलं? राजवाडाच जणू. मनूसाठी तर असं इतक्या खोल्या, अंगण, बाग, गच्ची, असलेलं घर स्वप्नवत होतं. श्रेयसच्या आई-वडीलांसह सारे नोकर-चाकर त्या सर्वांना काय हवं नको ते बघत होते.सर्वांनी खूप मज्जा केली त्या दिवशी श्रेयसकडे. श्रेयसच्या ड्रायव्हर काकांनी मग सर्वांना घरी सोडलं. रात्री झोपतांना मनूच्या डोळ्यांसमोर फक्त त्या घरातली दॄश्येच येत होती. दुसर्या दिवसापासून दोन महिने शाळेला सुट्टी होती. सुट्टीत मनू गावी गेली. पण शहरी वातावरणात रुळलेल्या मनूला आता गावी चैन पडेना. त्यातही मधल्या सुट्टीची वेळ झाली की मनूच्या डोळ्यांसमोर ती आवडती वेल तरळून जायची आणि त्या वेलीला निरखत असतांना हळूच चोर पावलांनी श्रेयसचा चेहरा मनःपटलावर यायचा. हळू हळू तर ती वेल आणि श्रेयस हे समीकरणच फिट्ट झालं तिच्या डोक्यांत.मनू घरातही गप्प गप्प राहू लागली. ती एकटीच स्वतःच्या विचारांच्या तंद्रीत बसून असे...हरवल्यागत. होतां होतां दोन महिने सरले. कपिल तिला पुन्हा न्यायला आला होता. त्याच्यासह परत जातांनाही ती अबोलच होती. बालपणीच्या सवंगड्याशीही बोलावेसे वाटत नव्हते तिला आता.

नववीचे वर्ष सुरु झाले.उत्साहात तयार होऊन मनू शाळेत गेली. सार्‍या मैत्रिणी एकमेकींना भेटत होत्या. गप्पा मारत होत्या. पण मनूची नजर मात्र 'त्याला' शोधत भिरभिरत होती. काही वेळातच त्याची गाडी आवारात प्रवेशली आणि ती पाहतांच मनू इतकी खूश झाली की तिच्या सर्व मैत्रिणींच्या ते ध्यानात आलं. श्रेयस प्रसन्नपणे हसत तिच्या समोरुन गेला आणि त्याला पाहताच मनू मोहरुन गेली.दोनच महिन्यांपूर्वी ज्याच्या सावलीलाही मनू उभी राहत नव्हती त्याची ती आता वाट बघू लागली, त्याच्या आठवणींत दोन महिने तिने झुरत काढले. स्वतःतलं हे परिवर्तन तिलाही जाणवत होतं, पण जे घडत होतं ते थोपवणं काही तिच्या हाती नव्हतं.
यापुढे सुरु झाला एक गोड प्रवास. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतांना एकमेकांबद्द्ल वाटत असलेली ओढ, हळुवार फुलत जाणारं प्रेम, ते चोरटे कटाक्ष, मित्र-मैत्रिणींना भुलथापा देऊन दोघांचंच भेटणं...सगळं कसं अलवार, हवंहवंसं, मखमली. या सर्व प्रवासादरम्यान मनूचं स्वतःच्या अभ्यासावरचं लक्ष मात्र जराही विचलीत झालं नाही, हे विशेष. ती श्रेयसलाही आपण अभ्यास करुन स्वतःला सिद्ध केलं पाहिजे हेच वारंवार सांगत होती. श्रेयस तिला कित्येकदा आपल्या घरी घेऊन जात असे. मनूची श्रेयसच्या घरच्यांशीही ओळख वाढत होती आणि त्याच्या आई-वडीलांना लेकाची ही ‘खास मैत्रीण’ तिच्या रुपा-गुणांमुळे, हुशारीमुळे आवडू लागली होती. तिच्या आर्थिक परिस्थितीची पूर्ण कल्पना असल्यामुळे श्रेयसचे आई-बाबा तिचा स्वाभिमान दुखावणार नाही अशा प्रकारे तिला मदत करीत होते.

दहावीच्या वर्षी तिच्या आत्याला भेटून, त्यांची परवानगी घेऊन श्रेयसच्या आईने मनूला श्रेयसबरोबरच कोचिंग क्लासला अ‍ॅडमिशन घेऊन दिली. "तुला जे काही पुस्तक, गाईड, क्लास हवा असेल ते नि:संकोचपणे मला सांग,पण अभ्यासाबाबतीत हयगय नको", हे श्रेयसच्या आईने तिला बजावले.

दोघांनीही खूप मेहनत घेतली या वर्षी आणि परिणामतः दोघेही उत्तम प्रकारे दहावी झाले. श्रेयसला त्याच्या वडीलांचा केमिकल्सचा व्यवसाय सांभाळायचा असल्यामुळे त्याला अभियांत्रिकी शिक्षणच घ्यायचे होते आणि मनू.... तिला तर आत्याने तीन वर्षांसाठीच आपल्याकडे आणले होते. मॅट्रीक झाल्यावर नोकरी करुन संसाराला हातभार लावण्यासाठी. यावेळी श्रेयसच्या आईने पुन्हा मध्यस्थी केली. सोन्यासारखी हुशार मुलगी आहे, तिला शिकु द्या. मी तिचा सर्व खर्च करेन हे आश्वासन तिने आत्याला दिले. मनूच्या पालकांना भेटण्याची, त्यांचे मतपरिवर्तन करण्याचीही तयारी दाखवली त्यांनी.

एव्हाना मनूच्या आत्याला अंदाज येऊ लागला होता सर्व प्रकरणाचा. तिने मनूला स्पष्ट विचारलेदेखील श्रेयसबद्दल. मनूच्या डोळ्यांतून घळघळा आसवेच ओघळू लागली. आत्या व तिच्या सासूबाईंचा मानस तिला ठाऊक होता आणि ज्या आत्यामुळे ती मॅट्रीक होऊ शकली तिला नकार देण्याची मनूत हिंमत नव्हती. त्यामुळे ती केवळ आसवे गाळत राहिली, काहीही न बोलता. पण त्या अश्रूंनीच तिचे गूज सांगितले होते. वाईट वाटलं आत्याला पण आपल्या भाचीला आपल्या मुलापेक्षाही भारी स्थळ मिळतंय याचा आनंदही होता आणि तिने उदार मनाने परवानगी दिली, एव्हढंच नाही तर दादा-वहिनींना समक्ष भेटून हा सारा प्रकार त्यांच्या कानांवर घातला. एकंदर पोरीने नशीब काढलंय त्यामुळे निमूटपणे बर्वे कुटुंबाच्या ‘हो ला हो’ केलेलं बरं असा पवित्रा मनूच्या पालकांनी घेतला.
इतक्या सहजी सगळं मनाजोगं घडून येईल याची सुतराम शक्यता वाटत नव्हती मनू आणि श्रेयसला. पण हे घडलं होतं.

श्रेयसच्याबरोबरच मनूदेखील पुढील शिक्षणासाठी मुंबईला रवाना होणार होती तिच्या आवडत्या माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रात पदवी मिळवण्यासाठी. मनूच्या आई-बाबांनी दोघांचेही कॉलेज, हॉस्टेल अ‍ॅडमिशन करुन दिले. दोघांचेही पुढील शिक्षण जोमात सुरु झाले.
आता तर दोघेही एका शहरात. कॉलेज, हॉस्टेल्स वेगळी असली तरी भेटीगाठी होतच होत्या. दोघे एकमेकांना जास्त ओळखू लागले. श्रेयस एक अगदी साध्या स्वभावाचा, सरळ मनाचा मुलगा होता हे मनूला समजलं होत. सुट्टीत ती आता त्याच्यासह त्याच्याच घरी जात होती. होणारी सून, मुलगी म्हणून घरात राहत होती, वावरत होती.लाड करुन घेत होती.तिच्या सालस वागण्याने तिने सर्वांना आपलेसे केले. आत्याच्या घरी ती आता क्वचित पाहुण्यासारखी जाऊ लागली. कपिल मात्र खूप दुखावला गेला होता हा प्रकार पाहून. आजीने रंगवलेले स्वप्न डोळ्यांसमोर भंगलेले त्याला पहावत नव्हते. पण प्रवाहाबरोबर पुढे जाण्यावाचुन काही इलाज नव्हता त्याच्यापुढे. मॅट्रीक झाल्यावर त्याने आय टी आय चा कोर्स करुन एक नोकरीही मिळवली होती. तो आपलं स्वतःचं चौकटीतील आयुष्य जगत होता.

बघतां बघतां पाच वर्षे सरली. मनू पदवीधर झाली. तिच्या कॉलेजनेच आयोजित केलेल्या कँपस इंटर्व्युसाठी ती सहज म्हणून गेली आणि एका नामांकीत सॉफ्टवेअर कंपनीतील मुलाखत घेण्यासाठी आलेल्या मनिष शहा या मॅनेजरला काही क्षणांतच मनूमधील ‘स्पार्क’ जाणवला. त्याच्या सर्व प्रश्नांना मनूने समाधानकारक उत्तरे दिली आणि चक्क त्या कंपनीने तिला नोकरीसाठी ऑफर लेटरच दिले. आनंदातिशयाने तिने श्रेयसला भेटायला बोलावले आणि तो येताच ही खूशखबर त्याला दिली. तो तर अवाकच झाला. मनू अशी इंटर्व्युसाठी जाणार आहे याबद्दल त्याला कल्पनाच नव्हती. शिक्षण पूर्ण करुन दोघांनीही घरचा व्यवसाय सांभाळायचा, फार तर मनूने घरबसल्या काही प्रोजेक्टस वगैरे घ्यायची असेच तर सर्वानुमते ठरले होते. त्यामुळे मनू अशी तडकाफडकी मुलाखत देऊन येते काय आणि तिला नोकरीची ऑफर मिळते काय हा धक्काच होता श्रेयससाठी. पण मनूने त्याला समजावले की त्याच्याइतकंच तिलाही हे अनपेक्षित होतं. सहज म्हणून मुलाखतीचा अनुभव तरी घेऊ असा विचार करुन ती मैत्रिणीसह गेली आणि तिची निवड झाली. मात्र आता हाती आलेल्या या संधीचं वर्षभरात सोनं करावं असं तिला वाटत होतं. नाहीतरी श्रेयस असणारच होता तिच्यासह मुंबईत. त्याचे हे शेवटचे वर्ष होते. मग हे एक वर्ष मनू मुंबईतच राहून नोकरी करेल आणि श्रेयसची परीक्षा झाली की दोघेही गावी परत जातील लग्न करायला असे त्यांनी आपापसात ठरवले. श्रेयसनेच हे आईबाबांनाही समजावून सांगावे अशी इच्छा तिने व्यक्त केली. दोघांनी ठरवलंय म्हटल्यावर आई-बाबांनीही होकार दिलाच. मनू आता कमावती झाली, लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती तिला. तिच्या आई-बाबांचे कष्ट आता कमी होणार होते.

हे वर्ष दोघांसाठीही महत्वाचं होतं. श्रेयसचं शेवटचं डिग्रीचं म्हणून आणि मनूचं नोकरीचं पहिलं वर्ष म्हणून. दोघांनीही जीवतोड मेहनत घेतली आपापल्या क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी. साहजिकच त्यांच्या भेटीगाठीही कमी होत होत्या. मनू, मनिष शहा साहेबांची असिस्टंट म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे काम शिकून घेत होती.

श्रेयसचा शेवटचा पेपर झाला त्या दिवशी संध्याकाळी दोघं भेटणार होते. दोघांच्या नव्या आयुष्याची आता सुरुवात होणार होती.मनू ठरल्या वेळी आली. श्रेयसचा चेहरा तिला पाहतांच खुलला, त्याने आनंदातिशयाने तिला मिठीत घेतले. पण...मनू मात्र काहीशी उदास, चिंताग्रस्त दिसत होती. त्याने कारण विचारले असतां तिने विशेष काही नाही असे सांगितले. “नोकरी सोडायची म्हणून उदास झालीस होय?” असं श्रेयस बोलतांच तिने हसून वेळ मारुन नेली.

दुसर्‍या दिवशी दोघेही गावी परतले. आई-बाबांनी दोघांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. काही दिवसांतच हे घर ‘लग्नघर’ म्हणून गाजणार होतं त्याची ही नांदीच होती जणू. आईच्या उत्साहाला तर पारावार राहिला नाही. आपण मनूच्या आई-वडीलांना बोलवून लवकरात लवकरचा मुहुर्त काढुयात याचा धोषा लावला होता तिने. रात्री स्वहस्ते बनवलेलं पंचपक्वानांचं जेवण मुलांना खाऊ घालून सगळी गप्पा मारत दिवाणखान्यात बसली असता मनूने, “मला तुम्हा सर्वांशी काही बोलायचंय”, असं म्हणत विषयाला हात घातला. झालं होतं असं की नोकरीचा राजीनामा देऊन गावी जाऊन लग्न करणार असल्याचे तिने शहा साहेबांना सांगताच ते उडालेच. म्हणाले, "वेडी की खुळी तू? अगं ,पुढच्या महिन्यात एका प्रोजेक्टसाठी तुझी निवड झाली आहे, तीही ऑनसाईट अमेरिकेला, तीन महिन्यांसाठी. तेव्हा लग्न बिग्न आता तीन महिन्यांनंतर". मनूचे हे बोलणे ऐकताच तिघेही चपापले. काही क्षण शांततेत गेले.. मनूच मग धीर करुन बोलली, "श्रेयस, आई-बाबा, अहो तीन महिन्यांचाच तर प्रश्न आहे. आपण तर सहा वर्ष थांबलो. मग तीन महिने काय अस्से जातील निघून.पण माझ्या कार्यक्षेत्रातला हा ‘मैलाचा दगड’ पार केल्याचं समाधान मला तुमच्या संमतीमुळे मिळेल". आपल्या कर्तबगार सूनेचे हे बोलणे त्यांना पटले मात्र आणि होऊ घातलेलं लग्नघर बघता बघता भावी सुनेच्या अमेरिकावारीची तयारी करण्यात गुंतलं.

मनूच्या जाण्याचा दिवस उजाडला. तिला एअरपोर्टवर सोडायला श्रेयस, त्याचे आई-बाबा, तिचे आई-बाबा असे सारे आले. मनू भयंकर खुशीत होती. श्रेयस मात्र काहीसा उदास, तिच्या काळजीने अस्वस्थ होता. मनूवर लहानमोठ्या सुचनांचा सारेजण भडीमार करत होते. सर्वांना भेटून, आशिर्वाद घेऊन मनू सामानासहीत आत गेली. मागे वळून एकवार तिने सर्वांना पाहिले.हात हलवला आणि गर्र्कन फिरुन काचेच्या दाराआड दिसेनाशी झालीसुद्धा. आई-बाबांना अश्रु आवरणे कठीण गेले पण पोर दूर देशात प्रोजेक्टसाठी निवडली गेली होती ही अभिमानाची गोष्ट होती त्यांच्यासाठी.

मनूचे सिक्युरिटी चेक इन झाले. काही वेळातच फ्लाईटची घोषणा झाली.मनू विमानात आपल्या जागेवर स्थानापन्न झाली आणि तिने सुटकेचा नि:श्वास सोडला. सर्वप्रथम तिने तिचा मोबाईल बाहेर काढून श्रेयस आणि त्याचे आई- बाबा या तिघांचेही नंबर्स ब्लॉक करुन टाकले...... .

लहानपणापासून स्वतःच अंगी बाणवलेल्या तत्वांनुसारच हे तिचं वर्तन होतं . वेलीसारखी झाडाच्या अंगावर सरसर चढत असतांना झाडाला बिलगून राहणे तिला कधीच पटले नव्हते. तर झाडाचा फक्त शिडीसारखा वापर करायचा असतो हेच तिने आत्मसात केले होते. पुढची शिडी दॄष्टीपथात येताच आधीच्या शिडीचा अडसर दूर सारता आला पाहिजे हे तत्व होते तिचे. तिच्या नजरेसमोर आता पुढची शिडी तिला खुणावत होती ‘मनिष शहा’. केवळ तीन महिने नाही तर तीन वर्षांची ऑफर मनूने स्वीकारली होती. वेलीवर बागडणार्या फुलांसारखी ती हसत होती, अनेक शिड्यांना पायदळी तुडवून बेदरकारपणे…
विमानाने उड्डाण केले होते.

समाप्त

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle