सुगंधाचं मोरपीस : कृष्णा

त्या दिवशी आलासंच ना कृष्णा तळ्याकाठी फक्त माझ्यासाठी ? मी काही कुणी सर्वशृत , सुपरिचित गौळण नाही की कुणी नाही. एक साधी सर्वसामान्य गौळण मी. माझ्यासाठी आलास?

अन तुला कळलं कसं की माझ्या मनात काय आहे ते ? मी तर हळूच चांदण्यांच्या साक्षीने तळ्यातल्या कमळांना सांगितलं होतं. वाऱ्यावर अलवार डोलून त्यांनी मला ऐकल्याची पोच दिली होती.

कमळांनी हळूच वाऱ्याला सांगितलं आणि मग त्याने तुला निरोप धाडला का ? कसा ? की सगळ्या फुलांच्या अंतरंगातलं सौंदर्य म्हणजे तूच आहेस?

कसंही असो, चांदण्याने सांगो, कमळांनी कि भ्रमरांनी. तुला कळले आणि तू आलास. पिवळ्या रंगाचं भरजरी उत्तरीय आणि नीळरंगाचा आकाशासारखा तू आणि हाती पौर्णिमेच्या चंद्रासारखं फुललेलं शुभ्र कमलपुष्प. तुला हेही कळलंच ना कि मला शुभ्रपुष्प विशेष आवडतात. रिकाम्या हाती आला नाहीस पौर्णिमेचा चंद्र हाती घेऊन आलास.

हळूहळू बातमी पसरलीच मग. वाऱ्याला कळलं, आकाशी चंद्रताऱ्यांना कळलं. सभोवतीच्या कदंबवृक्षांना कळलं. आजूबाजूला डुलणाऱ्या लता-वेली-पुष्पांना कळलं, तळ्यातल्या लाटांच्या नाजूक नक्षीलाही कळलं. तू आलास. आणि ते मोरपीस एक काय लावतोस ते ? तुझे स्वतःचे रंग कमी आहेत की काय श्रीरंगा म्हणून आणिक मोरपिसाचे रंग घेऊन येतोस ?

आणि बासरी घेऊन आलास ! ते तर मला अपेक्षितच होतं. बासरीमधून विश्व साकार होतं म्हणतात. तू तर काय , तोंडात आईला विश्वरूपदर्शन घडविणारा. धन्य आहेस !! आणि मग विश्वरुपाला आईचं दर्शन झालं कि आईला विश्वरुपाचं ? दोन्हीही तेवढीच तुल्यबळ दर्शनं. आईनी तरीही म्हटलं असेल. बरं एक ते असो. तोंड आधी बंद कर आणि जेवलायेस का ते सांग. भूक लागल्याचं कळत नाही तुला. काय माझ्या मनातले असे वेडेवाकडे विचार वाचतोयेस आणि मंद हसतोयेस. तुझ्यापासून कुठली एक गोष्ट लपत नाही. आणि सगळ्यांच्या मनीचे सारेकाही कळले तर 'मंदस्मित' की काय ते असणारंच. नाही का ? असं आहे होय !

अलगद बासरी हातात धरलीस तू. तळ्याकाठी वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलास. तळ्यात मांडलेला चंद्रताऱ्यांचा खेळ बघत. आणि त्यावर डोलणारी कमलपुष्प. मी थबकले जरा जागीच. तू माझ्याकरता आला होतास माझी झोळी भरलेली होती. माझं मागणं तुझ्यापर्यंत पोहोचलं होतं. तुझ्या डोळ्यांतून ते मला पोचलं होतं.

एक, एकच सुरावट ऐकायची होती तुझ्या बासरीतून. हळूच मुरली ओठांवर टेकवलीस आणि विश्वसंगीतंच तुझ्या बासरीवर विराजमान झालं. एक सुरावट छेडलीस आणि मी दुसऱ्या जगात गेले. तिथे फक्त तुझे सूर होते, ज्यांत तू होतास. आणि मी. तिथेच रास रंगला. सुंदर सुरांना दर्दी कान कळतात आणि मग ते आणखी रंगू लागतात. भिनू लागतात. तसा हा रास रंगू लागला. किती ऐकू नी किती नाही. किती हळुवार आणि तरी किती जीवघेणे सूर. तुझ्या एका सुरावटीची मागणी होती माझी आणि हाती सहस्रचन्द्रिका येत होत्या. तळपत्या अलवार. किती वेचू? अन कुठे ठेवू. झोळी भरली ना माझी.

हाच रास असावा तुझा. तू खरंच रास खेळतोस का ? आणि त्यामध्ये किती 'तू' असतोस हा प्रश्नच होता मला. आता जरा कळल्यासारखं वाटतंय.

किती वेळ गेला कुणास ठाऊक. किती प्रहर लोटले कि फक्त काही क्षण. काहीही कल्पना नाही. जाग आली सुरांच्या गाभाऱ्यातून त्यावेळी तू तिथे नव्हतास. पण सुरावट अजूनही होती. जन्माचं दान देऊन गेलास मला. एका साधारण गौळणीला ? आता कसला ध्यास नाही की कसली आस नाही. आता मीच शुभ्रपुष्प झालेय. गाणारं , सुरावटींचं. आता सगळ्या शुभ्रपुष्पांतून सुरावट ऐकू येणार आणि त्यातून तू दिसणारेस कृष्णा. कर्णांनी चक्षुंशी संगनमत करून पुन्हा नेत्रांना दान दिलंय. सुरांचं.
आता शुभ्रपुष्प ऐकू येणारे
नेत्रांना सुरावट दिसणारे
आणि पुष्पगंध ? सुगंध ?
तो आता मीच झालेय .
आणि तसंही हे सगळं वेगळं असतं का ?
आता काही मागणं नाही.
भरभरून दिलंस.
कृष्णा, तू कदाचित गेला नाहीयेस इथून.
आला तरी होतास का?
की तू असतोसंच सदैव माझ्या साथीला ? पण जे घडलं ते सगळं खरं आणि आता जे वाटतंय तेही सगळं खरं.
मी भरून पावलेय. सुगंध झालेय.
मोरपिसांचे रंग , हलकेसे का होईना , कळलेत. पांघरलेत मी. आता कळलं मोरपीस का घालतोस ते. अस्सं आहे होय !!
सुरावटींच्या विश्वातला नादमधुर गंधमधुर रास कळलाय मला.
कृष्णा ..
मी सुगंधाचे मोरपीस झालेय !!

~ देवयानी गोडसे

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle