अर्थशास्त्रातील २०१८ चा नोबेल पुरस्कार

लेखिका - मामी

'हवामान बदल' या विषयावर काम करणाऱ्या विल्यम नाॅरडस आणि पॉल रोमर या द्वयीला यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडगोळीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

अर्थव्यवस्था आणि हवामान यांचा परस्परसंबंध आहे, या सिद्धांताला पहिलं शिस्तबद्ध प्रारूप येल विद्यापीठाच्या प्राध्यापक नाॅरडस यांनी दिलं, तर आर्थिक शक्तीकेंद्रं कसं कंपन्यांना नव्या संकल्पना आणि नवकल्पना अंगीकारण्यास भाग पाडतात, याबाबत न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्टर्न स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक रोमर यांनी संशोधन केलं आहे. बाजाराचं आर्थिक ज्ञान आणि निसर्ग यांच्यातल्या नात्याचं आर्थिक विश्लेषण करत संशोधनाचा परीघ वाढवण्यात या दोघांचं मोलाचं योगदान आहे.

nobel_2018_economics.jpg
(चित्र सौजन्य : https://www.economist.com)

पॉल रोमर (Paul Romer, born 6 November 1955, age 63 years, an American economist and University Professor at NYU and director of the Marron Institute of Urban Management) :

अर्थशास्त्राचा मूळ पाया आहे तुटपुंज्या/मर्यादित साधनांचा ( वैयक्तिक गरजा भागवण्यासाठी / देशाच्या आर्थिक विकासासाठी) कसा विनियोग करायचा याचा अभ्यास. या लहानश्या बीजाचा आता भलामोठा वटवृक्ष होऊन त्याचा शाखाविस्तार खूप वाढला आहे.

यंदाच्या नोबेल पारितोषिक विजेत्या जोडीतील पॉल रोमर यांनी अर्थशास्त्राच्या या मूळ बीजासंदर्भातच एका परिणामकारक घटकावर संशोधन केले आणि मुक्त आर्थिक व्यवस्थेत निसर्गासोबतच ' ज्ञान (knowledge)' या घटकाचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून दिले आहे. आणि या ज्ञानाला पोषक असे निर्णय घेतले गेले तर आर्थिक विकासाचा वरचा टप्पा गाठण्यास मदत होते, हा सिद्धांत मांडला.

कोणत्याही प्रदेशातील मूळ उपलब्ध घटक हे त्या प्रदेशातील निसर्गातून मिळतात. उदा, खाणीतून धातू, जंगलं असतील तर लाकूड, नदीशेजारी शेतीस योग्य अशी जमीन, वाळवंट असेल तर पाण्याचे दुर्भिक्ष्य पण जमिनीत पेट्रोलचे साठे इ. हे घटक अर्थात त्या त्या प्रदेशाच्या विकासावर परिणाम करतात. त्या त्या प्रदेशातील मानव आजूबाजूला सहज उपलब्ध असलेले हे घटक वापरून आपला जास्तीत जास्त उद्धार कसा होईल याकरता धडपडत असतो. हे परंपरांगत स्त्रोत वापरून एका ठराविक मर्यादेपर्यंत विकास साधता येतो, पण त्यापलिकडे जर विकासाचा टप्पा न्यायचा असेल तर त्यासाठी या साधनांचा उपयोग करणारं नविन तंत्र वापरावं लागेल. याचा अर्थ, साधनं तीच, पण नविन तंत्रज्ञान वापल्यामुळे विकासाला वरच्या दिशेनं एक धक्का देता येतो. ही बाब अर्थशास्त्रात आधीच मांडलीही गेली आहे आणि सर्वमान्यदेखिल झाली आहे.

पण हे तंत्रज्ञान नेमकं कोणत्या प्रकारचं असेल, हे कोणत्या निकषांवर निवडलं जाईल, यावर पॉल रोमर यांनी संशोधन केलं आणि त्यातून दाखवून दिलं की आर्थिक निर्णय (economic decisions) आणि त्या ठिकाणची आर्थिक बाजारपेठ कोणत्या प्रकारची आहे (market conditions) यावर कोणते तंत्रज्ञान निर्माण केले जाईल, हे अवलंबून असतं. आर्थिक व्यवस्थेतील उत्पादक घटक नेहमीच नवनविन संकल्पना राबवतात. वस्तु उत्पादन करणार्‍या फॅक्टरी, कामगार, शेती करणारे शेतकरी यांना नविन कल्पना सुचतात आणि त्या ते अंमलातही आणतात. आणि यापासून त्यांना फायदा होतोही. पण हा फायदा तात्पुरता ठरतो, कारण त्याच क्षेत्रात काम करणारे इतर स्पर्धक या संकल्पना घेऊन वापरतात आणि मग मूळ संशोधकाचा जास्तीच्या नफ्यामुळे होणारा फायदा मर्यादित होतो.

या संदर्भात रोमर यांनी दाखवून दिलं की, जर हे नविन ज्ञान स्पर्धेपासून दूर राहिलं (“non-rivalrous” nature of new knowledge) तर त्यामुळे नवनविन शोध लावण्यास आणि राबवण्यास उत्तेजन मिळेल. आणि हे कसं साध्य होईल? तर सरकारच्या धोरणांमुळे. जर सरकारचं धोरण संशोधनाला उत्तेजन देणारं असेल आणि ही निर्माण झालेली बौद्धिक मालमत्ता जपणारं असेल तर आर्थिक विकासाला नक्कीच चालना मिळेल. हे घटक एखाद्या प्रदेशाचा आर्थिक विकासाचा दर ठरवू शकतात.

रोमरनी “endogenous growth models” म्हणजेच अंतर्गत विकासाचा साचा, हा त्यांचा सिद्धांत १९९० मध्ये मांडला आणि त्यानंतर त्यांनी आणि इतर अर्थशास्त्रज्ञांनी हा साचा वापरून ठिकठिकाणच्या आर्थिक प्रगतीचा आलेख मांडून अभ्यास केला आहे आणि अजूनही अर्थात केला जात आहे. हा अगदी परिपूर्ण असा सिद्धांत नसला (अर्थशास्त्रासारख्या विषयात असा परिपूर्ण सिद्धांत असणं शक्यही नाही) तरीही याला नोबेल मिळालं आहे, कारण यात असलेल्या त्रुटींतूनही अनेक प्रश्नांची उत्तरं मिळण्याची शक्यता दिसत आहे. उदा. एखादं विशिष्ट तंत्र / ज्ञान सर्वांना उपलब्ध असेल तरीही (कधीकधी एखाद्या प्रदेशाचा) विकास का होत नाही? ज्ञानाचा सर्वत्र प्रसार होण्यासाठी नेमक्या कोणत्या अडचणी असतात? काही प्रदेशात जे सहज शक्य होतं, त्याच ज्ञानाचं इतर काही प्रदेशांत विकासात रुपांतर न होण्यामागे काय कारणं असू शकतात?

रोमर यांच्या या संशोधनातून हे मात्र नक्की अधोरेखित होतं की नविन संकल्पनांची निर्मिती आणि प्रसार ही अट आर्थिक विकासासाठी गरजेची असली तरी पुरेशी मात्र नव्हे, आणि त्यामुळे या अनुषंगाने पुढे संशोधन करण्यास चिकार वाव आहे.

विल्यम नॉरडस (William D. Nordhaus, Born: 31 May 1941, age 77 years, American economist and Sterling Professor of Economics at Yale University) :

रोमरप्रमाणेच नॉरडस यांनी देखिल निसर्ग आणि अर्थव्यवस्था यांचा संबंध उकलून दाखवला आहे. जेव्हा १९७० साली नॉरडस यांनी या विषयावर काम सुरु केलं, त्यावेळी ग्लोबल वॉर्मिंगची भीती जाणवू लागली होती. जीवाश्मांपासून बनणारे इंधन अर्थात fossil fuel वापरल्यानं पृथ्वीचं तापमान वाढत असल्याचे सिद्धांत मांडले जाऊ लागले होते. शेवटी १९९० मध्ये नॉरडस यांनी एक सर्वसमावेशक साचा शोधून अर्थव्यवस्था आणि वातावरण (पक्षी: वातावरणातील बदल) यांचा परस्परसंबंध दाखवून दिला. हा असा संबंध शोधून त्याच्या संख्यात्मक साचा ( quantitative model) तयार करणारे ते पहिले अर्थशास्त्रज्ञ होते. कारण ते केवळ सिद्धांत मांडूनच थांबले नाहीत तर त्यातील निष्कर्ष त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि अर्थशास्त्र या तीनही क्षेत्रातील डेटा(माहिती) गोळा करून, त्याची या सिद्धांताला जोड दिली. त्यांचा हा मूलभूत साचा आता पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांची सांगड घालण्यासाठी वापरला जातो. पर्यावरणासंबंधीचे (पक्षी: प्रदुषण आटोक्यात ठेवण्यासाठीचे) आर्थिक निर्णय घेण्यासाठी हा साचा वापरला जातो. उदा. कार्बन टॅक्सेस इ.

नॉरडस यांचा हा साचा हा गुंतागुंतीचा आहे. अनेक घटक, त्यांचा एकमेकांशी संबंध आणि त्यांचा एकमेकांवर होणारा परिणाम यामध्ये दाखले देऊन मांडले आहेत. पण त्यामुळेच वातावरणातील कार्बनचे प्रमाण, त्याचा तापमानावर होणारा परिणाम आणि तापमानातील फरकाचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम ते उकलून दाखवू शकले आहेत. हा साचा वापरून यातील घटकांचे प्रमाण बदलले तर अर्थव्यवस्थेवर काय संभाव्य परिणाम होईल, याची कल्पना येऊ शकते.

हा साचा समजून घेण्यासाठी काही अधिक माहिती :
कार्बन आटोक्यात ठेवायचा (टॅक्स लावून) तर वाढीचा दरही कमी होऊ शकतो, कारण उद्योगधंद्यांना टॅक्सचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो, मालाच्या किंमती वाढतात, ही वाढीव किंमत ग्राहकाला मोजावी लागते, दुसर्‍या प्रांतात/देशात जास्त किंमतीच्या मालाला कमी मागणी येऊ शकते, परिणामी अर्थव्यवस्थेला खीळ बसते. याउलट जर टॅक्स न लावता अनिर्बंध उत्पादनास मोकळीक दिली तर वातावरणात प्रदुषणाचे प्रमाण अतिशय वाढेल, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल आणि त्यांची कार्यक्षमता कमी होईल. त्यांचा आरोग्यावरील खर्च वाढेल. कदाचित प्रदुषण टाळण्यासाठी काही नागरीक स्थलांतर करतील, अशानं कारखान्यांना लागणारी कामगारशक्ती कमी होईल आणि त्या धंद्यावर परिणाम होईल. कोणत्याही आर्थिक निर्णयाचे परिणाम असे दूरगामी असू शकतात.

या दोन्ही नोबेल पारितोषिक विजेत्या अर्थशास्त्रज्ञांचे योगदान महत्त्वाचे कारण त्यांनी अत्यंत पद्धतशीर साचे बनवून निसर्ग/पर्यावरण आणि आर्थिक निर्णय यांचा संबंध प्रस्थापित करून फार मूलगामी आणि उपयुक्त असा रस्ता बांधून काढला आहे. त्यावरून पुढे जात त्या त्या विषयात अजून खूप संशोधन करायला त्यांनी हा सुकर मार्ग उपलब्ध करून दिला आहे.

अजून माहितीसाठी :

  1. अर्थशास्त्रातील हे ५० वे नोबेल आहे.
  2. William D. Nordhaus यांची मुलाखत
  3. Paul M. Romer यांची मुलाखत
  4. विल्यम नाॅरडस यांचे वीकीपीडिया पेज
  5. पॉल रोमर यांचे वीकीपीडिया पेज
  6. अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची अधिकृत वेबसाईट
  7. Integrated assessment modelling चे वीकीपीडिया पेज
  8. Technological innovation चे वीकीपीडिया पेज

संदर्भ :

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle