प्रतीक्षा आणि आगमन

माझी भारतवारी जवळ येऊन काऊंटडाऊन चालू झाला आणि हा ब्लॉगवरचा एक जुना लेख आठवला म्हणून इथेही आणला.

कुठल्याही विमानतळाचा आगमन कक्ष किंवा जवळपासचा परिसर. सगळेच आपापल्या धुंदीत आणि तरीही विमानाच्या वेळेकडे काटेकोर लक्ष. कुणी एकटेच, कुणी कुटुंबासोबत. कुणी अक्ख्या गावासोबत. कुणाच्या हातात स्वागताचे बोर्ड तर कुणाच्या हातात फुलं. सगळ्यांचे लक्ष फक्त आपली जवळची व्यक्ती कधी येतेय याकडे. कुणाच्या हातात नावांचे बोर्ड. एकदा या चार लोकांना यांच्या घरी यांना सोडले की माझे आजचे काम संपणार या विचारातले काही लोक. कुणाचा महिनाभराचा तर कुणाचा वर्षाचा विरह. पण सगळ्यात जास्त वाट बघायला लावणारी वेळ म्हणजे ही शेवटची काही मिनिटे. फोन, स्काइप, इमेल्स हे सगळे विमानात बसायच्या आधीपर्यंत चालूच असते. पण तरीही तेव्हापासून डोक्यातले विचार वेगळेच धावू लागतात. मन चिंती ते वैरी न चिंती म्हणत इमिग्रेशन, भाषेची अडचण, जास्तीचे सामान किंवा अजून कसला त्रास होणार नाही ना म्हणून वाट बघणाऱ्याला उगाचच तणाव असतो. जोवर ती व्यक्ती समोर दिसत नाही तोवर काही समाधान होत नाही. प्रत्येकाची वेगळी स्टोरी, वेगळी मनस्थिती.

हातात गुलाबाचे फुल घेऊन एक चिमुकली आपल्या आईसोबत बाबांची वाट बघत असते. दर दोन मिनिटांनी 'कधी येणार गं बाबा' म्हणत आईला प्रश्न विचारत असते. आईपण तेवढीच आतुरतेने वाट बघत असते पण 'येईल गं आत्ता दोन मिनिटात' म्हणत लेकीला धीर देत असते. 'मग तो माझ्यासाठी काय आणणार येताना' या प्रश्नाचे उत्तर पाच मिनिटात पंधरा वेळा देऊन आई थोडी वैतागते आणि परत एकदा घड्याळात बघते. 'तू त्याला हे फुल देणार ना आल्यावर?', 'आणि तो थकला असेल हां, त्रास द्यायचा नाही जास्त' म्हणून एकीकडे समजावणी करत असते. बास दोन मिनिट, एक मिनिट करत करत अखेर दुरून बाबा बाहेर येताना दिसतो आणि पिल्लू आनंदाने उड्या मारू लागते. बाबाच्या प्रवासाचा सगळा शीण, डोळ्यात असलेली झोप सगळे काही त्या दोघीना बघून पळून जाते आणि तो लेकीला उचलून कडेवर घेतो. कधीचे जपून लपवून ठेवलेले फुल बाबाला कौतुकाने देते. 'तू माझ्यासाठी तिकडून काय आणलेस बाबा' म्हणत त्याला भंडावून सोडते. आत्ता महिनाभरापूर्वी मी गेलो होतो आणि एवढ्यात पिल्लू किती मोठं झालंय अशा काहीशा विचारात बाबा लेकीला बघत असतो. हळूच डोळ्यातून आईशी पण संवाद करतो. त्या दोघांचे लाड बघून खुश होत आई पण त्याच्या कुशीत विसावते. बाबाशी किती बोलू, त्याला काय काय सांगू अशा पद्धतीने लेकीची बडबड सुरूच असते. शेवटी आता बाकीचं घरी जाऊन बोलूयात म्हणून तिघेही बाहेर पडतात आणि इतका वेळ मिनिटा मिनिटा कडे डोळे लावून असणाऱ्या त्या दोघीही बाबाच्या स्वागतात मग्न झालेल्या असतात.

लग्न झाल्यावर लगेच तो परदेशात आलेला असतो. नंतर काही दिवसांनी ती पण निघते. तिच्या येण्याची तारीख ठरते आणि 'बोर्डेड. सी यु सून' असा संदेश पाठवून ती निघते. विमानाच्या नियोजित वेळेच्या कितीतरी आधीच तो घरून निघतो. 'उगाच रस्त्यात काही प्रॉब्लेम झाला तर नको. त्यापेक्षा तिथे जाऊन थांबू' अशा सगळ्या एरवी तिच्या डोक्यातल्या शंका त्याच्या डोक्यात असतात. तो पोहोचतो तर अजून विमान उतरलेले पण नसते. तो सतत आपला त्या हॉलमध्ये येरझारा घालत असतो. प्रत्यक्ष लग्नाच्या दिवशी इतका बेभान नव्हतो मी, आज काय झालेय म्हणून त्यालाही आश्चर्य वाटत असतं. 'एखादी कॉफी घेऊयात तोवर' असे म्हणून वळतो आणि तेवढ्यात 'नको पण मग इकडे विमान आल्याचे कळणार नाही' म्हणून परत तिथेच थांबतो. विमान उतरतं, 'लँडेड' असे दिसताक्षणी अजूनच अस्वस्थ होतो. हातातला फुलांचा गुच्छ परत एकदा बघतो. 'तिला नक्की वाटत असणार की मी काही फुलं वगैरे आणणार नाही, बघतोच आता काय प्रतिक्रिया देतेय यावर ते' म्हणत स्वप्नात रंगतो. तिच्या पहिल्या भेटीपासून तर लग्नापर्यंतच्या अनेक आठवणीत गुंग होतो. हळूहळू लोक बाहेर पडताना दिसू लागतात. हे तिच्याच विमानातले लोक असणार म्हणून तो अगदी जवळ जाऊन उभा राहतो. प्रत्येक क्षण अजूनच उत्कंठा वाढवत असतो. बॅग येतील ना व्यवस्थित. इमिग्रेशनला काही अडचण तर येणार नाही ना? अशा सगळ्या शंकांना स्वतःच उत्तरे देत असतो. आणि सामान सावरत ती बाहेर येताना दिसते. इतक्या वेळ थांबवून ठेवलेल्या सगळ्या भावना तिच्या डोळ्यातून वाहू लागतात. तिचा तो आवेग ओसरला की मग त्याला फुलं द्यायला वेळ मिळतो. 'मला खात्री नव्हती पण आणलीस की तू फुलं वगैरे' असे हसून म्हणत आनंदाने ती ते स्वीकारते. 'सो, चला आता आपल्या घरी' म्हणत तो सामानाची गाडी ढकलतो आणि ती सोबतीने हातात हात धरून चालू लागते.

आई बाबा पहिल्यांदाच परदेशात मुलांकडे येणार असतात. 'तुम्ही बाहेर आलात की आम्ही दिसूच' असे सांगून त्यांना ते दोघेही धीर देत असतात. त्यांना अडचण येऊ नये म्हणून एक तास आधीच पोचतात. हज्जार सूचना दिल्यात खऱ्या, पण येतील ना व्यवस्थित ही काळजी काही मिटत नसते. नेहमी ही बाजू वेगळी असते खरं तर. काळजीवाहू आई बाबा असतात आणि मुलं आम्ही पोहोचू व्यवस्थित असा धीर देत असतात. पण तेव्हाची आई बाबांची परिस्थिती कशी होत असेल याचा त्यांना आत्ता अंदाज येतो. मागची आईबाबांची भेट, त्यांचा झालेला पासपोर्ट, व्हिसाच्या मुलाखती, त्यावेळचे प्रश्न सगळे काही आठवून लेक-सून किंवा लेक-जावई आता आई बाबा कधी एकदा येताहेत म्हणून अधीर होत असतात. पहिल्यांदाच सासू सासरे येणार असतील तर सुनबाई बिचाऱ्या गोंधळलेल्या असतात. आजूबाजूच्या लोकांकडे बघण्यात वेळ घालवण्याचा प्रयत्न सगळेच करत असतात. आई बाबा दुरून दिसतात आणि ते आपल्याकडे पहिल्यांदा आल्याचा आनंद सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसू लागतो. आई बाबांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. वर्षभरातले सगळे बदल आईची नजर शोधत असते. जरासा/जराशी स्मार्ट दिसू लागलाय असे बाबांना वाटत असते. सगळ्यांचा एक फोटो होतो आणि आता घरी जाऊयात आता लवकर म्हणत ते बाहेर पडतात.

दोन तीन मित्रांचा घोळका गप्पा मारत असतो. केवळ आंतरजालावरून ओळख असणाऱ्या आणि परदेशात शिकायला येणाऱ्या मित्रासाठी ते सगळे आले असतात. पूर्वी आपणही असेच आलो होतो, तेव्हा तो मला घ्यायला आला होता वगैरे आठवणी रंगतात. त्यांच्या गप्पांना बहर आलेला असतो. तो आला की आपल्याला शोधेलच याची त्यांना खात्री असते त्यामुळे फारशी काही काळजी वगैरे नसते. आजूबाजूचे लोक यांच्याकडे बघून थोडेसे शांत व्हायचा प्रयत्न करत असतात. आपणच उगाच एवढे व्याकुळ का होतोय म्हणून स्वतःलाच प्रश्न विचारतात. ठरल्याप्रमाणे ते येतील ना नक्की, आपल्याला ओळखू येतील का अशा प्रश्नांच्या गर्तेत तो बाहेर येतो. अंदाजाने त्यांना ओळखतो आणि तुम्ही तेच का म्हणून विचारतो. वेलकम मित्रा म्हणत ते त्याला सामावून घेतात आणि चला निघुयात आपण म्हणत मार्गस्थ होतात. 'घरी फोन करून दे रे पहिले' म्हणून त्याला आपला फोन देतात. दूरवर आलेल्या त्याला एकदम आपल्या माणसात आल्यासारखे वाटते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव हळूहळू शांत होत जातात आणि ते बाहेर पडतात.

'तू यावेळी परत येशील तेव्हा मी येतेय घ्यायला' हे तिने त्याला सांगून टाकले असते. 'कशाला उगाच' वगैरे त्याच्या उत्तरांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून ती पोहोचते. येरझाऱ्या घालत आजूबाजूला बघत असते. मागच्या वेळी फोनवर झालेले भांडण विसरून कधी एकदा तो येतोय म्हणून प्रत्येक क्षणी मोबाईल बघते. थोडा वेळ बसुयात म्हणून एक जागा शोधते. सोबत पुस्तक असतं पण ते वाचायची इच्छा होत नाही. वेळ कसा काढावा असा प्रश्न असतो. मोबाइलशी उगाच चाळे करत, आजूबाजूला बघत उद्योग सुरु असतात. तिच्या आजूबाजूला असेच अनेक लोक त्यांच्या कुटुंबाची वाट बघत असतात. न बोलताच त्यांच्यात मूक संवाद होत असतो. आता कोण पहिले येतेय याची थोडीशी चढाओढ पण असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. 'उतरलोय आणि सामान आलं की येतोच' म्हणून तो कळवतो. मग तिच्या शेजारची व्यक्ती आता न राहवून विचारते, 'कुठलं विमान? आलेत का लोक? मी पण वाट बघतोय.' 'हो या विमानाचे लोक येऊ लागतील आता बाहेर, असे म्हणत ती आता मात्र अगदी जवळ जाऊन उभी राहते. तो येतो आणि अचानक सगळे काही थांबल्यासारखी ती त्याच्या मिठीत विसावते. कुणी एखादी दुसरी ती नुकतीच तिथे पोहोचली असते आणि त्यांच्याकडे कौतुकाने बघत तिच्या आठवणीत गुंग होत वेळ काढू लागते.

आपल्या पहिल्या वहिल्या परदेशवारीवर निघालेल्या तिला ऑफिसकडून लोक घ्यायला येणार हे माहिती असतं. पण येतील का नक्की, नाही आले तर काय ही भीती असते. आपल्या नावाची पाटी घेऊन कोण कुठे दिसतंय का म्हणून तिची नजर भिरभिरत असते. एका कोपर्यात तिच्याचसाठी एक जण उभे आहे बघून जवळ जाते. खात्री करून घेते. चला मॅडम म्हणून ती व्यक्ती सामान घ्यायला मदत करते. आजूबाजूला अशाच काही होणाऱ्या भेटी बघून आईच्या आठवणीने तिचे डोळे भरून येतात. एकाकी फिलिंग येतं आणि तरीही काहीतरी नवीन करण्याच्या आनंदात त्या बाजूला सारून ती चालू लागते.

तो बाहेर येतो आणि सरळ चालायला लागतो. आपल्यासाठी कुणी येणार नाही हे त्याला माहिती असतं. त्याच्यासाठी हे रोजचं असतं. गर्दीतून वाट काढत तो सरळ ट्रेन पकडण्यासाठी निघतो. घरी सगळे वाट बघत असेल या विचारात इतरत्र बघायला त्याला वेळच नसतो.

ती बाहेर येते आणि नवरा आजूबाजूला दिसत नाही म्हणून मनातल्या मनात चडफडत त्याला फोन लावते. येतोच दहा मिनिटात असे ऐकते आणि रागारागाने फोन ठेवते. तो तसा पाच सात मिनिटातच येतो. आल्यावर धुसफूस सुरु होते. समजावणे सुरु होते. तिचा राग स्वाभाविक असतो. त्याचे उत्तरही बरोबर असते. शेवटी समजूत काढण्यात तो यश मिळवतो आणि मग झालेला उशीर विसरून दोघे निघतात.

बाळाला घेऊन ते दोघे पहिल्यांदाच येणार असतात. आजी आजोबांना नातवंडाच्या ओढीने विमानतळावर यायचेच असते. ते दोघेही हा आग्रह मोडत नाहीत. मोठ्ठा प्रवास करून थकलेले दोघे आणि आईच्या कुशीत निर्धास्त झोपलेलं बाळ यांना दुरूनच बघून त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कौतुकाने कितीतरी वेळ ते तिथेच स्तब्ध होऊन थांबतात. त्याला थंडी वाजतेय का? गरम होतेय का? भूक लागली आहे का? अशा प्रश्नांची मालिका सुरु होते. शेवटी 'आता घरी जायचे आहे ना? मला भूक लागलीये' म्हणत नवीन बाबा सगळ्यांना कौतुक सोहळ्यातून ब्रेक घायायला लावतो आणि ते चालू लागतात. आजच नेमका सकाळी सगळा गोंधळ कसा झाला, इकडे यायचे होते म्हणून मी आपली सक्काळी उठून स्वयंपाक करत होते, मग कामवाली कशी आली नाही अशा या मधल्या वेळातल्या सगळ्या अडचणी ज्याची आधी कुरकुर सुरु असते असतात त्या कधीच हरवलेल्या असतात. मुळात ती धांदल का उडाली आणि त्यातून या मधल्या वेळात ते सगळं जास्तच का आठवतंय हे समजायला आजोबा हुशार असतात.

आपल्या गावातला किंवा घराण्यातला परदेशात गेलेला पहिला मुलगा परत येतोय म्हणून सहकुटुंब सपरिवार सगळे गाव लोटले असते. या सगळ्या लवाजम्यात त्याची लाजरी बुजरी बायको सतत आपल्या नवऱ्याची वाट बघत असते. प्रत्येकाचे गोंधळ सुरु असतात. तो बाहेर येतो आणि आला आला म्हणून गोंधळ अजूनच वाढतो. हार घातला जातो, कधी कधी औक्षण पण केले जाते, ये गं बाई तू पण म्हणून बायकोला पण बोलावले जाते. डोळ्यातून काय बोलायचे ते दोघे बोलतात. फोटो होतात. इतर काही जण हे बघून आपली करमणूक करून घेतात. एखादं लहान मुल विमान बघण्यात गुंग असतं. एखाद्या तरुणाच्या मनात मी पण जाईन असाच परदेशात म्हणून स्वप्न रचली जातात. येणाऱ्या व्यक्तीला हसू आवरत नसते. प्रत्येकाचे नमस्कार, सत्कार होत होत शेवटी सगळी जनता परतीच्या वाटेला लागते.

काहींच्या बाबतीत कधीतरी ही आनंदांची वेळ नसून दुःखाची असते. येणारी व्यक्ती आणि वाट बघणाऱ्या व्यक्ती सगळेच वेगळ्या परिस्थितीत असतात.

काहींचे हे रोजचेच काम असते. त्यांच्यासाठी येणारी व्यक्ती ग्राहक आणि पर्यायाने त्यांच्या पोटापाण्याची सोय असते. कधी आपल्याला विमानात बसायला मिळेल का असेही विचार असतात तर कधी आज पैसे मिळाले की उद्या आईला दवाखान्यात नेऊ असे. काहींना फक्त आणि फक्त आजच्यापुरते पैसे मिळवण्यात रस, ते उडवायचे त्यांचे रोजचे मार्ग ठरलेले असतात. येणारी व्यक्ती तो आहे की ती यावरही त्यांच्यातल्या त्यांच्यात खलबतं.

पण एकंदरीत आपल्या प्रिय व्यक्तीची वाट बघणे नेहमीच असे असते. विशेष करून ती शेवटची काही वेळ, जेव्हा क्षण आणि क्षण मोजला जातो. मनातल्या मनात याचे आडाखे बांधायला कितीही आधी सुरुवात झाली तरी विमानातून उतरून तर प्रत्यक्ष भेटीपर्यंत आगळावेगळा सोहळा त्या परिसरात घडत असतो. जगातल्या कुठल्याही विमानतळावर या आगमन कक्षात वाट बघणाऱ्या आणि अवतरणाऱ्या लोकांच्या भावना सगळीकडे समान दिसतात. तुमचा देश, स्थळ, काळ कशाचा काही विशेष फरक पडत नाही. प्रत्येक ठिकाणी थोड्या रिती वेगळ्या, व्यक्त होण्याची पद्धत वेगळी. पण बाकी तसेच. दूर राहणे अनेकांनी वर्षानुवर्षे स्वीकारले असते पण तरीही ही भेट आणि ती अस्वस्थता, व्याकुळता काही बदलत नाही. सगळेच आठवणींच्या गर्दीत हरवलेले असतात. प्रत्येकाची ओढ तशीच असते. लोकांची ये जा सुरूच राहते. व्यक्ती बदलतात. त्यांची जागा नवीन लोक घेतात. कुणासाठी घड्याळाचे काटे सरकतच नसतात तर कुणी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. असेच क्षण जेव्हा नंतरही आठवतात, तीच अस्वस्थता, तीच हुरहूर पुन्हा जाणवते आणि मग ती भेट प्रत्येक वेळी सुखावून जाते.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle