गावरान चिकन

साहित्य
चिकन अर्धा किलो
चार चमचे दही
कोरडा मसाला :
धणे पूड 3 चमचे
बडिशेप पूड 2 चमचे
तिखट 1 चमचा
गरम मसाला पूड 1 चमचा
मीठ एक चमचा

ओला मसाला:
आलं लसूण पेस्ट दोन चमचे
मोठे दोन कांदे उभे चिरुन
सुकं खोबरं किसून 4 चमचे

तेल

कृती :
चिकनचे मध्यम तुकडे करून ठेवणे.

कोरडा मसाला एकत्र करून त्यात चार चमचे दही घालून नीट मिक्स करून ठेवणे.
उभा चिरलेला कांदा कढईत घालून 2 चमचे तेल टाकून छान ब्राऊन होईल इतपत परता. तो मिक्सीत काढून घ्या. त्याच कढईत सुकं खोबरं लालसर परतून घ्या.  तेही मिक्सित घाला. आलंलसूण पेस्ट घाला. आता हे सगळं बारीक वाटून घ्या.

आता मोठ्या पातेल्यात 4 चमचे तेल टाका. त्यात दह्यात कालवलेला कोरडा मसाला टाका. तेल सुटे पर्यंत परता. मग दोन चमचे पाणी घालून पुन्हा परता.

आता त्यात ओले वाटण ( कांदाखोबऱ्याचे) घाला. पुन्हा भरपूर परता.

 तेल सुटू लागले की त्यात चिकनचे पिसेस टाका.

 दुसरीकडे चार वाट्या पाणी गरम करत ठेवा. चिकन पुन्हा सगळे छान परता. तेल सुटू लागलं पाहिजे.

आता गरम पाणी चिकनमधे घाला. रटरट उकळू लागलं की झाकण ठेऊन 15-20 मिनिटं शिजू द्या.
शेवटी कोथिंबीर चिरून घाला, एक उकळी आली की गॅस बंद करा.
तयार आहे गावरान चिकन!

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle