आल्याचं डेझर्ट (दही)

एक अत्यंत अभिनव प्रकार. एकदम सोपा, स्वयंपाकघरात सहज सापडणार्‍या वस्तूंपासून बनवलेला आणि तरीही सर्वस्वी अनोखा. पाहुणे मंडळींना त्यांच्यादेखत डेझर्ट बनवून देऊन खुश करा.

साहित्य : आलं, दूध, साखर

प्रमाण : असं काही खास नाही. अंदाजे.

कृती : आलं किसून एका बारीक गाळणीत घालून पिळून घ्या. हा आल्याचा रस बाजूला ठेवा. आता दुध उकळवा. ते गार करत ठेवा. साधारण उकळत्या दुधाच्या पाऊणपट तपमान झाले की त्यात आवडीप्रमाणे साखर घालून विरघळवा.

आल्याचा रस छोट्या छोट्या काचेच्या अथवा चिनीमातीच्या वाट्या/बोल्स मध्ये घालून त्या वाट्या जरा गोल फिरवा म्हणजे आतून सगळीकडे रस लागेल.

यात आता ते गरम दूध हलकेच ओता. तसंच ठेऊन द्या.

पंधरा-एक मिनिटांत दही लागेल. हे आल्याच्या चवीचं गोड आणि गरम दही केवळ अवर्णनीय लागतं.

मला ही रेसिपी इतकी आवडली की लगेच केली. नशिबाने जुनं आलं घरात होतं. मी चुकून मोठ्या बोलमध्ये लावलं पण तरीही लागलं. अगदी घट्टं लागत नाही.

विशेष टिपा :
१. आलं जुनं असलं पाहिजे. नव्या आल्याच्या रसाचं दही लागत नाही.
२. दही लागलचं नाही तरी ते दूधही उत्तम लागतं. त्यामुळे याबाबतची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
३. दरवेळी दही लागेलच अशी खात्री नाही त्यामुळे आधी घरच्यांवर, मग जवळच्या पाहुण्यांवर प्रयोग करावेत. डायरेक्ट व्हिआयपीजवर शायनिंग मारायला जाऊ नये.

माहितीचा स्त्रोत :
इकोनॉमिक टाईम्स मध्ये श्री. विक्रम डॉक्टर यांचा कॉलम. त्यांची रीतसर परवानगी घेऊन ही रेसिपी मी इथे टाकली आहे.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle