सुरती ऊंधीयूं

अवलने उंधीयूंची रेसेपी लिहीली आहे. थोडी तिची कृती, थोडे इंटरनेट पाहून केलेले आणि थोडे मनाचे बदल असं मिळून ही पाककृती तयार झाली. डॉक्यूमेंटेशन होईल म्हणून इथे लिहीली. मी एका इव्हेंटसाठी केली होती. त्यामुळे भरपूर प्रमाणात केली, तेच प्रमाण इथे लिहीते म्हणजे कुणाला मोठ्या प्रमाणात हवी असल्यास उपयोग होईल.

साहित्य -

भाज्या -
१. बटाटे- ७ ते ८ मध्यम
२. रताळू (Purple yam) - ४ मोठे
३. भारतीय रताळी - ५ ते ६ मध्यम आकाराचे
४. इथे जे स्वीट पोटॅटो मिळतात ते २ मोठे
५. सुरती पापडी - दीपची फ्रोजन २ पाकिटं (ताजी मिळाली नाहीत म्हणून)
६. सुरती पापडी लिलवा (दाणे) - दीपचे १ रेग्यूलर साईझचे पाकिट
७. तूर लिलवा (दाणे) - दीपचे १ मोठे पाकिट
८. मटार -१ दीपचे १ मोठे पाकिट
९. २० ते २५ लहान वांगी
१०. सहा कच्ची केळी
याव्यतीरीक्त सुरणही घेऊ शकता पण मला मिळाला नाही म्हणून घातला नाही.

वाटणासाठी -
२.५ पाकिट दीपचे ओले खोबरे, दोन ते तीन मोठ्या जुड्या कोथींबीर, २ लसणाचे गड्डे सोलून, अर्धी वाटी दाण्याचे कूट सगळे मिक्सरमधे ओबडधोबड वाटून घेतले.

कालवायचा मसाला -
वर वाटलेला मसाला.
१ वाटी लसणाची पेस्ट (ओला लसूण मिळाला तर उत्तम नाहीतर नेहमीचा घेतला तरी हरकत नाही). मिळाल्यास लसणाची थोडी पात बारीक चिरून.
१ वाटी आल्याची पेस्ट
१ वाटी हिरव्या मिरच्यांची पेस्ट (तिखटपणावर प्रमाण कमी जास्त करावे)
१ कप सुक्या खोबर्‍याचा कीस
१ ते दीड कप दाण्याचं कूट
१ वाटी धने पावडर - भाजून ताजी करून घेणे
१ वाटी जीरे पावडर - भाजून ताजी करून घेणे
३ टेबलस्पून गरम मसाला ( मी MDH चा वापरला)
पाव वाटी ओवा
अर्धी वाटी तीळ
मीठ चवी नुसार, थोडे उचलते असावे
साखर ४-५ चमचे

मुठीया - ३ मोठ्या जुड्या कोवळी मेथी
एक कप डाळीचे भरड
१ कप डाळीचे नेहमीचे पीठ
१ कप कणीक
१ टेबल्स्पून आलं पेस्ट
१ टेबलस्पून लसूण पेस्ट
१ चमचा तीळ
१ चमचा ओवा
१ चमचा मिरची पेस्ट
१ चमचा धने पावडर
१ चमचा जीरे पावडर
१ लहान चमचा तिखट
मीठ
सर्व कालवून घेऊन गोळा करावा. मुठीये वळून खरपूस तळून घ्यावेत. हे आदल्या दिवशी तळून ठेवले तरी चालतील.

वाठीभर बारीक चिरलेली कोथींबीर, बारीक चिरलेली लसणाची पात.

बटाटे, रताळू, Sweet potato आणि रताळे सोलून मिडीअम साईजचे तुकडे करून पाण्यात ठेवून स्वच्छ धूवुन घ्यावेत. (रताळू (Purple yam) चिकट असते ते वेगळ्या पाण्यात ठेवावेत). वांग्याची देठं काढून चिरा देऊन पाण्यात ठेवावीत. केळ्याचे तुकडे करून घ्यावेत. सगळ्या कंदांमधलं पाणी काढून टाकून थोडा मसाला लावून ठेवावा. वांग्यात मसाला भरून ठेवावा. केळ्याला एका बाजूने चीर देऊन त्यातही मसाला भरावा.
मुठीया तळलेलं तेल घेऊन गरज भासल्यास अजून तेल घालून चमचाभर ओवा घालावा. सुरती पापडी, तूरीचे दाणे, मटार, सुरती पापडीचे दाणे घालून चांगले हलवून ५ ते ७ मिनीटे वाफेवर शिजवून घ्यावे. शिजवताना वर झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवावे. ५- ७ मिनीटांनी सगळे कंद,वांगी,केळी घालून अलगद हलवून वर मुठीये ठेवावेत. कोथींबीर, पात पसरवून झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. दर ७-८ मिनीटांनी अलगद हलवावे. मी साधारण सव्वा तास शिजवला. सर्व करताना वरून परत कोथींबीत पेरावी.

टीपः तेल सढळ हस्तेच घ्यावे. माझ्याकडून तेल थोडं कमी पडलं असं वाटलं. तेलात कंजूसी करू नका.
तयारी आधी करून ठेवली तर जास्त वेळ लागत नाही. या प्रमाणात एक full size ट्रे भरून शिवाय अजून थोडा वर राहिला. १६ oz चे ३२ डबे अगदी काठोकाठ भरले.

WhatsApp Image 2019-01-15 at 7.26.39 PM.jpeg

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle