हवाई - भाग ५ - 'ब्लॅक सँड बीच' आणि ' Waipi'o Valley'

वॉल्कॅनोज पार्कवरुन परतीच्या रस्त्यावर 'ब्लॅक सँड बीच' पहायचे ठरवले. याचे दुसरेच नाव 'Punaluʻu Beach' असे आहे. या बीचवरील सँड काळ्या बेसॉल्ट आणि वितळलेल्या लाव्हापासुन बनली आहे. जेव्हा लाव्हा वाहत येऊन समुद्राला मिळाला तेव्हा तेथेच थंड होऊन थांबला आणि हा बीच तयार झाला. येथे स्नोर्केलिंगही करता येते.

तत्पुर्वी वाटेत हा कॉफीचा मळा दिसला. नाव 'KAU Coffee Mill'. मिल आणि मळ्याची टुअरही देतात. पण आम्ही पोचलो तेव्हा बंद झाली होती. चालत्या गाडीतुन काढलाय फोटो त्यामुळे हललाय.

DSC_0322.JPG

बीचवर गाडी पार्क केली आणि सगळ्यात पहिले लक्ष गेले ते सभोवतालच्या पुरातन वृक्षांकडे. या झाडाचे खोड पहा. सफाईदारपणे बनवलेला कठडाच वाटतोय की नाही? नवरयाकडे पाहु नका. नको तेव्हा नको तिथे उभे रहायची 'खोड' आहे त्याला.

IMG_4293.JPG

तेथे एक कमळांनी भरलेले तळेही होते. त्यात बदके डुंबत होती. तळ्यावरुन जायला एक लाकडी पुल केलाय पण त्याच्या बरयाचशा पायरया तुटल्या आहेत त्यामुळे जपुन पाय ठेवावा लागतो. आजुबाजुला दलदलसदृश काळोखे पाणी आणि त्यावर येऊन लटकणार्‍या वृक्षांच्या पारंब्या. अगदी पुराणात दंडकारण्याचे वर्णन आहे ना तसा परिसर होता. मला वल्कले नेसुन फिरावेसे वाटु लागले. पण नंतर बीचवेअरवर ती हौस भागवली मी.

IMG_4294.JPG

मुलाला निसर्गसौंदर्य वगैरे काही कळत नाही. सारखी काय झाडे फुले पाहता असे म्हणत त्याने आम्हाला ओढत ओढत समुद्राजवळ नेले. येथे मोठी पाणकासवे आहेत असे वाचल्याचे मी नवरयाला सांगत होते तेवढ्यातच एक कासव दिसलेही. पाठोपाठ दुसरेही आले. बराच वेळ त्यांची गंमत पाहिली आणि मग पाण्यात शिरलो. सुखद गार स्पर्श. सुर्यास्त व्हायला १५/२० मिनिटेच अवकाश होता. तोपर्यंत लाटांशी भरपुर खेळलो. स्नोर्कलिंगही केले. पण आमच्या हॉटेलच्या बीचवर केलेले स्नोर्कलिंग जास्त लक्षात राहिले माझ्या. त्यावर पुढच्या भागात लिहेन.

black sand beach.jpg
IMG_4174.JPG

भरपुर हुंदडुन झाल्यावर झाडीत जाउन कपडे बदलले आणि जेवणाची सोय करावी म्हणुन गुगलला शरण गेलो. वाटेवर 'कोना 'एक इंडियन रेस्टॉ आहे हे कळले आणि गाडी त्या रस्त्याला हाकली. २/३ दिवस भारतीय पदार्थ न मिळाल्याने आज ते मिळायलाच हवेत अशी परिस्थिती होती. हवाईची (big island ची) आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे येथे पावलोपावली मॅकडी, पिझा शॉप्स आणि तत्सम फास्ट फुड रेस्टॉ. अजिबातच नाहीत. मुलाची ही सर्वात नावडलेली गोष्ट आहे हे नमुद करते. तर, 'कोना' येथे पोचल्यावर कळले की हे भारतीय नाही तर नेपाळी रेस्टॉ आहे. पण चालतंय की. बिर्याणी, टिक्का, नान, चहा, लस्सी असे सगळे मिळाले. चव काही फार बरी नव्हती पण त्यावेळेस ते बेस्ट जेवण वाटले. अजुन आमच्या हॉटेलपर्यंत पाउणएक तासाची ड्राइव्ह बाकी होती. इतकं जेवलेलो की येथेच बीचवर पाय पसरुन झोपावे का यावर विचारमंथन केले. मग तो आळस समुद्रावर चालुन मांजरींना खाऊ घालुन घालवला. हो, ते सांगायचे राहिलेच.

हवाईला भरपुर मोकाट मांजरी आहेत. अगदी आमच्या हॉटेलच्या पार्किंगपासुन ते कुठल्याही बीचवर, मार्केटात, बागेत, अशा सगळीकडे मांजरी बागडताना दिसतात. बोक्यासाठी एखादी उचलावी असे सतत वाटायचे. पण म्हंटले नको, येथे नंदनवनात छान सगळ्या मांजरी/बोके सुखात राहतायत. आमच्या येथे थंड हवेत आणि बंदिस्त घरात यांना नाही जमायचे. तर, कुठल्याही रेस्टॉतले उरलेले पदार्थ आम्ही पार्सल करुन घ्यायचो आणि जेथे मांजरी दिसतील तेथे त्यांना खाऊ घालायचो. भटके कुत्रे फार नाही दिसले त्या मानाने.

हॉटेलवर पोचलो तर 'आवाज वाढव डिज्जे, तुला आईची शप्पथ हाय' शी मिळते जुळते हवाई गाणे लागलेले आणि त्यावर काही लोक नाचत होते. काहीतरी प्रायव्हेट पार्टी होती. आम्ही पुलमध्ये उतरुन अंग शेकत शेकत तो करमणुकीचा कार्यक्रम पाहिला. हे असे नाचायचे म्हणजे २/३ पेग्ज रिचवलेले हवेत. आणि मुलगा झोपल्याशिवाय ते शक्य नव्हते. पण तो कल्ला लवकरच थांबला आणि समुद्राचा मंद आवाज कानावर येऊ लागला.

उद्या 'Waipi'o Valley' ला जायचे होते. हे ठी़काण हॉटेलपासुन तासाभराच्याच अंतरावर असल्याने निघायची घाई नव्हती. उद्या वॅलीवरुन परत आल्यावर जरा हॉटेलही एंजॉय करायचे ठरवले. त्याप्रमाणे स्पा बुकींग केले आणि मुलासाठीही 'lei making', आणि 'dolphin watching' या अ‍ॅक्टिवीटीज बुक केल्या. तेवढाच मोकळेपणा आम्हाला.

सकाळी ११ च्या सुमारास वॅली जवळ पोचलो. वरुन नजारा असा होता.
IMG_4171.JPG

ही वॅली उतरुन बीचपर्यंत जाता येते. मात्र अगदी स्टीप उतार असल्याने फक्त जीपनेच जाता येते. बाकी कुठलेही वाहन जाऊ शकत नाही. आता आली का पंचाईत. आमची मस्टँग काही जाऊ शकणार नव्हती. मी सुरुवात केली,"तरी मी सांगत होते की आपण जीप घेऊया'. नवरा लगेच "खोटं बोलु नकोस, आपण एसयुवी घेणार होतो. मस्टँग पाहुन तुम्हीच चेकाळलात". परत मी "मी नाही चेकाळले, हा चेकाळला". मुलाकडे बोट दाखवले, त्याने कानावर हात ठेवले. असा सुखसंवाद चालु असताना आमचा मांडवलीकिंग म्हणाला, "असुदे आपण हॉटेलात परत जाऊन टीव्ही पाहुया". आम्ही भानावर आलो, अरे, आपण कुठे आहोत काय करतोय! हवाईत भांडायचे नाही म्हणजे नाही. पायी जावे का? इथेतिथे चौकशी केल्यावर कळले की पायी उतरायला तशी फक्त ३० मिनीटेच लागतात. खरा प्रॉब्लेम आहे तो वर परत येण्याचा. पायी वर आलो तर तास दीड तास लागु शकेल. आम्ही दोघे एवढे सहज चढु शकतो असा विश्वास वाटला. प्रश्न मुलाचा होता. मी काही हल्ली त्याला उचलु शकत नाही. नवरा म्हणाला, नाही चालला तर मी घेईन उचलुन. असा रामभरोसे प्लॅन करुन आम्ही वॅली उतरायला सुरुवात केली.

बीचवर पोचल्यावर मात्र योग्य निर्णय घेतला ही खात्री पटली. अतिशय सुंदर, स्वच्छ पाणी. लाटा मात्र फार उंच येत होत्या. काही ठिकाणी संथही होत्या. बापलेकाला पोहता येते, मला नाही. त्यामुळे प्रत्येक लाट येऊन गेल्यावर मी तळागाळाला जाऊन गटांगळया खाऊन वर यायचे. हे मात्र लगेच सरळ उभे राहुन लाटेवर स्वार. माझी भरपुर टिंगलटवाळी झाली तेथे :radu: काय करु, स्विमिंग शिकण्याचा खुप प्रयत्न केला. दोनदा पर्सनल ट्रेनरकडुन शिकायचा प्रयत्न केला पण फ्लोट करण्यापलिकडे प्रगती झाली नाही.
IMG_4316.JPG
धबधबा पहा समुद्रात कोसळतोय:
IMG_4315.JPG

पाण्याच्या बाहेर आले आणि वाळुचा स्पर्श घेत फिरले (फोटो कमेंटमध्ये).

२ वाजता वर चढायला सुरुवात केली. वाटेत एक शिवलिंगासारखे देऊळ दिसले, जे उतरताना दिसले नव्हते. मी देऊळ म्हणतेय पण नक्की काय होते कुणास ठाऊक! मी नमस्कार केला आणि काय चमत्कार! पाठुन एक जीप आली आणि थांबली. आत एक कपल होते, त्यांनी विचारले सोडु का वर तुम्हाला? आम्ही आपले 'कशाला कशाला' असे उगीचच आढेवेढे घ्यायच्या बेतात असतानाच मुलगा थँक्यु म्हणुन टुणकन आत जाऊन बसला. मग आम्हीही बसलो बापडे. त्या कपलचे आभार मानले. नाहीतरी बीचवर एवढी एनर्जी घालवल्यावर आमची थोडी फॅ फॅ झालीच असती सहकुटुंब वर पोचताना.

हॉटेलात ४ च्या आत पोचायला हवे होते. वाटेत जेऊन घेतले आणि प्रसिद्द 'कोना' कॉफी प्यायली. मला काही विशेष आवडली नाही. तशीही मी चहाप्रेमी आहे. मुलाला त्याच्या अ‍ॅक्टीवीटीजना सोडले आणि आम्ही स्पामध्ये कपल्स मसाज घेतला. मला मसाज नेहमीच आवडतो पण नवरयाला तो नाजुक साजुक मसाज आवडला नाही. सगळा वेळ गुदगुल्या होत होत्या म्हणे :dokyalahat: आज आक्खी संध्याकाळ निवांत असणार होती. हॉटेलची सगळी दालने फिरलो. एका दालनात हवाईचे दुर्मीळ फोटो, प्रतिकृती होत्या. एका दालनातुन समुद्राचे सुंदर दृष्य दिसत होते. फिटनेस सेंटरमध्ये जाऊन वजन चेक करुन आलो. भटकंतीमुळे कमीच झाल्याचे दिसले. त्यावर खुष होऊन लगेच चरायला गेलो. हॉटेलात रोज एक सिग्नेचर डिश बनवायचे. त्या दिवशी हवाईयन टाकोज होते. ते 'mai tai' बरोबर स्वाहा केले. मुलाला पिकअप केले. त्याची स्विमिंग पुलची हौस त्याने पुरेपुर भागवुन घेतली. उद्या लांबचा पल्ला होता. 'हवाईअन ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन' आणि 'केव्ज'.

रात्री झोपायच्या आधी बोक्याला कॅमेरयावर चेक केले. तो मस्त हात पाय पसरुन सोफ्यावर पहुडला होता. जागाच होता कारण शेपटी हवेत हलत होती. तो खुष असला की शेपुट अशी हवेत तरंगवतो. म्हंटले आज हा खुष का आहे? नवर्‍याचे उत्तर, त्याला वाटत असेल की हे लोक घरदार, मालमत्ता माझ्या नावावर करुन निघुन गेलेत आणि दिमतीला सिटर आहेच. अजुन काय पाहिजे आयुष्यात! बादशहासारखे वाटत असेल त्याला. म्हंटले असेल, तसेही असेल. मग आम्ही हाका मारुन मारुन बोक्याला पिडले. तो बिचारा भुत पाहिल्यासारखे कॅमेरयाच्या दिशेने पहात होता. "तुला काय आणु रे हवाईवरुन, खाऊ की माऊ"? असे त्याला विचारले. तो म्हणाला "म्याऊ"! अशा प्रकारे सुखात पहुडलेल्या बोक्याला छळुन आम्ही सुखाने झोपलो.

हवाई- भाग ४ - 'Hawai'i Volcanoes National Park': https://www.maitrin.com/node/3326

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle