दाण्याची चटणी आणि नवी शिखरंं

दाण्याची चटणी आणि नवीन शिखरं

जेवणाच्या ताटात भाजी, आमटी, कोशिंबीर असली; ताट कितीही सजलेलं असलं तरी लोणचं किंवा दाण्याची/ तिळाची/ कारळाची/ जवसाची चटणी असल्याशिवाय ताट परिपूर्ण वाटत नाही. जसा हापूस आंब्यांचा राजा आहे तशीच दाण्याची चटणी, चटण्यांची राणी आहे. निदान आमच्याकडे आम्ही हे पद तिला निरविवाद बहाल केलेलं आहे.जेवणाच्या पानातलं दाण्याच्या चटणीचं स्थान जसं ठरलेलं आहे तसच गिऱ्यारोहण करणाऱ्या किंवा सह्याद्री रांगा सर करणाऱ्या सगळ्यांच्या backpack मध्ये ही चटणी असतेच असते. पहिल्यांदा परदेशात घर बसवायला येणाऱ्या मुला-मुलींच्या बॅगेतही गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि दाण्यच्या चटणीची पाकीटं हमखास अस्तात.

आम्ही अमेरिकेत येताना इतरांसारखीच ही मसाल्याची आणि चटणीची पाकिटं घेऊन आलो. पण ती संपायच्या आधीच आम्हाला इथल्या नवीन पदार्थांचे वेध लागले. वेगवेगळ्या डिप्स, ह्म्मस, साल्सा, ग्वाकामोले, आणि सॅासचे वेगवेगळे प्रकार- मुह्मारा, हरिसा, श्रीराचा, थाई पिनट इत्यादी. गरीब बापडी पाच जीन्नसातून बनणारी दाण्याची चटणी बाजूला पडली. कॅलिफोर्निया exploreकरायला फिरायलो लागलो आणि मग दाण्याच्या चटणीचं पुनरागमन झालं. अनोळखी प्रदेश फिरायचा असेल तर पोटोबा तरी ओळखीचा नको का? दाण्याची चटणी,बटर आणि ब्रेड अशी आमची ठरलेली प्रवासाची शिधा आम्ही बांधायला लागलो.

आठ दहा वर्ष जुनी होंडा सिविक, टेंट, कॅम्प स्टोव, तुटपुंजकं बजेट, आणि दाण्याची चटणी बरोबर घेऊन आम्ही दर वीकेंडला नवीन स्टेट पार्क, नवीन टेकाडं सर करायला बाहेर पडायला लागलो. चटणी सॅडविच करणं सोयीस्कर होतं, स्वस्त होतं, एवढाच त्यामागचा विचार होता. पोटोबाची विवंचना नसली की पायवाटा तुडवत wild flowers च्या शेकडो छटा बघणं, वाट ओलांडून जाणारी बनाना स्ल्ग्झ मोजणं, दऱ्यांमधले उन सावलीचे खेळ पाहणं, कुरणांचे विस्तार, पॅसिफिक समुद्राच्या निळ्याशार लाटांशेजारी वाढलेली अजस्त्र रेडवूड झाडं, जॉन मुईरच्या प्रदेशात हरवून जाणं, त्याला हरपून टाकणाऱ्या नैसर्गिक समृद्धीची अनुभूती घेणं, आम्हाला सहज अनुभवता येत होतं. आमच्या बरोबर येणारे आमचे मित्र मैत्रिणी काही वेळा आमच्या दाण्याच्या चटणी सॅडविच बाबत आमची टिंगल सुद्धा करत, काही जणं चटणीचं sample मागत.

२०१२ साली आम्ही Grand Canyonला गेलो होतो. दहा दिवसांची, मोठी Roadtrip. अर्थातच बरोबर दाण्याची किलोभर चटणी, मॅगी, भेळ, खाकरे, पोहे, चहा. शटल बस घेऊन आम्ही रिम ट्रेलला जेमतेम सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास पोचलो होतो. कार २ मैल लांब व्हीझीटर सेंटरला पार्क केली होती. सूर्यास्तानंतर, अंधारात कॅन्यनचा “ फील” घेत , पायवाटेवर टॅारच दाखवत आम्ही परतीच्या वाटेवर निघालो. पाच दहा मिनिटात शेवटची शटल भरून लोकं गेली, गर्दी गेली. ट्रेल वर चालणारी मोजकी लोकं राहिली. ५- १० मिनिटात पूर्ण काळोख झाला. आकाशात एक नाजूक चंद्रकोर आणि शेकडो तारे. मी तिथे येऊन पोचल्याच्या आनंदात सुर्यास्ताचा आनंद नीट उपभोगला नव्हता पण अंधार होताच माझ्या पापण्यांमागे, सूर्यास्तामुळे खिंडीचा बदललेला भडक बदामी रंग प्रतिबिंबित होत होता. म्हणून मी अडखळत चालत होते, का excitementमुळे आता आठवत नाही. कुठेतरी मी ठेचकाळले, म्हणून आम्ही एका बेंच वर बसलो. अंधारात फक्त खिंडीच्या भासरेषा दिसत होत्या. एकच अंधुक torch दाखवत आमच्यापाशी एक जोडपं आलं. “ Are you all right?” त्यांनी विचारलं.

“ Yes, just taking a break.” निकीत म्हणाला. काही न बोलता ते पण बेंचपाशी थांबले, पाणी प्यायले. मग आम्ही चौघंही एकत्र चालायला लागलो. बोलण्यात कळलं की ते सीअॅटल शहरातून सगळं घर दार विकून, ओरेगन मध्ये राहिला चालले होते. एका पाच एकरच्या शेतावर त्यांना स्वतः शेती करायची होती, शेतावर वाहणाऱ्या ओढ्यातून, लागेल तेवढीच उर्जा निर्मिती करायची होती. आम्हाला त्यांचं बोलणं ऐकून ते दोघंही हिप्पी वाटले.निकीत green energy मध्ये काम करतो म्हटल्यावर त्यांनी windmill आणि water turbine बद्दल भरपूर प्रश्न विचारले. प्रश्न थांबेचना, त्यांना भरपूर बोलायचं होतं. आम्हाला दोघांनाच जे हातात हात घालून चालत जायचं होतं ते राहीलच.. आम्ही भारतातले म्हटल्यावर आमचं arranged marriage होतं का , लग्नात किती लोकं बोलावतात आणि मुख्य म्हणजे बॉलीवूड सिनेमाबद्दल बोलायचं होतं. Slumdog Millionaire मध्ये दाखवली आहे तशीच आहे का मुंबई वगैरे प्रश्न झाले. त्यांना शाहरुख खान खूप आवडत होता. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देता देता पार्किंग लॉट पर्यंत आम्ही पोचलो सुद्धा. एवढ्या मोठ्या लॉट मध्ये फक्त चारच गाड्या होत्या.गिफ्ट आणि कॉफ्फी शॉप बंद होतं. त्यांनी RV van आणली होती, आम्हाला dinnerच निमंत्रण दिलं. खरं Thank you म्हणून निघायला काहीही हरकत नव्हती, पण आम्ही थांबलो.

बाहेर चांदण्यांखाली एक फोल्डिंग टेबल आणि तीन खुर्च्या टाकल्या. त्यांनी wine आणि beer ची बाटली उघडली आणि ती त्याच्या मांडीवर चढून बसली. निकीतने त्याच्या playlist मधली शाहरुख खानची गाणी लावली. मी त्या तिघांचं बोलण फारसं ऐकलं नाही. Grand Canyonची भव्यता एकीकडे आणि तिथे पोचून आम्ही अनुभवत असलेलं हे वायफळ संभाषण ह्या दोन्हीचा ताळ जमत नव्हता. मी backpack मधून चटणी, ब्रेड आणि खाकरे काढले. ते पाहून तिचे डोळे चमकले. चटणी खाऊन त्या दोघांचे डोळे पाणावले. “ Woah! thats hot...!oww..” म्हणत ती मांडीवरून उठली आणि RV मध्ये गेली. काकडी, टोमॅटो, ऑलिव्ह आॅईल घेऊन आली. तिने चटणी आणि तेलाची डीप तयार केली. काकडी डीप मध्ये बुडवून खालली.मग कशाची चटणी, कशी करतात, खाकरा कसा करतात ह्या बद्दल चर्चा झाली. ह्या गप्पांमध्ये मागे रेहमान ची शेहनाई वाजली...” ये जो देस है तेरा ...” सुरु झालं.

स्वदेस मधलं गाणं ऐकून माझा चेहरा खुलला. “If you don't mind, will you share this spice mix with us?” तिने विचारलं.
“ Chutney, not spice mix.” मी म्हणाले.
“Of course ! Peanut Chutney, love...” तो म्हणाला.
मी हसून त्यांच्यासाठी पाकिट भरलं, देशातून बांधून आणलेली शिदोरी थोडी परदेशात वाटली ह्याचं समाधान वाटलं.

स्वतःसाठी आणि निकीतसाठी सॅडविच केलं. पहिला घास पोटात गेल्यावर पोटोबा सुखावला. आलो होतो Grand Canyon बघायला आणि बसलो चटणीची कृती सांगत! चटणी सारखी साधी, मी गृहीत धरलेली गोष्ट अशी उलगडून सांगावी लागली ह्याची मला गम्मत वाटली. वाटलं, स्वतःबद्दल गृहीत धरलेलं सगळच ह्या नवीन देशात उलगडून सांगावं लागणार. त्या उलगडून सांगण्यात स्वतःची परत पारख होणार. परत परत ते उलगडून सांगणं बोचलं तरी ते करावं लागणार. इथल्या वास्तव्यात नवीन गोष्टी, स्वाद, जाणीवा, अनुभव सतत येऊन दार ठोठावणार, हात धरून स्वतःबरोबर यायला प्रवृत्त करणार. पण तेच नवीन प्रवास साधायला तर आलो इथे, नवीन शिखरं गाठायला. शिखराकडे प्रवास करताना ‘स्व’देशातली शिदोरी घट्ट धरून ठेवावी लागणार.
दाण्याची चटणी हे फक्त रूपक आहे, हे समजण्याइतकी मला तेव्हाही wine चढली नव्हती. पण आंतरिक मोनोलाॅग नंतर मी शांत झाले.
Hike, sandwich etc चा संबंध मी त्या नंतर देशांतर, स्थलांतर किंवा मानसिक संक्रमणाशी जोडला नाही. चटणी ही चटणीच राहू दे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
हे विचारचक्र सुरु करणाऱ्या चटणीची रेसिपी देते आहे. दाण्याची चटणी लाल जर्द दिसत नसली, थोडी काळपट दिसत असली तरी त्याच्या रंगावर जाऊ नका. :)
साहित्य: कुरकुरीत भाजलेले दाणे- २ मोठ्या वाट्या
आमसुलं – ४-५
जिरे- १ छोटा चमचा
साखर- २ छोटे चमचे
मीठ आणि लाल तिखट चवीनुसार.
कृती: आमसूलं, मीठ, जिरं आणि साखर आधी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि बाजूला ठेवा. दाण्याचं कुट करून त्यात तिखट आणि आधीकेलेली पूड नीट मिक्स करा. घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.आमसूल आणि साखरेमुळे ह्या चटणीला आंबट, गोड, तिखट चव येते. ही चटणी कितीही खालली तरी आमसुलामुळे पित्ताचा त्रास होत नाही.

https://amrutahardikar.blogspot.com/2018/12/blog-post_21.html

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle