चाकवत गरगटं

माझ्या आईची चाकवत गरगट्याची रेसिपी अशी:

चांगला ताजा बघून चाकवत आणणे. जाड, मोठ्या पानांचा आणलेला तिला आवडत नाही. मध्यम, मध्ये दाबली तर कटकन मोडणारी पाने असलेला असला तर मस्त.

निवडून घेतलेला चाकवत, अख्खे शेंगदाणे, थोडीशीच डाळ(हे पुलंच्या भाषेत वाचायचं झालं तर कोंबडीत मसाला कसा हवा, शराबी डोळ्यात सुरमा असावा तसा. म्हणजे भाजी चाकवताचीच वाटायला हवी, डाळीची किंवा शेंगदाण्याची नको) :)

आणि चवीला मीठ असं सगळं ती सरळ कुकरला लावून घेते. चाकवत लगेच शिजतो, जास्त शिट्ट्याची गरज नाही.
मग रवीने ताक करतो तसा घोटून बारीक करायचा तो.

मग नेहमीची फोडणी, त्यात भरपूर हिरव्या मिरच्या आणि लसूण ठेचून घालायच्या.
लसणाचा वास आणि मिरचीचा ठसका पसरला कि त्यात चाकवत घालायचा.

चांगली उकळी येऊन द्यायची. पाणी अगदी अंगापुरतंच घालायचं. जास्त पातळ चांगली लागत नाही ही भाजी.

भाजी करतानाच पलीकडे मस्त आजरा बासमती किंवा तत्सम सुंदर वासाच्या तांदळाचा भात ठेवायचा शिजायला. दोन्ही वासांनी तोंड खवळतं, पण जरा दम काढायचा आणि गरम असतानाच गट्टम करायचा भाताबरोबर.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle