हवाई - भाग ४ - 'Hawaiʻi Volcanoes National Park'

पार्कची पार्श्वभुमी थोडक्यात सांगायची तर, सुमारे ७० दशलक्ष वर्षांपुर्वी पॅसिफिक महासागरात उसळलेल्या ज्वालामुखीमुळे जमीन समुद्रातुन वर आली आणि जी बेटे झाली ती म्हणजेच 'हवाई'. साऊथइस्ट आशियातुन वारयाबरोबर वाहत आलेले किडे, परागकण, बिया, स्पायडर्स तसेच पक्ष्यांनी पोटातुन अथवा पंखांवरुन वाहावलेल्या बिया, समुद्राच्या लाटांनी वाहत आलेले किडेमकोडे अशा काही मार्गांनी हवाई बेटावर जीवसृष्टी निर्माण झाली. काही उभयचर, सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी इ. मात्र येथे पोचु शकले नाहीत. हळुहळु येथील झाडांच्या, पक्ष्यांच्या, प्राण्यांच्या नवीनच जाती येथे जन्मल्या. ज्या आशिया खंडातील काही जातींशी साम्य दाखवतात.

एकदा हवाईला असतानाच मी नवरयाला म्हंटलेही, "का म्हणुन अमेरिकेने हे बेट जिंकले? एखाद्या आशियाई देशाचेच मालकत्त्व हवे या बेटावर". मग आम्ही बराच राजकीय वाद घातला आणि नंतर अमेरिका, आशिया, भारत, मुंबई, असे करत करत एकमेकांच्या घरी पोचलो. एकमेकांचा अजुन कुळोद्धार व्हायच्या आतच आपण हवाईत आहोत आणि तरीही भांडतोय? याचे भान आले आणि एक एक बिअर पिऊन शांत झालो.

तर मुळ मुद्दा हा की, हवाईचे 'वॉल्कॅनोज नॅशनल पार्क' अशा वनस्पती आणि जीवांचे संवर्धन करण्याचे कार्य करते. ही 'युनिक इकोसिस्टीम' अशीच रहावी यासाठीच प्रामुख्याने हे पार्क उदयाला आले आहे. आणि ७० दशलक्ष वर्षांपुर्वी झालेल्या ज्वालामुखीचे सर्वाधिक अवशेषही याच पार्कमध्ये आढळतात.

या पार्कच्या सध्याच्या स्थितीबद्दल मी काढलेली माहिती अशी होती की, मे २०१८ ला येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि पुढील ३ महिने गरमागरम लाव्हामुळे पार्क बंदच ठेवावे लागले. पार्कजवळील काही निवासीत भागांतील ७०० च्या आसपास घरांचेही नुकसान झाले. पार्कजवळील काही भागात भुकंपही झाले आणि कडीकपारी कोसळुनही रस्ते बंद झाले. साधारणपणे सप्टेंबर २०१८ च्या सुमारास हा लाव्हा थंड झालेला पण पार्कचे काही विभाग मात्र बंदच ठेवलेले. रस्ते दुरुस्ती, पाइपलाइन्स इ. नवीन टाकायचे म्हणुन. आम्हाला डिसेंबरात जरी पार्क खुले असणार होते तरी फिरण्यावर बंधने असणार होती. ती अर्थातच आमच्याच सुरक्षिततेसाठी.

पार्क बरेच मोठे आहे. एक गोल वळसा घातला तर ६०/६५ किमी होईल एवढे मोठे. आम्ही तेथे पोचलो तेव्हा ११ वाजलेले. आमच्या वायकोलोआच्या हॉटेलपासुन २ तासांची ड्राइव्ह. रस्त्यात मध्येच हा फोटो काढला. कुणी 'लेले' आहेत का ईथे? Heehee
DSC_0778.JPG

इथे पोचलो तेव्हा कुंद हवा आणि पावसाचा हलका शिडकावा चालु होता. येथे फिरताना जॅकेट्/स्वेटर मस्ट आहे. मोकळा परिसर असल्याने बोचरा वारा येतो. विझीटर सेंटरवर आम्हाला पार्कचा मॅप मिळाला आणि कुठुन ड्राइव्ह चालु करावी, कसे जावे, कुठे थांबावे याबद्दल मार्गदर्शन मिळाले. 'ज्युनिअर रेंजर' चा एक दिवसभराचा प्रोग्रॅमही होता, त्यात मुलाने उत्साहाने भाग घेतला. या उपक्रमाअंतर्गत दिवसभर फिरुन एका बुकलेटमध्ये २०/२५ प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात. पार्क फिरुन झाल्यावर सिनीअर रेंजर ही उत्तरे तपासतो आणि ज्युनिअर रेंजरचा बिल्ला आणि प्रशस्तीपत्रक द्यायचे की नाही ते ठरवतो.

बुकलेट घेऊन आम्ही एक माहितीपट पहायला ऑडिटोरिअममध्ये शिरलो. येथे हवाईचा शोध कुणी, कसा लावला. मग किती देशांतील लोक येथे हक्क सांगावयास आले. त्यांनी कशी संस्कृती वाढवली वा नासवली हे सांगितले. अतिशय सुंदर चित्रफीत होती. हवाईचे काही दुर्मीळ पक्षी, प्राणी, लोप पावलेली हवाईयन घरे, भांडी, कपडे, लोक, दागिने, हत्यारे दाखवली. वाईट वाटलेच. माणुस जेथे जेथे पोचला तेथे तेथे त्याने स्वतः च्या सोईसाठी परिसराला बदलले आहे. पण आता तरी जे काही पुरातन अवशेष उरले आहेत ते जपण्याचे आटोकाट प्रयत्न येथील संबंधित अधिकारी करत आहेत. टुरिस्ट लोकांनी काय करावे, काय करु नये याबद्दल्ही सुचना दिल्या आणि माहितीपट संपला.

पार्कमध्ये कुठेही खायला मिळत नाही म्हणुन आम्ही विझिटर सेंटरजवळील रेस्टॉमधुन लंच पार्सल घेतले. पाऊस जरी हलका होता तरी गारव्यामुळे पाँचोज विकत घेतले आणि निघालो. पहिला स्टॉप 'Crater Rim Drive'. क्रेटर म्हणजे जमीनीतला मोठा खड्डा जो की नैसर्गिक हालचालींनी तयार होतो. अगदी खोल दरीसारखा होता तो. किंवा महाकाय विवरही म्हणता येईल आतुन धुरही येत होता. जवळ जाऊन आत वाकुन पाहिले की भिती वाटत होती.

IMG_4290.JPG

उद्रेकाच्या वेळी हे असे दृष्य दिसते: (हा फोटो आंतरजालावरुन साभार)

crater.jpg

तेथुनच थोड्या अंतरावर जमिनीखालुन वाहणारे गरम पाण्याचे झरे होते. पाणी दिसत नव्हते मात्र एका विशिष्ट ठिकाणी उभे राहिले की अंगावर वाफा येत होत्या. अगदी सॉनाबाथच. जवळच्या झाडाझुडपांतुनही वाफा दिसत होत्या.

IMG_4291.JPG

'सल्फर बँक' म्हणुन एक जागा होती, तेथे गंधकाने माखलेली जमीन, दगड होते. अतिशय उग्र वास होता त्या परिसरात.
IMG_4292.JPG

तेथील स्थानिक लोकांचे म्हणणे असे की जमिनीखालील ज्वालामुखी अजुनही विझलेला नाही आणि खोल भुगर्भात तो उसळतोच आहे. शास्त्रज्ञही म्हणत आहेतच की हवाईला काही वर्षांत महाप्रलयी ज्वालामुखी होईल. संशोधन चालु आहे. काही स्थानिक म्हणतात की 'पेले' नावाची जी ज्वालामुखीची देवता आहे (जिने हवाई बेट बनवले आहे) ती सध्या आराम करत पहुडली आहे. ती उठली की प्रचंड अवतार घेऊन दर्शन देईल. जमले तर या स्थानिक दंतकथांवर एक वेगळा भाग लिहेन. सध्या हा तिचा फोटो पहा.

pele.jpg

पुढचा स्पॉट 'लाव्हा ट्युब' (Lava Tube -Tropical forest area featuring a long, subterranean cave formed by ancient flowing lava.) या ट्युबच्या आत जायला सध्या मनाई होती. काही काम चालु आहे. मात्र जवळपासचा 'रेन फॉरेस्ट' परिसर खुप सुंदर आहे. दगडाच्या पायरया, ओलीहिरवी झाडी, वृक्ष आणि गुहेच्या तोंडाशी असलेला काळोख. बोगद्यात शिरायचा मोह महत्प्रयासाने टाळला. हो, गार्ड्स पार्कच्या बाहेर काढु शकतात नियम उल्लंघन केल्याबद्दल. कॉलेजला असताना सर्रास असले उद्योग केलेत पण आता मुलासमोर चांगले उदाहरण ठेवावे म्हणते.

lava tube 2.jpg

आणि हा आतुन: (आंतरजालावरुन साभार)
lava tube 3.jpg

पुढे 'Devastation Trail' या ट्रेलवर १९५९ साली झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेले 'क्रेटर' आणि इतर अवशेष आहेत. हे क्रेटर पहावले नाही मला. पाताळ पाताळ जे म्हणतात ते म्हणजे हेच असाच विचार माझ्या मनात आला. अंगावर काटा आला आणि मागे फिरले मी. फोटो नाहीत कारण मी घाबरुन काढलेच नाहीत. आणि जोरदार वारयामुळे नवरा मुलाला घट्ट पकडुन उभा होता त्यामुळे त्यानेही काढले नाहीत. हो, आमचा सुका बोंबिल उडुन जाईल अशी भिती वाटली नवरयालाही. अतिशयोक्ती नाही पण एखादे लहान मुल तोल जाऊन पडु शकते. तसा कठडा केलाय तेथे, पण कुणी जाल तर सावध रहा.

एव्हाना दमलेलो आम्ही. मग निवांत जागा शोधुन पोटपुजा केली आणि मुलाला बुकलेट भरायला बसवले. आमच्या मदतीने बरेच प्रश्न सोडवले त्याने. पार्कमध्ये फिरायला अजुनही बरेच आहे पण आमचे मन भरले आणि आम्ही ४ च्या सुमारास निघायचे ठरवले. परतीला काही झाडा फुलांचे फोटो काढले. पक्ष्यांचे मात्र काढणे कठीण आहे. गर्द झाडीत लपुन ते नुसतेच आपल्याला हाका मारत राहतात पण समोर येत नाहीत.
DSC_0854.JPG

परतीला विझिटर सेंटरमध्ये मुलाचे बुकलेट सबमिट केले. सिनिअर रेंजर म्हणुन एक ६५/७० वर्षांच्या आजीबाई होत्या. अतिशय प्रेमाने मुलाला प्रश्न विचारले त्यांनी. त्याची जी उत्तरे चुकलेली ती नीट समजावुन बरोबर केली आणि मुलाला एक शपथ घ्यायला लावली. त्या शपथेचा सारांश असा की ,'मी जिवंत असेपर्यंत निसर्गाचे, नैसर्गिक संपत्तीचे आणि अवशेषांचे जतन करेन. त्यांना नुकसान पोचेल असे वर्तन स्वतःही करणार नाही आणि इतरांनाही करु देणार नाही. प्लॅस्टीक, कागद इ. वस्तु गरजेपुरत्याच वापरेन. रिसायकल करण्यापेक्षा सुका कचरा कमीच होईल असेच पाहीन'. मला ही शपथ खुप आवडली. शपथ झाल्यावर मुलाला प्रशस्तिपत्रक दिले आणि त्याच्या शर्टला ज्युनिअर रेंजरचा बिल्ला लावला. तेथे उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि मुलाच्या डोळ्यात जरा पाणी तरळले. आजीबाईंचे प्रेम ,कळकळ पोचली असावी त्याच्यापर्यंत. मलाही सोनाराने कान टोचले म्हणुन खुप आनंद झाला. त्या आजींचे मी मनापासुन आभार मानले. त्या म्हणाल्या, आमची पिढी आता ५/१० वर्षांत जाईल. तुम्ही आणि तुमच्या पोरांनी पृथ्वीची काळजी घ्यायला पाहिजे. मी मनापासुन हो म्हंटले आणि खरंच काही बदल केले घरी आल्यावर. तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. असो, हा पहा त्यांचा फोटो:
IMG_3337.jpg

पार्कच्या बाहेर आलो आणि परतीच्या रस्त्यावरच एक सुंदर बीच आहे असे कळाले म्हणुन तेथे जायचे ठरवले. गाडीत बीचवेअर भरुनच निघालेलो. हवाईला पावलो पावली समुद्र आहे. कुठेही मनात येईल तेव्हा डुंबता यावे म्हणुन कपड्यांचा एक सेट गाडीतच ठेवलेला. बाकीचे उद्या लिहिते. दमले बुवा Whew

हवाई - भाग ३ - आगमन आणि 'फॉल्स':https://www.maitrin.com/node/3319

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle