हंपी

मंगळूरमध्ये असतानाची गोष्ट. सकाळी पेपर आल्या पहिलीच बातमी वाचली आणि धसकले. नवर्‍याला म्हटलं, “अरे, ऐकलंस का? सिस्टर स्टोनमधला एक दगड पडला म्हणे” तो ऑफिसच्या गडबडीत असल्याने दगड माझ्याच डोक्यात पडला असता तरी काही फरक पडला नसता अशा आवाजात “आरेरे, वाईट झालं” वगैरे काहीतरी म्हणाला. पण रूखरूख लागून राहिली ती मलाच.

“आक्कातंगी गुड्डा” गाईडने मी सहावीत हंपीमध्ये प्रवेश करण्याआधी रस्त्याच्या कडेला गाडी लावून या दगडांची ओळख करून दिलेली. याचं कानडी गुड्डा नाव जास्त सार्थकी. गुड्डा म्हणजे टेकडी. नजरेतही मावणार नाहीत अशा टनावारी वजनाच्या दोन अतिप्रचंड एकमेकांवर कललेल्या शिळा. अशाच अवस्थेमध्ये गेली शेकडो वर्षं उभ्या आहेत. त्यातली एक शिळा नुकतीच दुभंगून तुटली. दुसरी अद्याप तशीच आहे. रस्त्याच्या अगदी बाजूलाच असल्यानं गाड्यांच्या वर्दळीने ही शिळा दुभंगली म्हणे. पण मला काळजी भलतीच. आता या दोन बहिणींचा शाप कधीच संपणार नाही का?

हंपीबद्दल ही माझी आवडती दंतकथा. कोणे एकेकाळी हंपी वैभवशाली शहर होतं, तेव्हा या दोन बहिणी इथंफिरायला आल्या होत्या. फिरून पाय दुखायला लागले म्हणून याठिकाणी येऊन बसल्या. बरं, बसल्या तर गप्प बसतील की नाही. हंपीलाच शिव्या द्यायला लागल्या. “एवढं मोठं शहर कुणी बांधतं का? हंपी कसली ही तर कुंपी आहे” झालं! देवाला राग आला. तो म्हणाला, “ही सुंदर नगरी पाहून तुम्ही अशा वाईट गोष्टी करताय? तुम्हाला शापच देतो, जोपर्यंत तुमचं संपूर्ण हंपी फिरून होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे दगड होऊन पडाल” तत्क्षणी दोन्ही बहिणी शिळा होऊन इथं पडल्या. आता या दगडांनी हंपी बघावी कशी?

पहिल्यांदा ही कथा ऐकल्यावर डोक्यात एक ब्रिलियंट आयडीया आली होती, आतापर्यंत कुठल्याही आर्किओलॉजिस्टला सुचलेली नसेल. एक भलीमोठी क्रेन आणावी आणि या दोन शिळांना अख्ख्या हंपीभर फिरवावं. मग त्या दोन्ही बहिणी मूळ मानवी रूपात येतील. मग त्यावेळचा सगळा इतिहास, संस्कृती याबद्दल अगदी ऑथेंटिक माहिती त्या सर्वांना देतील. इतिहासकारांचं काम एकदम सोपंच.पुढं काही वर्षांनी हंपीमध्येच भटकत असताना विचार आला, दोन गावंढळ बहिणींनी हंपीला नावं ठेवली म्हणून शाप देणारे हे देवमहाशय जेव्हा हंपी जळत-लुटत होती तेव्हा नक्की कुठं बिझी होते? तेव्हा या असल्या लुटारूंना का शाप दिला नाही? पण अशा शाप आणि वरदानांनीच हंपीची कहाणी बनली आहे. हे दगड शाप संपण्याआधीच दुभंगायला लाग्लेत. काही वर्षांमध्ये त्यांचे तुकडे-तुकडे होत जातील. कदाचित या शिळा शिल्लक राहणार नाहीत,मग ही दंतकथा तिथंच विरून जाईल पण तरी एक गोष्ट मात्र तेव्हाही कायमच राहील- हंपी कधी फिरून संपतच नाही!

हंपीला जगातलं सर्वात मोठं ओपन एअर म्युझियम म्हणतात. सुमारे पंचवीस किलोमीटर्सच्या या परीघामध्ये इथं पाचशेहून अधिक “महत्त्वाची ठिकाणे आहेत” शिवाय आजही इथं पुरातत्वशास्त्राचे उत्खनन चालू आहे. आजही इथं अनेक नवनवीन वस्तू, दागिने अथवा मूर्ती वगैरे सापडत असतात. दोन-तीन वर्षांनी एकदा हंपीला गेलं की कायबाय नवीन सापडलंयत्याबद्दल समजत राहतं. आणिमाझ्या डोक्यामध्ये केवळ एकच गोष्ट वारंवार ठसत जाते. आजही हंपी किती श्रीमंत आहे...
मी आजवर कितीतरी वेळा हंपीला गेलेय. बघण्यासारखे जितके पॉइन्ट आहेत ते सर्व बघून झालेत. सहसा कुणी जात नसलेल्या ठिकाणीपण भेटी देऊन झाल्यात. तरी कुणी हंपीला जाऊया का म्हटलं तर मी आजही एका पायावर तयार. प्रत्येक भेटीमध्ये हंपीचं अणि माझं नातं अधिक खोल होत जातं. नक्की एखाद्या जागेशी नातं जोडलं जातं ते कशामुळे?माहित नाही. पण हंपीनंतर कितीही ठिकाणं फिरले तरी ही अशी नाळ परत कुठल्याच जागेशी जोडली गेली नाही.
मी हंपीला सारखी का जाते? कुठल्याही पर्यटनस्थळामध्ये असतील अशा सोयी आणि गैरसोयी इथं आहेतच. हे स्थान ग्रूप ऑफ मॉन्युमेण्ट युनेस्कोच्या यादीमध्ये आहे. त्यामुळे इथे बरेचसे परदेशी पर्यटक फिरत असताना दिसतील. हंपीपासून तीन-चार किमीवर एक “हिप्पि” लोकांचा अड्डादेखील आहे (असं म्हणतात, मी कधी जाऊन खात्री केलेली नाही!) त्याखेरीज देशी पर्यटक प्रचंड दिसतील शिवाय विरूपाक्ष मंदिर हे आजही जागतं धार्मिक स्थळ असल्यानं आजूबाजूच्या ऐतिहासिक अवशेषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत फिरणारे देवभक्त इथे दिसतील. त्याखेरीज तुंगभद्रेच्या काठावर करण्यात येणारी दहावा-बारावा-वर्षश्राद्ध वगैरेसाठी जमलेली मंडळीदेखील दिसतील. थोडक्यात हंपी सर्वसाधारण एखाद्या पर्यटनस्थळासारखंच तर आहे- जोपर्यंत तुम्ही थोडंसं झुकून तिच्या अंतरंगामध्ये पाहत नाही तोपर्यंत. या जागेनं आपल्या हृदयामध्ये हजारो वर्षांचा इतिहास, मिथकं, दंतकथा आणि असंच बरंचसं काहीबाही लपवून ठेवलंय. एक-दोन दिवसामध्ये इथं फिरताना फक्त मेजर टूरिस्ट स्थळं पाहून होतील, पण हंपीबद्दल सगळं बैजवार समजून घ्यायला इथंनिवांत बसून तिच्याशी गप्पा मारायला हव्यात, मग तुटलेल्या माळेतून मोती गळावेत तशी काळाची गणितं हातातून सुटत जातात आणि हंपी सगळं घडाघडा सांगायला लागते.

हंपीनं एकेकाळी प्रचंड वैभव पाहिलंय. इथल्या जवळच्या “होस्पेट” (होसापेटे) नावाची दंतकथा अशी सांगतात की इथे म्हणे देशविदेशामधले व्यापारी आठवड्याबाजारामध्ये भाजी घेऊन बसावेत तसे हिरेमोतीमाणके रस्त्यावर विकायला घेऊन बसायचे, असा हा किमती वस्तूंचा नवीन बाजार (कानडीमध्ये होसापेटे) म्हणून त्या भागाचं नाव होस्पेट. आता हे हंपीजवळचं तालुक्याचं ठिकाण आहे. मूळ हंपी एखाद्या खेड्य़ाइतकी शिल्लक आहे. एकेकाळी शेराच्या हिशोबानं रत्नं विकणार्‍या हंपीमध्ये आता सर्वत्र भग्नावशेषांचं साम्राज्य पसरलेलं आहे. एक मंदिर धड नाही. प्रत्येक घर जोत्यातून निखळलं आहे.साध्यासुध्या घरांचं जाऊ देत, एकेकाळी राजप्रसाद, राणीचा महाल असा तोरा मिरवणार्‍या वास्तूंचा केवळ पाया शिल्लक आहे. भिंती आणि छपरं केव्हाच ढासळली. सागवानी लाकडं आणि घरामधल्या महत्त्वाच्या वस्तू कुणीकुणी उचलून नेल्या. इथं उरल्या आहेत त्या फक्त तुटक्याफुटक्या दगडी आठवणी. आता जे दिसतंय ते अख्खंच्या अख्खं गाव एका राजधानीच्या उरलेल्या तुकड्यांवर उगवलेल्या बांडगुळासारखं आहे. एकेकाळच्या सरदारच्यावस्त्यांमधून आता गोरगरीबांनी घरं थाटली आहेत. इकडचे तिकडचे मंदिर-महालामधले कोरीव दगड वापरून स्वत:च्या घराच्या न्हाणी बांधल्या आहेत. सरदार जहागिरदारांच्या महालांमध्ये आता झोपडपट्ट्या उगवलेल्या आहेत.हंपी श्राद्धाचं ठिकाण म्हणून स्थानिकांमध्ये गेली काही शतकं लोकप्रिय आहे.असं म्हणतात की,दशरथाचा मृत्यू झाल्याची बातमी वनवासामध्ये असताना रामाला इथं आल्यावर मिळाली म्हणून त्यानं इथंच नदीकाठी दशरथाचे दिवसकार्य केले.“हंपीला जाणे” म्हणजेच दिवस घालणे अशा अर्थाचा एक वाक्प्रचार या भागामध्ये प्रसिद्ध आहे. नाहीतरी कणाकणानं बांधलेलं साम्राज्य जेव्हा मणामणानं कोसळतं तेव्हा त्या जागेवर अजून कसला व्यवसाय चालणारे? पण हंपीचा हा डाऊनफॉल पहिलाच नव्हे, ही नगरी फार पूर्वीपासून असे अनेक आघात-अपघात पचवून उभी राहिलेली आहे. काळाच्या सुरूवातीपासून हंपी अनेक धार्मिक आणि दंतकथांचे माहेर राहिलेलेच आहे. यामधला मानाचा तुरा म्हणजे विजयनगर साम्राज्याचा भरभराटीचा काळ आणि सर्वात काळाकुट्ट भाग म्हणजे युद्धानंतर या नगरीची झालेली लूटालूट. आता या क्षणाला हंपी खनिज समृद्ध प्रदेश म्हणून उद्योगपतींच्या नजरेत भरली आहे. इतके दिवस ऐतिहासिक म्हणून प्रसिद्ध असलेला हा भाग आता खाणींसाठी नैसर्गिक साधनसंपत्तीने विपुल भाग म्हणून ओळखला जातोय. काळ बदलला तशी हंपीनं पण आपली ओळख बदलली. अजून काय!

तसंही निसर्ग कायम आपली जादू दाखवत असतो. इथे असंख्य टेकड्या आहेत, प्रचंड आकाराच्या शिळांपासून बनलेल्या. त्या शिळांचे गमतीशीर आकार बघायला फार मजा येते. कशा बनल्या असतील अजस्त्र शिळा? भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर हंपीच्या या शिळा पृथ्वीवरच्या सर्वात जुन्या शिळांपैकी एक आहेत. कित्येक दशलक्ष वर्षांपूर्वी इथे अतिप्रचंड डोंगराएवढे सलग दगड होते. नंतर उन्हापावसामुळे या दगडी डोंगरांना तडे गेले आणि त्यामधून या शिळा तयार होत गेल्या. घरंगळत एकमेकांवर जाऊन पडल्या आणि चित्रविचित्र नैसर्गिक आकार तयार झाले. पण इथंनिसर्गानं जी कलादृष्टी दाखवली आहे त्याला तोड नाही. दुपार कलायला लागलेली असताना तेनाली रामन व्ह्यु पॉइण्टपर्यंत चढायचं. हा बिरबलासारखाच कथांमधून हुशारीसाठी प्रसिद्ध असलेला कृष्णदेवराय राजाचा प्रधानंमत्री - तेनाली रामन, याच्या चातुर्याच्या कथा प्रसिद्ध आहेत. तो या पॉइण्टवरूनअख्ख्या शहरावर लक्ष ठेवायचा म्हणे!इथून दूरवर दिसणार्‍या हे दृश्य बघत बसायचं. हंपीनं मला एकदा सांगितलं की “हे दगड म्हणजे वाली आणि सुग्रीवाचं युद्ध झालं तेव्हा वापरलेली शस्रे आहेत.” इथलेच दगड नेऊन वानरांनी लंकेला जाण्यासाठी पूल बांधला होता. असेलही! हंपीमध्ये कुठलीही गोष्ट सामान्य नाहीच. इथल्या दगडादगडाला कसल्यातरी दंतकथेचा आधार आहे असं म्हटलं तर अजिबात अतिशयोक्ती नाही.एकमेकांवर आदळलेल्या, कलंडलेल्या, ओघळलेल्या, गळ्यात पडलेल्या क्वचित कुठेतरी एकमेकांवर नाजुकपणे रचून ठेवल्यासारख्या शिळा.. प्रत्यक्षामधे कित्येक टन वजनाच्या असतील कुणास ठाऊक. कुठं जहाज दिसतं, कुठं घर, कुठं हत्ती, कुठं गायींचा कळप. दगडामध्ये दिसणारे आकार. आपली नजर हाच कुंचला आणि समोरचे दगड हा कॅनव्हास. काढा कशी हवी तशी चित्रं. हे असं बघताना हंपीचंच काय, पण अख्ख्या मानवजगतानं स्वत:च्या हातांनी बनवलेलं हे जग फालतू वाटायला लागतं. ही करामत नक्की कोण करत असावं? दिवसाच्या चोवीस तासामधल्या मिनिटांचा हिशोब चक्क निष्फळ वाटायला लागतो. कित्येक दशलक्ष वर्षं!! तितकी वर्षं या शिळा इथे उभ्या आहेत. तुमच्या आमच्या कर्मानं आपण सगळेच एक दिवस “माणूस” ही जमातच पृथ्वीतलावरून नाहीशी करणार आहोत. कदाचित अजून काही वर्षांत! पण तरी हे दगड इथंच राहतील. यांनी सृष्टीचा उगम पाहिला. पहिलं जीवन अनुभवलं. त्या जीवनाचं विस्तारलेलं विश्व पाहिलं, मग आदिमानव पाहिला, त्याचं हळूहळू मानवात झालेलं रूपांतर पाहिलं. त्याच मानवानं वसवलेली संस्कृती पाहिली. संस्कृतीचा विस्तार पाहिला. मग विनाश पाहिला. एकमेकांची कापाकापी पाहिली. रक्ताच्या चिळकांड्या पाहिल्या.मांसाचे चिखल पाहिले. यापुढे कदाचित याहूनही जास्त मोठा विध्वंस ते पाहतील. तरी ते तिथंच राहतील. अनादि कालापासून अनंत कालापर्यंत. प्रत्येक गोष्टीचा मूक साक्षीदार बनून.

विजयनगरच्या राजांनी राजधानीचं ठिकाण निवडलं ते याच भौगोलिक स्थानामुळे. नदीकाठ, बारा महिने पाणी आणि भोवताली भल्यामोठ्या अजस्त्र शिळांच्या टेकड्या. सहजासहजी आक्रमण न करता येण्यासारखं.तरी हंपी हरली कारण फंदफितुरी. विजयनगराचे साम्राज्य हा हंपीच्या अनेक हजारो वर्षांच्या कालखंडामधला एक तुकडा. त्याही आधी शतकानुशतके बहरलेल्या अनेक गावांमध्ये हंपीचं नाव कायम येत राहील.प्रागैतिहासिक काळामध्ये हजारो वर्षांपूर्वी आदिमानवाने काढलेली गुंफाचित्रं या परिसरामधे मिळालेली आहेत, म्हणजे हे स्थान जुनं असेल ते बघा!! इतक्या वर्षांच्या कथा-दंतकथा आपापसांत मिसळून हंपी म्हणजे एक अजब रसायन बनलेलं आहे. हे नाव आलंय पंपाक्षेत्र या तीर्थस्थानावरून. तुंगभद्रेचं अजून एक नाव पंपा. ही ब्रह्मदेवाची मुलगी. तिनं तपश्चर्या करून शंकरालाप्रसन्न करून घेतलं आणि वरदान म्हणून त्याच्याशी लग्न करायची इच्छा व्यक्त केली. या दैवी लग्नाच्या वेळी स्वर्गातील देवांनी सोन्याचा वर्षाव केला ती टेकडी म्हणजे हेमकूट. हे हंपीमधलं सर्वात महत्त्वाचं ठिकाण, बरीचशी देवळं आणि वास्तू याच परिसरामध्ये आहेत. इथं पंपाक्षेत्री राहिलेला शंकर म्हणजे विरूपाक्ष. त्याच्या तिसर्‍या डोळ्यांवरून त्याला हे नाव मिळालंय. भारतातल्या इतर असंख्य शिवस्थळांपैकी शंकराने कामदहन केल्याची आणि रतीच्या विनवणीमुळे त्याला जीवनदान दिल्याची कथा याच परिसरांत घडली असंदेखील सांगितलं जातं ते शंकराच्याया नावामुळेच. हे विरूपाक्ष मंदिर हंपीमधलं सर्वात भव्य आणि गजबजलेलं देऊळ आहे. अभ्यासकांच्या मते, हे सातव्या-आठव्या शतकामध्ये बांधलेल्या छोट्याशा देवळासमोर मंडप, सभागृह, गोपुर अशी वाढ नंतर आलेल्या राजांनी केली आणि त्यामधून आजचं हे मंदिरप्रांगण तयार झालं आहे. याच मंदिराच्या अवतीभवती पंपादेवी, भुवनेश्वरी, पाताळेश्वर, नवग्रह अशी छोटीछोटी मंदिरं आहेत. इथंच विद्यारण्यास्वामींचं देखील एक मंदिर आहे. हरिहर आणि बुक्का या विजयनगर साम्राज्याची स्थापना करणार्‍या बंधूंचे हे स्वामी. यांच्याच आशीर्वादानं या साम्राज्याची पायाउभाराणी झाली असं मानलं जातं. याच समाधीच्या थोडं पुढे गेल्यावर एका काळोख्या ठिकाणी एका भिंतीवर पडलेली देवळासमोरील भव्य गोपुराची उलटी सावली दिसते. लहानपणी कधी पुठ्ठ्याचे तुकडे वापरून पिनहोल कॅमेरा केला असेल तर या सावलीची खरी गंमत कळेल.विरूपाक्ष मंदिराच्या प्रांगणामध्ये सहसा न दिसणारी त्रिमुखी नंदीची एक मूर्ती आहे. हे मंदिर म्हणजे हंपीमधला हा सगळ्यांत जिताजागता भाग.

हे विरूपाक्ष मंदिर सातव्या शतकाच्या दरम्यान बांधलेले आहे पण इतके जुने असूनदेखील काही अभ्यासकांच्या मते, हे मूळ मंदिर नाही. हेमकूट टेकडीच्या बाजूला एक छोटे मंदिर आहे. याला मूळविरूपाक्ष मंदिर असे नाव आहे.या मूळविरूपाक्ष मंदिराच्या पायथ्याशी एक छोटं नैसर्गिकतळे आहे. आताच्या विरूपाक्ष मंदिराच्या जवळच एक भव्य परंतु बांधलेली पुष्करणी आहे. या मंदिरासमोर सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी पर्यंत टिपिकल टूरीस्ट ठिकाणीअसतात तशी दुकानं, हॉटेल, रेस्टॉरंट्स वगैरे गजबज होती. नुकतीच पुरातत्वखात्यानेइथली सर्व अतिक्रमणे हटवली आहेत. सध्या इथे खात्यामार्फ़तचरीस्टोरेशनचे काम चालू आहे. गंमत म्हणजे ही अतिक्रमणं करण्यासाठी स्थानिकांनी शेकडो वर्षांपूर्वी बांधलेल्या दुकानाच्या गाळ्यांचाच वापर केला होता.

हंपीमधल्या या पौराणिकदंतकथेमध्ये एक मिश्किल पान लपलेलं आहे. या नगरीचं एकेकाळचं नाव किष्किंधा. वाली आणि सुग्रीवाची राजधानी. हंपीपासून जवळच आंजनेय पर्वत आहे. पर्वत म्हणजे टेकडीच, पण भल्यामोठ्या शिळांनी बनलेली. सूर्याचं लाल फळ खायला निघालेल्या मारूतीरायाचे हे जन्मस्थान. सीतेला शोधत राम याच नगरीमध्ये आला. इथंच त्याचं आणि सुग्रीवाचं युद्ध झालं. सुग्रीव ज्या गुहेमध्ये लपला होता ती गुहा आजही बघायला मिळते.तिथंच राम-लक्ष्मणाची उमटलेली पावलं दाखवतात. याच गुहेच्या आसपास कुठंतरी रावण सीतेला पळवून घेऊन जात असताना तिचा पदर घसटला होता त्याच्या खुणा दगडांमध्ये आजही दाखवल्या जातात. त्या खुणा बघताना कोण्या एका दुष्ट राक्षसाने ओढत नेलेली आणि दु:खाने आक्रोश करत असलेली सीता नजरेसमोर येतेच. सीतेचं एक नशीब चांगलं होतं, तिला वाचवायला राम होता, या भूमीमधल्या बहुसंख्य सीतेच्या नशीबी मात्र, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तो रामच रावण बनून छळतो. वाचवणार तरी कोण आणि कोणापासून? राम आणि हनुमानाची पहिली भेट झाली त्या चक्रतीर्थामध्ये काही भाविक डुबक्या मारून पापं धुवून घेतात. याच चक्रतीर्थाच्या किनार्‍याला कोदंडधारी राम म्हणून एक छोटंसं पण शांत देऊळ आहे. गाईड उत्साहानं इकडेतिकडे बोट दाखवून मारूती त्याच्या सवंगड्यांसोबत खेळायचा म्हणून सांगतो. लोकं लगेच त्या दिशेला बघून हात जोडतात. पण एका अर्थानं त्यांचं बरोबरे. मारूती चिरंजीवी आहे. तो आजही इथं पृथ्वीवरच आहे. इथं जवळच मारूतीचंच छोटंसं विलक्षण मंदिर आहे. “यंत्रोद्धार अंजनेय” असे भरभक्कम नाव धारण करणारा हा बालहनुमान. मारूती म्हणे सारखा दंगामस्ती करायचा, आईचं अजिबात ऐकायचा नाही. एकदा व्यासमुनी आल्यावर अंजनीनं सांगितलं, “बघावं तेव्हा उंडगत असतो, काहीतरी सांगा त्याला” व्यासमुनींनी लगेच एक यंत्रमंडल आखलं आणि मारूतीरायाला त्यात बंदिस्त केलं. अणुपासूनी ब्रह्मांडाएवढा होणार्‍या हणुमंताला ते मंडल भेदणं मात्र जमलं नाही. त्या यंत्रामध्येच तो शांतपणे ध्यान लावून बसलाय. मारूतीचे सगळे वानरदोस्त बाहेरच राहिले. ते यंत्राच्या भोवतीनं गोलाकार बाहेर बसून त्याला खेळायला चल ना म्हणून बोलावतायत, त्याला फळं दाखवताहेत, खेळण्यांचं आमिष दाखवतात असं कोरलंय. ही अगदीच दंतकथा नसावी असं म्हणायची वेळ यावी इतकी माकडं हंपीमध्ये फिरत असतात. पर्यटकांच्या हातातल्या बॅगा पळवणे, त्यांच्या टोप्या उचलणे वगैरे त्यांची आवडती कामं असतातच. या खेळसवंगड्यांना भेटण्यासाठी म्ह हनुमान इथं येत असावा असं मला कायम वाटतं. लहानपणीचे दिवस जिथं घालवले त्या ठिकाणच्या आठवणी आयुष्यभर साथ देतातच.. मग तो सामान्य मनुष्य असो वा चिरंजीवी हनुमान.

हंपीमध्ये रामाचं अजून एक भव्य देऊळ आहे. हजारीराम किंवा पट्टाभीराम मंदिर. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला रामायणामधील अनेक प्रसंग कोरलेले आहेत. संपूर्ण मंदिराला प्रदक्षिणा घालत गेलं की संपूर्ण रामायणाचे दर्शन होते. हे बहुतेक शाही कुटुंबाचे खाजगी मंदिर असावे, कारण, हे शाही भागाच्या आणि राणीवश्याच्या अगदी जवळ आहे. आता इथंही पूजा होत नाही कारण गाभार्‍यात मूर्ती नाहीत. इथल्या बहुतेक भव्य मंदिरांची हीच कहाणी आहे. एकदा आम्ही सर्व मित्रमैत्रीणी मिळून गेलो होतो, तेव्हाचा किस्सा. ग्रूपमधल्या एका मित्राला प्रत्येक भग्न वास्तू पाहिली की या मूर्ती ज्यांनी कुणी फोडल्या असतील त्यांना करकचून शिव्या देण्याची हुक्की यायची, देणार कशा? गाईड नेमका मुस्लिम. तरी तो हळूहळू पाठी राहून का होइना त्याचे जहाल शब्द वापरून घेतच होता. या मंदिराजवळ आल्यावर कुणीतरी गाईडला विचारलं की, देवळासमोरचा स्तंभ का उखडला? गाईड म्हणाला की, “हिंदू देवळांच्या वास्तुशास्त्रानुसार जिथे मूर्ती ठेवली जाते ती जागा आणि देवळासमोरील स्तंभ इथं विधीवत पूजा करून सोने आणि वेगवेगळी रत्नं पुरलेली असतात. त्यासाठी देवळासमोरचे खांब आणि गाभार्‍याची मोडतोड केली गेली. हंपीची तोडफोड सर्वात जास्त या लूटीसाठी झाली. मुसलमानांनी केलीच त्यात वाद नाही. पण हे गांव ओसाड झाल्यानंतर आसपासच्या हिंदूंनी ही मंदिरं पुन्हा बांधून काढण्याऐवजी उरलेली मंदिरं लुटण्यातच जास्त धन्यता मानली. श्रीमंत देवस्थानांचं म्हणूनच सर्वात जास्त नुकसान झालं.” आमचा मित्र हे ऐकून वरमला (म्हणून त्यानं शिव्या द्यायचं बंद केलं असं मात्र अजिबात नाही).

या गाईडच्या सात पिढ्या याच परिसरात गेल्यात. हंपी टूरीस्ट प्लेस म्हणून किंवा आर्किओलॉजिस्ट्सच्या दृष्टीनं महत्वाचं ठिकाण होण्याआधीपासून त्याच्या खानदानाला इथली सर्व माहिती आहे. त्याचं म्हणणं सिद्ध करण्यासाठी त्यानं लगेच बडवलिंगाचा संदर्भ दिला. या हजारीराम मंदिरात येण्याआधी ते मंदिर बघून आलो होतो. मंदिर कसलं जेमतेम गाभारा. बडव म्हणजे गरीब. कुण्या एका गरीब शेतकरणीनं कसलासा नवस पूर्ण झाला म्हणून कालव्याजवळस शिवलिंग स्थापन केलं असं मानलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे हंपीमध्ये सध्या असलेलं सर्वात मोठं एकाश्म शिवलिंग आहे. गाईडच्या मते, अशी देवळं जिथं काही रत्नं वगैरे मिळायची शक्यता कमी होती,तिथं नासधूस जास्त झाली नाही. अर्थात धार्मिक, युद्ध जिंकल्याच्या उन्मादामध्ये देवळं पाडली गेली, मूर्ती भग्न केल्या हे त्यालाही मान्य होतंच. याच बडवलिंगाच्या जवळच लक्ष्मीनरसिंहाची एक मूर्ती आहे. ही एकाश्म नाही, पणहंपीमधली सर्वात उंच मूर्ती आहे. चेहर्‍यावर उग्र भाव असल्यानं याला कित्येकदा उग्रनरसिंह असे मानले जाते, परंतु हा वास्तवात लक्ष्मीनरसिंह आहे. सात फण्यांच्या नागावर बसलेल्या या नरसिंहाच्या मांडीवर लक्ष्मी बसलेली होती, मात्र, या मूर्तीचं नुकसान करताना ती लक्ष्मीची मूर्ती तोडून फेकण्यात आली. आता असलेली मूर्ती नीट पाहिल्यास लक्ष्मीचा केवळ एक हात मात्र दिसतो.

हंपीमधल्या भव्य मूर्तींबद्दल बोलायचं झालं तर मला या दोन बाप्पांचा उल्लेख करायलाच हवा. हे दोन्ही बाप्पा माझे अगदी आवडते. हे. यांची नावं सासवीकाळु गणेश आणि कडलीकाळु गणेश. मोहरीचा गणपती आणि हरभर्‍याचा गणपती. या दोन्ही मूर्ती एकाश्म आहेत. एकमेकांपासून जवळच असलेल्या या दोन्ही मूर्ती साक्षात ८ आणि १५ फुटाच्या आहेत. पैकी मोहरीच्या गणपतीला सभोवताली केवळ एक मंड्प आहे. एका व्यापार्‍याने हा मंडप बांधल्याचा पुरावा मिळाला आहे. हरभर्‍याचा गणपतीभोवती गाभारा आणि समोर मोकळा मंडप आहे. याही मूर्तींना विद्रूप केलेलं आहे. या गणपतींना एवढी मजेशीर नावं का मिळाली माहित आहे? अभ्यासकांच्या मते, या गणपतीची पोटांचे आकार कोरताना मोहरीसारखे आणि हरभर्‍यासारखे असल्यानं. हंपीला विचारा, ती खुसूखुसू हसत सांगेल- पार्वतीमातेनं एकदा तिच्या लेकाच्या या अजस्त्र मूर्ती पाहिल्या. तिला रागच आला, म्हणाली माझ्या बाळाच्या अशा धष्टपुष्ट मोठ्या मूर्ती बनवताय होय. केवढासा त्याचा जीव. असल्या अचाट मूर्तींमुळे त्याला दृष्ट वगैरे लागली म्हणजे. म्हणून तिनं या मूर्तींची नावं मोहरी आणि हरभरा अशी ठेवून दिली. साक्षात जगतजननी असलेल्या मातेचा तिच्या बाळावरची माया. दुसरं काय?

याच विजयनगरमध्ये स्थापत्याची एक शैली विकसित झाली. प्रचंड पैसा. आजूबाजूला मुबलक कोरण्यासारखा दगड यामुळे इथं विविध मंदिरं, वास्तु, आणि मूर्ती उभ्या राहिल्या. देशापरदेशामधून अनेक कलाकार इथं येऊन आपली कला आजमावू पाहत होते. या सर्व वेगवेगळ्या संस्कृतीमुळे हंपी त्याकाळी “कॉस्मोपोलिटन” होतं. जिथं इतक्या वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येतात तेव्हा होणारी युद्धे जितकी अपरिहार्य असतात त्याहून अधिक अटळ असतं त्या संस्कृतींचं एकमेकांमध्ये बेमालूमपणे मिसळून जाणं. हंपीच्या वास्तुशिल्पांमध्ये हिंदू, जैन, बौद्ध, इस्लामिक, ग्रीक अशा वेगवेगळ्या शिल्पपद्धतींचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. हत्तीखाना बांधताना त्याचे घुमट हिंदू, जैन आणि इस्लामिक या आर्कीटेक्चर पद्धतींनी बांधले आहेत हे दिसतंच पण कमल महाल म्हणून ओळखल्या जाणार्‍या इमारतींचा पाया हिंदू मंदिरांप्रमाणे आणि वरच्या कमानी इस्लामिक पद्धतीच्या आहेत ते बघून फार मजा वाटते. महाल बांधताना वायुवीजनाची अशी काय सोय केली आहे, जेणेकरून हंपीच्या जीवघेण्या कोरड्या उन्हाळ्यातदेखील इथं आल्यावर थंडावा मिळेल. हंपीमध्ये सर्वत्र फिरताना पाण्याचे दगडी पाईप दिसत राहतात. दगडांनी बांधलेले हायड्रोलिक सिस्टीम्स पाहता त्याकाळी पाण्याचे व्यवस्था कशी करता येत असेल ते दिसून येते. हा भौगोलिक भाग मुळातच कमी पावसाचा आहे. त्यामुळे तुंगभद्रेमधून मिळणारे पाणीच संपूर्ण शहराला पुरवण्यात येत असे. तुंगभद्रेमधून एक संपूर्ण कालवा खणून राजवाडा आणि राणीवश्याला पाणी पुरवण्यात आला होता. शहरामध्ये बर्‍य़ाच ठिकाणी पाण्याची मोठमोठ्या टाक्या आणि पुष्करणी बांधलेल्या सापडतात. त्याखेरीज विहीरी आणि तळीदेखील खोदली जात असत. आज हे दगडी पाईप तुटलेफुटलेले आहेत. तुंगभद्रेवर जवळच बांधलेल्या धरणांमुळे नदीचे पाणी आता कमी झालेलं आहे तरीही अजूनहीहंपीमध्ये शेतीसाठी, केळींच्या बागांसाठी याच शतको जुन्या कालव्यांचं पाणी वापरलं जातं. याच राजवाडा परिसरामधेच शंकराचे पाताळेश्वर मंदिर आहे. शब्दश: जमीनीच्या पातळीखाली खोदून देऊळ बांधलेलं आहे. या मंदिरामध्ये कायम पाणी असतं, गाभार्‍यापर्यंत जाताच येत नाही. जाऊनही काही फारसा उपयोग नाही कारण आतमध्ये कसलीही मूर्ती अथवा शिवलिंगच अस्तित्त्वात नाही. परिणामी देऊळ आहे, पण देव नाही.

खरंतर पूजेविना देऊळ ही संकल्पनाच कित्येकदा पटत नाही. किमान मलातरी. कोकणातली देवळं पाहत लहानाची मोठी झाल्यानं असेल कदाचित. तरीहीहंपीमधलं हे माझं सर्वात आवडतं ठिकाण. विजय विठ्ठल मंदिर. काही अभ्यासकांच्या मते, आणि बर्‍याच दंतकथांच्या मते या देवळात देवपूजा कधी झालीच नाही. देवळाच्या प्रांगणामध्ये छोटी मंदिरे आहेत. कल्याण मंटप आहे. रथयात्रेसाठी संपूर्ण प्रांगणाभोवती कोरलेला मार्ग आहे. याखेरीज सर्वत्र सुंदर कोरलेली शिल्पे आहेत. काही मजेदार शिल्पे आहेत, म्हणजे एकाच मूर्तीत सोळा वेगवेगळी रूपे किंवा इकडून बघितला तर हत्ती तिकडून बघितला तर वृषभ अशा पद्धतीची. एखाद्या वास्तुविशारदाला पहाटे एखादं कोवळं स्वप्न पडावं आणि त्या स्वप्नामधून त्यानं ही शिल्पाकृती उभारावी असं हे विजय विठ्ठल मंदिर. इथला विठ्ठल हल्लेखोरांच्या भितीनं महाराष्ट्रातल्या पंढरपूरात नेऊन लपवला अशी एक दंतकथा सांगितली जाते (म्हणून कानडा राजा पंढरीचा). पण हे हंपी आहे. इथं प्रत्येक सामान्य कथेला काहीतरी असामान्यतेची किनार आहेच आहे. त्यानुसार या मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर देवांनी स्वत:च या देवळात रहाण्यासाठी ठाम नकार दिला. कारण, हे मंदिर फारच भव्य आणि सुंदर असल्यानं त्यांना इथं राहायला संकोच वाटला असता. तस्मात, या देवळामध्ये कधीही पूजा अर्चा झालेली नाही. पण आपल्याला देऊळ या संकल्पनेचंच इतकं कौतुक असतं की या देवळात देव नस्ला तरीही ते देऊळच राहतं.

इथंच ते संगीत वाजवणारे खांब आहेत. खूप लहानपणी जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा या खांबांना हात लावता येत होता. आता संवर्धनाच्या कारणानं परवानगी नाही. हे खांब खरंच वाजतात. गाईडनं तेव्हा आम्हाला ढोलक, तबला मृदुंग, वीणा असले वेगवेगळी वाद्ये वाजवूनदेखील दाखवली होती. आमचं संगीतज्ञान अगाध असल्यानं तेव्हा आम्हाला ते अद्भुत वाटले होते. हे खांब नक्की कसे वाजतात ते शोधण्यासाठी ब्रिटीशांनी दोन खांब तोडूनदेखील पाहिले म्हणे. ते तुटके खांब आताही दाखवतात. काहीच वेगळेपण नव्हतं त्या खांबामध्ये. पण संगीत ऐकू येतं हे मात्र खरं.

विजय विठ्ठ्ल मंदिरासमोरचा हा दगडी रथ म्हणजे हंपीचा आयकॉन ठरलाय. निरखून पाहिलं तर दगडाच्या आतमधल्या बाजूला अजून पावसापाण्याउन्हाहवेपासून वाचलेले काहीरंगदेखील दिसतात. पूर्ण रंगवलेला, उत्सवासाठी फ़ुलापानांनी नटलेला, दिव्यांनी सुशोभित केलेला हा रथ कसा दिसत असेलयाची मी कल्पना करायचा प्रयत्न करतेय. त्याचबरोबर वार्षिक उत्सवासाठी नटलेली हंपी मला दिसायला लागते. आजूबाजूला लोकांची गडबड असेल. पूजेची तयारी चालू असेल. कुणीतरी देवाच्या उत्सवमूर्तींना नटवून आणलं असेल. समोरचे भाविक मान वर करून करून त्या मूर्तींना बघायला प्रयत्न करत असतील. कुणाच्या मुखातून एखादे काव्य किंवा स्तोत्र आपसूक म्हटले जात असेल. अख्ख्या नगरीमधले लोक या प्रांगणामध्ये लोटलेले असतील. अंगणभर रांगोळी काढली असेल, केशराकुंकवाचे सडे घातले असतील. स्त्रिया ठेवणीतले दागदागिने घालून शालू नेसून डोक्यामध्ये हातभर मोगर्‍याचे गजरे घालून फिरत असतील. ढोल-नगारे वाजत असतील. किंवा सनई चौघडेसुद्धा. शिवाय विजय विठ्ठल मंदिरामधल्या त्या सुप्रसिद्ध खांबामधून येणारं संगीत असेलच. सर्वत्र तेलातुपाचे दिवे पेटवले असतील. खांबाखांबावर मशाली जळत असतील. हंपीच काय पण आजूबाजूच्या गावामधली आलेली सर्व जनता कौतुकानं हे वास्तुवैभव पाहत असेल. देवाच्या उत्सवमूर्ती लाकडी रथामधून याच देवळाच्या प्रांगणामध्ये मिरवल्या जातील.. मोठा जयघोष होइल. कुणाच्या तरी पायांतले पैंजण इतक्या गर्दीमध्ये हरवतीललगेच कोणीतरी ते आठवणीनं जपून उचलून घेईल. लहान मुलं आनंदानं खिदळत असतील. राजा संतोषानं उंच जोत्यावरून नगरीमधलं हे आनंदांचं थुईथुई नाचणारं कारंजं बघत असेल. उत्सवासाठी जमलेली जनता आजचा दिवस किती छान गेला, आणि पुढल्यावर्षीच्या उत्सवाला अजून काय काय करायचं याची चर्चा करत घरी जाईल. पण पुढल्या वर्षी उत्सव होणार नाही. त्याआधीच एक युद्ध होइल. सगळंच संपून जाईल. देवळं तोडली जातील. मूर्ती भंग केल्याजातील. जीव घेतले जातील. कुणालातरी सापडलेले ते नाजुक पैंजण कुणाच्यातरी मदमस्त आरोळीखाली चिरडले जातील. कसला उत्सव, कसली जत्रा आणि कसलं काय. सगळंच आयुष्य उद्ध्वस्त. इतिहासाच्या पुस्तकामध्ये अमुक राजा जिंकला आणि तमुक राजा हरला अशी नोंद होइल. “सुमारे” किती जीवितहानी झाली त्याची नोंद. पण किती आयुष्यं उद्ध्वस्त झाली त्याची कुठं नोंद करतात का हो? इतिहासामध्ये नोंद अशी आहे की, युद्ध हरल्यावर हंपीची लूट झाली त्यामध्ये पाच महिने हंपी जळत होती. शत्रूनं इथं येऊन नगरी लुटायला सुरूवात करण्याआधी इथल्या राजानं शेकडो हत्तींवर शहरामधला खजिना लादून दुसरीकडे नेला. तरीही उरलेली नगरी लुटत राहिली. लुटणार्‍यांनी केवळ सोनंनाणं लुटलं नाहीतर, नेताना जे सापडेल ते सर्व जाळतपोळत गेले. घरं उखडत गेले, महाल पाडत गेले.काय वाटलं असेल तिथल्या लोकांना. किती किंचाळले असतील. तळतळले असतील. घरंच्या घरं जळताना पाहून काय वाटलं असेल. एकेकाळी या शुभ्र रांगोळीवर लाल कुंकवाची बोटं उठवली होती, आणि आज त्याच अंगणामध्ये लालभडक प्रेतांवर घातलेलं पांढरं कापड. एक अख्खं साम्राज्य कोसळलं आणि ते कोसळल्यानंतर त्याला परत उभारणारं कुणीसुद्धा आलं नाही...सर्वत्र मृत्यूचं थैमान आणि आगीचं तांडव.आणि मग त्या आगीमधूनदेखील शिल्लक राहिले ते हे दगडी अवशेष. याच अवशेषांकडे चार शतकांनंतर पाहणारी मी एक वेडी.

पण इथं संध्याकाळी येऊन बसलं की अगदी मनापासून वाटतं की इथल्या या दगडांनी खरंच हे संगीताचा जे काय आभास वगैरे असेल तो बंद करावा आणि माझ्याशी बोलावं. खूप सांगण्यासारखं आहे त्यांच्याकडे. मला ते युद्धाची माहिती नकोय. तहाची नोंद नकोय. राजकारणामध्ये नक्की काय घडलंय ते नकोय. इथल्या राजेरजवाड्यांच्या सोन्यानाण्याचे हिशोब नकोत. मला ऐकायच्यात ते इथल्या सामान्य लोकांच्या कहाण्या. कसे जगत होते ते लोक. कसं आयुष्य होतं त्यांचं. काय स्वप्नं होती. अशा कहाण्या या दगडांजवळ असतील ना? कधीतरी मला त्या ऐकायला मिळतील का?

इथ फिरत असताना ही इतिहासाची पानं मीच स्वत:च्या मनानं उलगडायचा प्रयत्न करते. भूतकाळाच्या त्या इवलाश्या झरोक्यामधून पलिकडे काहीतरी दिसतंय का ते बघण्य़ाचा दुर्दम्य अट्टहास चालूच राहतो.. पलिकडे हंपी सुहास्य मुद्रेनं उभी असते. अंगावर जितके मौल्यवान दागिने तितकेच जखमांचे व्रणदेखील. रात्रीच्या अंधारामध्ये काळोखाच्या सावलीसारखे दिसणारे छोटेमोठे डोंगर आज परत सूर्याच्या किरणांनी वेगवेगळ्या रंगानी चमकत असतात. नजरेसमोरून वाहणारी तुंगभद्रा तिच्या मार्गाने जातच राहते.. जिथवर नजर जाईल तिथवर पसरलेले मंदिरांचे अवशेष आज मला ताठ मानेने “देव नसला म्हणून काय झालं? आमचा प्रत्येक दगड म्हणजे एका जिवंत इतिहासाची निशाणी आहे” म्हणून सांगतात.. मी हात सहज पुढे करते. एखाद्या शेकडो वर्षापूर्वीच्या दगडावरून फिरवते. ती निर्जीव अजस्त्र शिळा त्या स्पर्शानं शहारते. माझ्या अंगावर त्या शहार्‍याचे रोमांच उठतात. कुठ्तरी कसल्यातरी अज्ञाताला माझी ओळख पटते. त्या क्षणापुरती मी नंदिनी राहत नाही. माझ्यासमोर हंपी शहर राहत नाही. कालाच्या कुठल्यातरी पटलावर आम्ही दोन्ही एकच होऊन जातो. ही अख्खी सृष्टी एकच होऊन जाते. पण तो क्षण पुढे सरकतो. माझा हात अजून त्या शिळेवरच असतो, नजरेसमोर हंपी पसरलेली असते. त्या क्षणाच्या आठवणी दोघांच्या मनामध्ये कायमच्या कोरलेल्या राहतात. शिळेवर कोरलेल्या एखाद्या मूर्तीसारख्याच.

(समाप्त)

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle